Friday, November 30, 2018

सन्मान की अपमान

muttemwar rahul के लिए इमेज परिणाम

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कॉग्रेसनेते विलास मुत्तेमवार यांनी आपल्या पक्षाध्यक्षांना खुश करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निंदा करणे स्वाभाविक आहे. अन्यथा त्यांनी मोदी त्यांच्या जन्मदात्यांचा उद्धार करण्याचा आततायीपणा केला नसता. कुठल्या तरी एका सभेत त्यांनी मोदींना २०१४ पुर्वी कोण ओळखत होते? असा सवाल करून राहुल गांधींना कसे व कोणत्या कारणासाठी जग ओळखते, त्याची जंत्रीच सादर केली. आजही मोदी पंतप्रधान झालेले असले तरी त्यांच्या पित्याला कोणी ओळखत नाही, असा मुत्तेमवार यांचा दावा खराच आहे. फ़ार कशाला मोदींच्या अगदी जवळच्या नातलगांनाही कोणी फ़ारसे ओळखत नाही. त्यांची नावे काय व मोदींशी नाते कोणते, त्याचाही खुलासा शंभर भारतीयांना करता येणार नाही. कारण मोदींनी कधी आपल्या सार्वजनिक जीवनात कुटुंबियांना लुडबुडू दिलेले नाही. फ़ार दुरची गोष्ट सोडून द्या. देशात सत्तांतर घडवून मोदी भारताचे पंतप्रधान झाले, त्याचे श्रेय अवघ्या जगाने त्यांनाच दिले आहे. पण त्यात सहभागी व्हायलाही मोदींनी घरच्यांना साधे आमंत्रण दिले नाही. त्यांचा शपथविधी त्यांच्या आप्तस्वकीयांनी जगाप्रमाणेच दुरदर्शनच्या प्रसारणातूनच बघितला होता. अशा व्यक्तीच्या पित्याला जगाने ओळखण्याचे काहीही कारण उरत नाही. तशी त्याची इच्छाही नाही. एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून मोदींनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि आपल्या कुटुंबाला त्यापासून अलिप्त ठेवलेले आहे. पण ही गोष्ट भारतीय राजकारणात दुर्मिळ आहे. साध्या नगरसेवकापासून थेट पंतप्रधान पदापर्यंत एका व्यक्तीला सत्तापद मिळाले, की ती आयुष्याभर कुटुंबाची जागिर म्हणून जगण्याची या देशात पद्धतच आहे. पण तो मोदींचा दोष आहे की त्रुटी आहे? दोष असला तर नेहरूंनी घालून दिलेल आदर्श मोदी पाळत नाहीत हा म्हणावा लागेल.

सार्वजनिक जीवनात आल्यावर एकाने कर्तृत्व गाजवावे आणि त्याच्या कुटुंब आप्तस्वकीयांनी समाजाची संपत्ती आपली घरगुती मालमत्ता असल्याच्या मस्तीत जगावे, हा आदर्श भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनीच घालून दिलेला नाही काय? त्या आदर्शाचे पालन नंतर त्यांच्या पक्षातल्या लहानमोठ्या नेत्यांनी व अन्य पक्षातूनही झालेले आहे. नरेंद्र मोदी त्याला अपवाद असतील, तर गोष्ट खटकणारीच आहे ना? कारण आजकाल आपला पिता आई वा पुर्वज कोण, यानुसार राजकीय पात्रता ठरत असते आणि मोदी त्यात बसणारे नाहीत. महाभारतातला कर्ण कोणा खास पुर्वजाचा वारस नव्हता, म्हणून हेटाळला जात होता. तशीच मोदींची परिस्थिती आहे. नाहीतर नेहरू गांधी खानदानाची कहाणी बघा. केवळ त्या घराण्यातल्या म्हणून विजयालक्ष्मी पंडित राज्यपालही होऊ शकल्या आणि चार पिढ्या पक्षाचे अध्यक्षपद जन्मसिद्ध असल्यासारखे पुढल्या वारसांना मिळत राहिलेले आहे. तसे नसते तर रॉबर्ट वाड्रा हे नाव कोणाला कशाला लक्षात राहिले असते? पण आज त्याही नावाचा बोलबाला आहे. विलास मुत्तेमवार एकवेळ आपल्या जन्मदात्याचे नाव विसरू शकतात, पण वाड्रा हे कोण त्यांना पक्के माहिती असावे लागते. नाहीतर त्यांना कॉग्रेसमध्ये स्थान असू शकत नाही. घराण्याची ही किमया असते. मात्र मुत्तेमवार यांना फ़िरोज गांधी हे नाव आठवणार नाही. त्यांनाच कशाला सोनियांनाही ते नाव किंवा त्याच्याशी असलेले नाते आठवत नाही. मध्यंतरी नॅशनल हेराल्ड दैनिकाच्या पैसा-मालमत्तेच्या हेराफ़ेरीचा खटला समोर आला, तेव्हा सोनियांनी चवताळून एक विधान केलेले होते. आपण कोणाला घाबरत नाही. कारण आपण इंदिराजींची सुन असल्याचे अभिमानाने सोनियाच म्हणाल्या होत्या. ते सत्यही आहे. पण सासू आठवणार्‍या सोनियांना सासरा मात्र आठवत नाही, की त्याचे स्मरणही करावे असे वाटत नाही.

फ़िरोज गांधी हे इंदिराजींचे पति होते आणि सोनियांच्या पतीचे पिताही होते. पण त्यांचे नाव कॉग्रेस पक्षात कोणी घेत नाही. मुत्तेमवारही ते नाव घेणार नाहीत. तरीही त्या खटल्याच्या वेळी ते नाव सोनियांना आठवायला हरकत नव्हती. कारण ज्या दैनिकाच्या मालमत्तेचा तो खटला आहे, त्या कंपनीचे पहिले कार्यकारी संचालक फ़िरोज गांधीच होते. पण सोनियांना आपला सासरा वा त्याचे नावही आठवत नाही. कारण सासरा असला म्हणून त्याने त्याच्या सासर्‍यालाही सोडलेले नव्हते. कुठल्या तरी भ्रष्टाचार मामल्यात फ़िरोज गांधी यांनी आपले सासरे व तात्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नाकी दम आणलेला होता. कुटुंबाची महत्ता सांगून सार्वजनिक पैशाचे अपहरण करण्याला आपल्या कुटुंबातही विरोध करणारा त्यांना कसा मानवणार ना? म्हणून सोनियांना सासरा आठवत नाही, की त्याचे नावही घ्यायची इच्छा नाही. मग मुत्तेमवारना तरी राजीव गांधींचे पिता कशाला आठवणार ना? राहुल गांधींचे पिता राजीव गांधी अशी आठवण मुत्तेमवार ठणकावून सांगतात आणि राहुलच्या आजीचेही नाव सांगतात. पण राहुलच्या पित्याच्या पित्याचे नाव मुत्तेमवारांनाही आठवत नाही. कशी गंमत आहे ना? एखादे कुटुंब प्रसिद्ध वा ख्यातकिर्त असले म्हणून त्यातील सगळ्याच कुटुंबियांची नावे जगाला माहिती असतात. तरी संबंधितांना सगळीच नावे आठवत नाहीत, की आठवूनही उच्चारता येत नसतात. अन्यथा मुत्तेमवारांनी जी वंशावळ त्या भाषणात वाचून दाखवली, त्यात फ़िरोज गांधी या नावाचा उल्लेख टाळला नसता. न जाणो ते नाव घेतले आणि सुनबाईंचा रोष झाला तर पडायच्या निवडणूकीचेही तिकीट नाकारले जायचे ना? त्यापेक्षा मुत्तेमवारांनी जीभ चावली आणि मनातल्या मनात फ़िरोज गांधी हे नाव यादीतून डिलीट करून टाकले. मात्र असे करताना त्यांनी खरेच राहुल गांधींचा गुणगौरव केला आहे, की या पक्षाध्यक्षाची निंदानालस्ती केली आहे?

वरकरणी बघितले तर मुत्तेमवार यांनी राहुलचे कौतुक करताना मोदींची टवाळी केली असे़च वाटेल. पण बारकाईने त्यांचे विधान लक्षात घेतले, तर त्यांनी नरेंद्र मोदींच्या कौतुकासाठी राहुल गांधींची नको तितकी बदनामी करून टाकलेली आहे. राहुलची ओळख त्यांनी काय करून दिली? तर त्यांचे पिता व पुर्वज ख्यातनाम होते, म्हणूनच आज राहुल गांधींना काही किंमत आहे. लोक राहुलना ओळखतात कारण त्यांच्यापाशी काही कर्तृत्व नसून पुर्वजांची पुण्याई एवढेच राहुलचे भांडवल आहे. नाहीतर नरेंद्र मोदींकडे बघा, हा माणूस शून्यातून स्वकर्तृत्वाने इतक्या उच्चपदावर पोहोचला आहे. असाच मुत्तेमवार यांच्या विधानाचा खरा अर्थ नाही काय? थोडक्यात पुर्वजांची अशी पुण्याई पाठीशी नसती वा राजीवचे पुत्र व इंदिराजींचे नातू नसते, तर राहुलना कोणा कुत्र्याही विचारले नसते. असाच त्या वक्तव्याचा अर्थ होत नाही काय? मग त्याला मोदींची निंदा म्हणायचे, की राहुलचे गुणगान म्हणायचे? ज्याला हवा तसा प्रत्येकाने अर्थ काढावा. पण तटस्थपणे बघितले तर तो मोदींचा गौरव आहे. ज्याच्या पित्याला कोणी ओळखत नाही असा सामान्य घरातला मुलगा, आपल्या मेहनत व कर्तृत्वाने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला, हा त्यातला आशय आहे. तो नक्कीच अपमानास्पद नाही. पण राहुल गांधींचे कौतुक मात्र प्रत्यक्षात त्यांची नालायकी सांगणारे आहे. पुर्वजांच्या पुण्याईने हा पोरगा इथपर्यंत पोहोचू शकला. मात्र वारशात मिळालेल्या मोठ्या अधिकार व पक्षाचे त्या दिवट्याने पुरते वाटोळे करून टाकले, असाच त्याचा दुसरा आशय नाही काय? नेहरूंपासून राजीवपर्यंत कर्तबगार पुर्वज नसते तर राहुल गांधींना कोणी ओळखले नसते. इतके महत्व मिळाले नस[ते, असेच मुत्तेमवार सहजगत्या म्हणून गेलेत आणि समोर बसलेल्या कोणा कॉग्रेसी गणंगांनी त्या शब्दांना आक्षेपही घेतलेला नाही. उलट पक्षाध्यक्षाच्या त्या हेटाळणीला टाळ्या वाजवून दाद मात्र दिली, आता बोला!

Thursday, November 29, 2018

बी टीम आणि ए टीम

Image result for rahul gandhi

मला राहूलचे सर्व फ़ोटो व्हिडीओ आवडतात. जगात कोणापाशी इतका टोकाचा आत्मविश्वास मला आजवर आढळलेला नाही

तीन राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान संपलेले आहे आणि येत्या शुक्रवारी राजस्थान व तेलंगणा या दोन विधानसभांसाठी अखेरच्या फ़ेरीतले मतदान व्हायचे आहे. त्यासाठी शेवटची प्रचार रणधुमाळी चालू असून विविध पक्षांनी एकमेकांवर बेधडक आरोप करण्याला पर्याय नाही. त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भारत ही मोदींच्या पित्याची जागिरी नसल्याचे म्हटले आहे, तर मोदींनी राव हे कॉग्रेसप्रमाणेच घराणेशाही राबवित असल्याची टिका केली आहे. यात कॉग्रेस हा तेलंगणातला मुख्य विरोधी पक्ष असल्याने त्या पक्षाचे मुरब्बी अध्यक्ष राहुल गांधी काय म्हणतात, याला खास महत्व आहे. राहुल नेहमी राफ़ायल वा अनिल अंबानी यांच्यावर बोलत असतात. पण तेलंगणात त्यांनी आगामी राजकारणाचे बिगुल वाजवलेले आहे. आपल्या सोबत आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हजर असतानाही राहुलनी चंद्रशेखर राव यांच्याशी निकालानंतर युती करण्याची घोषणाच करून टाकली आहे. पण नायडूंना त्याचा किती अंदाज आलाय, हे ठाऊक नाही. पण ही राहुल गांधी यांची शैली झालेली आहे. ते एक बोलतात आणि भलतेच करतात, हा आजवरचा अनुभव आहे. अशा राहुलनी नायडूंच्या हजेरीत राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला भाजपाची बी टीम घोषित केलेले आहे. हा मोठा राजकीय संकेत आहे. कारण राहुल प्रचारात ज्या पक्षावर भाजपाचा हस्तक वा बी टीम म्हणून हल्ला करतात, त्यांच्याशी निकालानंतर थेट युती करतात, असा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी राव यांना भाजपाची बी टीम म्हटलेले आहे. मग ११ तारीख नंतर तेलंगणात टीआरएस व कॉग्रेस यांचे संयुक्त सरकार सत्तेत आले तर नवल मानण्याचे कारण नाही. असेच कर्नाटकात झालेले आपण विसरून गेलो काय? कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात अखेरच्या दिवसात राहुल यांनी कुमारस्वामी व जनता दल सेक्युलर पक्षाला भाजपाची बी टीम म्हणून घोषित करून टाकलेले नव्हते का?

आताही तेलंगणात राहुलनी राव यांच्या टीआरएस पक्षाला हरवण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाशी हातमिळवणी केलेली आहे. त्यातली पहिली गंमत अशी, की तेलंगणाच्या निर्मितीला तेलगू देसम पक्षाचा कडवा विरोध होता. त्यामुळेच त्या राज्यात नायडू यांना फ़ारसे समर्थक नाहीत. मागल्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत त्याची प्रचितीही आलेली आहे. त्यामुळेच नायडूंना स्वबळावर तिथे लढणे शक्य नव्हते. त्यांनी कॉग्रेससोबत आघाडी करण्यात गैर काहीच नाही. पण तिथे हे दोन पक्ष एकमेकांना कोणती मदत करू शकणार आहेत, त्याचे उत्तर सोपे नाही. नायडू आंध्राचे मुख्यमंत्री व तेलंगणाचे शत्रू मानले जातात. त्याचा फ़टका कॉग्रेसला कितपत बसेल वा लाभ होईल, ते आज सांगता येत नाही. पण मजेची गोष्ट अशी, की आंध्राची विभागणी करून वेगळे तेलंगणा राज्य केल्याचे श्रेय कॉग्रेस मागते आहे आणि त्याचे तात्कालीन कडवे विरोधक आता त्याच कॉग्रेससोबत हातात हात घालून उभे आहेत. लोकांनी तेलंगणा देणार्‍या कॉग्रेसवर विश्वास ठेवावा, की तेलंगणाला कडवा विरोध करणार्‍या चंद्राबाबूंना नव्या राज्याचे तारणहार मानावे? एकूणच घोळ आहे ना? तर असे लोक एकत्र येऊन तेलंगणा समितीला भाजपाची बी टीम घोषित करीत आहेत. पण मग भाजपाची ए टीम कोण आहे? त्याचा खुलासा राहुलनी कधीच केलेला नाही. त्यांना भाजपाची प्रत्येक राज्यातली बी टीम नेमकी ठाऊक असते. पण एक टीम मात्र सांगता येत नाही. मग तेच व त्यांची कॉग्रेस भाजपाची ए टीम आहे काय? कारण भाजपाला मागल्या चार वर्षात जितके व जिथे मोठे यश मिळाले, त्यात महत्वाची मदत खुद्द राहुल गांधी व कॉग्रेस पक्षानेच केलेली आहे. मात्र जिथे ए टीम फ़सली तिथे भाजपाच्या बी टीमशी कॉग्रेसनेच हातमिळवणी करून सत्तेवर कब्जा मिळवला आहे. आताही बहुधा निकालानंतर राहुल बहूमत हुकलेल्या चंद्रशेखर रावना पाठींबा देण्याच्या मनस्थितीत आलेले असावेत.

त्यालाही हरकत नाही. लोकशाहीत आणि निवडणूकीच्या राजकारणात संख्येला महत्व असते. सगळेच पक्ष आधी एकमेकांच्या विरोधात लढतात, दोषारोप करतात आणि नंतर गळ्यात गळे घालून सत्तेची हिस्सेदारीही करतात. तेच कॉग्रेस वा राहुल गांधी यांनी केल्यास त्यात काही गैर मानायचे कारण नाही. पण ज्या भाजपाच्या विरोधात राहुल अखंड आग ओकत असतात, त्याच पक्षाची बी टीम लगेच त्यांच्यासाठी पुरोगामी कशी होते, त्याचाही एकदा खुलासा त्यांनी करावा अशी अपेक्षाही गैर मानता येत नाही. पण खुलासा गांधी खानदानाने देण्याची कुठलीही गरज नाही. सुदैवाने तशी अजून भारतीय राज्यघटनेत तरतुद झालेली नाही. बहुधा पुढल्या काळात पुन्हा युपीएचे पुरोगामी राज्य आले, तर तशीही तरतुद केली जाईल. मग असे प्रश्न विचारण्याची वा खुलासा मागण्य़ाची हिंमत कोणाला होणार नाही. पण सध्या तशी तरतुद नसल्याने हे प्रश्न उपस्थित होणारच. अर्थात त्याचा खुलासा मिळण्याची अपेक्षा बाळगता येत नाही. म्हणूनच आपल्या बुद्धीनुसार त्याची उत्तरे शोधणे भाग आहे. जर टिआरएस व कर्नाटकातील कुमारस्वामींचा सेक्युलर जनता दल भाजपाची बी टीम असेल; तर त्याच्याशी राहुल निकालानंतर हातमिळवणी कशाला करतात? आणि ह्या अशा बी टीमवर पुरोगामी लोक भाजपाचा विरोधक असल्याचा विश्वास कशाला ठेवतात? त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भाजपाची ए टीम कोण याचा शोध घ्यावा लागेल आणि तो घ्यायला गेल्यास राहुल गांधी व त्यांचे निकटवर्तियच भाजपाची खरी ए टीम असल्याचे धागेदोरे सापडू शकतात. २०१३ पासून कॉग्रेसच्या नेतृत्वाची सुत्रे हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदींच्या कॉग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला वास्तवात आणण्यासाठी राहुल गांधींनी जेवढे परिश्रम घेतले तितके खुद्द मोदी शहांनी घेतले नाहीत. राहुल व अय्यर निरूपम बब्बर इत्यादिकांनी तशीच मेहनत घेतलॊ नाही का? मग त्यांना भाजपाची ए टीम नाही तर काय म्हणायचे?

मागल्या दोनतीन महिन्यापासून पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची अखंड रणधुमाळी चालू आहे आणि राज्याच्या मतदानात स्थानिक प्रश्नांना मोठे महत्व असते. तिथले मतदार आपल्या अडचणींवर मात करणारा सत्ताधारी शोधत असतात आणि सत्तेत असलेल्यांच्या चुकांसाठी त्याला शिक्षा करायला मत बनवित असतात. परंतु राहुल गांधी कॉग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून सगळ्या राज्यात राफ़ायल विषयावर पोटतिडकीने बोलताना आपण बघितलेले आहेत. ज्या विषयाशी त्या राज्यातूल मतदार जनतेला काडीमात्र कौतुक नाही की फ़िकीर नाही, अशा विषयावर तोफ़ा डागून राहुलनी भाजपाच्या स्थानिक मुख्यमंत्र्यांना किती दिलासा दिला आहे? शेतकरी संकटात अणि महागाई वा विकासाचे थांबलेले काम; यासाठी लोक उत्सुकतेने कॉग्रेसची भूमिका ऐकायला व्याकुळ झालेले होते. तर त्यांना अनिल अंबानींना तीस हजार कोटी मिळाल्याचे वॄत्त सांगून राहुल गांधी निराश करत राहिले. हे ए टीमचे काम नाही काय? राहुल जातील व बोलतील तोच चर्चेचा विषय व्हायचा आणि त्यात कुठेही स्थानिक प्रश्न वा समस्यांचा मागमूस नव्हता. हे कॉग्रेसला लाभदायक नव्हते आणि भाजपाला त्रासदायक नव्हते. मग राहुल कोणाला हातभार लावत होते? कोणाची ए टीम म्हणून दौरे करीत होते? अशा ए टीम आणि बी टीमने निकालानंतर एकत्र यायचे ठरवले, तर त्यात वावगे काय? ज्योतिरादित्य शिंदे वा सचिन पायलट यांनी मागल्या दोनतीन वर्षात आपापल्या राज्यात मेहनत घेऊन भाजपा विरोधी हवा निर्माण केली, ती राहुलनी आपल्या दौर्‍यातून काढून घेतली. तर मोदींसाठी प्रचाराला चांगले वातावरण निर्माण होते आणि भाजपाची ए टीम असेल तर तेच त्या टीमचे काम असते ना? उद्या अशा रितीने त्या तीन राज्यात भाजपाने आपले सरकार व सत्ता टिकवली, तर त्याचे श्रेय मोदींपेक्षाही भाजपाच्या ए टीमला म्हणजे राहुल गांधींनाच द्यावे लागणार ना?


Monday, November 26, 2018

संघीय ढाचा कोण मोडतोय?

naidu mamta के लिए इमेज परिणाम

बाटगा अधिक जोरात बांग देतो, अशी एक उक्ती पुर्वी प्रचलीत होती. त्याचा अर्थ धर्मांतर केलेला मुस्लिम अधिक जोरात अल्लाची प्रार्थना करतो असा आहे. जर त्याने धर्म बदलला असेल तर जोरात किंवा सौम्यपणे प्रार्थना केली, तर बिघडले कुठे? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशावेळी उक्तीमधला आशय लक्षात घ्यावा लागतो. तो आशय मुस्लिमांशी संबंधित नसून एकूण मानवी प्रवृत्तीचे वर्णन करणारा आहे. आपण आता कोणीतरी नाही तर भलताच अमूक कोणी असल्याचे, सिद्ध करण्याची अतीव इच्छा असा त्यामागचा आशय आहे. त्यामुळेच आजच्या जमान्यात पक्षांतर केलेला कोणी नव्या पक्षाचे गोडवे गाताना आपल्याच जुन्या पक्षाचे तावातावाने वाभाडे काढण्यात पुढाकार घेताना दिसत असतो. सध्या पाच विधानसभांचॊ मिवडणूक जोरात असून उमेदवारी नाकारली गेलेल्या अनेकांनी पक्षांतर केले आहे आणि ते नव्या पक्षाविषयी बोलण्यापेक्षाही जुन्या पक्षाची लक्तरे काढण्यात गर्क आहेत. तसाच काहीसा प्रकार काही स्थानिक प्रादेशिक वा लहान पक्षांच्याही बाबत होताना दिसतो. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू त्यापैकीच एक आहेत. म्हणूनच त्यांनी आजवरचे सर्वच राजकीय संकेत बाजूला सारून आपल्या राज्यात सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेला प्रवेश करण्यास वा कुठलाही तपास करायला मज्जाव करण्याची टोकाची भूमिका घेतलेली आहे. क्वचितच अशी स्थिती पुर्वी उदभवलेली होती. केंद्रात वा राज्यात विभिन्न पक्षाची सरकारे असली म्हणून राज्यातील कुठल्या सरकारने सीबीआयला आक्षेप घेतला नव्हता. बहुधा कर्नाटकात जनता दलाचे राज्य असताना एकदा तशी घटना घडलेली आहे. अन्यथा कुठल्या पक्षाने असले आततायी पाऊल उचललेले नव्हते. पण अलिकडेच एनडीएतून बाजूला झालेल्या चंद्राबाबूंना आपणच सर्वाधिक मोदीविरोधी असल्याचे सिद्ध करण्याची घाई झाल्याने, ते टोकाच्या भूमिका घेत चालले आहेत.

मध्यंतरी त्यांच्या पक्षातील व जवळचे नेते असलेल्या कुणावर सीबीआयने धाडी घातल्या. तशाच धाडी अन्य पक्षांच्याही बाबतीत झालेल्या आहेत. मोदी सरकार सत्तेत नसतानाही अशा घटना घडलेल्या आहेत आणि तेव्हाही केंद्रात सत्तेवर असलेल्या पक्षावर सीबीआय वा अन्य यंत्रणांचा राजकीय दबाव आणण्यासाठी उपयोग केल्याचे आरोप झालेले आहेत. पण कोणी अशा रितीने थेट सीबीआयला आपल्या राज्यात प्रतिबंध घालण्याचा आगावूपणा केलेला नव्हता. अगदी मागल्या दोनतीन वर्षात ममता बानर्जी मोदी सरकार विरोधात बोलण्याची व वागण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्या पक्षाचे अनेक नेते मंत्री सीबीआयच्या जाळ्यात फ़सलेले आहेत. पण त्यांनी कधी सीबीआयला बंगालमध्ये येण्यास प्रतिबंध केला नाही. भाजपाच्या विविध नेत्यांना वादग्रस्त भागात प्रवेश करायला वा दौरा करायला जरूर रोखलेले आहे. पण कधी केंद्राच्या शासकीय यंत्रणेला प्रतिबंधित करण्याचा उच्चारही केलेला नव्हता. कारण भारतीय राज्यघटनेने संघीय राज्याची कल्पना मांडलेली आहे. त्यात राज्य व केंद्राचे अधिकार क्षेत्र निर्धारीत करून दिलेले आहे. काही बाबतीत त्याची वादावादी होऊ शकते. कायदा सुव्यवस्था हा राज्य सरकारचा अधिकार मानला गेला आहे. पण जेव्हा राज्यातील सत्ताधारी पक्ष हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी होतात, तेव्हा कोर्टाने वा स्थानिक पक्षानेही तपासकाम सीबीआयकडे सोपवलेले आहे. तसे नसते तर ममता बानर्जी यांनी शारदा नारदा अशा घोटाळ्यात गुंतलेल्या आपल्या निकटवर्तियाना खटल्यात गुंतूच दिले नसते. त्यामुळेच चंद्राबाबूंची भूमिका टोकाची वाटते. शिवाय तेच कालपर्यंत मोदी सरकारमध्ये एक भागिदार होते. मग इतके दिवस मोदी सरकार राज्यात हस्तक्षेप करीत असल्याचे त्यांना कशाला जाणवले नव्हते? की आता आपला मोदींच्या सोबत राहिल्याचा डाग पुसण्यासाठी त्यांनी असा आततायीपणा चालविला आहे?

आंध्रातील नायडूंचा खरा प्रतिस्पर्धी भाजपा अजिबात नाही. तसाच कॉग्रेस पक्षही त्यांचा स्पर्धक नाही. मग चंद्राबाबू कशामुळे इतके विचलीत झाले आहेत? त्यांचा खरा स्पर्धक जगनमोहन रेड्डी आहे. मागल्या खेपेसही त्यानेच तेलगू देसमशी कडवी टक्कर दिली होती आणि भाजपाच्या किरकोळ मतांमुळे नायडूंना सत्ता मिळवला आलेली आहे. हा जगनमोहन कोण? तर २००४ सालात चंद्राबाबूंचे साम्राज्य उध्वस्त करून आंध्रामध्ये कॉग्रेसला पुनर्स्थापित करणार्‍या राजशेखर रेड्डी यांचा मुलगा आहे. एकदा नव्हेतर दोनदा त्याच्या पित्याने चंद्राबाबूंबा धुळ चारलेली आहे. मात्र पित्याचे अपघाती निधन झाल्यावर मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे, अशी त्याची अपेक्षा होती आणि ती कॉग्रेस अध्यक्षा सोनियांना मान्य नव्हती. त्यामुळे त्याने बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. कारण सोनियांनी स्वपक्षाचा असूनही त्याची चहूकडून कोंडी केली होती. पित्याने हजारो कोटीची माया केली अशी वदंता होती आणि त्यातला हिस्सा श्रेष्ठींना पाठवला नाही, तर मुलाच्या मदतीने अन्यत्र दडपून ठेवला असा संशय होता. त्यामुळेच आधी जगनमोहनची पक्षातच कोंडी करण्यात आली. पित्याच्या वर्षश्राद्धाला सोहळा करण्यासाठी राज्यभर यात्रा काढण्याची त्याची मागणी पक्षाने पार धुडकावून लावली आणि जगनला बंड करावे लागले. तेव्हा त्याच्यामागे सीबीआय व आयकर खात्याचे शुक्लकाष्ट लावण्यात आलेले होते. आपल्या आईसह त्याने पक्षाला रामराम ठोकला आणि वेगळी चुल मांडली. खासदारकीचा राजिनामा दिला आणि तुरूंगात राहूनच तो पुन्हा लोकसभेत निवडून आला. कॉग्रेसमध्येही त्याचे खुप संख्येने हितचिंतक होते. तेव्हा त्याला संपवण्यासाठी सोनियांनी अखेरच्या दिवसात वेगळ्या तेलंगणाची मागणी मान्य करून राज्याचे तुकडे पाडले. हे सर्व राजकीय सुडबुद्धीने जगनमोहनला संपवण्यासाठीच होते आणि त्यासाठी सरसकट केंद्रीय यंत्रणांचा राजरोस वापर झालेला होता.

चंद्राबाबूंना आज त्यांच्या सहकार्‍यांवर आरोप झाले व धाडी पडल्याने केंद्रीय संस्थांचा राज्यात हस्तक्षेप दिसला असेल, तर तेव्हा म्हणजे जगनमोहनच्या बाबतीत केंद्राने कुठला न्याय लावला होता? चंद्राबाबूंनी कधी जगनसाठी दोन अश्रू ढाळले होते का? खुद्द जगननेही इतके भोगून कधी सीबीआयवर आरोप केले नाहीत. आपली भूमिका समर्थपणे कोर्टात व राजकीय व्यासपीठावर मांडून त्याने किल्ला लढवलेला होता. आजही त्याच्यावरचे खटले चालू आहेत आणि तब्बल दिड वर्ष जगनने तुरूंगात काढली आहेत. त्याच्यावरचा अन्याय नायडूंना दिसला नाही की तेव्हा अन्यायाची व्याख्या वेगळी होती? चंद्रबाबू जितके विरोधात होते, इतकाच तेव्हा जगनही कॉग्रेस विरोधातच होता. पण केंद्राने जगनच्या मुसक्या बांधल्या त्यावर नायडू खुश होते. कारण त्याच केंद्रीय संस्थांच्या कारवाईने तेलगू देसमचा आंध्रातील प्रतिस्पर्धी खच्ची केला जात होता ना? तेव्हा नायडूंना संघीय ढाचा वा संघराज्याच्या संकल्पनेला हादरे बसलेले जाणवले नाहीत. आता अकस्मात त्यांना घटना संघराज्य वगैरे गोष्टी दिसू लागल्या आहेत. ज्या सरकारवर ढाचा मोडण्याचा आरोप त्यांनी चालविला आहे, त्याच सरकारचे वर्षभरापुर्वी नायडूच एक हिस्सा होते आणि जीएसटी कौन्सील म्हणून नेमलेल्या मुख्यमंत्री समितीचे म्होरकेही होते. मोदी सरकारच्या महत्वपुर्ण निर्णयाचा हा भागिदार आता अचानक एनडीएतले दोष सांगू लागला आहे. पण त्यात सहभागी असताना त्याने एकदाही तक्रार केली नव्हती, की लोकशाही धोक्यात असल्याची भाषा वापरली नव्हती. मोदींच्या खांद्याला खांदा लावून चंद्राबाबू उभे दिसायचे. अचानक त्यांना आपल्या राज्यातील सत्तेचा पाया हादरताना दिसला आणि आपोआप देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा साक्षात्कार झाला. मग आपला उपरेपणा लपवायला त्यांना विविध कसरती कराव्याच लागणार ना? त्यातून ही टोकाचॊ भूमिका आलेली आहे.

पण त्यांनी उचललेले पाऊल मोदी सरकारला अडचणीचे नसून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे काम सोपे करणारे ठरणार आहे. कारण चंद्राबाबूंनी देशाच्या संघराज्य व्यवस्थेलाच धक्का दिला आहे. राज्य आणि केंद्राने आपापल्या अधिकार मर्यादेत रहावे आणि दुसर्‍यावर कुरघोडी करू नये, अशी घटनेची अपेक्षा आहे. पण त्याला केंद्राने धक्का देण्यापेक्षा विविध विरोधी पक्षाची राज्य सरकारेच हादरे देत आहेत आणि हे सामान्य माणसाला कळत नाही असे त्यांना वाटते. हा खंडप्राय देश एकत्र व अखंड ठेवण्यासाठी कुणा महापुरूषाची गरज भासलेली नाही. इथे पिढ्यानुपिढ्या वसलेल्या लोकांनी हा देश एकसंघ राखलेला आहे आणि त्याला बाधा आणण्याचा प्रसंग आला, तेव्हा सगळे हेवेदावे बाजूला ठेवून त्याची प्रचिती आणून दाखवलेली आहे. १९८४ सालात खलीस्तानी अतिरेक्यांनी इंदिराजींची हत्या केल्यावर देश एकसंघ राहिल की नाही, अशी स्थिती निर्माण झालेली होती. तर मतदाराने सगळे राजकीय मतभेद गुंडाळून नवख्या राजीव गांधींना ८० टक्के जागांचे बहूमत बहाल केलेले होते. त्याचे कारण हेच होते. १९६७ सालात नऊ राज्यात संयुक्त आघाडीची सरकारे आली व राज्यात सत्ताधारी झालेल्या काही विक्षिप्त नेत्यांनी केंद्र राज्य असा झगडा उभारून देशाच्या अखंडतेला दणके द्यायचा प्रयत्न केला. तेव्हा इंदिराजींना दोन तृतियांश बहूमत देऊन देशाला अखंड व सुरक्षित राखण्याची तजवीज मतदाराने केली होती. चंद्राबाबू व ममतांनी सीबीआय प्रकरणात घेतलेली भूमिका त्याच अराजकाची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे ठराविक अभ्यासक पत्रकार टाळ्या वाजवतील. परंतु विचलीत होणारा मतदार समर्थ केंद्र सरकार स्थापन करण्याकडे अशावेळी झुकतो, असा इतिहास आहे आणि त्याची पुनरावृत्ती करण्यास यातून चंद्राबाबूंनी हातभार लावला आहे. ज्या संघराज्य ढाच्याला जपण्याची भूमिका नायडू वा अन्य विरोधक मांडत असतात, त्याला त्यांनीच या निर्णयातून धोका निर्माण केला आहे ना?

मागल्या साडेतीन वर्षात जो पोरखेळ दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल करीत आहेत, त्याचे पुढले पाऊल नायडूंनी टाकलेले आहे. दिल्ली हे नगरराज्य असून तिथेच देशाची राजधानी आहे. म्हणून तिथल्या राज्य सरकारला मर्यादित अधिकार दिलेले आहेत. पोलिस वा अन्य महत्वाचे अधिकार दिल्ली राज्याला नाहीत. त्याबद्दल केजरीवाल नेहमी तक्रार करत आले आहेत. त्यांच्यापुर्वीच्या कुणा मुख्यमंत्र्याने तशी तक्रार केली नाही. कारण राजधानीच्या गरजा आणि सुरक्षितता हा किरकोळ विषय नाही, तसाच पोरखेळही नाही. आपला अधिकार नसताना केजरीवाल यांनी अनेक चौकशा नेमल्या व निर्णयही घेतले. इतका आगावूपणा करणारा मुख्यमंत्री किती भयंकर अराजक माजवू शकेल? तो आपल्या अधिकारात देशाच्या पंतप्रधान वा राष्ट्रपतीलाही अटकेचे फ़र्मान काढू शकतो आणि तसे झाल्यास भारताचा मालदिव वा श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून संघीय ढाचामध्ये अनेक परस्पर गतिरोध घटनाकारांनी उभे करून ठेवलेले आहेत. जे केजरीवाल यांच्यासारख्या माथेफ़िरूने करायला नको म्हणून दिल्ली राज्याचे अधिकारक्षेत्र मर्यादित ठेवले आहे, तेच अधिकार चंद्राबाबूंना असल्याने त्यांनी बेछूटपणे वापरलेले आहेत. ही अराजकाची चाहुल असते. हेच कालपरवा श्रीलंकेत झाले आहे आणि अशा कृत्यांमुळे मालदीव या छोट्या बेटवजा देशात मागले काही महिने अराजकाची स्थिती आलेली होती. पण दुर्दैव कसे असते बघा. जे लोक भारताचा संघराज्य ढाचा उखडून टाकायला निघाले आहेत, तेच संविधान बचावही बोलत आहेत. त्यांना संघराज्य वा संविधानाच्या मर्यादा मान्य नाहीत. त्यांच्याकडून कुठले संविधान वा़चवले जाऊ शकते? उलट त्यांच्यापासूनच संविधान वा़चवण्यासाठी मतदाराला निर्णायक पाऊल उचलावे लागणार आहे आणि भारतीय मतदाराने वेळोवेळी तितका समजूतदारपणा दाखवलेला आहे.

१९६७ सालात नऊ राज्यात कॉग्रेसने सत्ता गमावली होती आणि त्यापैकीच एक असलेल्या उत्तरप्रदेशच्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये समाजवादी पक्ष सहभागी होता. त्याचे सर्वेसर्वा राजनारायण होते. त्यांच्या पक्षातर्फ़े दिल्लीत कसली तरी निदर्शने होती आणि त्यावर लाठीमार झाला. मंत्री व्हायला पुढे असलेल्यांनीच लाठ्या खायलाही पुढे असले पाहिजे, असा अट्टाहास राजनारायण यांनी केला होता. त्यामुळे त्यात अनेक समाजवादी मंत्री जखमी झाले होते. त्यावर प्रतिक्रीया देताना राजनारायण असे म्हणाले होते, इंदिराजींनी हा लाठीमार केला. कारण दिल्लीत त्यांचे राज्य आहे. आमचेही लखनौमध्ये सरकार आहे आणि पंतप्रधान इंदिराजी तिथे आल्या तर आमचे सरकार त्यांनाही लाठ्या मारील व अटकही करील. हे विधान पुरेसे होत. अशा लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द केली तर देशामध्ये अराजक माजायला वेळ लागणार नाही, हे मतदार ओळखतो. म्हणूनच त्यानंतर इंदिराजींनी हा हलकल्लोळ संपवण्यासाठी लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूका घेतल्या, तर लोकांनी त्यांना भरभरून मते दिली होती. नुसती लोकसभा इंदिराजी काबीज करून गेल्या नाहीत. नंतर झालेल्या विधानसभांच्या निवडणूकीतही मतदाराने अशा गठबंधन सरकारे चालवणार्‍या विविध पक्षांना संपवून टाकले होते. केवळ इंदिराजींच्या शब्दाखातर दगडालाही मते देण्यापर्यंत मतदार गेला होता. त्याला इंदिराजींपेक्षा अखंड भारताची चिंता होती आणि अशा बेताल विरोधी आघाडीच्या हाती देश सुरक्षित राहू शकत नाही. याचे दाखले आजच्याप्रमाणे तेव्हाही विरोधी पक्षांनी़च दिलेले होते. म्हणूऩच आज नायडूंना सीबीआयला आंध्रामध्ये प्रतिबंध लावताना मर्दुमकी वाटलेली असू शकते. पण त्याचा सामान्य मतदार जनतेच्या मनावर कोणता परिणाम होतो आणि मतदानावर काय प्रभाव पडतो; त्याचे भान नसावे. राजनारायण यांना तरी कुठे भान होते? हातातली इवली सत्ता केजरीवालांप्रमाणेच त्यांनाही तेव्हा बेभान करून गेली होती ना?

पुत्र व्हावा ऐसा गुंडा?कॉग्रेस नेत्यांना काय झाले आहे, तेच समजत नाही. एका बाजूला गाळात रुतून पडलेले पक्षाचे गाडे बाहेर काढायचे आहे आणि त्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत. दुसरीकडे एकमागून एक कॉग्रेसनेते मुक्ताफ़ळे उधळून पक्षाविषयी असलेली सहानुभुतीही मातीमोल करायचे कष्ट सतत उपसत असतात. कालपरवा उत्तरप्रदेशचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी पंतप्रधानांच्या वृद्ध आईविषयी काही आक्षेपार्ह विधान केलेले होते. आता नागपूरला माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मोदींच्या दिवंगत पित्याचा उद्धार केला आहे. नरेंद्र मोदींना मागल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी कोण ओळखत होते? त्यांच्या पित्याचेही नाव लोकांना ठाऊक नाही. जणू पित्याचे नाव ख्यातनाम असणे ही भारतीय राजकारणातील एक मोठी पात्रता असावी. अन्यथा मुत्तेमवार यांची असली भाषा कशाला वापरली असती? एकूण काय, तर नरेंद्र मोदी यांना क्षुल्लक टाकावू ठरवण्य़ाची स्पर्धाच लागलेली असावी. असायलाही हरकत नाही. राजकारणात एकमेकांची निंदानालस्ती होतच असते. त्यासाठी वेगवेगळे मुद्दे वा तपशील शोधून काढले जातात. घरकुटुंब पुर्वायुष्यातले प्रसंगही हुडकून काढले जातात. त्यामुळे जर काही कॉग्रेस नेत्यांनी मोदींचा बाप काढला, तर बिघडत नाही. त्यांच्या पुर्वाध्यक्षांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हणून झालेले आहे. विद्यमान अध्यक्षांनी चोर शोरच्याही घोषणा देऊन झाल्या आहेत. त्यामुळे मुत्तेमवार यांनी मोदींचा बाप काढला, तर अश्रू ढाळण्याचे काही कारण नाही. पण मोदींच्या जन्मदात्या पित्याला कोणीही ओळखत नव्हता, हे राहुल गांधींचे कर्तृत्व कसे होऊ शकते? विलासराव त्याचा खुलासा करू शकलेले नाहीत. पण मग त्यांच्या त्याच मोजपट्टीला निकष मानायचे का? तुकोबा म्हणतात, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, नाहीतर माळावरचा धोंडा. यातला गुंडा कोण आणि धोंडा कोण, त्याचाही खुलासा व्हायला नको का?

राहुल गांधी वा त्यांच्या गोतावळ्यातले लंडन अमेरिकेत शिकलेले महान बुद्धीमंतर सहकारी सोडून द्या. विलासराव मुत्तेमवार निदान महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांना हे तुकोबाचे बोल ठाऊक असायला हवेत ना? मग मोदींच्या पित्याचे कर्तृत्व किंवा ओळख शोधण्यापुर्वी त्यांनी राहुल गांधींच्या पात्रतेची झाडाझडती आधी घेतली असती. पंतप्रधान झाल्यामुळेच लोक मोदींना ओळखू लागले अन्यथा त्यांना कोणी ओळखतही नव्हते, असा विलासरावांचा दावा आहे. यात तथ्य आहे नक्कीच. कारण त्यांनाही नरेंद्र मोदी कसे ठाऊक असतील? त्यांना गुजरातचा मौत का सौदागर नक्कीच माहिती असणार. कारण सलमान खुर्शिद यांच्या आईनेच त्यांच्याकडून असे घडे गिरवून घेतलेले आहेत ना? आता तुम्ही विचाराल सलमान खुर्शीद कोण आणि त्यांची आई कोण? तर मागल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी देशात गांधी हायस्कुलचे राज्य होते आणि त्यातल्या हुशार विद्यार्थ्याला हेडमास्तर मॅडमनी देशाचा पंतप्रधान म्हणून मॉनीटर सारखे नेमलेले होते. त्या मॉनिटरच्या हाताखाली सलमान खुर्शीद मंत्री म्हणून काम करत होते. त्या काळात त्यांनी आपल्या हेडमास्तर मॅडमच देशाची माता असल्याचे महान विधान केले होते. सोनियाजी आमच्या माता आहेत आणि पर्यायाने त्याच देशाच्याही राष्ट्रमाता असल्याचा शोध खुर्शीद यांनी लावला होता. त्या राष्ट्रमाता सोनिया गांधी, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीला मौत का सौदागर म्हणून संबोधत होत्या आणि त्याच शाळेच्या अंगणवाडीत विलास मुत्तेमवार शिकत होते ना? त्यांना नरेंद्र मोदी कसा ठाऊक असेल? त्याला मौत का सौदागर नक्की ठाऊक असणार. तेव्हा त्यांची गल्लत नावाने केलेली आहे. सोनियांना ठाऊक असलेले मोदी विलासरावांनाही ठाऊक असतातच. फ़रक नावापुरता असतो. मुत्तेमवारही मोदींना खुप आधीपासून ओळखता. पण मौत का सौदागर म्हणून. मॅडमनी तेच नाव शिकवले आहे ना?

बरं विलासराव मुत्तेमवार बाकीचे सोडून द्या. मोदींचे काय व्हायचे ते होईलच. त्यांच्यासारख्या सामान्य लोकांना आपापल्या कर्माची फ़ळे भोगावीच लागतात. त्यामुळे आगामी निवडणूकीत त्यांचा बाप कोण होता म्हणून मते मिळणार नाहीत हे मान्य. पण तुमचे काय? तुम्हाला पुन्हा लोकसभा वगैरे लढवायची आहे की नाही? खरेच लढवायची असेल तर पक्षातर्फ़े उमेदवारी मिळवायला हवी ना? तेव्हा कशाच्या बळावर उमेदवारी मिळू शकणार आहे? यापुर्वी कशामुळे उमेदवारी मिळाली? सोनियांना व त्यांचे जे कोणी पुर्वज होते, त्यांचा पिताश्री मुत्तेमवार यांच्याशी परिचय वगैरे काही होता का? असला तरी आता त्याचा उपयोग उरलेला नाही. सोनिया बाजूला झाल्यात आणि राहुल पक्षाचे नवे अध्यक्ष आहेत. उमेदवारीचे वाटप त्यांच्याच हाती आहे. त्यामुळे राहुलजी आपल्या पिताश्री मुत्तेमवारांना कितीसे ओळखतात, याची आताच खातरजमा करून घ्या. नाहीतर ऐनवेळी राहुलजी तुमच्या पिताजी वा पितामहांना ओळखत नसल्याचे सांगून तिकीट काटू शकतील. म्हणूनच तातडीने वंशवृक्षाची छाया निर्माण करण्याच्या मागे लागा. अर्थात तितक्यावर थांबण्याचे कारण नाही. इथे वरती एक फ़ोटो टाकलाय. त्यात आदर्श उदाहरण दिलेले आहे. कॉग्रेस पक्षात कुठलेही अधिकारपद मिळवण्यासाठी कोणता सराव किंवा तपस्या करावी लागते, त्याचेही प्रात्यक्षिक आहे., त्या चित्रात तुम्हाला एक बालक दिसेल. सहासात वर्षाच्या बालकाला नम्रतेने अभिवादन व नमस्कार करणारे ऐंशी वर्षापार गेलेले आजोबा दिसतील. त्यांचेही पिताश्री कोण जगाला माहिती नाहीत. पण तरीही उतारवयात आजोबा देशाचे थेट पंतप्रधान होऊन गेले. कारण त्यांना पिताश्रींची ओळख नसली तरी त्या बालकाच्या सगळ्या वंशवृक्षाची बारीकसारीक माहिती होती नि आहे. त्या बालकाची प्रार्थना आतापासून सुरू केलीत तर मुत्तेमवार पुढल्या दोन पिढ्या तुमच्या खानदानाला कॉग्रेस तिकीटाची बेगमी होऊन जाईल. ओळखलात त्या बालकाला?

देशातल्या करोडो लोकांना त्या बालकाची ओळख नाही. सोबत बसलेले आईवडील बघून मात्र अनेकांच्या लक्षात येईल की सहाव्या पिढीतला तो कॉग्रेसच भावी अध्यक्ष आहे, कारण राहुल गांधींनी वारस निर्माण केलेला नाही. त्यांनी ते काम आपल्या भगिनीवर सोपवले आणि त्यातूनच ह्या बालकाचा जन्म झालेला आहे. त्यामुळे राहुल थकतील तेव्हा कॉग्रेसचा अध्यक्ष कोण, हा प्रश्न एव्हाना सुटलेला आहे. बाकी देशाचे प्रश्न नवे नाहीत आणि प्राथमिकतेचे नाहीत. कॉग्रेसचा अध्यक्ष कोण होणार आणि त्याचा पिता पितामह वगैरे कोण, हे देशासमोरचे गहन प्रश्न असतात. रॉबर्ट वाड्रा नावाच्या एका उद्योगपतीने तो प्रश्न वेळीच सोडवून ठेवला असल्याने मुत्तेमवार सारख्यांना आता चिंता उरलेली नाही. मात्र जुनी वंशावळ सांगताना त्यात या बालकाकडे काणाडोळा करू नका. आज नसेल पण दहापंधरा वर्षांनी त्याची किंमत कळू शकेल. म्हणून आजच गुंतवणूक करा आणि या बालकाची ओळख करून घ्या. मोदी किंवा त्यांची सत्ता म्हणजे, काय आळवावरचे पाणी. आज आहे उद्या नसेल. नेहरू गांधी खानदान हे सनातन जनेयुधारी सत्य आहे. त्यात मध्येच कोणी रॉबर्ट आला वा फ़िरोज आला, म्हणून जानवे विटणार नसते. विटाळ वगैरे गोष्टी मोदी शहा इत्यादी सामान्य क्षुल्लक लोकांसाठी लागू होतात. त्यांची फ़िकीर कशाला करायची? राहुल मुंबईत आले, तेव्हा अशोक चव्हाण मंत्रालयातली खुर्ची सोडून रमाबाई आंबेडकरनगरात त्यांच्या प्रतिक्षेत काही तास ताटकळत बसले होते ना? आणखी कोणी मंत्री बुद्धविहारातून बाहेर पडलेले राहुलजी अनवाणी चालताना त्यांच्या मागून पादुका घेऊन धावले नव्हते का? बघा आज कुठे आहेत. तेव्हा विलासजी तातडीने या बालकाच्या भक्तीला लागा. कारण तुमच्या पुर्वजांना कोणी फ़ारसे ओळखत नाही. दामोदरदासाच्या पुत्राने तिन्ही खंडात झेंडा फ़डकवला म्हणून, काही तो मोठा होत नाही. तुम्ही माळावरच्या धोंड्याला शेंदूर फ़ासून मारुती केलाय, त्याच्या महाआरत्या जोरात चालू ठेवा बुवा. आणि तेवढी त्या बाळाची ओळख करून घ्या झटपट.

Sunday, November 25, 2018

एक्सपायरी डेट

Image result for sushma swaraj

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आतापासूनच आपण पुढली निवडणूक लढवणार नसल्याचे जाहिर केल्याने बरीच कुजबुज सुरू झालेली आहे. तेही स्वाभाविक आहे. कारण मागल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाची सुत्रे व नेतॄत्व पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींनी हाती घेतल्यापासून आपल्या पक्षातील जुन्या वयोवृद्ध नेत्त्यांना हळुहळू क्रमाने बाजूला केलेले होते. त्यापैकी सर्वात बुजुर्ग असलेले लालकृष्ण अडवाणी यांनी पहिला आक्षेप घेतला होता. कारण त्यांना येऊ घातलेल्या परिस्थितीचा अंदाज मोदी उमेदवार होण्याच्या शक्यतेपासूनच आलेला होता. पण त्यांना कोणी फ़ारशी दाद दिली नाही आणि अखेरचा उपाय म्हणून त्यांनी लोकसभा मतदारसंघ मिळवताना गुजरात की मध्यप्रदेश, असा घोळ घातला होता. तेव्हा त्यांना हवा तो मतदारसंघ निवडण्याची मोकळीक देण्यात आली. अखेरीस त्यांनी गुजरातचाच गांधीनगर मतदारसंघ स्विकारला. पण दरम्यान त्यांच्या मनातली चलबिचल उघड होऊन गेलेली होती, ती काय असावी? तर उमेदवारी देऊन आपल्याला मोदींच थेट पराभूत करतील की काय? या शंकेने अडवाणी बावरले होते. तसे झाले नाही. पण एकूणच भाजपातील ज्येष्ठ नेत्यांची कुवत व हिंमत स्पष्ट होऊन गेली. त्याच पठडीतल्या सुषमा स्वराजही आहेत. त्या पंधराव्या लोकसभेतील विरोधी नेत्या होत्या. त्यामुळेच मोदी त्यांना कनिष्ठ नेता वाटणे स्वाभाविक होते आणि मोदींच्या उमेदवारीने आपला पंतप्रधान पदाचा हक्क नाकारला जाण्याची बोच त्यांच्याही मनात असल्यास नवल नाही. पण त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले. बाकी ज्येष्ठ नेत्यांना मोदींनी मार्गदर्शक मंडळ स्थापन करून राजकीय वृद्धाश्रमात टाकले. अशा मागल्या पिढीच्या नेत्यांविषयी मध्यंतरी कॉग्रेसचे दिग्विजयसिंग यांनी कधी नव्हे ते शहाण्यासारखे विधान केलेले होते. पण त्याची कोणी दखल घेतली नव्हती.

दिग्विजयसिंग चमत्कारीक वा खुळचट बोलण्यासाठी इतके ख्यातकिर्त झालेले आहेत, की चुकून शहाण्यासारखे बोलले, तर कोणी त्यांची दखल घेत नसल्याचा परिणाम असावा. पण सहासात वर्षापुर्वी राहुल गांधी कॉग्रेस पक्षातले महत्वाचे निर्णय घेऊ लागल्यापासून त्यांचे निष्ठावंत असल्यासारखे दिग्विजयसिंग यांनी राहुलनेच अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेण्यासाठी वारंवार घोषणा केल्या होत्या. पण त्या कधी फ़लद्रुप झाल्या नाहीत. त्या बदलासाठी सिंग यांनी मांडलेले तर्कशास्त्र योग्य असे होते. राजीव गांधी यांनी नवी तरूण पिढी म्हणून आपल्यासारख्या अनेकांना कॉग्रेसच्या नेतृत्वात पुढे आणले. अशा माझ्यासारख्या नेत्यांचे आता वय झाले असून, त्यांनी आपणहून बाजूला व्हायला हवे किंवा त्यांना पक्षाने बाजूला करायला हवे; असे मतप्रदर्शन एका पक्ष अधिवेशनात सिंग यांनी केले होते. त्यासाठी त्यांनी वयोवृद्द्ध वा वाढल्या वयाचे नेते असा शब्द वापरला नव्हता, तर एक्सपायरी डेट झालेले नेते असा केला होता. हा आजार फ़क्त कॉग्रेस पक्षालाच जडलेला नाही, तर अनेक लहानमोठ्या पक्षाला त्या वयाच्या व्याधीने व्यापलेले होते व आहे. मोदींनी पक्षाची सुत्रे हाती आल्यावर सर्वप्रथम त्याच आजाराचा निपटारा केला होता. आधी अशा नेत्यांना निर्णय प्रक्रीयेतून बाजूला केले आणि नंतर सत्ता प्राप्त झाल्यावर सरकारी अधिकार पदापासूनही दुर ठेवले होते. त्यासाठी पंच्याहत्तरी ओलांडलेले नेते अशी लक्ष्मणरेषा आखलेली होती. सुषमा स्वराज ती ओलांडत असतील तर त्यांनी आपले भवितव्य ओळखलेले आहे आणि आपला मुरलीमनोहर वा लालकृष्ण होण्यापुर्वी माघार जाहिर केली आहे. शिवाय त्यांची प्रकृतीही त्यांना साथ देईनाशी झाली आहे. म्हणूनच त्यातून फ़ार मोठा अर्थ शोधण्याची गरज उरलेली नाही. कारण यशवंत सिन्हा, अरुण शौरी इत्यादिंच्या थयथयाटाने काही साध्य झालेले नसेल, तर सुषमाजी या वयात काय बंड करू शकणार आहेत?

खरेतर अनेक पक्षातील नेत्यांनी आता बाजूला होण्याची वेळ आली आहे. आली नव्हेतर येऊन गेलेली आहे. सुषमाजी १९७७ च्या काळातल्या सर्वात तरूण आमदार म्हणून जनता लाटेत निवडून आल्या होत्या. म्हणजे निवडणूकांच्या राजकारणात त्यांची कारकिर्द ४१ वर्षांची होऊन गेली आहे. त्याच कशाला लालूप्रसाद यादव, पासवान, शरद यादव आणि मुलायमसिंग त्याच पिढीतले नेते आहेत. शरद पवार तर त्यांच्याही आधी दहा वर्षे कोवळा आमदार म्हणून निवडणूकीने राजकारणात आले. शक्य तितकी अनेक सत्तापदे या लोकांनी उपभोगून झालेली आहेत. मिळवण्यासारखे पंतप्रधानपद सोडल्यास त्यांना कुठली महत्वाकांक्षा आता असता कामा नये. पण यापैकी बहुतेकांना नव्या राजकारणात आपल्याला स्थान नाही, याची टोचणी सहन होताना दिसत नाही. मध्यंतरी आपल्या अर्धशतकाच्या राजकीय कारकिर्दीचे समारंभ शरद पवारांनी खुप साजरे करून घेतले. त्यांचेच समकालीन म्हणावे असे विधानसभा गाजवलेले शेकापचे आमदार केशवराव धोंडगे यांनी त्यापैकी एका समारंभात भाषण करताना पवारांची मस्त टोपी उडवली होती. हा बिनचिपळ्यांचा नारद असल्याची उपमा त्यांनी दिलेली होती. ती जितकी मजेशीर होती, तितकीच पवारांच्या अनेक समकालीन नेत्यांनाही लागू होणारी आहे. कारण त्यापैकी बहुतेकांना राजकीय जीवनात व जनमानसात स्थान उरलेले नाही. पण राजकीय घडामोडीत लुडबुडायची हौस काही फ़िटलेली नाही. आताही तब्येत हाताबाहेर गेली असताना पवारांची धडपड शोभणारी नाही. तिक्डे दिल्लीत कुठल्याही विरोधी एकजुटीत हात गुंफ़ून उंच करायला हजेरी लावणारे शरद यादव दयनीय वाटतात. कारण ते नेता जरूर आहेत, पण त्यांच्या हाताशी कुठलाही पक्ष वा संघटना उरलेली नाही. मात्र आपण आजही लढवय्ये असल्याच्या थाटातले त्यांचे बोलणे शेलारमामाला शोभणारे आहे.

शेलारमामावरून आठवले. त्याने तानाजी धारातिर्थी पडला असताना आपण पुढे येऊन तलवार उपसली नव्हत. तर गडावरून माघारी पळून जाण्याचे दोर कापून टाकले होते आणि मावळ्यांना लढा किंवा मरा, असा अंतिम संदेश दिला होता. त्या सैनिकांना चेतवण्य़ाची कामगिरी बजावणे व स्वत:च सेनापती म्हणून पुढाकार घेण्यात खुप मोठा फ़रक असतो. आता लढण्याचा जोश ज्यांच्यात आहे त्यांनाच पुढे येऊ देण्यात वाढलेल्या वयाची शोभा असते. त्यासाठी नवख्यांना चार युक्तीच्या गोष्टी सांगणे व चुका होत असतील तर सुधारायला मदत करणे; अशा वयातली खरी कामगिरी असते. दुर्दैवाने त्याला भारतातले कुठल्याच पक्षाचे नेते राजी नसतात. त्यांना पदावरून उतरण्यापेक्षा कोणीतरी हुसकून लावण्याची प्रतिक्षा असते. दहा वर्षे पंतप्रधानपद उपभोगलेले मनमोहन सिंग वा अनेक महत्वाची अधिकारपदे भोगण्यातच आयुष्य खर्ची पडलेले चिदंबरम, अहमद पटेल, अंथनी वा खुद्द एक्सपायरी डेट उलटून गेलेले दिग्विजय सिंग काय करीत असतात? आताही मध्यप्रदेशच्या निवडणूकीत ज्योतिरादित्य शिंदे यांना अपशकून करण्यापेक्षा सिंग यांनी कोणते कर्तृत्व गाजवले आहे? त्यांच्याच दहा वर्षाच्या कारभाराने मतदार इतका विचलीत झाला होता, की कॉग्रेस म्हणजे पुन्हा दिग्विजय, अशा भयापोटीच मतदाराने सलग १५ वर्षे भाजपा व शिवराजसिंग चौहान यांना सत्ता बहाल केलेली होती. इतके असूनही सिंग यांची खुमखुमी संपलेली नाही. यशवंत सिन्हा, शौरी इत्यादी त्याच वाटेने चाललेले आहेत. त्यांना कोणी एक्सपायरी डेटचा अर्थ समजावण्याची गरज आहे. अर्थात तो त्यांनाही ठाऊक आहे. परंतु मान्य होत नाही. अवघे पाऊणशे वयमान अशी जी उक्ती आहे तशी त्यांची प्रत्येक बाबतीत लुडबुड चाललेली असते. त्यांच्याप्रमाणे हास्यास्पद होऊन बाजूला व्हायची दुर्दैवी वेळ यायला नको, म्हणूनच बहुधा सुषमाजींनी समाधानी मनाने निवृत्तीचा निर्णय घेतला असावा.

आज आपल्या देशातल्या कुठल्याही खेड्यातल्या सामान्य माणसालाही एक्सपायरी डेट म्हणजे काय ते नेमके कळते. खाद्यपदार्थ असो किंवा एखादे महत्वाचे महाग उपकरण असो, त्याची उपयुक्तता कितीकाळ असू शकेल, याचा उत्पादकांनी दिलेला इशारा छापलेला असतो. म्हणूनच असे पदार्थ वा वस्तु खरेदी करताना सामान्य लोक आधी एक्सपायरी डेट बघून घेतात. त्या वस्तु दिसायला नासलेल्या वा सडलेल्या नसतात. त्यामुळेच टाकावू किंवा अपायकारक नाहीत असेही वाटत असते. पण वस्तुस्थिती तशी नसते. त्यांचा काहीही उपयोग राहिलेला नसतो. मुदतीनंतर त्यांचा उपयोग संपलेला असतो आणि क्वचित त्यांच्यामुळे अपायही होण्याची भिती असते. म्हणूनच एक्सपायरी डेटचे महत्व आहे. ज्या कारणास्तव किंवा उपयोगासाठी त्या वस्तु असतात, तोच राहिलेला नसतो. राजकारणात अशा अनेक नेत्यांची आज गर्दी आहे. त्यांना बाजूला करण्याचीही खुप गरज आहे. म्हणून दिग्विजयसिंग यांचा मुद्दा खुप योग्य व चांगला होता. पण त्यांनाच कळलेला उमजलेला दिसत नाही. इतरांचे काय बोलावे? अमेरिकेचे अध्यक्षपद म्हणजे जगाची सुत्रे हलवण्याचे राजकारण. पण अशा पदावरून आठ वर्षे जगावर राज्य केलेले जॉर्ज बुश, बिल क्लिंटन वा बराक ओबामा यांच्यासारखे तुलनेने खुप कमी वयाचे नेते अधिकार सोडल्यावर प्रचलीत राजकारणातून संन्यास घेतल्यासारखे अलिप्त झालेले आहेत. मनमोहन किंवा अडवाणी यांच्यासमोर तर हे अध्यक्ष मुलेच आहेत. पण आज त्यांनी दाखवलेला संयम भारतात कोणाला दाखवता आला आहे काय? हे दृष्य मनाला उद्विग्न करणारे आहे. कारण ज्यांचा दबदबा माझ्या पिढीने वा समकालीन पन्नाशीतल्या पिढीने बघितला आहे, त्यांची आजची केविलवाणी धडपड मन विषण्ण करून टाकते. अमिताभ वय झाल्यावर योग्य शोभणार्‍या भूमिकेत गेला म्हणून टिकलाय. हे गर्जणार्‍या यशवंत सिन्हा वगैरेंना कोणी सांगावे?

Saturday, November 24, 2018

संस्कृतीतला फ़रक

parrikar ill के लिए इमेज परिणाम

गोव्यातील सत्ता मागल्या विधानसभा निवडणूकीत गमावण्य़ाची पाळी भाजपावर आली, तेव्हा त्य छोट्या राज्यातील आजचा सर्वाधिक लोकप्रिय नेता दिल्लीतून माघारी आणून सत्ता राखावी लागली होती. संरक्षण मंत्रीपद सोडून मनोहर पर्रीकर पुन्हा गोव्यात आले आणि त्यांनी लोकाग्रहास्तव राज्याचे मुख्यमंत्रीपद स्विकारले होते. त्याचे कारणही होते. तुलनेने कॉग्रेसला दोन जागा अधिक मिळाल्या तरी बहूमत त्याही पक्षाचे हुकलेले होते आणि लहान पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापण्याची गरज होती. अशावेळी कॉग्रेसने पुढाकार घेतला नाही आणि लहान पक्षांनी पर्रीकर नेता होणार असतील, तर भाजपाला साथ देण्याची तयारी दर्शवली होती. दुर्दैवाने खुद्द परिकर पुढे आले तरी लौकरच त्यांना असाध्य आजाराने गाठले. अशा स्थितीत त्यालाच भाजपाचा दुबळेपणा ठरवण्याचे हिणकस राजकारण कॉग्रेसने आरंभले आहे. पर्रीकर सतत कुठल्या ना कुठल्या उपचारासाठी इस्पितळात जात असतात आणि काहीकाळ तर त्यांना परदेशीही जाऊन रहावे लागलेले आहे. अशावेळी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करायचा असतो, ह्याला सभ्यता मानले जात असते. पण कॉग्रेस आता तीही सभ्यता गमावून बसलेली आहे. अन्यथा कॉग्रेसच्या नेत्यांनी व स्थानिक आमदारांनी पर्रीकरांच्या आजाराला राजकीय मुद्दा बनवण्याचा अट्टाहास केला नसता. वास्तविक कॉग्रेसपाशी संख्याबळही उरलेले नाही. कारण अलिकडेच त्यांच्या दोन आमदारांनी राजिनामे दिल्याने संख्याही घटलेली आहे आणि अन्य लहान पक्षही कॉग्रेसला साथ देण्यासाठी पुढे आलेले नाहीत. तरीही कुठलेतरी तांत्रिक मुद्दे काढून कॉग्रेस पर्रीकरांच्या आजारपणाचे राजकीय भांडवल करीत आहे. त्यासाठीच कालपरवा कॉग्रेस आमदारांनी पर्रीकरांच्या निवासस्थानी मोर्चा काढून पुर्णवेळ मुख्यमंत्र्याची मागणी केली. तेव्हा दिनेश सिंग नावाच्या कॉग्रेसच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्मरण झाले.

दिनेश सिंग हे खुप जुने कॉग्रेसनेते होते आणि उत्तरप्रदेशातील एक संस्थानिक अशी त्यांची ओळख होती. इंदिराजींपासून राजीव गांधी व नरसिंहराव यांच्यापर्यंत प्रत्येक मंत्रिमंडळात त्यांना अगत्याने स्थान मिळालेले होते. मध्यपुर्वेत अरब इस्त्रायल संघर्ष ऐन भरात असताना इंदिराजींचे परराष्ट्रमंत्री म्हणून दिनेश सिंग यांनी महत्वाच्या भूमिका पार पाडलेल्या होत्या. इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात जेरूसेलम येथील अल अक्सा मशीदीनी पडझड झाल्यावर राबात येथे जगातल्या मुस्लिम राष्ट्राची गाजलेली परिषद झालेली होती. तर दुसर्‍या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला देश म्हणून इंदिराजींनी १९७० च्या दशकात दिनेश सिंगांना पाठवले होते. पण धर्माने मुस्लिम नाहीत म्हणून त्यांना परिषदेत प्रवेश नाकारला गेला होता. इतका हा ज्येष्ठ नेता नरसिंहरावांच्या कारकिर्दीतही देशाचा परराष्ट्रमंत्री होता आणि वयाने थकलेला होता. अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळेच त्यांना आपल्या खात्याचा जबाबदारीने कारभार हाकता येत नव्हता. अशावेळी पाकिस्तानने भारताला एका पेचात पकडले होते. राष्ट्रसंघाच्या सुरक्षा मंडळात काश्मिरचा विषय उकरून काढलेला होता आणि भारताचा हा परराष्ट्रमंत्री बेशुद्धावस्थेत रुग्णशय्येवर पडलेला होता. पंतप्रधान नरसिंहराव यांना त्या प्रसंगाला सामोरे जाताना थेट विरोधी नेता अटलबिहारी वाजपेयी यांची मदत मागताना शंकाही आली नाही. भारताची बाजू जागतिक मंचावरून मांडण्यासाठी दिनेश सिंग उपलब्ध नाहीत, तर वाजपेयींनी ती मांडावी. कारण आधी वाजपेयी जनता सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते आणि त्यांनी समर्थपणे भारताची बाजू अनेकदा मांडलेली होती. वाजपेयींनी तात्काळ होकार भरला आणि कॉग्रेसच्या राव सरकारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व वाजपेयींनी त्या प्रसंगी केलेले होते. त्यामध्ये परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री सलमान खुर्शीद वाजपेयींचे सहाय्यक म्हणून गेलेले होते. त्याला राजकीय संस्कृती म्हणतात.

सत्तेतला पक्ष अडचणीत आहे म्हणून त्याचा राजकीय फ़ायदा विरोधकांनी उठवायचाच असतो. पण त्यात एखादी मोक्याची व्यक्ती आजारी आहे, तर त्याचा लाभ उठवून राजकारण साधण्याला गुन्हाच म्हटले पाहिजे. सवाल असा होता, की आज पर्रीकर खुप आजारी आहेत आणि पदावर कायम आहेत. तरीही आपल्या उपचारातून सवड काढून ते राज्याचा कारभार हाकत आहेत. आपल्या सहकार्‍यांना सुचना देऊन कारभार चालवत आहेत. दिनेश सिंग त्याही अवस्थेत नव्हते, ते मुळात शुद्धीवर नव्हते, तरीही देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून त्या पदावर कायम होते. त्या आजारातून सिंग कधी बरे झाले नाहीत आणि अखेरचा श्वास घेईपर्यंत मंत्रीपदी कायम राहिलेले होते. पण विरोधी पक्ष नेता म्हणून वाजपेयींनी कधी तो विषय संसदेत काढला नाही, की पंतप्रधान राव किंवा सत्ताधारी कॉग्रेस पक्षाची कोंडी करण्यासाठी हा मुद्दा वापरला नाही. उलट अडचणीची वेळ आली तेव्हा विरोधी नेता असूनही सरकारला मदतच केली होती. आजच्या कॉग्रेस अध्यक्षांना वा त्यांच्या अन्य ज्येष्ठ नेते सहकार्‍यांना तो प्रसंग ठाऊक नसेल कदाचित. पण निदान दिनेशसिंग नावाचा कोणी आपलाच नेता व ज्येष्ठ मंत्री होता, इतके तरी आठवते काय? असते तर त्यांनी गोव्यात भाजपा सरकारला कोंडीत पकडण्याच्या असल्या असंस्कृत खेळी करणार्‍यांना वेळीच रोखले असते. कारण हा प्रकार गेले काही महिने सातत्याने चालू आहे आणि आजारी पर्रीकरांना सतावण्यालाही राजकारण मानले जात आहे. हे राजकारण किंवा असले डावपेच युद्धातही सहसा खेळले जात नाहीत. किमान सभ्यता म्हणून आजारी किंवा दुखावलेल्यांना मारण्याचे डाव खेळायचे टाळले जाते. पण राहुल गांधी व त्यांच्या नव्या पिढीतल्या कॉग्रेसला कसलाही धरबंद उरलेला नाही, इतकाच याचा अर्थ निघू शकतो. अर्थात लाजलज्जा वगैरे कॉग्रेसी संस्कृतीमध्ये नगण्य वस्तु असतात ना?

१९८३ सालात हृदयावर शस्त्रक्रीया करून मायदेशी परतलेल्या आंध्रच्या मुख्यमंत्री रामाराव यांना पदच्युत करून तिथे रातोरात दुसर्‍या मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल वापरून करणार्‍या पक्षाला हिंसक व्हायला कितीसा वेळ लागणार? तेव्हा रामाराव चाकाच्या खुर्चीशिवाय हिंडूफ़िरू शकत नव्हते आणि डॉक्टरांनी त्यांना फ़ारशी धावपळ करायला नकार दिलेला होता. अशा अवस्थेत रामाराव आपल्या बहुमताच्या आकड्याला घेऊन राज्यपाल व राष्ट्रपती निवासाच्या पायर्‍या झिजवत होते. त्यांची प्रकृती वा अवस्था इंदिराजींना पाझर फ़ोडू शकलेली नव्हती, की त्यांनी कुठला हस्तक्षेप केला नव्हता. अखेरीस नव्या मुख्यमंत्र्याला महिनाभरातही बहूमत सिद्ध करता आले नाही, तेव्हा पुन्हा त्याच रामारावांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. पण मध्यंतरीच्या महिनाभरात धावपळ करताना रुग्णावस्थेतल्या रामारावांचे बरेवाईट काही झाले असते, तर काय प्रसंग ओढवला असता? हा किस्सा मुद्दाम सांगावा लागतो आहे. कारण त्यातून कॉग्रेसी संस्कृती आणि हिंसक मानसिकता स्पष्ट होते. सत्तेसाठी आसुसलेली कॉग्रेस कुठल्या हिंसक स्तराला जाऊन काय करू शकते, त्याची आठवण करून देणे भाग आहे. अर्थात असल्या अनुभवाने पर्रीकर खुप काही शिकले आहेत आणि विरोधकही खुप शिकले आहेत. पण आपल्या खुळेपणाच्या आहारी गेलेल्या चंद्राबाबूंनाच आपल्या सासर्‍याचे हाल आठवत नसतील, तर इतरांची काय कथा?  राजकारण दिवसेदिवस किती हिंसक अमानुष होत चालले आहे, त्याचा हा नमूना आहे. विषय एका गोव्याचा किंवा मुख्यमंत्र्याचा नाही. सत्तेबाहेर राहून तळमळणारी कॉग्रेस किती व कोणत्या थराला जाऊन सत्ता मिळवण्यासाठी यापुढे काय नाटके करणार; याचा प्रत्येकाने विचार करण्याची म्हणूनच गरज आहे. सुदैवाने भारताचा मतदार व जनता खुप जागरूक आहे. तिला योग्यवेळी योग्य उपाय योजता येत असतात ना?

Tuesday, November 20, 2018

केजरीवाल का तिखा लाल

Image result for kejriwal at rajghat

काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या कार्यालयातून बाहेर पडत असताना कोणीतरी त्यांच्यावर मिरची पुड फ़ेकल्याची बातमी आली आणि पाच वर्षापुर्वी ज्या घटना घडत होत्या, त्याचे स्मरण झाले. तेव्हा केजरीवाल किंवा त्यांचे निकटवर्तिय कोणी आप नेते कुठे जातील, तिथे त्यांच्यावर शाई फ़ेकण्याचा सपाटा लागलेला होता. दिल्ली असो किंवा वारणाशी असो, तिथे कोणी तरी गर्दीतून अकस्मात पुढे घुसायचा आणि केजरीवाल यांच्या अंगावर शाई फ़ेकून अटक करून घ्यायचा. कधीतरी त्याला आपचे कार्यकर्ते यथेच्छ झोडपूनही काढायचे. मग विनाविलंब टिव्हीच्या विविध कॅमेरासमोर आपचे प्रवक्ते येऊन भाजपावाल्यांनीच तो हल्ला केल्याचे तावातावाने कथन करू लागायचे. केजरीवाल व शिसोदिया वगैरे मंडळी तशा माखल्या तोंडाने व रंगलेल्या कपड्यानिशी आपल्या व्यासपीठावर जाऊन भाषणे देत भाजपाच्या नावाने शिव्याशाप देण्याचा उद्योग सुरू करायचे. हळुहळू वाहिन्यांनाही त्याचा कंटाळा आल्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर शाई फ़ेकण्याचे प्रकार थंडावलेले होते. मजेची गोष्ट म्हणजे त्या निकालानंतर केजरीवाल कुठेही कसेही फ़िरत होते आणि लोकांमध्ये मिसळत होते. पण विधानसभेच्या निवडणुका लागण्यापर्यंत पुन्हा कोणी त्यांच्या वाटेला शाई घेऊन गेला नव्हता, की कुणावर आरोप करायची सवड आपनेत्यांना मिळालेली नव्हती. आता त्यात प्रगती झालेली दिसते, शाईच्या बाजी कोणाला नवा काही पदार्थ वापरण्य़ाची बुद्धी झालेली आहे. येत्या काही दिवसात किंवा लोकसभेच्या निवडणूका होईपर्यंत अनेकदा केजरीवाल किंवा अन्य आप नेत्यांवर आता मिरची पुड वा अन्य काही मसाल्याचे पदार्थ फ़ेकण्याचे प्रकार वाढत जातील. कारण अशा बातम्यांना वाहिन्यांच्या बाजारात खुप मागणी असते. सहाजिकच त्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट आम आदमी पक्षाने घेतलेले असेल तर असे प्रकार वाढण्याला पर्याय नाही.

तेव्हा म्हणजे मागल्या लोकसभेपुर्वी केजरीवाल यांनी अशी अनेक नाटके रंगवली होती. त्यांना त्यातून वारेमाप प्रसिद्धीही मिळालेली होती. शाईतून एक नवखा पुढारी थेट देशाचा पंतप्रधान व्हायला निघाला होता आणि वाहिन्यांच्या पत्रकारांनी आम आदमी पक्षाला भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी बनवून कॉग्रेसला परस्पर निकालात काढले होते. पण सुदैवाने आपल्या देशात वाहिन्यांच्या वा पत्रकारांच्या मतांवर निकाल लागत नसल्याने कॉग्रेसचा जबरदस्त पराभव झाला, तरी देशातला तोच दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून लोकसभेत निवडून आला. केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या सर्व उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली होती. देशात तर केजरीवाल यांच्या पक्षाने इतिहासात सर्वाधिक अनामत रकमा जप्त होणारा पक्ष म्हणून विक्रम साजरा केला होता. खुद्द केजरीवालही वाराणशीमध्ये मोदींच्या विरोधात पराभूत झाले होते. काही बाटल्या शाई आणि वारेमाप प्रसिद्धी त्यांना निवडणूकीत यश मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा गुंडाळून ठेवत केजरीवाल पुन्हा दिल्लीची जमिन शोधत फ़िरू लागले होते. लौट के बुद्दू घरको आये, या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले कार्यक्षेत्र दिल्लीपुरते मर्यादित करून विधानसभेची तयारी सुरू केली आणि चांगले यश मिळवले. मजेची गोष्ट म्हणजे त्या मध्यावधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मोकाट फ़िरणार्‍या केजरीवाल यांच्यावर कोणीही पुन्हा शाई फ़ेकली नाही, की कुठली उचापत केली नाही. त्यानंतर थेट आता हा मिरची पुड फ़ेकण्याचा उद्योग झालेला आहे. याचा अर्थच आम आदमी पक्ष जुन्याच मार्गाने लोकसभेच्या तयारीला लागला असे म्हणावे लागेल. कारण असली काही नाटके तमाशे केल्याशिवाय केजरीवाल यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि प्रसिद्धीच्या झोताबाहेर गेल्यावर त्यांना चैन पडेनाशी होते ना?

तेव्हा लोकसभेचे वेध लागलेले असताना एका धरण्याचा कार्यक्रम योजलेला होता. तिथे केजरीवाल नव्हते आणि त्यांचे अन्य सहकारी तिथे बसलेले होते. योगेंद्र यादव यांच्यावर असाच हल्ला झालेला होता. कोणीतरी थेट मंचावर अकस्मात आला आणि त्याने यादवांच्या तोंडाला काळे फ़ासले होते. मग तशाच रंगलेल्या तोंडाने यादवांनी वाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या, तर प्रवक्त्यांनी भाजपावर झोड उठवली होती. पुढे अधिक चौकशी झाली आणि कार्यकर्त्यांनी ज्याला झोडपून पोलिसांच्या ताब्यात दिलेले होते, तो त्यांच्याच पक्षाचा कोणी कार्यकर्ता असल्याचे निदर्शनाला आलेले होते. मग कशाच्या आधारावर आप प्रवक्त्यांनी भाजपा किंवा कॉग्रेसवर हल्ल्याचे आरोप केलेले होते? हेच कशाला अशाच एका निवडणूक प्रचार फ़ेरीत कोणीतरी एक उत्साही कार्यकर्ता केजरीवाल यांच्या उघड्या जिपच्या समोर आला आणि हार घालण्याच्या निमीत्ताने अगदी जवळ पोहोचला. हार घालून होताच त्याने केजरीवाल यांच्या कानशिलात सणसणित वाजवली होती. ती इतकी जबरदस्त होती, की केजरीवाल यांचा चेहरा सुजलेला होता. मग तसाच चेहरा घेऊन त्यांनी एक्दोन तास गांधी समाधी राजघाट येथे धरणे धरलेले होते. तपासाअंती तोही त्यांच्याच पक्षाचा कोणी कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झालेले होते. वारंवार असे प्रकार एकाच पक्ष वा नेत्याच्या बाबतीत घडू लागले आणि त्यात त्याचाच कोणी कार्यकर्ता असल्याचे उघड होऊ लागल्यावर अधिक काळ ते नाटक चालू शकले नाही. त्या नाटकाचे प्रयोग प्रेक्षकाअभावी वाहिन्यांनाही थांबवावे लागलेले होते. बहुधा म्हणूनच आता नव्या कलाकारांच्या संचात आणि नवी नेपथ्य रचना करून मिरची पुड हा खेळ सुरू झालेला असू शकतो. कारण असे हल्ले आम आदमी पक्ष व केजरीवाल सोडून अन्य पक्षांच्या वाट्याला फ़ारसे आलेले नाहीत. नाट्यमयता हा या नव्या पक्षाचा आत्मा राहिला आहे.

मागल्या लोकसभा निवडणुका जाहिर होण्याच्या बेताला केजरीवाल पक्षाचा प्रचार करण्यासाठी गुजरातला पोहोचले होते आणि अचानक त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भेट मागितली. ती नाकारली गेल्यावर त्यांनी तिथेच तमाशा सुरू केला होता. आपण दिल्लीचे माजी मुख्यमंत्री असतानाही आपल्याला गुजरातचा मुख्यमंत्री तात्काळ भेट देत नाही, ह्याला ‘आम आदमी’ पक्षाचा नेता लोकशाहीचा अपमान ठरवून नाटक रंगवत होता. मग त्याच दरम्यान निवडणूक आयोगाने लोकसभेच्या मतदानाचे वेळापत्रक जाहिर केले आणि आचारसंहिता लागू झाली. तर आचारसंहितेचे कारण देऊन केजरीवाल यांच्यासोबत चाललेल्या तीसचाळीस गाड्यांचा ताफ़ा पोलिसांनी रोखला. तर त्याला भाजपाची दादागिरी ठरवून केजरीवालनी मोठा तमाशा केला होता. त्यांचे दिल्लीतले दोनतीनशे समर्थक भाजपाच्या पक्ष कार्यालयाजवळ जमा झाले आणि तिथे त्यांनी दगडफ़ेक सुरू केली. अशाप्रकारे त्या पक्षाने आपण गांधीवादॊ व अहिंसक असल्याची साक्ष दिली होती. त्याची किंमत त्यांना लोकसभा मतदानातून मोजावी लागली होतीच. पण नाट्यमयता ही केजरीवालांच्या रक्तात आणि आम आदमी पक्षाच्या डीएनएमध्येच सामावलेली आहे. त्यामुळे आता निवडणूकांचे वेध लागले असतील तर अशा नाटकांचे नवनवे अविष्कार पुढल्या काळात दिसणार आहेत. वाहिन्यांना नाट्यमयता हवीच असल्याने त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळणारच. तेव्हा वाहिन्यांच्या प्रेक्षकांनीही तशा नाटकाची सवय लावून घेतलेली बरी. आज मिरची पुड टाकलेली आहे. उद्या सुहाना वा एमडीएच वगैरे मसाला कंपन्यांची जाहिरात केजरीवाल यांनाच मॉडेल म्हणूनही वापरू लागण्याची शक्यता कोणी नाकारू शकणार नाही. आम आदमी पक्षाचे नेते वा केजरीवाल यांच्या अंगावर फ़ेकलेली मिरची पुड म्हणजे आमचाच ‘एव्हरेस्टचा तिखा लाल’ असल्याची जाहिरात झळकली तर मला आश्चर्य वाटणार नाही. कदाचित कंपनी आपली जाहिरात बदलून ‘केजरीवालका तिखा लाल’ अशीही जाहिरात करू लागण्याची शक्यता आहे

Sunday, November 18, 2018

अमेरिकन निवडणूकीत हिंदूत्व?

Image result for tulsi gabbard

अयोध्येच्या राममंदिरासाठी काही हिंदू संघटनांनी अध्यादेश काढण्याची मागणी आग्रहपुर्वक मांडल्यावर लगेच आता निवडणूकांसाठीच भाजपा हिंदूत्वाचा अजेंडा नव्याने पुढे आणत असल्याचा आरोप झाला आहे. खरेतर त्यात नवे काही़च नाही. मागल्या तीन दशकांपासून हा आरोप सातत्याने होत राहिला आहे आणि आताही होतो आहे. १९८९ सालच्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा विषय ऐरणीवर आला होता. त्याला खरेतर राहुलचे पिताश्री राजीव गांधी जबाबदार होते. त्यांच्या पाठीशी दोन्ही सभागॄहात भक्कम बहूमत होते आणि सुप्रिम कोर्टानेच शहाबानुचा विषय निकाली काढलेला होता. पण मुठभर मुस्लिम धर्मांध नेते व मौलवींनी तो वादाचा विषय केला आणि मुस्लिमांची मते गमावण्याचे भय कॉग्रेसला घातले. त्याला राजीव गांधींनी दाद दिली नसती, तर आज खुप वेगळे राजकारण व समिकरण दिसले असते. राहुल गांधींना गळ्यात जानवे घालून मंदिरांच्या पायर्‍या झिजवाव्या लागल्या नसत्या, की कॉग्रेसला भाजपावर हिंदूत्वाचे आरोपही करावे लागले नसते. पण राजीव गांधी मौलवींच्या धमक्यांना शरण गेले व त्यांनी सुप्रिम कोर्टाचा निकाल फ़िरवणारा अध्यादेश काढला. त्यातून सामान्य हिंदूंच्या मनात शंका निर्माण केली. हा देश मुस्लिमांचे लांगुलचालन करतो आणि हिंदूंना आपल्या धार्मिक भावनांची जपणूकही करू देत नाही; अशी धारणा त्यातून निर्माण झाली. मग उलट दबाव कॉग्रेसवर आला. हिंदूंच्या भावनांना हिंदू संघटनांनी उत्तेजित केले आणि त्या शांत करण्यासाठी राजीव गांधी यांनी अयोध्येतील दिर्घकाळ वादग्रस्त असलेल्या मंदिराचे दरवाजे खुले केले. तिथे पूजाअर्चा करण्य़ाची मोकळीक दिली. परिणामी हिंदू खुश होण्यापेक्षा मुस्लिम खवळले आणि बाबरी मशिदीच्या आवारातील त्या मंदिराचा विषय मोठा गंभीर होऊन गेला. तिच रामजन्मभूमी असल्याची धारणा असल्याने तिथेच भव्य मंदिर उभारण्याच्या विषयाला चालना मिळून गेली. ही प्रेरणा वा हिंदूत्व फ़क्त भारतीय निवडणूकांपुरते असते का? की अमेरिकेतही हिंदूत्वाचे राजकारण चालू शकते?

आपल्याकडला हिंदूत्वाचा विषय सध्या बाजूला ठेवू या. कारण लोकसभेचे पडघम वाजायला अजून अवधी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीलाही अजून दोन वर्षे बाकी आहेत. पण नुकत्याच तिथल्या मध्यावधी, म्हणजे संसदीय निवडणूका पार पडल्या असून त्यात रिपब्लिकन पक्षाला काहीसा फ़टका बसला आहे. त्या संसदेतील प्रतिनिधीसभा रिपब्लिकन पक्षाच्या हातून निसटली असून लौकरच अध्यक्षीय निवडणूकीच्या प्राथमिक हालचाली सुरू होतील. त्यापैकी रिपब्लिकन पक्षाला नवा उमेदवार शोधण्य़ाची गरज नाही. कारण ट्रंप पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि तिथल्या पद्धतीनुसार त्यांना दुसर्‍या खेपेला उभे रहाताना पक्षाची संमती घ्यावी लागणार नाही. म्हणूनच त्यांचा दोन वर्षानंतरचा आव्हानवीर कोण असेल, त्याची चर्चा आतापासून सुरू झालेली आहे. अमेरिकन सिनेट म्हणजे वरीष्ठ सभागृहाचा प्रत्येक सदस्य सिनेटर म्हणून ओळखला जातो आणि तो अध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार मानला जातो. तशी अनेक नावे समोर येऊ लागली असू,न ती अर्थातच डेमॉक्रेट पक्षाची आहेत. कारण आव्हानवीर त्याच पक्षाला द्यायचा आहे. असे इच्छुक आधीपासून पक्षातील प्रतिनिधींनाच आपल्या बाजूला वळवण्य़ाची खेळी सुरू करतात आणि त्यातून दुर्बळ वाटणारे एकेक माघार घेत, तीनचार खरेखुरे स्पर्धक शिल्लक उरतात. त्यांची तुफ़ान झुंज होऊन पक्षाचा अंतिम उमेदवार निश्चीत होतो. दहा वर्षापुर्वी म्हणूनच अशी झुंज हिलरी क्लिंटन व बराक ओबामा यांच्यात जुंपलेली होती. त्यात ओबामा यांनी बाजी मारली आणि हिलरींना माघार घ्यावी लागली होती. त्यांनी पुन्हा आठ वर्षांनी आखाड्यात उडी घेतली आणि उमेदवारी २०१६ साली मिळवली. मात्र त्यांची डाळ रिपब्लिकन डोनाल्ड ट्रंप यांच्यासमोर शिजली नाही. आता हिलरींना संधी उरलेली नाही. डेमॉक्रेट पक्षाला नवा चेहरा शोधावा लागणार आहे. तो चेहरा हिंदू असू शकतो काय?

डेमॉक्रेट पक्षाचे एक भारतीय वंशाचे नेते डॉ. संपत शिवांगी यांनी तशी शक्यता वर्तवली आहे. एका समारंभात शिवांगी यांनी तुलसी गब्बार्ड या अमेरिकन अध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतील, अशी शक्यता व्यक्त केलेली आहे. शिवांगी हे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचे नेते असून, तिथल्या मतदारात हल्ली भारतीयांची संख्या लक्षणिय झालेली आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून शिवांगी यांच्याकडे बघितले जाते. मात्र त्यांनी नाव सुचवलेले असले, म्हणून तुलसी या भारतीय वंशाचा अजिबात नाहीत. त्या मुळच्या अमेरिकन असून त्यांच्या जन्मदात्या आईने हिंदू धर्माचे पालन आचरण सुरू केल्याने तुलसी यांचा धर्म हिंदू आहे. त्या हवाई बेटाच्या राज्यातून अमेरिकन संसदेत निवडून आलेल्या आहेत. अजून त्यांनी चाळीशीही गाठलेली नसली, तरी त्यांनी चार वेळा संसदेच्या प्रतिनिधीसभेची निवडणूक जिंकलेली आहे. तुलसीचे वडील हवाई राज्याच्या कायदेमंडळाचे दिर्घकाळ सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांच्या मुलीने आरंभापासून राजकारणात आपले अस्तित्व स्वतंत्रपणे निर्माण केले आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकनांमध्ये तुलसी खुप लोकप्रिय आहेत. तिची आई गोरी अमेरिकन ख्रिश्चन आहे. पण आध्यात्मिक आकर्षणामुळे त्यांनी हिंदूधर्माचे आचरण सुरू केले आणि तुलसीही त्याच प्रभावाखाली आल्याने हिंदू झालेली आहे. शिवांगी यांनी तुलसीचे नाव त्या समारंभात जाहिर केलेले असले तरी तिथेच नंतर भाषण करताना तिने त्याविषयी कुठलेही भाष्य केलेले नाही. नकारही दिलेला नसल्याने त्यालाच होकर ठरवून तुलसीच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही चर्चा एका वेगळ्या अंगाने जाऊ लागली आहे. येत्या काही महिन्यात अध्यक्षीय प्राथमिक चाचण्या सुरू होतील आणि त्यात खरोखरच तुलसीने उडी घेतली तर ती ओबामा किंवा हिलरी यांच्याप्रमाणेच एक वेगळा उमेदवार म्हणून इतिहास घडवू शकेल. त्या निवडणूकीतला तो पहिला हिंदू उमेदवार असेल.

दहा वर्षापुर्वी जॉर्ज बुश ह्यांची दुसरी मुदत संपत असताना डेमॉक्रेट पक्षातर्फ़े दोन नावे अगत्याने पुढे आलेली होती. ती दोन्ही इतिहास घडवणारीच मानली जात होती. ओबामा हे निवडून आल्यास प्रथमच अमेरिकेचा अध्यक्ष कृष्णवर्णिय वा गौरेतर असणार होता आणि हिलरी क्लिंटन निवडून आल्या असत्या, तरी प्रथमच अमेरिकेला महिला अध्यक्ष लाभली असती. तुलसीचा वेगळेपणा असा आहे, की आजवर कोणी हिंदू अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीतला उमेदवार झालेला नव्हता. बहुधा ख्रिश्चन नसलेलाही कोणी अध्यक्ष अमेरिकेला मिळालेला नाही. म्हणूनच तुलसीला तशी संधी मिळाली तर ती पहिली हिंदू उमेदवार असेल आणि निवडून आलीच तर पहिलीच महिला व पहिलाच हिंदू अध्यक्ष, असा अपुर्व योगायोग घडून येऊ शकेल. आपल्याकडे कुठल्या मतदारसंघात वा कुठल्या पदासाठी कुठल्या जातधर्माचा उमेदवार दिला, यावर राजकारण व टिकाटिप्पण्या होत असतात. अमेरिकेत तितका प्रकार होत नाही. पण कुजबुज मात्र नक्की चालते. त्यातही रिपब्लिकन पक्ष हा कट्टर ख्रिश्चन धर्मियांचा मानला जातो आणि त्यातले बहुतांध पंथ संप्रदाय त्याच पक्षाच्या पाठीशी उभे असतात. त्यामुळे तुलसी यात उतरली, तर तिला ख्रिश्चन कडव्या नागरिकांची मते कितपत मिळतील याची शंका आहे. मात्र एकूण ट्रंप विरोधातले अमेरिकन मग पुराणमतवादी त्यांना हरवण्यासाठी तुलसीच्या ‘हिंदूत्वाचे’ समर्थक होऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो किती मोठा विनोद असेल? उदारमतवादी पुरोगामी मानले जाणारे डेमॉक्रेट अमेरिकेत हिंदूत्वाचे समर्थन करतील आणि भारतात मात्र त्यांचेच इथले भाईबंद हिंदूत्वाच्य नावाने तेव्हाच गळा काढत असतील. अर्थात ही जर-तरची गोष्ट आहे. कारण अजून प्राथमिक चाचण्याही सुरू झालेल्या नाहीत आणि तुलसी वा कुठल्याही इच्छुकाने त्यासाठी हालचाली सुरू केलेल्या नाहीत. पण तसे झाले तर? इथले पुरोगामी हिंदूत्वाचा विरोध म्हणून ट्रंपचे समर्थन करणार काय? प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Saturday, November 17, 2018

राजकारणातले ‘किरणा’ घराणा

lalu family के लिए इमेज परिणाम

गेल्या काही वर्षात अनेक राजकीय घराण्यांमध्ये भाऊबंदकी माजलेली आहे. दिल्लीत २०१४ साली सत्तांतर होण्यापुर्वीची आणि आजची राजकीय समिकरणेच खुप बदलून गेलेली आहेत. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकीय क्षितीजावर उदय होण्यापुर्वी देशाचे राजकारण प्रत्येक प्रांतानुसार विविध राजकीय घराण्यांकडे विभागले गेलेले होते. प्रत्येक राज्यामध्ये एक दोन प्रादेशिक पक्ष असे आहेत, ज्यांचे वर्चस्व होते आणि तिथे एका नेत्याच्या घराण्य़ाचेच कोणीतरी नेता होऊ शकत होते. इतरांनी त्यांचे सरदार किंवा आश्रित म्हणून राजकारणात वावरावे, अशीच स्थिती होती. २०१४ नंतर ही स्थिती आमुलाग्र बदलत गेलेली आहे. अनेक राज्यातून अशा घराणेशाहीला शह मिळाला आणि मतदाराने अनेक राज्यात पर्याय म्हणून घराण्याच्या वारसांना नाकारण्याचे पाऊल उचललेले आहे. त्यामुळे अशा अनेक घराण्यांना धक्का बसला असून त्यांच्यात अंतर्गत सत्तास्पर्धा उफ़ाळून आलेली आहे. कारण त्यांच्यापाशी सतापदे कमी झाली असून, आश्रितांनाही वाडगा घेऊन फ़िरण्य़ाची नामुष्की आली. त्यामुळे भावाभावात किंवा नातलगांमध्ये हमरीतुमरी वाढलेली आहे. २०१४ च्या लोकसभेनंतर लगेच देशातील सर्वात मोठ्या असलेल्या उत्तरप्रदेश या राज्यातून त्याची सुरूवात झाली आणि आता अनेक राज्यात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातली नवी दोन घराणी म्हणजे बिहारचे लालूप्रसाद आणि हरयाणाचे ओमप्रकाश चौताला यांचे कुटुंबकलह होत. योगायोग असा, की ही तिन्ही राजघराणी मुळातच घराणेशाहीच्या विरोधातील राजकारणातून उदयास आलेली आहेत. कारण त्यांचे मुळपुरूष लोहियावादी समाजवादी राजकीय परंपरेतून आलेले आहेत. त्यांच्या राजकारणाचा पायाच घराणेशाही विरोधातून घातला गेला होता आणि आता त्यांचेच राजकीय विसर्जन घराणेशाही दिवाळखोरीत गेल्यामुळे होऊ घातलेले आहे. किती चमत्कारीक योगायोग आहेत ना?

कोणी भाजपाचा प्रवक्ता किंवा पक्षाध्यक्ष अमित शहा कॉग्रेसवर एका घराण्य़ाची सत्ता राबवणारा पक्ष म्हणून आरोप करतात, तेव्हा बाकीचे पुरोगामी पक्ष खवळून प्रत्युत्तर देतात. घराणेशाही भाजपातही असल्याचे आवर्जून सांगत असतात. त्यात तथ्य नाही असे कोणी म्हणू शकत नाही. कारण भाजपाच्या अनेक नेत्यांनीही आपल्या मुलांना राजकारणात वारसा म्हणून उतरवलेले आहे. पण सवाल एका नेत्याने स्वपक्षात नव्हेतर आपल्या मतदारसंघाचा वारसा आपल्या कुटुंबाला देणे ही सुभेदारी म्हणता येईल. सत्तेची वा राज्याची सुत्रेच आपला वारसा म्हणून आपल्या मुले मुलींकडे सोपवण्याशी मतदारसंघाच्या वारश्याची तुलना होऊ शकत नाही. संजय वा राजीव गांधी यांच्यावर घराणेशाहीचे आरोप तेव्हा झाले, जेव्हा त्यांना पंतप्रधानांचे पुत्र म्हणून पक्षाच्या थेट सर्वोच्च नेतृत्वासाठी पुढे आणले गेले होते. इंदिराजींनी तरी पिता हयात असताना पक्षात काम केलेले होते आणि नेहरूंच्या मृत्यूनंतर दुय्यम पदावर काम करून आपली गुणवत्ता सिद्ध केलेली होती. नेहरूंची कन्या म्हणून त्यांना नेतॄत्वाची संधी नक्की मिळाली. पण बाकी त्यांच्या गुणवत्तेमुळेच त्यांना पंतप्रधानपद मिळवणे किंवा संभाळणे शक्य झालेले होते. पक्षाला पराभूत व्हावे लागल्यावर त्यांनाही पक्षाने बाजूला केलेले होते आणि पुन्हा त्यांनी वेगळी चुल मांडून आपली गुणवत्ता सिद्ध केलेली होती. आज राहुल गांधी ज्या प्रकारे पक्षाला रसातळाला घेऊन चालले आहेत, तसे तेव्हा घडले असते, तर संजय राजीव यांनाही राजकारणात स्थान मिळाले नसते की सोनिया राहुल यांना इतकी राजकीय अरेरावी करता आलीच नसती. घरातला वारस जन्मामुळे थेट मुख्यमंत्री वा पंतप्रधान पदाचा दावेदार बनतो, त्याला घराणेशाही म्हणता येईल. एखाद्या मतदारसंघाचा वारसा ही तुलनेने नगण्य बाब आहे. कारण अशा मतदारसंघात कोणीही गुणवान होतकरू कार्यकर्ता वारशाला आव्हान देऊ शकत असतो.

इंदिराजी नेहरूंची कन्या म्हणून नेतृत्वात पुढे आल्या. त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप करण्याचा आरंभ डॉ. राममनोहर लोहिया व त्यांच्या निकटवर्तियांनी केलेला होता. प्रामुख्याने लोहियांचे राजकीय वारस म्हणून उत्तर भारतात राजकीय प्रभाव पाडणारे समाजवादी नेते राजनारायण, यांनी घराणेशाही हा शब्द प्रस्थापित केला. इंदिराजींनी संजय गांधी यांना कॉग्रेसमध्ये आणून थेट सरचिटणिस पदावर बसवले आणि युवक कॉग्रेसची सुत्रे त्यांच्या हाती दिली. तेव्हापासून राजनारायण यांनी घराणेशाही येऊ घातल्याचा आवाज उठवला होता. त्यांचा राजकीय वारसा पुढल्या काळात अनेक राज्यात इतर नव्या पिढीतल्या नेत्यांनी चालविला. त्यांना आज ज्येष्ठ नेते म्हणूनही ओळखले जाते. त्यातले एक उत्तरप्रदेशचे मुलायम सिंग यादव आणि दुसरे बिहारचे लालूप्रसाद यादव होत. हरयाणातले चौधरी देवीलाल आणि उत्तरप्रदेशारले अजितसिंग त्यातलेच होत. राजनारायण घराणेशाही विरोधात आवाज उठवित होते, तेव्हा चौधरी देवीलाल मोठा नेता होते. आज ते हयात नाहीत. पण त्यांनीच आपल्या राजकीय वारशासाठी सर्वप्रथम मुलाला थेट मुख्यमंत्री बनवले होते. देवीलाल हरयाणाचे मुख्यमंत्री असताना १९८९ सालात लोकसभेच्या निवडणूका झाल्या आणि त्यात जनता दल पक्ष सत्तेपर्यंत पोहोचला. केंद्रात मग सत्तांतर झाले आणि त्यात देवीलाल उपपंतप्रधान झाले. तेव्हा त्यांनी आपल्या जागी हरयाणाचा मुख्यमंत्री म्हणून थोरला सुपुत्र ओमप्रकाश चौताला यांचा शपथविधी करून घेतला होता. त्यासाठी हरयाणातही जावे लागलेले नव्हते. राज्यपालांनाच दिल्लीत पाचारण करून देवीलालनी आपल्या पुत्राचा शपथविधी उरकला. त्यासाठी आमदारांची बैठकही घेणे आवश्यक मानले नव्हते. त्यावरून खुप गदारोळ झाला आणि मग घराणेशाहीची साथ सर्वच पक्षात पसरत गेली. कदाचित प्रतिष्ठीत होत गेली असे म्हणता येईल. त्याच नव्या पिढीत लालू मुलायम यांच्या घराण्यांचा पाया घातला गेला होता.

देवीलाल उपपंतप्रधान झाले व त्यांनी आपल्या सुपुत्राला मुख्यमंत्री पदावर थेट बसवले, त्याच कालखंडात जनता दलाची सत्ता बिहार व उत्तरप्रदेशात आलेली होती. राजीव विरोधातल्या आघाडीच्या राजकारणात तेव्हा भाजपा अस्पृष्य नव्हता आणि अयोध्येत जन्मभूमीचा वाद उकरून काढल्याने शक्ती मिळालेल्या भाजपाच्याच पाठीब्यावर मुलायम व लालू मुख्यमंत्री झालेले होते. पुढे त्याच विषयातल्या रथयात्रेला रोखल्यामुळे दोघांची सत्ता धोक्यात आलेली होती. कारण भाजपाने अडवाणींच्या अटकेमुळे सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. तर त्यांची सरकारे कॉग्रेसने वाचवली होती. पण तो मुद्दा नसून मुलायम वा लालूंचा राजकीय उदय तिथून झाला आणि दोघेही घराणेशाही विरोधी राजकारणातून उदयास आलेले नेते आहेत. मात्र एकदा सत्तेची चव चाखल्यावर त्यांना विचारसरणी व लोकशाही लक्षात राहिली नाही. मग आपली सत्ता नुसती टिकवणेच नाही, तर ती आपल्या घराणे व कुटुंबाची जहागिरी बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या राजकीय कसरती कोणाही सर्कसपटूलाही लाजवणार्‍या ठरल्या. त्याची दोन उदाहरणे पुरेशी ठरावित. २०१४ मध्ये अमित शहा यांनी लोकसभेच्या निकालाच्या वेळी प्रतिक्रिया देताना म्हटले होते, उत्तरप्रदेशात भाजपा व एनडीए सोडून अन्य कुठलाच पक्ष निवडून आला नाही. तर दोन कुटुंबातले खासदार निवडून आलेत. सोनिया व राहुल असे गांधी कुटुंबिय होते आणि मुलायमच्या कुटुंबातले पाच सदस्य लोकसभेत निवडून आलेले होते. मायावतींचा कोणीच पक्ष सदस्य निवडून येऊ शकला नाही. म्हणजेच तिथे कुटुंब सोडले तर समाजवादी व कॉग्रेस पक्षाचा कोणी निवडून आला नाही. लालूंनी त्याची पुनरावृत्ती २०१६ च्या विधानसभा निवडणूकी नंतर केली. पक्षाला मिळालेले उपमुख्यमंत्रीपद धाकट्या मुलाला दिले आणि मंत्रीपद थोरल्या मुलाला दिले. राज्यसभेच्या दोनपैकी एका जागी मिसा भारती या मुलीला निवडून आणले.

तसे बघितल्यास बिहारमध्ये लालूंचा राष्ट्रीय जनता दल पक्ष आता घराण्य़ाची मालमत्ता म्हणून वादग्रस्त राहिलेला नाही. लालूंचा पक्ष ही त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता ही बाब मतदारानेही मान्य केली आहे. १९९७ सालात लालूंना चारा घोटाळ्यात मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी जनता दलातर्फ़े दबाव आणला गेला तेव्हा त्यांनी पक्षाचा आदेश मानला आणि आपल्या कुटुंबवत्सल पत्नीलाच त्या पदावर आणून बसवले. तेव्हा पासवान, शरद यादव असे नेते संतप्त झाले होते. तर लालूंनी पक्षाचे बहुतांश आमदार घेऊन नव्या पक्षाची वेगळी चुल मांडली. तेव्हा विरोध करणारे तमाम पक्ष आता लालूंना पुरोगामी म्हणून मिरवत आहेत आणि त्यांच्या वारसांचे आश्रित म्हणून मिळेल ते पदरात पाडून घेण्यातही खुश आहेत. पासवान शरद यादवही त्याला अपवाद नाहीत. मात्र या घराणेशाहीला जेव्हा बाहेरून आव्हान उरत नाही, तेव्हा आतूनच कोणी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत असतो. कारण राजाच्या वारसाला आपल्या भाईबंदाना देण्याइतकी सर्वोच्च पदे उपलब्ध नसतात. मुलायमना धाकटा भाऊ व सख्खा मुलगा यातून एकाची निवड करताना भाऊबंदकीचा सामना करावा लागलेला आहे आणि आता तशीच काहीशी स्थिती बिहारमध्ये लालूंच्या कुटुंबात उदभवली आहे. धाकट्याला पक्षाची सर्व सुत्रे सोपवल्याने थोरला पुत्र तेजप्रताप नाराज झाला असून त्याने सगळा सूड आपल्या नवपरिणित पत्नीवर काढला आहे. सहा महिन्यापुर्वी लग्न झालेल्या पत्नीला घटस्फ़ोट देण्यासाठी तेजप्रताप याने दिवाणी कोर्टात अर्ज दाखल केला आणि तो बिहार सोडून निघून गेल्यामुळे लालूंच्या पक्षात अराजक माजलेले आहे. ते फ़क्त त्यांच्या पक्षापुरते मर्यादित नसून महागठबंधन म्हणून योजलेल्या मोदीविरोधी आघाडीसाठीही तेजप्रताप या लालूपुत्राचा घटस्फ़ोट राजकीय पेचप्रसंग बनला आहे. सगळे लालू कुटुंब तो विवाह वाचवण्याच्या कामात गर्क आहे आणि महागठबंधनासह राष्ट्रीय जनता दल पक्षही संकटात सापडला आहे.

अलिकडेच सौदी अरेबियाच्या राजघराण्यात वादंग माजले होते आणि राजाच्या लाडक्या राजपुत्राने आपल्याच कुटुंबातील अन्य काही सख्ख्या सावत्र भावांचा सुडबुद्धीने काटा काढल्याच्या बातम्या आल्या होत्या. सौम्य स्वरूपात इथेही वेगळी स्थिती नाही. मुलायम लालूंची अशी स्थिती आहे. त्यात मुलायम तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. लालू चारा घोटाळ्यात दोषपात्र ठरून शिक्षा भोगायला गेलेले आहेत. त्यांना पुढ्ल्या आयुष्यात कुठलीही निवडणूक लढवण्यास कोर्टाने प्रतिबंध लागू केलेला आहे. पण लोक त्यांच्याच नावावर मते देतात, हा आपल्या लोकशाहीतला चमत्कार आहे. नेमकी तशीच काहीशी स्थिती हरयाणातील ओमप्रकाश चौतला यांचीही झाली आहे. देवीलाल यांच्याकडून त्यांच्याकडे आलेला लोकदल पक्षाचा वारसा त्यांनी अजय चौताला या पुत्राला दिला होता. पण लालूंच्या चारा घोटाळ्याप्रमाणेच चौतालाही शिक्षक भरतीच्या घोटाळ्यात अडकले आणि पुत्र अजय चौतालासह तुरुंगात जाऊन पडलेले होते. तर दुसरा पुत्र अभयसिंग चौताला याच्याकडे पक्षाची सुत्रे गेलेली होती. तुरुंगात पित्यासह पडलेल्या अजयसिंगचे दोन पुत्र परस्पर आपल्या चुलत्याला संपवायला निघालेले होते. त्याचा सुगावा लागताच तुरुंगात खितपत पडलेल्या आजोबाने आधी नातवांची पक्षातून हाकालपट्टी केली आणि चार दिवसांनी पॅरोलवर बाहेर आलेल्या थोरल्या पुत्राचीही हकलपट्टी केलेली आहे. थोडक्यात घराणेशाहीच्या विरोधात उदयास आलेल्या आणखी एका घराण्यातली बेदिली चव्हाट्यावर आलेली आहे. आंध्रप्रदेशात एनटी रामाराव यांच्या हयातीत तेलगू देसम पक्षाचे हेच झाले होते आणि करुणानिधींच्या उतारवयात त्यांच्याही घरात तेच घडलेले आहे. पंजाबात प्रकाशसिंग बादल यांच्या अकाली दलात घडले महाराष्ट्रात शिवसेना वा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बाबतीतही घडलेले आहे. एकूण घराणेशाहीला आता घरघर लागली असे नक्की म्हणता येईल.

मजेची गोष्ट अशी आहे, की असे लहानमोठे राज्यातील घराणेशाहीचे वारस संस्थानिक वंशज आता देशातल्या सर्वात जुन्या लोकशाही घराणेशाहीच्या वारसाला सत्तेत बसवायला एकत्र यायला निघालेले आहेत. त्यापैकी प्रकाशसिंग बादल यांचा अकाली दल पक्ष त्यात सहभागी झालेला नाही. अन्यथा राहुल गांधी ज्या महागठबंधन रणनितीतून आपल्या नेहरू घराण्याची सत्ता पुन्हा मिळवू बघत आहेत, त्यात बहुतांश अशीच राज्यातली घराणी सहभागी होताना दिसतील. योगायोग असा गंमतीशीर आहे, की मोदी विरोधक असूनही जे काही प्रादेशिक वा लहान पक्ष महागठबंधनात यायला राजी नाहीत, तेच घराणेशाहीचे पूजक नाहीत. ममता बानर्जी यांचा तृणमूल कॉग्रेस, मायावतींचा बसपा, मार्क्सवादी हे घराणेशाहीवर चालणारे पक्ष नाहीत. पण तेच राहुलचे नेतृत्व स्विकारून महागठबंधनात यायचे टाळत आहेत. स्वबळावर तेलंगणात पक्ष व सत्ता स्थापन करणार्‍या चंद्रशेखर राव यांनी अशा महाआघाडीची कल्पना सर्वप्रथम मांडली होती. पण सर्वात आधी तेच त्यातून बाजूला झाले आणि आता ममताही त्यात सहभागी व्हायला राजी नाहीत. बाकी जे कोणी तावातावाने महागठबंधनाची मोट बांधून मोदीना सत्ताभ्रष्ट करण्य़ाचा आणाभाका घेत आहेत, ते बहुतांश पक्ष घराणेशाहीने चालणारे वा प्रस्थापित राजघराण्य़ाच्या मालमत्ता होऊन बसलेले पक्ष आहेत. आपापल्या गावात किंवा आळीत उत्तम पिढीजात किराणा दुकान चालवणार्‍यांनी एकत्र येऊन मोठा बाजार उभा करण्य़ाचे स्वप्न बघण्यात गैर काहीच नाही. पण बाजार चालवण्यासाठी चिकाटी व संयम यांच्यासह परस्परांचा फ़ायदाही बघावा लागत असतो. त्याऐवजी एकमेकांना पाण्यात पाहून आपली पोळी भाजून घेण्य़ाचे डाव खेळणारे एकत्र येऊन किराणा दुकानही दिवाळखोरीत जात असते. बाजारही उठत असतो. मग हा सगळा महागठबंधनाचा गदारोळ बघून किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात परदेशी गुंतवणूकीच्या विरोधात उमटलेला व्यापार्‍यांचा आवाज व आंदोलनाची आठवण होते. राजकारणातही अशा ‘किराणा’ घराण्यांची आजची तारांबळ वेगळी नाही ना?

Friday, November 16, 2018

आधुनिक दंतकथेचा नायक (उत्तरार्ध)

Related image

कुठलेही शब्द बेधडक बोलण्याची त्यांची हिंमत जगाला चकीत करणारी होती. इतर कोणी जे बोलायला धजावणार नाही, ते बोलण्याची व त्याला घट्ट चिकटून रहाण्याची ही हिंमत या माणसात कुठून आली असेल? मजेची गोष्ट अशी, की त्यांनी लिहावे किंवा बोलावे, त्यावर कायदेशीर कारवाई करायचे धाडस सरकारलाही होत नसे. अनेकजण त्यांच्यावर खटले भरून त्यांना हैराण करू शकले असते. पण तसे झाले नाही. कारण जे कोणी त्यांना ओळखत होते, त्यांना शब्दातल्या अर्थापेक्षाही आशय समजलेला असावा. भावनांचा उद्रेक यापेक्षा बाळासाहेबांच्या मनात कुठे कुणाविषयी किल्मीष नसायचे. म्हणून कुठलेही शब्द वापरण्याची मुभा या जगाने त्यांना दिलेली होती. त्यातली निष्पाप भावनाही लोकांना उमजलेली होती. ते पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादादनेही बोलून दाखवले. अखेरच्या दिवसात साहेबांची प्रकृती बिघडली, तेव्हा अनेकांच्या प्रतिक्रीता वाहिन्यांवर घेतल्या जात होत्या, त्यात मियादादही होता, आपल्या मातोश्री भेटीची आठवण त्याने कथन केली. पाकच्या विरोधात इतके जाळजळीत बोलणारा हा माणूस घरी भेटायला गेलो, तर माझ्या कुटुंबाची विचारपूस करत होता. ‘अजिब आदमी थे, ना पाकिस्तान ना दुष्मनी, हमारे बालबच्चे फ़ॅमिलीकी बारेमे पुछते रहे.’ एका पाकिस्तानी खेळाडूचे नवल यासाठी होते, की जाहिर भूमिकेतून त्याला ठाऊक असलेला बाळासाहेब आणि समोर साक्षात अनुभवास येणारा शिवसेनाप्रमुख यात जमिन अस्मानाचा फ़रक त्याला दिसला होता. व्यासपीठावरून पाकविषयी बोलणे व घरी आलेल्या पाहुण्याला अपमानित करणे, यातला फ़रक मियादादला चकीत करून गेला होता. कारण तो राजकारण्याला भेटायला आला होता आणि भेटला होता एक कुटुंबवत्सल माणूस! पण वास्तवात तेच खरेखुरे बाळासाहेबांचे रूप होते. राजकारण त्यांनी खेळले खुप, पण ते त्यांना कधीच मानवले नाही. ते सामान्य माणूसच राहिले.

१९९४ सालची गोष्ट आहे. सुरेश खानोलकर हा माझा मित्र तेव्हा दुखणाईत होऊन इस्पितळत दाखल झाला होता. त्याच्या ‘खतरनाक’ या दिवाळी अंकाची एक प्रत साहेबांना सर्वात आधी द्यावी ,अशी त्याने मागणी केली आणि मी नरक चतुर्दशीच्या दिवशी मातोश्रीवर गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहसिनखान आलेल होता. तेव्हा तो इथे भारतात येऊन काही हिंदी चित्रपटात हिरो म्हणूनही झळकला होता. कोणी मुस्लिम बिल्डर उद्योगपती त्याला मातोश्रीवर घेऊन आलेले होते. त्यांची पत्नीही तिथेच बसलेली होती. बहुधा दिवाकर रावतेही तेव्हा तिथे होते. कुठून तरी बोलता बोलता विषय मुस्लिमांकडे वळला. अकस्मात साहेब मोहसिनखानला म्हणाले, माझ्यावर मुस्लिमांना लांडे म्हटल्याचा आरोप होतो. तर मी काय चुकीचे बोलतो? तुमचे ‘ते’ थोडे कापलेलेच असते ना? कापल्याने तोकडे झाले तर मराठीत त्याला लांडे म्हणतात. मग माझे काय चुकले? अर्थात हे सर्व साहेब त्यांना साधेल तितक्या हिंदीत बोलत होते आणि ऐकणारे चपापलेले होते. तो मोहसिनखान इतक्या दडपणाखाली होता, की तो अवाकच झाला होता. साहेबांनी चुकले कुठे म्हणून विचारले तर तो बिचारा काय उत्तर देणार होता? तरी साहेबांनी पुन्हा विचारलेच. ‘कुछ गलत है क्या?’ बिचार्‍याने नकारार्थी मान हलवली आणि विषय बदलून संवाद पुढे सरकला. थोड्या वेळाने ती मंडळी निघून गेली आणि मीच साहेबांना म्हणालो, तुम्ही काय बोलून गेलात? तर माझ्याकडे चमत्कारीक नजरेने बघत त्यांनी विचारले काय बोललो? त्यानेही मान्य केले की. मुस्लिम असले म्हणून काय झाले मी बोललो, तेच खरे आहे आणि त्यानेही मान्य केले ना? त्यावर मी म्हणालो, पण त्यांच्या सोबत एक बाई होती ना? तेव्हा मात्र चपापल्यासारखे साहेब उत्तरले, हे मात्र चुकले. त्या बाईसमोर असे शब्द बोलायला नको होते. बस्स!.

यातली गंमत लक्षात घेतली पाहिजे. समोर बसलेल्यात तिघेजण मुस्लिम होते आणि त्यातला एक चक्क पाकिस्तानी होता. तरी जाहिरपणे मुस्लिमांना लांडे म्हणणारे बाळासाहेब त्यांनाच आपल्या शब्दात काही चुक आहे काय असे विचारत होते. त्यातून त्यांच्या धार्मिक भावना दुखावतील वा अन्य काही आपल्यावर आरोप होतील, याची त्यांना अजिबात फ़िकीर नव्हती. आपण जे शब्द बोललो ते योग्य असल्याची त्यांना खात्री होती आणि म्हणूनच त्यांनी थेट मोहसिनखानलाच असा प्रश्न विचारला होता. त्यानेही वाघ्याच्या गुहेत बसलेल्या कोकराप्रमाणे त्याला होकार भरला होता. पण त्याला तिथे घेऊन आलेल्या भारतीय मुस्लिम उद्योगपतीचे काय? त्याचा उपमर्द होईल असेही साहेबांना कशाला वाटले नसेल? उद्या तोच उद्योगपती बाहेर जाऊन याचा गवगवा करील व पक्षाला त्याची वेगळी किंमत मोजावी लागेल, अशीही कुठली चिंता या पक्षप्रमुखाच्या सुरात नव्हती. म्हणूनच मी विचारले तर त्यांनी आपल्या शब्दाचा ठामपणे आक्रमक तर्‍हेने बचाव केला होता. पण दुसर्‍याच क्षणी म्हणजे तिथे एक महिला असल्याचे लक्षात आणुन दिल्यावर चपापलेल्या मुलाप्रमाणे आपली चुक मान्य केली होती. कुठल्या राजकीय नेत्याला इतके निरागस राहुन राजकारण करता येईल? काही मिनीटे आपली चुक नसल्याचे ठामपणे सांगणारा हा मोठा नेता, चुक लक्षात आल्यावर कुठलेही आढेवेढे न घेता विनासायास शब्द चुकल्याचे मान्य करतो, हे किती भारतीय नेत्यांना शक्य आहे? भले हा प्रसंग जाहिर नव्हता. खाजगीतला होता. पण दोन व्यक्तीतला संवाद नव्हता. त्याला अनेकजण साक्षीदार होते. पण आपल्या शब्दावरचा विश्वास व चुक मान्य करण्यातला प्रामाणिकपणा दुर्मिळ आहे ना? बाळासाहेबांचा हाच मोठेपणा होता. राजकारणातले डावपेच वा फ़ायदेतोटे ओळखून त्यांना कधी जगता आले नाही, की आपल्या जगातील प्रतिमेला ते बळी पडले नाहीत.     

अख्खी नदी अंगावर घेऊन हा माणूस राजकारणापासून किती व कसा कोरडा राहू शकला? मी मार्मिकमध्ये असताना त्यांनी शिवसेनेचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला नेलेले होते. मला तो विषय घ्यावा असे वाटलेले होते, म्हणून मी त्यांना भेटायला मातोश्रीवर गेलो होतो. तर त्या भेटीत काय झाले व कुठली चर्चा झाली, तेच त्यांना स्पष्ट करता येईना. मला त्याची गंमत वाटली. शिष्टमंडळ तुमच्या नेतृत्वाखाली असेल, तर मुख्य चर्चा तुम्ही व मुख्यमंत्र्यांची झाली असणार ना? मग काहीच कसे आठवत नाही? हे हसून उत्तरले, मी कोणाला भेटायला गेलो होतो? मुख्यमंत्री कोण आहे? यावर मी उत्तरलो, शंकरराव चव्हाण! त्यांना कधी समोरासमोर भेटलायस का? मी उत्तरलो नाही. त्यावर साहेब म्हणाले, भेटूनही उपयोग नाही. कारण तू व्यंगचित्रकार नाहीस. अरे मी शिवसेनाप्रमुख असलो, तरी मुळचा कार्टुनिस्ट आहे. समोर कार्टूनला योग्य चेहरा व व्यक्तीमत्व बसलेले असेल, तर त्याच्या बोलण्यातल्या गंभीर विषयाकडे लक्ष कसे राहिल? शंकरराव असे व्यक्तीमत्व आहे, की त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांची रेखाचित्रे रंगवावीत. हे असेच होणार हे मला ठाऊक असल्याने मी त्यांना कधीच एकटा भेटत नाही. ते मनोहरपंत, सुधीरभाऊ, नवलकरांना सोबतीला घेऊन जातो. ते ऐकत असतात, बोलत असतात. मी निरिक्षणे करीत असतो. मध्येच कोणी हटकले तर इतरांकडे प्रश्न ढकलून आपले निरिक्षण चालू! शंकररावांचे ओठ कसे आहेत? नरसिंहरावांचे ओठ कसे आहेत? नुसत्या ओठांना उठाव दिला की व्यंगचित्र तयार! बाकी पार्श्वभूमी तात्कालीन विषय असेल, तशी घ्यायची. ह्याला कोणी एका राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणायचे? राजकारणात डुंबूनही जो माणूस इतका अलिप्तपणे राजकीय व्यक्तीमत्वांचा व्यंगचित्रातून विचार करत असेल, तर त्याच्यातली ती अलिप्तता किती अपवादात्मक असेल ना?

याच कारणास्तव मला बाळासाहेबांशी जुळवून घेता आले. पन्नास वर्षाची पत्रकारिता करताना सहसा कुठल्याही नेत्याला भेटायचे टाळलेला बहुधा मी मराठीतला एकमेव पत्रकार असेन. बाळासाहेब असे जवळून व अफ़लातून बघता आले नसते, तर याही नेत्याशी कधी जवळीक झाली नसती. सहसा राजकीय नेता आपला आब व प्रतिष्ठा राखुन इतराशी संवाद चर्चा करत असतो. पण बाळासाहेबांची गोष्ट वेगळी होती. मुंबईच्या कुठल्या कोपर्‍यातला फ़ेरीवाला वा झोपडपट्टी रहिवासी असो, किंवा कोणताही उद्योगपती असो, त्याच्याशी तितक्याच मोकळेपणाने बोलणे वागणे या माणसाला साधलेले होते. तुमची त्याच्याकडून काही अपेक्षा नसेल, तर त्यांना घाबरून वागण्याचीही गरज नव्हती. ते कोणाशीही मित्रासारखे वागू शकत होते. तुम्हाला त्यातला मित्र ओळखता आला नसेल, तर दोष त्यांना देता येणार नाही. तुमचे पुर्वग्रह हा त्यांचा गुन्हा नाही. माझ्या पत्नीने जिहादची तोंडओळख करून देणारे पुस्तक लिहीले व साहेबांचा अप्रण केले होते. त्याचे प्रकाशनही त्यांच्याच हस्ते व्हावे, ही तिची अपेक्षा होती. म्हणूनच आमच्या कुटुंबातील सर्वजण प्रथमच मातोश्रीवर गेलो होतो. प्रकाशनाचा विषय बाजूला राहिला आणि साहेब गप्पातच रंगून गेले. त्यांनी जुन्या काळातील प्रबोधनकारांच्या अनेक आठवणी त्यावेळी जाग्या केल्या. मला कायम आवाज चढवून बोलण्याची संवय आहे आणि तिथेही मी तसेच बोलत होते. तर माझ्या साडूंना तो शिवसेनाप्रमुखांचा अवमान वाटला असावा. तो एका हाताने मला आवाज खाली ठेवण्यासाठी इशारा करीत होता आणि माझे तिकडे लक्षच नव्हते. परंतु जगातल्या एका महान व्यंगचित्रकाराचे तिकडे बारीक लक्ष होते. त्यांनी माझ्या साडूला हटकले, तुम्ही असा हात कशाला हलवता आहात, हे विचारल्यावर गडी गळपटला. साहेब विचारतात तर तो नाही नाही म्हणू लागला. साहेब म्हणाले, नाही कसे, मी मघापासून बघतोय तुम्ही हात हलवित आहात. पण काही उपयोग नाही.

या संवादाने उपस्थित सगळेच चमकले आणि माझ्या साडूला उगाच घाम फ़ुटायची वेळ आली. कारण त्याच्या समजुतीतले बाळासाहेब आणि समोरची व्यक्ती यातला फ़रक त्याला उमजला नव्हता. तेव्हा त्याला समजावित साहेब म्हणाले, बाहेर जगात म्हणतात, माझा दबदबा आहे. पण इथे बघताय ना? मला कोण चढ्या आवाजात दम भरतोय? भाऊ इथे आला मग असाच दमदाटी करतो मला. काय करू शकतो सांगा? आपला इशारा भाऊने ओळखला नाही व साहेबांनी पकडला, म्हणून माझा साडू खजील झाला होता. पण त्यामुळे त्याच्या मनातली या महान व्यक्तीविषयीची प्रतिमा कायम बदलून गेली. त्यापुर्वी मी साहेबांधी काय बोलायचो ते घरी सांगूनही कोणाचा त्यावर विश्वास बसलेला नव्हता. कारण त्यांच्या मनातली शिवसेनाप्रमुखाची दहशत पक्की होती. प्रत्यक्ष ती व्यक्ती व त्याच्याशी झालेला संवाद जेव्हा त्यांनी अनुभवला, तेव्हा त्यांचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की कानावर! जगाला राजकारणातला हा माणूस ठाऊक आहे, त्याची व्यंगचित्रे, वक्तव्ये व विधाने माहिती आहेत. परंतु आपल्या जीवनक्रमात या माणसाला प्रत्यक्ष जे कोणी भेटले आहेत, त्यांच्याकडे अशा शेकडो दंतकथा असतील, ज्या जगासमोर क्वचितच आल्या असतील. राजकारणात इतका ॠजू व नम्र नेता मला तरी कोणी दिसला नाही. त्यांच्या कृपेने मोठी सत्तापदे भूषवलेल्यांनाही तितकी नम्रता वा समज दाखवता आलेली नसेल. शेकड्यांनी सत्तापदे इतरांना वाटून मोकळा झालेला हा माणूस, कुठल्या पदाच्या मोहात सापडला नाही आणि एक सामान्य माणूस म्हणून जगण्याचा अट्टाहास त्याने कधी सोडला नाही. आपल्या वागण्याबोलण्यातून त्याने आपले अढळपद निर्माण केले. साडेचार दशके देशातील एका मोठ्या राज्याचे राजकारण करूनही राजकारणापासून पुर्णपणे कोरडा राहू शकलेला दुसरा कोणी नेता मला तरी ठाऊक नाही.  (संपुर्ण)


Thursday, November 15, 2018

आधुनिक दंतकथेचा नायक (पुर्वार्ध)

संबंधित इमेज

१९८६ सालात मी ‘मार्मिक’ या साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम करत होतो. शिवसेना त्याच काळात आपला व्याप अवघ्या महाराष्ट्रात विस्तारत होती आणि प्रथमच सेनेला मुंबई महापालिकेची सत्ता एकहाती मिळालेली होती. त्याच दरम्यान माझ्या धाकट्या भावाचे लग्न निघाले होते. मला अशा कौटुंबिक सोहळ्याचे अजिबात आकर्षण नाही. म्हणून मी सहसा भावंडांच्या लग्नातही पुर्ण वेळ कधी हजर राहिलो नाही. सहाजिकच घरच्या लग्नासाठी कुठल्याही मित्र परिचिताला आमंत्रण देण्याचा माझा स्वभाव नाही. पण अगदीच जवळचे असतात, ते नाराज होतात. म्हणून औपचारिक आमंत्रण द्यायचो. तेव्हा प्रमोद नवलकर मार्मिकच्या कामात लक्ष घालायचे आणि आठवड्यातले तीन दिवस कार्यालयात यायचे. सहाजिकच त्यांना आमंत्रण देण्याला पर्याय नव्हता. लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी नवलकर कार्यालयात आले असताना त्यांना मी पत्रिका दिली आणि तेही चिडलेच. आज पत्रिका देता? असा काहीचा नाराज स्वर त्यांनी लावला. मग काही क्षणातच त्याना स्मरल्यासारखे म्हणाले, ‘साहेबांना दिली का पत्रिका?’ मी नकारार्थी मान हलवली, तर ते कमालीचे विचलीत झाले. आपल्या व्यापातून बाळासाहेब कुठे लग्नाला वेळ काढू शकणार होते? म्हणजे असे माझे तर्कशास्त्र होते. पण आमंत्रण दिले नाही तर साहेब रागावतील, असा इशाराच नवलकरांनी दिला आणि लग्नाच्या आदल्या रात्री आठच्या सुमारास मी मातोश्रीवर पोहोचलो. साहेबांना पत्रिका दिली आणि त्यांनीही इतक्या ‘उशिरा’ असा सूर लावलाच. मग थातूरमातूर उत्तर दिले. त्यावर त्यांनी चक्क लग्नाला येत असल्याचे सांगून टाकले. आता माझी पंचाईत होती. कारण साहेब येणार म्हणजे संपुर्ण वेळ लग्नात हजर रहण्याखेरीज मला पर्याय नव्हता. पण विषय तेवढ्यावर संपला नाही, तितक्याच सहजपणे साहेबांनी मला विचारले, ‘शिरीला पत्रिका दिली का?’

शिरी म्हणजे श्रीकांत ठाकरे. बाळासाहेबांचे कनिष्ठ बंधू व तेच मार्मिकचे आरंभीपासूनचे प्रकाशक होते. संपादकाला पत्रिका दिली तर प्रकाशकालाही देणे आवश्यक होते. मी ठोकून दिले की दिलीय पत्रिका म्हणून! पण प्रत्यक्षात मी श्रीकांतजींना पत्रिका दिलेली नव्हती. पण आता थाप मारलीच आहे, तर धावपळ करणे भाग होते आणि मला तितक्या उशिरा बांदरा येथून पुन्हा शिवाजी पार्कला येणे भाग झाले. श्रीकांतजी काहीसे मितभाषी व कोरड्या स्वभावाचे. इतक्या रात्री त्यांचे दार वाजवले आणि ते चिडलेलेच सामोरे आले. त्यांना पत्रिका देण्यास आलो म्हटल्यावर ते भडकलेच. उद्या लग्न आणि आज रात्री पत्रिका? पुन्हा थाप मारणे आले. दिवाळी अंकाच्या कामात गढलो होतो. सवड आता मिळाली म्हणून त्यांची समजूत काढली. मनातल्या मनात म्हटले, त्यांनी आपल्या थोरल्या भावाशी यावर बोलू नये म्हणजे झाले. दुसरा पुर्ण दिवस मग मला लग्न सोहळ्यात व हॉलवर थांबावे लागलेले होते. साहेब येणार हे घरात सांगितलेले असल्याने भावाचे मित्र व बहुतांश नातलग उशिरापर्यंत थांबलेले होते आणि साहेब साडेआठ वाजता मीनाताई, कुमूदताई व श्रीकांतजींना घेऊन आले. तेव्हा त्यांच्याभोवती सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा नसायचा. एकदोन पोलिस असत. त्यांना थेट मंचावर नेवून नवरानवरीला भेटवले आणि त्यांचे आशीर्वादही झाले. मग खाली आल्यावर त्यांनी काही पेय वगैरे घेतले नाही. पण मला एका वृद्धेकडे बोट दाखवून ओळख विचारली. ही महिला त्यांना परिचीत वाटत होती. शिवसेनेच्या आरंभीच्या महिला आघाडीत ती कार्यरत असल्याचे त्यांनी अगत्याने सांगितले, मी त्यांना तिच्यापाशी घेऊन गेलो, ती माझी आई होती. अर्थात वयाने ती साहेबांपेक्षाही मोठी होती. काही बोलायचे म्हणून ती सीटवरून उठून उभी राहिली, तर साहेब व मीनाताई तिच्या पाया पडले. हा सगळा भाग माझ्या आईला चक्रावून टाकणारा होता. मलाही चकीत करणारा होता.

मिश्किल हास्य करीत माझ्या पाठीवर थाप मारून साहेब म्हणाले, ज्येष्ठांचा सन्मान ठेवायचा असतो. इकडे माझ्या आईचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. जमलेली मंडळीही थक्क झालेली होती. पण ह्या सर्वाचे कारण असलेल्या बाळासाहेबांचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यांनी खांद्यावर हात टाकला आणि मला मंचाच्या एका बाजूला नेले. काहीतरी ते कुजबुजल्यासारखे माझ्याशी बोलत असल्याचे इतरांना दिसत होते. पण ऐकू येत नव्हते की समजत नव्हते. शिवसेनाप्रमुख भाऊच्या खांद्यावर हात टाकून काय कानगोष्ट करीत असतील, याची प्रत्येकाला उत्कंठा असणे स्वाभाविकच असणार. महाराष्ट्रात उदयास येऊ घातलेल्या नव्या पक्षाचे सर्वोच्च नेते असलेले बाळासाहेब मला काय सांगत असतील, ही इतरांची उत्सुकता मलाही कळत होती. अर्थात काहीतरी राजकीय विषय असेल वा काही राजकीय लिखाणाविषयीच आम्ही बोलत असणार, हे सर्वांचेच गृहीत होते. कारण साहेबांचा अविर्भाव आदेश देण्याचा होता किंवा जाब विचारल्यासारखा होता. पण मी हसत हसत त्यांच्याशी बोलत होतो. म्हणून बहुतेक उपस्थित बुचकळ्यात पडलेले होते. दहाबारा मिनीटातच साहेब निघून गेले आणि तात्काळ पाहुण्यांनी साहेब काय सांगत होते, म्हणून माझ्यावर सरबत्ती केली. मात्र आमच्यात झालेला संवाद तिथे कोणालाही जाहिरपणे सांगण्यासारखा नव्हता. अनेकदा अशा मोठया व्यक्तींच्या आयुष्यातील घटना त्यांच्या व्यक्तीमत्वाला धरूनच टिकवाव्या लागत असतात. बाळासाहेब त्याला अपवाद होते. तरीही त्यांच्याशी तेव्हा झालेला माझा संवाद जाहिररित्या कथन करणे मला योग्य वाटले नाही. कारण तो संवाद अतिशय हास्यास्पद वा निरासग होता. बघणार्‍यांच्या कल्पनेपलिकडला होता. ज्या लग्नाला साहेब आलेले होते, त्याची जी इंग्रजी पत्रिका मी त्यांना दिलेली होती. त्यापेक्षा वेगळी एक पत्रिकाही छापलेली होती आणि तीही त्यांना हवी होती. इतकेच आमच्यात बोलणे झालेले होते.

आपल्याकडे लोक लग्नाच्या वा कुठल्याही समारंभाच्या आकर्षक वा खर्चिक आमंत्रण पत्रिका छापतात आणि तरीही त्या कोणी उघडूनही बघत नाहीत. तुम्ही आमंत्रण द्यायला गेलात, मग हातात पत्रिका घेतानाच समोरचा विचारतो, अरे वा, कुठला मुलगा वा मुलगी आहे? विवाहस्थळ कुठे आहे? तारीख कोणती आहे? म्हणजे इतका खर्च करून बनवलेली पत्रिका वाचलीही जात नाही. मला त्याचा खुप राग यायचा. म्हणून माझ्या भावंडांच्या लग्नात मी नेहमीच चमत्कारीक पद्धतीने आमंत्रण पत्रिका छापलेल्या होत्या. त्या पत्रिका हाती घेणार्‍याला वाचाव्याच लागत असत. थोरल्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका मी साध्या ब्राऊन पेपरवर हॅन्डबिलासारखी छापली होती. ती बघूनच लोक शिव्या घालत वाचायचे आणि हसायचे. पण वाचायचे. तशीच या भावाची पत्रिका मी मुद्दाम अंतर्देशीय पत्रावर मालवणी भाषेत छापली होती आणि थेट पोस्टाने पाठवून दिलेली होती. त्यातला मालवणी मसुदा वाचून लोक चकीत झाले होते आणि माझ्या या चक्रमपणाची चर्चाही नातलगांमध्ये झालेली होती. मात्र इतर मान्यवरांसाठी इंग्रजीतल्या पत्रिका भावाने मुददाम छापल्या होत्या. तर त्यातलीच पत्रिका मी साहेबांना दिलेली होती. पण अवघ्या चोविस तासात मी अशी काही चमत्कारील मालवणी पत्रिका छापल्याचे साहेबांना कळले होते. एखाद्या लहान मुलासारखी त्यांना त्याविषयी उत्सुकता होती. त्या हॉलमध्ये मला बाजूला घेऊन ती पत्रिका त्यांना आमंत्रण रुपाने दिली नाही, म्हणून त्यांनी खडसावले होते. सहाजिकच दुरून बघणार्‍यांना ते आवेशात बोलताना दिसले व मी हसताना दिसलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी ती मालवणी पत्रिका मातोश्रीवर आणून त्यांना दिली पाहिजे, असा इशारा देऊनच त्यांनी सोहळ्याचा निरोप घेतला होता. यातली निरासग अपेक्षा कोणला समजणार होती? एका मोठ्या नेत्याच्या मनातली ही उत्कंठा कोणाला उमजणार होती?

हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या आक्रमक नेत्याचा खरा चेहरा होता. त्यावर कुठला मुखवटा नव्हता की आवरणही नव्हते. एक उत्कंठेने भारलेले निरागस मूल असावे, तसा हा माणूस कोणीही निर्मळ मनाने बघितला तर त्याच्या प्रेमात पडावे, इतका सरळ होता. मार्मिकचा कार्यकारी संपादक म्हणून त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांना सलग चार वर्षे जवळून बघता आले. वयाने, अनुभवाने व प्रतिष्ठेने वीस वर्षे मोठे असलेले बाळासाहेब कुणाशीही सहज मित्रत्वाने बोलू शकत होते व वागतही होते. राजकीय बडेजाव त्यात नव्हता आणि असला तर मला कधीही जाणवला नाही. त्यांच्यासमोर नतमस्तक असावे लागते किंवा त्यांच्यासमोर कोणाचीही बोलती बंद होते, असे मीही ऐकून होतो. पण मार्मिकमध्ये दाखल झाल्यापासून कधीही तसे जाणवले नाही. रस्त्यावर टपरीवर कुणा मित्राशी गप्पा माराव्यात, इतक्या मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलता आले. आपण मोठा नेता वा व्यंगचित्रकार आहोत, म्हणून समोरच्याने आपल्याशी कसे वागावे बोलावे, अशी त्यांची कुठलीही अट नसे. अर्थात तो माणूस जितका मनमोकळा होता, तितक्या स्वच्छ मनाने तुम्ही त्याच्याशी वागणे बोलणे अगत्याचे असायचे. जेव्हा महाराष्ट्राचे राजकारण साहेबांना वगळून मोजता येत नव्हते, तेव्हाही हा माणूस तसाच होता आणि नंतरही तितकाच अलिप्त होता. राजकारणाच्या गुंतवळ्यात फ़सलेले एक निरागस मुल, असेच मला त्यांचे कायम विश्लेषण करावेसे वाटले. राजकारणातले फ़ायदेतोटे किंवा रागलोभ याच्या पलिकडे गेलेला एक सामान्य माणूस, हे बाळासाहेबांचे खरे रूप होते. म्हणूनच त्यांच्याविषयी आपापल्या मनातील समजूतींना चिकटून बसलेल्यांना त्यांना कधी ओळखता आले नाही की समजून घेता आले नाही. बहुतांश लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जी प्रतिमा होती, त्यापेक्षा खरा माणूस खुपच भिन्न होता.

मातोश्रीवर गेले मग मुजरा करावा लागतो, कुणा बुवा महाराजाप्रमाणे बाळासाहेबांच्या पाया पडावे लागते; अशा अनेक दंतकथा आहेत. पण मला तसा कुठलाही अनुभव आला नाही. मी या काळात कधी त्यांच्या पाया पडल्याचे आठवत नाही. त्यांच्या खोलीत त्यांच्याशी बोलत असताना एक कोणी व्यक्ती आली आणि ती साहेबांच्या साष्टांग पाया पडली. माझेही पाय समोर होते आणि मी माझे पाय मागे घेतले. त्यावर मिश्कील हसून ते म्हणाले, तो माझ्या पाया पडतोय. मीही उत्तरलो, म्हणून माझे पाय मागे घेतले, तेही त्यावर मनसोक्त हसले. आणखी एकदा मी मातोश्रीवर गेलो असताना त्यांच्या थेट पाया पडलो होतो. त्यांना ते खटकले आणि म्हणाले, आज काय बिघडले आहे? तू चक्क माझ्या पाया पडतो आहेस? मी उत्तरलो, माझे वडील हयात नाहीत, तुम्ही वडीलांच्या वयाचे आहात आणि आज माझा वाढदिवस आहे. तात्काळ ते आपल्या आसनावरून उठले आणि उभे राहून म्हणाले, मग पुन्हा पाया पड. आता मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. मी त्यापुर्वी त्यांच्या कधीही पाया पडलेलो नव्हतो, हे त्यांच्या पक्के लक्षात होते. पण त्याविषयी कुठला आक्षेप नव्हता की अपेक्षाही नव्हती. पुढला अर्धा तास मग त्यांनी पाया पडण्यावरूनचे किस्से मला ऐकवले. ते म्हणाले, एक माणूस पाया पडला मग मला संताप येतो, पण बोलूनही दाखवता येत नाही. मला गंमत वाटली. कोणी पाया पडला म्हणून संतापायचे काय कारण? मलाही नवल वाटले, म्हणून विचारले कोणाचा राग येतो, पाया पडल्यावर? ते म्हणाले अमिताभ बच्चनचा! हे आणखीच गुढ झाले. इतका मोठा कलावंत पाया पडला, हा गौरव आहे, त्यावर रागावण्यासारखे आहेच काय? अशावेळी खुलासा करताना साहेब हसायचे त्याला तोड नाही. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघत साहेबांनी धमाल खुलासा केला. ‘अरे आपण उभे असताना अमिताभ पाया पडला, तरी ओणवा असूनही तोच उंच वाटतो ना?’ (अपुर्ण)

कसं बोललास शाहीद!

shahid afridi के लिए इमेज परिणाम

पाकिस्तानचा धडाकेबाज फ़लंदाज आणि माजी क्रिकेट कर्णधार शाहीद आफ़्रिदी याने इंग्लंडमध्ये केलेल्या एका विधानाने त्याच्या मायदेशी खळबळ माजलेली आहे. कारणही स्वाभाविक आहे. आजकाल पाकिस्तानचे राजकारण क्रिकेटमय झाले आहे. तिथला पंतप्रधानच क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व गोलंदाज आहे. मात्र त्याला वाटली होती तितकी पाकिस्तानची राजकीय स्थिती सुखरूप नाही. टॉस जिंकून आधी फ़लंदाजी घ्यावी आणि पहिले पाचसहा फ़लंदाज किरकोळ धावसंख्येत बाद व्हावेत, तशी इमरानची एकूण अवस्था आहे. अशावेळी नेहमी अष्टपैलू मानल्या जाणार्‍या कर्णधाराला डाव संभाळावा लागत असतो. इमरानखान त्याच अवस्थेतून जात आहे. मात्र सुंभ जळले तरी पीळ जात नाही, या उक्तीप्रमाणे पाकचा क्रिकेटपटू पंतप्रधान काश्मिरचा राग आळवत बसला आहे, मग इंग्लंडला गेलेल्या दुसर्‍या माजी कर्णधाराला लोकांनी वेडेवाकडे प्रस्ग्न विचारले तर नवल नाही. शाहीद आफ़्रिदीला असाच कोणी काश्मिर विषयी प्रश्न विचारला आणि त्याने आपल्याला ज्येष्ठ असलेल्या इमरानची अब्रुच चव्हाट्यावर आणली. असलेले चार प्रांत पाकिस्तानला संभाळता येत नसतील, तर काश्मिर घेऊन काय करायचे आहे? असा प्रामाणिक सवाल आफ़्रिदीने प्रश्नकर्त्यालाच विचारला. काश्मिर पाकिस्तानने काबीज करण्यापेक्षा असलेले चार प्रांत संभाळावेत आणि काश्मिरला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी. तिथला रक्तपात तरी निदान थांबू शकेल. पाकिस्तानला काश्मिर नकोच आहे असे आफ़्रिदी म्हणतो, तेव्हा त्याला त्या भूमी वा लोकसंख्येचे नियोजन व संभाळही पाकिस्तान करू शकणार नाही, असेच म्हणायचे आहे. म्हणजेच जो काही पाकिस्तान आहे तोच दिवाळखोरीत व अराजकात बुडाला असल्याची कबुलीच आफ़्रिदीने दिली आहे. मग काश्मिर हवा कशाला? हा सवाल योग्य व वास्तविक असला, तरी तो विचारणार्‍या आफ़्रिदीला अजून पाकिस्तान मात्र कळलेला नसावा.

काश्मिरात वाद वाढल्याने तिथले लोक मारले जातात. हिंसाचार व रक्तपात होतो, शांतता निकालात निघाली आहे. कुठल्याच आसपासच्या लोकांना सुखरूप समाधानी जगता येत नाही. म्हणून माणूसकी सर्वात महत्वाची आहे. मरणारे वा मारणारे कुठल्या जात धर्माचे आहेत, ते महत्वाचे नसून तीही माणसे आहेत. याकडे आफ़्रिदीने लक्ष वेधले आहे. तसेच असेल आणि आफ़्रिदीला माणूसकीचा इतकाच कळवळा आलेला असेल, तर मग पाकिस्तान तरी कशाला हवा होता? असा प्रश्न त्याला पडायला हवा होता. कारण पाकिस्तान हा देशच मुळात रक्तमासाच्या चिखलाने शिंपडून उभा करण्यात आला आहे. आपण मुस्लिम लोकसंख्या असल्याने आपण वेगळा देश वा राष्ट्र असल्याच्या दुराग्रहामुळे हिंदूस्तान नावाच्या देशाची फ़ाळणी झाली. करोडोच्या संख्येने तिथे वसलेल्या बिगर मुस्लिमांना पिढीजात घरेदारे सोडून भारतात पळून यावे लागलेले होते. अनेकजण सुखवस्तु होते आणि रातोरात देशोधडीला लागले. पण तरीही त्यांना सुदैवीच म्हणावे लागेल. कारण जे कोणी अंगावरच्या वस्त्रानिशी घर सोडून पळाले आणि जीव मुठीत धरून दिल्ली अमृतसरच्या दिशेने आले, ते बचावले तरी. बाकी लाखो शिख हिंदूंची आजच्या पाकिस्तानात कत्तल होत राहिली, अगदी मागल्या सत्तर वर्षात तिथे घटलेली हिंदू-शिखांची संख्या खुप बोलकी आहे. आजही कोणी बिगर मुस्लिम तिथे सुरक्षित नाही. ख्रिश्चन धर्म आचरण करणार्‍या आशियाबी नामक महिलेचे हाल हल्लीचेच आहेत ना? तिच्या वाट्याला आपल्याच मायदेशात अशी दुर्दशा कशामुळे आली? की आफ़्रिदीला पाकिस्तानात काय चालले आहे, तेही ठाऊक नाही? असते तर त्याने अशी हवेतली विधाने केली नसती. काश्मिर पाकिस्तानला नको असेल तर ठिक आहे. पण पाकिस्तान तरी कशाला हवा आहे? कोणाला हवा आहे? मुठभर राजकारणी व तितकेच सेनाधिकारी यांचे पोटपाणी चैन यापेक्षा पाकिस्तानच्या अस्तित्वाला काय अर्थ उरला आहे?

धर्माच्या नावाने जे राजकारण म्हणून मागल्या शतकाच्या पुर्वार्धात मुस्लिम मौलवी व कडव्या धर्मनिष्ठ राजकारण्यांनी हे भूत निर्माण केले, आफ़्रिदी त्या भुताटकीलाच आपली मातृभूमी समजून बसला आहे. रक्त सांडणार्‍या कैचीत सापडलेल्या काश्मीरच्या गोष्टी सांगतो आहे. तिथे ज्या मुठभरांचा रक्तपात आजही चालू आहे, त्याच्या हजारपटीने काश्मिरी लोक अनेक पिढ्या बरबाद होऊन गेलेले आहेत. काही लाख काश्मिरी हिंदू उध्वस्त होऊन गेले आहेत आणि भारताच्या ताब्यात असूनही इथल्या काश्मिरात सुखाने हिंदू जगू शकत नाही, अशी स्थिती आहे. कारण तो काश्मिरचा प्रादेशिक विषय नसून धार्मिक राजकारणाचा पेच आहे. जगावर इस्लामचा झंडा फ़डकावण्याच्या इर्षेला पेटलेल्यांचा रक्तरंजित खेळ आहे. बाकीच्या धर्माचे सोडून द्या, शिया मुस्लिमांची होणारी कुठल्याही देशातील कत्तल आफ़्रिदीला कळत नाही  काय? त्याच्याच पाकिस्तानी देशामध्ये ज्या अहमदीया पंथाच्या लोकांची निर्घॄण हत्या सातत्याने होते असते, त्यांचे काय? ते बिचारे स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेतात. तर त्यांना पाखंडी ठरवून ठार मारले जात असते ना? शिया वा अहमदिया मुस्लिमांच्या मशिदीत नित्यनेमाने होणारे बॉम्बस्फ़ोट कशासाठी होत असतात? काश्मिर पाकला मिळावा म्हणून नव्हेतर, कोणाचा इस्लाम खरा, अशा वादातून ही हत्याकांडे होत असतात. तेव्हा समस्या समजून घेतल्याशिवाय आफ़्रिदीने असली राजकीय वक्तव्ये करण्याचे काही कारण नाही. वादग्रस्त होऊन थोडी जास्त प्रसिद्धी मिळू शकेल. पण प्रश्नाचा अधिक चुथडा होऊन जाईल आणि रक्तपात थांबवायचा असेल तर मुळात धर्माचे राजकारण व अट्टाहास थांबवावा लागेल. ते इमरानच्या हाती नाही की आफ़्रिदीच्या हातातली गोष्ट नाही. कारण समस्या राजकारणात नसून धर्माच्या नावाने माजवलेल्या थोतांडात सर्व गुणदोष सामावलेले आहेत. ते सत्य बोलण्याची हिंमत पुरोगामी लोकांमध्ये नसेल तर मुस्लिमात कुठून असायची?

आफ़्रिदीने जो काश्मिरातील हिंसा व रक्तपाताचा विषय काढला आहे, तो ऐकून इथले अनेक हिंदूत्ववादी हुरळून जाऊ शकतात. कारण त्यात पाकिस्तानला दोन खडेबोल सुनावले असाही आभास निर्माण होतो. पण व्यवहारात त्यातून आफ़्रिदीचे अज्ञानच प्रकट होते. तो प्लास्टीकची बॅट घेऊन अंगणात क्रिकेट खेळत होता, तेव्हापासून काश्मिरातला हिंसाचार सुरू झालेला आहे आणि त्याचा बोलविता धनी पाकिस्तानच आहे. अगदी क्रिकेटमध्येही धर्माने लुडबुड करायची बाकी ठेवली नाही, हे त्याचा कर्णधार म्हणून नेतृत्व केलेल्या इंझमाम उल हकने कृतीतून दाखवून दिलेले आहे. मग नसत्या उचापती आफ़्रिदीला कोणी सांगितल्या आहेत? अजून त्याचा कोणी मुडदा पाडलेला नाही आणि वेळ आल्यास पाडतीलही. तेव्हा काय रडायचे, ते त्याने आपल्या आप्तस्वकीयांना आतापासून पढवून ठेवावे. शक्य झाल्यास इमरान खानला भेटून हे शहाणपण शिकवावे. पंतप्रधान म्हणून देशाच्या चार प्रांतांचा कारभार चालवता येत नाही आणि कायदा व्यवस्था राखता येत नसेल; तर काश्मिरच्या उचापती कशाला हव्यात? हे लोकांना नव्हेतर पाकिस्तानी पंतप्रधानाला समजावण्याची गरज आहे. बाकीची पाक जनताही असल्या जिहादी राजकारणाला कंटाळलेली आहे. पण तिला काही करता येत नाही आणि ‘नया पाकिस्तान’ घडवायला निघालेल्या इमरानला सत्ता मिळाल्यावरही जुन्या काश्मिरी जिहादमधून मुक्त होता येत नाही. मग मधेच उठून आफ़्रिदीने शहीद होण्याचा आव तरी कशाला आणायचा? त्यापेक्षा त्याने आपली लोकप्रिय प्रतिमा वापरून पाक जनमानसात त्याचा प्रचार प्रसार करावा. मग काही फ़रक पडू शकेल. निदान विविध प्रांतातील लोक उठून इमरानला काश्मिरातील उच्छाद थांबवण्यासाठी आग्रह धरू लागतील आणि मानवतेला कलंक लावणारा त्या भूमीतला रक्तपात आटोक्यात आणायला हातभार लागू शकेल. नुसत्या वल्गना करण्यात अर्थ नाही.

Tuesday, November 13, 2018

त्यांना सत्य गवसले आहेहेनरीख हायने नावाचा जर्मन कवी विचारवंत आहे. त्याचे एक वचन प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, ‘आपल्याला अंतिम सत्य गवसले आहे असा ज्यांना भ्रम झालेला असतो, ते लोक आपले सत्य सिद्ध करण्यासाठी बेधाडक धडधडीत असत्य बोलू लागतात.’ कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मागल्या तीनचार महिन्यातली विविध वक्तव्ये बघितली, ऐकली व गंभीरपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला; की हायनेचे शब्द पटतात. राहुल गांधींना अंतिम सत्य गवसले असल्याचे सहज लक्षात येऊ शकते. राफ़ायलपासून जगातल्या कुठल्याही बाबतीत राहुल गांधींचे ज्ञान अपुर्व आणि संपुर्ण स्वरूपाचे आहे. अन्यथा त्यांना इतक्या ठामपणे बोलता आलेच नसते. मध्यंतरी राहुल गांधी मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणूकांसाठी कॉग्रेस उमेदवारांचा प्रचार करायला गेलेले होते. त्यांनी ठामपणे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या भावाचे नाव व्यापम घोटाळा व पनामा पेपर्समध्ये आल्याचे छातीठोकपणे सांगून टाकले. त्याच्याही पुढे जाऊन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान पनामा पेपर्समध्येच नाव झळकल्याने तुरूंगात जाऊन पडल्याचाही संदर्भ राहुलनी नेमका दिला. मग त्यांचे अगाध ज्ञान चुकीचे कसे मानता येईल? सहाजिकच राहुलभक्तांनी विनाविलंब गदारोळ सुरू केला आणि चौहान यांचे पित्त खवळले. ताबडतोब शब्द मागे घेतले नाहीत, तर राहुल यांच्यावर बदनामीचा खटला भरण्याचा इशारा त्यांनी देऊन टाकला. सत्य बोललेले सख्ख्या आईला आवडत नसेल, तर राहुलचे ‘सत्य’ चौहानांना कसे आवडावे? पण राहुलनीच माघार घेतली आणि एका महान सत्याची भृणहत्या होऊन गेली. कारण राहुलनी चौहान यांच्या इशार्‍यासमोर सपशेल नांगी टाकली आणि आपल्याला त्या संदर्भातले काहीच ठाऊक नसल्याचेही कबुल करून टाकले. पण मग कशातले नेमके काय राहुल गांधींना ठाऊक आहे? ते सामान्य लोकांना कसे उमजावे? की त्यांना हायनेच्या उक्तीतले अंतिम सत्य गवसले असे मानावे?

मध्यप्रदेशात भाजपाच्या विरोधातला प्रचार करताना आरोप करणे स्वाभाविक आहे. पण चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. मागल्या सोळा वर्षात सोनियांनी आपल्या सुपुत्रासाठी घरचा अभ्यास जितका घेतलेला नसेल, तितकी मेहनत गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींसाठी घेतलेली होती. त्यामुळे अशा अंतिम सत्य गवसलेल्या आरोपांना उत्तरे देण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करावे, हा धडा मोदींनी नेमका शिकून घेतलेला आहे. सहाजिकच त्यामुळे त्यांना थेट पंतप्रधान पदापर्यंत मजल मारता आली. सोनियांनी आपलेच सुपुत्र राहुल यांच्यावर तितकी मेहनत घेतली असती, तर त्यांना चौहान यांच्या धमकीला घाबतण्याचे काही कारण उरले नसते. त्यांनी अंतिम सत्य बोलण्याचा उद्योग केला नसता. पण तो केला व नंतर आपल्याला कशातलेच काही कळत नाही आणि भाषणात अनेक संदर्भ इकडचे तिकडे होऊन जातात, अशी कबुली राहुलना द्यावी लागली. अर्थात जी गोष्ट व्यापम वा चौहान यांच्यावरील आरोपांची आहे, तीच तशीच राहुलनी आपल्या भाषणात वेळोवेळी सांगितलेल्या अंतिम सत्याची आहे. कोणीही येऊन मोदी विरोधात काहीही खुळ्यासारखे सांगितले, तरी राहुलना तेच अंतिम सत्य असल्याचा साक्षात्कार होतो आणि ते जगाला ज्ञानाचे डोस तात्काळ पाजू लागतात. आता त्यासाठी राहुल यांना जागतिक किर्ती प्राप्त झाली असून, फ़्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांपासून भारताला राफ़ायल विमाने पुरवणार्‍या कंपनीच्या प्रमुखापर्यंत; सगळेच राहुलना खोटे पाडू लागले आहेत. पण त्याची पर्वा करण्याचे काहीही कारण नाही. राहुलना अंतिम सत्य गवसले आहे आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांनी शतायुषी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शिरावर घेतलेली आहे. परिणामी त्यांना रोजच्या रोज सभांमध्ये वा पत्रकारांना ज्ञानदान करताना अंतिम सत्य बोलणे भाग नाही का? ते सिद्ध होण्यासाठी राहुल खोटे बोलते तर नवल काय?

नोव्हेंबर महिन्याच्या आरंभी राहुलनी पुन्हा एकदा राफ़ायलच्या बाबतीत अंतिम सत्य पत्रकार परिषदेत सांगितले आणि मग हेनरीक हायनेच्या जर्मन देशाच्या शेजारी असलेल्या फ़्रान्सच्या एका मोठ्या कंपनीच्या प्रमुखाने राहुल गांधी यांच्याप्रमाणे आपल्याला खोटे बोलण्याची सवय नसल्याचे पत्रकारांना सांगून टाकले. राहुल खोटे उगाच बोलत नाहीत. त्यांना राफ़ायलचे अंतिम सत्य गवसलेले आहे. ते त्यांना खरे वाटलेले असेल तर खरे ठरवण्य़ासाठी धडधडीत खोटे बोलत रहावे लागले, तर चुक कसे म्हणता येईल? राफ़ायलमध्ये कुठलातरी भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यात पंतप्रधान मोदींनी सरकारी तिजोरीतले ३० हजार कोटी रुपये उचलून अनिल अंबानींच्या खिशात टाकलेले आहेत. हे राहुल गांधींना सापडलेले अंतिम सत्य आहे. एकदा हे अंतिम सत्य मानले, मग त्यासाठी कुठली कागदपत्रे वा पुराव्याची गरज नसते किंवा साक्षीदाराचीही गरज उरत नसते. रस्त्यावरचा कोणीही काहीही निराधार बोलला तरी, तो भक्कम सज्जड पुरावा होत असतो. कारण सत्य सिद्ध होण्याशी सर्व मतलब असतो. सत्य काय आहे त्याच्याशी कोणाला कर्तव्य असते? हायने जसा जर्मन विचारवंत होता तसाच एक जर्मन राजकारणी होता. त्याचे नाव गोबेल्स होते. त्याचेही एक विधान खुप प्रसिद्ध आहे. एखादे असत्य शंभर वेळा बिनदिक्कतपणे सांगत राहिले; मग लोकांना तेच सत्य वाटू लागते. बहुधा राहुलना मातोश्रींनी त्याच गोबेल्सची शिकवणी लावलेली असावी. अन्यथा त्यांनी इतका ‘सत्याचा आग्रह’ धरून आपण गांधीच असल्याचे सिद्ध करण्याची काहीही गरज नव्हती. मागल्या साडेचार वर्षामध्ये त्यांना पक्षाची संघटना उभारून भाजपाला २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मोठे आव्हान उभे करता आले असते. पण गांधीवादी परंपरेच्या आहारी जाऊन राहुलनी अंतिम सत्याचा ध्यास घेतलेला आहे. हायने व गोबेल्स यांच्या शिकवण्या त्यांना कुठे घेऊन जातात, ते आणखी आठ महिन्यात समोर आलेले असेल.

खरे तर राहुल यांना कोणी गंभीरपणे घेत नाही. पण बिचार्‍या विरोधी पक्षांची भलतीच गोची होऊन गेलेली आहे. त्यांना राहुलखेरीज पर्याय राहिलेला नाही. मागल्या अनेक वर्षात आपली बिगर कॉग्रेसवादाची भूमिका सोडून त्यांनीच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आपली मूळ बिगरकॉग्रेसी राजकारणाची परंपरा चालवताना त्यांनीच पुरोगामीत्वाचे नाटक रंगवले नसते आणि भाजपाला वाळीत टाकण्य़ाचा खुळेपणा केला नसता, तर भाजपाला आपले हातपाय इतके सर्वदुर पसरण्यासाठी मोकळी जमिन मिळाली नसती/ कॉग्रेसला संजिवनी मिळताना पुरोगामीत्व मिरवणारे असे केविलवाणे होऊन गेले नसते. एका बाजूला कॉग्रेस नेस्तनाबुत झाली असती आणि दुसरीकडे भाजपाला देशव्यापी होण्याची संधीही मिळू शकली नसती. तसे झाल्यामुळे पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांना यापुर्वी सोनियांची सत्ता मानावी लागली नसती. आज राहुलच्या वेडसरपणाचे खुळे समर्थनही करावे लागले नसते. एखाद दुसर्‍या राज्यात ज्यांचे अस्तित्व किंवा प्रभाव आहे, त्यांना एकत्र येताना दुबळ्या कॉग्रेसला मोठा पक्ष म्हणून स्विकारावे लागते आहे आणि पर्यायाने राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य करण्यावर महागठबंधन उभे राहू शकणार आहे. तसेच करायचे असेल तर पुरोगामी पक्षांनाही राहुलचे अंतिम सत्य मान्य करावे लागणारच. मग राफ़ायलच्या सापळ्यात अडकण्याला पर्याय नाही. सहाजिकच इतके पाठबळ मागे असताना राहुल गांधींनी माघार घ्यायचे काही कारण नाही. त्यांनी राफ़ायलच्या विमानात बसूनच विरोधकांचे नेतृत्व खंबीरपणे चालविले आहे आणि त्याची किंमत अखेरीस या विरोधी पक्षांना मोजावी लागणार आहे. कारण आगामी लोकसभेत कॉग्रेसचे संख्याबळ आणखी घटू शकत नसल्याने वाढणार आहे आणि भाजपा घटण्याची शक्यता नसल्याने दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या वाढीव जागांसाठी पुरोगामी व अन्य पक्षांना आपापल्या जागा मोकळ्या करून देण्याखेरीज पर्याय नाही. कारण राहुल गांधींना गवसलेले अंतिम सत्य सतराव्या लोकसभेचे वास्तविक चित्र रंगवणार आहे.