कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकांना सुरूवात झाली आणि विनाविलंब प्रत्येक इच्छुक व पक्षनिष्ठाची सत्वपरिक्षा सुरू झालेली आहे. त्यात दोन्ही प्रमुख पक्षांचे लहानमोठे नेते सहभागी आहेत. भाजपा व कॉग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहिर केल्यावर त्यात नाव नसल्याचे पाहून अनेकजण विचलीत झाले, संतापले आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाचे जाहिर वाभाडे काढायला मागेपुढे बघितले नाही. अर्थात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निष्ठावान अनुयायी कार्यकर्त्यांना वगळून आपल्या घरातल्याच वारसांची वर्णी लावून घेतली व इच्छुकांना वार्यावर सोडले. मग पक्ष गेला खड्ड्यात म्हणत, अशा निष्ठावंतांनी उमेदवारीसाठी अन्य पक्षांना निष्ठा विकायला धाव घेतली तर नवल नाही. कर्नाटकची लढत तिरंगी असून त्यात भाजपा व कॉग्रेस हे प्रमुख पक्ष असले तरी सेक्युलर जनता दल हा तिसरा पक्षही मैदानात आहे. त्याच्यापाशी मोठे बळ व कार्यकर्त्यांची फ़ौज नसली, तरी प्रादेशिक पक्ष म्हणून त्याचे दिर्घकालीन अस्तित्व मोठे आहे. सहाजिकच भाजपा वा कॉग्रेसने तिकीट नाकारलेल्यांनी देवेगौडांचा धावा केल्यास नवल नाही. या दोन्ही पक्षातले अनेकजणांनी अखेरच्या क्षणी तिकडे उमेदवारी मागितली आहे. पण तिथेही थोडी गडबड झाली आहे. प्रमुख दोन पक्षांनी आपले उमेदवार जाहिर करण्यापुर्वीच जनता दलाने आपले बहुसंख्य उमेदवार घोषित केलेले असल्याने, या नवागतांसाठी खुप कमी जागा शिल्लक आहेत. सहसा असे होते नाही. दुबळा तिसरा पक्ष नेहमी प्रमुख पक्षातल्या नाराजांना उमेदवारी देण्यासाठी नाऊमेदवार आगमनाच्या प्रतिक्षेत असतो. देवेगौडांनी तितकी प्रतिक्षा केली नसल्याने अनेक नाराजांची तारांबळ उडालेली आहे. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख उलटल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पण त्यामुळेच मैदानात अपक्षांची मोठी फ़ौज दाखल होण्याची चिन्हे आहेत.
तिकीट हुकलेल्या दोन्ही पक्षातील नाराजांनी आपल्याच पक्ष कार्यालयात धुमाकुळ घालून व मोडतोड करून आपली नाराजी स्पष्ट केलेली आहेच. पण ह्यात आता काही नवल राहिलेले नाही. प्रत्येक तिकीट वाटपानंतर असे चित्र तयार होतच असते. त्यामुळे कोणी नाक मुरडून दुसर्याकडे बोट दाखवण्याचे कारण नाही. कॉग्रेस पक्षामध्ये उमेदवारी विकली गेली वा श्रेष्ठींनी भाऊबंदकी केल्याचे आरोपही नवे नाहीत. दहा वर्षापुर्वी अशीच स्थिती होती. तेव्हाही कॉग्रेस सत्तेत असताना निवडणूका झाल्या होत्या आणि त्यातही नेमका हाच आरोप ज्येष्ठ नेत्या मार्गारेट आल्वा यांनी केलेला होता. त्यांच्या सुपुत्राला तिकीट नाकारले गेल्यावर आल्वा यांनी जाहिरपणे कॉग्रेस तिकीटे विकली गेल्याचा आरोप केला होता. पुढल्या काळात त्यांच्यावर श्रेष्ठींची खप्पा मर्जी झाली आणि अलिकडे मार्गारेट आल्वांचे नाव कुठे ऐकू येत नाही. त्या क्रियाशील राजकारणातून कायमच्या हद्दपार झाल्या. पण इतरांवर आरोप करणार्या आल्वांना तरी हे सत्य कधी बोलावेसे वाटले? त्यांनाही आपल्या वारसाला उमेदवारी नाकारली गेल्याने अन्याय झाला असे वाटलेले होते. त्यांची घराणेशाही फ़ेटाळली गेल्याचे ते दु:ख होते. सामान्य कार्यकर्त्याला संधी नाकारली गेल्याची तक्रार नव्हती. सहाजिकच यात नवे काहीच नाही. सामान्य कार्यकर्ते त्याला आता सरावलेले आहेत आणि अशा बंडखोरीला पक्षश्रेष्ठीही सरावले आहेत. म्हणूनच मुळच्या तिकीट वाटपात फ़ारकाही बदल होण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण निवडणूका गुणवत्तेच्या आधारे होत नसतात, तर जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवाराला गुणवान मानले जात असते. सहाजिकच तसेच उमेदवार शोधले व स्विकारले जात असतात. मग त्यासाठी कसलेही स्पष्टीकरण दिले गेले, तरी त्यात अर्थ नसतो. ती सारवासारव असते. कारण आता निवडणूका म्हणजे जुन्या मराठी बालगीताचा खेळ होऊन बसला आहे.
मारू बेडूक उडी, गड्यांना खेळुया लंगडी, असे एक जुने गाणे आहे आणि त्यापेक्षा कर्नाटकात सध्या काहीही नवे चाललेले नाही. कुठल्याही पक्षातून इच्छुक कुठल्याही पक्षात उड्या मारत आहेत आणि त्याचे लंगडे समर्थनही चालू आहे. किंबहूना इतक्यात आलेली पहिली मतचाचणी कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळणार नाही अशी ग्वाही देत असली, तरी जुगाराचा बाजार रंगू लागला आहे. क्रिकेटचा सामना वा राजकीय निवडणूका अतिशय अनिश्चीत निकाल आणणार्या असल्याने त्यावर मोठा जुगार खेळला जात असतो. कुठला पक्ष किती जागा मिळवणार वा कुठला नेता पराभूत होऊ शकेल, अशा गोष्टीवर सट्टाबाजार जोरात चालत असतो. कर्नाटकात आता तसा जुगार सुरू झाला आहे. त्यावर हजार कोटी रुपयांच्या पैजा लावल्या जात असल्याचे म्हणतात. त्या सट्टाबाजारातले अंदाज वेगळेच असतात. चाचणीने कॉग्रेसला सर्वात मोठा पक्ष होण्याची आशा दाखवलेली असली तरी सट्टाबाजार मात्र भाजपाला झुकते माप देतो आहे. जुगारी दलाल भाजपाला बहूमत मिळण्याची शक्यता वर्तवत आहेत आणि कमीअधिक झाल्याच भाजपाच मोठा पक्ष होईल अशी ग्वाही दिली जात आहे. त्याचेही कारण आहे. चाचणीनेही कॉग्रेसला स्पष्ट बहूमत दिलेले नाही आणि सर्वात मोठा पक्ष ठरवताना दोन्ही प्रमुख स्पर्धकांना जवळपास समान टक्केवारी दाखवलेली आहे. कॉग्रेसला ३७ टक्के तर भाजपाला ३५ टक्के मते मिळताना चाचणी दाखवित आहे. अजून एक महिन्यांनी होणार्या मतदानात दोन टक्क्याचा फ़रक पारडे इकडून तिकडे करू शकतो. त्यामुळेच सट्टेबाज भाजपाला झुकते माप देत असावेत. पण आणखी एक कारण आहे, ते राजकीय दुष्टचक्राचे. चार दशके कर्नाटकात तोच मुख्यमंत्री बहूमत घेऊन सत्तेत आलेला नाही. प्रत्येक वेळी सत्ताधीश मुख्यमंत्री सत्ता गमावून बाजूला झालेला आहे आणि यावेळी कॉग्रेसच्या हाती सत्ता आहे. भाजपाला त्याच्या तुल्यबळ मते दिसत असल्याने त्यात उलथापालथ होईल, ही सट्टेबाजांची अपेक्षा असावी. अर्थात जुगार्यांचे अंदाजही बदलायला वेळ लागत नाही आणि मतदानाला चार आठवडे आहेत.
दरम्यान कॉग्रेस व भाजपातील नाराजी व फ़ाटाफ़ुटीचा पक्षांकडून देण्यात आलेला खुलासा हास्यास्पद आहे. जो पक्ष जिंकणार असतो, त्याच्याकडेच इच्छुकांची झुंबड उडालेली असते आणि जागा कमी व मागणी जास्त म्हणून नाराजांची संख्या मोठी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येते. पण कॉग्रेस व भाजपाला इतकी विजयाची अपेक्षा असेल, तर त्यांना जातीपाती व संख्याबळानुसार उमेदवार पुढे करण्याची गरज नाही. तसे करावे लागते आहे, कारण दोघांनाही धाकधुक आहे. विजयाची खात्री नसल्याचे ते लक्षण आहे. अन्यथा इतर पक्षातले उमेदवार आणुन या दोन्ही पक्षांना आपल्याच जुन्या निष्ठावंताना बाहेर ठेवावे आगले नसते. आता अर्ज भरण्याची मुदत संपण्यापर्यंत व त्याहीनंतर अर्ज मागे घेण्याचा दिवस मागे पडल्यावरच, खरे लढतीचे चित्रे स्पष्ट होईल. त्याहीपेक्षा अशा पक्षांतर व पळवापळवीवर लोक कोणत्या प्रतिक्रीया देतात, त्यावरच सोक्षमोक्ष लागणार आहे. सहाजिकच आता चालली आहे ती फ़क्त सारवासारवी आहे. पाच वर्षातून मस्तवाल राजकारण्यांना खेळवणारा मतदारही त्यांची मौज बघतच असणार. लोकशाहीत नेहमी बोलघेवडी अल्पसंख्या गदारोळ करीत असते आणि मौनी बहूसंख्या आपला हिसका दाखवित असते. त्यामुळे १५ मे रोजी या सर्व कसरती व बेडूक उड्या मारणार्यांचे भवितव्य समोर येईल. कोणाची कसरत लोकांना आवडली व कोणाला लोकांनी हुर्यो उडवून पिटाळले त्याचा तपशील मतमोजणीच्या दिवशी समोर येईल. तोपर्यंत मुठभर राजकीय नेते, उमेदवार यांची बकवास ऐकणे भाग आहे. कारण आज प्रत्येककडे त्याच्या विचित्र वागण्याचे खुलासे तयार आहेत. पण निकालाच्या दिवशी असले खुलासे टिकणारे नसतील. प्रत्येकाला आपल्या अपयशाचे वा विजयाचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तोपर्यंत आपणही ही फ़ुकटातली सर्कस बघून आपले मनोरंजन करून घ्यायला काय हरकत आहे?
Bhau 82 lakh+ page view congrats.specially using own blog not like parasite fb posts like all purogami ppl uses they even don't beat you on fb.its your own achievement.
ReplyDeleteभाऊ ,
ReplyDeleteब्लॉगला बरीच आझादी गॅंग मंडळी भेट देत आहेत. त्यांना कमेंट्स मध्ये धिंगाणा घालू देऊ नका.