Wednesday, November 28, 2012

पत्रकारितेतील बुवाबाजी



   १९७८ सालची गोष्ट आहे. तेव्हा मुंबईतून प्रकाशित होणार्‍या ब्लिट्झ नावाच्या साप्ताहिकात मी वर्ष भर काम केले. ते मुळातच इंग्रजी साप्ताहिक होते. त्याच्या हिंदी, उर्दू व मराठी अशा अन्य भाषेतील आवृत्त्या निघत असत. मी मराठी आवृत्तीमध्ये काम करत होतो. त्या साप्ताहिकाचे संपादक मालक रुसी करंजिया हे पारसी गृहस्थ थेट इंदिरा गांधी वगैरे मोठ्या नेत्यांना जाऊन भेटायचे, त्यांच्या मुलाखती घ्यायचे म्हणून त्यांच्या ना्वाचा तेव्हा राजकीय वर्तुळात मोठाच दबदबा होता. ते करंजिया सत्य साईबाबाचे मोठे भक्त होते. तसे ते कम्युनिस्ट विचारसरणीचे म्हणूनही मानले जायचे. पण त्यांची ही साईभक्ती अजब कोडे होते. त्या साप्ताहिकाच्या कार्यालयात निरंजन माथूर नावाचा एक जादूगार यायचा व तिथल्या सर्वांशी तो चांगला परिचित होता. आमच्याही विभागात येऊन गप्पा मारायचा. त्याने करंजिया यांचे साईभक्तीपासून मन वळवण्याचा खुप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सत्यसाईबाबा कुठलीही वस्तू रिकाम्या हातातून काढून भक्तांना विस्मयचकित करीत असत आणि ती वस्तू भक्ताला प्रसाद म्हणून देत असत. त्यांच्या प्रमाणेच आपणही चमत्कार करून दाखवतो, असे या जादूगाराने करंजियांना आव्हान दिले. एकदा ते त्याला घेऊन सत्यसाईबाबांकडे गेले. बाबांनी जी वस्तू काढली ती त्याने तिथल्या तिथे काढून दाखवली. तरीही करंजियांची साईभक्ती कमी झाली नाही. तो किस्सा तो सर्वांना सांगायचा. पण तो महत्वाचा नाही. त्या अनुभवातून तो माथुर काय शिकला ते त्याचे निरुपण महत्वाचे होते. मी ते कधीच विसरणार नाही. त्याचे म्हणणे काय होते?

ज्या दिवशी तो सत्यसाईंकडे करंजियांच्या सोबत गेला होता, तेव्हा त्याने आपल्या सोबत अशा सर्व वस्तू नेलेल्या होत्या, ज्या सत्यसाई अकस्मात काढून भक्तांना चकित करतात. त्यात अंगारा, सफ़रचंद अशा वस्तूंचा समावेश होता. हातचलाखीने त्याने त्या सर्व काढून दाखवल्या होत्या. पण जर त्यादिवशी सत्यसाईंनी नेहमीपेक्षा भलतीच म्हणजे जिलबी किंवा अंडे वगैरेसारखी वस्तू काढून दाखवली असती तर या निरंजनची फ़टफ़जिती झाली असती. कारण सत्यसाई ज्या वस्तू काढून दाखवतात, त्या त्याला ऐकून माहिती होत्या, तेवढ्य़ाच त्याने आपल्या शरीरावर कुठ्तरी दडवून ठेवल्या होत्या. बाकी काम होते हातचलाखीचे. त्याबद्दल त्याला आत्मविश्वास होता. पण अकस्मात कुठली वस्तू निर्माण करता येत नाही, अशीही त्याची वैज्ञानिक श्रद्धा होती. पण तो त्यात यशस्वी ठरला. मात्र त्याचे दु:ख होते वेगळेच. इतके सिद्ध करूनही त्याला करंजियासारख्या सत्यसाई भक्ताला अंधश्रद्धेपासून दुर करता आलेले नव्हते. मग तो म्हणायचा, की मी सगळी जादू करून लोकांना थक्क करतो, पण ती चलाखी आहे म्हणून सांगतो. ते न सांगता मी भगवी वस्त्रे परिधान करून बुवा महाराज झालो असतो; तर लाखो रुपये कमावले असते. कारण जादू किंवा चलाखी हाती आहे म्हणून तुम्ही बुवाबाजी करू शकत नाही. तुमची खरी दैवीशक्ती समोरच्या भक्ताच्या मनात वसत असते. एकदा त्याची भक्ती संपादन करा, मग त्याला चलाखी कळली तरी बिघडत नाही. कारण श्रद्धेने मनाचा कब्जा घेतला, मग खोटेही खरे ठरवता येत असते. कारण सामान्य माणसाला किंवा कुठल्याही बुद्धीमान माणसाला त्याच्या मनाच्याच ताब्यात रहावे लागते. त्याच्या विवेकबुद्धीला मनावर निर्णायक ताबा मिळवता येत नाही. तिथूनच माणसाच्या बुद्धीचा पराभव होत असतो आणि बुवाबाजीचे साम्राज्य सुरू होत असते.

   मी आजवर अनेक बुद्धीमंत, विचारवंत ऐकले वाचले आहेत. पण त्या जादूगार निरंजन माथुरने जी बुवाबा्जीची सोपी सरळ व्याख्या केली तितके सोपे विवेचन कोणाकडून मला कधीच ऐकायला मिळालेले नाही. किंबहूना त्याच्याच त्या विवेचनामुळे धार्मिक वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील बुवाबाजी व अंधश्रद्धेवर मी टिकेचे आसूड ओढू शकलो, असेच मी मानतो. आणि आज जेव्हा अंधश्रद्धेच्या विरोधातला नवा कायदा येऊ घातला आहे; तेव्हा तर मानवी जीवनातील अन्य क्षेत्रातही बुवाबाजी भयंकर बोकाळली आहे. त्याकडे डोळसपणे बघायची मला अधिक गरज वाटते. मी आयुष्य खर्ची घातले त्या माध्यम व पत्रकारितेच्या क्षेत्राचा समावेशही अशा बिघडत चाललेल्या बुवाबाजीच्या क्षेत्रात होतो. मागल्या दोन दशकात कधी नव्हे इतका संचार व प्रसार साधनांचा आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. त्यातून माध्यमांनी व पत्रकारितेने अधिक मोठ्या जनमानसावर आपला प्रभाव निर्माण केला आहे. सहाजिकच त्यातला पेशा व उदात्त उद्दीष्ट मागे पडून, त्या क्षेत्राला व्यापाराचे हिडीस स्वरूप आले आहे. म्हणजे जसा कोणी बुवा किंवा महाराज त्याग व संन्यस्त वृत्तीचे दुकान थाटून ऐषारामी जीवन जगतो आणि वरती समाज उद्धाराच्या मोठ्या उदात्त वल्गना करत असतो, त्यापेक्षा आजची पत्रकारिता वेगळी राहिलेली नाही.

   बुवाबाजी म्हणजे तरी नेमके काय असते? जे लोक आपल्या नित्यजीवनातील समस्या अडचणींनी गांजलेले असतात आणि त्यांना त्यावर कुठले व्यवहारी उपाय सापडत नसतात, त्यांना आपल्यापाशी काही अलौकिक दैवी चमत्कारी शक्ती असल्याचे भासवून त्यांची फ़सवणूक करण्यालाच बुवाबाजी म्हणतात ना? मग आजची माध्यमे किंवा पत्रकारिता त्यापेक्षा कोणता वेगळा धंदा करीत आहेत? वृत्तपत्र हे वाचण्यासाठी असते, प्रसार माध्यमे ही लोकशिक्षण व प्रबोधनाचे साधन आहे, त्यांची आजची सगळी मदार माल खपवायच्या जाहीरतीवर अवलंबून असेल आणि त्यासाठी प्रबोधन, लोकशिक्षणाची त्यात गळचेपी चालू असेल; तर त्या व्यवसायात गुंतलेल्यांना आपण काही महान लोक उद्धाराचे कार्य करीत आहोत असा दावा करता येईल काय? कोणी डॉक्टर स्त्रीभृणहत्येचे वा गर्भलिंग चिकित्सेचे काम करून समाजविघातक धंदा करत असेल आणि कोणी आक्षेप घेतल्यावर त्याने आपले वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवाभावाचा मुखवटा चढवणे, ही बुवाबाजी नाही काय? ज्याने जीव वाचवायचा असतो त्यानेच जन्मापुर्वी गर्भाच्या हत्येला सहकार्य करणे किंवा त्यातून कमाई करणे गुन्हा असतोच. पण त्यानंतर पुन्हा तोंड वर करून आपण जनसेवा करतो, असे सांगणे बदमाशीच नाही काय? त्यालाच पाखंड किंवा बुवाबाजी म्हणतात. आज पत्रकारिता व माध्यमे तेवढेच करीत नाहीत काय? अधिक पाने व कमी किंमत असे आमिष दाखवून लोकांच्या ज्ञानात भर घालण्याऐवजी लोकांची दिशाभूल ही सुद्धा तशीच बुवाबाजी असते ना?

   लोकांना अधिक पाने व रंगीत पाने देण्याचा भुलभुलैया तयार करून अधिक खप मिळवणे व त्यातून अधिक जाहीरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी वाटेल त्या मार्गांचा अवलंब करणे ही पत्रकारिता आहे काय? ज्याच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असताना, जवळपास मोफ़त वर्तमानपत्रे वितरित केली जात आहेत, त्यात फ़क्त अधिक खप मिळवणे एवढाच हेतू आहे. मग त्यासाठी बहुतेक वृत्तपत्रांच्या संपादकांना विक्री व जाहीरात विभागाच्या तालावर नाचावे लागत असते. तसे नाचणार्‍यांनी अविष्कार स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकणे ही बुवाबाजी नाही तर काय आहे? कधी आपल्या राजकीय हेतूने कुठल्या पक्षाची वा नेत्यांची कुरापत काढायची आणि त्यांनी खुलासा दिल्यास प्रसिद्ध करायचा नाही, याला बदनामी म्हणतात. अशा बदनामीच्या सुपार्‍या घेतल्या जातात. ती कुठली पत्रकारीता आहे? अविष्कार स्वातंत्र्याच्या नावावर हे जे सुपारीबाजीचे उद्योग चालतात, ते उघडे पडले आणि कोणी अंगावर आले, मग लगेच पत्रकारितेचा मुखवटा लावायचा; अशीच आजच्या पत्रकारितेची अवस्था झालेली नाही काय?

   सहा महिन्यांपुर्वी मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणूका ऐन रंगात आल्या होत्या. विविध पक्षांचे उमेदवार किंवा आमदार, खासदार फ़ोडण्याचे उद्योग चालू होते. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधूकर पिचड यांनी शिवसेनेचा कोणी खासदार आपल्या पक्षात येणार असल्याची वावडी उडवली. मग प्रत्येक वृत्तपत्राने आपापले अंदाज सुत्रांच्या हवाल्याने थापा ठोकाव्यात तसे प्रसिद्ध केले. त्यात एकेकाळचे मान्यवर दैनिक महाराष्ट्र टाईम्सचाही समावेश होता. त्यांनी तर बेधडक शिवसेनेचे खासादार आनंदराव अडसूळ यांचा नावानिशी उल्लेख करून बातमी दिली. मग त्यांच्या संतापलेल्या पाठीराख्यांनी टाईम्सच्या कार्यालयात घुसून धिंगाणा केला. मग सर्वत्र एकच कल्लोळ माजला. काय केले होते त्या अडसुळवाद्यांनी? टाईम्सच्या कार्यालयातील पाच दहा संगणक व काही टेबले खुर्च्या मोडून फ़ोडून टाकल्या. तेवढ्याने संपुर्ण देशातील आविष्कार स्वातंत्र्यावर गदा आली म्हणुन काहूर माजवण्यात आले. काही वाहिन्यांनी त्यावर तास अर्ध्या तासाच्या चर्चा घड्वून आणल्या. प्रत्यक्षात महाराष्ट्र टाईम्सने जे छापले होते ती शुद्ध थाप होती. म्हणजेच अफ़वा पसरवण्याचे काम त्यांनी केले होते. पण ते पत्रकार म्हणुन केले तर त्याला उदात कार्य म्हणावे, असा त्यांचा आणि तमाम अविष्कार स्वातंत्र्यवाद्यांचा दावा होता. एकवेळ तो दावा वादासाठी मान्य करू. पत्रकार किंवा त्यांच्याशी संबंधीत कामावर हल्ला झाल्यास त्यालाच अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला म्हणायचे असेल, तर परवा ११ ऑगस्टला आझाद मैदानावर घडले ती काय अविष्कार स्वातंत्र्याची महापूजा होती का? तिथे पोलिसांसह माध्यमांचे प्रतिनिधी व त्यांच्या थेट प्रक्षेपणाच्या गाड्यांवर रझा अकादमीच्य गुंडांनी जीवघेणा हल्ला चढवला. त्याला काय म्हणायचे? त्याबद्दल कुठल्याच वृत्तपत्राने, वाहिन्यांनी वा पत्रकारांच्या संघटनेने साधा निषेधाचा शब्द का उच्चारला नाही? की शिवसैनिकांनी वा संभाजी ब्रिगेड, बजरंग दल अशापैकी कोणी मारहाण, मोडतोड केली तरच अविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला होतो? आणि रझा अकादमी वा अन्य कुठल्या मुस्लिम संघटनेने जीवघेणा हल्ला केला तरी ती सत्यनारायणाची पूजा असते का?

   अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या संबंधाने लोकसत्तेचे संपादक असताना कुमार केतकर यांनी उपहासात्मक लेख लिहिला होता. तेव्हा ठाण्यातील त्यांच्या घराला शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डांबर फ़ासले. तर त्यालाही मोठाच हल्ला मानले गेले होते व आक्रोश करण्यात आला होता. मग रझा अकादमीच्या हल्ल्याबद्दल मौन कशाला? याला पक्षपात म्हणत नाहीत, याला भंपकपणा व थोतांड म्हणतात. यालाच बुवाबाजी म्हणतात. बुवा जसे काही मोजक्या भक्तांना व्यक्तीगत दर्शन देतात, त्यांच्यावर खास अनुग्रह करतात आणि बाकीच्या भक्तांना गर्दी म्हणुन तुच्छ वागणुक दिली जात असते. आजची माध्यमे व पत्रकारिता तशीच झालेली नाही काय? काही पक्ष किंवा नेते यांना प्रसिद्धी मुद्दाम द्यायची आणि इतरांना मुद्दाम अपायकारक प्रसिद्धी द्यायची, असे चालत नाही काय? जो लाखो करोडो रुपये दानदक्षीणा देईल, त्याच्यावर विशेष कृपा आणि ज्यांच्याकडे तेवढी दक्षीणा देण्याची कुवत नाही त्यांच्यावर अवकृपा, असा प्रकार सर्रास चालत नाही काय? अगदी सामान्य माणसाच्या व वाचकाच्या नजरेत येण्याइतपत आता ही पत्रकारितेची बुवाबाजी उघडी पडू लागली आहे. आणि ती उघडी पडत असली तरी हे भंपक लोक तेवढ्याच बेशरमपणे आपापले मठ चालवितच आहेत.

  लोकमत नावाच्या दैनिकाने मागल्या विधानसभा निवडणूकीत अशोकपर्व, विकासपर्व अशा पुरवण्य़ा छापल्या आणि त्याचे पैसे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडुन घेतले असा एक खटला चालू आहे. जाहिरातीच बातम्या किंवा लेख म्हणुन छापून मतदार वाचकांची दिशाभूल केली जाते. त्याकडे निवड्णूक आयोगाचे लक्ष वेधण्यात आल्यावर कारवाई सुरू झालेली आहे. पण त्याबद्दलचे अवाक्षर आयबीएन लोकमत वाहिनीवर कधी आले काय? दुसर्‍या कोणी पॅन्ट घातली आहे तर त्या पॅन्टच्या आत कुठले अंतर्वस्त्र आहे, त्याला किती भोके किंवा चुण्या पडल्या आहेत, ते भिंग घेऊन आपण तपासतो असा आव आणणार्‍या त्या वाहिनीच्या संपादक निखिल वागळे यांनी कधी त्या पेडन्युज प्रकरणी चर्चा का केलेली नाही? ‘उत्तर द्या’ म्हणून इतरांच्या अंगावर भुंकणार्‍यांनी कधीतरी आपल्या मालकांच्या पायाला निदान दात तरी लावावेत ना? मालकाचे पाय चाटायचे आणि इतरांवर भूंकायचे याला इमान दारी बांधलेली पत्रकारिता म्हणतात. आणि त्यातूनच पत्रकारितेची बुवाबाजी सुरू होत असते. मंत्रालयात राजेंद्र दर्डा यांच्या स्वीय सहाय्यकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यावर त्याची बातमी वागळे देत नाहीत, पण सुनिल तटकरे किंवा छगन भुजबळ यांच्या संडासात काय पडते, त्याचा वास हुंगून घ्यायला खास वार्ताहर पाठवतात, त्याला बुवाबाजी नाही तर काय म्हणायचे? त्याच वाहिनीवर येणारे प्रकाश बाळ, हेमंत देसाई असे जाणकार नेहमी नरेंद्र मोदींचे वाभाडे काढत असतात. पण वाहिनीचे मालक विजयभाई दर्डा अहमदाबादला जाऊन एकाच व्यासपीठावरून त्याच मोदींना राष्ट्रसंत ठरवतात. मात्र माघारी आल्यावर तेच विजयभाई तोच मोदी हा सैतान असल्याचेही सांगून पळवाट काढतात. मग मुद्दा इतकाच की अशा दुतोंडी माणसाला ठाममत वाहिनीसमोर आणायची हिंमत वा्गळे यांच्यात आहे काय? बाकी संघटना पक्षांच्या नेत्यांवर भुंकण्यात पुरूषार्थ व धन्यता मानणार्‍या या जातिवंत पत्रकाराने एकदा तरी आपण ‘चावू’ शकतो हेसुद्धा दाखवावे. पण बुवाबाजी करणार्‍यांना लाजलज्जा नसते.

   इतक्या तक्रारी व पर्दाफ़ाश झाले म्हणून निर्मल बाबांनी आपले दुकान बंद केले आहे काय? लोक काय म्हणतात त्याची बुवाबाजी करणार्‍यांना कधीच फ़िकीर नसते. चार संगणक अडसूळच्या पाठिराख्यांनी फ़ोडले म्हणुन ‘तोडफ़ोड संस्कृतीचे पाईक’ असा पांडित्यपुर्ण अग्रलेख लिहिणार्‍या महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना रझा अकादमीच्या हिंसाचारानंतरही त्यातली विधायक विकासाची संस्कृती अभिमानास्पद वाटली आहे. म्हणुनच त्यांनी आझाद मैदानच्या धिंगाण्याबद्दल बोलायचे टाळले आहे. हा दुटप्पीपणा नाही काय? सर्वत्र हेच चाललेले दिसेल. आजची पत्रकारिता अशाच बुवाबाजी करणार्‍यांनी ओलिस ठेवली आहे. वृत्तपत्रे व माध्यमे ही जाहीरातीसाठीचे प्लॅटफ़ॉर्म बनले आहेत. फ़रक इतकाच आहे, की तिथे निदान रस्ते, वाहन किंवा रेल्वे अशाही अन्य सुविधा उपलब्ध आहेत. जाहिरातीचे फ़लक झळकवायचे म्हणुन प्लॅटफ़ॉर्म उभे केलेले नाहीत. वृत्तपत्रे व माध्यमे मात्र आता जाहीरातीसाठीच चालविली जातात, हे लपून राहिलेले नाही. त्यातला अविष्कार स्वातंत्र्याचा आवेश व लढा किंवा लोकप्रबोधनाचा आव; निव्वळ ढोंगबाजी झालेली आहे. मालकाने डोळे वटारताच लोळण घेणारी बुद्धीमत्ता ही आजची संपादकीय पात्रता झालेली आहे. पण मुळात बुवाबाजीप्रमाणे अलौकिक शक्ती अंगी असल्याचा दावा करून लोकांची फ़सगत करणे; हा पत्रकारितेचा मुख्य धंदा बनला आहे. कारण आता त्या पेशामध्ये ध्येयवाद संपला आहे व सच्चाई लयास गेली आहे. व्यवसायनिष्ठा दोष बनला आहे. त्यामुळे मग पत्राकारीतेवर हल्लेही होऊ लागले आहेत. उदात व नैतिक शक्ती हेच पत्रकारितेचे खरे बळ असते. ते गमावले मग उरते ती शुद्ध बुवाबाजी. तिला कायदा संरक्षण देऊ शकतो; पण लोकांच्या प्रक्षोभातून तिची सुटका होत नसते. त्यामुळे पत्रकारीता ही आता नुसतीच बुवाबाजीसुद्धा राहिलेली नाही ती सुपारीबाजही झाली आहे. हा माझाच व्यक्तीगत आरोप नाही. लढवय्याचा मुखवटा लावून रोज मिरवणार्‍या इमान दारी बांधलेल्या झुंजार संपादक निखिल वागळे यांच्या ‘मालकाचा’ तो अनुभवी दावा आहे. गुजरातमध्ये जाऊन मोदी स्तुतीस्तवन म्हणुन परतल्यावर, लोकमत समुहाचे अध्यक्ष विजयभाई दर्डा यांना झालेला तो महान साक्षात्कार आहे. त्यांनीच त्याचे निरुपण १० ऑगस्ट २०१२ च्या ‘लोकमत’ अंकात एक खास लेख लिहून केलेले आहे. अजून निखिलने ते वाचलेलेही नसावे बहुतेक. "मोदी, माध्यमे आणि मी.." शिर्षकाच्या त्या लेखात विजय दर्डा लिहितात,

   ‘गेली अनेक वर्षे मी सक्रिय राजकारणात व प्रभावी वृत्तकारणात आघाडीवर राहिलेला कार्यकर्ता आहे. संसदेच्या कामकाजाची १४ तर वृत्तपत्रीय नेतृत्वाची ४0 वर्षे माझ्या उपलब्धीत जमा आहेत. यातल्या प्रत्येकच क्षेत्रातील अनवधानाने घडलेल्या लहानशाही चुकीसाठी, मग ती प्रामाणिक का असेना, फारशी दयामाया कोणी दाखवीत नाही आणि तिचा जेवढा म्हणून राजकीय वापर करता येईल तेवढा केल्यावाचून कोणी थांबत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. आपल्या भक्ष्यावर क्रूरपणे तुटून पडणे हा राजकारण आणि वृत्तकारण या दोहोंचाही आताचा व्यवसायधर्म आहे.’

   भक्ष्यावर तुटून पडणे कोण करतो? ही कोणाची प्रवृत्ती असते? एकीकडे श्वापदांची व गिधाडांची किंवा दुसरीकडे भोंदूभगत वा भामट्यांचीच ना? मग मी करतो ते आरोप आहेत, की एका त्यात व्यवसाय करणार्‍याचे ते अनुभवी बोल आहेत? फ़रक थोडाच आहे. मी अशा प्रकारे कधीच पत्रकारिता केली नाही. तो एक पेशा आहे समजून त्यात मिळणार्‍या कमाईची कधीच पर्वा केली नाही, पण समाधान व वाचकांची विश्वासार्हता मिळवण्यात धन्यता मानली. विजयभाई यांनी जे आजवर केले त्याचे चटके त्यांनाच बसेपर्यंत त्यांना त्यातले दु:ख ठाऊक नव्हते. कारण त्यांनीही त्यालाच व्यवसाय धर्म समजून तेच केले व आपल्या संस्थेतून चालविले. माझे तसे नाही. मी पत्रकरितेला लोकशिक्षणाचे व्रत समजून चार दशकाहून अधिक काळ कार्यरत आहे. त्यातून पोटापुरते मिळाले तरी खुश राहिलो. पण कुठली बुवाबाजी करण्याचा मोह मला झाला नाही. कदाचित मी ज्याला पत्रकारिता समजून जगलो व तीचा पाठपुरावा आजपर्यंत हट्टाने करतो आहे, ती पत्रकारिता आज कालबाह्य झाली आहे. त्यातली उदात्तता, व्रत व पेशा संपला आहे. तो पैसे फ़ेकणार्‍या समोर नाचण्याचा धंदा झाला आहे. पण त्यातही सोवळेपणाचा मुखवटा सोडायचा नाही, म्हणुन आजचे पत्रकार त्याची बुवाबाजी बनवत असतील. खर्‍या बुवाबाजीपेक्षा ही साळसुद बौद्धिक बुवाबाजी समाजाला अधिक घातक आहे. कारण सामान्य बुवाबाजीत एखादा भक्त वा त्यांचा गटच फ़सत असतो. पत्रकारितेच्या बुवाबाजीत अवघा समाजच भरकटत जाऊन अखेर रसातळाला जाण्याचा धोका असतो

पूर्वप्रसिद्धी   ‘रोखठोक’  दिवाळी अंक २०१२

Monday, November 26, 2012

एक साधासरळ माणूस: बाळासाहेब

माझी पत्नी स्वाती हिच्या पुस्तकाचे प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते मातोश्रीवरच २००६ मध्ये झाले होते. ‘इस्लामिक दहशतवाद: जागतिक आणि भारतीय’ हे पुस्तक तिने त्यांनाच अर्पण केले आहे. 





   १९८६ सालची गोष्ट आहे. मी तेव्हा ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक होतो आणि तेच शिवसेनेचे मुखपत्र होते. तेव्हा ‘सामना’ सुरू झाला नव्हता. त्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये माझ्या धाकट्या भावाचे लग्न होते. शिवसेनाभवनातच ‘मार्मिक’चे कार्यालय होते. आठवड्यात दोन दिवस तिथे प्रमोद नवलकर यायचे. त्या दिवशी संध्याकाळी मी त्यांना भावाच्या लग्नाची पत्रिका दिली. त्यांनी लगेच विचारले, ‘साहेबांबा दिली का?’ मी नकारार्थी मान हलवली. तर नवलकरांनी मातोश्रीवर पत्रिका गेलीच पाहिजे म्हणून आग्रह केला. मग काम आटोपल्यावर रात्री आठच्या सुमारास बाळासाहेबांना मी पत्रिका द्यायला गेलो. त्यांनी पत्रिका घेतली आणि विचारले शिरीला दिली का? शिरी म्हणजे राज ठाकरेंचे पिता श्रीकांत ठाकरे. बाळासाहेबांचे धाकटे बंधू आणि ‘मार्मिकचे भागिदार व प्रकाशक. झाले, माझी पंचाईत झाली. खरे तर मी नवलकरांच्या आग्रहाखातर उपचार म्हणुन साहेबांना पत्रिका द्यायला गेलो होतो. ते कशाला येतील लग्नाला, अशी आझी समजूत होती. पण त्यांनी नुसता शिरीला पत्रिका देण्याचाच विषय काढला नाही तर लग्नाला नक्की येतो; असे सांगून मला धक्का दिला. मग काय मला वांद्रा येथून उलट दादरला यावे लागले. तिथे जुन्या जागेत श्रीकांत ठाकरेंचे वास्तव्य होते. नऊ वाजून गेले होते, त्यामुळे मला बघून ते वैतागले. इतक्या रात्री काय, हा प्रश्न त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. तर ऑफ़िस उरकून आलो अशी त्यांना थाप मारत त्यांना पत्रिका दिली. दुसर्‍या दिवशी मी संपुर्ण दिवस लग्नात हजर होतो. माझ्या घरच्या वा अन्य कुठल्याही विवाहाला मी कधीच इतका वेळ खर्ची घातला नाही. साहेब येणार म्हणून मला थांबावेच लागले होते.

   मला असले सोहळे अजिबात आवडत नाहीत. म्हणूनच कितीही जवळचे लग्न असेल, तरी मी चेहरा दाखवण्यापुरती हजेरी लावतो. हा एकमेव अपवाद होता. दिवस मावळला आणि समारंभ आवरत असताना स्वारी हजर झाली. मीनाताई, श्रीकांतजी व कुंदाताई असे एकत्र आले आणि हॉलमध्ये गडबड उडाली. भावाचे अनेक मित्र केवळ त्यासाठीच थांबुन होते. त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिलाच; पण मी आईची ओळख करून दिल्यावर मीनाताईंसह त्यांनीच माझ्या वृद्ध आईसमोर वाकून अशीर्वाद घेतला. हे सर्वच विचित्र होते. व्हिडीओ टेप चालू होती. मग त्यांनी बाजूला घेऊन माझ्याशी कानगोष्ट केली. ती ऐकून कोणालाही हसू आल्याशिवाय रहाणार नाही. मी नेहमी भावंडांच्या लग्नपत्रिका विचित्र पद्धतीने बनवल्या होत्या. या धाकट्या भावाची आमंत्रण पत्रिका आंतरदेशीय निळ्या पत्रावर मालवणी भाषेत छापून पोस्टाने पाठवून दिली होती. पत्रिका सहसा वाचल्या जात नाहीत म्हणून मी असा काहीतरी उद्योग करायचो. त्या लग्न समारंभात बाजूला घेऊन साहेबांनी माझ्याकडे तीच पत्रिका मागितली होती. कारण त्यांना दिलेली पत्रिका नेहमीसारखी इंग्रजी पद्धतीची होती. पण अशीही पत्रिका असल्याचे कोणीतरी त्यांच्या कानावर घातले होते. आणि त्याविषयीची उत्सुकता त्यांनी अजिबात लपवली नाही. तिथे समारंभातच त्यांनी मला उद्या ती मालवणी पत्रिका मातोश्रीवर आणून दे; म्हणून फ़र्मावले. ते गेल्यावर प्रत्येकजण मला खाजगीत काय बोलले, त्याबद्दल विचारत होता.

   असा हा माणुस होता. ज्याला अर्धशतकभर लोक हुकूमशहा, ठोकशहा किंवा एकाधिकारशाही राबवणारा किंवा कायदा वगैरे झुगारणारा; म्हणून आरोप करीत होते. मी ‘मार्मिक’चा कार्यकारी संपादक होण्यापुर्वी माझेही असेच काहीसे मत होते. जेव्हा ती जबाबदारी घेण्याची बोलणी झाली; तेव्हा थेट भेटीत मी त्यांना म्हणालो, ‘मी शिवसैनिक नाही आणि तुमच्या राजकीय भूमिका मला मान्य नाहीत. तेव्हा साप्ताहिकाचा अंक काढण्याची जबाबदारी घेतो, पण तुमच्या राजकीय भूमिका मांडण्याचे काय?’ फ़ोटोत हसताना दिसतात, तसेच हसून ते उत्तरले, ‘हरकत नाही. शिवसेनेच्या भूमिकेच राहूदे. तुझी जी काही भूमिका आहे तीच मांडत जा. शिवसेनेला तुझी भूमिका मान्य आहे.’ मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. तर पुन्हा मिश्कील हसत म्हणाले, ‘आता मला जरा तुझी काय भूमिका आहे ते सांगशील का? जिथे अन्याय दिसेल तिथे ठोकायचे, ही भूमिका तर तुला मान्य आहे ना? तुला कार्यकारी संपादक करतोय; तेव्हा संपादकाचे काम तू करायचे. त्यात कोणाची ढवळाढवळ सहन करू नको; अगदी माझीसुद्धा.’

   १९८५ सालात शिवसेनेने मुंबई महापालिकेत बहूमताने आपली सत्ता पहिल्यांदाच प्रस्थापित केली आणि त्या वर्षीचा ‘मार्मिक’चा वाढदिवस अंक काढून त्याचे प्रकाशन थांबवण्यात आले होते. नव्या स्वरूपात त्याचे प्रकाशन सुरू करायचे चालले होते. त्यात पंढरीनाथ सावंत याने माझी व नवलकारांची भेट घडवून आणली. त्यांनीच बाळासाहेबांकडे नेले. त्यानंतर तिसर्‍या भेटीत आम्ही बोलत असतानाचा वरील संवाद आहे. ज्या माणसाला पुरेसा ओळखत नाही, किंवा ज्याचे काही मोजके लेख वाचले आहेत आणि ज्याने शिवसेनेच्या राजकारणावर बोचरी टिका केली आहे, त्याच्यावरच पक्षाच्या मुखपत्राच्या संपादनाची जबाबदारी टाकताना हा माणूस इतका विश्वास कसा दाखवू शकतो; याचे रहस्य मला तेव्हा उलगडले नव्हते. पण जसजसा कामाच्या निमित्ताने संपर्क वाढत गेला व सहवास वाढला; तेव्हा त्याचा उलगडा होत गेला. आम्ही नव्या स्वरुपातल्या ‘मार्मिक’चे दोन अंक काढल्यानंतरची गोष्ट आहे. आढावा घ्यायला त्यांच्यासोबत बैठक झाली होती. तेव्हा मी त्यांच्या व्यंगचित्राचा विषय काढला. त्यांनी ठामपणे व्यंगचित्र होणार नाही, असे सांगून टाकले. आपण सवड नसल्याने व्यंगचित्र काढायचे बंद केले आहे, तेव्हा त्याचा आग्रह नको; असे म्हणत त्यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला. पण मी हटून बसलो. संपादक मी असेन तर मला उपलब्ध असलेला जगातला एक यशस्वी व्यंगचित्रकार मी हातचा कशाला सोडू; असा सवाल मी त्यांना केला आणि थक्क झाल्यासारखे बाळासाहेब माझ्याकडे बघत राहिले. क्षणभर मला निरखून माझ्याकडे पाहिल्यावर ते म्हणाले, ‘कोणाशी बोलतोयस? मी शिवसेनाप्रमुख आहे.’ मीही म्हणालो,‘इथे शिवसेनेची बैठक नाही, ‘मार्मिक’च्या मालक, संपादक मंडळाची बैठक आहे’.

   हा माणुस जागेवरून उठला आणि आम्ही सगळेच उठलो. पण ते बैठक संपवायला उठले नव्हते. माझ्याजवळ आले आणि पाठ थोपटून म्हणाले, ‘शाब्बास, मला असाच संपादक हवा होता. आता कळले शिवसेना किंवा शिवसैनिकाची भूमिका कशी असते?’ मग त्यांनी माझ्या मागणीचा विचार करून तोडगा काढला. श्रीकांत ठाकरे स्वत: उत्तम व्यंगचित्रकार होतेच. साहेबांनी त्यांच्याशी लगेच फ़ोनवरून बोलणे केले आणि तिसर्‍या अंकापासून नवा ‘मामिक’ व्यंगचित्राच्या मुखपृष्ठासह प्रसिद्ध होऊ लागला. त्यात बाळासाहेबांची कल्पना ते कच्ची रेखाटून द्यायचे, त्याचे चित्रण व रंगकाम श्रीकांतजी पार पाडायचे. मग पुढे तर मी त्यांच्याकडून कव्हरस्टोरी नुसार मुखपृष्ठाच्या व्यंगचित्राचा हट्ट पुर्ण करून घेतला. त्याच वर्षीच्या ३१ आक्टोबरला इंदिराजींच्या हत्याकांडाला एक पहिले वर्ष पुर्ण व्हायचे होते. त्या अंकात ‘इंदिराजी, तुम्हालाही न्याय नाही’ अशा शिर्षकाचा लेख मी लिहिला होता आणि साहेबांनी अगतिक इंदिराही तराजू घेतलेल्या न्यायदेवतेसमोर बसलेल्या; असे व्यंगचित्र काढून दिलेले अजून डोळ्यासमोर आहे. पुढे काही महिन्यांनी शरद जोशी त्यांना भेटून गेले आणि नंतर त्यांनी सेनेवर टिकास्त्र सोडले. डॉ. दत्ता सामंत यांच्याशी जोशींच्या शेतकरी संघटनेने हातमिळवणी केली. त्यावर मला टिका करायची होती. पण सेनेने जोशींबद्दल मौन पाळण्याचे धोरण स्विकारले होते. मला ते पटले नाही. मी साहेबांशी बोललो, तर त्यांनी माझ्याशी सहमत नसतानाही लिहायचे स्वातंत्र्य दिले. पण लेख प्रसिद्ध झाला, तेव्हा दिलखुलास अभिनंदन सुद्धा केले. त्याच दिवशी शिवाजी पार्कवर सामंत जोशींची सभा होती. तिथे शेतकर्‍यांचे स्वागत करायला महापौर म्हणून भुजबळ पोहोचले, तर उपस्थितांनी त्यांची हुर्यो उडवली होती. तोच तो दिवस होता. पण सेनानेत्यांची नाराजी पत्करून बाळासाहेब माझ्यामागे ठामपणे उभे राहिले होते.

   अगदी अलिकडे त्यांची गाठ पडली होती, ती माझ्या पत्नीच्या, स्वातीच्या पुस्तकाचे मातोश्रीमध्येच प्रकाशन झाले तेव्हा. ‘इस्लामिक दहशतवाद; जागतिक आणि भारतीय’ असे त्या पुस्तकाचे नाव. तेव्हा आम्ही सगळे कुटुंबिय तिथे हजर होतो. पहिल्यांदाच माझ्या घरचे त्यांना जवळून भेटत होते व व्यक्तीगत बोलत होते. पण कित्येक वर्षापासूनची ओळख असल्याप्रमाणे सहज गप्पा मारणारा हा माणूस घरच्यांना थक्क करून गेला होता. राज शिवसेना सोडुन गेल्यानंतरची ही गोष्ट आहे. पहिल्यांदाच मला त्यांच्या आवाजातली जरब व आकांक्षा हरवली असे वाटले. जे सभोवती घडते आहे, त्यापासून त्यांनी स्वत:ला अलिप्त करून घेतले असावे; असेच मला त्या पावणेदोन तासाच्या गप्पातून वाटले. पुढे तर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. मग भेट होऊच शकली नाही. पण आयुष्याला व अनुभवाला श्रीमंत करून गेलेला माणूस, इतकेच माझ्या गाठीशी राहिलेले बाळासाहेब आहेत.

  ‘मार्मिक’च्या निमित्ताने त्यांना जवळून बघता आले व त्यांच्याशी वादविवाद सुद्धा झाले. त्यामुळेच मला वाटते हा माणूस सामान्य जनतेला जेवढा सहजपणे कळू शकला; तेवढा विचारपुर्वक त्याच्याकडे बघणार्‍यांना कधीच कळला नाही. दुरून डोंगर साजरे म्हणतात, त्याच्या नेमकी उलट परिस्थिती इथे होती. त्यांचा आणखी एक किस्सा डॉ. य. दि. फ़डके यांनी सांगितलेला आठवतो. युती सरकारच्या काळात प्रबोधनकारांच्या समग्र साहित्याने संकलन प्रकाशन करायची योजना राबवली गेली. त्यात फ़डके यांचा पुढाकार होता. त्याच्या प्रकाशनाच्या वेळीच फ़डक्यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी समारंभाला हजर राहू; पण फ़ुले हार वगिरे घेणार नाही, असे नवलकरांना आधीच सागितले होते. प्रत्यक्ष समारंभात प्रबोधनकारांच्या प्रतिमेला हार घालण्यापलिकडे कोणालाच फ़ुले हार देण्यात आले नाहीत, म्हणून मग फ़डक्यांनी चौकशी केली. तर तशी बाळसाहेबांची आज्ञा होती, असे नवलकरांनी त्यांना सांगितले. हा किस्सा सांगुन फ़डके मला म्हणाले, ‘यापेक्षा माणसाच्या सभ्यतेचा कुठला पुरावा द्यायला हवा?’ पण हा बाळासाहेब ठाकरे माध्यमांनी लोकांसमोर कधीच आणला नाही. शक्यतो त्यांची उर्मट, उद्धट, अतिरेकी, अरेरावीची प्रतिमा रंगवण्यात माध्यमांनी धन्यता मानली. त्यामुळेच खरा त्यांचा चेहरा लोकांच्या मनात ठसला होता, त्याचे दर्शन देशभरच्या माध्यमांना गेल्या रविवारच्या गर्दींमुळे झाले आणि सर्वांना थक्क व्हायची पाळी आली. जर हा माणूस हिटलर, हुकूमशहा होता आणि हिंसेचा व द्वेषाचा पुरस्कार करणारा होता, तर त्याच्यासाठी इतकी गर्दी लोटली कशाला, हे म्हणूनच अनेकांना कोडे वाटले. पण ज्यांनी कुठलाही चष्मा न लावता व पुर्वग्रह न ठेवता त्या माणसाला बघितले, अनुभवले, ऐकले वा समजून घेतले; त्यांना त्याचा साधेपणा जसा भावला तसाच त्याची महत्ताही उमगली होती. आपल्या एका आदेशाने मुंबई कधीही बंद करू शकणारा हा माणूस इहलोक सोडून गेला, तर त्याचा आदेश नसतानाही शेकडो पटीने अधिक लोक त्याला निरोप द्यायला जमले, लोटले. सामान्य माणसातून असमान्य होताना आपले सामान्यपण न सोडणार्‍या माणसाला त्याच्या अलौकिक असण्याची सामान्य जनतेने दिलेली ती पावती होती. ज्या कायदा व प्रशासनाला त्याच्या जिवंतपणी अपवाद करावे लागले; त्याच्या निधनानंतरही अंत्यविधीसाठी अपवाद करावाच लागला.

   कित्येक वर्षे व कित्येक पिढ्या ज्याच्या आख्यायिका व दंतकथा सांगितल्या जातील; असा एक अजब माणूस होता, ज्याचे नाव बाळासाहेब ठाकरे. कारण त्यांना व्यक्तीगत भेटलेले व त्यांच्या सहवासाची संधी मिळालेले जेवढ्या भल्याबुर्‍या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगतील, तेवढ्यच नव्हेतर त्यापेक्षा अधिक गोष्टी त्यांना न भेटलेले लोक त्यांच्याबद्दल सांगतील व सांगत रहातील. कारण ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. एक सहजपणे जीवन जगलेला व सहजपणे कुठल्याही परिस्थितीला सामोरा जाणारा, साधासरळ माणूस होता बाळासाहेब. आणि राजकीय अभ्यासक वा विश्लेषक म्हणुन विचाराल; तर ज्याला आपली अफ़ाट राजकीय तकद कळली सुद्धा नाही म्हणुन ज्याने तिचा पुरेपुर वापर केला नाही असा एक अनैच्छिक राजकारणी; असे मी या मनस्वी माणसाचे वर्णन करीन. ज्याने करोडो लोकांच्या मनात स्वत:विषयी चांगुलपणा जोपासण्यात आयुष्य वेचले व राजकारण शोधले, असा अलौकीक मानव.

Saturday, November 24, 2012

भगत सिंग आपल्यातलाच एक होता



आपल्या समाजात इतका भक्कम पाया प्रस्थापित करणार्‍या तालिबान व अन्य अतिरेकी संघटनांशी दोन हात कसे करायचे, यावर आपल्या देशात (पकिस्तानात) खुपच चर्चा व विचार चालू आहे. अर्थात ते योग्य व समर्थनियच आहे. तालिबानांनी आणलेली दहशत आणि माजवलेला थरार यांनी आपला देश कदाचीत कायमचा बदलून गेला आहे, प्रामुख्याने फ़ाटा प्रदेशातील लोकांचे जीवन तर ओळखण्यापलिकडे बदलले आहे. कधी संधी मिळालीच तर तिथले लोक सत्य बोलण्याची हिंमत करतात व सांगतात, कित्येक वर्षे त्यांना अविश्वसनीय इतक्या क्रौर्याचा अनुभव घ्यावा लागला आहे. त्यातून सुटका व्हावी अशी त्यांनी मागणी राहिली आहे, पण कोणी त्यांच्याकडे लक्षच दिलेले नाही.

खरे सांगायचे तर आपल्याला असलेले धोके व दहशत तालिबानांच्या पलिकडचे आहेत. आणि ही बाब अशी आहे, की आपल्याला त्याकडेच अधिक लक्ष देण्याची करज आहे. लोकांच्या मनाचा कब्जा ज्या अतिरेकाने घेतला आहे तो कदाचित खुद्द दहशतवाद्यांपेक्षा अधिक भयंकर धोका आहे. आणि अशी मानसिकता सर्वत्र आढळून येते आहे. चारही प्रांतांच्या मोठ्या महानगरात, आणि छोट्या शहरात व गावागावात ते जाणवते. प्लेगच्या साथीप्रमाणे तो धोका सर्वत्र वेगाने पसरतो आहे.

ती समस्या नुकतीच लाहोरमधल्या शदमान फ़वारा चौकाच्या नामांतर वादातून पुन्हा समोर आली आहे. मार्क्सवादी बुद्धीमंत, क्रांतीकारक व अत्यंत धाडसी स्वातंत्र्यवीर शहिद भगतसिंग यांचे नाव त्या चौकाला देण्यातून हा वाद उफ़ाळून आलेला आहे. तो शहिद कोण? ज्याला ब्रिटीश सत्तेच्या काळात १९३१ साली याच शदमान चौकात वयाच्या तेविसाव्या वर्षी फ़ाशी दिलेली होती.

याच वर्षीच्या १४ नोव्हेंबर रोजी दिलकश लाहोर समितीने भगत सिंगाच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा बहूमान करण्यासाठी या शदमान चौकाला त्याचे नाव देऊन नामांतराला मान्यता दिली होती. या समितीमध्ये प्रशासक, लेखक, आर्किटेक्ट, कलावंतांचा समावेश आहे. लाहोर या ऐतिहासिक महानगराचे सुशोभीकरण व तिथे रस्त्यांसह जागांचे नामांतर करण्यासाठी या समितीची नेमणूक झाली आहे.

ही मान्यता मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी लाहोर हायकोर्टाचे न्यायाधीश नासिर सईद शेख यांनी स्थानिक जिल्हा व शहर प्रशासनाला अशा नामांतराचा आदेश जारी करण्यापासून परावॄत्त करणारा आदेश लागू केला. एका अर्जाची सुनावणी करताना न्यायाधीशांनी प्रशासनाकडे काही उत्तरे मागितली आहेत. तहरिके हुरमत ए रसूल संघटनेचे सदस्य व शदमान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, झहिद बट यांच्या अर्जावर हा आदेश देण्यात आला आहे. चौधरी रहमत अली यांनीच पाकिस्तान हे नाव देशाला दिलेले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्या चौकाला त्यांचे नाव देण्याचा प्रशासनाचा मनोदय होता. पण शहिद भगतसिंग फ़ाऊंडेशन व काही तथाकथित मानवाधिकार संघटनांच्या पुढाकाराने प्रशासनावर दबाव आणण्यात आला, म्हणूनच हे नाव बदलण्याचा निर्णय झाला, असे बट यांच्या अर्जात म्हटले आहे. भारताचे हित बघणारा गट यामागे असल्याचा हवाला देतांनाच अर्जामध्ये पवित्र कुराण व सुन्नहचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. पण याच समितीने आधीच रहमत अली यांचे नाव लाहोरमधील एका भुयारी मार्गाला देण्याची शिफ़ारस केलेली आहे.

लाहोरमध्ये भडक ओबडधोबड व गलिच्छ वा वाटावा असाच हा चौक आहे, इतक्या विचित्र पद्धतीने त्याच्या आसपासच्या इमारती व रस्ते रंगलेले आहेत. त्यामुळेच भगतसिंग सारख्या क्रांतीवीराच्या स्मारकासाठी हा विद्रूप चौक हे दुर्दैवच म्हणायला हवे. संपुर्ण उपखंडाच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा झालेल्या या माणसाच्या स्मारकासाठी यापेक्षा अधिक चांगली जागाच हवी. पण वस्तुस्थिती अशी, की त्याच चौकात ब्रिटीशांनी ८० वर्षापुर्वी त्या क्रांतीवीराला फ़ासावर चढवले होते. आणि म्हणूनच तो चौक हीच त्याच्या स्मारकासाठी ऐतिहसिक हक्काची जागा आहे, असा दावा लाहोरच्या नागरिकांचा एक गट गेली अनेक वर्षे करतो आहे. आपण त्या स्वातंत्र्यवीराचे खुप जुने देणे लागतो असे त्या गटाचे म्हणणे आहे. कारण आपला देश (पाकिस्तान) त्याच स्वातंत्र्यलढ्यातून उदयास आला, ज्यात लक्षावधी मुस्लिम, हिंदू, शिखांनी सारखाच भाग घेतला होता.

काही दशकांपासून आपल्या देशाच्या इतिहासाचे इतक्या बेशरमपणे विकृतीकरण करण्यात आले आहे, की फ़ारच थोड्या लोकांना आज वास्तव माहित असेल. १९४७ सालापुर्वी लाहोर शहर व जिल्ह्यात ४० टक्क्याहून अधिक बिगर मुस्लिम म्हणजे प्रामुख्याने हिंदू व शिख वास्तव्य करीत होते. (पाकिस्तानी) पंजाबच्या अन्य जिल्ह्यातही जवळपास तसेच लोकसंख्येचे प्रमाण होते. जोवर सीमेच्या दोन्ही बाजूंना धार्मिक अत्याचार सुरू झाले नव्हते; तोवर ही परिस्थिती होती. ज्या फ़ाळणीमुळे मानवी इतिहासात सर्वात मोठे लोकसंख्येचे स्थलांतर झाले, ज्यामुळे मानवी हत्याकांड व आंधळ्या द्वेषाचा जन्म झाला, त्यापुर्वीची ही गोष्ट आहे.

भगत सिंगाच्या बाबतीत भारतीय गटबाजीचा विषय निघता कामा नये. भगत सिंगाचा जन्म तेव्हाच्या लायलपूर व आजच्या फ़ैसलाबाद जिल्ह्यातील झारनवाला गावात झाला. त्याचे शिक्षण लाहोरमध्ये झाले व त्याने पंजाबच्या अनेक जिल्ह्यात दौरे करून तरुणांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायची प्रेरणा दिली होती. समाजवादाने भारावलेल्या भगतसिंगाने देशाच्या अनेक शहरात जाऊन तरूणांना आपल्या अल्पायुष्यात प्रेरित केले होते. वस्तुस्थिती अशी आहे, की या (पाकिस्तानी) पंजाबच्या सुपुत्राची भारताने चांगली आठवण ठेवली आहे. त्याच्यावर चित्रपट, नाटके निघाली, पुस्तके छापली गेली, ही आपल्यासाठी लज्जास्पद बाब आहे. त्यामुळेच भगतसिंगाच्या स्मारकासाठी कोणी खास प्रयत्न वा लॉबींग करण्याची गरज नव्हती. त्याच्या कर्तृत्वानेच त्याला महान बनवले आहे. पण शोकांतिका अशी आहे, की पाकिस्तानच्या शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमातून आम्हीच त्याला पुसून टाकले आहे. जाणिवपुर्वक त्याला विस्मरणाच्या गर्तेत ढकलून दिले आहे.

म्हणूनच आपल्याला ज्याप्रमाणे दहशतवादाशी लढायची गरज आहे; तसेच आपल्याला अज्ञान व धर्मांधतेशी लढावे लागणार आहे. कारण त्यामुळे जो द्वेष व भ्रम निर्माण केला जातो, त्यातूनच अतिरेक व माथेफ़िरूपणा जन्माला येत असतो. शिक्षण क्षेत्रात याची सुरूवात खुपच पुर्वी झाली होती. पण जनरल झिया उल हक यांच्या लष्करी क्रांतीनंतर तिला अधिक वेग आला. आज आपल्याला ती प्रक्रिया उलट्या दिशेने माघारी फ़िरवण्याची गरज आहे. पण त्यासाठी योग्य निर्णय घेतले जात नाहीत. शालेय पाठ्यपुस्तकात अजून तोच चुकीचा विकृत पाढा वाचला जात आहे. वास्तवा पलिकडचे ठरलेले नायक व हिरो मुलांसमोर मांडले जात आहेत. आपला देश यापासून वाचवायचा असेल तर ताबडतोबीने दुरुस्त्या करण्याची गरज आहे. एका महान देशभक्त क्रांतीवीर व्यक्तीच्या नामकरणा सारख्या साध्या विषयात विरोध करून वाद निर्माण करण्याची जी मुभा मिळत आहे, त्यातून आपण कोणत्या धोक्याच्या सावटखाली जगत आहोत त्याची साक्ष मिळते. आणि अशी अनेक उदाहरणे आहेत.

लोकांची मानसिकता बदलणे अत्यंत गुंतागुंतीचे अवघड काम असते. अगदी बंदूकधारी दहशतवाद्यांच्या मागे जाण्यापेक्षाही लोकांची मनोवृत्ती बदलणे अवघड काम आहे. ह्या दोन्ही गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत, हे आपण विसरता कामा नयेत. कारण त्या दोन्हीचा उपाय वेगवेगळ्या मार्गाने होऊ शकत नाही. त्याकडे आपण एकच मोठी समस्या म्हणून बघावे लागेल. दहशतवादाने आपल्या आयुष्यात केवळ हिंसाच आणलेली नाही, तर त्याने आपल्या मेंदूची फ़ेररचनाही केली आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या मेंदूने आपल्याला अशा विचारांमध्ये गुंतवले आहे, की भूतकाळतून बाहेर पडण्यापासून ते विचार आपल्याला परावृत्त व भयभीत करतात.

अशा विचारातून एक संदेश सर्वत्र पोहोचवला जात असतो, जो मलाला युसूफ़जाईच्या विरोधात बदनामीच्या मोहिमा चालवतो. मलाला ऐवजी डॉ. अफ़िया सिद्दिकीच्या नावाने दिवस साजरा करायचा प्रचार होतो. तोच विचार तुम्हाला सतत भारताकडे शत्रू म्हणून बघायला प्रवृत्त करत असतो आणि दुसरीकडे पाकिस्तानातले अल्पसंख्यांक व महिलांच्या सशक्तीकरणाकडे डोळेझाक करायला भाग पाडत असतो. कुठल्यातरी मार्गाने हे चित्र बदलले पाहिजे, ज्यामुळे लोक आपल्या भूतकाळाविषयी सत्य जाणतील, शिकतील आणि त्यायोगे आपल्याला वर्तमान काळात काय करणे अगत्याचे आहे, याचा (पाकिस्तान्यांना) त्यांना बोध होऊ शकेल

कोमिला हयात ( लेखिका पाकिस्तानातील एक ज्येष्ठ पत्रकार व एका प्रनुख दैनिकाच्या माजी संपादिका आहेत. त्या ‘द न्यूज’ दैनिकात व अन्यत्र नेहमी वैचारिक लिखाण करीत असतात. हे त्यांच्या मूळ लेखाचे स्वैर रुपांतर आहे. शक्य असेल त्यांनी मूल इंग्रजी लेख मुद्दाम वाचावा.)
=====================.
http://www.thenews.com.pk/Todays-News-9-144392-Bhagat-Singh-was-one-of-us