Tuesday, May 5, 2020

तो शिवसैनिक कुठे हरवलाय?

Amitabh Bachchan: I am Alive because of Bal Thackeray | FilmiBeat ...

अडचणी कोणाला नसतात? पण त्या अडचणीवर मात करणार्‍याला माणूस म्हणतात. त्यात आपल्या अडचणींवर मात करून पुढे इतरांच्या मदतीला धाव घेणार्‍याला कार्यकर्ता म्हणतात. तो कुठल्या सरकारी सेवेत नसतो किंवा त्याला इतरांना मदत करण्यासाठी कुठेही वेतन वगैरे मिळत नसते. पण शेजारीपाजारी वा परिसरातल्या लोकांच्या सदिच्छा मिळण्यावर तो समाधानी असतो. कुठलीही संघटना वा राजकीय पक्ष व संस्था अशाच कार्यकर्त्याच्या बळावर पायावर उभी रहात असते. जेव्हा अशा कार्यकर्त्यांचा दुष्काळ पडतो, तेव्हा समाजावर खरेखुरे संकट येत असते. लॉकडाऊनच्या कालखंडात त्याचा मोठ्या प्रमाणात प्रत्यय आलेला आहे. कोरोना हे नवे संकट नाही. अशी कमीअधिक लहानमोठी अनेक संकटे भारतीय समाजाने सहज पेललेली आहेत. पण त्याला कधी सरकारच्या दारी लाचार होऊन उभे रहाण्याची वेळ आली नाही. कारण भारतात कार्यकर्ता नेहमी भक्कमपणे जनतेच्या मदतीला उभा राहिलेला आहे. त्याच कार्यकर्त्यांच्या बांधिलकी वा हिंमतीतून अनेक संस्था व राजकीय पक्षही उभे राहिलेले आहेत. पण असे अनेक पक्ष नावारूपाला आल्यावर आज आपले पायच विसरून गेलेत असे वाटू लागले आहे. दिल्लीत अलिकडल्या काळात उदयास आलेला आम आदमी पक्ष असाच लोकपाल आंदोलन वा तत्पुर्वीच्या काही कामातून आकाराला आला आणि पन्नास वर्षापुर्वी मुंबईत शिवसेना त्यातूनच नावारुपाला आली. अगदी शतकापुर्वी कॉग्रेसही कार्यकर्त्यांचे मोहोळ होते आणि पुढल्या काळात कम्युनिस्ट, समाजवादी वा अन्य पक्षांचाही उदय कार्यकर्त्यांच्या बांधिलकीतून झाला आहे. पण असे सर्व कार्यकर्ते वा त्यांचे कार्य फ़क्त सरकार विरोधातले नव्हते तर शासकीय यंत्रणा जिथे कमी पडते तिथे धाव घेऊन लोकांना संकटात हात देण्यासाठीच त्यांची जनतेला ओळख होती. आज तो शिवसैनिक कुठे गायब झालाय असा म्हणूनच अनेकांना प्रश्न पडलेला असेल. सत्तरीच्या पुढे गेलेले अनेक मुंबईकर तो शिवसैनिक नक्कीच शोधत असतील. तो बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक असता तर मुंबईत परप्रांतिय मजूर वा सामान्य गरीब रहिवाशांना इतके लाचार अगतिक व्हावे लागले असते का?

गेल्या दोनतीन आठवड्यात मुंबईत अडकलेल्या लाखो परप्रांतीय मजूरांची समस्या प्रकर्षाने समोर आली. त्यांना इतका दिर्घकाळ मुंबईत रोखून धरणे प्रशासनाला शक्य नव्हते आणि लॉकडाऊन यशस्वी करताना त्यांना योग्य रितीने हाताळणेही आवश्यक होते. बंदोबस्ताचा बोजा डोक्यावर असताना पोलिस वा शासकीय यंत्रणा तोकडी पडणार, हे कोणी वेगळे सांगायची गरज नाही. ती उणिव किंवा त्रुटी नसून अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे तिथेच कार्यकर्ता महत्वाचा असतो. मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाले वा कसाब टोळीचा हल्ला झाला, तेव्हा रक्तदानाच्या मोहिमेपासून रुगणवाहिकेच्या सेवेपर्यंत आघाडीवर शासकीय यंत्रणेपेक्षाही शिवसेना होती. हे मुंबईकराने पाहिले आहे व अनुभवलेही आहे. रेशनकार्ड असो वा कुठल्याही अशा लहानमोठ्या शासकीय योजनांचे खरेखुरे लाभ सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यातला पुढाकार असो, तो शिवसेनेच्या गल्लीबोळातल्या शाखांनी नेहमी घेतलेला होता. किंबहूना शिवसेना ही पहिली राजकीय सामाजिक संघटना असेल, जिच्यामुळे गल्लीबोळातल्या शाखा वा मदतकार्य करणारी कार्यालये सुरू झाली. आरंभापासूनच शिवसेना ही भागाभागातील शाखांच्या गजबजण्यातून लोकांपर्यंत पोहोचली. एकवेळ नजिक कुठे पोलिस चौकी वा प्रशासनाचे कार्यालय नसले तरी चालेल, पण सेनेशी शाखा, उपशाखा असायलाच हवी, ही मुंबईकराची धारणाच होऊन गेलेली होती. कारण केव्हाही अडल्यानडल्या
कामासाठी सामान्य नागरिक त्या शाखेत धाव घेऊ शकत होता. आधार कार्डसाठी अर्ज भरणे असो किंवा वीजेची जोडणी वा शाळा कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळी हवी असलेली प्रमाणीत कागदपत्रे असोत, शिवसेनेच्या शाखेत लोक धावायचे. त्याच मुंबई वा सर्व उपनगरात कालपरवा साधे प्रवासासाठी आवश्यक असलेले कागदपत्र, परवाने वा वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी उडालेली बेशिस्त बेवारस झुंबड बघून वाटले; शिवसेना कुठे आहे? तो जुना अशा प्रसंगी धावून येणारा शिवसैनिक कुठे आहे?

खरे तर हा प्रश्न एकट्या शिवसेनेलाही विचारण्याचे कारण नाही. कारण हळूहळू बहुतेक राजकीय पक्षांनी आपल्या कामात व कार्यशैलीत शिवसेनेचे अनुकरण केलेले होते. रुग्णवाहिका शिवसेनेने सार्वजनिक क्षेत्रात आणल्या. वॉर्ड वा गल्लीबोळात पक्षाची कार्यालये, आमदार नगरसेवकांची संपर्क कार्यालये, ही शिवसेनेची कार्यशैली इतर पक्षांनी अनुसरली. अशी कार्यालये म्हणजे कुठल्याही उद्यमी वा कार्यतत्पर लोकप्रतिनिधीचे प्रतिक बनुन गेले. त्याचे श्रेय शिवसेनेला असले तरी अलिकडे सर्वच पक्षांनी त्यांचे अनुकरण केलेले होते. पण हळुहळू असे बहुतेक नेते आणि लोकप्रतिनिधीच निवडणूकांच्या मतांमध्ये अडकून गेले. मतदाराला फ़ुकटातल्या वह्या पुस्तके गणवेश वाटणे किंवा यात्रा सहली करण्यात गुंतले. आपण संकट प्रसंगी धावून जाण्यासाठी आहोत, अडचणीच्या प्रसंगी मदतीला जाणे, हे आपले कर्तव्य असल्याचा त्या सर्वांनाच विसर पडला. मग निवडणूक जिंकण्यासाठी ग्राहक सेवेप्रमाणे आमिषे दाखवून नामानिराळे होण्याकडे कल गेला. त्याचे दुष्परिणाम आज मुंबईला भोगावे लागत आहेत. सगळ्याच पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांना आज सरकार वा प्रशासनाकडे काहीतरी मागण्यात धन्यता वाटू लागली आहे. पण आपणही तुटपुंज्या साधनांसह उणिवा त्रुटी भरून काढण्यासाठी असतो व आपली तितकी क्षमता आहे, त्याचेच विस्मरण झालेले आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९६८ सालात पहिल्यांदा निवडून आलेला परळचा विजय गावकर नावाचा कोवळा पंचविशीतला तरूण नगरसेवक वर्षभरात कोयना भूकंप झाल्यावर आपल्या घरात गप्प बसला नव्हता. त्याने आपल्या सहकार्‍यांना जमवून विभागात मदतफ़ेरी काढली व मिळेत तितके साहित्य घेऊन ट्रकभर माल गरजूंना वाटण्यासाठी सातार्‍याला धाव घेतली होती. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍यातून काढलेल्या जखमींना इस्पितळात न्यायला रुग्णवाहिका मिळाली नाही, म्हणून गजानन वर्तक या शाखाप्रमुखाने पुढल्या सहा महिन्यात वर्गणी जमवून शिवसेनेची पहिली रुग्णवाहिका रस्त्यावर आणली होती. शतकाचा महानायक अमिताभ बच्चनही त्या रुग्णवाहिका सेवेचा कायम ॠणी राहिलेला आहे



कोणाला आठवते का ती शिवसेना? तो गावकर किंवा गजाभाऊ वर्तक यांना बाळासाहेबांनी आदेश द्यावा लागला नव्हता किंवा कार्यक्रम म्हणून असे काही सुचवले नव्हते. अडचणीतल्या नागरिक रहिवाश्यांच्या मदतीला धावून जाणे, हा मंत्र होता आणि संकट आले की म्हणूनच लोकांना शिवसेना आठवायची. त्याच पुण्याईवर शिवसेना ही जादू उदयास आली. अनेक शाखांमध्ये रक्तदानाची शिबीरे़च होत नव्हती, तर कायमस्वरूपी रक्तदान करणार्‍या लोकांच्या रक्तगटाच्या याद्याही सज्ज असायच्या. अशी शिवसेना वा तिचे अनुकरण केलेले अनेक पक्ष कार्यकर्ते आज कोरोनाला शरण गेलेत काय? नसतील तर मुंबई वा अन्यत्र अडकलेल्या परप्रांतिय नागरिकांच्या घरवापसीचा विषय इतका अराजकाचा वा गोंधळाचा कशाला झाला? आज शिवसेना सत्तेत आहे आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्रीही आहे. पण लोकांना हवीहवीशी वाटणारी ती शिवसेना किंवा तो शिवसैनिक कुठे आहे; असा म्हणूनच प्रश्न पडतो. अर्थात ज्यांनी ती विजय गावकर वा गजानन वर्तकची शिवसेना बघितलेलीच नाही, अशा विशीतिशीतल्या शिवसैनिकांना वा सोशल मीडियातल्या बोलघेवड्यांना, ह्या प्रश्नाचा आशयही कळणार नाही, शिवसैनिकच कशाला? कुठल्याही पक्षाच्या अशा तावातावाने भांडणार्‍या, प्रत्युत्तर देण्यास उतावळ्या असलेल्या समर्थक व्यक्तीला यातली आपुलकीही समजू शकणार नाही. कारण हे तोंडाळ लोक कुठल्याही पक्षाचे कल्याण करीत नसतात वा प्रचारही करीत नसतात. त्यांना भांडण्यात रस असतो आणि समोरच्याला अपमानित करण्यात धन्यता वाटत असते. पण आपणच आपल्या पक्षाचे संघटनेचे जनमानसातील स्थान संपवित असतो, याचेही भान उरलेले नाही. संघटनेची महत्ता किंवा उपयुक्तता अशाचवेळी नजरेत भरणारी असते. आपुलकीचे नाते जोडून पक्षाचा जनमानसातील पाया भक्कम करण्याची हीच संधी असते आणि त्याचा सर्वच पक्षांना विसर पडला आहे. हे खरे तर कोरोनापेक्षाही मोठे संकट आहे. असो, आम्ही किंवा आमची पिढी भाग्यवान होती, ज्यांना असा कार्यकर्ता व शिवसैनिक अनुभवायला मिळाला.

20 comments:

  1. भाऊ ज्यांना कोणत्याही निवडणुकीला उभे राहायचे नाही असे रा स्व संघ, जनकल्याण समिती, वनवासी कल्याण आश्रम असे संघ परिवारातील कार्यकर्ते या संकटात पाय रोवून उभे आहेत हे korona संकट काळातील वास्तव आहे, विचारसरणी सोडून सेनेला मुख्यमंत्री पद मिळाले आहे पण त्यामुळे सामान्य शिवसैनिक उर्मी हरवून बसला आहे, या संकट काळात शिवसैनिक कोठेच दिसत नाहीत हे आपले म्हणणे अगदी खरे आहे

    ReplyDelete
  2. भाऊ नमस्कार, आपण लिहिलेला शिवसैनिकां विषयी चा लेख खरोखरच बाळासाहेबांची असणारी शिवसेना ची आठवण करून गेली सध्या चया करोना संकटात मदत करणारी सेना व शिवसौनिक लुप्त झाले हयाचे मुख्य कारण उद्धव ठाकरेंनी जे गठबंधन शिवसेनेच्या मुळ विचारधारेला टांगणीला ठेवुन केले त्यामुळे कट्टर शिवसैनिक मनातुन नाराज आहे ते उघडपणे बोलत नसले तरी मनातुन अनैच्छिक असल्यामुळे अशा वेळेस ते मैदानात उतरले नाही व त्याचा परिणाम बांद्रा घटने मध्ये दिसुन आला आणि नेतृतवाचा अभाव म्हणा किंवा परस्पर वार्तालाप नसलेला डोळयात भरतो

    ReplyDelete
  3. Bhau ghala ghala radlo he vachun ani aikun. Mazi shiv Sena jiche breed 80 takke samajkaran ase hote ti haravli. Bhau amhi he sagle anubhavle ahe ani tyat kharicha vata uchalla ahe.
    Aajchi awastha pahun bhayan watate. Koni te sagle parat deil ka?

    ReplyDelete
  4. भाऊ
    छान आठवणी.
    सर्वच पक्षांकडे त्या काळात समर्पित कार्यकर्ते होते.समाजसेवी संघटनाहि समाजसेवा करत होत्या.
    पण नेत्यानी तत्वाचे राजकारण सोडले.आयाराम गयारामना महत्व प्राप्त झाले. सत्तेतून पैसा व पैशातुन सत्ता हे सुत्र सर्वमान्य झाले व त्याला प्रतिष्ठा मिळाल्याने ही आजची स्थिती झाली आहे.सर्व थरांवरचा भ्रष्टाचार कमी करणे व तत्वांची कास धरणे हाच उपाय आहे.पंप्र मोदींच्याकडून नीच अपेक्षा आहे.मात्र हे काम अवघड आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. पंप्र मोदींच्या कडून हीच अपेक्षा आहे अशी सुधारणा करून घ्यावी चुकून नीच असे टाईप झाले आहे

      Delete
    2. Mala tech lihayche hote chu kun beech jhala typographical error.

      Delete
  5. भाऊ, ती शिवसेना बाळासाहेबांच्या हातातून उद्धवांच्या हातात गेली आणि हळूहळू संपली. कार्यकर्ते नेते बनले व त्यांची मुले युवा नेते. दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलण्यापुरतेच उरले.
    एके काळी चांगला कार्यकर्ता असेल तर दत्तजी साळवी, नलावडे हे त्यांनत्यांना मदत करुन पुढे आणायचे, देवरुखचे रविंद्र माने, कर्जतचे देवेंद्र साटम ही ठळक उदाहरणे. आता कार्यकर्त्यांना ती शाश्वती आहे का? पदोन्नती सर्वांनाच हवी असते, पण त्यांंच्या गुणावगुणाचा व कार्यक्षमतेचा विचार करुन त्यांना योग्य पदावर ठेवणे हे शिर्षस्थ नेत्यांचे काम असते. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व इतर पक्षात सध्या काय चित्र आहे, तर ते पक्ष एका कुटुंबाचे खाजगी पक्ष असल्यासारखे झालेत. पिढीजात अध्यक्ष, ते सांगतात ती पूर्व दिशा.

    शिवसेनेत आता पैशाचा खेळ झाला आहे, छोट्या छोट्या पदांसाठी तुमच्याकडच्या पैशाची किंमत केली जाते, जेवढे जास्त पैसे किंवा पैसे खेचायची अक्कल तेव्हडे पद मोठे, अशा लोकांची भरती झाल्यावर कार्यकर्ते उरत नाहीत आणि सामाजिक बांधीलकी फक्त वह्या पुस्तके वाटणे व मदत देताना फोटो काढणे एवढीच उरते. योग्य गरजवंत शोधणे, त्यांना मदत करणे हे मेहनतीचे काम असते आणि मेहनत सध्या कुणालाच नकोय.

    ReplyDelete
  6. भाऊ,
    लेख आवडला. तुमच्या कडून खूप शिकायला मिळते नेहमीच.

    प्रतिपक्ष वर स्वाती ताईंना भेटून छान वाटले. त्यांच्याकडून सुद्धा बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत! आंतर राष्ट्रीय घडामोडींवर तुम्ही भाष्य करत नाही. पण प्रतिपक्ष वर तुम्ही त्यांना अधून मधून घेऊन येता आणि त्या आंतर राष्ट्रीय घडामोडींवर बोलतात हे फार बरे झाले. स्वातीताई वेळात वेळ काढून आवर्जून बोलतात त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार! 🙏

    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  7. राजकीय पक्ष आणि एनजीओ या दोघांनी मिळून कार्यकर्ता संपवला.

    ReplyDelete
  8. किरण कुलकर्णी ,May 6, 2020 at 5:25 AM

    भाऊ, नेते लोकच ध्येयवादी,तत्ववादी व समाजहितासाठी आग्रही न राहता फक्त आणि फक्त सत्ता व पैसा याच्या नादी लागल्यामुळे कोणत्याच पक्षात प्रामाणिक व गरीब कार्यकर्त्यांना किंमत राहिली नाही. त्यामुळे सर्व पक्षात लुटांरूचा बाजार भरलेला आहे. कालाय तस्मै नमः

    ReplyDelete
  9. शिवसेनेच्या उदयापासून आतापर्यंत ज्या प्रकारचा बदल आपल्याला दिसतो तो सर्वच राजकीय पक्षात कमीजास्त प्रमाणात आढळतो,आपल्या पक्षाचे राजकारण इतर पक्षापेक्षा वेगळे आहे, तत्वनिष्ठ आहे असे म्हणणाऱ्या पक्षाला सुध्दा हे टाळता आले नाही हे सत्य आहे. तत्वनिष्ठ नेते निवडून येऊ शकत नाहीत हे सत्य सर्व पक्षांनी मान्य केले आहे. त्यामुळे ज्या तडजोडी कराव्या लागतात त्या जे करण्याची तयारी दाखवतात त्यांच्याकडे सत्ता जाणे अपरिहार्य आहे.
    ज्या देशातील मतदार एकजिनसी वर्गात असतात तेथे घटकांचे स्वार्थ मतदानावर प्रभाव पाडू शकत नाहीत. आपल्याकडे जास्तीत जास्त मतदारांना जो आर्थिक फायदे मिळवून देण्यात यशस्वी होतो तो सत्ता राखण्यात यशस्वी ठरतो.कार्यकर्ते नेत्यांच्या प्रोत्साहनानुसार पुढे येतात. त्यामुळे पक्ष सत्तेत आला की तत्वनिष्ठ कार्यकर्ते मागे पडतात. मला वाटते विरोधात असलेल्या पक्षात जी सेवावृत्ती दिसते ती सत्तेत आल्यानंतर नाहीशी का होते ह्या प्रश्नाचे उत्तर लोकशाही निवडणुकपद्धतीतच सापडते.

    ReplyDelete
  10. Shivsena grown due to mills n millworker. Due to mill strike it grown multifold. Now nobody wants to sit idle, n if somebody wants to, there is social media. Why one can go n sit in shakha

    ReplyDelete
  11. छान सवॅ नेत्याना विचार करणयास लावणारा लेख.

    ReplyDelete
  12. भाऊ.. माका तुमचा युट्यूब चनैल खूप आवडता. मी तुमच्या इडिओ ची आतुरतेने वाट बघतय. माझी एक विनंती आसा की तुम्ही मराठीतूनच इडियो बनवा. तुमची बायको जी जागतिक विषयावर अभ्यास करता.. तिची हिंदी चांगली असतली. तिका सांगा तुम्ही जे मराठीत मुद्दे मांडता ते हिंदीत मांडुक. त्यासाठी प्रतीपक्ष हिंदी नावाचा इगाळा चॅनल सुरु करुन देवा.
    धन्यवाद

    हो आणि एवढी लाखो लोका तुमका बघातत तर मेक उप नको पण जरा टापटीप पणे बसा.

    ReplyDelete
  13. अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलात. पूर्वीची शिवसेना आता राहिली नाही. मी शिवसेनेच्या जन्मा पासुनचा प्रवास व जडण घडण माझ्या लहान पणा पासुन बघत आहे. ज्या सैनिकांनी शिवसेनेला घडवण्यात व नावारुपाला आणण्या साठी आपलौया रक्ताचे पाणी केले
    प्रसंगी लाठ्या खाल्या व तुरुंगवास आनंदाने सहन केला,साहेबांच्या एका शब्दावर रस्त्यावर उतरणारे असे सैनिक आता ७०च्या वर वयोमान झालेले असतील. मनोहर कोतवाल,प्रि.वामनराव महाडिक, आनंद दीघे असे दिग्गज अनुयायी साहेबांनीघडवले. साहेबांनी मुंबई बंद असा आदेश दिल्यावर जनता घराबाहेर पडायचा विचार देखिल करायची नाही व बंद १००% यशस्वी व्हायचा.१९८४ साली इंदीरा गांधीच्या हत्ये नंतर मुंबईतील शीख समाज केवळ शिवसेनेच्या असण्यामुळे सुरक्षित राहीला. १९९२ च्या दंग्यांच्या वेळी हिंदू समाज केवळ शिवसेनेकडे रक्षणा साठी अपेक्षेने बघत होता व तसे झाले देखिल . आजचे नेतृत्व वारसा हक्काने आले आहे व वडीलांना दिलेला शब्द(?) पूर्ण करण्या साठी सत्तेवर आहे.अनेक सैनिक व मतदार या निर्णयाने नाराज आहेत ,आपल्याला गृहीत धरल्याची व फसवले गेल्याची भावना आहे.ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मुखपत्र असे घोषवाक्य मिरवणारे जेव्हा भलत्याच गोष्टींचे लंगडे समर्थन करतात तेव्हा संताप होतो व विषाद वाटतो. आता जो जिंकून येउ शकतो अशांचीच वर्णी लागते व सामान्य सैनिक दुरावला आहे व कोरोनाच्या लढतीमध्ये फारसा दिसत नाही.भाउ परवा सोनिया गांधी यांनी निद्रावस्थेतुन जागृत होऊन मोदींना प्रश्न विचारला १७ मे ला लाॕकडाऊन संपल्यावर पुढे काय करणार ते सांगा? त्याःच्या ५०वयाच्या दिवट्याने पुलित्झर पारितोषक मिळालेल्या कश्मिर मधिल छायाचित्रकारांचे आवर्जून अभिनंदनकेले पण हंदवाडा येथे शहीद झालेल्या बहाद्दर जवानांबद्दल साधी श्रद्धांजली पण नाही? आपण या वृत्तींवर कृपया आपले विचार व्यक्त करावे ही विनंती,

    ReplyDelete
  14. भाऊ, प्रतिपक्ष youtube चॅनेल वरील आपली "वागले कि दुनिया" हि मालिका आफाट गाजली आहे... तुमचा अभ्यास आणि पत्रकारिकेतील सद्य परिस्थितीचे निरीक्षण अभूतपूर्व असे आहे....
    एक विनंती, आपण लोकसत्ताचे "गिरीश कुबेर" ह्यांच्या पुरोगामीपणावर अशीच एक मालिका करावी... सध्या गिरीश कुबेर हे सुद्धा महाराष्ट्र सरकारचे तोंड भरून कौतुक करत आहेत...
    धन्यवाद...! आपले काम असेच चालू ठेवा...आमच्या खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
  15. विधानसभेसाठी खडसे मुंढे तावडे बावनकुळे यांना भाजप ने उमेदवारी दिली नाही हे जने कार्यकर्ते आहेत त्यांना डावलण्यात शीर्षस्थ नेत्यांचा हेतु असणार भाऊराव,त्यावर भाष्म करावे हि विनंती

    ReplyDelete
  16. मी आपला हितचिंतक आहे

    ReplyDelete