Saturday, September 22, 2012

झुंडीची मनोवृत्ती


या दुष्ट चौकोनातून कसे सुटावे?

by Navnath Pawar on Wednesday, September 14, 2011 at 11:51am ·
मित्रांनो, मला सारखे असे वाटत राहते की आपण एका दुष्ट चौकोनात फसत चाललो आहोत.
१. टोकाचे गोड्सेवादी
२. टोकाचे बहुजनवादी
३. टोकाचे आंबेडकरवादी
४. टोकाचे इस्लामवादी
यातले पहिले तीन भारतीय समाजातूनच उगवले आहेत. तर चौथा भारताबाहेरचा असून स्थानिक समाजाला बळजबरीने त्याच्या दावणीला बांधण्यासाठी नंबर एकचा गट जीवाचे रान करतो आहे. नंबर एकला प्रत्युत्तर म्हणून नंबर दोन रिमिक्स इतिहास आणि तत्वज्ञान सांगून देशाच्या एकतेला सुरुंग लावत आहे. कोणी नुसता आ वासला तरी तो फक्त भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्यासाठीच वासावा हा तिसऱ्या गटाचा आग्रह असतो. भारतीय मुस्लीम प्रत्यक्षात इतके वादात पडू इच्छित नाहीत. मात्र पहिल्या तीन गटांनी त्यांचा द्वेष करावा यासाठी पाकिस्तानी अतिरेकी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत आहे... मला यातल्या सर्वच कट्टरवादी गटांची घृणा आहे... अर्थवादी विचार मंथन सुरु केले की हे त्यात जातीयवाद घुसवून मूळ पोस्टचा धुव्वा उडवतात. मात्र कुठल्या जयंतीचे निमित्त साधून हे पहिले तीन हे एकमताने आणि हक्काने माझी गाडी अडवतात. चौथा प्रत्यक्ष माझ्या मार्गात येत नसला तरी तो सगळ्यात जास्त देशद्रोही आहे, असे पहिल्या तिघांचे एक्मताचे (कोणी उघड कोणी छुपा) दडपण माझ्या खिशातून वर्गणी अक्षरश: काढून घेते.. यातही अनेक बहुभूज उपआकृत्या पुन्हा आहेतच.... त्यामुळे साधी गणपतीची वर्गणीही किमान दहा ठिकाणी द्यावीच लागते....  इच्छा असो की नसो शिवाजी महाराजांना वर्षातून दोनदा जन्माला घालावेच लागते.  प्रत्येक गल्लीत एक महारुद्र हनुमान किंवा गणपती मंदिर असलेच पाहिजे, आणि त्यात अर्थात माझे योगदान असलेच पाहिजे. .... लावण्यांच्या तालावरील प्रबोधनगीते आणि डीजेच्या तालावर धुंद नाच ठीकठाक व्हावा यासाठी  किमान पाच ठिकाणी पावती घेतलीच पाहिजे, नसता बाबासाहेबांचा अनादर करण्याची किंमत द्यायची वेळ कधीतरी येतेच....!चौथा गट मला कधी वर्गणी मागत नसला तरी त्याच्या पावत्या पाकिस्तानची असहाय्य जनता आपल्या विकासाचा बळी देऊन मुकाट्याने    फाड्तच आहे. मुक्त अर्थव्यवस्था आणि अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द नुसते उच्चारले तरी देव, धर्म, देश द्रोही खणून अंगावर येणारे हे गट वर्गणी साठी मात्र मी खिसा मुक्त ठेवावा असं प्रेमळ आग्रह प्रसंगी गुदगुल्या करून करता, हे विशेष. आता या फायद्याच्या धंद्यात अनेक नवीन अस्मिता मोठ्या फौज फाटयासहित उतरण्याच्या तयारीत असलेल्या पाहून मी धास्तावलो आहे. या चौकोनाचा लवकरच पंचकोन, षटकोन, अष्टकोन होत वर्तुळ होणार हे दिसतच आहे....    .  मी खूप अस्वस्थ आहे, पण या दुष्ट चौकोनातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नाहीये, आपण काही मार्गदर्शन कराल का?

========================


झुंडीची मनोवृत्ती 

   पहिली गोष्ट म्हणजे विचार किंवा प्रेमाने माणसे जोडणे हा दुरचा व कष्टप्रद मार्ग असतो. त्यापेक्षा भय किंवा द्वेषाने माणसे लौकर जोडता वा संघटित करता येतात. कारण विचार व विवेक ही वैयक्तीक मनस्थिती असते तर भयगंड ही झुंडीची मानसिकता असते. त्यामुळेच झुंड गोळा करायची तर विचार व तत्वज्ञानापेक्षा समजूती व तिरस्कार सोपे साधन असते. कोणी तरी समान शत्रू दाखवावा लागतो. तो खरा असण्याची सुद्धा गरज नसते, काल्पनिक सुद्धा चालतो. पण त्याचे भय समुहाच्या कल्पनाविश्वात ठसवता आले पाहिजे. ज्याच्या डोक्यावर सर्वप्रकारचे खापर फ़ोडणे, मग सोपे होऊन जाते. आपण ज्या चार टोकाच्या चौकोनाची गोष्ट सांगत आहात; त्या प्रत्येक कोनाचे पाय कुठला ना कुठला तिरस्कार घेऊनच बनलेले दिसतील. आपल्या अडचणी किंवा अपयशाचे खापर अशी मंडळी दुसर्‍या कोणाच्या तरी डोक्यावर फ़ोडताना दिसतील. स्वत:चे अपयश किंवा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तिरस्कार व द्वेष हा सर्वात सुरक्षित व सोपा आडोसा असतो. तेवढेच नाही तर अशा पराभूत मनोवृत्तीचा जमाव गोळा करायला, त्याचा भरपुर उपयोग होतो. म्हणूनच ज्यांच्याकडे आपण भयभित होऊन बघत आहात ती म्डळी स्वत:च भयगंडाने पछाडलेली आहेत हे आधी ओळखा. 


   हिटलर किंवा त्याची ज्य़ु जमातीच्या द्वेषावर उभी राहिलेली नाझी चळवळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. ज्यू जमात संपवणे हे त्याचे उद्दीष्ट अजिबात नव्हते. एकदा हिटलरला त्याबद्दल विचारण्यात आले, की ज्य़ु जमातीचा संपुर्ण नि:पात करण्यात यावा असेच तुझे मत आहे का? त्यावर त्याने दिलेले मत डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला, ‘ छे छे, ज्य़ु नावाचा कुणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्य़ु नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणीतरी हाडामासाचा, खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा शत्रू नसेल तर लोकंना चिथावता येत नाही. केवळ अमुर्त कल्पना पुढे करून ही गोष्ट साध्य होत नाही.’ हिटलरचे हे बोल आजच्या आपल्या देशातील चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या वर्तनाशी तपासून बघा. मग तुमच्या लक्षात येईल, की त्यांच्यापाशी कुठलाही विधायक कार्यक्रम नाही की विवेकबुद्धीला स्थान नाही. 


   आपण ज्यांच्याकडे बोट दाखवले आहे त्या चारही प्रवृत्ती द्वेषाच्या पायावर उभ्या आहेत. त्यांना काही निर्माण करायचे नसून, दुसरे काहीतरी नष्ट करायची त्यांची भूमिका आहे. मग सवाल येतो, की विध्वंसातून त्यांना काय साधायचे आहे? सूड घेण्यातून कसली भरपाई होत असते? आपला नाकर्तेपणा लपवता येतो ना? मग कोणी पुरातन बौद्ध मुर्तीचा विध्वंस तोफ़ा डागून करतो तर कोणी बाबरी पाडण्यात पुरूषार्थ शोधू पहातो तर कोणी जुन्या काळातल्या कुत्र्याच्या पुतळ्याला हटवण्यात मर्दानगी अनुभवतो. मजेची गोष्ट अशी दिसेल, की तुम्ही त्यांच्या अशा कसरतीकडे दुर्लक्ष केलेत, तर त्यांची आक्रमकता व क्षोभ अधिकच वाढलेला दिसेल. अशा तिरस्कार व द्वेषाने प्रेरित झालेल्या झुंडी दिसतात माणसांच्या, पण वागतात पशूसारख्या. माणुस शेवटी प्राणीच आहे आणि त्याच्यात पाशवी वृत्ती उपजतच असते. अनैसर्गिक अशा नागरी जीवनातले अपयश पचवण्याची कुवत नसलेल्या माणसात पाशवी वृत्ती लौकर उफ़ाळून बाहेर येते. मग अशी माणसे झुंड शोधू लागतात आणि चलाख लोक त्यांना आवश्यक असलेले द्वेष, तिरस्कार करण्यास योग्य वाटणारे काही प्रतिक देतात. 


   वयात येणारी मुलगी किंवा मुलगा जसा प्रेमात पडायला उतावळा असतो, तशी ही पराभूत मनोवृत्तीची विवेकशून्य माणसे अशा तिरस्कारणिय प्रतिक वा निमित्ताच्या शोधात असतातच. त्यामुळेच जो कोणी चलाख माणूस ती मानसिकता ओळखून चतुर व्यापार्‍याप्रमाणे त्यांना असे प्रतिक पुरवतो, त्याला झूंडीचे आपोआपच नेतृत्व मिळत असते. तिरस्कार करायला प्रतिक मिळाले, मग प्रतिक्रिया म्हणून ते पुरवणार्‍याबद्दल आदर व भक्तीभाव निर्माण होत असतो. आणि अशा निरर्थक श्रद्धा व भक्तीच्या आहारी जाऊन आपले जीवन सर्वस्व त्यावर उधळून टाकण्यामध्ये झुंडीत सहभागी झालेले लोक पुरूषार्थ समजू लागतात. अनेक देशात मानवी बॉम्ब म्हणून मरणाला हसतहसत कवटाळणारे, किंवा आंदोलनात सहभागी होऊन पोलिसांच्या तावडीत सापडणारे, त्याच झूंडीतले असतात. जेव्हा अशा झुंड तयार होतात, तेव्हा त्यात अल्पबुद्धीचे लोक सहभागी होऊन द्वेषाला तिरस्काराला खतपाणी घालायचे मुद्दे पुरवू लागतात, बदल्यात त्यांच्या अल्पबुद्धीला अभ्यासक वा तत्ववेत्ता अशी मान्यता झुंडीकडून मिळत असते. आणि हे आजकालचे नाही. हजारो वर्षाच्या मानवी इतिहासात त्याचीच सतत पुनरावृत्ती होताना दिसेल. तेव्हा तीही नैसर्गिक अपरिहार्यता आहे समजून जगणे विवेकी माणसाच्या हाती असते.


   मग यावर उपाय कोणता? उपाय एकूण मानव जमात आपोआप शोधून काढत असते. जोवर एकूण समाजाची सोशिकता टिकून असते, तोवर अशा झुंडींची मस्ती चालते. पण त्या सोशिकतेचा कडेलोट होतो तेव्हा संयम सोडून अवघा समाजच त्या झुंडींपेक्षा अधिक हिंसक होऊन त्या झुंडींचे निर्दालन करायला अधिक पाशवी रूप धारण करतो. तेव्हाच त्या झुंडींचे निवारण होत असते. या झुंडी समाज जीवनाला तापदायक असल्या तरी वारंवार अवतार घेतच असतात आणि समाजजीवन विस्कटून टाकत असतात. आपल्या पाशवी वृत्तीने त्या झुंडी सामान्य शांततामय जीवन जगायला धडपडणार्‍या मोठ्या लोकसंख्येला शेवटी पाशवी पातळीवर आणुनच स्वत:चे निर्दालन करून घेतात. आजवरचा मानवी इतिहास त्याचाच साक्षिदार आहे. 


Wednesday, September 19, 2012

(पुण्यनगरीची ब्रेकिंग न्यूज) २/९/१२


नरेंद्र मोदींच्या भितीने
मध्यावधी निवडणूका?

(पुण्यनगरीची ब्रेकिंग न्यूज) २/९/१२

   नवी दिल्ली: शुक्रवारी अचानक कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपती भवनात गेल्या आणि त्यांनी प्रथमच नव्या राष्ट्रपतींची ब भेट घेतली. त्याची कारणे कोणीही माध्यमांना कळू दिलेली नाहीत. पण त्यामागे मध्यावधी लोकसभा निवडणूकीची दाट शक्यता आहे. किंबहूना त्याच कारणासाठी सोनिया प्रणबदांना भेट्ल्या आहेत. त्या भेटीमागे त्यांच्यासह कॉग्रेसला भेडसावणार्‍या भितीचे नाव नरेंद्र मोदी असल्याचे एका जुन्या जाणकाराचे मत आहे. मोदी येत्या वर्ष अखेर होणार्‍या गुजरातच्या विधानसभा निवाणूका जिंकले तर त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखता येणार नाही आणि मोदींना आणखी एक वर्ष दिल्लीच्या निवडणूकांची तयारी करण्यास सवड दिली; तर त्यांना पंतप्रधान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशा भितीने आता कॉग्रेस पक्षाला पछाडलेले आहे. त्याच बाबतीत प्रणबदांचे मत घ्यायला सोनियाजी राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या, असा निष्कर्ष निघतो.

   मागल्या काही दिवसात लागोपाठ मतचाचण्यांचे निष्कर्ष येत आहेत आणि त्यात नरेंद्र मोदी यांना लोकांची मिळणारी पसंती कॉग्रेसची झोप उडवणारी ठरली आहे. दिल्लीतील एका ज्येष्ठ पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतलेल्या या चाचण्या मुळातच कॉग्रेस पुरस्कृत असून त्यातून मध्यावधी निवडणुकीसाठीची ती चाचपणी आहे. पण त्या प्रत्येक चाचणीत मोदी यांनाच लोकांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने कॉग्रेसची बेचैनी वाढली आहे. सर्व बाजूनी मतांची चाचपणी व्हावी, म्हणुन प्रत्येक चाचणीत विभिन्न विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. अण्णा, रामदेव किंवा राहुल, अडवाणी, नितीशकुमार यांच्यासह तिसर्‍या आघाडीच्या पंतप्रधानाची कल्पना मांडूनही मोदींकडेच लोकमत झुकल्याचे प्रत्येक चाचणीने दाखवले आहे. त्यामुळेच मोदींनी दिल्लीकडे मोर्चा वळवण्यापुर्वी लोकसभा निवडणूका उरकणे कॉग्रेसला सुरक्षित वाटू लागले आहे. त्यामागे मोदींना गुजरातमध्येच रोखण्याचा डावही आहे.

   भारतीय गुप्तचर खात्यामध्ये दिर्घकाळ काम केलेले निवृत्त अधिकारी बी. रामन यांनी आपल्या ताज्या निबंधातून तशी शक्यता व्यक्त केली आहे. तेहरानला अलिप्त राष्ट्राच्या परिषदेल गेलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वर्तन आणि त्यांनी खूंटीस टांगून ठेवलेले पाकिस्तान भेटीचे आमंत्रण या दोन गोष्टींचा आधार घेऊन त्यांनी मध्यावधी निवड्णुकीही शक्यता शुक्रवारी लिहून टाकली. त्याच संध्याकाळी सोनिया प्रणबदांना भेटायला गेल्या. सत्ताधारी पक्षाच्या वतीने पंतप्रधान राष्ट्रपतींची भेट घेतो, पक्षाध्यक्ष नाही. पण इथे सोनिया राष्ट्रपती भवनात गेल्या. याचा अर्थच त्या घट्नात्मक कामासाठी नव्हेतर राजकीय सल्लामसलत करायला गेल्या असणार. म्हणुनच त्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यामध्ये ठेवण्य़ात आले आहे. कारण राष्ट्रपती म्हणून प्रणबदा राजकीय पक्षाचे हित बघू शकत नाहीत. पण गेल्या आठ वर्षात त्यांनीच प्रत्येकवेळी कॉग्रेस व युपीएला राजकीय संकटातून बाहेर काढण्याचे सर्व डाव खेळले होते. म्हणूनच मध्यावधी निवडणूकीबद्दल त्यांचा सल्ला घ्यायला सोनियाजी तिकडे गेल्या असणार. पण मोदींना गुजरातमध्ये अडकवून कॉग्रेसचा कोणता राजकीय लाभ होऊ शकतो?

   आज देशाच्या कुठल्याही भागात न जाता आणि स्वत:ला केवळ गुजरातमध्येच गुंतवून ठेवणार्‍या मोदींची लोकप्रियता सर्वाधिक आहे. त्यांना लोकसभा निवडणूकीत सर्वत्र फ़िरण्याच संधी मिळाली तर त्यात आणखीनच भर पडू शकते. पण गुजरातबाहेर त्यांना पडता आले नाही तर लोकप्रियतेचा पुरेपुर लाभही मोदी घेऊ शकणार नाहीत. आणि गुजरातच्या विधानसभा निवडणूका वार्‍यावर सोडून मोदी देशभर दौरे करणार नाहीत. म्हणूनच गुजरात विधानसभा निवडणुकी सोबतच लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेतल्या; तर मोदी गुजरात बाहेर प्रचाराला जाऊ शकणार नाहीत. याचाच अर्थ त्यांची लोकप्रियता असली तरी तिचा पुर्ण लाभ त्यांना एकत्रित निवडणूका झाल्यास घेता येणार नाही. गुजरात जिंकल्यावर त्यांना एक सव्वा वर्षाचा अवधी मिळाला, तर ते देशभर दौरे काढून आपल्या लोकप्रियतेचा भरपुर लाभ घेऊ शकतील. त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुजरात सोबच्या मध्यावधी लोकसभा निवडणूका होय.

   आताच लोकसभा मध्यावधी निवडणूक घेतल्यास कॉग्रेसचे आणखी दोन लाभ आहेत. एक म्हणजे अनेक घोटाळ्यामुले जी बदनामी दिवसेदिवस वाढते आहे, तिचा प्रादुर्भाव पुढल्या दिडवर्षात आणखी हानीकारक होऊ शकतो, त्यापासून मध्यावधीमुळे आपले नुकसान कमी होऊ शकेल असे कॉग्रेसला वाटते आहे. दुसरीकडे मोदी भाजपा वगळता जे अन्य विरोधक आहेत, त्यांना बेसावध गाठले तर अपुर्‍या तयारीमुळे त्यांनाही फ़ारसे यश मिळणार नाही. इतक्या अल्पावधीत तिसरी सेक्युलर आघाडी आकार घेऊ शकणार नाही, म्हणुनच ते एकत्रित निवडणूक लढू शकणार नाहीत. आणि सध्या अण्णा-रामदेव यांच्या प्रेमात पडलेल्या मतदाराला त्यांचे अनुयायी वापरू शकणार नाहीत. कारण इतक्या अल्पकाळात अण्णा टिमला आपल्या पक्षाची संघटनत्मक उभारणी करून निवडणूका लढणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांच्याकडून होणारे कॉग्रेसचे नुकसानही मध्यावधीमुळे टळू शकते.

   त्याच बाबतीत सल्लामसलत करायला सोनिया राष्ट्रपती भवनात जाऊन प्रणबदांना भेटल्या असाव्यात. आणि म्हणुनच त्या भेटीचे कारण गोपनिय राखण्यात आले आहे. एकतर राष्ट्रपती अशी राजकीय सल्लामसलत करू शकत नाहीत असे आहे आणि दुसरे कारण मध्यावधी निवडणूका विरोधकांसह मोदींना बेसावध गाठण्याचा डाव आहे. आणि तसे असल्यानेच पंतप्रधानांनी पाकिस्तानचे आमंत्रण असूनही तिकडे जाण्याबद्दल व ते स्विकारण्याबद्दल एक महिना उलटून गेल्यावरही टाळाटाळ चालवली आहे. सध्याचे संसदेचे गोंधळात सापडलेले पावसाळी अधिवेशन लौकर गुंडाळण्याचे पाऊल सरकारने उचलले, तर डिसेंबर अखेर लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून समजावे

Friday, September 14, 2012

पुरोगामी पतिव्रतांच्या उरावर सेक्युलर ‘बाजार’बसवी

   गुरूवारी डिझेलची दरवाढ केल्यावर काहूर माजणार याची कॉग्रेसला पुर्ण कल्पना होतीच. मात्र ते काहूर माजल्यावर एक दोन रुपयाची कपात करून दरवाढ पचवली जाईल, असे बहुतेक वाहिन्यांवरील मुर्खांनी सांगितले होते. कारण पुस्तकापलिकडचे जग बघायची सवय नसलेल्यांम अशा पढतमुर्खांना जगात खरोखरच काय घडते याच्याशी कर्तव्य नसते. अगदी अपेक्षेप्रमाणे विरोधकांनीच नव्हेतर कॉग्रेसच्या मित्र पक्षांनीही डिझेल दरवाढीला कडाडून विरोधाचे नाटकही छान रंगवले. पण आपला पुरोगामी देश शेवटी पतीपरमेश्वर मानणार्‍या मनोवृत्तीचाच आहे ना? तिथे पुरोगामीत्वही त्याच पातिव्रत्याच्या सोवळ्यात अडकलेले असते. मग बाहेरख्याली नवरा जसा रुसलेल्या पतिव्रता पत्नीला दाद देत नाही, तशीच आजच्या सेक्युलर कॉग्रेसची अवस्था आहे. त्यामुळेच जोवर मित्र व सहकारी पक्ष कपाळावर सेक्युलर सौभाग्यलेणे मिरवण्या्चे पातिव्रत्य जपणार आहेत; तोवर सेक्युलर व्याभिचारी नवर्‍याने लग्न मोडायची भिती कशाला बाळगायची? दोन दिवस शिव्या घालणारी पतिव्रता शेवटी वटसावित्रीचा दिवस उजाडला, मग पुन्हा हातात तबक घेऊन वडाची पूजा बांधतेच ना? आणि सातजन्मी हाच सेक्युलर नवरा हवा म्हणून उपास करतेच ना? मग कॉग्रेसने घाबरायचे कशाला? असा नवरा नुसता त्या सतीसावित्रीचा अपेक्षाभंगच करत नाही तर तिच्या उरावर बसून भावना पायदळी तुडवणारा चंगीभंगीपणा उजळमाथ्याने करतच असतो. अशा मुर्ख पतिव्रतेवरच्या अन्याय किंवा फ़सवणूकीने हळहळतात, तेही बेअक्कल असतात. तशीच आजच्या कॉग्रेस व सेक्युलर लाचारांची अवस्था आहे. म्हणुन तर इकडे हे सेक्युलर लाचार डिझेल दरवाढीवर रुसून बसले असताना; तिकडे कॉग्रेसने दरवाढ कमी करण्यापेक्षा उलट अनेक व्यापार उद्योगात ५१ टक्क्याहून अधिक परदेशी गुंतवणुकीची वारांगना या सेक्युलर पतीव्रतांच्या उरावर आणून बसवली. कारण हे लाचार सेक्युलर पक्ष तोंडाने खुप कॉग्रेसला शिव्या घालतील; पण गळ्यातले सेक्युलर मंगळसुत्र काढून घेण्याची वेळ आली किंवा पुरोगामीत्वाचे कुंकू पुसायची वेळ आली, मग निमुटपणे त्यागी पतिव्रतेसारखे कॉग्रेसच्या समर्थनाला उभे रहातील याची कॉग्रेसला खात्री आहे. म्हणूनच डिझेल दरवाढीची नाराजी कमी करण्याऐवजी मनमोहन सरकारने परदेशी गुंतवणूकीची बाजारबसवी या सेक्युलर पतिव्रतांच्या उरावर आणून बसवण्यापर्यंत मजल मारली आहे.

   गुरूवारी डिझेल दरवाढ केल्यावर शुक्रवारी आपल्या जनानखान्यातील या सेक्युलर पाळीवांमध्ये कुरबुरी होणार याची कॉग्रेसला खात्री होतीच. पण नाराजी दुर करण्याऐवजी कॉग्रेसने त्यांना आणखी दुखावण्याचे कारण काय असेल? त्याचे उत्तर वाहिन्यांवरील दिवट्य़ांना सापडत नव्हते. कारण त्यांची बुद्धीच खुंटली आहे. सेक्युलर मित्रांना दुखावून कॉग्रेस पक्ष आपल्याच सरकारला धोका का न्रिर्माण करते आहे? त्याचे उत्तर कुठल्याही शहाण्याकडे नव्हते. ते उत्तर असे आहे की कॉग्रेसला हे सरकार चालवायचे नाही, तर शक्य झाल्यास येत्या डिसेंबरपुर्वी निवडणुका घ्यायच्या आहेत. पण सत्ता अर्धवट सोडली व लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूका घेतल्या, असे पाप आपल्या डोक्यावर नको आहे. ते सरकार पाडायला विरोधी भाजपा सोबत जनानखान्यातले सेक्युलर पक्षच गेले आणि म्हणुन सरकार पडले व मध्यावधी निवडणूका आल्या, असे कॉग्रेसला दाखवायचे आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणूका येत्या डिसेंबरमध्ये होत आहेत. त्यात मोदी जिंकणार याची कॉग्रेसला खात्री आहेच. पण तिथे यश मिळवल्यावर मोदी दिल्लीच्या मोहिमेवर निघणार आणि त्यांना अवघे सहा महिने मिळाले तरी ते देश ढवळून काढतील, याची भिती कॉग्रेसला सतावते आहे. म्हणूनच मोदींना गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये अड्कवून लोकसभा निवडणूका उरकायची रणनिती कॉग्रेसने आखलेली आहे. मात्र तसे थेट करण्यासाठी लोकसभा बरखास्त केली, तर कॉग्रेस मोदींना घाबरलेली दिसेल. तसे व्हायला नको म्हणुन सरकार पाडायचे पाप आपल्या जनानखान्यातील सेक्युलर पतीव्रतांना करायला भाग पाडायचा डाव कॉग्रेसने योजला आहे. त्यासाठीच हमखास विरोध होईल अशी मि्त्र पक्षांची कळ कॉग्रेसने काढली आहे.

   आता मुद्दा असा आहे, की मित्र सेक्युलर पक्षांना मान्य नसेल तर त्यांनी सरकार भाजपाच्या मदतीने पाडावे. नाहीतर आहे ते निमुटपणे सहन करावे. म्हणजे दोन्ही बाजूंनी कॉग्रेसच जिंकते ना? आजचे सरकार चालवणे म्हणजे कसरतच आहे. त्यात अशा मित्रांच्या इशार्‍यावर नाचण्यापेक्षा आपले निर्णय ठामपणे घेऊन मित्रांनाच अडचणीत आणायचे डाव कॉग्रेस खेळते आहे. सेक्युलर मित्र गप्प बसले तर भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे ते भागिदार ठरतात, अधिक महागाई दरवाढीचेही खापर सरकार समर्थक म्हणून त्यांच्याही डोक्यावर फ़ुटते. आणि विरोधात जाऊन सरकार पाडले तर त्यांच्या सेक्युलर पातिव्रत्यावर कलंक लावता येतो. म्हणजे दोन्हीकडून व्याभिचारी नवरा कॉग्रेस सुटतो आणि फ़सते ती सेक्युलर पतिव्रता. कॉग्रेसला येत्या डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूका हव्या आहेत आणि त्यामागे नरेंद्र मोदींचे भय कारणीभूत आहे. त्यातूनच हा आक्रमक पवित्रा कॉग्रेसने घेतला आहे. त्यात मोदींचे कॉग्रेसला वाटणारे भय हा मुद्दा ज्या सेक्युलर मुर्ख विश्लेषकांच्या हिशोबातच नाही, त्यांना कॉग्रेसचा हा आक्रमक पवित्रा कशामुळे आला त्याचा थांगपत्ता लागू शकणार नाही. मग ज्याचे उत्तर सापडत नाही व तर्कानेही शोधता येत नाही, त्याला हे शहाणे अनाकलनिय ठरवतात. मुद्दा सोपा व सरळ आहे. येत्या डिसेंबरमध्ये गुजरात मोदी पुन्हा जिंकणार आहेतच. पण तो विजय त्यांना २०१४ सालच्या लोकसभेतील अर्धे यश मिळवून देईल. आणि पुढले दहा बारा महिने मिळाल्यास मोदी संपुर्ण देशच पादाक्रांत करतील, या भयातून कॉग्रेसने हा जुगार खेळलेला आहे. सर्वकाही परत मिळवण्याच्या आमिषाने युधिष्ठीराने जशी द्रौपदी पणाला लावली होती; तशीच आज कॉग्रेसने आपली लुळीपांगळी सत्ता पणाला लावली आहे.

Friday, September 7, 2012

सानेगुरूजी म्हणतात, निखिलसारखे पत्रकारच दंगली पेटवतात


अमळनेर गांवात आज विश्वधर्ममंडळाच्यावतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रांतील एक लहानसा भाग म्हणजे ते मंडळ होते.

हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे दंगे सुरू असताना असे मंडळ स्थापण्याचा बावळटपणा कोणी केला? ही स्वाभिमानशून्यता कोणाची? या दंग्याच्या आगीत तेल ओतल्याचे सोडून हे नसते उपद्व्याप कोण करीत होते?

काय सर्व हिंदुस्थानभर दंगे आहेत? नाहीत. ती एक भ्रांत कल्पना आहे. हिंदुस्थानांतील दहावीस शहरांत मारामारी झाली असेल. परंतु ही दहावीस शहरे म्हणजे कांही हिंदुस्थान नव्हे. लाखो खेड्यापाड्यांतून हिंदुमुसलमान गुण्योगोविंदाने नांदत आहेत. त्यांचे संबंध प्रेमाचे व जिव्हाळ्याचे आहेत. शेकडो प्रामाणिक मुसलमान नोकर हिंदूंची मुले खेळवीत आहेत. एकमेकांच्या ओटीवर हिंदुमुसलमान पानसुपारी खात आहेत. हिंदुमुसलमानात सलोखा आहे. 

परंतु वर्तमानपत्राना हे खपत नसते. ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो का तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो. 

मुंबईला एका इमारतीस आग लागते. परंतु आपण त्याच गोष्टीस महत्त्व देतो. मुंबईतील लाखो इमारती देवाने सुरक्षित ठेविल्या होत्या हे आपण विसरतो. त्याप्रमाणे एके ठिकाणी दंगा झाला तर त्यालाच आपण महत्त्व देतो. इतर लाखो ठिकाणी प्रेमळ शांतता आहे, ही गोष्ट आपण डोळ्याआड करून उगीच आदळआपट करु लागतो. प्रत्येक धर्मांतील संकुचित वृत्तीचे लोक अशा प्रकारे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर अश्रद्धा घेऊन जात असतात. जगाची होळी पेटत ठेवतात.  

   पुज्य सानेगुरूजी यांच्या ‘धडपडणारी मुले’ या ग्रंथातील ‘स्वामी’ नावाच्या कथेतील हा उतारा आहे. साठ वर्षापुर्वीच सानेगुरूजींचे निधन झाले. पण तेव्हाच त्यांनी हिंदू-मुस्लिम व भांडणे कोण लावून देतो आणि त्यावर आपली पोळी कोण भाजून घेतो ते लिहून ठेवले आहे. आपल्यावर त्याच सानेगुरूजींच्या राष्ट्र सेवा दलाचे संस्कार असल्याचा दावा निखिल वागळे आणि त्याच्या चॅनेलवर जमणारे प्रकाश बाळ, हेमंत देसाई, निळू दामले, डॉ.कुमार सप्तर्षी, किंवा अन्य चॅनेलवर दिसणारे डॉ. रत्नाकर महाजन, प्रताप आसबे, समर खडस इत्यादी अतिशहाणे करता असतात. त्यांची भाषा व बोलणे सानेगुरूजी यांच्या विचारांच्या जवळपास तरी येणारे आहे काय? की हेच दिवटे गुरूजींच्या शिकवणीचे विकृतीकरण करत असतात?

Tuesday, September 4, 2012

कोडग्या कोडग्या लाज नाही

सोमवारपासून किरी्ट सोमय्या सर्वच चॅनेलवर झळकत होते आणि विजय दर्डा, राजेंद्र दर्डा व देवेंद्र दर्डा यांच्यासह दर्डा कुटुंबावर कोळसा खाण घोटाळ्य़ासंबंधात सरसकट आरोप करत होते. त्याला अपवद एकमेव चॅनेल होता, त्याचे ना
व कायबीइन लोकमत. आणि आपले झाकून ठेवत दुसर्‍याचे वाकून बघणारे निखिल वागळे सच्चा पत्रकारितेच हवाले देत दुसर्‍य़ांची कुलंगडी काढण्यात गर्क होते. त्यावर मी फ़ेसबुकवर ‘डॉबरमना सज्जना’ ही टिपण्णी केल्यावर मंगळवारी सुर्य मावळल्यानंतर सच्चाईच्या आणाभाका घेत त्यांनी दर्डा फ़ॅमिलीवरच्या धाडी व एफ़ आय आर दाखल झाल्याची पहिली बातमी दिली. आणि आपण दर्डा फ़ॅमिलीच्या बातम्या दडपून ठेवल्या नाहीत, असे भासवण्यासाठी ‘आम्ही बातमीशी प्रामाणीक असतो’ असाही दावा केला. पण तसा दावा करण्यापुर्वी निखिलने आपल्यातल्या हुंग्या पत्रकाराचा आपण मुडदा पाडला आहे असे का सांगू नये? हे दर्डा कोण? ते कायबीइन लोकमतचे कोण लागतात, ते कोणी सांगायचे?

आमच्या वागळे, गलका चुपकर किंवा आणखी कोणाला कुठले् फ़ुरस्कार मिळाल्यावर त्यांचे चॅनेलशी असलेले नाते सांगणार्‍या वागळेने विजय दर्डा यांना एवढा मोठा सीबीआयचा ‘पुरस्कार’ मिळाला तर त्यांचे कायबीइन लोकमतशी असलेले नाते का लपवावे? डॉ. नीतू मांडके यांना युती सरकारच्या काळात अंधेरी येथे इस्पितळ वांधायला भूखंड मिळाला, तर त्यांनीच शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली होती आणि म्हणुनच त्यांना भूखंड मिळाला असे दुरदुरचे नाते शोधणार्‍या निखिलच्या मेंदूला आता गंज चढला आहे काय? हिंदमाता दादर येथील उड्डाण पुलाच्या बांधकामाचे कंत्राट युनीटी कंपनीला मिळाले, तर त्याच कंपनीने मातोश्री बंगल्याचे सुशोभीकरण केले होते, असे बारीकसारीक तपशील शोधणार्‍या निखिलला विजय दर्डा त्याच्याच वाहिनीचे विजय दर्डा हे मालक असल्याचे ठाऊक नाही काय? असेल तर ते सांगण्याची लाज का वाटावी? की निखिल व त्याचे सहकारी विजय दर्डांना नवरा मानतात आणि नवर्‍याचे नाव उखाण्यात घ्यावे, तसे त्यांचे झाले आहे? विजय दर्डा कॉग्रेसचे खासदार आहेतच. पण ते कायबीइन लोकमतचे कंपनी अध्यक्ष सुद्धा आहेत. किंबहूना त्याच कंपनीच्या व्यावहारिक ताकदीमुळे त्यांना कोळसाखाण मिळू शकली आहे. मग एवढी लपवाछपवी कशाला?

बाकीच्या जगासाठी विजय दर्डा कॉग्रेस खासदार असतील. पण निखिल व त्याच्या वाहिनीवरील सहकार्‍यांसाठी तेच विजय दर्डा मालक आहेत ना? मग आमचे विजय दर्डा आणि आमचे देवेंद्र दर्डा यांच्यावर एफ़ आय आर दाखल असे अभिमानाने सांगायला नको काय? तसे सांगितले असते तर तो बातमीशी प्रामाणिकपणा म्हणता आला असता. पण सच्चाई व प्रामाणिकपणा यांच्याशी निखिलचे सात जन्माचे वैर असल्यावर दुसरे काय होणार? मंगळवारी सीबीआयने एफ़ आय आर दाखल केले नसते आणि त्यासाठी शुक्रवार शनिवार उजाडला असता तर कायबीइन लोकमतवर ही सच्चाई निखिल उखाण्यात मालकाचे नाव घेऊन तरी दाखवू शकला असता काय? इतरांसाठी विजय दर्डा कॉग्रेस खासदार असतील, पण निखिल व लोकमतसाठी ते आमचे मालक असा अभिमानाने उल्लेख व्हायला हवा ना?

आणि होय, आमीर खानची पहिली मराठी मुलाखत किंवा तत्सम काहीही फ़डतुस बाबतीत आम्हीच पहिले, असे दावे करण्यात धन्यता मानणार्‍या निखिलने तर अभिमानाने सांगायला हवे होते, देशभर गाजणार्‍या व संसदेचे कामकाज दिर्घकाळ ठप्प करणार्‍या कोळसा घोटळ्यातही संपुर्ण देशातला पहिला एफ़ आय आर आमच्या कायबीइन लोकमतच्याच वाट्याला आलाय. मग मी सुद्धा दिलखुलासपणे निखिलसह त्याच्या प्रकाश बाळ, हेमंत देसाई इत्यादी भडभुंज्यांची प्रशंसाच केली असती. सानंदा प्रकरणात किंवा आदर्श घोटाळ्यात विलासराव देशमुखांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे छाती फ़ुगवून सांगणार्‍या हेमंत देसाईंनी आता कुठल्या खाणीतल्या कोळश्याने आपले तोंड काळे केले आहे? विजय, राजेंद्र व देवेंद्र दर्डासह निखिलला लाज नाही असे देसाईंना म्हणायचे आहे काय? नसेल तर ते कुठे दडी मारून बसले आहेत? निखिलची लाज शोधायला त्यांनी आतापर्यंत कायबीइन लोकमतच्या स्टूडियोमध्ये यायला हवे होते ना? कसे येतील, त्यासाठी आधी आपल्या गाठीशी थोडी का होईना लाज असायला हवी ना? इथे मामला कोडगेपणाचा आहे. म्हणतात ना, कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणे आज नाही.

आवडले तर लाइक बरोबर शेअर सुद्धा करा

http://bhautorsekar.blogspot.in/2012/05/blog-post_9562.html

मुर्खनाम शिरोमणी

मागल्या वर्षी बिहारच्या विधानसभा निवडणूका जवळ आल्या होत्या, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बिहारमध्ये प्रचाराला येऊ देणार नाही; अशा धमक्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्या होत्या. एका राज्याचा म
ुख्यमंत्री असा दुसर्‍या राज्याच्या मुख्यमंत्र्याला धमक्या देऊ शकतो काय? भारतीय राज्यघटना एका पक्षाच्या नेत्याने दुसर्‍या पक्षाच्या नेत्याला अमुक एका राज्यात यायला बंदी करण्याचे अधिकार दिले आहेत काय? नसतील तर तेव्हा कोण्या वाहिनीला किंवा त्यावरील दिवट्या बुद्धीमंतांना त्यातल्या घटनात्मक विरोधाभासाचा साक्षात्कार का झाला नव्हता? त्यापैकी कोणीच नितीशकुमार यांना तेव्हा कानपिचक्या देऊन राज्यघटनेचे हवाले देत उलट प्रश्न विचारले नव्हते ना? उलट त्याच धमक्यांचे सेक्युलर पराक्रम म्हणून कौतुक चालविले होते. त्यात आपले मुर्खनाम शिरोमणी कायबीईन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांचाही समावेश होता. आज त्यांनाच राज ठाकरे यांनी बिहारींना मुंबई-महाराष्ट्र बंद करू म्हटल्यावर राज्यघटना आठवली आहे. मग ही राज्यघटना तेव्हा तयार झाली नव्हती आणि आजच निर्माण झाली असे म्हणायचे आहे काय? वाहिन्या व माध्यमे यांच्या सेक्युलर खोटारडेपणाचा व बदमाशीचा यापेक्षा आणखी कुठला पुरावा देण्याची गरज आहे काय? सेक्युलर म्हणजे मराठी विरोध आणि सेक्युलर म्हणजे हिंदूच्या मुळावर येणे, असेच हळुहळू स्पष्ट होत आहे ना? मग समस्या काय आहे? प्रादेशिक अस्मिता किंवा हिन्दू-मुस्लिम अशी समस्याच नाही. सेक्युलर पाखंड हीच आज आपल्या देशाला भेडसावणारी समस्या आहे ना? मग तिच्यातूनच देशाला मुक्त करावे लागणार आहे ना?

डॉबरमना सज्जना श्वान पंथेची जावे


श्वान हे अत्यंत इमानदार जनावर असते असे अवघ्या जगात मानले जाते. पण त्याचे इमान हे त्याला पाळणार्‍याशी असते. मग तो पाळणारा गुन्हेगार आहे किंवा चारित्र्यसंपन्न माणुस आहे, याच्याशी श्वानाच्या इमानाला कर्तव्य
 नसते. अलिकडे ही इमान दारी बांधण्या्ची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात मानवी जमातीनेही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या पैसेवाल्यांना चार पायांचे श्वान म्हणजे कुत्रे पाळण्य़ाचा किंवा त्यातले जातिवंत कुत्रे पाळण्याच साफ़ कंटाळा आलेला आहे, त्यांनी असे मानवी श्वानपंथीय पाळण्याचा श्रीमंती छंद जोपासलेला दिसतो. त्यातले काही श्वान मग भुंकण्यात वाकबगार म्हणून ख्यातकिर्त झालेले आहेत तर काहींनी सामुहिक भुंकण्याचे नवनवे विक्रम करुन दाखवले आहेत. मग अशा श्वानांच्या मालकांनी त्यांच्यासाठी खास थेट प्रक्षेपणाच्या सुविधाच उभ्या करून दिल्या आहेत. उपग्रहवाहिन्या म्हणून त्या ओळखल्या जातात. अशा वाहिन्यांमध्ये कायबीइन लोकमत आघाडीवर असेल तर नवल नाही. कारण ज्यांचा जन्मच लायका कुत्रीने अवकाशात झेप घेण्याच्या युगात झाला, त्यांच्याकडून तशीच अपेक्षा करायला हवी ना?

जेव्हा उपग्रहाचा जमाना सुरू झाला नव्हता आणि नुसतेच अग्नीबाण सोडून प्रक्षेपणाची क्षमता वाढवली जात होती, तेव्हा अवकाशात ज्या पहिल्या सजीव प्राण्याला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला, त्याचे श्रेय लायका नावाच्या कुत्रीला होते. सोवियत युनियनच्या अवकाशयानातून सर्वप्रथम तिनेच अवकाशात झेप घेतली. बहुधा त्याच वर्षी निखिल वागळेचा जन्म झालेला असावा. त्यामुळे उपग्रहाच्या वाहिनीवरून भुंकण्याचे नवनवे विक्रम तो नेहमी प्रस्थापित करत असतो. सोमवारी ३ सप्टेंबर रोजी त्याने मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांच्यावर सलग पाच मिनिटे भुंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. अर्थात जो खरे बोलतो त्याला भुंकण्याची गरज नसते. आणि दरेकर खरेच बोलत असल्याने त्यांना आवाज चढवावा लागला नाही. पण समोर येण्यार्‍या सत्याला भेदरल्यामुळे निखिलला भुंकण्याखेरीज गत्यंतर नव्हते. म्हणूनच की काय हा डॉबरमन श्वान पंथेची गेला.

केरळ व अन्य राज्यात स्थलांतरीत कामगार म्हणजे अन्य राज्यातून येणार्‍या कामगार श्रमिकांची रितसर नोंद केली जाते. पोलिसांकडे तशी नोंद व्हावी लागते, असा मुद्दा आमदार दरेकर मांडत होते. तर निखिलने थेट त्यांच्यावर डॉबरमन या जातिवंत कुत्र्यालाही मागे टाकील, एवढ्या भसाड्या आवाजात भूंकायला आरंभ केला. जेणे करून प्रेक्षकांना दरेकर सांगत असलेले सत्य ऐकता येऊ नये. उलट दरेकर खोटे बोलत असल्याचे निखिल भुंकून भुंकून सांगत होता. आणि ज्याअर्थी निखिल खोटे म्हणतो त्याअर्थी दरेकर खरे सांगत असणार याची मला खात्री पटली होती. म्हणूनच मी मंगळवारी इन्टरनेटवर शोध घेऊन सत्यशोधनाचा प्रयास केला. आणि दरेकरच खरे असल्याचा पुरावाच मला मिळाला. मला आश्चर्य वाटले ते कॉग्रेस आमदार व प्रवक्ते भाई जगताप यांचे. कारण मी त्यांना बुद्धीमान व विवेकी अभ्यासू नेता म्हणून ओळखतो. त्यांनीही निखिलच्या धडधडीत खोटेपणाला दुजोरा देण्याचा प्रमाद केला, त्यात माझी मोठी निराशा झाली. कारण जगताप स्वत: कामगार नेता आहेत आणि त्यांनी निखिलच्या नादी लागून आपले अज्ञान असे जगासमोर आणायला नको होते. कारण केरळा्त अशी स्थलांतरीत परप्रांतिय कामगारांची नोंद होते, ही नुसती बातमीच नाही तर त्यावर तिथल्या विधानसभेत चर्चाही झालेली आहे. इथे त्या बा्तमीचा इंतरनेट दुवा मी देत आहे तो निखिल बघेल असे मला वाटत नाही. कारण तो अज्ञानातच आनंदी आहे व राहो. पण जगताप यांनी जरूर बघावा.

प्रेस ट्रस्टने ११ जुलै २०१२ रोजी दिलेल्या बातमीत केरळमध्ये सरकारच्या हुकूमान्वये पोलिसांनी ६३,२०० परप्रांतिय स्थलांतरीत कामगाराची नोंद केल्याची माहिती गृहमंत्री तिरुवंकूर राधाकॄष्णन यांनी विधानसभेत दिल्याची ही बातमी आहे. तिथे केरळात मनसेचे राज्य नाही, तर भाई जगताप यांच्याच कॉग्रेस पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अघाडीचे सरकार आहे. तेव्हा निखिलच्या भुंकण्याला दाद देऊन जगताप यांनी आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये एवढीच अपेक्षा. मुद्दा इतकाच, की दरेकर देत असलेली माहिती शंभरटक्के खरी होती. मग निखिल त्यांच्यावरच खोटेपणाचा आरोप करून भूंकत का होता? कारण सोपे होते. त्याच दिवशी त्याच्या मालक दर्डा फ़ॅमिलीच्या कंपनीवर सीबीआयच्या धाडी पडल्या होत्या ना? ते जे कोणी सीबीआयवाले तिथे आले वा धाडी घालत होते, त्यांच्यावर भूंकायची हिंमत नसली मग या डॉबरमनाने दुसरे काय करावे? निदान मालकाची अब्रू जाते आहे त्यावरचे लोकांचे लक्ष उडवण्याचे इमान तरी दाखवायला नको काय? त्यासाठी मग दरेकरना ‘दर्डा’वत शिकारीचा आव आणणे त्याला भाग होते. कारण बाकी सगळ्या चॅनेलवर दर्डा कंपनीचे धिंडवडे निघत असताना त्याची लपवाछपवी करायची, तर अन्य कुणाच्या अंगावर भुंकायला नको का? राज ठाकरे कोण लागून गेलेत; असे म्हणतानाचा निखिलचा आवेश असा होता, की सीबीआयवाले कोण लागून गेलेत. असेच त्याला भुंकताना म्हणायचे असावे. पण तिकडे तोंड वळवले तर कायबीईन लोकमतच्या शेअर्सचीही तपासणी व्हायची भिती असेल ना? त्यापेक्षा दरेकरवर भुंकण्यात डॉबरमना सज्जनाने आपली ताकद व बुद्धी खर्ची घातली. तिथे आपली खोटेपणाची भूक भागवून घेतली

आवडले तर लाइक बरोबर शेअर सुद्धा करा

http://www.ndtv.com/article/south/kerala-police-to-identify-lakhs-of-unregistered-migrant-labourers-208005http://www.dailypioneer.com/state-editions/kochi/90613-kerala-mulls-law-for-migrant-workers-registration.html


http://www.mid-day.com/news/2012/sep/030912-mumbai-Raj-Kerala-govt-registers-migrants-so-why-cant-we.htm


http://www.ndtv.com/article/south/over-60-000-migrant-workers-register-with-kerala-police-242172


http://bhautorsekar.blogspot.in/2012/02/blog-post_27.html
 — withSuresh Chiplunkar and 5 others.