मंगळवारी महापालिका निवडणूकीचे उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि तरीही कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाची संपुर्ण उमेदवार यादी जाहिर होऊ शकली नव्हती. त्यामुळे गुपचूप आपापल्या खास वशिल्याच्या माणसांना तिकिटे दिली असणार याची प्रत्येक पक्षातल्या इच्छुकांना खात्री पटली होती. सहाजिकच सर्वच पक्षांना बंडखोरीच्या रोगाने ग्रासले तर आश्चर्य नव्हते. पण त्या निमित्ताने जे निष्ठावान पक्ष कार्यकर्ते वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरा समोर आले, त्यापैकी दादर माहिम भागातील दोघांचे बोलणे खरोखर आजच्या राजकीय संस्कृतीचे उत्तम लक्षण मानता येईल. मजेची गोष्ट म्हणजे दोघेही कॊंग्रेस पक्षाचे स्थानिक नेते आहेत. एकाचे नाव अजित सावंत आणि दुसरयाचे नाव सदा सरवणकर. त्यांचा इतिहास ठाऊक नसलेले त्यांच्या बातम्या रंगवून सांगत असल्यावर चुथडा झाला नाही तरच नवल ना?
आज सरवणकर यांच्या सुपुत्राला उमेदवारी मिळाली म्हणून प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असा सावंत यांचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांवर पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचाही आरोप केला आहे. कार्यकर्ता पाच वर्षे राबतो आणि ऐनवेळी कुणा बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते अशी त्यांची तक्रार आहे. नेमका हाच आरोप २००४ साली त्यांना माहिममधून कॊग्रेस पक्षाची विधानसभा उमेदवारी देण्यात आली तेव्हा झाला होता. मुंबई कोंग्रेसचे अध्यक्ष गुरुदास कामत यांचे खास म्हणून अजित सावंत यांना पैसे खाऊन तिकिट दिल्याचा आरोप झाला होता. पण तो सावंत यांनीच फ़ेटाळून लावला होता. आज तेच सावंत त्याच माहिममधल्या तिकिट वाटपाबद्दल पैसे खाल्ल्याचा आरोप करतात; तेव्हा म्हणून गम्मत वाटते. कारण २००४ मध्ये त्यांनी केले तेच २००९ मध्ये त्यांच्या वाट्याला आले होते. फ़रक इतकाच होता की यावेळी उमेदवार दुसरया भागातून आयात केला नव्हता तर दुसरया पक्षातून आयात केलेला होता. त्याचे नाव सदा सरवणकर.
२००९ विधानसभा नि्वडणूक अर्ज भरायच्या अखेरच्या दिवसापर्यंत शिवसेनेच्या तिकिटाची प्रतिक्षा करणारया सदा सरवणकर यांनी शेवटच्या दिवशी कॊंग्रेस उमेदवार म्हणून माहिममधून अर्ज दाखल केला होता आणि बिचारे अजित सावंत हात चोळत बसले होते. कारण यावेळी शिवसेनेने बाहेरचा उमेदवार आयात केला होता. वहिनींचा भावजी म्हणून लोकप्रिय झालेल्या आदेश बांदेकरला सेनेने उसना उमेदवार म्हणून घोड्यावर बसवले होते. तेव्हा आमदारकी टिकवायला उतावळे होऊन सेनेला जय महाराष्ट्र करणारे हेच सरवणकर १९८५ साली किती नि:स्वार्थी शिवसैनिक होते हे पाहिले तर आजच्या अनेक कार्यकर्त्यांना चक्कर येईल.
लागोपाठ लोकसभा विधानसभा निवडणूकांत तेव्हा शिवसेनेने आपटी खाल्ली होती. मग बाळासाहेबांनी आपल्या तमाम शाखाप्रमुखांना महापालिका निवडणूकीत उतरवायचा धाडसी निर्णय घेतला. कुणालाच जिंकायची खात्री नव्हती. तेव्हा सरवणकर प्रभादेवीचे शाखाप्रमुख होते. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरायची टाळाटाळ केली. योगायोगाने तिथले एक जुने शिवसैनिक मोतीरामदादा तांडेल यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. सरवणकरांनी पळ काढल्यामुळे मग मुदत संपल्यावर नवा उमेदवार सेना भरू शकत नव्हती. म्हणून तांडेल यांना अधिकृत सेना उमेदवार बनवण्यात आले. पुढे जो चमत्कार घडला त्याने सरवणकर यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. कारण त्यांनी पाठ फ़िरवली त्याच सेना उमेदवारीने तांडेल यांना नगरसेवक बनवले होते आणि सरवणकर शाखाप्रमुख राहिले होते. मग त्यांच्या बरोबरीचे नाराय़ण राणे, कालिदास ओळंबकर, रामदास कदम, विठ्ठल चव्हाण आमदार होऊन गेल्यावर १९९२ साली सरवणकर नगरसेवक होऊ शकले आणि आमदारकी पदरात पडेपर्यंत २००४ साल उजाडले. त्याआधी तुलनेने नवख्या विशाखा राऊत महापॊर व आमदार होऊन गेल्या होत्या.
मग २००९ सालात आमदारकी टिकवण्याची धडपड करण्याची नामुष्की सरवणकर यांच्यावर आली. आधी त्यांनी आपली उमेदवारी कापण्याचा संशय घेऊन आपल्याच एकेकाळच्या गॊडफ़ादर मनोहर जोशी यांच्या घरावर अनुयायांचा मोर्चा काढला होता. शेवटी उद्धवरावांनी तोंडाला पाने पुसल्यावर नारायण राणेंना शरण जाऊन कॊग्रेसची उमेदवारी मिळवली होती. तिचा उपयोग आमदरकी टिकवायला झाला नाही आणि कॊंग्रेसमध्ये डाळ शिजत नाही म्हणुन पुन्हा सेनेचे दार ठोठावत मुलाचे प्यादे पुढे केले होते. दुहेरी निष्ठेचे असे प्रयास कामी आले नाहित तरी योग्य गणिते जुळवून त्यांनी कॊंग्रेसमधुन मुलासाठी आता उमेदवारी पदरात पाडून घेण्याचे ’समाधान’ नक्कीच मिळवले आहे.
हा असा दादर माहिममधल्या राजकिय निष्ठेचा गेल्या २७ वर्षातला प्रवास आहे. या दोन्ही कॊंग्रेस नेत्यांच्या मुलाखती चित्रीत करून वाहिन्यांवर दाखवणारयांना तो इतिहास ठाऊक नाही; की जाणून घेण्याची गरज वाटली नाही. ही आजची ब्रेकिंग न्युज पत्रकारिता आहे. ज्यात बातमीची आणि वास्तवाची फ़क्त मोडतोड तांबापितळ होत असते. मग वाचणारयाला आणि ऐकणारयाला निष्ठा म्हणजे काय किंवा अनिष्ट कशाला म्हणतात तेही कळणे अवघड होऊन जाते. डोळे झाकून हा तमाशा चालू असतो आणि तो करणारेच आपल्याला सांगत असतात "डोळे उघडा बघा नीट".