यशाला अनेक बाप असतात आणि अपयश नेहमी अनौरस असते असे म्हणतात. दिल्लीतल्या भाजपाची आज नेमकी तीच अवस्था आहे. लोकसभेच्या पाठोपाठ चार विधानसभात जे वाढते यश मिळाले, ते पुरेसे नव्हते. पण त्यातून आपला पक्ष अजिंक्य होऊन गेल्याची झिंग भाजपाच्या नेत्यांना व मुखंडाना इतकी चढली होती, की त्यांना कार्यकर्ता व मित्रही ओळखता येत नव्हते. दिल्लीत त्याचेच परिणाम समोर आलेले आहेत. खरे सांगायचे तर आज केजरीवालही आपल्या इतक्या मोठ्या यशाचे नेमके विवेचन करू शकणार नाहीत. कारण खरेच त्यांनाही त्याचा अर्थ इतक्या सहजासहजी लागणार नाही. मग पराभूत भाजपाला तरी आपल्या अपयशाची मिमांसा इतक्यात कशी शक्य आहे? अर्थात राजकीय विश्लेषक म्हणवणार्यांसाठी सध्या पर्वणी आहे. कारण दिल्लीत भाजपाचा पुरता सुपडा साफ़ झालेला आहे. ज्यांनी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून आयात केले होते आणि त्यासाठी दिर्घकाळ दिल्लीत राबलेल्या नेत्या कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेतले नव्हते, त्यांना झाला तो पराभव लक्षात यायलाही काही दिवस उलटावे लागणार आहेत. आजच्या क्षणी आम्हाला ३२ वर्षे जुन्या भारताने जिंकलेल्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धेचे स्मरण होते. तेव्हापर्यंत भारतीयांना त्या स्पर्धेची फ़ारशी माहितीही नव्हती. अशा स्पर्धेत कपील देवच्या संघाने अकस्मात विजय संपादन केला आणि अवघ्या जगाला थक्क करून सोडले होते. कारण तो विजय खरेच चकीत करणारा होता. पण व्यवहारी पातळीवर बघितले, तर तो भारताच्या विजयापेक्षाही वेस्ट इंडीजचा पराभव होता आणि त्यांनी तो ओढवून आणलेला पराभव होता. सहाजिकच अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्याने हरायचे ठरवल्यासारखा खेळ केल्यास उरलेल्या दुसर्या संघाला जिंकण्याखेरीज पर्यायच उरत नाही. त्यापेक्षा आजचा आम आदमी पक्षाचा दिल्लीचा विजय किंचितही वेगळा नाही.
सहाआठ महिन्याच्या अथक मेहनतीतून लोकसभेत अभूतपुर्व यश मिळवल्यापासून भाजपाच्या नेते व प्रवक्त्यांची अवस्था २०-२० च्या पहिल्या स्पर्धेतल्या युवराज सिंगसारखी झाली होती. एका षटकात सहा षटकार मारून युवराज असा चमकला, की पुढल्या काळात त्याला प्रत्येक षटकात षटकार मारायच्या अपेक्षांना सामोरे जावे लागले आणि युवराजही त्या अपेक्षांना बळी पडत गेला. लोकसभा निवडणूकीत उत्तरप्रदेश आणि बिहार जिंकण्यावर सत्ता अवलंबून होती आणि त्यासाठी मोदी व अमित शहा यांनी योजलेल्या रणनितीला यश मिळाले. त्या यशाने अमित शहांसकट भाजपाचे नेते वास्तव विसरून गेले आणि त्याच तंत्राने प्रत्येक विधानसभा व महापालिका जिंकू शकतो, अशा भ्रमात वावरू लागले. त्याची पहिली प्रचिती हरयाणा व महाराष्ट्रातील आपल्या मित्रांना लाथाडून आली. महाराष्ट्रात युती मोडताना आपल्या वाढलेल्या ताकदीचा हवाला भाजपानेते देत होते आणि त्यासाठी अन्य पक्षातून नेते व उमेदवार आयात केले जात होते. अशा युक्तीवादाने टिव्हीवरच्या चर्चेत वरचष्मा दाखवता येत असला, तरी वास्तव बदलत नव्हते. त्या तंत्राने पहिला संदेश देशभर असा गेला, की भाजपाला आपली शक्ती वाढवण्यासाठी विस्तार करण्यासाठी कॉग्रेसच्या ऐवजी प्रादेशिक पक्षांनाच संपवायचे आहे. सहाजिकच कॉग्रेसमुक्त भारताच्या कल्पना बाजूला पडून कॉग्रेसयुक्त भाजपा व त्यासाठी प्रादेशिक मित्रांचा खात्मा असा सेंदेश गेला. तिथून मग भाजपा विरुद्ध प्रादेशिक पक्ष अशी अस्मितेची लढाई सुरू झाली. किंबहूना मागल्या अर्धशतकात कॉग्रेसची हीच निती राहिली. प्रादेशिक पक्षांना व अस्मितांना संपवायच्या अट्टाहासातून कॉग्रेसने नवनव्या प्रादेशिक पक्षांना जन्माला घातले आणि त्यांच्याच कुबड्या घेऊन मग भाजपा राष्ट्रीय पक्ष बनत गेला होता. लोकसभेनंतर भाजपाच कॉग्रेसी भूमिकेत आला आणि त्यासाठी त्याने पवारनितीचा बारामती पॅटर्न स्विकारला.
अमित शहा भाजपाचे अध्यक्ष पन्नाशीच्या वयात झाले आणि त्यांच्या वयापेक्षा अधिक काळ शरद पवार राजकारणात आहेत. या काळात आपले बस्तान बसवताना पवारांनी एक राजकीय शैली विकसित केली. अन्य पक्षातून विजयी होऊ शकणार्या नेते उमेदवारांची आयात करून आपल्या राजकीय संघटना व पक्षाला संजीवनी द्यायची. भाजपाने लोकसभा आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आणि प्रादेशिक मित्रांच्या बळावर जिंकली. पण पुढल्या काळात शत-प्रतिशत होण्याच्या नादात मित्रांनाच संपवायचा हव्यास सुरू केला. त्यासाठी मग अन्य पक्षातले नेते आयात केले. अगदी जुना मित्र शिवसेनेला खिजवण्यासाठी मराठी अस्मितेची टवाळी केली आणि राष्ट्रवादीची म्हणजे शरद पवार यांचीही मदत घेण्यापर्यंत मजल मारली. मोदींची लोकप्रियता इतकी अफ़ाट आहे, की त्यापुढे कुठलेही गुन्हे माफ़ होतात, अशी समजूत भाजपाने करून घेतली होती. त्याचा फ़टका त्या विधानसभेतही बसला होता. इतके आयात उमेदवार करूनही लोकसभेपेक्षा एकही टक्का मते भाजपा वाढवू शकला नाही. उलट मोदींना शिव्या घालून सुद्धा सेनेला लोकसभेतील मते टिकवणे शक्य झाले. तिथेच भाजपाने आपल्यातील या त्रुटीचा गंभीरपणे विचार करायला हवा होता. पण दुप्पट मिळालेल्या जागांच्या यशाआड मतांची त्रुटी झाकली गेली. परिणामी पुढे काश्मिर व झारखंडातही तीच पवारनिती कायम राहिली. त्यापैकी कास्मिरात लडाखला चार जागी असलेले मताधिक्य जाण्यातून भाजपाने विधानसभेत त्या जागा गमावल्या आणि झारखंडात ५४ जागी लोकसभेत असलेले मताधिक्य विधानसभेत ३७ इतके खाली आले. पण सत्ता मिळवली असे सांगून त्रुटी लपवली गेली. दिल्लीत तीच पवारनिती कायम राहिली आणि तिथे अनेकरंगी निवडणूक नसल्याने थेट लढतीमध्ये वास्तव समोर आले. चलाखीचा तिथे दारूण पराभव झाला.
भाजपाही कॉग्रेस होत असेल, तर भगवी कॉग्रेस लोकांना नको होती. म्हणूनच लोकांनी पुन्हा कॉग्रेसकडे जाण्यापेक्षा आम आदमी पक्ष नावाचा दुसरा पर्याय निवडला. लोकसभेत भाजपाला ४४ टक्के तर ‘आप’ला ३४ टक्के मते होती. त्या सदिच्छा होत्या. आज नेमके उलट होताना भाजपा पुन्हा मागे ३४ टक्क्यांवर आला आणि त्याची दहा टक्के मते केजरीवालांना प्रोत्साहन म्हणून दिली गेली. तर अमित शहा आयोजित पवारनितीला दिल्लीकरांनी चांगला धडा शिकवला आहे. भाजपाला लोकसभेत मिळालेली मते सदिच्छा होत्या. पण त्यांना ती आपली शक्ती वाटली आणि तिच्याच बळावर भाजपावाले नाचत होते. अगदी आपलेच स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्या इच्छा व भावना पायदळी तुडवून अमित शहांनी मनमानी केली. कोणालाही पक्षात आणून त्यांना उमेदवार्या दिल्या. त्यासाठी स्थानिकांना विश्वासातही घेतले नाही. हेच लोकसभेच्या वेळी केजरीवाल यांनीही केले होते. तर मतदाराने त्यांचा सुपडा साफ़ केला होता. यावेळी अमित शहांमध्ये केजरीवाल संचारला होता. त्यांनाही लोकांनी धडा शिकवला आहे. मतदार व त्याची मते ही कोणा पक्ष वा नेत्याची जागीर नसते. मतदार आपली नाराजी वाहिन्यांवर येऊन चर्चेत सांगत नाही. पण पुढल्या मतदानाचा दिवस उजाडेपर्यंत दबा धरून बसतो. एक शिक्का मारून वा बटन दाबून निकाल लावतो. मग चाणक्य अमित शहा असोत की बारामतीकर पवार असोत. अन्य राज्यात भाजपाला लोकसभेइतकी मते नाकारून मतदार इशारे देत होता. ते समजू शकले नाहीत, म्हणून त्याने दिल्लीत सफ़ाया करून टाकला आहे. म्हणून तो केजरीवाल यांचा निर्णायक विजय नाही. १९८३ च्या कपीलच्या अजिंक्यपदासारखा तो भाजपाने ओढवून आणलेल्या पराभवाचा परिणाम आहे. तो ओळखता आला नाही, तर केजरीवाल यांनाही तोच धडा मतदार पुन्हा शिकवू शकतो. आगामी निवडणूकांसाठी भाजपा यातून काय शिकतो बघायचे.
Khare aahe Bhau.....
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteतुम्ही म्हणता तेच खरंय. भाजपने वेळकाढूपणा केला तो नडला. आठ नऊ महिने काढायला नको होते.
दुसऱ्या प्रकारे या घटनेकडे बघायचं झालं तर संघाने आआपला मदत करून जिंकवून आणलं आहे. अशा प्रकारे संघाने भाजप आणि विरोधी दोन्ही गोटांवर वर्चस्व प्रस्थापित करायच्या दृष्टीने पाहिलं यशस्वी पाऊल टाकलंय.
आपला नम्र,
-गामा पैलवान
केजारीवालाना मिळालेले यश इतके उत्तुंग आहे कि आता त्यांना राष्ट्रीय नेता होण्याची सुवर्ण संधी आहे. यावर तुमचे काय मत आहे भाऊ.
ReplyDelete