महाभारतातली एक गोष्ट आठवते. श्रीकृष्ण हा कुंतीचा भाचा होता म्हणे. पण त्याचवेळी तो विष्णूचा अवतार म्हणजे भगवंतही होता. एकदा तो प्रसन्न चित्ताने कुंतीला म्हणतो, मी खुश आहे आता वाटेल ते वरदान मागून घे. विनासंकोच मी काहीही देउन टाकेन. क्षणाचाही विलंब न लावता कुंती म्हणते, जितकी संकटे आणता येतील तितकी आण. हे ऐकून साक्षात भगवंतही थक्क होऊन जातो. श्रीकृष्ण तिला चकीत होऊन म्हणतो, मी वरदान मागायला सांगितले आहे, शाप नव्हे. तर कुंती त्याला समजावते, संकटात तर तुझी आठवण येते आणि मदतीची गरज असते. त्यामुळे तुझा कायमचा वरदहस्त रहावा, तर संकटाची सोबतच हवी ना? जगाला गीतेचा महान मंत्र देणार्या भगवंताला या महिलेने दिलेला हा संदेश आपण किती लक्षात घेतो? आपण साक्षात भगवंत आहोत, म्हणून श्रीकृणाने अहंकार बाळगला असता, तर त्याला शाप किंवा वरदान देता आले असते, पण त्यातला आशय उमजला नसता. कुंतीने त्याला शाप किंवा वरदानातला फ़रक समजावला आहे. अर्थात तो समजून घेणार्यासाठी आजही वरदान आहे. उलट समजून घ्यायचेच नाही, त्यांच्यासाठी तोच शापही असतो. कुठलीही परिस्थिती उदभवते, तेव्हा त्याला शाप किंवा वरदान ठरवण्याची बुद्धी वा समज तुमच्यापाशी असावी लागते. अन्यथा वरदानालाही शाप बनवू शकता वा शापालाही वरदानात रुपांतरीत करू शकता. अक्षय तृतिया हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी मोठा मुहूर्त असतो. त्या दिवशी त्या संघटनेचे प्रमुख सरसंघचालक आपल्या सदस्य व अनुयायांसाठी वर्षाचा नवा संदेश वा दृष्टांत देत असतात. त्यासाठी काही हजार स्वयंसेवक एकत्र येतात. बाकीचे आपल्या परीने संपर्क साधनांची मदत घेऊन तो संदेश मिळवित असतात. ही अखंड चाललेली ती परंपरा यावर्षी कोरोना बाधेमुळे खंडीत झाली. पण इच्छाशक्ती असल्यावर साधनांचा तुटवडा नसतो. म्हणून मोहनजी भागवत यांनी यावर्षीचा दृष्टांत डिजीटल सुविधा वापरून प्रसारीत केला आणि त्याला संकटकाळाचीही पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यांचे संदेशवजा भाषण वा मार्गदर्शन ऐकून कुंतीची म्हणूनच आठवण झाली.
आज देशातील सर्वात मोठी सामाजिक व सांस्कृतिक संघटना अशी संघाची ओळख आहे. त्या संघटनेच्या विविध शाखा आहेत आणि मानवी जीवनाच्या नानाविध क्षेत्रामध्ये त्यांचे अनुयायी पाठीराखे आपापल्या परिने समाजहित साधण्याचे काम करीत असतात. त्यांनी याही काळात आपल्या कुवतीनुसार व विभागानुसार गांजलेल्या भारतीय नागरिकांना मदतीचा हात दिलेला आहे. त्याची कुठली योजना मध्यवर्ति नेतृत्वाने त्यांना दिलेली नाही वा त्यासाठी साहित्यही पुरवलेले असणार नाही. पण जिथे आहोत आणि जितकी साधने उपलब्ध आहेत, त्यानुसार मदतकार्य करावे, ही संघाची दिर्घकाळ शिकवण राहिलेली आहे. सहाजिकच कोरोनाचा उपद्रव सुरू झाला व त्याने देशभर थैमान घातले; तेव्हा असे लाखो संघ स्वयंसेवक कामाला लागलेले असणार. हे वेगळे सांगण्याची अजिबात गरज नाही. पण स्वयंप्रेरणेने व संघाच्या शिकवणीने कामाला लागलेल्यांना त्यातला समान आशय व सुत्र समजावण्याची गरज होती व आहे. अन्यथा नेहमीच्या जीवनात गुरफ़टलेल्या सामान्य स्वयंसेवकालाही परिस्थिती भारून टाकत असते. त्यानुसार त्याच्या प्रतिक्रीया उमटत असतात. मात्र त्यात कुठे गफ़लत झाली वा विपरीत काही घडल्यावर त्याचे खापर संघावर फ़ोडायला अनेकजण टपलेले असतात. अशा एखाद्या किरकोळ चुकीमुळे लाखो पटीने केलेले मोठे महत्वाचे कार्य मात्र मातीमोल होऊन जात असते. म्हणूनच लाखोच्या संख्येने जनसेवेत गुंतलेल्या कार्यकर्ते वा पाठीराख्यांना संयमाचे चार शब्द सांगून कामाचा हेतू वा आशय भावनांच्या लोंढ्यातून वहावत जाऊ नये, म्हणून सावध करण्याला महत्व आहे. किंबहूना अशाच वेळी नेतृत्वाची खरी कसोटी लागत असते. तशा काही चुका झाल्या तर संबंधितांशी नाते झुगारून जबाबदारी झटकण्याचा आजचा जमाना आहे. पण त्यातून प्रतिष्ठा जपली जाणार असली तरी संघटनेचे व कार्यकर्त्याचे चारित्र्य मात्र भ्रष्ट होऊन जाते. संघटनेच्या उदात्त हेतूलाच किड लागत असते. अशावेळी वडिलधारेपणाने आपल्या अनुयायांना योग्य मार्गदर्शन करणारा खरा नेता असतो. मोहनजी भागवत यांनी पाऊण तासाच्या आपल्या मार्गदर्शनात त्याचाच कुशलतेने उहापोह केलेला आहे.
सोमवारी अक्षय तृतियेचा मुहूर्त साधून भागवत यांनी जे विवेचन व मार्गदर्शन केले, त्याच्या बातम्या सर्वत्र आलेल्या आहेत. अर्थात माध्यमात आपल्या अजेंड्यानुसार अशा भाषणाचे वृत्त प्रसिद्ध केले जात असते. त्यातून अपेक्षित असलेला संदेश वा मार्गदर्शन पत्रकारांना किंवा टिकाकारांना कितपत मिळेल, हा भाग वेगळा. कारण ते मार्गदर्शन पत्रकारांसाठी नसते किंवा त्यांना कितपत आशय समजला याची संघ नेतृत्वाला फ़िकीरही करण्याचे कारण नाही. महाविद्यालयाच्या बुद्धीमान प्राध्यापकाने शाळकरी वर्गातल्या शिक्षणाची तुलना उच्चशिक्षणाशी करावी, तशीच अनेकदा टिका होत असते. पण ते व्याख्यान वा मार्गदर्शन ज्या समुदायासाठी आहे, त्याच्यापर्यंत काय पोहोचले, त्याची टीकाकारांना फ़िकीर नसते. म्हणूनच अशा टिकाकारांकडे दुर्लक्ष करून काम करावे लागते. या स्थितीत देशातील सर्वात मोठी सामाजिक सांस्कृतिक संघटना म्हणून कोरोना विरुद्धच्या लढाईत राष्ट्रीय प्रयासांना अधिक मजबूत करणे, ही संघाची जबाबदारी आहे. त्याच दृष्टीने भागवत यांनी शब्द व आशय योजलेला आहे. त्यात हिंदूत्व किंवा वैचारिक भूमिका शोधणे वा त्याचे राजकीय अर्थ लावणेच गैरलागू असते. मात्र त्याचवेळी आपले अनुयायी वा पाठीराखे हितचिंतक चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत, याची नेत्याने सावधानता बाळगली पाहिजे. पालघर येथे दोघा हिंदू साधूंची जमावाकडून निर्घृण हत्या झाली, त्यामुळे विचलीत होऊन सेवाकार्यात बाधा येता कामा नये; असाही एक संदेश त्यांनी दिला. याचेही कारण लक्षात घेतले पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनीच त्या बाबतीत बेजबाबदार विधान केलेले आहे. अशा घटनांचे राजकारण होऊ नये म्हणून अनिल देशमुख यांनी भूमिका घेणे समजू शकते. पण त्यांनी आगावूपणे त्या हल्लेखोर जमावात कोणीही मुस्लिम नव्हता, असे सांगणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यात मुस्लिमच मारेकरी हिंदू साधूंवर हल्ले करता्त, हे गृहीत व्यक्त झाले. त्याची काय गरज होती? त्यातून घातक संदेश जात असतो. भागवत यांनी त्याही बाबतीत विचलीत होऊ नका, असा आग्रह धरणे म्हणून उठून दिसते.
तबलिगी जमातीच्या उपटसुंभांनी आपल्या वागण्यातून एकूण मुस्लिम समाजाला बदनाम करून टाकलेले आहे. तर त्यांचे नावही न घेता भागवत यांनी एका गटाच्या विकृत वागण्यासाठी संपुर्ण समाज घटकाला दोषी मानायचे नाही, असे सुचवून या काळखंडातला सावधपणा दाखवला. हा नुसता राजकीय भूमिकेपुरता विषय नाही. त्याच्या पलिकडे जाऊन मदत कार्यातही धर्म जात बाजूला ठेवून गरजुला मदत देण्याचे औदार्य आवश्यक असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले. कोरोना कधी संपणार हे आज कोणीही सांगू शकत नाही. पण जेव्हा संपेल त्यावेळचे जग पुर्वीसारखे असणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच नव्या जगात व नव्या युगात संघाची भूमिका कशी असली पाहिजे? देशाला काय करावे लागणार आहे, त्याकडेही या विवेचनातून लक्ष वेधलेले आहे. स्वदेशीवर अधिक भर देण्याची संघाची जुनीच भूमिका आहे. पण त्याची प्रखर जाणिव आज फ़क्त भारतालाच नव्हेतर संपुर्ण जगाला झालेली आहे. स्वस्तातले म्हणून कुठलेही उत्पादन चिनकडुन आयात करण्याच्या आळसाने व चुकीमुळे आज जगभरच्या अनेक पुढारलेल्या देशांना स्मशानकळा आलेली आहे. परावलंबी स्थिती आलेली आहे. त्यातून देशाला बाहेर काढताना प्रत्येक गरजेची वस्तु आपल्या देशात निर्माण व्हावी आणि होत नसेल तर तिच्याशिवाय जगण्याची सवय लावायला हवी, हा दुरगामी मुद्दा आहे. हळुहळू जगातले बहुतांश पुढारलेले देश त्याचा विचार करू लागलेले आहेत. सरकारही त्यासाठी योजना आखू लागलेले आहे. मात्र अन्य राजकीय सामाजिक शहाण्या लोकांकडून त्याची वाच्यताही झालेली नाही. पण स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना भागवतांनी त्यावर अतिशय सुचक भाष्य केलेले आहे. त्याला दुरदृष्टी म्हणतात. नव्वद वर्षे ही संघटना कशामुळे चालली व चार पिढ्या त्यात कशाला समर्पित भावनेने सहभागी होऊ शकल्या, त्याची चुणूक या संकटकालीन मार्गदर्शनातून मिळते. कोणाही संघटनेचे बळ जितके तिच्या संख्येमध्ये असते, त्यापेक्षा अधिक बळ तिच्या पोक्त चाणाक्ष नेतृत्वामध्ये सामावलेले असते. संघाला मिळालेले नेतृत्व आणि विपरीत काळात कसोटीला उतरण्याची त्याची क्षमता, हे संघाचे बलस्थान व विस्ताराचे खरे रहस्य आहे. हे त्याच्या टिकाकारांना अजून समजूही शकलेले नाही.
आज देशाचा पंतप्रधान एक सामान्य स्वयंसेवक आहे. तो संघाचाही कधी मोठा पदाधिकारी नव्हता. पण अशाच सेवाकार्य मदत कार्यात त्याने कित्येक वर्षे खर्ची घातलेली आहेत. जमेल तिथून आपल्या भागात उदार लोकांकडे हात पसरून मदत गोळा करायची. ती तुटपुंजी मदत खर्या गरजवंतांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने वितरीत करायची. ही संघाची शिकवण अंमलात आणताना मोदी सार्वजनिक जीवनात आले आणि म्हणूनच लॉकडाऊनचा इतका मोठा धाडसी निर्णय यशस्वीपणे राबवू शकलेले आहेत. अपुरी साधने व साहित्याच्या बळावर नियोजनाने त्यांनी कोरोनाला थोपवून धरला आहे. कधीकाळी त्याही स्वयंसेवकाने असेच मार्गदर्शन घेऊन वाटचाल करताना देशाचे नेतृतत्व आपल्या हाती घेतले आहे. सहाजिकच देशाचा नेता म्हणून १३० कोटी जनतेचे आरोग्य वा देशाचा कारभार हाकताना त्याला साधनांची कमतरता घाबरवू शकली नाही. त्याचे श्रेय भले भाजपाला वा मोदींना मिळत असेल. पण त्यातली पुण्याई यापुर्वीच्या सरसंघचालकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनात सामावलेली आहे. किती टिकाकार वा भाष्यकारांनी भागवतांच्या भाषणानंतर त्याचा उल्लेख केला? आपल्याला देश उभा करायचा आहे व प्रत्येक नागरिक त्यातला सारखाच घटक आहे, हा त्यातला गाभा आहे. नुसता देश नाही तर अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना बोलली गेली खुप. पण मोदींनी देशाचा पंतप्रधान म्हणुन राबवून दाखवली. म्हणून जगभर त्यांचे कौतुक होते. पण त्या जगाला अजून त्यामागचे सुत्र कितपत उमगलेले आहे? संकटातही वरदान शोधण्याची वेगळी सकारात्मक भूमिका मोदी मांडतात, पण ती शिकवण संघातून आलेली आहे आणि त्याचेच प्रतिबिंब भागवतांच्या त्या मार्गदर्शनात पडलेले आहे. शापालाही वरदान बनवण्याची किमया ज्याला आत्मसात करता येते, तोच खरा स्वयंसेवक होऊ शकतो, इतकाच त्याचा अर्थ आहे. तो समजून घेतला तर संघ समजू शकेल. मग संघातून घडणारे नेतृत्व म्हणजे काय त्याचा उलगडा होऊ शकतो. आपल्या जागी नरेंद्र मोदी व संघटनेच्या प्रमुखपदी असलेले मोहनजी भागवत यांच्यातले हे साम्य साधर्म्य कोणी तरी सांगायला दाखवायला हवे होते, म्हणून हा लेखनप्रपंच. लागोपाठच्या पराभवानंतर जबाबदारी झटकून पळ काढणार्या राहुल गांधींच्या कौतुकात रमलेल्यांना नेतृत्वाची कसोटी संकटाला सामोरे जाण्यात असते, हे कसे कळायचे?