अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा भिन्न मत समजून घेण्य़ाची सहिष्णूता आजकाल सगळेच बोलू लागले आहेत. लता मंगेशकर व सचिन तेंडूलकर यांच्याविषयी अतिशय हीन दर्जाच्या टिप्पण्या करण्याला अभिव्यक्ती ठरवण्याची जी स्पर्धा काही शहाणे करीत आहेत, ते नवे नाहीत किंवा त्यांचा युक्तीवादही नवा नाही. असे वाद उफ़ाळले मग हेच ठरलेले गुळगुळीत झालेले युक्तीवाद सतत होत असतात. वास्तव जीवनाशी अशा शहाण्यांची किती फ़ारकत झालेली असते, त्याची अशावेळी प्रचिती येत असते. तुम्हाला आक्षेपार्ह वाटत असेल, तर त्यात पडू नका किंवा बघू-ऐकू नका. पण तसे बोलणे लिहीणे हे कायद्याने मिळालेले स्वातंत्र्य आहे, अशी त्यामागची भूमिका असते. काही वेळी वेगळ्या दृष्टीकोनातून बघायला सांगितले जाते. चार वर्षापुर्वी कुठल्याशा पाठ्यपुस्तकात एक जुने व्यंगचित्र छापण्यावरून वाद उफ़ाळला होता. बाबासाहेबांच्या घटनासमितीतील कामासंबंधाने प्रसिद्ध झालेले ते चित्र होते. कासवावर बसलेले बाबासाहेब आणि मागे चाबूक उगारलेले पंडित नेहरू असे ते व्यंगचित्र होते. तर त्यावर वाद उफ़ाळला, तेव्हा काहीजण म्हणाले, की खुद्द बाबासाहेबांनी त्यावर आक्षेप घेतला नव्हता. कारण मूळ व्यंगचित्र प्रकाशित झाले, तेव्हा बाबासाहेब हयात होते आणि राज्यघटना लिहीण्याचे काम करीत होते. जे व्यंगचित्र बाबासाहेबांना दुखावणारे नव्हते, त्यावरून अनुयायांनी काहूर कशाला माजवावे, असा बुद्धीवादी प्रश्न विचारला जात होता. हीच खरी दिशाभूल वा फ़सवणूक असते. कारण संदर्भ बदलून विषय पेश केला जात असतो. बाबासाहेबांचे दैवतीकरण झाले नव्हते, त्या काळातील ते चित्र होते आणि आज बाबासाहेब हे श्रद्धास्थान झालेले आहे. म्हणूनच मुद्दा बाबासाहेबांना मान्य असलेल्या चित्राचा नसतो. तर त्यांना उद्धारक दैवत मानणार्या कोट्यवधी लोकांच्या भावनेचा असतो.
बाबासाहेब किंवा तत्सम व्यक्ती ह्या जेव्हा श्रद्धास्थान बनतात, तेव्हा त्यांच्याविषयी जपून बोलणे आवश्यक असते. किंबहूना व्यक्तीच नव्हेतर सार्वजनिक जीवनात जी अनेक प्रतिके असतात, त्यांच्या बाबतीत तीच काळजी घेणे आवश्यक असते. जिथे करोडो लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात, त्यावर बौद्धिक कसरतीने स्पष्टीकरणे देणे सोपे असले, तरी ते लोकांच्या गळी उतरू शकणारे नसते. तर्कशास्त्र किंवा युक्तीवाद अशा जागी फ़सवे असतात. ह्या श्रद्धा व प्रतिके सामान्य माणसाच्या जीवन व दैनंदिन व्यवहारातील आधार असतात. तसे नसते तर बाबरी मशीद कशाला कौतुकाची झाली असती? मागली चोविस वर्षे त्यावरून किती राजकारण व उलथापालथ झाली आहे? तसे बघायचे तर ते जुन्या इमारतीचे अवशेष आहेत. कधीकाळी तिथे रामजन्म झाला अशी श्रद्धा आहे. अन्यथा मध्यंतरीची कित्येक वर्षे तिथे ओसाड वास्तु होती. कोणाला त्याची फ़िकीर नव्हती. पण जितक्या आवेशात त्याविषयी श्रद्धावान बोलतात, तितक्याच आवेशात बुद्धीमंतही बोलतात. एका जुन्या इमारतीचा ढाचा पाडला गेला, तर त्याचेही तितकेच समर्थन याच बुद्धीजिवींनी कशाला केले नाही? आज सचिन वा लताजींच्या अवहेलनेचे समर्थन करणार्या बुद्धीवादी शहाण्यांनी बाबरीसाठी अश्रू ढाळलेले नाहीत काय? ती पाडणार्यांच्या भूमिका वा त्यातली ‘गंमत’ या शहाण्यांनी कधी समजून घेतली आहे काय? जितक्या सहजपणे या दोघांची हेटाळणी करण्यात पुरूषार्थ शोधला व सांगितला जातो, तितकाच पुरूषार्थ या विनोदवीरांनी बाबरी वा तत्सम बाबतीत करून दाखवावा. यातले कितीजण प्रेषित महंमदाचे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्याची हिंमत दाखवू शकले आहेत? ज्यांना ती हिंमत करता आलेली नाही, त्यांचा आजचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावा निव्वळ बदमाशी असते. कारण त्यांनाही खरा धोका व आभासी धोका नेमका ठाऊक असतो.
अशा वादात भारतातील बहुतांश माध्यमे व पत्रकार मोठ्या आवेशात बोलतात व लिहीतात. पण त्यातल्या कोणी युरोपात प्रकाशित झालेल्या प्रेषिताच्या व्यंगचित्राचे पुनर्प्रकाशन करण्याची हिंमत दाखवलेली आहे काय? वेगळा दृष्टीकोन मुस्लिमांनी समजून घ्यावा, अशी भाषा करीत किती अभिव्यक्ती स्वातंत्र्यवीर संघर्षाला पुढे आले? यातले कितीजण तस्लिमा नसरीनच्या जीवंत रहाण्याच्या व मनमोकळे लिहीण्याच्या अधिकारासाठी लढायला उभे ठाकले आहेत? कारण तिथे नुसते निषेध होणार नाहीत किंवा पोलिसात तक्रारी होणार नाहीत. जीवाशी गाठ पडेल, याची पक्की खात्री आहे. म्हणून मग हे स्वातंत्र्यवीर इस्लामचा विषय आला, मग विनाविलंब शेपूट घालून स्वातंत्र्यलढ्याची भाषा सोडून पळ काढतात. कारण मुस्लिम समाज सहिष्णूतेचे पाठ ऐकून घेत नाही, तर आपल्या संतप्त भावनांची ‘अभिव्यक्ती’ करून प्रतिकार करतो, असा अनुभव आहे. तशी अभिव्यक्ती लता वा सचिनचे भक्त करणार नाहीत, याची हमी आहे. त्याच हमीच्या जोरावर मग विनोदबुद्धी किंवा अविष्कार असल्या गमजा केल्या जात असतात. तुम्हाआम्हाला ‘समजून’ घेण्याचे पाठ शिकवले जातात. त्याचा अर्थ आपणही कधी समजून घेत नाही. घटनेकडे वेगळ्या नजरेने बघणे म्हणजे तरी काय असते? तुम्हाला अपाय इजा वाटणार्या गोष्टीची दुसरी बाजू काय असते? दुसरा दृष्टीकोन काय असतो? निर्भयाच्या बाबतीत आपण सगळेच हेलावून गेलो होतो. संतप्त झालो होतो. खवळून उठलो होतो. पण त्याचीही दुसरी बाजू होतीच ना? बाकी जगाला ज्यातून असह्य यातना वेदना झाल्या, त्याहून जास्त यातना निर्भयाच्या वाट्याला आल्या होत्या. पण त्याचीच दुसरी बाजू अशी होती, की तो सामुहिक बलात्कार करणार्यांना मोठी मजा आलेली होती. विकृत का असेना, पण सुखसमाधान मिळालेले होते. बलात्काराची ही दुसरी बाजू आणि सचिन लताच्या अवहेलनेची दुसरी बाजू यात कुठला फ़रक असतो?
गांधी, बाबासाहेब, लता किंवा सचिन अशा व्यक्तींना आपल्याविषयी कोण काय बोलले, याच्याशी काडीमात्र कर्तव्य नसते. सवाल त्यांना दैवत मानणार्यांच्या श्रद्धा वा भावनांशी निगडीत असतो. कारण ह्या व्यक्ती स्वतंत्र असतात आणि त्यांच्यापेक्षा त्यांच्याविषयी कमालीची आत्मियता बाळगून जगणार्यांच्या भावना भिन्न गोष्ट असते. कुठल्याही ताशेर्यांनी टिकाटिप्पणीने अशा व्यक्ती विचलीत होण्याचा विषय नसतो, तर त्यांच्यात जगण्याचा आधार शोधणार्यांच्या भावनांचा विषय मोलाचा असतो. निर्भया किंवा तत्सम बलात्कार पिडीत मुलींशी सामान्य माणसाचा कुठलाही थेट संबंध नसतो. पण त्यांच्यातच आपली मुलगी बहिण माता बघून तिची इज्जत अब्रु वा सुरक्षा बघणार्यांच्या मनाचा अशा घटनांनी थरकाप उडत असतो. त्यासाठी तशी सामुहिक प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटत असते. ज्याने असा बलात्कार केला, त्याला तसे वागण्याची मोकळीक असेल, तर उद्या आपल्या आयाबहिणी सुरक्षित असू शकत नाहीत, असा भयगंड निर्माण होतो. तसाच समाजातील मान्यवर प्रतिष्ठीत दैवत मानल्या जाणार्यांच्या अवहेलनेचा विषय आहे. इतक्या मोठ्या मान्यवरांच्या प्रतिष्ठेशी खेळण्याची मुभा असेल, तर उद्या आपल्याही प्रतिष्ठा व अब्रुशी कोणीही खेळू शकेल, ही धारणा भयगंड व पर्यायाने प्रक्षोभ निर्माण करीत असते. कारण अशी माणसे एक व्यक्ती नसतात. त्यांना स्वयंभू दैवताचे रूप मिळालेले असते. ते जीवनाचे निकष बनलेले असतात. गांजलेल्या पिडलेल्या सामान्य माणसाच्या जीवनात बुद्धीवाद नव्हेतर श्रद्धा व समजुती जगण्याचे आधार असतात. याचे भान ज्याला राखता येत नाही, त्याचा बुद्धीशी वा शहाणपणाशी संबंध नाही, असे़च म्हणायला हवे. त्याला विनोदबुद्धी तरी कुठून असणार? सध्या माजलेल्या वादाचे पापुद्रे काढणार्या शहाण्यांना त्याची अक्कल कधीच येणार नाही. त्यांना कायदा व सभ्यतेची भाषा समजत नाही. त्यांना इसिस वा रझा अकादमीचीच भाषा उमजत असावी. शिवसेना, पॅन्थर वा तत्सम संघटना, म्हणूनच तशा ‘अभिव्यक्त’ होऊ लागल्या असाव्यात.