Tuesday, October 9, 2012

ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी तर्कशास्त्र


(आजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता)

   तशी ही गोष्ट नवी नाही. मी कधीतरी पुर्वी ऐकलेली आहे. आणि अनेकदा माझ्या लिखाणातून सांगितलेली सुद्धा आहे. एका गावामध्ये मुले मोकळ्या माळावर खेळत होती. त्यातली मस्तवाल होती त्यांचा आडदांडपणा चालू होता तर बिचारी शांत मुले आपल्या कुवतीप्रमाणे साधेच काही खेळत होती. इतक्यात कुठून तरी एक बारकेसे मांजर तिकडे पोरांच्या घोळक्यात आले. पोरांच्या धावपळीत फ़सले आणि त्याला निसटावे कसे तेच कळेना. तेव्हा गोंधळलेल्या मुलांप्रमाणेच मांजराचीही तारांबळ उडाली. मग त्यातल्या एका मस्तीखोर मुलाला कुरापत सुचली. त्याने आपल्यासारख्याच इतर आडदांड मुलांना एक कल्पना सांगितली. गोल फ़ेर धरून उभे रहा आणि नेम धरून त्या मांजरावर दगड मारायचा. बघू कोणाचा नेम सरस आहे ते. सर्वांनाच त्यात मौज वाटली आणि सगळे फ़ेर धरून मांजरावर दगडधोंड्यांचा वर्षाव करू लागले. बिचारे ते इवले मांजर त्या मुलांच्या तावडीतून सुटायला सैरावैरा पळू लागले. पण पळणार तरी किती आणि कुठे? ज्या दिशेने पळायचे, त्या बाजूच्या पोराने जवळून मारलेला दगड त्याला अधिक जोरात दुखापत करत होता. जेवढी त्या मांजराची तारांबळ उडत होती, तेवढा या पोरांना जोश चढत होता. शेवटी अशी वेळ आली, की धावण्याचे पळण्याचे त्राण अंगी उरले नाही आणि मांजर एकाच जागी थबकून केविलवाणे इकडेतिकडे बघू लागले. इतक्यात त्याच्या दिशेने आलेला दगड त्याच्या असा वर्मी बसला, की तिथेच कोसळून ते मांजर गतप्राण झाले. मग अकस्मात दगडफ़ेक थांबली. आणि भोवताली जमलेल्या घोळक्यात एकदम शांतता पसरली.

   मांजर सैरावैरा पळत असताना त्याच्यावर दगड मारणार्‍यांप्रमाणेच बाकीची मुलेही जल्लोश करतच होती. पण मांजर मेल्यावर सर्वांची पाचावर धारण बसली. काहीतरी गडबड झाली आहे, याची जाणिव एकूणच त्या वानरसेनेला झाली होती. त्यामुळेच एकामेकाकडे शंकास्पद नजरेने बघत प्रत्येकाने पाय काढता घेतला. पोरे आपापल्या घरी पळाली. आपापल्या घरात जाऊन गुपचुप बसली. हू नाही की चू नाही. अशा सुट्टीच्या दिवशी आणि सूर्य अजून मावळला नसताना मुले घरोघरी परतली आणि निमुट बसली म्हटल्यावर पालकांनाही शंका आली. घरोघर मुलांकडे विचारणा झाली, तेव्हा खेळाच्या नादात मांजर मारले गेल्याचे उघडकीस आले. दुपार उलटून संध्याकाळ होत असताना, ती बातमी गावभर पसरली आणि गावकरी एकमेकांशी पोरांच्या मस्तीबद्दल बोलत हसू लागले होते. पण कुठून तरी मांजराला मारणे पाप असल्याची वदंता गावकर्‍यात पसरली आणि विनोदाची जागा चिंतेने घेतली. पण मांजर मारले म्हणजे कुठले पाप झाले व त्याव्रचा उपाय कोणता; याची कोणालाच अक्कल नव्हती. तेव्हा दिवेलागणीच्या वेळी तमाम गावकर्‍यांच्या जमाव शास्त्रीबोवांच्या अंगणात येऊन धडकला. कारण धर्मशास्त्र व पापपुण्याचे गावातले जाणकार व ठेकेदार शास्त्रीबोवाच होते ना?

   अंगणातली कुजबुज शास्त्रींच्या कानावर आली आणि अंधारलेल्या अंगणात लोकांचा जमाव दिसल्यावर शेंडीला गाठ मारून, बंडी सारखी करीत ते पडवीत आले. समोरचा चिंताक्रांत घोळका काही विपरित घडल्याचे सुचवत होता. मात्र काय घडले असावे याचा अंदाज येत नव्हता. अखेर शास्त्रींनीच काय काम काढलेत अशी विचारणा केली; तेव्हा त्या सुतकी चेहर्‍याच्या जमावा्तील वडीलधार्‍या व पिकल्या केसाच्या गावकर्‍याने घटना सांगितली आणि बुवांचा चेहराही आक्रसला. शेंडीची गाठ सोडून बुवा म्हणाले, घोर पापकर्म झाले आहे आणि त्याची विषारी फ़ळे संपु्र्ण गावालाच भोगावी लागणार आहेत. अहो शेवटी मांजर म्हणजे व्याध्रवंशीय. मांजराला वाघाची मावशी म्हणतात ना? आणि वाघ हे तर साक्षात देवी भवानीचे वाहन. त्याचीच हत्या झाल्यावर देवीचा गावावर कोप होणार नाही तर काय? त्यातून आता सुटका नाही. अंधारल्या अंगणात एकदम स्मशानशांतता पसरली. जमावातल्या सर्वच गावकर्‍यांचे चहरे काळवंडले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून अपराधी भावना ओसंडून वहात होती. आणि आपण धर्मशास्त्राचा गहन अर्थ उलगडून दाखवल्याचा सार्थ अभिमान शास्त्रीबोवांच्या विजयी मुद्रेतून त्या अंधारातही स्पष्टच दिसत होता. काही मिनिटे अशीच शांततेत गेली आणि मग एका म्हातारीने तोंड उघडले. ती म्हणाली ‘शास्त्रीबुवा, अहो तुम्हीच गावातले काय ते एकमेव जाणकार. तेव्हा आता या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हालाच माहीत असणार ना? मग आम्हाला कोड्यात कशाला टाकता? झटपट काय प्रायश्चित्त घ्यायचे ते सांगून टाका. आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत?’

   आता शास्त्रीबोवांच्या चेहर्‍यावरले स्मित मावळले आणि ती जागा गांभिर्याने घेतली. कपाळाच्या उजव्या बाजूला थोडे हलकेसे खाजवत बुवा म्हणाले, घडले आहे मोठे विपरीतच. पण त्याचे उत्तर किंवा प्रायश्चित्त असे झटपट सांगता येणार नाही. असे आधी कधीच गावात घडलेले नाही. अघटित घडले आहे. त्यामुळेच त्याचा शास्त्रार्थ शोधावा लागणार आहे. मगच त्यावरचा उपाय व प्रायश्चित्त सांगता येईल. आता तुम्ही आपापल्या घरी जा आणि मनोमन देवीची करूणा भाका. प्रार्थना करा. मी आज रात्री पोथ्या व ग्रंथांचे अवलोकन करून घडल्या गोष्टीचा शास्त्रार्थ लावतो. उद्या सकाळी पुढले बघू. लोक आपापल्या घरी गेले. कोणाचे जेवणात लक्ष नव्हते, की रात्रभर अनेकांचा डोळ्याला डोळा लागला नाही. शास्त्रीबोवा इथे समई पेटवून पोथ्या व ग्रंथांचे अवलोकन करीत मध्यरात्रीपर्यंत जागत होते. पहाटे केव्हातरी त्यांनी गाशा गुंडाळला आणि झोपी गेले. त्यामुळेच सकाळी त्यांना जाग यायलाच उशीर झाला. प्रातर्विधी उरकायालही उशीरच झाला. पण तांबडे फ़ुटण्याआधीपासून एक एक गावकरी येऊन शास्त्रीबोवांच्या अंगणात बसला होता. बुवा आपले दैनंदिन सोपस्कार उरकून बाहेर येईपर्यंत अवघा गाव त्यांच्या अंगणात हजर झाला होता. चेहरे सर्वांचे कालच्या सारखेच सुतकी होते. गावात शांतता होती. पोरेही कुठे खेळायला हुंडडायला घराबाहेर पडली नव्हती. गावावर जणू त्या मांजराच्या हत्येने मोठीच अवकळा आलेली होती. आणि त्यावरचा उपाय आता शास्त्रीबोवा देणार म्हणुन अवघा गाव, जीव कानात आणुन त्यांच्या अंगणात प्रतिक्षा करत उभा होता. ऊन चढू लागण्यापुर्वी बुवा पडवीत आले आणि अत्यंत चिंतातूर नजरेचा कटाक्ष त्यांनी गावकर्‍यांच्या समुदायावरून फ़िरवला. पुन्हा कालच्या त्या म्हातारीनेच विषयाला तोंड फ़ोडले. ‘काय करायचे शास्त्रीबुवा?’ त्यावर काही क्षण शांत राहून आणि शेंडीशी खेळत बुवांनी कथन सुरू केले.

   ‘मोठाच घोर अपराध घडला आहे. देवीच्या कोपातून सुटका मोठी अवघड गोष्ट आहे. मोठीच किंमत मोजावी लागणार आहे. शांती करावी लागेल, होमहवन करावे लागेल. दोन दिवसांच्या हवनानंतर सोन्याचे मांजर ब्राह्मणाला दान करावे लागेल.’ सगळीकडे एकच शांतता पसरली. पण प्रायश्चित्ताचा उपाय असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. आता सवाल होता, तो या प्रायश्चिताच्या मोठ्या खर्चाचा. तेव्हा त्याच म्हातारीने शास्त्रींना विचारले, बुवा उपाय शोधून काढलात हे आम्हा गावकर्‍यांवर आपले खुप मोठे उपकार झाले. आता एकच राहिले, तेवढे सांगा मग आपण सगळे कामाला मोकळे झालो. इतका वेळ विजयी मुद्रेने जमावाकडे बघणार्‍या बुवांच्या भुवया ताणल्या गेल्या. काहीशा क्रोधातच त्यांनी म्हातारीला विचारले, ‘आणखी काय राहिले?’ म्हातारी उत्तरली, ‘बुवा हे तुम्ही म्हणता ते प्रायश्चित्त करायचे कोणी?’ मग बुवांचा चेहरा खुलला, तुच्छतेने त्या म्हातारीकडे बघत बुवा म्हणाले, ‘एवढेही कळत नाही तुम्हा मुर्खांना? अरे ज्याच्या हातून मांजर मारले गेले, त्या पोराने नाही तर त्याच्या कुटुंबाने प्रायश्चित्त घ्यायला हवे ना?’

   या उत्तराने जमावातून इतका मोठा सुस्कारा निघाला, की शास्त्रीबोवांनाही चकित व्हायची पाळी आली. इतका वेळ सुतकी चेहर्‍याने तिथे उभ्या असलेल्या तमाम गावक‍र्‍यांच्या चेहर्‍यावर आता सुटकेचा भाव स्पष्ट दिसत होता. त्यामुळे बुवा अधिकच गोंधळले. कारण चिंतेने गप्प आलेल्या त्या घोळक्यात आता कुजबुज सुरू झाली होती. त्याकडे बुवा प्रश्नार्थक मुद्रेने बघत होते. तेवढ्यात गावचा म्होरक्या म्हातारा उत्तरला, ‘मग तर चिंताच मि्टली गावाची शास्त्रीबुवा’. आता बुवांना अधिकच बुचकळ्यात पडायची पाळी आली. कारण इतका गंभीर व खर्चिक उपाय असूनही लोक निर्धास्त का व्हावे? मात्र त्याचे उत्तर गावकर्‍यांकडुनच घ्यायला हवे होते. म्हणुन बुवांनी त्या म्हातार्‍याला विचारले, ‘चिंता संपली म्हणजे काय?’ आणि म्हातारा उत्तरला, ‘बुवा आता गावाची चिंता संपली कारण ही आता तुमचीच चिंता आहे. ते मांजर गावातल्या पोराच्या हातुन मारले गेले, त्या पोराचे नाव चिंताच आहे. तो दुसरातिसरा कोणी नसून तुमचा चिंत्याच आहे. तुमचा चिंतामणी’. काही क्षण बुवाही गडबडून गेले. आणि गावकर्‍यातही खसखस माजली होती. पण लगेच स्वत:ला सावरत बुवा समोरच्या जमावावर गरजले,

    ‘मुर्खांनो हे कधी सांगणार? माझा वेळ आणि दिवस खराब केलात. अरे माझ्याच मुलाकडून मांजर मारले गेले होते तर कालच संध्याकाळी सांगायचे नाही का? इतकी रात्र बघून उपाय व प्रायश्चित्त शोधायला लावलेत मला. मुर्खांनो. माझ्याच मुलाकडून त्या मांजराचा मृत्य़ु झाला असेल तर प्रायश्चित्त वगैरे काहीही करायला नको. पळा आपापल्या कामाला, मुर्ख लेकाचे.’

   एकदम गावकर्‍यांचा जमाव शांत झाला. सगळेच शास्त्रीबोवांकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते. गावकर्‍यापैकी कोणाकडुन मांजर मारले गेले तर घोर पाप असते आणि प्रायश्चित्त घ्यायला हवे. पण बुवांच्या मुलाकडून मांजर मारले गेले तर पापसुद्धा होत नाही? हा काय मामला आहे? ‘निघा’ असा फ़तवा बुवांनी काढला तरी जमाव तसाच स्तब्ध उभा होता. आणि त्या शंकेचाशी शास्त्रार्थ त्याच म्हातारीने बुवांना विचारला. ‘हे कसे काय हो बुवा?’

‘म्हातारे, अगोबाई माझा मुलगा चिंतामणी हा ब्राह्मणाचा पुत्र म्हणजे ब्राह्मणच ना? मग त्याच्या हातून मांजर मेले तर त्याला थेट मोक्षच मिळाला ना? मांजराला मोक्ष देणे हे पाप कसे होईल? उलट आमच्या चिंत्याने केले ते पुण्य़कर्मच आहे. त्याचे कसले आले आहे प्रायश्चित्त? हे पुण्य कालच संध्याकाळी सांगितले असते तर तुमच्या झोपा खरा्ब झाल्या नसत्या आणि माझा वेळ वाया गेला नसता.’