Friday, July 17, 2015

मुंबई तुमची, भांडी घासा आमचीमी वांद्रा पुर्व येथील म्हाडाची वसाहत गांधीनगर येथे रहातोय. मागली तीस वर्षे. माझ्या शेजारच्याच खोलीत पटणी नावाचे गुजराती ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करून आहे. किमान पाच दशकापासून ते तिथे रहातात आणि त्यांचे कुणाशीही कसले भांडण नाही. शनिवार ७ जुनची गोष्ट आहे. म्हणजे महिनाभर जुनी. आमचे घर साफ़ करायला काढले होते, म्हणून बाहेर गॅलरीत बसलो होतो. आजचा त्या पटणी कुटुंबातला कर्ता मुलगा हेमांग माझ्याशी नेहमीच्या गप्पा मारत होता. पुढे गाडी राजकारणावर आली आणि तो अकस्मात म्हणाला, ‘आमचे हे गुजराती लोक मोदीला बुडवणार बघा भाऊ.’ मी अवाक झालो. कारण तोही गुजराती असून असे कोणत्या संदर्भात बोलतोय, तेच लक्षात येत नव्हते. तर त्याने आपल्या ऑफ़ीसमधले अनुभव सांगायला सुरूवात केली. तो शेअर ब्रोकर कंपनीत काम करतो. तिथले लोक बोलताना आता भारत गुजराती मालकीचा झाला असे काही बोलतात, त्यामुळे हेमांग अस्वस्थ झालेला होता. तितकेच नाही तर अन्य भारतीयांविषयी अत्यंत तुच्छ भाषेत बोलतात, त्यामुळे तो कमालीचा विचलीत होता. मोदी केवळ गुजरात्यांमुळेच पंतप्रधान झाले आणि यापुढे देशात गुजरात्यांचाच वरचष्मा राहिल, असा एकूण ऑफ़िसातला सूर असतो. त्यामुळे हेमांग विचलीत होता. कारण ही मानसिकता गुजरात्यांना अन्य भारतीयांपासून दुरावणारी व एकटे पाडणारी आहे, अशी त्याची रास्त भिती आहे.

हेमांग या आशंकेतून मला थेट माझ्या बालपणात साठ वर्षे मागे घेऊन गेला. तेव्हा मी लालबागला दिग्विजय मिल समोरच्या सुदाम भुवन चाळीत तिसर्‍या मजल्यावर वास्तव्य करत होतो. सात आठ वर्षाचा अजाण मुलगा. तिथेही समोरच्याच खोलीत बाबुलालशेठ जैन नावाचे कापड दुकानदार वास्तव्य करीत होते आणि शेजारी म्हणून आमच्या दोन्ही कुटुंबात झकास गट्टी होती. वर चौथ्या मजल्यावर आणखी तीन गुजराती कुटुंबे वास्तव्य करीत होती. ते लोक मात्र उर्वरीत चाळकर्‍यांशी फ़टकून वागत. बाकी राजकारण समजण्याची अक्कल नव्हती. पण मोठी माणसे बोलत, त्यांचे ऐकण्याकडे कल होता. १९५४-५५ च्या दरम्यान भाषिक प्रांतरचना या विषयाने उचल खाल्ली होती आणि मुंबईसह महाराष्ट्रात मराठी राज्य व्हावे म्हणून भावना तापू लागल्या होत्या. त्या मराठी रोषाचा सगळा रोख प्रामुख्याने कॉग्रेसच्या विरोधात होता. त्याचे प्रमुख कारण मुंबईच्या कॉग्रेसमध्ये गुजराती नेत्यांचाच वरचष्मा होता. मजेची गोष्ट अशी, की मुंबई नावाच्या द्विभाषिक राज्याचा दुसरा भाग असलेल्या गुजरात प्रांतातही महागुजरात आंदोलनाचे सूतोवाच झालेले होते. मात्र मुंबईतले गुजराती कॉग्रेस नेतृत्व मुंबईसह द्विभाषिकाचे आग्रही होते आणि म्हणूनच मुंबईसहीत महाराष्ट्राची मागणी इथल्या ‘गुजराती’ मुंबई कॉग्रेसी नेत्यांच्या खिल्ली उडवण्य़ाचा विषय होता. त्याचा रोख नुसताच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या विरोधातला नव्हता, तर एकूणच मुंबई गुजरात्यांची आहे असा होता. म्हणूनच मग नुसते मराठी नव्हेतर बिगर गुजराती कुणावरही गरळ ओकण्याची मानसिकता गुजराती दाटवस्तीमध्ये दिसून यायची. बाबुलालशेठ त्यानेच अस्वस्थ होते. अशा वागण्याने गुजराती भाषिकांच्या विरोधात वातावरण तापत चाललेय, अशी भिती ते चाळीतल्या वडिलधार्‍यांशी बोलताना व्यक्त करायचे. हेमांगच्या परवाच्या आशंकेने मला त्यांचे बोल आठवले.

मुंबईच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती आहेत म्हणून मुंबईत सर्वांना आपल्याच गुलामीत जगावे लागेल; अशी एकूण तेव्हाची मानसिकता होती आणि तिचेच प्रतिबिंब गुजराती नेतृत्व असलेल्या कॉग्रेसच्या भूमिकेत पडलेले असायचे. त्याच्याच आहारी गेलेले मराठी सदोबा पाटील मग मराठी माणसाचे गुजरात्यांपेक्षा अधिक शत्रू बनुन गेले. कारण त्याच गुजराती उन्मत्त उद्दाम मानसिकतेला प्रोत्साहन देताना सदोबा पाटील म्हणाले होते, ‘यावश्चंद्र दिवाकरौ, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.’ आजच्या गुजराती उद्दामपणावर पांघरूण घालणार्‍या मुठभर भाजपा समर्थक नेत्यांची सारवासारवी बघितली, मग मला तेव्हाचे सदोबा पाटील आठवतात. अर्थात त्या मुंबईतल्या मराठी-गुजराती वादाचा गुजरातच्या लोकसंख्येवर कुठलाही प्रभाव पडला नव्हता, की तिथल्या कुणा बिगर गुजराती माणसांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागलेले नव्हते. ही व्यावसायिक यशाची गुर्मी आहे आणि ती दिर्घकाळ जगाच्या पाठीवर गुजरात्यांनी नेहमीच दाखवलेली आहे. तिचा प्रत्येक गुजराती वा गुजरातच्या जनतेशी काडीमात्र संबंध नाही. तेव्हा त्यांच्यासाठी मोरारजी देसाई पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याने आणि त्यांच्या हाती मुंबई या द्विभाषिक राज्याची सत्ता असल्याने; मुंबईतल्या सर्व गुजराती व्यावसायिक पैसेवाल्यांना आपण मुंबई ‘रोख रक्कम’ मोजून खरेदी केल्याची मस्ती चढलेली होती. आज साठ वर्षांनी त्याचाच पुन:प्रत्यय येतोय असे जाणवते. लोकसभा मोदींनी जिंकल्यापासून प्रामुख्याने गुजरात नव्हे इतकी मस्ती मुंबई परिसरातील गुजराती भाषिकांना चढलेली आहे. त्यातले बहुतांश व्यावसायिक व्यापारी दिसून येतील. आपण मुंबईच्या व पर्यायाने सर्व मुंबईकरांच्या आर्थिक नाड्या आवळू शकतो, असा त्या मस्तीमागचा रोख आहे. व्यापार व व्यवसाय नुसताच भांडवलावर चालत नाही, तर ग्राहकाच्या ‘कृपेने’ भरभराटतो याचे भान सुटल्याचा तो परिणाम आहे.

असो, तर तेव्हा असा जो मस्तवालपणा होता, त्याचे एक उदाहरण म्हणजे, ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’, अशी कोणी तरी केलेली मल्लीनाथी. त्यातून मग मराठी राज्याच्या लढ्याचा सगळा रोख थेट गुजराती भाषिकांकडे वळला आणि एकाकी रहीवासी असलेले गुजराती वा चहूबाजूंनी वेढलेल्या गुजराती वस्त्या त्या रोषाची शिकार होत गेल्या. त्यावेळी चौथ्या मजल्यावरचे तिन्ही गुजराती परिवार विनाविलंब गाशा गुंडाळून अहमदाबादला पळून गेले होते. आमच्या समोरच्या खोलीतल्या बाबुलाल शेठला किती गुंडांनी चाकू पोटाला लावून लुटले, ते माझ्या इवल्या डोळ्यांनी मी बघितले आहे. त्यातला एक होता रघ्या दादा. तो थोर शहीद कृष्णा देसाई सोबत आलेला आणि त्याच रघ्याने रामपूरी उपसलेला मला अजून आठवतो. ज्यांना तो कृष्णा ठाऊक नाही त्यांना आजच्या गुजराती मानसिकतेचेही दुखणे कळू शकणार नाही. माझे वडील व शेजारचे मिल जॉबर साहेबराव महाजन हस्तक्षेप करायला पुढे झाले होते. तर कृष्णाने त्यांची समजूत काढली, ‘चार घागरी उपसल्या म्हणून विहीर कधी ओस पडत नाही’. मात्र त्या अनुभवानंतर आपण बाबूलालशेठला वाचवू शकत नसल्याचे लक्षात येऊन माझ्या वडीलांनी डॉ. पाटकर यांच्या गाडीतून तेव्हाच्या कर्फ़्युतही त्यांना बॉम्बे सेंट्रलच्या रेल्वेस्थानकावर पोहोचवले. इतका तेव्हा गुजराती द्वेष पराकोटीला पोहोचला होता. त्याचे कारण बाबुलालशेठ सारखे सामान्य गुजराती नव्हते, तर मोरारजी देसाईंच्या उर्मटपणाने मस्तावलेले, गठ्ठ्याने वस्ती करणारे गुजराती त्याला जबाबदार होते. मग त्याचा परिणाम नंतरच्या निवडणूकीत कॉग्रेसला भोगावा लागला.

आज अनेक निष्ठावान भाजपावाले नेमक्या त्याच बचावात्मक कॉग्रेसी भाषेत बोलत आहेत व सारवासारव करीत आहेत. त्यांना मराठीच नव्हे तर इतर बिगर गुजराती मुंबईकर कसा विचलीत होत चालला आहे; त्याचेही भान उरलेले नाही. तेव्हाही मराठी राज्याच्या आंदोलनात गुजराती सोडून सर्वभाषिक मुंबईकर एकत्र आलेला होता आणि आज तशीच गुजराती विरोधातली भावना मुंबई परिसरात आकाराला येताना दिसू लागली आहे. त्याचा भाजपाशी संबंध काय? तर तेव्हाच्या कॉग्रेसमधील त्याच उर्मट गुजराती वर्चस्वाची मानसिकता, भाजपात एकत्रित गोळा होणार्‍या व्यावसायिक वा व्यापारी गुजराती लोकांमध्ये दिसू व अनुभवास येऊ लागली आहे. दहिसरमधला प्रकार त्याचीच प्रचिती आहे. अगदी तेलगू, हिंदी व मद्रासीही तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागे एकवटला होता आणि त्याची प्रेरणा मस्तवाल गुजरात्यांना धडा शिकवण्याचीच होती. मोदींच्या लोकसभेतील यशानंतर अमित शहांची भाषा व इथल्या एकूणच गुजराती वर्तनात, ती सहा दशकांपुर्वीची ‘भूमिका’ ठळकपणे समोर येऊ लागली आहे. तिच्या प्रतिकारात जो कोणी पुढाकार घेईल, त्याला सर्व बिगर गुजराती भाषिक मुंबईकरांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मिळत जाणार यात शंका बाळगण्याचे काही कारण नाही. शिवसेना भले मराठी अस्मितेच्या गोष्टी करील. पण तिचा गुजराती विरोध अन्य भाषिक व प्रांतियांच्या वेदनेवरही फ़ुंकर घालणारा असल्याने असे उन्मत्त गुजराती व पर्यायाने भाजपा एकाकी पडत जाणार आहे. (अपुर्ण)

5 comments:

 1. https://www.youtube.com/watch?v=rALzpelw-4M&feature=youtu.be

  ReplyDelete
 2. शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये जीव टाकून त्याचे सैनिक बनवले आणि शकांचा पराभव केला म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो अशी गुढीपाडव्याची आख्यायिका सांगितले जाते . हे मातीचे पुतळे म्हणजे शेतकरी असावेत. त्यांचे सहाय्य घेऊन सिरी सातकार्णीने (शालिवाहन) नह्पानाचा वध केला असावा. व्यापार आणि राजसत्ता ह्या दोन्ही गोष्टी शकांच्या हातात गेल्यामुळे इथल्या समाजाची जी आर्थिक होलपट आणि पिळवणूक होत होती ती सातवाहनांची सत्ता आल्यामुळे दूर झाली म्हणून आज इतकी वर्ष आपण शालिवाहनाच्या नावाने नवीन वर्ष साजरे करतो.
  आजवर गुजराती समाजाच्या हातात फक्त आर्थिक नाड्या होत्या. आज मोदींच्या रूपाने अर्थकारण आणि सत्ता ह्या दोन्ही गुजराती समाजाच्या हातात जात आहेत अशी भीती मुंबईतील सामान्य मराठी माणसाला वाटू लागली आहे.
  मागे एका गुजराती बाईने फेसबुक वर मराठी लोकांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते, फक्त गुजराती व्यक्तींसाठी कॉम्प्लेक्स मध्ये जागा असणे हे तर नेहमीचेच झाले आहे, मांसाहार केला म्हणून घरावर हल्ला होणे हे म्हणजे कहरच झाला म्हणायचा.
  मार्केटमध्ये मोदींमुळे गुजराती माणसांचा कॉन्फिडेंस खूप वाढला आहे असा बोलबाला आहे. हि उदाहरणे त्याचीच द्योतक आहे.
  शिवसेना आणि मनसे ह्या पक्षांवर किती विसंबून राहायचं हा यक्ष प्रश्न झालेला आहे. भाजपमध्ये मोदींशिवाय कुणाचं काही चालत नाही अशी परिस्थिती आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांच्या बद्दल काही न बोललेलंच बरं.
  अशा परिस्थितीत मराठी माणसाला आपापसातील मतभेद सोडून, व्यापक हितासाठी समाजकारण, राजकारण आणि अर्थकारण ह्या तिन्ही बाजू योग्यप्रकारे सांभाळून वाटचाल करावी लागणार आहे. 'संघै शक्ती कलियुगे' ह्या उक्तीप्रमाणे कोणत्याही नेत्याविना आपली दिशा ठरवणे जास्त संयुक्तिक आहे. तेव्हाच आपल्याला सौहार्दाची गुढी परत उभारता येईल.

  ReplyDelete
  Replies
  1. Kombadine sonyachi andi dili tari tee kombadich asate he tine visarata kama naye.

   Delete
 3. हो बरोबर आहे सगळ्या मराठी लोकांनी एकत्र यायला हवे

  ReplyDelete
 4. म्हणूनच गुजराती व्यापारी मग्रूर मानसिकतेविरुद्ध मुंबईसह सयुंक्त महाराष्ट्राचा लढा काही गुजराती सोडून गुजरातीइतर भारतीय मनात आजही धगधगत आहे. महाराष्ट्रात विशेषत्वा मुंबईत शिवसेना त्यावरच तरून आहे. पुन्हा ती वेळ आली आहे, अलीकढेच काही पत्रा- भांडीवाले व्यापारी-उद्योजक मुंबई सोडून गुजरातला जाणार अशी बातमी वाचनात आली होती तेव्हाच ज्यांची पोटे भरली आहेत त्यांनी तातडीने सोडून जावे यासाठी उद्योगमंत्र्याना उद्देशून मुखपुस्तकात प्रसिद्ध केले होते. गुजरातच्या मुख्यमंत्री बेन यांनी महाराष्ट्रात गुजराती व्यापाऱ्यांना गुजरातला चला हे आव्हान जाहिर आहेच पण काही गुजरातमधील गुजराती आपल्या गुजराती नातेवाईकांना गुजरातला येण्याचे आवाहन करत असल्याचे माझ्या एका गुजराती केळवणी (शिक्षण) संस्थेतील गुजराती मित्राने मनमोकळेपणे सांगितले होते. मात्र आजही मराठी मनात हेमांग पटनी, बाबुलाल जैनसारखे मराठी मातीत मिसळलेले, संस्कृतीत रुजलेले गुजराती, इतर प्रांतीय आहेतच त्यांचा विचार पडतो. पण भाऊ, प्रश्न पडतो, चांगला शेजार जपताना तुम्हाला खाण्याच्या सवयी - पदार्थांवर मर्यादा पडतात का ?

  ReplyDelete