Tuesday, October 23, 2018

‘वाघ’मारे होण्याची गरज नाही

Image may contain: Mahesh Manerikar, smiling, standing

पाच वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा सुप्रिम कोर्टाने एक निकाल दिला होता आणि त्यात फ़ौजदारी गुन्ह्यात दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा झालेल्या कुणालाही अपील केलेले असले, तरी निवडून आलेल्या पदावर रहाता येणार नाही, असा निर्वाळा दिलेला होता. त्यामुळे युपीएचे घटक असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह कॉग्रेसचे राज्यसभा सदस्य रशीद मसूद यांचे सदस्यत्व धोक्यात आलेले होते. सभापतींना त्यांची खासदारकी रद्द करावी लागणार होती. तर तो निकालच रद्दबातल करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक अध्यादेश मंत्रिमंडळात संमत करून राष्ट्रपतींकडे पाठवला होता. त्यावरून मोठे वादळ उठलेले होते. मग  कॉग्रेस पक्षाला त्याची सारवासारव करावी लागत होती. त्यासाठीच कॉग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय माकन यांनी दिल्ली प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली होती. त्यात कॉग्रेसची भूमिका ते अतिशय स्पष्ट शब्दात मांडून तो अध्यादेश किती महान आहे त्याचे विवरण देत होते. जमलेले पत्रकार त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत होते आणि माकन मोठ्या धैर्याने त्यांना तोड देत होते. अशावेळी अकस्मात त्या पत्रकार परिषदेला कॉग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत असल्याची खबर लागली आणि माकन यांनी प्रश्नोत्तरे थांबवली. राहुलजींचे स्वागत करण्याचे पत्रकारांना आवाहन केले. मग राहुल तिथे अवतीर्ण झाले आणि क्षणार्धात अवघा विषय बदलून गेला होता. प्रवक्ते माकन ज्या अध्यादेशाचे गुणगान करीत होते, तो तद्दन मुर्खपणा असल्याचे सांगायची वेळ त्यांच्यावरच अवघ्या २० मिनीटात आलेली होती. कारण राहुलजी आले आणि त्यांनी तो अध्यादेश फ़ाडून कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकून देण्याइतका मुर्खपणा असल्याची ग्वाही देऊन टाकली होती. सहाजिकच २० मिनीटापुर्वीचा घटनात्मक निर्णय नंतर भयंकर मुर्खपणा असल्याचे खुलासे माकन यांना द्यावे लागत होते.

एकूण देशातील विविध पक्ष प्रवक्त्यांची ही अशी अलिकडे वाहिन्यांच्या जमान्यात तारांबळ उडत असते. त्यातून कोणी सुटलेला नाही. पण प्रवक्त्यावर इतके हास्यास्पद होण्याची वेळ क्वचितच अन्य कुणावर आलेली असेल. म्हणून असेल आता पाच वर्षे हा तद्दन मुर्खपणा अशक्य झाल्याने माकन यांनी पक्षाच्या सर्व जबाबदार्‍यातून मुक्ती घेतली आहे. ते अंतर्धान पावलेले आहेत. वाहिन्यांवरील वा माध्यमातील अशा विषयांच्या चर्चाही हास्यास्पद होऊन गेलेल्या आहेत. कॉग्रेससारखा शतायुषी पक्ष वा भाजपासारखा सत्ताधारी पक्ष, यांच्या कुठल्या महत्वाच्या प्रवक्त्याने धोरणात्मक विधान केले तर समजू शकते. पण त्यांच्या प्रत्येक विधानाचा कीस पाडत बसण्यात कुठली बातमी असते, याचाही हल्ली विचार होत नाही. कोणी काही बरळले तरी त्यावरून तावातावाने चर्चा रंगवल्या जात असतात. अलिकडेच भाजपाचे महाराष्ट्रातील प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या अशाच एका विधानावरून कल्लोळ माजवला गेला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णूचा अकरावा अवतार म्हटल्याने चर्चा झाल्या, टिकाही झाली. पण असली चर्चा लोकहितास्तव कितीशी उपयुक्त आहे, याचा साधा विचार कुठल्या संपादकाला पत्रकाराला करावा असे वाटले नाही, याचे खरे नवल वाटते. वाघ भाजपाचे प्रवक्ते आहेत, आपल्या नेत्यविषयी भाबडे भक्त आहेत. तर त्यांना तसे वाटणारच. शिवाय ते पक्ष व नेत्याच्या कौतुकाचे बोलणार आणि त्यात थोडीफ़ार तरी अतिशयोक्ती असणार ना? हे ज्यांना समजत नाही, त्यांनी आपला पत्रकार विश्लेषक म्हणून अवतार कशासाठी आहे, त्याचाही थोडा फ़ेरविचार करणे शहाणपण ठरेल. कारण अवधूत वाघ किंवा तत्सम कोणाही मोदी चहात्याला अशाच टिकाकारांनी भक्त अशी उपाधी दिलेली आहे. मग ज्याचे भक्त म्हणून हे लोक गणले जातात, त्याला अवतार कोणी बनवले आहे? अशा टिकाकारांनीच मोदींना अवतार केलेले नाही काय?

मोदी यांना वाघ किंवा तत्सम कोणी अवतार आज म्हटले आहे. पण त्याच नेत्याच्या चहात्यांना भक्त अशी उपाधी देणार्‍यांनीच नकळत मोदींना अवतार घोषित केलेले आहे ना? कारण अवतार घेणार्‍या विभूतीचे भक्त असतात. यापुर्वीही इंदिराजी, नेहरू वा वाजपेयी, महात्मा गांधी असे एकाहून एक लोकप्रिय नेते होऊन गेले आहेत. त्यांच्या पाठीराख्यांना निष्ठावंत वा चहाते मानले गेले, भक्त अशी त्यांची संभावना कोणी केलेली नव्हती. मग तशी संभावना करणार्‍यांनीच मोदींना देवपण बहाल केलेले असेल, तर त्याला होकार भरण्यात अवधूत वाघ यांचे काय चुकले? म्हणजे मुळातच ज्यांनी मोदींना अवतार पुरूष बनवले, तेच आता अवधूतला जाब विचारत आहेत. मोदींना अवतार संबोधणारा तू कोण? मग सवाल असा येतो, की कोणालाही अवतार घोषित करण्याचा अधिकार या शहाण्यांना दिला कोणी? माध्यमात बसलेले शहाणे धर्माचार्य कधीपासून झाले? मदर तेरेसा किंवा अन्य कोणाला संत ठरवण्याचे अधिकार पोप व त्यांच्या व्हॅटीकन सत्तेला आहेत, तसा कुठला घटनात्मक अधिकार माध्यमातल्या शहाण्यांना राज्यघटनेने दिलेला आहे काय? नसेल तर त्यांनी मुळात मोदींच्या चहात्यांना भक्त कशाला घोषित करून टाकले? आणि तसे केलेले असेल तर मोदींना अवतारही त्यांनीच जाहिर केलेले आहे. त्याचे खापर अवधूत वाघच्या माथी कशाला? त्यांनी फ़क्त त्यांच्यावर होणार्‍या मोदीभक्त शब्दाचा खुलासा मोजक्या शब्दात करून टाकलेला आहे. त्यांनी मोदींना अवतार संबोधण्यासाठी माफ़ी मागण्यापेक्षा, मोदी चहात्यांना भक्त संबोधणार्‍यांनी आधी माफ़ी मागायची गरज नाही काय? यातले काही होणार नाही. कारण सगळाच कांगावा असतो. शिवाय जे असे कोणी पुरोगामी वा विवेकवादी आहेत, त्यांना असल्या अंधश्रद्धेची फ़िकीर कशाला? त्यांच्यासाठी कोणी अवतार ही विभूती कधीपासून झाली? यातून असल्या भोंगळ विवेकवादाचेही पितळ उघडे पडून गेले आहे.

पाच वर्षापुर्वी अशीच एक जाहिरात कॉग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेली होती. लोकशाही व विवेकवादाचा तितका अपमान या देशात कोणी केलेला नव्हता. सोनियांची भक्ती इतक्या टोकाला गेलेली होती की, ‘द हिंदू’ नावाच्या दैनिकात पहिल्या पानावर पुर्ण जाहिरात देऊन सोनियाजींच्या चरणी आपल्या निष्ठा श्रद्धा वाहिल्याचे त्यात म्हटलेले होते. ती जाहिरात छापायची हिंदू सारख्या ख्यातनाम वर्तमानपत्राला शरम वाटली नव्हती. त्या जाहिरातीचा अर्थ काय होता? तेव्हा कितीशा चर्चा झाल्या होत्या आणि त्याच दरम्यान केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी सोनियांना देशाची माताही जाहिर करून टाकले होते. अशा अवतारी सोनियांची महत्ता संपुष्टात आल्याने असे माध्यमवीर विचलीत झाले आहेत काय? कारण त्यांच्या तुलनेत अवधूत वाघ यांनी व्यक्तीगत पातळीवर आपली मोदीभक्ती व्यक्त केलेली आहे. पक्षातर्फ़े त्यांनी कुठे जाहिरात दिलेली नाही, की मोदींच्या पायाशी आपल्या निष्ठा वाहून टाकत असल्याचा डंका पिटलेला नाही. त्याच्याही पलिकडे जाऊन अजय माकनप्रमाणे आपलेच शब्द गिळण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली नाही. कोणी सचिन तेंडूलकरला देव मानतो तर कोणी अमिताभ बच्चनची भक्ती करतो. ते त्यांना घटनेने व कायद्याने बहाल केलेले स्वातंत्र्य आहे. त्यात बाधा आणण्याचा अधिकार माध्यमांना कोणी दिला आहे? मानला तर देव, अशी उक्ती आहे आणि जग तसेच चालत आलेले आहे. अवधूत वाघना मोदी हा अकरावा अवतार वाटला असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी वाहिन्या वा अन्य कोणावर ते मान्य करण्याची सक्ती केलेली नाही. म्हणूनच असल्या विषयावर बाष्कळ बकवास करण्यापेक्षा आपल्या रोज चुकणार्‍या बातम्या किंवा अर्थाचा अनर्थ करणारी भाषा सुधारण्यासाठी अशा उचापतखोरांनी वेळ कारणी लावला, तर त्यांच्यासह पत्रकारितेचेही कोटकल्याण होईल. वाघाला वाघ राहू द्यावे आणि ‘वाघ’मारे व्हायच्या फ़ंदात पडण्याची गरज नाही.

7 comments:

  1. मस्त भाऊ ! एकदम परखड व तर्क संगत. लिहित रहा.

    ReplyDelete
  2. आपली वैयक्तिक कंड जिरवण्यासाठी 'प्रसन्न'तेने पत्रकारिता करणाऱ्या वामपंथी ( डाव्या विचाराच्या अशा अर्थाने - वाम म्हटले आहे ) पत्रकारांनी आपला सल्ला मानला तर मग त्यांना कामच उरणार नाही याचं काय ?

    ReplyDelete
  3. चपखल विश्लेषण,
    आजकाल खासकरुन टिव्ही पत्रकार सगळ्या गोष्टींंकरता सरकार व भाजपलाच आरोपी बनवत आहे

    ReplyDelete
  4. "Indira is India"D K BARUA.

    ReplyDelete