मोदी सरकारच्या तिहेरी तलाकला प्रतिबंध घालणार्या विधेयकामुळे कुणा मुस्लिम मुल्ला मौलवीपेक्षाही राष्ट्रावादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कमालीचे विचलीत झाले आहेत. कारण त्यांना या विधेयकाने वा तशा निर्णयाने इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथामध्ये हस्तक्षेप असल्याचे जाणवले आहे. तलाक ही कुराणातली तरतुद असून त्यात कोणीही राजकीय सत्ताधारी ढवळाढवळ करू शकत नाही, असा निर्वाळा पवारांनी आपल्या औरंगाबाद येथील प्रवचनातून देऊन टाकला आहे. औरंगाबाद शहर व परिसर मुस्लिमबहुल असल्यामुळे असे बोलणे हा राजकीय भाग झाला. मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी पवारांनी तसे काही मतप्रदर्शन करण्यालाही कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. पण इस्लामच्या पवित्र कुराणात अन्य कोणी हस्तक्षेप करू नये सांगताना, मतांसाठी तसा हस्तक्षेप करण्याचा अधिकार खुद्द पवारांना कोणी दिलेला आहे? पवार एका पक्षाचे सर्वेसर्वा असल्याने कुठल्याही धर्मात वा त्यांच्या कुठल्याही धर्मशिकवणीत ढवळाढवळ करू शकतात काय? इतरांचे अधिकार तपासून बघण्याची घाई करण्यापेक्षा पवारांनी निदान आपले अधिकार कोणते व त्याच्या मर्यादा कोणत्या, त्याची चाचपणी करावी. इतकीही आता अपेक्षा बाळगायची नाही काय? कारण पवार ज्या विषयावर बोलत आहेत आणि कुराणाचे निर्वाळे देत आहेत, त्यांनी कधी सवड काढून कुराण वाचले तरी आहे काय? नुसती लोकरी वा विणलेली टोपी घालून इफ़्तार पार्ट्या योजल्या म्हणजे इस्लाम समजत नाही, किंवा त्याच्याविषयी जगाला मार्गदर्शन करता येत नाही. कुराणात सरकारने ढवळाढवळ करू नये तर कोणी करावी? कुराण प्रेषित पैगंबराच्या माध्यमातून सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचत असते आणि कुठल्याही निकषावर शरद पवार इस्लामचे पैगंबर असू शकत नाहीत. हा पहिला नियम आहे, कारण हजरत महंमद हा इस्लामचा शेवटचा प्रेषित आहे. त्याने कथन केलेल्या कुराणाची पवार प्रतारणा करीत आहेत.
मागले सहाआठ महिने तिहेरी तलाक हा विषय भारतात गाजत असून त्यावर वाहिन्या व वर्तमानपत्रातून हजारो चर्चा झालेल्या आहेत. अगदी ज्या मौलवींशी मसलत करावी असे पवार सांगतात, त्यातल्या डझनावारी मौलवींनीही अशा चर्चांमध्ये भरपूर सहभाग दिलेला आहे. पण त्यापैकी एकानेही कोणी कुराणात तलाकचे नियम किंवा आदेश असल्याचा दावा केलेला नाही. किंबहूना तिथेच अशा चर्चेत मौलवींची प्रत्येकवेळी बोबडी वळलेली अवघ्या जगाने बघितलेली आहे. या चर्चांमध्ये सहभागी होणार्या अनेक जाणत्या मुस्लिम महिलांनी मौलवींना फ़ैलावर घेत कुराणात तिहेरी तलाकचा उल्लेख कुठे आहे, ते दाखवण्याचे खुले आव्हान वारंवार देऊन झालेले आहे. म्हणजे अशा चर्चा रंगलेल्या होत्या आणि उहापोह चालू होता, त्यापैकी अवाक्षरही पवारांनी कधी ऐकलेले नाही वा तशी तसदी घेतलेली नाही. जेव्हा त्यावर सुप्रिम कोर्टात विषय आला होता आणि खडाजंगी माजलेली होती, तेव्हाही पवारांनी तिकडे ढुंकून बघितले नाही. तो विषय समजून घेतला नाही की त्यावर भाष्य केले नाही. तेवढे कष्ट घेतले असते तर पवारांनी औरंगाबादच्या हल्लाबोल सभेत पवित्र कुराणावरच ‘हल्ला’ केला नसता. या रंगलेल्या प्रदीर्घ वादात उतरलेल्या मुस्लिम महिलांनी प्रत्येक मौलवीला कुराणात तिहेरी तलाक कुठे सांगितला आहे, प्रश्न सातत्याने विचारला होता आणि एकाही मौलवीला त्याचे उत्तर देता आलेले नव्हते. कारण तिहेरी तलाक हा कुराणातला विषयच नाही. तो कुराणबाह्य विषय आहे. मात्र पवार राजकीय आवेशात धर्मगुरू होऊन कुराणाचे हवाले देण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. कुराणात नसलेले आदेश घुसवून स्वत:च नवे कुराण सांगू लागलेले आहेत. मग प्रश्न इतकाच पडतो की शरद पवार हे इस्लामचे नवे प्रेषित झालेले आहेत काय? नसेल तर कुराणात नवे आदेश व सल्ले घुसवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? तिहेरी तलाक कुठून आला, त्याचाही गंध या नेत्याला नसल्याची साक्ष त्यानेच दिलेली आहे.
तलाक हा विषय कुराणात कुठेच नाही, म्हणून तर त्याविषयी सुप्रिम कोर्टात बाजू मांडताना मौलवींची गोची झाली. कुराणात कुठेही तिहेरी तलाकचा उल्लेख नाही की त्याचे समर्थन झालेले नाही. म्हणून व्यक्तीगत कायदा मंडळालाही शेपूट घालावी लागली होती. बहुधा ह्या मंडळाने सुप्रिम कोर्टात बाजू मांडण्यापुर्वी पैगंबर असल्याचा आव आणणार्या पवारांना भेटून सल्लामसलत केली नाही, ही मोठी चुक झाली असावी. किंबहूना पवारसाहेब इस्लामचे जगातले सर्वात मोठे अभ्यासक असू शकतील. कारण त्यांना कुराण व शरीयत यातला फ़रक ओळखता आलेला नाही. तिहेरी तलाक हा कुराणाचा विषय नसुन इस्लामी धार्मिक कायदा गणल्या गेलेल्या शरीयतचा भाग आहे. पण ती शरीयत अल्लाच्या इच्छा वा आदेशाबरहुकूम नसून पैगंबराच्या निर्वाणानंतर काही धर्मगुरूंनी तयार केलेली धर्मसंहिता आहे. त्यामुळे तिला कुराण मानले जात नाही. तसे असते तर जगातल्या बहुतांश मुस्लिम देशात तिहेरी तलाक बाद होऊ शकला नसता. इस्लामी देशात कुराण हाच पायाभूत कायदा असून, त्याला छेद देणारा कुठला कायदा वा न्याय होऊ शकत नाही. म्हणूनच तिहेरी तलाक कुराणात समविष्ट असता तर याही देशांनी त्यात हस्तक्षेप केला नसता किंवा त्तिहेरी तलाकला आपापल्या राज्यात प्रतिबंध घातला नसता. त्या देशातले मौलवी कुचकामी असावेत किंवा तिथे पवारांना कोणी प्रेषित मानत नसावेत. अन्यथा तुर्कस्थानसह अनेक मुस्लिम देशांनी अशी बंदी घालण्यापुर्वी मौलवींशी विचारविनिमय केला नसता, पण पवारांशीच सल्लामसलत केली असती. ज्या आवेशात पवारांनी उपरोक्त वक्तव्य केले आहे, त्याकडे बघता, पवारच इस्लाममध्ये अतिरेकी ढवळाढवळ करीत आहेत. कारण नसलेला तिहेरी तलाक त्यांनी आपल्या राजकीय मतलबासाठी थेट कुराणात घुसवण्याची मनमानी केलेली आहे. व्यवहारी पातळीवर हा प्रेषित पैगंबराचा अवमान व उपमर्द आहे.
पवित्र कुराणात कुठलाही फ़ेरबदल होऊ शकत नाही, हा इस्लामचा पायाभूत सिद्धांत आहे. कुराणात समाविष्ट असलेले आदेश साक्षात अल्लाचे म्हणजे इश्वराचे़च असून ते आणणारा अखेरचा प्रेषित हजरत महंमद होते. पण पवार त्यात नवी भर घालत असतील, तर ते स्वत:ला अल्लाचा प्रेषित मानतात, असा निष्कर्ष काढणे भाग आहे. असे कुठलेही कृत्य इस्लामचा घोर उपमर्द आहे. अहमदीया नावाचा एक पंथ मुस्लिमात असून त्याचे म्होरके स्वत:ला पुढला प्रेषित मानतात. म्हणून जगभरात मुस्लिम त्यांना पाखंडी ठरवित असतात. पवार वेगळे काहीही करत नसून कुराणात नसलेली गोष्ट ते त्यात घुसवत आहेत. परिणामी इस्लाम वा कुराणात सरकार हस्तक्षेप करीत नाही, इतका मोठा हस्तक्षेप पवारांनी केला आहे. कुठल्याही निष्ठावान मुस्लिमाने म्हणूनच आधी पवारांकडे माफ़ीची मागणी केली पाहिजे. किबहूना असे वक्तव्य पवार करीत असताना त्यांच्या व्यासपीठावर मिरवायला बसलेल्या मुस्लिम नेत्यांना सामान्य मुस्लिमाने जाब विचारला पाहिजे. पत्रकारांनी असाउद्दीन ओवायसी यांना पवारांच्या या वक्तव्याबद्दल खुलासा करण्यास भाग पाडले पाहिजे. पवारांनीही विरोधकांची मोट २०१९ साठी बांधताना जे विषय बोलायचे आहेत, त्याचे थोडेफ़ार चिंतन मनन करण्याचे कष्ट घ्यायला हरकत नाही. दहापंधरा वर्षापुर्वी सामान्य लोक इस्लामविषयी जितके अजाण होते, तितके आज राहिलेले नाहीत. जगात मुस्लिम नसलेल्या लाखो लोकांनी आता कुराण वाचले व त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे असल्या पोरकटपणाला कोणी मुस्लिम महिलाही भुलणार नाहीत, तर बाकीच्या सामान्य मतदाराची गोष्टच सोडून द्या. असली शरि(दी)यत सांगण्यापेक्षा कुराणासह शरियतही साहेबांनी अभ्यासली नाही, तरी निदान वाचावी व चाळावी. मगच राजकीय प्रचारमोहिमेत हल्ला हो अखबारची गर्जना करावी.
http://deccanmirror.in/2018/02/03/ncp-chief-sharad-pawar-on-talaq/
संघाची अर्धी चड्डी म्हणून कुचेष्ठा करणार्या शरदरावांची पुर्णच चड्डी, भाऊ तुम्ही काढून घेतलीत की ! हे सगळे २०१९ साठीचे उमाळे आहेत हे लोकांना समजत नाही काय ?
ReplyDeleteभाऊंचे लेख म्हणजे ह्या anti-national तथा भ्रष्टाचारी कॉंग्रेस वाल्यांना मिरच्याच कि हो!
ReplyDeleteखुप खुप आभार भाऊ
भाऊ......एकदम मस्त !! शब्दयोजना तर ' अप्रतिम '.......आता बदललेल्या काळात व नवीन पिढी ह्या जुन्या लान्गुलचालनाच्या पद्धतीला बळी पडणार नाहित. आता या मावळतीच्या वाटेवरील राजकारणानी सामान्य लोकाना लुभावण्याचे नवीन मार्ग शोधावेत हेच खरे.
ReplyDeleteआता २ दिवसा पुर्वी संविधान बचाव मोहीम काढली. ज्यात समान नागरी कायदा आहे. आज त्याच्या एकदम विरोधी टोक..
ReplyDeleteयालाच मर्कट लिला म्हणतात
भाऊ आपण सोडून इतर कुठलाही पत्रकार असला मूर्ख पणा करणार नाही कारण गुलाम आकाशी गद्दारी करत नाही आपण गुलाम नाही तर आमचे मार्गदर्शक आहात
ReplyDeleteमौलाना सदरुद्दिन नवी तफ्सीर लिहित असावेत
ReplyDeleteमस्तच👌👌 शालजोडीतला भाऊ👌👌
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteअन्न,वस्त्र,निवारा या मानवी मूलभूत गरजा आहेत.मग तुम्ही वस्त्रहरण का करता?? लोकलाजेस्तव तरी थोडे ठेवा...
भाऊ,
ReplyDeleteबहुदा द्रौपदीनंतर वस्त्रहरण होणारे पवारच असावे...
फरक इतकाच आहे की तिच्या पाठीशी साक्षात श्रीकृष्ण उभा होता,पवारांच्या पाठीशी लोकांचे शिव्याशाप,तळतळाट आहेत.
भाऊ अप्रतिम लेख फक्त हा लेख वाचुन ह्यातुन बोध घेणार का जाणता राजा? हे महत्त्वाच!
ReplyDeleteपवारांना पुन्हा PM होण्याची स्वप्ने पडू लागलीत आणि वय सुद्धा झालंय... त्यामुळे हे सगळं सुरु झालंय
ReplyDeleteजबरदस्त चपराक.
ReplyDeleteकाहीतरी बरा वाटत असणारा मनुष्य हास्यास्पद होताना पाहून कीव येते
ReplyDeleteजाणता आलमगीर
ReplyDeleteपवार चुकीचेच बोलले आहेत. त्यांच्या त्या व्यक्तव्यामुळे काही मुसलमान एनसीपी-ला मते देतील. पण त्याचा हिंदूंना एक फायदा आहे. त्यांच्या व्यक्तव्यामुळे मुसलमानांची मते फुटणार आहेत. त्यासाठी आपण पवारांचे आभार मानले पाहिजेत.
ReplyDelete