प्रत्येक बाबतीत तुम्ही राजकारण खेळायला लागलात, मग तुमचा कपाळमोक्ष व्हायला वेळ लागत नाही. फ़क्त निर्णायक वेळ येण्याची तुमच्या प्रतिस्पर्ध्याला प्रतिक्षा करावी लागते. भाजपा बंगालमध्ये तशाच प्रतिक्षेत दबा धरून बसला आहे. कारण तिथल्या समर्थ मुख्यमंत्री व तृणमूल कॉग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बानर्जी इतिहास विसरून इतिहासाचीच पुनरावृत्ती करीत आहेत. अवघ्या अकरा वर्षापुर्वी त्याही अशाच दबा धरून बसल्या होत्या. परंतु तेव्हा तिथे शिरजोर असलेली डावी आघाडी इतकी बेफ़ाम झालेली होती, की त्यांना पराभूत करण्यासाठी ममतांना फ़ार कष्ट उपसण्याची वा डावपेचही खेळायची गरज नव्हती. फ़क्त डाव्यांचा कपाळमोक्ष होण्याची प्रतिक्षा होती. ती पुर्ण झाली आणि ममता बंगालच्या सर्वेसर्वा होऊन गेल्या. अर्थात त्यातूनही डाव्यांना सावरणे अशक्य अजिबात नव्हते. पण सावरण्यासाठी मुळातच आत्मपरिक्षण करून आपल्या चुका ओळखाव्या लागतात आणि त्यानुसार आपल्यामध्ये सुधारणा करावी लागत असते. त्याच्या उलटी बाजू अशी, की चुकाच नाकारत गेलात तर सुधारण्याची प्रक्रीया सुरू होत नाही आणि नामशेष होऊन जाण्याची नामुष्की येत असते. ममतांनी त्याच इतिहासाची नव्याने पुनरावृत्ती करायचा चंगच बांधलेला असेल तर भाजपाने उगाच डावपेच खेळायची गरज कुठे उरते? डाव्यांप्रमाणे ममता आता कुठे चुकत आहेत? २००९ च्या दरम्यान डाव्या आघाडीच्या गुंडगिरीने बंगालभर थैमान घातले होते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सामान्य माणसाला जगणेही अशक्य करून टाकलेले होते. कायदा व प्रशासनात कुठेही डाव्यांचे कार्यकर्ते इतका हस्तक्षेप करीत होते, की लोकांना सरकार बदलून टाकण्याखेरीज पर्याय उरला नव्हता. लोकांना ममतांचे कौतुक असण्यापेक्षा डाव्यांच्या तावडीतून सुटण्याची सोय हवी होती आणि म्हणून मग तृणमूल कॉग्रेस विजयी होत गेली. आज नेमकी डाव्यांची जागा ममतांनी घेतली असून डाव्यांवरही लोकांचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे अकस्मात भाजपा हा सत्तांतराचा पर्याय म्हणून समोर आला आहे. पण ममतांचे डोके कुठे ठिकाणावर आहे? त्या कोरोनाच्या विळख्यातही अतिरेकी राजकीय गुंडगिरी करून आपल्याला हाकलून लावायची जणू सक्तीच सामान्य नागरिकांवर करीत आहेत.
कोरोनाने जगाला विळखा घातलेला आहे. त्यात भारतातही कोरोनाने जनजीवन ठप्प झालेले आहे. त्याखेरीज अन्य पर्याय नसल्याने प्रत्येक पक्षाला राजकीय भूमिका गुंडाळून केंद्राशी सहकार्य करीत आपापल्या राज्यात स्थैर्य निर्माण करणे भाग आहे. पण ममतांना त्यातही आपला भाजपा विरोध वा मोदींच्या विरोधात लढायची खुमखुमी आवरता आलेली नाही. परिणामी बंगालमध्ये कोरोनाचा धुमाकुळ हाताबाहेर गेला असून राज्यातले डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यक कर्मचारी व संस्थाही ममतांच्या कारभाराने हवालदिल झाल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये बेशिस्त, चाचण्यांचा घोळ आणि वाढत्या रुग्णांच्या संख्येतही गफ़लती करून आपण उत्तम कारभार करीत असल्याचा एक देखावा ममतांनी उभा करायचा प्रयत्न केला. त्यातील उणिवा किंवा त्रुटी दाखवणार्या माध्यमांची व पत्रकारांची मुस्कटदाबीही केलेली आहे. पण बंगाली माध्यमात गोंधळ लपवता आला असला तरी मरणार्यांना रोखणे ममता कसे साध्य करणार होत्या? त्यामुळे महिनाभराचा कालावधी उलटून जाताना अकस्मात कोरोना मृतांची संख्या वाढू लागली. त्याआधी वैद्यकीय उपचार व कामे करणार्या संस्थांनी ममतांच्या हडेलहप्पीवर टिका केली होती. त्यातल्या त्रुटी व गैरकारभाराची लेखी तक्रार केंद्राकडे पाठवली होती. पण त्यांना गद्दार म्हणून किंवा खोटे पाडून ममतांनी सारवासारव केली. गुंडांना हाताशी धरून तक्रार करणार्या नागरिकांनाही गप्प केले. पण जोवर पिडीत संख्या मर्यादित असते, तोपर्यंत गुंडगिरी चालून जाते. पण पोलिसांच्याही दंडेलशाहीला लोक जुमानायचे थांबत नाहीत तिथे पितळ उघडे पडू लागते. आता तशीच वेळ आलेली आहे आणि दहा महिन्यांवर विधानसभा मतदान असल्याने ममतांना खडबडून जाग आलेली आहे. कारण अशा रितीने माणसे मरू लागली आणि रुग्णांची संख्या हाताबाहेर गेली; तर निवडणूकही गेली समजा असे कान सल्लागारांनी टोचले. तेव्हा ममतांची झिंग उतरली आहे.
दोनतीन आठवड्यापुर्वी ममतांनी सत्य दडपण्यासाठी हॉस्पिटल्स वा दवाखान्यातही दडपशाही केली. मृतांच्या नातलगांना न कळवता कोरोना मृतांचे देह परस्पर स्मशानभूमीत नेऊन क्रियाकर्म उरकण्यात आले. कोरोनाने मरण पावलेल्यांना भलत्यासलत्या आजाराचे कारण दाखवून मृत घोषित करण्यात आले. चाचण्या घेण्याचे टाळून केंद्राने साहित्य पुरवले नसल्याचाही कांगावा करून झाला. मुस्लिम वस्तीमध्ये लॉकडाऊनचे पालन धुडकावले गेल्यानेही कोरोनाचा विस्तृत फ़ैलाव होऊन गेला. त्यावर पांघरूण घालण्यासाठी डॉक्टरांनी मृत्यूचे कारण किंवा प्रमाणपत्र देण्यावर निर्बंध घातले. ते काम आपल्या राजकीय नेत्यांच्या समितीकडे सोपवले. त्याचा एकत्रित परिणाम आता समोर येऊ लागला आहे. आरंभी देशातील सर्वात कमी रुग्णबाधा असलेले राज्य म्हणून ममतांनी मिरवले व त्यांच्या प्रवक्त्यांनी केंद्रावर तोफ़ा डागल्या. फ़ार कशाला शेवटी केंद्राला विशेष पथके पाठवून बंगालच्या रुग्णांच्या हेळसांडीची दखल घ्यावी लागली. तर त्यांच्याशी असहकार्य करून ममतांनी आणखी गोंधळ घातला. म्हणून सत्य कुठे लपणार होते? अर्थात अशा लोकांचे काम सोनाराने टोचावे लागतात. ममतांना बाकी कोणाचीही पर्वा नसली तरी पुन्हा विधानसभा जिंकण्याची चिंता नक्कीच आहे. त्यासाठी त्यांनी या क्षेत्रातील जाणकार रणनितीकार म्हणून ओळखल्या जाणार्या प्रशांत किशोरला हाताशी धरलेले आहे. कंत्राटच दिलेले आहे. त्याने़च कान टोचल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार असेच चालत राहिले तर कोरोनाच्या थैमानाने पुढल्या दोनतीन महिन्यात काही हजार बंगाली नागरिक मृत्यूमुखी पडतील. मग २०२१ सालाच्या आरंभी व्हायची राज्य विधानसचेची निवडणूक गमवावी लागेल, असे किशोरनेच समजावल्यावर ममतांची झिंग उतरली आहे. अचानक त्यांनी कोरोनातून माघार घेऊन काम राज्याच्या आरोग्य अधिकार्यांकडे सोपवले आहे. पण व्हायचे ते नुकसान होऊन गेले आहे. कारण झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या बंगालमध्ये वाढू लागली आहे.
सवाल इतकाच आहे, की आगामी दोनतीन महिन्यात ही संख्या आवरली नाही आणि मृतांचा आकडा फ़ुगत गेला, तर त्याची छाया दहा महिन्यानंतरच्या मतदानावर नक्कीच पडणार आहे. भाजपाविषयी बंगाली मतदाराला आस्था वा प्रेम नसले तरी कोरोनाची हेळसांड जाहिरपणे बोलणारा तेवढाच पक्ष मतदारांनी सध्या बघितला आहे. तेच तर २०१७-१८ सालातही चालू होते. ममतांची मनमानी व तृणमूलच्या गुंडांचा धुडगुस यावर एकट्या भाजपाच बोलत होता. त्याचाच फ़ायदा लोकसभा मतदानात त्या पक्षाला मिळाला आणि ममतांना जबरदस्त दणका बसला. त्यांची लोकसभेतील संख्या ३३ वरून २२ इतकी खाली आली, तर भाजपाचे संख्याबळ बंगालमधून लोकसभेत ४ वरून १८ पर्यंत पुढे गेले. ती भाजपाची मेहनत असण्यापेक्षाही ममतांची कृपा होती. त्यांच्या मनमानीला कंटाळलेले लोक आपोआप भाजपाकडे वळले होते. खरे तर त्यापासून धडा घेऊन ममतांनी मनमानी थांबवायला हवी होती आणि कुठलेही खुसपट काढून केंद्राशी भांडण्याचे तंत्र सोडायला हवे होते. कोरोनाच्या संकट काळात तर केंद्राशी सहकार्य करायला पर्यायच नव्हता. अगदी हाडवैर असलेले डावेही केरळात केंद्राशी जुळवून घेत बाजी मारून गेले आहेत. मग ममतांना इतकेही कशाला समजू शकलेले नाही? किंबहूना डाव्यांपासून इतकाच धडा मिळालेला नाही. मुळात २०११ सालात ममतांनाही डाव्यांच्या तशाच कृपेने सत्ता व बहूमत मिळालेले होते. त्यांची बंगालमध्ये तितकी संघटनात्मक शक्ती नव्हती. आजच्या भाजपाइतकाच तृणमूल नवखा व विस्कळीत पक्ष होता. पण डाव्या आघाडीच्या गुंडगिरीतून मुक्त व्हायला उतावळ्या झालेल्या मतदाराने डाव्यांच्या मुख्यमंत्र्यालाही पराभूत करून बंगाल ममतांकडे सोपवला होता. आपल्याच यशातून बंगाली जनतेने दिलेला धडा ममतांना शिकता आलेला नाही, इतकाच याचा अर्थ आहे. त्यातून त्यांच्यासमोर २०११ सालची परिस्थिती त्यांनीच उभी करून ठेवलेली आहे.
नंदीग्राम व सिंगूरच्या हिंसक गुंडगिरी व शासकीय दडपशाहीने डाव्या आघाडीची राज्यातील प्रतिमा डागाळलेली होती. तेव्हा हतबल झालेल्या सामान्य जनतेचा आवाज होऊन ममता पुढे सरसावलेल्या होत्या आणि २००९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांना मतदाराने उत्स्फ़ुर्त प्रतिसाद दिला. डाव्यांना ठामपणे नाकारत मतदाराने ममतांच्या पक्षाला प्रचंड यश दिले. बरोबर दहा वर्षांनी त्याचेच प्रतिबिंब २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पडलेले दिसते. पण तेव्हा डाव्यांना जाग आली नाही व गुंडगिरीला कंटाळून मतदार ममतांकडे झुकलेला असतानाही डाव्यांनी हडेलहप्पी कायम ठेवली. मग २०११ सालात विधानसभेला डाव्यांचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्यही विधानसभेच्या आपल्या मतदारसंघात पराभूत होण्यापर्यंत परिस्थिती ओढवली. २००९ च्या लोकसभेतील आपले यश ममता आज विसरल्या आहेत आणि तेव्हाच्या डाव्यांप्रमाणे अधिकच मस्ती व धांगडधिंगा करीत आहेत. मग २०११ चे प्रतिबिंब २०२१ साली पडले तर नवल कसे असेल? प्रशांत किशोर याला ते कळत असल्याने त्यानेच ममतांना कोरोनाची बाधा राजकारणात कशी होऊ शकते, त्याचे कान टोचलेले आहेत आणि अचानक ममता नरम पडल्या आहेत. पण दोन महिने हाताबाहेर गेलेली परिस्थिती सावरण्याइतका वेळ त्यांच्यापाशी उरला आहे काय? मागल्या दोनतीन महिन्यात त्यांनी बंगालच्या आरोग्याला केंद्राशी चाललेल्या जुगारात पणाला लावून झालेले आहे. त्यामुळे बंगालभर वाढलेल्या कोरोना बाधेची प्राथमिक लक्षणे समोर आलेलीच आहे. हे प्रकरण आणखी सहा आठ महिने चालणार आहे आणि तोपर्यंत आपल्या चटावलेल्या गुंड पाठीराख्यांना ममता कसे रोखणार व आवरणार; याला महत्व आहे. त्यात कसूर झाली तर ममता मतांच्या ज्वालामुखीवर बसलेल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. माध्यमांची गळचेपी वा कांगावा करून चर्चा बंद पाडता येतात. गुप्त मतदानात असल्या गुंडगिरीने बाजी मारता येत नाही. भाजपाचे बंगालमधले वाढते प्रस्थ त्यांची मेहनत असण्यापेक्षाही बानर्जींची माया, किमया व ‘ममता’ असणार आहे.
आणि महाराषट्रात ??
ReplyDeleteममता या केजरीवाल यांच्या जोडीच्या आहेत.अराजकवादी व हाताबाहेर गेले की केंद्राला दोष द्यायचा. दिल्ली मध्ये असेच झाले. या बेजबाबदारपणा मुळे करोना वाढेल हे वाईट.लेखात महत्त्वाचे मुद्दे आहेत. पण ममताचे करोना घोटाळ्यांचे तपशील द्यावेत ही विनंती. महत्त्वाचा लेख.शेअरिंग
ReplyDeleteजित्याची खोड मेल्या शिवाय जाणार नाही....
ReplyDeleteBhau The Print ya news channel chi he news vachun apali pratikriya dya, https://www.google.com/amp/s/theprint.in/opinion/uddhav-thackeray-failed-covid-crisis-bring-in-army/404053/%3Famp
ReplyDeleteBhau Bangal che rajkaran corona nantar badalel ka hyawar aple vichar "pratipaksh" channel war aikayala awadel...
ReplyDeleteभाजपकडे बंगाल मध्ये चेहरा आहे का? कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देशाला आणि राज्याला चेहरा लागतोय. त्यात प्रशांत किशोर ममता बॅनर्जी यांच्या बरोबर असल्याने ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपवाल्यांकडून जेवढ आरोप होतील आणि वाईट वाईट शब्द जातील त्याचे राजकारण करणार. कारण 2002 पासून मोदीना ज्या गोष्टींचा फायदा होतोय ते प्रशांत किशोर यांना चांगले ठाऊक आहे.मोदींचे डावपेच प्रत्येक निवडणुकीत प्रशांत किशोर वापरत असतात.(डावपेच हा मी वापरलेला शब्द मला मोदींसाठी योग्य वाटत नाही तसेच खटकतोय सुद्धा, कारण ते कितीही आणि कोणताही सरळ आणि चांगला मुद्दा घेऊन गेले तरी त्यावर टिकाच होतीय. थोडक्यात ममता दीदी यांच्याऐवजी प्रशांत किशोर यांना हरवायला चांगला उमेदवार पाहिजे.
ReplyDeleteभाऊ तुमच्यासोबत किमान एकदा फोनवर बोलण्याची इच्छा आहे.तुम्ही तुमचा नंबर शेअर करू शकत नाही म्हणून माझा नंबर देत आहे एकदा बोललो तरी अनेक वर्षाची इच्छा पूर्ण झाली असे समजेन 8999863634
क्षमस्व....
भाऊ मी थोडा सहमत नाही आहे कारण बंगाल bjp लोकल चेहरा नाही आहे...जे दिल्ली मध्ये झालं...बिहार २०१६ झाल...ते नाकारून कास चलेन मोदी शहा bjp संघ तुम्हाला २०/२५% मत मिळवून देऊ शकता पण जिंकायला स्वतः अशी काही ५/१० मत हवी असतात ती लागतात आणि विधानसभेला नेता नसेन आणि समोर ममता कसाई चेहरा असला तरी लोक स्थानिक नेता समोर दिल्ली नेता मत देणार नाहीत निदान विधानसभेत तरी लोकसभेच्या देतात...त्यामुळे समोर नेता लागतो...मुकुल रॉय तो होऊ शकत नाही..बंगाल मंत्री आहे मोदी सरकार मध्ये तो घाबरत आहे..ममता डाव्या समोर उभी राहिली...तास कोण तरी स्थानिक हवा जो ममता उरावर बसेन आणि मी तिला विरोध करू शकतो असा सांगू शकेन. कदाचित सौरव गागुली शेवटच्या क्षणी आणतील असा मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं भाऊ...चेहरा नाही दिल तर मला नाही वाटत हा किल्ला सर होईन...
ReplyDeleteVery correct 👍
Delete