Tuesday, April 10, 2018

जनेयुधारी ज्योतिषी

janeudhari rahul cartoon के लिए इमेज परिणाम

नाटक वा चित्रपटातील एखादी आकर्षक भूमिका बजावतांना काही कलावंत त्यातल्या प्रतिमेच्या आहारी जात असतात. मग त्यांच्यावर तशा भूमिकांचा ठप्पा बसतो आणि अन्य प्रकारच्या भूमिका त्याला मिळत नाहीत. मिळाल्या तरी लोक त्याला अन्य भूमिकात बघणे पसंत करत नाहीत. थोडक्यात त्याच्यावर एका साचेबंद भूमिकांचा शिक्का बसत असतो. उदाहरणार्थ हिंदी चित्रपटातील सलमान खान वा शाहरुख खान यांच्याकडे बघता येतील. त्यांच्या अभिनय गुणांची कसोटी लागेल, अशा भूमिका त्यांना मिळत नाहीत आणि मिळाल्या तरी त्याची प्रेक्षकांकडून कधी कदर होत नाही. उलट तितकीच लोकप्रियता संपादन केलेला आमिरखान आहे. पण तो प्रत्येक चित्रपटातून नवनवी पात्रे घेऊन लोकांसमोर येतो आणि तितकाच प्रेक्षकाला आवडतोही. त्याच्या अभिनयाची कसोटी लागते आणि तेच त्याच्या लोकप्रियतेचे कारणही झालेले आहे. पण दुसरीकडे सलमान व शाहरुख मात्र आपल्या साचेबंद भूमिकात गुरफ़टून गेले आहेत. हळुहळू त्यांना तशा भूमिकांशी तडजोड करावी लागली आहे. मागल्या तीनचार वर्षात भारतीय राजकारणात कॉग्रेस व राहुल गांधी अशाच दुष्टचक्रात गुरफ़टत गेले आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही त्यांना करता आलेला नाही. भाजपा प्रथमच बहूमत मिळवून सत्तारूढ झालेला असला तरी कॉग्रेस दिर्घकाळ सत्तेतला पक्ष होता. त्याच्या विरोधात व बाजूनेही अनेक पक्षांनी काम केलेले आहेत. पण सत्तेपर्यंत जाऊ शकणारा पक्ष म्हणून कॉग्रेसची दिर्घकालीन भूमिका राहिली होती. मात्र गेल्या चार वर्षात इतर विरोधी पक्षांप्रमाणे आपलीच ही गुणवत्ता विसरून कॉग्रेस इतर विरोधी पक्षांसारखी वागत गेली आहे. राहुल गांधींच्या हाती नेतृत्व आल्यानंतर मग कॉग्रेसला हीच भूमिका आपली असल्याचे वाटू लागले आहे. त्यापासून फ़ारकत घेण्याचा विचारही राहुलना शिवलेला नाही. आता तर ते समाजवादी विचारवंताप्रमाणे राजकीय भाकितेही करू लागले आहेत.

कालपरवा राहुलनी येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव होईल असे भाकित केले आहे. म्हणजे गुजरात विधानसभेपासून त्यांनी जानवेधारी ब्राह्मण म्हणून जी भूमिका स्विकारली आहे, त्याच्याही पुढले पाऊल टाकलेले आहे. राजकीय संघटना उभी करून प्रस्थापित सत्ताधार्‍यांना आव्हान देण्याचा विषयही संपला आहे आणि विरोधी पक्षांची एकजुट करून भाजपाला पराभूत करण्याची स्वप्ने राहुलही रंगवू लागलेले आहेत. १९६० च्या दशकात तात्कालीन समाजवादी मंडळी अशा भूमिकेत असायची. त्यांना कधी राष्ट्रीय पातळीवर आपल्या पक्षाचे संघटन उभे करता आले नाही. मग प्रत्येक निवडणूक आली, मग विविध लहानमोठ्या पक्षांची आघाडी जमवून कॉग्रेसला पराभूत करण्याची भाकिते समाजवादी नेते करायचे. तसे स्वप्नरंजन हा एकमेव समाजवादी राजकीय अजेंडा असायचा. तुरळक प्रमाणात त्याला यशही यायचे. पण त्यातून कॉग्रेस पक्षाची जी थोडीफ़ार पडझड व्हायची, ती अशा आघाड्यांच्या दिवाळखोरीने भरून निघायची. मग कॉग्रेस पुन्हा नव्या दमाने उभी रहायची. पण अशा कितीही अपयशामुळे समाजवादी नामशेष झाले, तरी निराश झाले नाहीत. आज त्यांचे वारस आपल्याला जमले नाही, ते कॉग्रेस वा इतर पक्षांच्या माध्यमातून साध्य करण्याची स्वप्ने रंगवित असतात. राहुल गांधी यांनी तो वारसा आता आपल्याकडे घेतला आहे. तसे नसते तर उत्तरप्रदेश, राजस्थानाच्या काही पोटनिवडणूकीच्या निकालांचा आधार घेऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीही वाराणशीत पराभूत होतील, इतके सनसनाटी भविष्य वर्तवले नसते. असे भाकित करण्यापुर्वी चार वर्षे आधी गुजरातचा हा मुख्यमंत्री तिथून हजार किलोमीटर्स दुरच्या उत्तरप्रदेशातून लोकसभेवर निवडून कसा आला, त्याचीही कुंडली मांडण्याची या जानवेधारी नव्या भविष्यकर्त्याला गरज वाटलेली नाही. ही अशा लोकांची शोकांतिका असते.

एक गोष्ट कोणालाही मान्य करावी लागेल, की चार वर्षापुर्वी लोकसभेच्या निवडणूका झाल्या, तेव्हा भाजपाची उत्तरप्रदेशातील स्थिती मोठी उत्साहवर्धक अजिबात नव्हती. अवघ्या दोन वर्षापुर्वी तिथे झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपा तिसर्‍या क्रमांकावर होता आणि त्याहीपुर्वी लोकसभा मतदानात भाजपा चौथ्या क्रमांकावर फ़ेकला गेला होता. अशा पार्श्वभूमीवर मोदी-शहा या गुजराथी जोडगोळीने उत्तरप्रदेशातील पिढीजात सर्वपक्षीय नेतृत्वाला अचंबित व्हायची पाळी आणलेली होती. तर तितके यश त्यांना कशाला मिळावे, याचाही अभ्यास कोणी केलेला नाही. राहुलना तर अभ्यासाची गरज वाटत नाहीच. त्याहीपेक्षा असली भाकिते व भविष्य वर्तवताना राजकारणाची कुंडलीही मांडण्याची गरज वाटत नाही. विरोधी पक्षाचे काही नेते आघाड्या व संयुक्त निवडणूकीचे प्रयत्न करीत आहेत, एवढ्यावरच ते आपली भाकिते वर्तवित आहेत. कुडमुडा ज्योतिषीही निदान ग्रहदशा व पंचांग तपासून बघत असतो. त्यात कुठले ग्रह कुठे चालले आहेत, त्याचा अंदाज घेत असतो. राजकारणात असे विविध पक्ष व नेते कुठे परिभ्रमण करीत आहेत, त्याची तरी दखल घ्यावी लागत असते. आजची स्थिती बघितली तर मुळात राहुलकडे कॉग्रेसचे नेतृत्व असेल, तर बाकीचे प्रादेशिक व इतर पक्ष कॉग्रेसच्या संगतीला यायला राजी नाहीत. त्यासाठी सोनियांना धडपडावे लागते आहे. हेही राहुलच्या गावी नाही. त्यांनी जणू सर्व पक्ष एकदिलाने एकमताने भाजपाच्या विरोधासाठी आपल्या नेतृत्वाखाली एकवटले असल्याच्या थाटात, राजकीय भाकिते सांगायला आरंभ केला आहे. आणखी एका महिन्यात कर्नाटकात मतदान व्हायचे आहे आणि तिथे भाजपाचे कडवे विरोधक असूनही देवेगौडा वा त्यांचा पक्षही कॉग्रेस सोबत यायला राजी नाही, की कॉग्रेस त्यांना सोबत घ्यायला तयार नाही, ही स्थिती आहे. मग राहुल कुठल्या विरोधी एकजुट राजकारणावरून भाकिते करीत आहेत?

उत्तरप्रदेशात दोन महत्वाच्या जागी अखिलेशच्या समाजवादी पक्षाने भाजपाला धुळ चारली आणि कुठल्याही अटीशिवाय मायावतींनी त्याला पाठींबा दिला. त्यातून तो पराभव होऊ शकला. पण मायावतींनी जो समजूतदारपणा दाखवला, तो खुद्द राहुल तरी दाखवू शकले काय? विधानसभेत अखिलेशशी युती केलेल्या व पोटनिवडणूक मतदानात डिपॉझीट गमावणार्‍या कॉग्रेसने, त्यात अखिलेशला पाठींबा देण्यात हयगय कशाला केली? कॉग्रेसपेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता असूनही मायावतींनी समजूतदारपणा दाखवला. पण आपण तितके समजूतदार नाही वा कुठल्याही तडजोडीला तयार नाही, असे राहुलनी कृतीतून दाखवून दिले. मग विरोधकांच्या ऐक्यातून भाजपाला पराभूत करण्याच्या वल्गना कुठून सुरू होतात? त्यात एकही पाऊल पुढे टाकण्याची लवचिकता राहुलपाशी नाही. पण त्यांना असे वाटते आहे की मोदींच्या विरोधात उतावळे झालेले विरोधी पक्ष, कॉग्रेसला सत्तेत बसवायलाही अधीर झाले आहेत. किंबहूना राहुलना पंतप्रधान करायला बहुतेक विरोधी वा बिगर भाजपा पक्ष कुठलाही त्या्ग करायला सज्ज झालेले आहेत. पण वस्तुस्थिती तशी नसून आपल्या दिल्ली मुक्कामात पवारांपासून शिवसेनेपर्यंत प्रत्येकाला भेटणार्‍या ममतांनी राहुलला भेटणे मात्र कटाक्षाचे टाळले. याचाही अर्थ ज्याला उलगडलेला नाही, त्याला भविष्याची स्वप्ने पडत आहेत. किंबहूना आपल्या यशापेक्षा भाजपा वा मोदींच्या पराभवाची स्वप्ने रंगवण्यात राहुल रममाण झालेले आहेत. गुजरातच्या मंदिर वार्‍यांनी आपल्याला यश दिले व जानवेधारी आपोआप भविष्यवेत्ता होतो, असल्या समजूतीने त्यांना पडाडले असावे. किंबहूना तशाच वागण्याने आता राहुलनी आपल्यासाठी भारतीय राजकारणातले विनोदी पात्र ही भूमिका ठरवून घेतली आहे. अन्यथा त्यांनी सदोदित असली हास्यास्पद मुक्ताफ़ळे कशाला उधळली असती? कॉग्रेसचा अध्यक्ष म्हणून गंभीर राजकीय भूमिका मनावर घेतली असती.

5 comments:

  1. खरोखरच, राहुल आता विनोदाचा विषय झाला आहे. सोशल मीडिया तर भरला आहे. कोणीतरी बघत असेल व राहुलला याचा फीडबॅक पण देत असतील. 'काँगेस पक्षाचा अध्यक्ष विनोदाचा विषय' हे देवा अध्यक्षांना बुद्धी दे.

    ReplyDelete
  2. भाउ इथले काॅगरेस समर्थक लोक तर भाजप२२५ काॅंगरेस १५०वइतर १९०अशी गणिते मांडु लागलेत तेपन इंग्रजी पेपरात .यु पी बंगाल तामिळ आंध्रा तसेच इशान्येकडची राज्येयात शुन्य अस्तित्वव महाराष्ट्रातचौथा हिस्सायावर150जागा कशामिळनार?

    ReplyDelete
  3. भविष्य सांगण्या करीता कोणत्या रंगाचा पोपट पप्पूने पाळलाय ते समजेल का?

    ReplyDelete
  4. Bhau saransh far chan. Ho rahul suruwatipasunch vinodi patra zalela ahe. Ani tyanchya adhyakshtekhali mukhya virodhi paksh hi jagasuddha gamvun basel.

    ReplyDelete