Saturday, October 31, 2015

मोठ्यांच्या कपाळी ‘छोटा’गेल्या दोन आठवड्यापासून देशात सहिष्णूता अकस्मात संपल्याचा साक्षात्कार अनेकांना होऊ लागला आणि मग विविध साहित्यिकांनी आपापले सन्मान परत देण्याचा सपाटा लावला होता. अर्थातच माध्यमातून रोजच्या रोज पुरस्कार वापसीच्या बातम्या झळकत होत्या. सामान्य माणसाला भले त्यात रस नसेल. पण माध्यमांना व तथाकथित पुरोगामी पत्रकारांना त्यातच रस होता. म्हणून त्याच त्या बातम्यांचा रतीब नित्यनेमाने घातला जात होता. त्यावरच मग कंटाळवाणे संपादकीय लेखही खरडले जात होते. हा प्रकार इतका अभिरुचीहीन झाला होता, की त्यातून बाहेर पडण्याची संधी पत्रकारांनाही हवीच होती. पण त्यांनाही सुटका मिळत नव्हती. कारण हे नाटकच मुळी माध्यमांनी सुरू केलेले होते. त्यामुळेच रोज कुणी नवा पुरस्कृत साहित्यिक शोधून जुन्याच नाटकाचा नवा प्रयोग रंगवला जात होता. आपणच रंगवलेल्या नाटकाचा प्रयोग बंद करणेही शक्य नसल्याने नाईलाजाने तो चालवावा लागत होता. अशावेळी अकस्मात गुलजार यांच्यासारखा नावाजलेला कलावंत त्यांच्या मदतीला धावून आला आणि शिळ्या कढीला ऊत आणण्याची सज्जता रविवारी चालू होती. इतक्यात भूकंप झाला! म्हणजे भूकंप वायव्य आशियात झाला, पण त्याचा सर्वात मोठा हादरा आग्नेय आशियात बसला. त्याचे नाव छोटा राजन! कारण ज्या दिवशी सकाळी भूकंपाच्या बातम्या येऊ लागल्या, त्याच दुपारी इंडिनेशियात छोटा राजनला अटक झाल्याची बातमी येऊन ठेपली आणि वायव्य आशियातील भूकंपाचेही धक्के सौम्य होऊन गेले. मंगळवारी देशभरच्या सर्व माध्यमांची मुखपृष्ठे राजनने व्यापली आणि सोमवारी संध्याकाळी वाहिन्यांचा सगळा वेळ राजननेच खाल्ला. इतक्या दोन दणकेबाज बातम्या आल्यावर ‘पुरस्कृत’ बातम्यांना जागा कुठे शिल्लक उरणार ना? मग पंधरा दिवस रंगलेला पुरस्कार परतीचा नाट्यप्रयोग अकस्मात रद्दबातल झाला.

मागल्या रविवारी याच स्तंभात मी पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या दाऊदचा काटा काढण्याचा भारतीय हेरखात्याचा डाव असेल अशी शक्यता व्यक्त केली होती. तेव्हा दाऊदचा हाडवैरी छोटा राजनविषयी कुठे बातमी नव्हती. त्याचा आणि राजनच्या अटकेचा काही संबंध आहे काय? असूही शकतो! म्हणजे राजनविषयीची बातमी धक्कादायक आहे तितकीच अस्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार त्याला इंडिनेशियातील पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. राजन ऑस्ट्रेलिया सोडून दहा दिवसांपुर्वीच इंडिनेशियात आलेला असेल, तर त्याला विमानतळावर कसा पकडला? त्याने दहा दिवस विमानतळावर मुक्काम केला होता काय? त्याच दरम्यान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग इंडिनेशियात होते, असेही आता उघड झालेले आहे. म्हणूनच सगळा तपशील गोंधळात पाडणारा आहे. त्यामुळेच संगनमताने राजनला भारतात आणले जात आहे, असाही आरोप झाला आहे. त्यात तथ्य जरूर आहे. पण कोणाशी कोणा़चे कसले संगनमत, ह्याचा खुलासा त्या बातम्यांमध्ये सापडत नाही. आजवर छोटा राजनचा वापर भारतीय हेरखात्याने अनेकदा केल्याचे आता लपून राहिलेले नाही. म्हणूनच वाढत्या वयात त्याला सुरक्षा बहाल करण्यासाठी मायदेशी आणले गे,ले असाही आरोप आहे. तो चुकीचा म्हणता येणार नाही. पण या एका बातमीने देशातील असंहिष्णूतेचे वातावरण एकदम निवळले असावे, असे नक्की म्हणता येईल. कारण छोटा राजन पोलिसांच्या जाळ्यात आल्यापासून त्या असंहिष्णूतेविषयी माध्यमात अकस्मात मौन धारण करण्यात आले आहे. कोणीच संहिष्णूता वा पुरस्कार परतीचा विषय बोलेनासा झाला आहे. देशासमोर केवळ छोटा राजन हीच एक मोठी बाब होऊन राहिली आहे. राजनचे काय होणार आणि त्याला भारतात कधी आणणार, त्याचाच बोलबाला सुरू झाला आहे.

किती चमत्कारीक अनुभव आहे ना? देशातले भले भले साहित्यिक कलावंत संहिष्णूता गमावल्याने व अराजक येत असल्याने कमालीचे विचलीत झालेले होते. त्यापासून एक कुख्यात गुन्हेगाराने देशाची मुक्तता केलेली आहे. निदान माध्यमातल्या शहाण्यांना देशातल्या संहिष्णुतेपेक्षा राजनची कहाणी मोलाची वाटू लागली आहे. त्याच्यापुढे साहित्यिकांचे सन्मान वा भिती दुय्यम होऊन गेली आहे. अन्यथा राजनची किरकोळ बात्मी देवून प्रत्येक माध्यम वा पत्रकार तेच पुरस्कार परतीचे चराट चघळत बसला नसता काय? असंहिष्णूतेचा उभा केलेला आभास आणि खरी बातमी यातला फ़रक इथे आपल्याला कळू शकतो. जेव्हा गदारोळ माजवायला काहीच नसते, तेव्हा मग अशा कृत्रिम गोष्टींचा बागुलबुवा केला जात असतो. पण खरोखरच मोठी बातमी येते, तेव्हा अशा खोट्या बातम्याचा मुखवटा गळून पडत असतो. छोटा राजनच्या अटकेने नेमके तेच केले आहे. भारतीय माध्यमांच्या पुरस्कार परतीची हवाच काढून घेतली आहे. आता राजनचे वादळ शांत होईल तेव्हा नव्याने त्यात हवा भरावी लागेल. कारण दरम्यान लोक व वाचक पुरस्कार परतीचे नाटक विसरून गेलेले असतील. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की तेव्हा नव्याने पुरस्कार परतीचे नाटक रंगवावे लागेल. म्हणजे असे की आजवर ज्यांनी पुरस्कार परत केले, त्यांना आता परत करायला काही हाताशी नाही. म्हणजेच ज्यांनी अजून पुरस्कार सन्मान परत केलेले नाहीत, असे मान्यवर शोधून त्यांना आखाड्यात आणावे लागणार आहे. याचे कारण असे, की मुळात सहिष्णुता व या पुरस्कार परतीचा कुठलाही वास्तविक संबंध नाही. हा सगळा बनाबनाया राजकीय देखावा होता. त्यातली हवा संपली, की फ़ुगा नव्याने फ़ुगवणे भाग आहे ना? कुठल्याही आंदोलनाची हीच तर मोठी अडचाण असते. त्यात भरलेली हवा संपण्यापुर्वी त्यात यश संपादन करावे लागते.

आंदोलनकर्ते आणि सत्ता यांच्यातली लढाई मुळातच विषम असते. एकदा आंदोलनाच्या आखाड्यात उडी घेतली, की कुस्ती जिंकूनच थांबायचे असते. त्यात दम घ्यायला विश्रांती घेता येत नाही. कारण त्यातला आवेश संपला की निवेशही संपल्यात जमा असतो. मुंबईच्या गिरणी कामगारांचा संप किती आवेशात सुरू झाला होता? त्यातून वेळीच तडजो्ड निघाली असती तर मर्यादित यश तरी वाट्याला आले असते. पण नुसताच आवेश दाखवण्यात नेते रंगले आणि आजपर्यंत तो संप कोणी मागे घेतलेला नाही. गिरण्या राहिलेल्या नाहीत की गिरणी कामगारही शिल्लक उरलेला नाही. न्यायाची गोष्ट सोडून द्या, साध्या भरपाईचेही कुठले चिन्ह दृष्टीपथात नाही. याची कधीही कारणमिमांसा झालेली नाही. लढे व आंदोलनात टिकून रहाण्याची सामान्य माणसाची क्षमता तोकडी असते आणि त्याच मर्यादेत लढे आवरावे लागतात. मालक किंवा सत्ताधीशाची गोष्ट वेगळी असते. लढे जितके लांबतील, तितका त्यातला आवेश ओसरत जातो आणि मग कालचे लढवय्ये आजचे अगतिक होऊन जातात. आक्रमकता टिकवून संघर्ष चालवणे ही युद्धकला असते. समोरच्याला जेरीस आणण्यावर युद्ध जिंकता येत असते. पुरस्कार परतीचे नाटक वा असंहिष्णूतेचा दावा मुळातच फ़ारसा खरा नाही, म्हणून त्या निमीत्ताने दाखवलेला आवेश फ़ारकाळ टिकणारा नव्हता. त्याचे भान राखूनच खेळी खेळण्याची गरज होती. पहिली बाब म्हणजे ज्या संहिष्णूतेचा बोलबाला मागले दोन आठवडे झाला, त्याचा कुठलाही अनुभव सामान्य जनतेच्या वाट्याला आलेला नाही. उलट जेव्हा तीच सामान्य जनता अराजकाच्या भयाने रस्त्यावर आलेली होती, तेव्हा यापैकी कुणाही साहित्यिकाला त्याची झळही लागली नव्हती. निर्भयाकांड किंवा अण्णांच्या आंदोलनाच्या निमीत्ताने लक्षावधी लोक आपले सुरक्षित घर सोडून रस्त्यावर आले. पोलिस अंगावर घालून तेव्हाच्या सत्ताधीशांनी लोकांना पळवून लावले होते. यापैकी कोणी पुरस्कृत मान्यवर तेव्हा विचलीत झाला नाही. इतकी या लोकांची सामान्य जनता व वास्तवाशी नाळ तुटलेली आहे. त्याच्या तुलनेत आज खुप सुरक्षित परिस्थिती लोक अनुभवत आहेत. म्हणून पुरस्कार परतीविषयी सामान्य जनता पुर्णपणे अलिप्त आहे.

अलिकडे तथाकथित पुरोगामी लढे व आंदोलने ही जनतेची राहिलेली नाहीत, तर माध्यमातील लुटूपुटूची लढाई झालेली आहे. तिचा वास्तवातील जगाशी संबंधच उरलेला नाही. उदाहरणार्थ सुधींद्र कुलकर्णी यांनी ‘पिपल टू पिपल कनेक्ट’ अशा शब्दप्रयोग केला होता. त्यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याचा निषेध करणार्‍या जाणत्यांनीही नेमक्या त्याच शब्दाचा वापर केला. मग आता तेच लोक कशावर कल्लोळ माजवत आहेत? दोन देशातल्या सामान्य माणसात संपर्क हवा, असा आग्रह धरायचा आणि तेव्हाच एकाच देशातील विभिन्न समाज घटकात ‘पिपल टू पिपल कनेक्ट’ नाही म्हणून टाहो फ़ोडायचा? किती विचित्र दावे आहेत ना? ज्यांना देशातील भिन्न धर्मिय समाज घटकात परस्पर विश्वास उरलेला नाही म्हणून पुरस्कार परत करायची इच्छा होते, तेच परदेशातील जनतेशी इथल्या जनतेशी नाते असावे असाही आग्रह धरतात. आधी त्यासाठी निदान आपल्याच देशातील विविध घटकात संबंध गुण्यागोविंदाचे असायला नकोत का? ते नसतील तर भारत पाक यांच्या जनतेचे मनोमिलन कसे होणार? देशातील समाज घटकात सौहार्द नसेल, तर इतके दिवस ही थोर मंडळी काय करत होती? कुलकर्णी वा तत्सम लोकांना पाकिस्तानी जनतेच्या भावना कळतात आणि मायदेशातील जनतेच्या भावना उमजत नाहीत. असे लोक कोणाशी कसला कनेक्ट करू शकतील? कुठल्याही बाजूने वा घटनाक्रमाशी वास्तव ताडून बघितले, तर एकूण नुसता देखावा व आभास असल्याचे जाणवते. निव्वळ माध्यमातून उडवलेले बुडबुडे! पुरस्कार परती असो किंवा संहिष्णूतेच विषय असो, निव्वळ भंपकबाजी चालू होती. त्यात बातमीमूल्य नव्हते की तथ्य नव्हते. म्हणूनच लोकांच्या काळजाला त्यातून हात घातला गेला नाही की लोकांना अशा बातम्या भावल्या नाहीत. साहित्यिक त्यात एकाकी व अलिप्त पडत गेले. माध्यमाचाही मुखवटा फ़ाटला.

हाच तमाशा मागल्या सहा महिन्यापासून पुण्याच्या फ़िल्म इंस्टीट्युटच्या बाबतीत रंगवला गेला होता. पुढे त्यातली मजा संपली आणि आता माध्यमातूनही बातम्या येईनाशा झाल्या. पुरस्कार परतीच्या निमीत्ताने रंगलेल्या तमाश्यात कोणी फ़िल्म इंस्टीट्युटचा उल्लेखही केला नाही, यातच त्या नाटकाचा पोरखेळ लक्षात येऊ शकतो. आता छोटा राजनच्या अटकेच्या बातमीने पुरस्कार परतीचे नाटक ओस पडले आहे. पुढले निदान पंधरा दिवस तरी राजनला भारतात आणणे शक्य नाही. कारण त्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यातच तितका काळ जाणार आहे. पण म्हणून राजनचा विषय मागे पडू शकत नाही. कारण या प्रकरणातील गुंतागुंत इतकी चमत्कारिक आहे, की रोजच्या रोज त्यावर नवनवे खुलासे होत रहाणार आहेत. जितके खोदत जावे तितके नवे रहस्य उलगडणार आहे. सहाजिकच लोक त्याच बातम्यांवर लक्ष ठेवतील. त्या धक्कादायक बातम्यांतून पुरस्कार परती व साहित्यिकांच्या तथाकथित संहिष्णूतेचा विषय कुठल्या कुठे झाकला जाणार आहे. मग त्यातून पुन्हा त्याला फ़ोडणी देवून नव्याने सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करायचे, तर आणखी लढवय्ये मैदानात आणावे लागतील. ते आणायचे कुठून आणि त्यांनी तरी बळीचा बकरा व्हायला कशाला पुढे यायचे? ही समस्या अशा पुरोगामी साहित्यिकांना भेडसावणार आहे. खरे सांगायचे तर ज्यांना महान म्हणून पेश केले त्या मोठ्यांच्या कपाळी हा ‘छोटा’ असा येऊन बसला, की सगळ्या नाटकातील हवाच परस्पर निघून गेली आहे. मग या लोकांची दया येते. ज्या नरेंद्र मोदी या माणसाविषयी त्यांना इतका आकस आहे, त्याच्याशी लढाईला उतरण्यापुर्वी हे लोक किमान त्याचा अभ्यास का करत नाहीत, तेच लक्षात येत नाही. मोदी हा संयमाचा मुर्तिमंत पुतळा आहे. कालापव्यय हे त्याचे सर्वात मोठे हत्यार आहे. इथेही नेमके तेच झाले आहे. नुसता वेळ जाऊ दिला आणि पुरस्कार परतीच्या नाटकातील हवा एका गुन्हेगारी बातमीने काढून घेतली. ही आपल्या देशातील माध्यमे, बुद्धीमंत व साहित्यिकांची शोकांतिकाच नाही काय?


पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर
रविवार  १/११/२०१५

Friday, October 30, 2015

पुरोगामी महाराष्ट्राचा ‘तामिळनाडू’ होईल?

भवितव्य: शिवसेना-भाजपा युती़चे  (ऊत्तरार्ध)लोकसभा हे सेनेसाठी दुय्यम रणमैदान आहे. समजा उद्या लोकसभेसाठी सेनेशी युती होऊ शकली नाही, तर भाजपाला आजच्या इतक्या जागा टिकवणे शक्य आहे काय? मागल्या खेपेस युतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या. त्यात सेनेच्या १८ तर भाजपाच्या २३ आहेत. सर्व जागा लढवून सेनेला दोनतीनच जागा राखता आल्या, तरी काही बिघडणार नाही. पण युती तुटल्याने भाजपाला २३ पैकी दहा जागाही राखता आल्या नाहीत, तर लोकसभेतील गणित विस्कटू शकते. आजवरची २५ वर्षातली युतीतली ती महत्वाची तडजोड होती. लोकसभेत भाजपा मोठा भाऊ आणि विधानसभेत सेना मोठा भाऊ! मागल्या वर्षी ती युती विस्कटली आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागाच महत्वाच्या नसून लोकसभेच्या जागाही वादग्रस्त झाल्या आहेत. तेव्हा भाजपाला स्वबळावर सर्व जागा लढवाव्या लागणार आहेत. नुसत्या जागा कोणीही लढवू शकतो. भाजपाला जागा जिंकण्याची सक्ती आहे. तशी सेनेला लोकसभेच्या जागा जिंकण्याची शक्ती नाही. म्हणून युती हे भाजपासाठी अवघड जागीचे दुखणे आहे व होते. म्हणूनच पालिका निवडणूका जशा सेनेसाठी महत्वाच्या, तशा लोकसभा भाजपासाठी महत्वाची निवडणूक असेल. तिथे अपशकुनाचे डावपेच उद्धव ठाकरे नक्कीच खेळणार. युतीचे तारू लोकसभेच्या वेळी जागावाटपाच्या खडकावर फ़ुटणार यात शंका नाही. मध्यंतरी औरंगाबाद व नवी मुंबईच्या महापालिका निवडणुका झाल्या, त्यात युती होऊनही भाजपाला त्याचा फ़ारसा लाभ मिळू शकला नाही. त्याचेही कारण स्पष्ट आहे. शिवसैनिकांनी पुर्वीप्रमाणे युती म्हणून भाजपाचे काम केले नाही. यापुढेही तसे होण्याची शक्यता संपलेली आहे. कारण मागल्या विधानसभेत भाजपाने उद्धव यांच्यावर कुरघोडी करण्याच्या नादात सामान्य शिवसैनिकाला असे दुखावलेले आहे, की पुन्हा युती झाली तरी ती पुर्वीसारखी असणार नाही. याचा अर्थ शिवसैनिक पक्षशिस्त म्हणुन उघड भाजपा विरोधात बोलणार नाहीत. पण जमेल तिथे भाजपाला मते मिळू नयेत, अशी कृती नक्कीच करतील. थोडक्यात आता उच्च पातळीवर कितीही मनोमिलन झाले, तरी ते शिवसैनिकाच्या पातळीवर होऊ शकणार नाही.

भाजपाने सर्वात मोठे नुकसान तिथे करून घेतले आहे. त्यांनी हिंदूत्वाच्या बाजूने उभी रहाणारी एक फ़ळी दुष्मन करून टाकली आहे. आजवरच्या राजकारणात शिवसेना फ़ार मोठे यश मिळवू शकली नाही. पण तरीही निष्ठेने राबणारा कार्यकर्ता व भावविवश होऊन झुंजणारा तरूण, हे सेनेचे बळ राहिले आहे. त्याला दुखवण्याने दुरावण्याने भाजपाचे झालेले नुकसान कधीच भरून येणारे नाही. मात्र अशा स्थितीत एक वेगळी शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात उदभवू लागलेली आहे. कॉग्रेस वा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नव्याने उभारी घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. कॉग्रेसपाशी उभारी देवू शकणारे स्थानिक नेतृत्व नाही; तर राष्ट्रवादीचे बहुतांश नेते खटले चौकशी अशा जंजाळात फ़सलेले आहेत. त्यामुळे विरोधात जोमाने उभे रहाणे त्या दोन्ही पक्षांन शक्य नाही. तीच पोकळी सत्तेत सहभागी असूनही उद्धव ठाकरे भरून काढत आहेत. गुलाम अली वा कुलकर्णी प्रकरणात तर सेनेने भाजपाच्या पाकिस्तान विरोधाचाही बुरखा फ़ाडला. त्यातून त्यांनी अनेक युतीसमर्थक मतदाराला आपल्याकडे ओढले आहे. ही चाल भाजपाला ओळखता आली नाही, तर पुढल्या काळात सत्ताधारी भाजपा विरोधात शिवसेना, असा आखाडा तयार होत जाणार आहे. आजवर अशा बाबतीत कॉग्रेस विरोधात सेना-भाजपा अशी स्थिती होती. आता कॉग्रेस राष्ट्रवादीची भूमिका सरकार म्हणून भाजपाला पार पाडावी लागते आहे. सहाजिकच मुळच्या युतीची पाकविरोधी हिंदूत्ववादी भूमिका एकट्या शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे. त्याचे लाभ त्यांनाच मिळणार यात शंका नाही. पण या गडबडीत कॉग्रेस राष्ट्रवादी यांचे काय? त्यांची मू्ळ मध्यममार्गी भूमिका भाजपा पार पाडत असेल, तर त्यासाठीचा मतदारही भाजपाकडे जाणार ना? म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण पुरोगाम्यांच्या हातून पुर्णपणे निसटून जाण्याचाच धोका नाही काय? सत्ताधारी व विरोधक दोघेही हिंदूत्ववादी! एक जहाल हिंदुत्ववादी तर दुसरा मवाळ हिंदूत्ववादी!

यात नवे काहीच नाही. यापुर्वी असे अनेक राज्यात घडलेले आहे. तामिळनाडू त्याचे जळजळीत उदाहरण आहे. तिथे कॉग्रेसला १९६७ सालात हरवून सत्ताधारी झालेल्या द्रविड मुन्नेत्र कझागम पक्षात फ़ुट पडल्यावर त्याला कॉग्रेसने खतपाणी घालून फ़ुटीर गटाला साथ दिली होती. पण त्याचा परिणाम असा झाला, की तामिळी राजकारण मग दोन द्रविडी गटातच विभागले गेले आणि अन्य राजकीय विचारी पक्षांना तिथे स्थानच उरले नाही. आता तिथे त्यापैकी एका गटात सहभागी होणे किंवा नगण्य ठरणे, इतकेच पर्याय अन्य लोकांकडे राहिलेत. काहीशी अशीच अवस्था मागल्या दोन दशकात मुलायम मायावतींमुळे उत्तर प्रदेशात आली. महाराष्ट्र क्रमाक्रमाने त्याच दिशेने जातो आहे काय? मतदानापुर्वी मोडलेली युती सत्तेसाठी एकत्र बसलेली असली, तरी त्यातला एक पक्ष सरकार चालवतो आहे आणि दुसरा पक्ष विरोधकाची भूमिका पार पाडतो आहे. कालपर्यंत सत्तेत बसलेला राजकीय प्रवाह इतका नामशेष झाला आहे, की त्याला कसलेही स्थान उरलेले दिसत नाही. गुलाम अली वा कुलकर्णी इतकेच विषय नाहीत. पुरंदरे पुरस्कार प्रकरणात उघडे पडलेले विरोधी पक्ष आणि विधान मंडळात तोकडे पडलेले विरोधक बघता, आगामी काळात महाराष्ट्र दोन हिंदूत्ववादी पक्षात विभागला जाणार अशी चिन्हे आहेत. त्यामुळे युतीला भवितव्य उरलेले नाही. पुरोगामी म्हणवणार्‍या राजकीय पक्षांना व संघटनांना आजवरच्या बिगरकॉग्रेसी राजकारणात असलेले स्थान आधी हिंदुत्ववादी सेना-भाजपा यांनी क्रमाक्रमाने व्यापले. मग तेच सत्तेपर्यंत पोहोचल्यावर जी काही विरोधी पक्षाची जागा आहे, ती संभाळण्यासाठी कालचे सत्ताधारी तोकडे पडत आहेत. परिणामी युतीतल्या सुंदोपसुंदीने कॉग्रेस वा पुरोगामी म्हटला जाणारा अवकाशही शिवसेना व्यापत चालली आहे. मग महाराष्ट्रातल्या पुरोगामी राजकारणाचे भवितव्य काय?

आपण युतीचे भवितव्य बघताना एक विसरतो, की महाराष्ट्राचेच राजकीय समिकरण आता बदलू लागले आहे. त्यातून नवे संदर्भ पुढे येत आहेत आणि त्याकडे डोळेझाक करून भवितव्याकडे बघता येणार नाही. गुलाम अली, कुलकर्णी वा तत्सम अनेक भानगडींच्या बरोबरीने सरकारवर थेट टिका करणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या डावपेचांवर बारकाईने लक्ष ठेवले, तरच युतीचे भवितव्य जोखता येईल. पण युतीचे भवितव्य आता महाराष्ट्राच्या राजकीय समिकरणाचे भवितव्य असणार यात शंका नाही. त्यात कॉग्रेस वा पुरोगामी म्हटला जाणारा ध्रुव अस्तंगत होत चालला असून, दोन हिंदूत्ववादी राजकीय घटक अवघा राजकीय अवकाश व्यापत चालले आहेत. थोडक्यात शरद पवार यांनी युती मोडण्यासाठी मागल्या वर्षी खेळलेल्या डावपेचांनी पुरोगाम्यांचे राज्यातील उरलेसुरले अस्तित्वही धोक्यात आणले आहे. त्यातून पुरोगामी राजकारण टिकायचे असेल, तर पुन्हा युतीने एकदिलाने काम करून अन्य राजकारणाला जागा ठेवली पाहिजे. म्हणजेच युती पुन्हा सुदृढ होण्यावर राज्यातले पुरोगामी राजकारणाचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.   (संपूर्ण)

भवितव्य: शिवसेना-भाजपा युती़चेशिवसेना भाजपा युतीचे भवितव्य काय, हा प्रश्न राजकीय विश्लेषकांसह अनेक राजकारण्यांना सध्या खुप सतावत आहे. त्याचे कारणही स्वाभाविक आहे. भाजपाला स्वत:चे हुकमी बहूमत मिळवता आलेले नाही. राष्ट्रवादी वा कॉग्रेस यांची मदत घेऊन पर्यायी संयुक्त सरकार बनवणे भाजपाला शक्य नाही. त्यातून आकडे जोडले जातील, पण कायमची नाचक्की भाजपाच्या वाट्याला येईल. त्याची ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब दिलेली होती. आयुष्यात कधी जितक्या शिव्या खाल्ल्या नाहीत, तितक्या आवाजी बहुमतानंतर वाट्याला आल्या; असे फ़डणविस यांनी स्वत:च ट्वीटरवर कबुल केले. सहाजिकच सेनेशी युती करण्यापलिकडे पर्याय उरला नाही, म्हणून हे संयुक्त सरकार होऊ शकलेले आहे. पण त्यात कुठल्याही प्रकारचा एकजिनसीपणा नाही. एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. सहाजिकच त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून शरद पवार म्हणाले, ‘सरकार पाच टिकेल, पण चालेल असे वाटत नाही’. त्याचा अर्थ सत्तेतली युती टिकवली जाईल. पण कारभार म्हणून काही चांगले काम हे सरकार करू शकणार नाही. मग पाच वर्षांनी युतीचे भवितव्य काय असेल? हा प्रश्न सर्वांना पडला तर नवल नाही. ह्याचे उत्तर शोधायचे तर पाव शतक मागे जावे लागेल. युती झाली तिथपर्यंत मागे जावे लागेल आणि युतीची त्या २५ वर्षातली वाटचाल तपासावी लागेल.

खरे तर युतीची स्थापना केवळ योगायोगाने झाली. त्याला दोन कारणे होती. एक म्हणजे शरद पवार पुलोदला वार्‍यावर सोडून परत कॉग्रेसवासी झाले आणि मुंबईच्या पालिकेत स्वबळावर प्रथमच सत्तेवर आलेल्या शिवसेनेला महाराष्ट्र मोकळा मिळाला. पवारांनी दुबळे केलेले बिगरकॉग्रेस पक्ष ती पोकळी भरून काढू शकले नाहीत आणि तिथे नव्या दमाचे दुय्यम सेना नेते भगवा झेंडा घेऊन पोहोचले. त्याचा परिणाम दिसेपर्यंत कुठल्याच प्रस्थापित पक्षाला सेनेचा झंजावात येतोय, याचा आंदाजही लागला नव्हता. म्हणून सेनेच्या हिंदूत्वाला भाजपाही नाकारत होता. पण पार्ला पोटनिवडणूक व औरंगाबादची महापालिका अशा दोन जागी मतदानाचे चित्र समोर आले, तेव्हा प्रमोद महाजन यांना पहिली जाग आली. कॉग्रेसलाही त्याची चाहुल लागली. म्हणून शंकरराव चव्हाणांना बाजूला करून राजीवनी शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्राची सुत्रे सोपवली होती. तर महाजन यांनी घाईगर्दी करून सेनेशी राज्यव्यापी युती करून टाकली. त्यामागचा डाव सेनेलाही उमजला नाही. कारण सेनेचे एकूण नेतृत्व मुंबई केंद्रित असल्याने, त्यांना ग्रामिण मतांचा अंदाज आला नव्हता, की तिथले आपले प्रभावक्षेत्र लक्षात आले नव्हते. पण १९८९ ची लोकसभा निवडणूक झाली आणि सेनेला थोडा अंदाज आला. मग पवारांनी सोडलेल्या पोकळीत भाजपाने सेनेला सोबत घेऊन आपलेही बस्तान बसवून घेतले. तरी मोठा भाऊ म्हणून मोठा हिस्सेदार सेनाच राहिली. पण दिल्लीच्या राजकारणार सेनेला रस नसल्याने लोकसभेच्या अधिक जागा भाजपाला, असे वाटप होत राहिले. कितीही झाले तरी युतीची मदार बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकप्रियतेवर आणि प्रचारावर होती. राष्ट्रीय पक्ष असूनही राज्यातल्या प्रादेशिक पक्षाचा दुय्यम म्हणून रहाण्यात पहिल्यापासून भाजपात कुरबुरी होत्या व त्याचे प्रतिबिंब प्रत्येक जागी दिसत होते. पण अंतिम शब्द मुंडे-महाजन अधिक बाळासाहेबांचा असल्याने कधी मतभेद विकोपाला गेले नाहीत. आज त्यापैकी एकहीजण हयात नाही. त्यामुळे युतीमध्ये कायमचा बेबनाव आहे.

यावेळी लोकसभेतील यश नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर मिळवलेले असल्याने भाजपाला सेनेची फ़िकीर वाटेनाशी झाली. त्यातून मग बेबनाव सुरू झाला. सेनेशिवाय आपण बहुमताचा पल्ला गाठू असे भाजपाला वाटत होते. कारण कमी पडेल तिथे शरद पवार मदतीला उभे होते. पुन्हा सत्ता मिळणार नसल्याचे पवारांना जाणवले होते आणि सत्ता गमावताना त्यांना दोन डाव खेळायचे होते. एका बाजूला डोईजड झालेल्या अजितदादांना लगाम लावायचा होता, तर त्याचवेळी शिवसेनेसारखा प्रतिस्पर्धी पक्ष खच्ची झाला, तरी पवारांना हवाच होता. त्यासाठी त्यांनी आपली निष्ठावान सेना भाजपाकडे धाडून युती मोडून घेतली आणि भाजपाला खात्री पटवण्यासाठी राज्यात असलेली कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही मोडून टाकली. त्या चौरंगी लढतीमध्ये भाजपाला सहज बहूमत मिळेल असे गणित होते. बाळासाहेबांशिवायचा नवखा उद्धव तोकडा पडणार, ही खात्री सर्वांनाच होती. त्यातून मग युतीमधले विरोध टोकाला गेले. ते आजही संपलेले नाहीत आणि नजिकच्या काळात संपण्याची शक्यता नाही. भाजपाने भले उद्धव विरोधातील डावपेच खेळले असतील, पण प्रत्यक्षात त्यांनी शिवसैनिकाला दुखावला आणि कधी नव्हे इतका शिवसैनिक नव्या नेतृत्वाशी एकनिष्ठ होऊन गेला. त्याचेच प्रतिबिंब मग मतदानात पडले. लोकसभेतील आपला मताचा हिस्सा सेनेने भाजपाच्या विरोधात जाऊनही टिकवला आणि भाजपाला पवारनिष्ठांना पक्षात आणूनही बहुमताचा पल्ला गाठता आला नाही. त्याहीपेक्षा धक्कादाअक बाब म्हणजे, भाजपाला लोकसभेतील आपल्या मतांचा हिस्सा लक्षणिय स्वरूपात वाढवताही आला नाही. आमदारांची संख्या मोठी दिसत असली, तरी मोदी पणाला लावूनही शत प्रतिशतचे स्वप्न भाजपाला पुर्ण करता आले नाही. त्यामुळे एकट्याच्या बळावर सरकार बनवणे किंवा चालविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यात पुन्हा सेनेला अपमानित करण्याच्या डावपेचांनी सरकार चालवणे अवघड होऊन बसले आहे.

एक वर्ष हे सरकार स्थापन होऊन झाले असले, तरी त्याला बस्तान बसवता आलेले नाही. दुसरीकडे युती कायमस्वरूपी विस्कटली आहे आणि पुढल्या काळात लोकसभा असो किंवा विधानसभा असो, पुन्हा एकत्रित निवडणूका लढवण्याची शक्यता संपुष्टात आलेली आहे. आगामी दहा महापालिका निवडणूकीच्या निमीत्ताने युतीची कसोटी लागणार आहे. त्यात मुंबई महापालिकेत सेनेला भागिदार नको आहे, तर भाजपाला तिथेही सेनेला मागे टाकायची खुमखुमी आहे. म्हणजेच तिथून युतीतले खरे मतभेद समोर येऊ लागतील. संख्येने बघितले तर भाजपा आज राज्यातला सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. म्हणूनच त्याला शिवसेनेची दखल घेण्य़ाचे कारण नाही. पंण खरेच तितका मोठा व बलवान पक्ष असेल, तरच दादागिरी शक्य असते. नुसत्या छोट्या नगण्य खात्यांच्या बदल्यात सेनेला युतीत आणण्याने भाजपा शिरजोर ठरत नाही. त्याने आत्मविश्वास दाखवण्याची गरज आहे. तिथे अभाव दिसतो. सुधीद्र कुलकर्णी वा गुलाम अली प्रकरणात सेनेने जो धिंगाणा घातला, तो सरकारची नाचक्की करणारा होता. त्यावर भाजपाचॊ प्रतिक्रीयाही तितकीच तीव्र होती. पण आत्मविश्वास असता, तर सेनेच्या मंत्र्यांना हाकलून लावण्याचे धाडस भाजपाने दाखवायला हवे होते. पण ते शक्य झाले नाही. कारण मग बहुमताचे गणित विस्कटले असते आणि पवारांच्या हातचे खेळणे होण्याला पर्याय राहिला नसता. म्हणूनच शिव्याशाप देवून पुन्हा भाजपालाच सेनेशी जुळवून घ्यावे लागले आहे. नुसते जुळवून नव्हेतर युती भक्कम असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांना जातीनिशी द्यावी लागली आहे. आत्मविश्वास कमी असल्याचे ते लक्षण आहे. नुसत्या सेनेच्या कुरापती काढायच्या आणि अंगावर आली मग माघार घ्यायची, हे राजकारण भाजपाला दुरगामी ्राजकारणात अपायकारक ठरणार आहे. युती करून किरकोळ मंत्रीपदावर सेनेची बोळवण केली म्हणजे सेनेला नमवले अशी भाजपाची समजूत आहे. पण त्यामुळे काय झाले आहे?

कुठल्याही क्षणी सत्तेतून बाहेर पडायला सेना बिचकणार नाही किंवा आपली हाकालपट्टी व्हावी असेच डाव खेळत रहाणार. नगण्य मंत्रीपदे गमावण्याच्या बदल्यात भाजपासमोर बहुमताचा राजकीय पेच उभा करण्यात मोठा राजकीय हेतू साध्य होत असतो. कारण मग नाक मुठीत धरून राष्ट्रवादीचा पाठींबा घेणे वा मध्यावधी निवडणूकीला सामोरे जाणे, इतकेच पर्याय भाजपापुढे शिल्लक उरतात. त्यात आज असलेल्या जागा टिकवण्याची खात्री असती, तरी भाजपाने सेनेला डिवचणे योग्य ठरले असते. पण तितकाही आत्मविश्वास नसेल तर सेनेचे हितसंबंध सरकार चालण्यात निर्माण करून सरकारचा पाया भक्कम करण्याला शहाणपणा म्हणता आला असता. त्यातूनच मग ही चमत्कारीक अवस्था युतीमध्ये आलेली आहे. सरकार भाजपाचे म्हणजे ते चालवण्याची जबाबदारी त्याच पक्षाची आहे. त्यात सहभागी असूनही सेनेला अजिबात फ़िकीर नाही. उलट आज सत्तेत असलेला विरोधी पक्ष अशीच सेनेची खेळी चालू आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे मोठ्या धुर्तपणे कधीही होणार्‍या विधानसभा निवडणूकीच्या तयारीला आतापासून लागले आहेत. मागल्या मतदानात त्यांनी जिथे पहिल्या तीन क्रमांकाची मते मिळवली अशा २०० जागा आहेत. तिथेच आपल्या सभा व निदर्शने उद्धव करताना दिसतात. याचा अर्थ त्या जागी संपुर्ण शक्ती पणाला लावून लढायची तयारी त्यांनी आतापासून चालविली आहे. मागच्या वेळी युती जागांच्या संख्येमुळे तुटली होती आणि तेव्हा तर स्वबळावर लढायचा अनुभवही सेनेच्या गाठीशी नव्हता. यावेळी तशी स्थिती नाही. शिवाय अपेक्षे इतक्या जागा भाजपा सोडू शकणार नाही, हे गृहीत धरून सेना सर्व जागा लढवण्याच्या तयारीला आधीपासुन लागली आहे. भाजपालाही कमी जागा लढवणे शक्य नाही. म्हणजेच निवडणुकीच्या बाबतीत बघितले तर सेना भाजपा युती कायमची संपुष्टात आलेली आहे. अर्थात सवाल विधानसभेपुरता नाही. भाजपासाठी लोकसभेचे समिकरण महत्वाचे आहे. (अपुर्ण)

Thursday, October 29, 2015

पानसरे, कलबुर्गी आणि छोटा राजनतिकडे इंडोनेशियात छोटा राजनला पकडण्यात यश आलेले आहे आणि इथे त्याला आणल्यावर कोणकोणत्या रहस्यांचा पडदा उठेल, याची चर्चा रंगली आहे. पण त्यातला एक महत्वाचा दुवा या रंगार्‍यांच्या नजरेत आलेला दिसत नाही. बरोबर एक महिन्यापुर्वी एका इंग्रजी दैनिकाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये राजन टोळीचा हात असल्याची बातमी दिली होती. पण त्याची आठवण कोणाला नाही. राजनला अशी कोणी सुपारी दिली असेल, तरच त्याने पानसरेंच्या हत्येचा उद्योग आपल्या हस्तकांकरवी करून घेतला असेल. त्याविषयी माहिती देताना संबंधित तपास अधिकार्‍यांनी कोठडीत असलेल्या समीर गायकवाड याचा हत्येशी संबंधही नसू शकतो, असे म्हटलेले होते. कारण त्याच्याशी सतत संपर्कात असलेला एक शंकास्पद माणूस राजन टोळीचा होता आ्णि यापुर्वीही अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे बातमीत म्हटलेले होते. तसे असेल तर पानसरे हत्येवरही राजन प्रकाश टाकू शकेल. पण दरम्यान आणखी एक महत्वाची बातमी बुधवारी उजेडात आली आहे. कलबुर्गी हत्येतल्या संशयिताचे जे रेखाचित्र तयार करण्यात आले, त्याच्याशी चेहरा जुळणार्‍या एका व्यक्तीचा मृतदेह कर्नाटकात हाती लागला आहे. अजून तरी त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. म्हणूनच तो सामान्य नागरिक आहे की कुख्यात कोणी गुन्हेगार आहे, त्याचा खुलासा होऊ शकलेला नाही. केवळ चेहरा जुळतो म्हणून त्याला खुनी ठरवता येणार नाही. पण जंगलात मृतदेह सापडावा आणि त्याचा चेहरा इतका जुळतामिळता असावा, ही बाब धक्कादायक नक्कीच आहे. शिवाय राजन पकडला गेल्यावरच असा मृतदेह सापडावा, ही बाबही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. खरेच मृत इसम कलबुर्गी यांचा मारेकरी असेल आणि छोटा राजन टोळीशी संबंधित असेल, तर हे मोठे भयंकर कारस्थान असू शकते.

कारण राजनच्या टोळीचा संशय पानसरे हत्याकांडात घेतला गेला होता आणि मृतदेहाचा चेहरा कलबुर्गी मारेकर्‍याशी जुळणारा आहे. त्यात तथ्य निघाले, तर दोन्ही हत्या एकाच टोळीने केल्याचा निष्कर्ष निघू शकतो आणि त्यावर राजनच प्रकाश टाकू शकेल. पण अशा दोन निरागस माणसांची हत्या टोळीने कशाला करावी? तर अशा टोळ्या खुन-मारहाण खंडण्यांचे उद्योग करीत असतात. त्यांच्यापाशी व्यावसायिक मारेकरी कायम सज्ज असतात. खुन पाडण्याच्या सुपार्‍या म्हणजे कंत्राटच हे लोक घेत असतात. त्याची लाखो रुपयात किंमत मोजणारा असेल, तर हे मारेकरी कोणाचीही हत्या करू शकतात. सवाल इतकाच आहे, की दाभोळकर, पानसरे वा कलबुर्गी यांच्या हत्या करण्यासाठी अशा मारेकर्‍यांना कोणी लाखो रुपये कशाला मोजले असतील? तिन्ही हत्येमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे तिघेही राजकारणात कुणालाही अडचण बनलेले नव्हते वा त्यांच्या हत्येने राजकीय पारडे खालीवर होण्याची अजिबात शक्यता नव्हती. शिवाय कुठल्याही आर्थिक उलथापालथीमध्येही त्यांचा सहभाग नाही. मग त्यांना मारण्यासाठी कोणी लक्षावधी रुपये कशाला मोजावेत? हत्येची पद्धत बघितली तरी त्यात कोणा संघटनेचा हौशी मारेकरी इतका सफ़ाईदार गुन्हा करू शकणार नाही. ते व्यावसायिकाचेच काम आहे. नेमकी वेळ, जागा व काम उरकून निसटण्याची तयारी बघता, असे खुन कोणी हौशी मारेकरी करू शकणार नाही. म्हणजे टोळीकडून हत्या करून घेतल्या गेल्या आहेत. मग मुख्य सवाल तिथेच येतो, की यांना मारण्यासाठी इतका पैसा कोणी कशासाठी मोजला वा खर्चला असेल? त्यामध्ये राजन टोळी गुंतली असेल, तर त्यावर प्रकाश पडू शकतो. म्हणूनच कर्नाटकच्या जंगलात सापडलेला मृतदेह आणि दोनच दिवस आधी पकडला गेलेला राजन यामध्ये काहीतरी संबंध असण्याची दाट शक्यता आहे.

कारस्थानामध्ये काही गोष्टी ठरवून घडवून आणल्या जात असतात. जशी सीआयए वा केजीबी या हेरसंस्था पुर्वीच्या काळात अनेक हत्याकांडे घडवून आणत असत आणि त्यातून स्थानिक राजकारणात उलथापालथ घडत असे. अशा हत्यांमधून जनमानस प्रक्षुब्ध करायचे आणि त्यातून राजकीय उठावाला चालना द्यायची, यासारख्या घटना जगात अनेकदा घडलेल्या आहेत. त्याचे तपशील नंतरच्या काळात बाहेर आलेले आहेत. चार वर्षापुर्वी ट्युनिशियामध्ये ‘अरब उठाव’ नावाचे नाटक रंगलेले होते. त्यातून मग एकामागून एक अरब राष्ट्रांमध्ये राजकीय सत्ता उलथून पाडल्या गेल्या. लाखो लोकांना निर्वासित म्हणून घरदार सोडून पळायची वेळ आली. अजूनही ती आग धगधगते आहे. त्या अरब उठावामागे फ़ोर्ड फ़ौडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पैशावर काम करणार्‍यांचा पुढाकार होता, हे लपून राहिलेले नाही. आता तर त्यांनाच नोबेल परितोषिकही देण्यात आलेले आहे. अशा घटना एका ठराविक पटकथेनुसार घडत असतात. त्यात एका बाजूला कायदा सुव्यवस्थेची समस्या उभी केली जाते, तर दुसरीकडे शासन व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याचे नाटक रंगवले जाते. त्यासाठी मग अशा हत्या वगैरेचे राजकीय भांडवल केले जाते. त्यामध्ये माध्यमांपासून स्वयंसेवी संस्थांना आधी रान उठवायचे काम पार पाडावे लागते. मग त्यात समाजातील मान्यवरांचा लोंढा आणला जातो. इजिप्तच्या तहरीर चौकातले आंदोलन अजून जुने झालेले नाही. अशा राजकारणात अधिकारी व राजदूतही बळी दिले जातात, त्याचे पितळ सध्या अमेरिकन राजकारणात चव्हाट्यावर येऊ घातले आहे. म्हणूनच दाभोळकर ते कलबुर्गी या तीन हत्येमागचे रहस्य उलगडण्याची गरज आहे. त्याचीच बोंब ठोकून ज्या पद्धतीने एका विशिष्ठ विचारांचे, विविध क्षेत्रातील लोक मैदानात उतरताना दिसतात, तेव्हा या हत्यांमागे काही राजकीय हेतू असल्याची शंका घेणे भाग पडते.

कुठल्याही खुनी प्रकरणात दोन मुद्दे अगत्याचे व मुख्य असतात. एक हत्येचा हेतू व त्याचे लाभार्थी! या हत्याकांडांमध्ये कोण लाभार्थी आहेत, ते आता लपून राहिलेले नाही. ज्यांनी त्य हत्येतील मारेकरी शोधण्यावर भर देण्यापेक्षा पहिल्या दिवसापासून त्याचे राजकीय लाभ उठवण्याचा आटापिटा चालविला आहे, त्यांना लाभार्थी नाही तर काय म्हणायचे? दाभोळकरांच्या हत्येला दोन वर्षे झालीत, तर पानसरेंच्या हत्येला नऊ महिने झालेत. त्यात आधी एका संस्थेला आरोपी म्हणून रंगवण्यात आले व आता एकूणच सगळे खापर देशातील नव्या सत्ताधीशांच्या माथी फ़ोडून एक आंदोलन उभे करण्याचा खेळ सुरू झाला आहे. कदाचित त्याचेच धागेदोरे उघड करण्यासाठी छोटा राजनला उचलला आहे काय? महिनाभर आधी त्याचे नाव पानसरे हत्येमध्ये आलेले होते. त्यानेच या हत्याकांडांची सुपारी घेतली असेल तर हत्येची किंमत मोजणार्‍यांचा मुखवटा राजनच फ़ाडू शकेल. जे लोक राजिनामे फ़ेकतात वा पुरस्कार परत करतात, त्यांनाही आपण कोणाच्या हातची कळसुत्री बाहुली झालोय, त्याचा थांगपत्ता नसतो. ते आपापल्या राजकीय भूमिकेसाठी उतावळेपणाने त्यात सहभागी होतात. पण खरा सुत्रधार उजळमाथ्याने जगात वावरत असतो. राजनच्या साक्षीतून अशा सुत्रधाराचा मुखवटा फ़ाटण्याची शक्यता असते. मुंबई हल्ल्यातील डेव्हीड कोलमन हेडली सहभाग लपून राहिला नाही. पण जेव्हा त्याची जबानी घ्यायची वेळ आली, तेव्हा अमेरिकेने त्यासाठीची परवानगी भारताला नाकारली होती. इथेही या हत्याकांडाचे भांडवल करणार्‍या पडद्याआडच्या सुत्रधारांचे मुखवटे फ़ाटू शकतात. राजन बोलला तर? कारण या हत्या आणि देशभर चाललेले पुरस्कार परतीचे नाटक यांचा नक्कीच कारस्थानी संबंध आहे. काही घटना तर पद्धतशीर घडवून आणल्यासारख्या दिसतात. राजन त्यातला एक सांधा असू शकतो.

http://articles.economictimes.indiatimes.com/2015-09-28/news/66958047_1_sanatan-sanstha-govind-pansare-narendra-dabholkar

Wednesday, October 28, 2015

गॅलिलीओ विज्ञाननिष्ठ नव्हता हे नशीब!तुमच्या माझ्यासारख्यांच्या जगाचे एक नशीब असे की गॅलिलीओ याच्यासारखे बहुतांश वैज्ञानिक व शास्त्रज्ञ संशोधक हे कधीच विज्ञाननिष्ठ नव्हते, तर अंधश्रद्ध असावेत. अन्यथा त्यांनी आपले संशोधन कार्य सोडून तेव्हाच्या जगाला व त्यातल्या धर्ममार्तंडांना पुरोगामी बनवण्याचा ध्यास घेतला असता आणि पुढले बहुमोलाचे संशोधन होऊच शकले नसते. कारण तेव्हा तर आजच्यापेक्षा धर्मश्रद्धा कडव्या व पक्क्या होत्या. कुणाची धर्माच्या विरोधात बोलायची बिशाद नव्हती. कारण धर्म आणि सत्ता एकत्र नांदत होते. पर्यायाने धर्माचे तत्वज्ञान हीच विचारसरणी असायची आणि धर्माचे प्रमाणपत्र मिळवून सत्ताधीश कुठलीही मनमानी करायला मोकळा होता. धर्मसत्तेच्या पाठीशी राजकीय सत्ता ठामपणे उभी असल्याने धर्माच्या तत्वज्ञानाला आव्हान म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण होते. अशा वेळी धर्माने जगाचे जे आकलन केले व सांगितलेले असायचे, तेच अंतिम सत्य होते. त्यानुसार पृथ्वी सपाट होती आणि चंद्र-सूर्य तिच्याभोवती फ़िरायचे. उगवायचे आणि मावळायचे. गॅलिलीओने दुर्बिणीतून ग्रहतार्‍यांचा अभ्यास सुरू केला आणि पृथ्वी हे विश्वाचे केंद्र नसून सूर्याभोवती फ़िरणारा पृथ्वी हा एक ग्रहमालेतील गोळा असल्याचे शोधून काढले. पण ते सत्य तिथला धर्मग्रंथ बालबलच्या कथेशी जुळत नव्हते. सहाजिकच गॅलिलीओने धर्मालाच आव्हान दिलेले होते. त्याला विनाविलंब धर्मसत्तेने पाचारण केले आणि जाब विचारला. त्यांची समजूत घालताना गॅलिलीओ वैफ़ल्यग्रस्त झाला आणि त्याने हार मान्य केली. आपण मुर्खपणा केल्याचे मान्य करून त्याने धर्ममार्तंडांची माफ़ी मागितली. पण त्याने आपले संशोधन थांबवले नाही आणि त्याच्या संशोधनात धर्माने कुठली आडकाठी आणली नाही. पर्यायाने जगाला नवनव्या सत्यांचा साक्षात्कार घडू शकला. आपले हे केवढे मोठे भाग्यच नाही काय?

समजा गॅलिलीओ संशोधन थांबवून त्या धर्ममार्तंडांशी वाद घालत बसला असता, तर त्यांचीच समजूत घालण्यात त्याचे उर्वरीत आयुष्य खर्ची पडले असते. त्याला पुढले संशोधन करण्यासाठी वेळच मिळाला नसता. शिवाय तशी वेळ येण्य़ाचीही शक्यता कमीच होती. धर्मातले पाखंड अमान्य करण्यासाठी दोषी ठरवून त्याला फ़ाशीच दिले गेले असते. तर पुढल्या संशोधनाचा प्रश्नच आला नसता. त्याची जाणिव झाल्यानेच गॅलिलीओने त्या धर्ममार्तंडांना समजावण्यापेक्षा त्यांचा मुर्खपणाच शहाणपणा असल्याचे मान्य करून टाकले. त्यामुळे ते मुर्ख खुश झाले व त्यांनी या संशोधकाला त्याचे काम करायला मोकळे सोडून दिले. यातला गॅलिलीओचा शहाणपणा समजून घेतला पाहिजे. ज्यांना समजूनच घ्यायचे नसते, त्यांना समजावण्यात अर्थ नसतो. आपले पुर्वज त्यालाच पालथ्या घड्यावर पाणी असे म्हणत आले. पोप वा त्याच्या धर्मसभेला वैज्ञानिक सत्य समजून घ्यायचे नव्हते, मग ते समजावण्यात काय अर्थ होता? तेव्हा त्यांच्या मुर्खपणाला मान्यता देऊन त्यांना समाधानी करण्याचा मार्ग गॅलिलीओने पत्करला. हे तेव्हा त्याच्यासाठी लाभाचे होते. पण आज आपल्यासाठी किती लाभदायक ठरले, ते आपण अनुभवत आहोत. मग त्या अर्थाने गॅलिलीओला अंधश्रद्धच म्हणायला नको काय? कारण त्याने आपलेच संशोधन नाकारून धर्ममार्तंडांना खुश करायला त्यांचे गैरसमज विज्ञान असल्याचे मान्य करून टाकले होते. कारण त्याला एक वैश्विक सत्य नेमके ठाऊक होते. जेव्हा विज्ञानाचे लाभ दिसू लागतात व अनुभवास येतात, तेव्हा सर्वसामान्य माणूस विज्ञानाचे अनुकरण करतोच. एकदा बहुसंख्य लोक विज्ञान स्विकारू लागले, मग त्यांच्यापुढे धर्माचा मस्तवालपणा टिकून रहात नाही. आपण लावत असलेल्या शोधांमुळे आपोआप धर्माची महती कमी होणार व जगाला विज्ञान स्विकारावे लागणार, याचा आत्मविश्वासच त्या संशोधकाला ‘पुरोगामी’ व्हायला उपयुक्त झाला.

आता आजच्या युगात येऊन आपण विज्ञाननिष्ठ लोकांच्या चळवळी व संघटना बघितल्या, तर ते कमालीचे विज्ञाननिष्ठ असतात आणि त्यांच्यापुढे गॅलिलीओही पक्का अंधश्रद्ध वाटावा. मध्यंतरी दाभोळकर यांच्या हत्येचा शोध घेणार्‍या पोलिस अधिकार्‍याने प्लॅन्चेटची मदत घेण्याचा प्रयत्न केल्यावरून काहुर माजले होते. इथपर्यंत ठिक होते. पण त्याच बाबतीत परदेशात काही पोलिस अधिकारी अशाप्रकारेही गुन्ह्यांचा शोध घेतात, असे विजय भटकर या शास्त्रज्ञाने बोलताच त्याच्यावर आपले महान विज्ञाननिष्ठ तुटून पडले. थोडक्यात काय विज्ञानाची पुस्तके वाचून कुठलाही शोध न लावलेले हे विज्ञाननिष्ठ खर्‍या वैज्ञानिकालाही मुर्ख ठरवू शकतात. जसे त्याकाळी पोपच्या धर्मसत्तेने गॅलिलीओला मुर्ख ठरवले होते. भटकर यांनीही बहुधा गॅलिलीओचे अनुकरण केले. कारण धर्ममार्तंड असोत की आधुनिक भारतीय विज्ञाननिष्ठ असोत, त्यांना कोणी सत्य समजावू शकत नाही. कारण ते सर्वज्ञ असतात. भटकर हे असे एकमेव शास्त्रज्ञ वा संशोधक नाहीत. इस्रो ही भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे. तिथून विविध उपग्रह व अग्निबाण अवकाशात सोडले जात असतात. मंगळयान वा चांद्रयानाच्या मोहिमा आखून राबवण्यापर्यत झेप त्यांनी घेतली आहे. पण त्यांनाही चक्क अंधश्रद्ध ठरवण्यापर्यंत आपल्या विज्ञाननिष्ठांनी मजल मारली आहे. त्यातले काहीजण मोहिमेच्या आधी वा नंतर भक्तीभावाने तिरूपतीच्या दर्शनाला गेल्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक कुवतीला नालायक ठरवण्याचा पराक्रम आपल्या अंधश्रद्धा निर्मूलकांनी केला आहे. सुदैवाने हे शास्त्रज्ञही पोपपेक्षा गॅलिलीओचे अनुयायी निघाले. त्यांनी अशा भारतीय विज्ञाननिष्ठांच्या नादी लागण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम चालू ठेवले आहे. कारण या पोपनिष्ठ विज्ञाननिष्ठांना काही समजावणे मानवी कुवतीच्या पलिकडली गोष्ट आहे आणि देवालाही ते अशक्य आहे. कारण त्यांना देवाचेही अस्तित्वही मान्य नाही.

पण अशा विज्ञाननिष्ठांना पोपचे अनुयायी म्हणावे की पोपचा दुष्मन सेन्ट मार्टिन ल्युथरचे अनुयायी म्हणावे, असाही प्रश्न पडतो. कारण त्यांचे वर्तन ल्युथरच्या शिकवणीनुसार असते. तो म्हणायचा, की ‘खुद्द स्वर्गातून देवदूत जरी खाली पृथ्वीतलावर अवतरले आणि आपल्या पवित्र धर्मग्रंथाच्या विरोधात काही सांगू लागले, तरी त्यावर विश्वास ठेवू नये. त्यांचे शब्द ऐकायला लागू नयेत म्हणून कान घट्ट बंद करून घ्यावेत. आपली निष्ठा इतकी भक्कम असली पाहिजे. आपल्याला समजले व सांगण्यात आले आहे, त्याच्यापेक्षा अधिक काही समजून घेण्याची गरज नाही.’ तमाम अंधश्रद्धा निर्मूलक व विज्ञाननिष्ठांचा पवित्रा त्यापेक्षा वेगळा दिसणार नाही. मग सांगणारा विजय भटकर यांच्यासारखा सुपर कॉम्प्युटर निर्माण करणारा अस्सल भारतीय शास्त्रज्ञ असो, किंवा अवकाश मोहिमा राबवणारे प्रतिभावान वैज्ञानिक असोत. त्यांनाही अंधश्रद्ध ठरवायला ही मंडळी मागेपुढे बघत नाहीत. याला म्हणतात निष्ठा! खरे विज्ञान व शास्त्रज्ञही त्यांच्यापुढे टिकू शकत नाहीत. अशी मंडळी विज्ञानाला वा विज्ञानाधिष्ठीत जीवनाला पुढे घेऊन जात नाहीत. मात्र नवनवे संभ्रम निर्माण करू शकतात. प्रश्न विचारण्यात त्यांना उत्साह असतो. पण प्रश्न सोडवण्याची अथवा उत्तरे शोधण्याची त्यांना गरज वाटत नाही. म्हणून तर गॅलिलीओही त्यांना घाबरून असतो. कारण असे लोक नैतिक अधीसत्ता गाजवून लोकांच्या मनात पापपुण्याच्या श्रद्धा रुजवतात आणि मग त्यावर धर्ममार्तंड बनून राज्य करत असतात. सामान्य माणसाच्या मनातला अपराधगंड ही त्यांची खरी शक्ती असते. चिकित्सेला ते पारखे असतात. जगातल्या बहुतांश शास्त्रज्ञांनी व वैज्ञानिकांनी नेहमीच अशा लोकांपासून दूर राहून आपले कार्य पुढे नेले आहे. म्हणून आज जगाला इतकी मोठी भरारी मारता आली आहे. म्हणून म्हटले गॅलिलीओ वैज्ञानिक असला तरी विज्ञाननिष्ठ नव्हता, हे अवघ्या मानव जातीचे नशीब!

राजन-दाऊद आणि खेळ सावल्यांचा!हेरखात्यामध्ये काम करणार्‍यासाठी दोन महत्वाचे निकष असतात. पहिला म्हणजे तिथे खरे बोलणे पाप असते आणि दुसरे म्हणजे भरपूर बोलून काहीही न सांगणे! इथे मग पत्रकारांची व बातमीदारांची तारांबळ उडत असते. सामान्य पत्रकारिता करताना कुठल्याही व्यक्ती वा राजकारण्याला त्याच्याच शब्दात पत्रकार खेळवत असतात. पण गुप्तचर वा हेरखात्याशी संबंधित माहिती असेल, तर त्यापासून बातम्या बनवणे मोठे गुंतागुंतीचे काम असते. कारण त्यातले जाणकार वा माहिती देणारे संबंधित कुठलीही परिपुर्ण वा नेमकी माहिती देत नाहीत. ते विविध गोष्टींकडे संकेत करणारा तपशील देत असतात. एखाद्या कोड्याचे तुकडे मुलासमोर फ़ेकावेत आणि त्याला कोडे सोडवायला सांगावे, तशी ही माहिती तुकड्यातली असते. प्रत्येक तुकडा योग्य जागी ठेवून तर्काने त्यातले रहस्य उलगडता यावे लागते. अन्यथा अर्थाचा अनर्थ होऊ शकत असतो. बहुधा अशा गुंतागुंतीच्या विषयात बातम्यांचा असाच बोजवारा उडालेला दिसतो. सोमवारी दुपारी छोटा राजनला इंडोनेशियात अटक झाल्याची बातमी आल्यावर नेमके तेच घडलेले दिसते आहे. यातल्या जाणत्या व खास पत्रकारांनी मग आपापल्या गोटातून माहिती काढण्याचा प्रयत्न करून बातम्या रंगवल्या आहेत. पण प्रत्येकाचे निष्कर्ष किती भिन्न टोकाचे आहेत, ते दिसते आहे. एक बातमी म्हणते भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या शिताफ़ीने राजनला जाळ्यात ओढले तर दुसरी बातमी म्हणते, आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजन एकप्रकारे सौदा करून मायदेशी परत येणार आहे. तिसरी बातमी म्हणते दाऊदचा तपशील मिळवण्यासाठी राजनशी सौदा करण्यात आलेला आहे. पण दोन दशकाहून अधिक काळ दाऊदशी वैर पत्करलेला राजन कोणती माहिती देवू शकणार आहे? ही बातम्यांची फ़सगत पत्रकारांच्या अडचणी स्पष्ट करणारी नाही काय?

एक गोष्ट आता लपून राहिलेली नाही, की दाऊद जसा पाकिस्तानी आय एस आयसाठी काम करतो; तसाच मग छोटा राजनचा वापर भारतीय गुप्तचर खात्याने वारंवार करून घेतला आहे. सहाजिकच गरजेनुसार राजनला संरक्षण देणे वा त्याला मदत करणे, ही जबाबदारी टाळता येणारी नाही. मुळात अशा गुंड गुन्हेगारांची सरकारच्या गुप्तहेर खात्याने मदत कशाला घ्यावी? तर त्यामागचे कारणही महत्वाचे असते. कुठल्याही देशाचे गुप्तहेर खाते हे कायदेशीर कामे करण्यासाठी नसतेच. कायदेशीर कामे करायला सरकारचे नागरी प्रशासन सज्ज असते. पण अनेक कामे अशी असतात, की ती आपल्याच कायद्याला धाब्यावर बसवून उरकावी लागतात. त्यात सरकार कुठली जबाबदारी घेतल्याचे दाखवू शकत नाही. म्हणूनच दाऊद पाकिस्तानात सुरक्षित असला, तरी तिथले सरकार त्याच्या पाकिस्तानातील वास्तव्याचा चक्क इन्कार करत असते. इथेही एक गोष्ट लक्षात येईल, की ज्याला इंडिनेशियात अटक झाली, त्या भारतीय नागरिकाचे नाव छोटा राजन वा निकाळजे नसून मोहनकुमार असे आहे. १९८७ पासून परदेशी पळालेल्या या माणसाला वेगळ्या नावाचा पासपोर्ट कसा मिळू शकला? त्याचे उत्तर जसे कोणी देत नाही, तसेच आता मोहनकुमारला छोटा राजन कशाला म्ह्णायचे, त्याचेही उत्तर मिळणार नाही. मागूही नये. कारण अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात आणि मागायचीही नसतात. सगळा संगनमताचा मामला असतो. पण नागरी व गुप्तचर खात्यातल्या बेबनावातून अनेक अशा गोपनीय गोष्टींचा बभ्रा होत असतो. मध्यंतरी गुजरातमध्ये झालेल्या एका चकमकीचे प्रकरण खुप गाजले होते. इशरत प्रकरणात गुप्तचर खात्याच्या एका अधिकार्‍याला गोवण्याचा राजकीय़ डाव खेळला गेला, तो त्याच विभागाच्या प्रमुखांनी टोकाची भूमिका घेऊन हाणून पाडला होता. कारण अशी अनेक कामे कायद्याच्या कसोटीवर तपासली जाऊ शकत नसतात.

कुठल्याही काळात व कुठल्याही देशात गुप्तचर विभागाचे प्रयोजन तेवढ्यासाठीच असते. त्यांना कायद्याच्या चौकटीपलिकडे जबाबदार्‍या पार पाडाव्या लागत असतात. मग असे विभाग गुन्हेगार वा गुंडांनाही हाताशी धरून काही कामे करून घेत असतात. देशातील असो वा परदेशातील असोत, अशा गुन्हेगार वा हस्तकांकरवी उचापती केल्या जात असतात. स्वातंत्र्य वा कायद्याचे राज्य नावाची बाष्कळ बडबड करणार्‍यांना सुखरूप जगता यावे, म्हणुन अनेकांना गुन्हेगारी कृत्ये करावी लागत असतात. आपल्या नावाने नाके मुरडणार्‍यांच्याच सुरक्षेसाठी असे बदनाम लोक धोके पत्करून कामे करत असतात. त्यांना कधी कुठली पदके सन्मान मिळत नाहीत वा त्यांच्या धाडसाचा कुठे गौरव होत नाही. कुठलाही गुप्तचर अधिकारी कधी अशा सन्मानाची अपेक्षाही करत नाही. पण आपल्या प्रामाणिकपणावर आणि देशभक्तीविषयी संशय घेतला जाऊ नये, इतकीच त्याची अपेक्षा असते. बदल्यात ते खतरनाक गुंड गुन्हेगारांशी संधान बांधून शत्रूशी सावल्यांचा खेळ खेळत असतात. कधी कधी जीवानिशी मारलेही जातात. काही महिन्यांपुर्वीच इराक व येमेनमध्ये यादवी युद्ध पेटले असताना, हजारो लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याची कामगिरी भारताने पार पाडली, हे काम नुसते कायद्याच्या सवलती घेऊन पार पाडणे शक्य नव्हते. तिथे कोणत्या मार्गाने या निरपराध नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, त्याचा तपशील कोणी विचारला नाही की कोणी सांगितलेला नाही. त्यात कोणाची मदत घेतली गेली वा कोणी मदत केली, त्याचीही कुठे वाच्यता झालेली नाही. अशी कामे हेरखात्याच्या हस्तकांकडून केली जातात. ते हस्तक गुंड गुन्हेगारही असू शकतात. कधी ते मित्र राष्ट्राचे घातपातीही असू शकतात वा शत्रू राष्ट्रातले देशद्रोही असू शकतात. प्रत्येक देश गुप्तचर कामात अशा लोकांचा सावधपणे वापर करत असतो.

छोटा राजन हे असेच एक आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघर्षातले मोक्याचे पात्र होते व आहे. त्याच्याकडून कुठल्या कारवाया करून घेण्यात आल्या वा कुठे त्याची सरकारला मदत झाली, त्याचा तपशील नजिकच्या काळात तरी बाहेर येण्य़ाची शक्यता नाही. कित्येक वर्षे उलटली व परिस्थिती बदलली तर तोही तपशील उद्या बाहेर येऊ शकेल. अशा गोष्टी व घडामोडी दशकानु दशके गुलदस्त्यात पडून रहातात. तसे नसते तर आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचे धक्कादायक तपशील आपल्याला कशाला चकीत करू शकले असते? देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आपले नजिकचे सहकारी असलेल्या नेताजींच्या बाबतीत स्वातंत्र्योत्तर काळात कसे वागले होते? नेताजींच्या निधनाची बातमी पसरवून सत्याचा अपलाप करण्यात आला व त्यांच्याच आप्तस्वकीयांवर दिर्घकाळ पाळत राखली गेली. हे सर्व गोपनीय असते. तसे गोपनीय राखले जाते. नेताजी युद्ध गुन्हेगार होते, म्हणून तसे केल्याची सारवासारव आज केली जाते. त्यातले सत्य किती जीवापाड झाकले गेले, ते आता वेगळे सांगायला नको. मुद्दा इतकाच की सुरक्षा व राजकारणाचा गुंता इतका विलक्षण चमत्कारिक असतो, की त्यात गुन्हेगारही देशभक्त ठरवले जाऊ शकतात आणि खरेखुरे देशभक्तही गुन्हेगार ठरवले जात असतात. छोटा राजनचा मामला अजून कोवळा आहे. त्याचे शेकडो पदर उलगडायला खुप वर्षे जावी लागणार आहेत. देशाला उपयुक्त असे त्याने काय केले, किंवा एकूणच देशाच्या गुप्तचर खात्याने त्याला पाठीशी घातले असेल, तर त्यामागची कारणमिमांसा व्हायला दिर्घकाळ जावा लागणार आहे. पण दरम्यान आताच त्याला अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया्त अटक न करता तिथून इंडोनेशियात आणून अटक करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तर पाकिस्तान भारतीय हेरखात्याने शरीफ़ व सईद हाफ़ीजच्या हत्येचे कारस्थान शिजवल्याचाही आरोप करतो आहे. त्याचा राजनच्या अटकेशी काही संबंध असेल का?

Tuesday, October 27, 2015

कॉग्रेसचा सूर्यास्त जवळ आलाय?साधारण दोन वर्षापुर्वी म्हणजे जेव्हा लोकसभा निवडणूकीचे वेध लागले होते तेव्हा कॉग्रेसचे एक अभ्यासू नेते जयराम रमेश यांनी, एक गंभीर विधान केले होते. ते इतके गंभीर होते, की कॉग्रेसवाल्यांनाही उमजले नाही. नरेंद्र मोदींची तेव्हा भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली होती आणि मोदी हे कॉग्रेससाठी स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे अपुर्व आव्हान आहेत, असे विधान रमेश यांनी केले होते. पुढल्या निकालांनी ते खरे ठरवले. कारण इतिहासात कॉग्रेस पक्षाचा सार्वत्रिक निवडणूकीत इतका दारूण पराभव कधीच झाला नव्हता. विरोधी पक्ष म्हणूनही मान्यता मिळू नये, अशी स्थिती कॉग्रेसची झाली. म्हणजेच वेळच्या वेळी रमेश यांच्या इशार्‍याची दखल घेतली गेली असती, तर कॉग्रेसचा पराभव थांबला नसता. पण निदान इतकी दाणादाण उडाली नसती. पण दुर्दैव असे, की कॉग्रेस पक्षात हल्ली डोके असणे हाच गुन्हा आहे आणि डोके स्वतंत्रपणे वापरणे तर अक्षम्य गुन्हा आहे. सहाजिकच तेव्हा रमेश यांच्यावर अनेक घराणेनिष्ठ तुटून पडले होते. पक्षप्रवक्ते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी तर रमेशना कॉग्रेस सोडून भाजपात जाण्याचा सल्ला दिलेला होता. अर्थात तसे काही झाले नाही आणि रमेश यांनी आपले डोके काढून पुन्हा कपाटात बंद करून ठेवले आणि उघड्या डोळ्यांनी पक्षाची नामुष्की होताना बघितली. पण रमेश यांच्या त्याच वेळच्या वक्तव्यात आणखी एक गंभीर विधान होते आणि त्याची आजपर्यंत कोणाला दखल घ्यावीशी वाटलेली नाही. किंबहूना आता पक्षात आपले स्थान टिकवण्यासाठी रमेशही ते विधान विसरून गेलेत. म्हणून त्यातले तथ्य संपत नाही. उलट जयरम रमेश यांच्या अभ्यासूवृत्तीची त्यातून साक्ष मिळते. काय म्हणाले होते दोन वर्षापुर्वी रमेश? आणि आजच त्याचे स्मरण करण्याचे कारण काय? तर तेच दुखणे रमेश यांनी पुन्हा बोलून दाखवले आहे.

तेव्हा रमेश म्हणाले होते. मोदींना येती लोकसभा निवडणूक जिंकलीच पाहिजे. अन्यथा मोदी राजकारणातून संपून जातील. पण राहुलचे तसे नाही. राहुलपाशी भरपूर वेळ व सवड आहे. राहुल गांधी नव्याने पक्षाची संघटना उभी करत आहेत. पण त्यांनी चालवलेली तयारी ही २०१९ सालसाठीची आहे आणि आम्ही कॉग्रेसजन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या चिंतेत आहोत. याचा अर्थ राहुलला आपण कुठली व कधीची निवडणूक लढवायची आहे, याचे भान उरलेले नाही. म्हणूनच कॉग्रेस पक्षाचा भयंकर पराभव होणार, याची रमेश तेव्हाच हमी देत होते. आज तेच रमेश नव्याने काय सांगत आहेत? राहुल गांधी आपली नवी टिम बनवत आहेत आणि येत्या मार्च महिन्यात कॉग्रेसचे नेतृत्व राहुल स्विकारतील. तेव्हा त्यांच्यासोबत सर्व नव्या पिढीचे नेते पक्षाची धुरा संभाळणार आहेत. साठी उलटलेल्या कॉग्रेस नेत्यांना मार्गदर्शक म्हणूनच पक्षात स्थान उरेल. मात्र असे सांगताना रमेश यांनी मोदींप्रमाणे ज्येष्ठांना अज्ञातवासात पाठवले जाणार नाही, असा टोमणाही मारला आहे. त्याची गरज होती काय? मुळातच ज्याप्रकारे राहुल मागल्या चारपाच वर्षात वागत आलेत, त्यातून अनेक जुन्याजाणत्यांना अपमानित होऊनच पक्षात रहावे लागले आहे. अज्ञातवासाचीच गोष्ट असेल, तर माजी मंत्री जयंती नटराजन यांना रमेश इतक्या लौकर कसे विसरले? राहुल यांनीच त्यांना तोंडी आदेश देवून पर्यावरणासाठी काही प्रकल्प रोखायला भाग पाडले. मात्र उद्योगपतींच्या मेळाव्यात जायची वेळ आली, तेव्हा तेच आदेश पाळल्याबद्दल जयंती यांचा तडकाफ़डकी राजिनामा घेण्यात आला होता. त्याविषयी खुलासा मागणारे प्रदिर्घ पत्र जयंती यांनी लिहीले होते आणि त्याला दिड वर्ष उत्तर मिळाले नाही, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात राहुल नेत्यांना कसे अपमानित करतात, त्याचा पाढाच वाचला होता. मग रमेश यांना मोदींवर मल्लीनाथी करण्याचे कारण काय?

असो, ती सक्ती आहे. मोदींना दोन अपशब्द वापरल्याशिवाय कॉग्रेस वा राहुलची मर्जी संपादन होत नाही, असे दिवस आहेत. पण ज्या निमीत्ताने रमेश पत्रकारांशी परवा बोलले, त्याचा वास्तव व्यवहारी अर्थ त्यांना तरी उमगला आहे काय? राहुल टिम बनवत आहेत याचा अर्थ काय? टिम म्हणजे तरी काय? एका मागून एक निवडणूका होऊन गेल्या आणि त्यात लागोपाठ पराभव पचवताना कॉग्रेस नामशेष व्हायची पाळी आलेली आहे. रमेशना याचेतरी भान आहे काय? दोन वर्षापुर्वी राहुल पक्षाची नवी संघटना उभारत होते आणि आता टिम बनवत आहेत, म्हणजे नेमके काय करत आहेत? राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची टिम ही निवडणूक नावाच्या सामन्यात खेळायला तयार होत असते. असे बहुतेक महत्वाचे सामने संपून गेलेत आणि शेवटचा सामना बिहारमध्ये येत्या दोनतीन आठवड्यात संपणार आहे. म्हणजे सामन्याचा मोसमही संपून गेला, तरी राहुल टिम बनवत आहेत? मग ती सामना कुठला खेळणार? कारण बिहार विधानसभेची निवडणूक संपली, मग पुढले दिड वर्ष देशात कुठलीही मोठी निवडणूक होणार नाही. त्यानंतर मात्र पुन्हा पाठोपाठ निवडणुकांचा सिलसिला सुरू होईल. तेव्हा टिम तयार होऊन काय उपयोग असेल? २००९ सालात राहुलनी पक्षात सरचिटणिस हाती पद घेतले. तेव्हापासून त्यांचे टिम बनवणे चालूच होते. मग २०१३ च्या आरंभी त्यांना बढती देवून पक्षाचे उपाध्यक्ष करण्यात आले. या सर्व काळात राहुल नेमके काय करत होते? संघटना बांधणे, टिम तयार करणे अशी विविध कारणे देण्यात आली. पण त्याचे विपरीत परिणाम मात्र पक्षाला भोगावे लागलेले आहेत. तरीही संघटना उभी राहिलेली नाही, की टिम बनलेली नाही. अन्य कुणा निव्वळ चमचेगिरी करणार्‍या कॉग्रेस नेत्याने अशी बाष्कळ विधाने केली असती, तर विचारात घेण्याचे कारण नव्हते. पण रमेश हे तितके नगण्य वा उथळ नेता नाहीत. म्हणुन चमत्कारीक वाटते.

खरे तर दोन महिन्यांपुर्वीच राहुल पक्षाध्यक्षपदाची धुरा संभाळणार अशी वदंता होती. पण तसे काहीही झाले नाही व पक्षांतर्गत निवडणूका पुढे ढकलून सोनियाच नेतृत्व पदी कायम राहिल्या. तेव्हा अशा बातम्या आल्या, की पक्षातल्या ज्येष्ठांनी व वयोवृद्धांनीच राहुलला अध्यक्ष होण्यापासून रोखलेले होते. म्हणजेच टिम बनवणे वगैरे फ़क्त थापा आहेत. पक्षात जुनेजाणते नेते आहेत त्यांना राहुल पक्ष पुरता बुडवणार असा आत्मविश्वास आता आलेला आहे. त्यामुळेच राहुल पक्षाध्यक्ष झाल्यास आपण पक्षात रहाणार नाही, असा इशाराच सोनियांना दिलेला असणार. म्हणून मुहूर्त ठरलेला असताना ऐनवेळी राहुल अध्यक्ष होऊ शकलेले नाहीत. मात्र त्याचे खरे कारण जाहिरपणे सांगता येत नाही, म्हणून टिम बनवणे असल्या कंड्या पिकवल्या जातात. राहुलचाच हटट करून जाणत्यांनी पक्षाबाहेर जाण्याचा धोका सोनियाही पत्करू शकत नाहीत, हे त्यातले वास्तव आहे. म्हणजेच आईला पुत्राने पक्षप्रमुख व्हावे अशी तीव्र इच्छा असली, तरी तो आपल्या कर्तृत्वावर कॉग्रेस चालवू शकेल, अशी खात्री वाटेनाशी झालेली आहे. म्हणूनच सोनियांनी ज्येष्ठांपुढे मन तुकवून राहुलच्या नावाची घोषणा टाळलेली असावी. रमेश यांच्यासारख्यांना तर २०१९ सालच्या निवडणूकीत तरी राहुल पक्षाला चांगले यश मिळवून देतील किंवा नाही, याची खात्री उरलेली नसावी. त्याचाच हा परिणाम आहे. म्हणून मग तोंडदेखले काहीतरी बोलावे म्हणून रमेश यांनी टिमची भाषा केलेली आहे. वास्तविक कॉग्रेस सध्या नेतृत्वाचा पेचप्रसंगातून जाते आहे. नवे नेतृत्व पुढे येत नाही. ज्याच्यावर आशा केंद्रित केल्या आहेत, त्यालाच त्याचे गांभिर्य नाही, ही समस्या आहे. बिहारसारख्या प्रमुख राज्यात विधानसभेचे मतदान सुरू झाले आहे आणि कॉग्रेसचे सुत्रधार राहुल तिथून बेपत्ता असतील, तर टिम कशासाठी बनवली जातेय? खुज्या माणसाच्या सावल्या लांबू लागल्या की सुर्यास्त जवळ आला म्हणतात, त्याचीच ही प्रचिती नाही काय?

आजही शिजते बिरबलाची खिचडी

badshah and birbal साठी प्रतिमा परिणाम

गेले दोन आठवडे दिल्ली नजिकच्या नॉयडात झालेल्या अखलाक महंमदच्या हत्याकांडाने अवघ्या बुद्धीवादी जगताला हैराण करून सोडले आहे. तमाम बुद्धीवादी रडकुंडीला आलेत. एका मुस्लिमाला जमावाने जिवंत जाळले मारले म्हणताच, अवध्या बुद्धीवादाचा पुरोगामी धर्म बुडायची वेळ आलेली आहे. अर्थात प्रत्येक साहित्यिक शहाण्याचा दावा असा आहे, की ते कुणा मुस्लिमासाठी मातम करत नसून माणुसकीसाठी आक्रोश करीत आहेत. म्हणजे जणू अखलाकच्या जागी अभिषेकवर अशी पाळी आली असती, तरी त्यांनी इतकाच आक्रोश मांडला असता, असेच कुणाला वाटावे. गोमांस खाण्याच्या नुसत्या संशयापोटी अशी हत्या, म्हणजे किती घोर पाप झाले ना? पण तसेच काही उलट्या बाजूने हिंदूच्या बाबतीत झाले असते तर, यातल्या कोणाला जागही आली नसती ही वस्तुस्थिती आहे. कारण आजकालचे तमाम पुरोगामी बुद्धीवादी बिरबलच्या जमान्यात जगतात. त्यांना आजचा भारत वा एकविसाव्या शतकाचा जमाना ठाऊकच नाही. तसे असते तर त्यांना पुसद यवतमाळच्या घटनेने वा कर्नाटकातल्या मुडबिद्री येथील घटनांनीही रडू आले असते. पण त्यासाठी तशी काही घटना घडण्याची गरज आहे वा असते, असेच कोणी म्हणेल. पण बुद्धीवादी लोकांचा वास्तवातील जगाशी संबंध नसतो. त्यांना कोणीतरी कथाकथन करावे लागते. गोष्ट सांगावी लागते. ती खरी असण्याचा संबंध नाही. म्हणजे असे की काय घडले असे वाहिन्या किंवा वर्तमानपत्रात झळकावे लागते. ते घडले म्हटल्यावर या कुंभकर्णांना जाग येते आणि मग त्यांच्या संवेदना कार्यरत होतात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे मुस्लिमाने एका पोलिस शिपायाला भोसकून मारल्याने ते विचलीत कशाला होतील? तसे घडले असले तरी त्याची बातमी ब्रेकिंग न्युज झाली नाही. किंवा त्या संबंधाने वाहिन्यांनी अशा बुद्धीमंतांना चर्चेसाठी आमंत्रित केले नाही. मग रडणार कसे?

हा बुद्धीवाद किती दुरगामी आहे ते समजून घ्यायचे असेल तर आधी बिरबल बादशहाच्या बौद्धिक पातळीवर जावे लागते. नेहमी बादशहा काहीतरी सवाल करणार आणि बिरबल त्याचे बिनतोड उत्तर देणार, अशा पातळीवर आपल्या समाजाचा बुद्धीवाद आला आहे. सहाजिकच त्यांचे वर्तनही त्यापैकी एका पात्रानुसार घडले तर नवल कुठले? एकदा बादशहा कडाक्याच्या थंडीने कुडकुडतो आणि इतक्या थंडीत रात्रभर कोणी यमुनेच्या पाण्यात उभा राहिला, तर बक्षिस देण्याची घोषणा करतो. एकजण बिचारा बक्षिसाच्या लोभाने ते दिव्य पार पाडतो आणि दरबारात बक्षिस घ्यायला हजर होतो. पण बक्षिस त्याच्या हाती पडण्यापुर्वीच एक पुरोगामी विज्ञानवादी सरदार आक्षेप घेतो. बादशहाच्या किल्ल्यातल्या दिव्याचा प्रकाश पाण्यात उभ्या राहिलेल्या माणसापर्यंत जातो, तर त्याची उष्णताही मिळते. म्हणूनच प्रत्यक्षात त्या इसमाने थंडी अनुभवली नाही, असा युक्तीवाद केला जातो. याला दूरगामी विचारसरणी म्हणतात. बादशहाही गडबडतो. शेवटी त्यावर उपाय म्हणून बिरबल खिचडीचे नाटक करतो. उंचावर बांधलेली हंडी आणि सहासात फ़ुट खाली असलेला जाळ, यावर खिचडी शिजवायचा उद्योग मांडतो. त्यातून मग बादशहाला पुरोगामी दरबार्‍याची अक्कल उमजते आणि त्या इसमाल बक्षिस दिले जाते. मुद्दा इतकाच, की तेव्हा सुदैवाने त्यात कोणी हस्तक्षेप केला नाही. आजच्या जमान्यात बिरबलाची खिचडी शंभर दिडशे फ़ुट उंचावर बांधलेल्या हंडीत असेल तरी शिजवणारे पुरोगामी विद्वान भारतात पैदा झाले आहेत. त्याचा पुरावा म्हणजेच दादरीची घटना होय. या विद्वानांना दादरीच्या हत्याकांडाची झळ पोहोचते. बारा पंधराशे किलोमिटर्सवरच्या जळितकांडाची धग जाणवते. पण यवतमाळ पुसदच्या घटनेचा सुगावाही त्यांना लागत नाही. याला बिरबलाची खिचडी नाही तर काय म्हणायचे?

याच देशात महाराष्ट्रातल्या पुसद गावात एका मुस्लिम तरूणाने २५ सप्टेंबर रोजी एका पोलिस शिपायाला भोसकले. कारण तो ज्या सरकारची नोकरी करतोय, त्याच सरकारने गोमांस खाण्यावर बंदी घातलेली आहे. एवढ्यासाठी त्या सरकारच्या सेवेत असलेल्याला भोसकणे माणूसकी असते, असे आपल्या बुद्धीजिवींना वाटते. तसे नसेल तर एव्हाना त्यापैकी एकाने तरी पुसदविषयी आक्रोश केला असता. पण बिचारे करणार काय? आपल्या पुरोगामी माध्यमांनी पुसदची बातमी ठळकपणे छापली नाही. कशी छापणार? त्यात एक मुस्लिमाने हिंदू असलेल्या पोलिस शिपायाला भोसकले आहे. आता हिंदूंना कोणीही कुठेही कसेही भोसकून जाळून मारावे, हा इतरांचा पुरोगामी अधिकार आहे ना? मग त्यासाठी कुठला पुरोगामी कशाला गदारोळ करील? कुठले पुरोगामी माध्यम त्याची बातमी ठळकपणे छापणार? मुळात हिंदू असेल त्याच्यावर अन्याय होतच नाही, अशी ठाम समजूत असल्यावर. तशी बातमीच कशी होऊ शकते? म्हणूनच तशी बातमी येत नाही, की त्यावरून गदारोळ व्हायचे कारण नाही. ही आपल्या देशातील पुरोगामीत्वाची अवस्था आहे. तीच कहाणी शेजारच्या कर्नाटकातील आहे. तिथे मुडबिद्री गावात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मुस्लिम जमावाने भोसकून ठार मारले. त्याचा कुठे गाजावाजा झाला? कशाला होईल? अशा पुरोगामी कार्याचा निषेध तरी कसा होणार? बातमी मुस्लिमाला मारले म्हणून होत असते. हिंदूंना मारणे, घरातून हाकलून लावणे ही घटनात्मक कृती असते इथल्या पुरोगामी बुद्धीवादानुसार. सहाजिकच अगदी शेजारी तशी आग लागलेली असेल, तरी त्याची कुठली धग वा झळ पुरोगामी शहाण्यांपर्यंत पोहोचत नाही. पण १५०० किलोमिटर्स दूर दादरीत अखलाकला हिंदू जमावाने मारले, की देशाच्या कानाकोपर्‍यातील कुठल्याही बुद्धीवाद्याची होरपळ सुरू होते. ह्याला बिरबलची खिचडी म्हणतात.

एकदा बुद्धीवाद किंवा पुरोगामीत्वाची अशी व्याख्या झाली, मग सामान्य बुद्धीच्या लोकांचीही त्याच्या नेमकी उलटी व्याख्या होत असते. जर बुद्धीवाद्यांना धर्मानुसार संवेदना जाणवत असतील, तर सामान्य लोकांनाही त्याचीच बाधा होणार ना? सहाजिकच लोकांना दादरी वा तत्सम घटनांची धग जाणवत नाही, पण आपल्या धर्माच्या वा जातीपातीच्या जाणिवांनुसारच संवेदना कार्यरत होतात. देशात अशा घटना घडत असताना लोकांमध्ये इतकी बधीरता कशाला आहे, असा सवाल लेखातून व चर्चेतून विचारला जातो. त्याचे उत्तर मुडबिद्री वा पुसदच्या बाबतीत इतकी बौद्धिक बधीरता कशाला, अशा प्रश्नाने मिळते. पुरोगामी वा बुद्धीमंत माध्यमे पुसद वा मुडबिद्रीच्या घटनांविषयी बधिर रहाणार असतील, तर सामान्य लोकही दादरीविषयी बधिर होऊन जातात. यमुनेच्या पाण्यात कडाक्याच्या थंडीत उभे राहणार्‍याला राजवाड्यातल्या दिव्यापासून उब मिळत असेल, तर पंधरा फ़ुट उंचीवरच्या हंडीतली खिचडीही शिजणारच ना? तुमची खिचडी शिजत असेल, तर सामान्यांची कशाला नाही शिजणार? विज्ञानाचा नियम सर्वांना सारखाच लागू होतो. तसाच अंधश्रद्धेचा निकषही सर्वांना सारखाच लागू होतो. किंबहूना त्याचेच प्रतिबिंब आता सोशल मीडियातून पडू लागले आहे आणि मुख्यप्रवाहातील माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. बुद्धीवादाची व साहित्यिक जाणत्यांची प्रतिष्ठा लयाला चालली आहे. बौद्धिक प्रांतातली मक्तेदारी आता संपली आहे, हे जितके अशा शहाण्यांच्या लक्षात येईल, तितकी लौकर त्यांना शुद्ध येईल. तुम्हीच शिजवलेली पुरोगामीत्वाची खिचडी तुम्हालाच खायला लोक भाग पाडत आहेत. तेव्हा ती शिजलेली नाही, अर्धकच्ची आहे, असल्या तक्रारी करण्यात अर्थ नाही. बादशहाही आपला मुर्खपणा कबुल करून सत्य स्विकारतो, तिथे पुरस्कारावर जगणार्‍या शहाण्यांची काय मजाल?

Monday, October 26, 2015

छोटा राजनच्या अटकेतील गुंतागुंत?

Chhota Rajan (

(अटकेनंतरही हसतमुख छोटा राजन?)

छोटा राजन ह्या कुख्यात गुंडाला इंडोनेशियात अटक झाल्याची बातमी खळबळजनक ठरणे स्वाभाविक आहे. कारण निदान मागली पंधरा वर्षे तरी तो भारतीय कायद्याला हुलकावणी देतोय. तसे बघितले तर तीस वर्षे त्याने भारतीय कायद्याला हुलकावण्य़ा दिल्या आहेत. पण खरोखरच अशा गुंडांना पकडण्याविषयी भारतीय पोलिस किती गंभीर होते, याचीच नेहमी शंका येते. कारण १९८० च्या दशकात दाऊद सोबतच अनेक माफ़िया गुंड दुबईत वास्तव्य करून होते. त्यांच्यावर इथे अनेक गुन्हे नोंदलेले असले तरी, त्यांना मायदेशी आणून कोर्टाच्या हवाली करण्यासाठी काय झाले, त्याचा तपशील कधीच समोर आला नाही. पण १९९२ मध्ये बाबरी पाडली जाण्याची घटना व नंतर काही महिन्यातच मुंबईतली बॉम्बस्फ़ोट मालिका; यानंतर दाऊद व राजन यांच्यात बेबनाव निर्माण झाला. तेव्हापासून राजनने स्वत:ला हिंदूचा कैवारी असल्याचा मुखवटा पांघरून दाऊदशी खुले वैर पत्करले होते. तिथे दुबईतून राजन फ़रारी झाल्याच्या बातम्या होत्या, तशाच तिथे व भारतात या दोन टोळीबाजांच्या साथीदारात एकमेकांच्या साथीदारांचे मुडदे पाडण्याचे सत्र सुरू झाले होते. त्याचा कळस मग २००२ सालात थायलंडची राजधानी बॅन्कॉक येथे राजनवर गोळीबाराने झाला. तिथे रोहित वर्मा नामक राजनच्या साथीदाराच्या मुलाचा वगैरे वाढदिवस होता. त्यानिमीत्त जमलेले असताना अकस्मात तिथे घुसलेल्या मारेकर्‍यांनी राजनचा गेम साधला. पण राजन त्यातून बचावला. वर्मा मारला गेला आणि राजन खिडकीतून उडी मारून फ़रारी झाला. तो अर्थातच पोलिसांच्या हाती लागला होता. पण त्याला भारतात आणण्याची कुठलीच कारवाई झाली नाही आणि एकेदिवशी राजन इस्पितळातून फ़रारी झाल्याच्या बातम्या झळकल्या. ते बहुधा २००२ साल असावे. पुढे कोणाला कधी राजनचा ठावठिकाणा लागला नव्हता.

राजनवर हल्ला करणारे मारेकरी पकडले गेले आणि त्या हल्ल्याची जबाबदारी दाऊदचा विद्यमान उजवा हात छोटा शकील याने घेतली होती. पुढे त्या मारेकर्‍यांचा तिथे बचाव करायला पाकिस्तानातून नामवंत वकीलही पोहोचले होते. यावरून पाकिस्तानात दाऊद वा शकीलचे असलेले वजन लक्षात येऊ शकते. त्या खटल्याचे पुढे काय झाले त्याचा पत्ता नाही. पण छोटा राजन मात्र थायलंड वा बॅन्कॉकमध्ये थांबला नाही. तो तिथून कसा निसटला व गायब झाला, ते आजही रहस्य आहे. तेव्हाची आणखी एक आठवण नमूद करण्यासारखी आहे. महाराष्ट्रात तेव्हा छगन भुजबळ उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांनी मुंबई पोलिसांना राजनला भारतात आणण्यासाठी बॅन्कॉक येथे धाडले होते. पण त्या पथकाला हात हलवत परत यावे लागले. कारण अशा कारवाया अन्य राज्यातून आरोपी आणतानाही उतावळेपणाने होत नाहीत. इथे तर भिन्न देशातून आरोपीला आणायचे होते. त्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र खात्यामार्फ़त प्रयत्न व्हायला हवे होते. पण भुजबळांच्या उतावळेपणाने सगळ्याच गोष्टींचा विचका होऊन गेला. आज इंडोनेशियात राजनला अटक होऊ शकली, तर तेव्हाही भारत सरकारच्या मदतीने राजनला भारतात आणणे अशक्य नव्हते. पण परस्पर मुंबई पोलिसांचे पथक बॅन्कॉकला पाठवणे शुद्ध अतिरेक होता. अखेर राजन तिथून अलगद निसटला. कारण थायलंडमध्ये त्याच्या विरोधात कुठला गुन्हा नव्हता की खटला चालू नव्हता. तिथपासून आजपर्यंत राजन भारतीय कायद्याला हुलकावण्या देत राहिला. अनेकदा विषय निघाला, तेव्हा त्याने फ़ोन करून भारतीय माध्यमांना मुलाखती दिल्या किंवा खुलासेही दिले होते. म्हणजेच त्याला हुडकून काढणे अशक्य नव्हते. पण तसे का झाले नाही हे जितके रहस्य आहे, तितकेच आता अकस्मात ऑस्ट्रेलिया व इंडोनेशिया सरकारशी संपर्क साधून राजनला अटक करण्याचे कारणही रहस्यमय आहे.

मध्यंतरी सात आठ वर्षापुर्वी मुंबईतील एका इंग्रजी पत्रकाराची उपनगरात हत्या झाली होती. नेहमीप्रमाणे आपल्या मोटरबाईकने निघालेल्या जे डे नामक या पत्रकाराला वर्दळीच्या रस्त्यावर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्याची हत्या राजनच्या साथीदारांनी केल्याची बोंब होती. मग काही दिवसांनी त्याच गुन्ह्यात एका महिला पत्रकाराला अटक झाली. तिच्यावर डे याच्या हालचालींची माहिती राजनला पुरवल्याचा आरोप होता. दुसरीकडे डे हा पत्रकार म्हणून काम करताना राजनची माहिती शकीलला देत असल्याचेही म्हटले गेले. पुढे त्यावर पडदा पडला. अधूनमधून शकील व राजन परस्परांना भारतीय माध्यमांच्या ‘मध्यस्थीने’ धमकावत राहिले. पण राजनचा पोलिसांनी तपास घेतला, असे सहसा कुठे वाचनात आले नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर अकस्मात राजनविषयी भारतीय पोलिस यंत्रणा व सरकार इतके दक्ष कशासाठी झाले, हे खरे रहस्य आहे. एका बाजूला दाऊद थकल्याने परत मायदेशी येऊ इच्छितो अशा बातम्या कानावर येतात आणि त्याचाच समवयस्क राजन आता बेड्या ठोकून मायदेशी आणला जाणार आहे. थकल्या वयात गुन्हेगारी साम्राज्य चालवणे अशक्य असल्याने मायदेशी येण्याची त्याचीच इच्छा यातून पुर्ण केली जात असावी काय? कारण कितीही खटले व गुन्हे दाखल झालेले असले, तरी राजनसारख्या गुन्हेगाराची प्रकृती सुखरूप राखणे हे कायदा व्यवस्थेचे काम रहाणार आहे. म्हणजेच उद्या जेव्हा केव्हा राजनला भारतात आणले जाईल, तेव्हा त्याला तुरूंगात कोंबण्यापेक्षा कडेकोट बंदोबस्तामध्ये एखाद्या वैद्यकीय व्यवस्थेत ठेवले जाण्याची शक्यता अधिक आहे. किंवा त्यासाठीच त्याला इथे आणले जात नसेल कशावरून? हे एकूणच घटनाक्रमाचे खरे रहस्य आहे. ज्याच्यावरचा पडदा दिर्घकाळ उठवला जाऊ शकणार नाही. कारण अटक परदेशी झालेली आहे आणि इथे आरोपीला आणायला अजून काही दिवस जातील.

इंडोनेशिया वा ऑस्ट्रेलिया यांच्या मदतीने राजनला पकडण्यात आल्याचे वृत्त आहे. म्हणजेच त्याचे दिर्घकाळ वास्तव्य दक्षिण आशियात असावे. थायलंडमध्ये त्याला शेवटचे बघितले गेले होते. तेव्हा जखमी अवस्थेत त्याचे फ़ोटो व चित्रण वाहिन्यांवर झळकले होते. त्यानंतर तो गायब होता व अनेक देशात फ़िरत होता. इंडोनेशिया वा मलेशिया, ऑस्ट्रेलिया अशा कुठल्या तरी देशातून त्याने माध्यमांशी संपर्क साधलेला असल्याचे आपण वारंवार ऐकत आलो. म्हणजेच त्याचे तिथे असलेले वास्तव्य हे रहस्य नव्हते. मग इतके दिवस भारतीय कायदा यंत्रणेने त्याच्यासाठी प्रयत्न का केले नव्हते? की त्याला गुन्हेगार असूनही त्या त्या देशांनी आश्रय दिलेला होता? राजनची व दाऊदची गोष्ट एकदम भिन्न आहे. १९९३ च्या स्फ़ोटानंतर दाऊद जवळपास अंतर्धान पावला. त्याचे दुबईनंतरचे फ़ोटो व फ़ोन पुर्णत: थंडावले होते. शकीलकडून दाऊदच्या नावे धमक्या वा इशारे यायचे तितकेच. मध्यंतरी दाऊदच्या घरी कराचीत फ़ोन लावला गेला व त्याच्या पत्नीनेच उचलून बातचित केल्याचा गाजावाजा झाला होता. पण राजन खुलेआम माध्यमांशी संपर्क साधत राहिला. मग त्याचा मागोवा भारतीय कायद्याने कशाला घेतला नव्हता? हे जितके रहस्य आहे तितकेच अकस्मात त्याला अन्य देशांच्या मदतीने ताब्यात घेणेही रहस्यमय आहे. मात्र त्याचा कुठलाही खुलासा दिर्घकाळ होऊ शकणार नाही. सीबीआयने त्याविषयी माहिती दिलेली आहे, म्हणजेच सध्यातरी त्याच यंत्रणेच्या ताब्यात राजन येईल. पण पुढल्या काळात त्याचा ताबा कोणाकडे असेल व ‘कसून’ चौकशी कोण करतो, यावरच राजन अटकेच खरे रहस्य उलगडायचे धागेदोरे उलगडू शकतील. तोपर्यंत माध्यमांना खळबळ उडवायचे निमीत्त, यापेक्षा राजनच्या अटकेला अधिक महत्व नाही. धुरळा खुप उडेल वा उडवला जाईल. पण माहिती म्हणून तसूभर तपशील हाती लागण्याची शक्यता नाही.

रविवारीच दाऊदविषयी मी लिहीलेला लेख आकस्मिक नव्हता, हे राजनच्या अटकेतून स्पष्ट होईल का? 

छोड आये हम वो गलिया!मानवी आयुष्यात व जगण्यात काही मुक्काम असे असतात, जे मैलाचे दगड मानले जातात. जसे भौगोलीक व्यवहारात मैलाचे दगड असतात, तसेच साहित्य संस्कृती वा सभ्यतेच्या, श्रद्धांच्या वाटचालीतही मैलाचे दगड असतात. ज्यांच्याकडे बघून लोक अर्थ लावत असतात. त्यात भेसळ झाली, मग जगण्याचा पाया ठिसूळ होऊन जातो. मुंबई कशाला म्हणतात किंवा मैल-किलो यांचे एक प्रमाणबद्ध माप असते. त्यात कमीजास्त होऊ लागले, की त्यांचे अर्थ लावणे सामान्य माणसाला अवघड होऊन जाते. किलोमिटर्स वा किलोग्राम ही वजने मापे असली, तरी साधारण नजरेने वा उचलण्यानेही लोकांना त्याचे अंदाज बांधता येत असतात. म्हणूनच जगताना प्रत्येक वेळी कोणी मोजपट्टी वा तराजू घेऊन तपासण्याच्या फ़ंदात पडत नाही. लांबीरुंदी वा वजन अनुभवानेही कळते. त्यात किंचित थोडीफ़ार तफ़ावत असल्याने बिघडत नाही. हे समजण्याइतका सामान्य माणूस व्यवहारी असतो. तसे नसते तर कुठल्याही दुकानात वा बाजारात कोट्यवधी व्यवहार रोजच्या रोज होऊच शकले नसते. प्रत्येक जागी तोळामासा इंच सेन्टीमिटर मोजत हुज्जती होत राहिल्या असत्या. पण तसे सहसा होत नाही. कारण किंचित कुठे फ़ेरफ़ार वा तफ़ावत असू शकते आणि त्यामुळे फ़ारसे बिघडत नाही. इतकी जाण सामान्य माणसाला असते. पण गणिती माणूस असला तर त्याचे व्यवहारी जगात झगडे होतात आणि त्याला व्यवहार उरकणे अशक्य होऊन जाते. तो सतत तक्रार करत रहातो. अशावेळी त्याला समजूतदार बनवणे, हे समाजातील जाणत्यांचे काम असते. ज्याला आपण मुंबई वा दिल्ली असे संबोधतो, त्या प्रचंड भूप्रदेशातील त्या शब्दांनी व्यक्त होणारा भूप्रदेश नेमका कुठला, त्यावर बोट ठेवता येत नाही. म्हणूनच तसा कोणी हट्ट करील तर तर्कबुद्धीने त्याचा दावा खरा असला, तरी लोक त्याच्याकडे कोणत्या नजरेने बघतील?

आमची अवस्था आज काहीशी अशीच झाली आहे. प्रामुख्याने गुलजार या साहित्यिक कलाकाराने जे मतप्रदर्शन कालपरवा व्यक्त केले, त्यामुळे आजवरच्या त्यांच्याविषयी असलेल्या श्रद्धेला मोठाच धक्का बसला. गेल्या काही दिवसात अनेक साहित्यिक वा लेखकांनी सन्मान परतीचा खेळ सुरू केला त्याचे फ़ारसे काही वाटले नव्हते. पण गुलजार यांच्या सर्जनतेविषयी शंका घेता येत नाही. अशा प्रतिभावंतानेही पुरस्कृतांच्या रांगेत जाऊन बसावे, याची खंत वाटली. त्याचेही कारण आहे. ज्या अनुभवातून हा सर्जनशील कलावंत लेखक गेलेला आहे, त्याची पुसटशीही कल्पना अन्य पुरस्कृत लेखकांना कधी आलेली नसेल. आज अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी चालू आहे आणि संहिष्णुतेचा संकोच होतो आहे असे इतरांनी म्हणणे समजू शकते. कारण त्यांना त्यातला काही अनुभवच आलेला नाही. पण गुलजार यांचे तसे नाही. त्यांनी आणिबाणीच्या झळा सोसलेल्या आहेत. जो अन्याय झाला, त्याबद्दल बोलायचीही त्यांना हिंमत झाली नाही, अशा अनुभवातून गेलेला हा कलावंत, त्याकडे साफ़ पाठ फ़िरवून असे कधी झालेच नव्हते ही भाषा बोलतो, तेव्हा मनाला खरेच वेदना होतात. ‘आंधी’ हा गुलजार यांचा दिग्दर्शित केलेला पहिला अजरामर सिनेमा आहे. त्यातली नायिका राजकीय पात्र वा तिची वेशभूषा इंदिरा गांधींसारखी होती. तेवढ्याच कारणास्तव आणिबाणीच्या आरंभीच तो चित्रपट दाखवण्यावर प्रतिबंध घातला गेला होता. आपल्या कलाजीवनातील पहिला अविष्कार असा कुठलेही कारण न देता मुस्कटदाबी करून दडपला गेला असताना, त्याचा दाहक अनुभव गुलजार यांना आलेला नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? की त्याच्यापेक्षा आजचा अनुभव दाहक भयानक आहे, असा दावा करता येईल काय? आज असंहिष्णूतेचा येणारा अनुभव प्रथमच घेत असल्याचे गुलजार यांचे कथन म्हणूनच चकीत करणारे आहे.

त्याचे दोन अर्थ होतात. आणिबाणीत ज्या मुस्काटदाबीने गुलजार यांना वेदना बोलायचीही हिंमत होऊ शकली नव्हती, तो अनुभव सुसह्य होता किंवा लोकशाहीसाठी योग्य होता. उलट आज पंतप्रधान वा सरकारच्या निंदानालस्तीचे दालन खुले असतानाही कलावंताला जाचक अनुभवातून जावे लागते आहे, असे गुलजार यांना म्हणायचे असावे. त्यांना असे अनुभव येत असतील, तर मग त्यांच्या आणि सामान्य माणसाच्या अनुभवामध्ये जमिन अस्मानाचा फ़रक आहे. कारण ते अन्यालाला न्याय म्हणत असून कल्पनेतील भितीने भयग्रस्त झालेले आहेत. आणिबाणीचीही गोष्ट बाजूला ठेवा. दोन दशकापुर्वी गुलजार यांनीच ‘माचिस’ नावाचा चित्रपट बनवला होता. ज्यात खलिस्तानी दहशतवादाचे कथानक होते. तेव्हाची परिस्थिती सुसह्य होती काय? कुणाही नेत्याची, धर्मगुरूची वा लेखक संपादकाची दिवसाढवळ्या हत्या व्हायची. पंजाब केसरीचे संपादक वा संत लोंगोवाल ते इंदिरा गांधी अशी लागोपाठ हत्याकांडे झालेली होती. नुसत्या संशयावरून दिल्लीतच पाच हजार शिखांचे हत्याकांड झालेले होते. त्या सर्व अनुभवाविषयी गुलजार यांना जे काही वाटले, त्यावर त्यांनी ‘माचिस’ चित्रपटाचे कथानक बेतलेले व रंगवलेले होते. पण त्यावेळी कधीही व कुठेही त्यांनी समाजात असहिष्णूता फ़ोफ़ावत असल्याची तक्रार केल्याचे कुणाच्या वाचनात वा ऐकीवात नाही. मग साहित्य अकादमीच्या सन्मानाने विभूषित झालेल्यांची हत्या म्हणजेच सहिष्णूता संपत असल्याचा कुठला मापदंड आहे? असेल तर तेही गुलजार यांनी याचवेळी स्पष्ट करायला हवे होते. नसेल तर मग त्यांना भयभीत करणारी असंहिष्णूता व सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवाला येणारी संहिष्णूता, यांच्या व्याख्येतच काही मुलभूत फ़रक पडतात. आजवरची गुलजार यासारख्यांची संवेदनशीलता सामान्य माणसाच्या अनुभवाशी जवळून निगडित होती. आज तसे का वाटू नये?

‘माचिस’ चित्रपटाचे कथानक रंगवताना गुलजार असे कुठल्याच एका बाजूला झुकलेले नव्हते. जितक्या ठामपणे त्यांनी सरकारी दडपशाही व पोलिसी अत्याचारावर रोख ठेवला होता, तितक्याच तटस्थपणे त्यांनी खलिस्तानी दहशतवादाकडे झुकलेल्यांच्या मानसिक अवस्थेचा वेध घेतला होता. एकामेकात गुंतलेल्या त्या बेबनावाचे सुयोग्य विश्लेषण करणारे कथानक गुंफ़लेले होते. आज त्याच्याही जवळपास जाण्याइतकी स्थिती नसताना गुलजार यांचा तोल गेलेला जाणवतो. आपल्या त्या तटस्थपणे मांडणी करण्याच्या गुणाला गुलजार पारखे झालेत काय? त्यांच्याच त्या ‘माचिस’ चित्रपटातले दहशतवादाच्या आहारी गेलेल्या तरूणांना पुर्वस्मृतींनी व्याकुळ करणार्‍या एका गीताची आठवण इथे झाल्याशिवाय रहात नाही. ‘छोड आये हम वोह गलिया!’ ते तरूण जीवावर उदार होऊन सत्तेशी बंडखोरी करत हिंसा माजवत असतात आणि त्यांना पुर्वायुष्यातल्या सुनहर्‍या आठवणीही व्याकुळ करत असतात. आपण त्या सुंदर आयुष्यातून कुठे कसे भरकटत आलो, त्याच्या वेदना व्यक्त करणारे इतके सुंदर काव्य रचणार्‍या गुलजार यांनी साहित्य अकादमीच्या पुरस्कार वापसीच्या निमीत्ताने व्यक्त केलेले मत वा घेतलेली भूमिका, म्हणूनच व्याकुळ करणारी आहे. आपल्या त्या सृजनशील, तटस्थ व राजकारणबाह्य परिसरातून गुलजारही कुठे भरकटले, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. आजवरचे त्यांच्या सृजनशील मनाला अनुभवातून व्यक्त व्हायला भाग पाडणारे मन, गुलजारना सोडून कुठे पोहोचले आहे? वास्तवाला कल्पनेच्या मुशीत घालून एक अप्रतिम कलाकृती घडवणारा शिल्पकार कुठे बाजारू मुर्ती घडवणार्‍यांच्या रांगेत येऊन उभा राहिला? याची वेदना गुलजार यांच्या खर्‍या चहात्यांना व्यथित केल्याशिवाय रहाणार नाही. कारण आज जी स्थिती आहे. त्यापेक्षा भयंकर अनुभवातून गुलजार व्यक्तीगतरित्या गेलेले आहेत. अनुभवाला झुगारणारा त्यांचा मापदंड म्हणूनच कलेला शरमिंदा करणारा आहे.

Sunday, October 25, 2015

दाऊद मारला जाऊ शकतो का?सध्या पाकिस्तान सातत्याने भारतावर दहशतवाद माजवल्याचे आरोप करू लागला आहे. आपल्याकडे जितक्या सहजपणे आय एस आय या पाक हेरसंस्थेवर आरोप केले जातात, तशीच पकिस्तानात भारतीय रॉ या संस्थेवर आरोप करण्याची फ़ॅशन आहे. मात्र यावेळी एक गंभीर आरोप होतो आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ व लष्करे तोयबाचा म्होरक्या सईद हाफ़ीज, यांची हत्या करण्याचा डाव भारताने शिजवला असल्याचा हा आरोप आहे. तो कुणा पाकिस्तानी पत्रकाराने उठवलेली आवई नाही, तर पाकिस्तानच्या पंजाब राज्याच्या गृहखात्याने तसा इशारा अनेकांना दिला आहे. शरीफ़ यांच्या हत्येतून पाकिस्तानात अराजकाची स्थिती निर्माण करण्याचा राजकीय हेतू असल्याचे त्यात म्हटले आहे. शरीफ़ व हाफ़ीज यांच्याविषयी त्यांना शंका आहे. पण कोणा तरी महत्वाच्या व्यक्तींची हत्या करण्याचा भारताचा डाव असल्याची खात्री व पुरावा असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यावर मग तिथल्या वृत्तपत्रांनी बातम्या रंगवल्या किंवा अग्रलेख खरडले तर नवल वाटायचे कारण नाही. नवल आहे ते भारतात त्याविषयी साधी बातमीही आलेली नाही. आपल्या आरोपाला दुजोरा देण्यासाठी स्थानिक पातळीवर जो हिंसाचार चालू आहे, त्याचेही खापर भारताच्या माथी फ़ोडलेले आहे. लष्करे जंगवी किंवा तहरिके तालिबान यांच्या हस्ते अशा हत्या घडवण्यात येतील, असेही त्यात वर्तवले आहे.

आजकाल पाकिस्तानात अनेक शहरात व वस्त्यांमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना लागोपाठ घडत असतात. त्याचा भारताशी काय संबंध, ते पाकिस्तानला स्पष्ट करता आलेले नाही. कारण अफ़गाण तालिबान वा तहरिके तालिबान ही पाकिस्तानची निर्मिती आहे. त्याचा भारताशी काय संबंध? त्यांनी माजवलेला हिंसाचार धर्माधिष्ठीत राजकारणातून आलेला आहे. नित्यनेमाने शिया वस्ती वा शियापंथीय मुस्लिमांच्या श्रधास्थानाअर हल्ले होत असतात. मोठमोठे बॉम्बस्फ़ोट शियांच्या मशिदीत होतात. ते करणारा कोणी भारतीय नाही. हे सगळे पाकिस्तानने जन्माला घातलेले व पोसलेले अतिरेकी आहेत. आज ते तुमच्यावर उलटले, तर त्यात भारताचा संबंध काय? अफ़गाणिस्तानात पाकची अप्रत्यक्ष हुकूमत राखण्यासाठी जे तालिबान तयार करण्यात आले, तेव्हा बुगती या बलुची नेत्याची मदत घेण्यात आली होती. पुढल्या काळात त्याचा उपयोग नव्हता आणि तो पाक सरकारला दाद देईना, म्हणून लष्करी कारवाईत त्याची हत्या करण्यात आली. तेव्हापासून हे रण माजले आहे. अफ़गाण जिहाद चालविताना बलुची भूमीचा वापर झाला. जगातून कुठूनही आलेल्या जिहादींना तिथे आश्रय देण्यात आला. त्यातून जे स्थानिकांशी रोटीबेटी व्यवहार करून स्थायिक झाले, त्यांचा आणि अफ़गाण तालिबानांचा जिव्हाळा आहे. सोयीसाठी त्यांना वापरले. मग गैरसोय झाल्यावर त्यांनी आपसातील रक्ताची नाती तोडण्याची अपेक्षा कशी करता येईल? त्यातून हा पेच पाकिस्तानपुढे उभा राहिला आहे. बलुची टोळीवाले आणि तहरिके तलिबान ही पाकिस्तानच्या नरडीत अडकलेली हड्डी बनली आहे. मग त्याचे खापर भारतीय हेरखात्याच्या माथी फ़ोडणे, ही फ़ॅशन झाली.

यावेळी त्याच्या पुढे मजल गेली आहे. शरीफ़ वा सईद हाफ़ीज यांच्या हत्येचा डाव? यातला हाफ़िज खुलेआम भारताला पेटवून देण्याच्या वा राखरांगोळी करण्याच्या धमक्या उठताबसता देत असतो. त्याला पाकिस्तान रोखू शकत नसेल, तर भारताला त्याचा बंदोबस्त करण्याचा अधिकार आपोआप पोहोचतो. अर्थात कायदेशीर मार्गाने असे काही कृत्य भारत करू शकणार नाही. म्हणूनच अन्य मार्गाने अशा गोष्टींची विल्हेवाट लावली जात असते. प्रत्येक देश हे उद्योग करतो. ओसामाला पाक लपवून ठेवत असेल, तर अमेरिकेने त्याचा परस्पर काटा काढलाच ना? तसेच भारताने करावे अशी अपेक्षा कोणी करणार नाही. पण अन्य मार्गाने म्हणजे कोणा पाकिस्तानी टोळी वा संघटनेच्या मदतीने भारत हे करू शकतो आणि त्यात वावगे काहीच नाही. उदाहरणार्थ कसाब टोळी भारतात आली व तिने शेकडो लोकांचा मुंबईत बळी घेतला. तेव्हा पाकिस्तानने काय म्हटले होते? ते अनधिकृत लोकांनी केलेले कृत्य होते. उद्या असेच कोणी पाकिस्तानात पाक नागरिकानेच केले, तर भारतालाही तसे म्ह्णत येईल ना? दाऊदला हाताशी धरून जे उद्योग मागली दोन दशके पाक करतो आहे, त्याचीच भुते पाकिस्तानला आता भेडसावत आहेत, असे म्हणता येईल. अन्यथा पाकच्याच काही जिहादी संघटनांकडून भारतीय हेरखाते हत्याकांड घडवणार, ही भिती कशाला?

अर्थात पाकिस्तानची भिती तद्दन खोटी वा बिनबुडाचा आरोप, असे म्हणण्यातही अर्थ नाही. काट्याने काटा काढता येतो, अशी भाषा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलले आहेत. तेव्हा यातला काटा जो कोणी आहे, त्याचा काटा काढायला काटाही पाकिस्तानी असू शकतो, असा त्याचा अर्थ घेता येईल. लष्करे जंगवी हा काटाच आहे. तसाच हाफ़ीजही काटाच आहे. पण तितकेच काटे नाहीत. दाऊद इब्राहीमही काटाच आहे. मग एका काट्याला हाताशी धरून दुसरा काटा काढण्यात गैर ते काय? तशा हालचाली भारत करत नसेल, असे कोणी म्हणू शकत नाही. म्हणूनच पाकिस्तानी पंजाबच्या सरकारने दिलेला इशारा संपुर्णतया खोटा म्हणता येत नाही. त्यात शरीफ़ व हाफ़ीज खेरीज अन्यही कोणी महत्वाचे लक्ष्य असू शकते, असे म्हटलेले आहे. ते लक्ष्य दाऊद असू शकते. कडेकोट बंदोबस्तात असलेल्या दाऊदपर्यंत कोणी भारतीय मारेकरी जाऊन पोहोचू शकत नाही. पण पाकिस्तानी तर पोहोचू शकतो ना? हाफ़ीजपर्यंत भारतीय पोहोचणे शक्य नाही. पण त्याच्याच जिहादी छावण्यांमध्ये प्रशिक्षित झालेला कोणी जिहादी हाफ़ीजपर्यंत पोहोचू शकतो ना? भिती व्यक्त होत आहे, ती त्यासाठी! शरीफ़ यांचे नाव अकारण जोडले आहे. अशी माहिती कुठलेही गुप्तचर खाते सरळ देत नाही. त्यांना जो परिणाम साधायचा असतो, त्यादृष्टीने उपयुक्त ठरेल इतकी खरी व बाकीची दिशाभूल करणारी माहिती भेसळ करून दिलेली असते. माध्यमांना पाक सरकारने दिलेली माहिती नेमकी तशी आहे. शरीफ़ यांना मारल्याने पाकिस्तानात कसला गोंधळ उडणार आहे? ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत बेनझीर भुत्तो यांची हत्या भर चौकात झाली. म्हणून काहीही झाले नव्हते. हुकूमशहा झिया उल हक यांच्या समवेत सगळे मोठे सेनापती विमान अपघातात ठार झाले, म्हणुन पाकिस्तान कोसळून पडला नव्हता. म्हणुनच शरीफ़ यांना ठार मारून कुठल्याच शत्रूला काही साधता येणार नाही. मग त्यांच्या हत्येचे कारस्थान भारत कशाला शिजवणार? परंतु हाफ़ीज वा दाऊद यांचा काटा काढला गेला, तर पाकिस्तानातील जिहादी यंत्रणाच कोसळून पडणार हे निश्चीत! भारताला त्या दोघांपैकी कोणालाही संपवायची संधी असेल तर नक्कीच हवी आहे. म्हणूनच ज्या बातम्या पाकिस्तानी माध्यमे देत आहेत, त्यातली नावे बाजूला ठेवून त्या माहितीकडे बघावे लागेल.

एक गोष्ट स्पष्ट आहे. दाऊदला मारायला भारत टपलेला आहे. पण तसा कोणी भारतीय माणूस पाकिस्तानात नाही, असाच पाकचा दावा आहे. म्हणूनच त्याची हत्या करण्याचा डाव भारताने योजला, असे पाकिस्तान म्हणू शकत नाही. कारण त्यातून दाऊद पाकिस्तानात असल्याची कबुली दिली जाईल. म्हणून मग ‘अन्य महत्वाच्या व्यक्तीची हत्या’ अशी शब्द योजना केलेली असू शकते. त्याचा रोख हाफ़ीजचे नाव घातल्याने कळू शकतो. पाकिस्तानात पंतप्रधान शरीफ़ यांच्या इतका हाफ़ीज हा महत्वाची व्यक्ती आहे काय? असेल तर म्ग दाऊद इब्राहीमही तितकीच महत्वाची व्यक्ती असू शकते. पंजाब गृहखात्याने काढलेला फ़तवा म्हणूनच दाऊदचा जीव धोक्यात असल्याचा इशारा असू शकतो. मात्र दाऊद मारला गेल्याने पाकिस्तानात कुठलेही अराजक माजण्याची शक्यता नाही. कारण दाऊद तिथल्या कुठल्या राजकीय क्षेत्रातला मातब्बर माणूस नाही, की कुठल्या सत्तापदावर नाही. पण त्याचवेळी दाऊद पाकिस्तानात मोठी गुंतवणूक केलेला व्यापारी भांडवलदार आहे. खेरीज भारतातील त्याच्या टोळीबाजी व गुन्हेगारी हस्तकांमुळे पाकसाठी मोठी उपयुक्त व्यक्ती आहे. भारताने दाऊदचा काटा काढला, तर पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांचा कणाच मोडला जाऊ शकतो. म्हणूनच अनेक अर्थाने दाऊद ही शरीफ़ यांच्यापेक्षा पाकिस्तानातील महत्वाची अघोषित व्यक्ती आहे. त्याचाच काटा काढला गेला, तर भारतातील अनेक संपर्क व हस्तक जमिनदोस्त होऊ शकतात. शरीफ़ यांच्या जागी दुसरा पंतप्रधान पुढे येऊ शकतो, किंवा हाफ़ीजच्या जागी अझहर मेहमुद वा अन्य कोणी लखवी उभा राहू शकतो. पण दाऊदला पर्याय नाही. म्हणूनच दाऊद मारला जाणे म्हणजे पाकिस्तानच्या भारतविरोधी जिहादी लढाईत अराजक निर्माण होणे आहे. पाक माध्यमात झळकणार्‍या बातम्यांचा अर्थ तोच आहे.

आता हे सर्व खरे मानले, तर प्रश्न असा उरतो की पाकिस्तानला इतकी खबर लागली असेल, तर त्यांनी त्याविषयी बोंब ठोकून काय मिळवले? गुप्तचर खात्याची लढाई नेहमी अंधारातली व सावल्यांची असते. त्यातून त्यांना परस्परांना शह काटशह द्यायचे असतात. या बातमीतून त्यांनी भारतीय हेरखात्याला इशारा दिला असू शकतो, की दाऊदचा खात्मा करण्याचा डाव शिजवत आहात, त्याची खबर आम्हाला लागली आहे. सहाजिकच आम्ही इतक्या सहजासहजी तुम्हाला त्यात यश मिळू देणार नाही. पण त्याहीपलिकडे आणखी एक हेतू त्यातून साधायचा असतो. पाकिस्तानात हाताबाहेर गेलेल्या जंगवी वा तहरिके तालिबान यांना देशाचे शत्रू ठरवून ते भारताचे हस्तक असल्याचा गवगवा करणे! म्हणजे सामान्य जनतेमध्ये त्या दोन्ही संघटनांविषयी देशाचे शत्रू म्हणून द्वेष निर्माण करण्याचाही हेतू साधला जातो. शिवाय मग त्यांच्या कुठल्याही सदस्यवर भारताचा एजंट म्हणून खटले भरून त्यांना दिर्घकाळ गजाआड ढकलता येत असते. पण दुसर्‍या बाजूला हाफ़ीज वा तोयबांविषयी देशप्रेमी अशी प्रतिमा निर्माण व्हायला हातभार लागतो. थोडक्यात पाकिस्तान सरकारही त्यांच्या जनतेशी सत्य बोलत नसते. तर परिणाम साधला जावा अशी दिशाभूल करणारी माहिती माध्यमातून पसरवली जात असते. इतका गंभीर आरोप पाकिस्तानात होत असताना, त्याची साधी दखलही भारतीय माध्यमांनी घेतलेली नाही, कारण भारताच्या हेरखात्याने वा भारत सरकारनेही त्यावर कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण कुठलेही कारण असो, पाकिस्तानात दडी मारलेला दाऊद आता सुरक्षित नाही, इतकाच याचा अर्थ आहे. मागल्या काही महिन्यात सईद हाफ़ीजच्या धमक्या आटल्या आहेत. दाऊदचा ‘प्रवक्ता’ छोटा शकीलही कुठल्या भारतीय माध्यमांशी पत्रकारांशी बोललेला नाही. ह्या गोष्टी सूचक आहेत. प्रामुख्याने याकुबच्या फ़ाशीच्या वेळी बदला घेण्याच्या धमक्या देणारे कुठल्या कुठे बेपत्ता आहेत. पण त्याच पहाटे टायगर मेमनने आपल्या माहिमच्या घरी फ़ोन करून बदला घेण्याचे वचन आईला दिलेले होते. मग काही दिवसातच दाऊदच्या पत्नीला कोणीतरी भारतातून थेट फ़ोन करून बातचित केल्याचे रेकॉर्डींग आपण ऐकले आहेच. त्यानंतर सर्वांची बोलती एकदम बंद होऊन गेली. कारण घरचा फ़ोन लागला म्हणजे घरचा पत्ता लागतो. पत्ता कळला की लपून बसलेली जागा कळते. तिथून दाऊदला अन्यत्र हलवला असेल, तरी त्याच्या हालचालीवर नजर ठेवलेल्यांना नवी जागा कळू शकते. अशा वेगवेगळ्या काळातल्या बातम्यांचे तुकडे जोडले, तर ताज्या बातमीचे संदर्भ उघडे होतात. पाकिस्तानी पंजाब सरकारच्या इशार्‍याप्रमाणे शरीफ़ वा हाफ़ीज यांच्या हत्येसाठी रॉ प्रयत्नशील असल्याची अफ़वा असावी आणि प्रत्यक्षात दाऊद हेच भारताचे लक्ष्य असल्याने पाकिस्तान गडबडलेला असावा, ही शक्यता अधिक आहे.

पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर
रविवार   २५/१०/२०१५