Friday, September 25, 2020

पाक एप्स कशी बंद होणार?

 लडाख आणि गलवानच्या खोर्‍यातील चिनी सेनेशी झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने अनेक चिनी कंपन्या व त्यांच्या विविध तांत्रिक एप्सला बंदी घालून चांगलीच कोंडी केलेली आहे. एका बाजूला सैनिकी व सीमेवरची कोंडी आणि दुसर्‍या बाजूला आर्थिक कोंडी; अशी ही रणनिती खुपच उपयोगी ठरली असून चिन हादरून गेला आहे. पण त्याचवेळी त्यापेक्षाही भयंकर अशा पाकिस्तानी एप्सना कोणी रोखायचे, हा प्रश्न विचारणे भाग आहे. एप्स म्हणजे स्मार्ट फ़ोन वा संगणकामध्ये त्यांना सामावून घेतले जाते आणि त्यांचा विविध कामासाठी उपयोग होत असतो. पण  त्या निमीत्ताने आपल्या फ़ोन वा संगणकात घुसलेली ही एप्स, उलट्या बाजूने आपली माहिती वा मोक्याच्या गोष्टी बाहेर पळवून नेत असतात, असाही आक्षेप घेतला जातो. थोडक्यात पुर्वीच्या काळात शत्रूचे हस्तक वा हेरगिरी करणारे जसे आपल्या समाजात मिसळून आपल्याशीच दगाफ़टका करायचे, तसाच काहीसा प्रकार एप्सच्या मार्फ़त होत असल्याचा आक्षेप आहे. अर्थात पाकिस्तान तंत्रज्ञानात तितका पुढारलेला नसून त्याने भारतात मोठ्या नावाजलेल्या व्यक्ती व प्रतिष्ठीतांनाच आपली एप्स बनवलेले आहे. मागल्या दोन दशकात अशा मानवी एप्समार्फ़त पाकिस्तान इथे अनेक उचापती करीत राहिला आहे. तसे बघायला गेल्यास असे लोक वरकरणी परदेशी हस्तक वा हेर वगैरे वाटणारे नाहीत. कारण ते नेहमी सामाजिक न्यायाच्या गोष्टी बोलत असतात. वैचारिक भाषेत बोलतात. पण वास्तवात त्यांचे काम देशाला व समाजाला पोखरण्यासाठीच चालू असते. जेव्हा परकीय आक्रमण होते, तेव्हा ते लोक अतिशय सावधपणे मायभूमीशी दगाबाजी करीत असतात. बरखा दत्त हे त्यापैकीच एक नाव आहे आणि तिचे पाकिस्तानप्रेम आजवर कधीच लपलेले नाही. पण ती इथे पत्रकार म्हणून मिरवत असली तरी व्यवहारात ती कायम पाकिस्तानचे हितसंबंध जपत राहिलेली आहे. त्याचे वेगवेगळे दाखलेही उपलब्ध आहेत. मुद्दा इतकाच, की ही पाकची मानवी एप्स भारत सरकार कशी प्रतिबंधित करणार आहे आणि कशी?


२०१४ च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी नरेंद्र मोदींनी प्रचाराची रणधुमाळी माजवली होती, तेव्हा त्यांनी बरखाच्या एका पापकर्माचा जाहिर उल्लेख नाव घेतल्याशिवाय केलेला होता. तेव्हा बिळातून नागिण सळसळत बाहेर यावी, तसा तिचा जळफ़ळाट जगाने बघितलेला आहे. मनमोहन सिंग अखेरच्या वर्षात ते राष्ट्रसंघाच्या बैठकीला अमेरिकेत गेलेले होते आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ही तिथे आलेले होते. शरीफ़ यांनी पाकिस्तानी पत्रकार मंडळींना चहापानासाठी बोलावलेले होते आणि त्यात बरखाचाही समावेश होता. अन्य कोणी भारतीय पत्रकार त्यात नव्हते. त्या गप्पांमध्ये शरीफ़ यांनी मनमोहन सिंग म्हणजे पाणवठ्यावरची गावंढळ महिला कुरकुरते अशी हेटाळणी केली होती. तर निषेध म्हणून भारतीय पत्रकारांनी तिथून उठून तरी जायला हवे होते, असा मुद्दा मोदींनी मांडला होता. मात्र त्यांनी बरखाचे नावही घेतलेले नव्हते. पण खायी त्याला खवखवे, या उक्तीप्रमाणे बरखा तिच्या एनडीटिव्ही वाहिनीवर आली आणि खुलासा देऊ लागलेली होती. आपण तितथे नव्हतोच, असा खुलासा देण्याची काय गरज होती? पण तिला समोर यावे लागले आणि मजेची गोष्ट म्हणजे बरखाच्या त्या खुलाशाला दुजोरा द्यायला पाकिस्तानी संपादक हमीद मीर पुढे सरसावले होते. आणखी गंमत अशी, की त्याच मीर यांनी त्यांच्या पाकिस्तानी चॅनेलवर तोच विषय घेऊन सिंग यांची खिल्ली उडवणारा कार्यक्रमही केलेला होता. ही बरखाची ख्याती आहे. पण विषय तिथेच संपत नाही. पठाणकोटच्या घातपाती हल्ल्यानंतर भारताचे पाकला उत्तर काय असेल, याचीच चर्चा चालू होती. तेव्हा बरखा पाकला कशी मदत करीत होती, तेही समजून घेतले पाहिजे. आपल्या चॅनेलवर भारताच्या विविध निवृत्त अधिकार्‍यांना आमंत्रित करून बोलताना ती अगत्याने एक प्रश्न विचारायची. भारत पाकला शस्त्रानेच उत्तर देईल काय? प्रतिहल्ला वा लष्करी उत्तर देईल काय? त्यावर नकारार्थी उत्तर आल्यानंतर खातरजमा करीत पुन्हा एक वाक्य सतत बोलायची. ‘म्हणजे पाकविरोधी लष्करी कारवाईची शक्यता नाही.’


एकप्रकारे हा पाकच्या सेनाधिकारी व सरकारला दिलेला इशारा वा संकेतच होता. थोडक्यात इथल्या चॅनेलवरची चर्चा रंगवताना बरखा त्यांना सांगत होती, निश्चींत रहा. भारत पाकविरोधात कुठलीही लष्करी कारवाई करण्याची शक्यता नाही. खुद्द माजी सेनाधिकारीच त्याची ग्वाही देत आहेत. हा संकेत कशाला मानायचा? तर बरखा सोडून अन्य कुठल्याही चॅनेल चर्चेत असा प्रश्न विचारला जात नव्हता आणि सातत्याने वदवूनही घेतला जात नव्हता. मात्र त्याच संकेताने पाकिस्तानचा घात झाला. कारण बरखावर विसंबून पाकसेना निश्चींत राहिली आणि सर्जिकल स्ट्राईक होऊन गेल्यावर त्यांना जाग आली. पण त्यामुळेच बरखा किंवा तत्सम पोसलेले भारतातील पाकचे हस्तक आता कसे निरूपयोगी बनुन गेलेत, त्याची त्यांनाही खातरजमा होत गेली. कारण भारतीय हेरखात्याने बरखाच्या पाकधार्जिणेपणाचा मोठ्या खुबीने उपयोग करून घेत, तिच्या मार्फ़तच पाकला धक्का दिलेला होता. त्यामुळे आता बरखाची किंमत तिथेही घटली आहे आणि भारतातील विश्वासार्हता कधीच संपलेली आहे. त्यामुळे असे अनाथ व बेवारस झालेले पाकचे हस्तक हळुहळू निकामी निरूपयोगी एप्सच बनुन गेले आहेत. आपली उपयुक्तता अजूनही असल्याचे सिद्ध करण्याचा केविलवाणा खेळ त्यांना करावा लागतो आणि त्याचाच ताजा नमूना समोर आला आहे. आता बरखा पाकिस्तानला भारत विरोधातल्या कारवाईचे सल्ले देऊ लागली असून त्यासाठी रणनितीही सांगु लागलेली आहे. पाकपेक्षाही काश्मिर हातून निसटल्याची वेदना बरखाला किती सतावते आहे, त्याचा अस्सल नमूनाच तिने ताज्या वक्तव्यातून सादर केला आहे. जगातल्या सगळ्या मंचावर पाकच्या काश्मिरी रडगाण्याल कोणी भिक घालत नसल्याने आता फ़क्त एकाच मार्गाने पाकला काश्मिरचा विषय शिल्लक ठेवता येईल आणि तो मार्गच बरखा भारतात बसून पाकला शिकवित आहे. तो मार्ग कोणता? 


काही दिवसांपुर्वी बरखा दत्तने एका व्हिडीओमधून पाकिस्तानला काश्मिर हातातून जायला नको असेल, तर काय करावे लागेल, त्याचा सल्ला दिलेला आहे. तिच्या म्हणण्यानुसार अजून पाकव्याप्त काश्मिर वाचवायचा असेल, तर पाकने भारतातील काश्मिरमध्ये पुलवामासारखा मोठा घातपाती हल्ला केला पाहिजे. तरच जगाचे लक्ष त्याकडे वेधले जाऊ शकते आणि जगाला नव्याने काश्मिरकडे वळावे लागेल. भारतीय काश्मिरात तसा कुठला भयानक हल्ला करणे शक्य नसेल, तर पाकने भारताच्या अन्य भागात कुठेतरी मोठा घातपाती हल्ला करून जगाचे लक्ष वेधून घ्यावे लागेल. अन्यथा काश्मिरचा विषय पाकिस्तानच्या हातातून निसटलेला आहे. ज्या महिला पत्रकाराला काश्मिरमध्ये सामान्य लोकांना सुखनैव जगता येत नाही वा विविध प्रतिबंध आहेत, म्हणून तिथल्या लोकांविषयी कायम जिव्हाळा वाटत राहिला आहे, तिला तिथे पुलवामासारखा हल्ला याचा अर्थ कळतो काय? तो घातक हल्ला फ़क्त सैनिकांवरच होत नसतो, त्यात अनेक नागरिकही मारले जात असतात. मग तसा हल्ला वा भारतात अन्यत्र प्राणघातक हल्ला करण्याचा सल्ला देऊन ही बाई काय सांगू इच्छिते आहे? ती शेकडो जिवांवर बेतणार्‍या हल्ल्याचा आग्रह धरून निरपराधांच्या जीवाशी खेळण्याचा सल्ला देते, तेव्हा त्याला पत्रकारिता वा विश्लेषण म्हणता येईल काय? की दहशतवाद टिकवून ठेवण्यासाठी सुचवलेली रणनिती म्हणायचे? दोन देशात सख्य असावे किंवा दोन्ही देशातल्या सामान्य जनतेच्या सुखरूप जगण्याला प्राधान्य असायला हवे, एवढेही पत्रकार म्हणून असणारे कर्तव्य तिच्या डोक्यात शिल्लक राहिलेले नाही काय? की आपण पाक हस्तक वा पाक एप्स असल्याचे लपवून बोलावे याचेही भान ती गमावून बसली आहे? अशा कित्येक पाक हस्तक व दलालांचा बंदोबस्त केल्याशिवाय भारताची सुरक्षा खात्रीची होऊ शकत नाही. त्यांना कायदेशीर मार्गाने प्रतिबंधित करता येत नाही. म्हणून त्यांची समाजात छिथू करणे एवढाच एकमेव मार्ग असू शकतो. कारण गुन्हेसंहिता वा दंडविधानाच्या कलमात अशा वागण्याला गुन्हा ठरवणारी कलमे वा तरतुदी नाहीत ना?


No comments:

Post a Comment