या दुष्ट चौकोनातून कसे सुटावे?
by Navnath Pawar on Wednesday, September 14, 2011 at 11:51am ·
मित्रांनो, मला सारखे असे वाटत राहते की आपण एका दुष्ट चौकोनात फसत चाललो आहोत.
१. टोकाचे गोड्सेवादी
२. टोकाचे बहुजनवादी
३. टोकाचे आंबेडकरवादी
४. टोकाचे इस्लामवादी
यातले पहिले तीन भारतीय समाजातूनच उगवले आहेत. तर चौथा भारताबाहेरचा असून स्थानिक समाजाला बळजबरीने त्याच्या दावणीला बांधण्यासाठी नंबर एकचा गट जीवाचे रान करतो आहे. नंबर एकला प्रत्युत्तर म्हणून नंबर दोन रिमिक्स इतिहास आणि तत्वज्ञान सांगून देशाच्या एकतेला सुरुंग लावत आहे. कोणी नुसता आ वासला तरी तो फक्त भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्यासाठीच वासावा हा तिसऱ्या गटाचा आग्रह असतो. भारतीय मुस्लीम प्रत्यक्षात इतके वादात पडू इच्छित नाहीत. मात्र पहिल्या तीन गटांनी त्यांचा द्वेष करावा यासाठी पाकिस्तानी अतिरेकी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत आहे... मला यातल्या सर्वच कट्टरवादी गटांची घृणा आहे... अर्थवादी विचार मंथन सुरु केले की हे त्यात जातीयवाद घुसवून मूळ पोस्टचा धुव्वा उडवतात. मात्र कुठल्या जयंतीचे निमित्त साधून हे पहिले तीन हे एकमताने आणि हक्काने माझी गाडी अडवतात. चौथा प्रत्यक्ष माझ्या मार्गात येत नसला तरी तो सगळ्यात जास्त देशद्रोही आहे, असे पहिल्या तिघांचे एक्मताचे (कोणी उघड कोणी छुपा) दडपण माझ्या खिशातून वर्गणी अक्षरश: काढून घेते.. यातही अनेक बहुभूज उपआकृत्या पुन्हा आहेतच.... त्यामुळे साधी गणपतीची वर्गणीही किमान दहा ठिकाणी द्यावीच लागते.... इच्छा असो की नसो शिवाजी महाराजांना वर्षातून दोनदा जन्माला घालावेच लागते. प्रत्येक गल्लीत एक महारुद्र हनुमान किंवा गणपती मंदिर असलेच पाहिजे, आणि त्यात अर्थात माझे योगदान असलेच पाहिजे. .... लावण्यांच्या तालावरील प्रबोधनगीते आणि डीजेच्या तालावर धुंद नाच ठीकठाक व्हावा यासाठी किमान पाच ठिकाणी पावती घेतलीच पाहिजे, नसता बाबासाहेबांचा अनादर करण्याची किंमत द्यायची वेळ कधीतरी येतेच....!चौथा गट मला कधी वर्गणी मागत नसला तरी त्याच्या पावत्या पाकिस्तानची असहाय्य जनता आपल्या विकासाचा बळी देऊन मुकाट्याने फाड्तच आहे. मुक्त अर्थव्यवस्था आणि अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द नुसते उच्चारले तरी देव, धर्म, देश द्रोही खणून अंगावर येणारे हे गट वर्गणी साठी मात्र मी खिसा मुक्त ठेवावा असं प्रेमळ आग्रह प्रसंगी गुदगुल्या करून करता, हे विशेष. आता या फायद्याच्या धंद्यात अनेक नवीन अस्मिता मोठ्या फौज फाटयासहित उतरण्याच्या तयारीत असलेल्या पाहून मी धास्तावलो आहे. या चौकोनाचा लवकरच पंचकोन, षटकोन, अष्टकोन होत वर्तुळ होणार हे दिसतच आहे.... . मी खूप अस्वस्थ आहे, पण या दुष्ट चौकोनातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नाहीये, आपण काही मार्गदर्शन कराल का?
========================
झुंडीची मनोवृत्ती
पहिली गोष्ट म्हणजे विचार किंवा प्रेमाने माणसे जोडणे हा दुरचा व कष्टप्रद मार्ग असतो. त्यापेक्षा भय किंवा द्वेषाने माणसे लौकर जोडता वा संघटित करता येतात. कारण विचार व विवेक ही वैयक्तीक मनस्थिती असते तर भयगंड ही झुंडीची मानसिकता असते. त्यामुळेच झुंड गोळा करायची तर विचार व तत्वज्ञानापेक्षा समजूती व तिरस्कार सोपे साधन असते. कोणी तरी समान शत्रू दाखवावा लागतो. तो खरा असण्याची सुद्धा गरज नसते, काल्पनिक सुद्धा चालतो. पण त्याचे भय समुहाच्या कल्पनाविश्वात ठसवता आले पाहिजे. ज्याच्या डोक्यावर सर्वप्रकारचे खापर फ़ोडणे, मग सोपे होऊन जाते. आपण ज्या चार टोकाच्या चौकोनाची गोष्ट सांगत आहात; त्या प्रत्येक कोनाचे पाय कुठला ना कुठला तिरस्कार घेऊनच बनलेले दिसतील. आपल्या अडचणी किंवा अपयशाचे खापर अशी मंडळी दुसर्या कोणाच्या तरी डोक्यावर फ़ोडताना दिसतील. स्वत:चे अपयश किंवा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तिरस्कार व द्वेष हा सर्वात सुरक्षित व सोपा आडोसा असतो. तेवढेच नाही तर अशा पराभूत मनोवृत्तीचा जमाव गोळा करायला, त्याचा भरपुर उपयोग होतो. म्हणूनच ज्यांच्याकडे आपण भयभित होऊन बघत आहात ती म्डळी स्वत:च भयगंडाने पछाडलेली आहेत हे आधी ओळखा.
हिटलर किंवा त्याची ज्य़ु जमातीच्या द्वेषावर उभी राहिलेली नाझी चळवळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. ज्यू जमात संपवणे हे त्याचे उद्दीष्ट अजिबात नव्हते. एकदा हिटलरला त्याबद्दल विचारण्यात आले, की ज्य़ु जमातीचा संपुर्ण नि:पात करण्यात यावा असेच तुझे मत आहे का? त्यावर त्याने दिलेले मत डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला, ‘ छे छे, ज्य़ु नावाचा कुणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्य़ु नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणीतरी हाडामासाचा, खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा शत्रू नसेल तर लोकंना चिथावता येत नाही. केवळ अमुर्त कल्पना पुढे करून ही गोष्ट साध्य होत नाही.’ हिटलरचे हे बोल आजच्या आपल्या देशातील चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या वर्तनाशी तपासून बघा. मग तुमच्या लक्षात येईल, की त्यांच्यापाशी कुठलाही विधायक कार्यक्रम नाही की विवेकबुद्धीला स्थान नाही.
आपण ज्यांच्याकडे बोट दाखवले आहे त्या चारही प्रवृत्ती द्वेषाच्या पायावर उभ्या आहेत. त्यांना काही निर्माण करायचे नसून, दुसरे काहीतरी नष्ट करायची त्यांची भूमिका आहे. मग सवाल येतो, की विध्वंसातून त्यांना काय साधायचे आहे? सूड घेण्यातून कसली भरपाई होत असते? आपला नाकर्तेपणा लपवता येतो ना? मग कोणी पुरातन बौद्ध मुर्तीचा विध्वंस तोफ़ा डागून करतो तर कोणी बाबरी पाडण्यात पुरूषार्थ शोधू पहातो तर कोणी जुन्या काळातल्या कुत्र्याच्या पुतळ्याला हटवण्यात मर्दानगी अनुभवतो. मजेची गोष्ट अशी दिसेल, की तुम्ही त्यांच्या अशा कसरतीकडे दुर्लक्ष केलेत, तर त्यांची आक्रमकता व क्षोभ अधिकच वाढलेला दिसेल. अशा तिरस्कार व द्वेषाने प्रेरित झालेल्या झुंडी दिसतात माणसांच्या, पण वागतात पशूसारख्या. माणुस शेवटी प्राणीच आहे आणि त्याच्यात पाशवी वृत्ती उपजतच असते. अनैसर्गिक अशा नागरी जीवनातले अपयश पचवण्याची कुवत नसलेल्या माणसात पाशवी वृत्ती लौकर उफ़ाळून बाहेर येते. मग अशी माणसे झुंड शोधू लागतात आणि चलाख लोक त्यांना आवश्यक असलेले द्वेष, तिरस्कार करण्यास योग्य वाटणारे काही प्रतिक देतात.
वयात येणारी मुलगी किंवा मुलगा जसा प्रेमात पडायला उतावळा असतो, तशी ही पराभूत मनोवृत्तीची विवेकशून्य माणसे अशा तिरस्कारणिय प्रतिक वा निमित्ताच्या शोधात असतातच. त्यामुळेच जो कोणी चलाख माणूस ती मानसिकता ओळखून चतुर व्यापार्याप्रमाणे त्यांना असे प्रतिक पुरवतो, त्याला झूंडीचे आपोआपच नेतृत्व मिळत असते. तिरस्कार करायला प्रतिक मिळाले, मग प्रतिक्रिया म्हणून ते पुरवणार्याबद्दल आदर व भक्तीभाव निर्माण होत असतो. आणि अशा निरर्थक श्रद्धा व भक्तीच्या आहारी जाऊन आपले जीवन सर्वस्व त्यावर उधळून टाकण्यामध्ये झुंडीत सहभागी झालेले लोक पुरूषार्थ समजू लागतात. अनेक देशात मानवी बॉम्ब म्हणून मरणाला हसतहसत कवटाळणारे, किंवा आंदोलनात सहभागी होऊन पोलिसांच्या तावडीत सापडणारे, त्याच झूंडीतले असतात. जेव्हा अशा झुंड तयार होतात, तेव्हा त्यात अल्पबुद्धीचे लोक सहभागी होऊन द्वेषाला तिरस्काराला खतपाणी घालायचे मुद्दे पुरवू लागतात, बदल्यात त्यांच्या अल्पबुद्धीला अभ्यासक वा तत्ववेत्ता अशी मान्यता झुंडीकडून मिळत असते. आणि हे आजकालचे नाही. हजारो वर्षाच्या मानवी इतिहासात त्याचीच सतत पुनरावृत्ती होताना दिसेल. तेव्हा तीही नैसर्गिक अपरिहार्यता आहे समजून जगणे विवेकी माणसाच्या हाती असते.
मग यावर उपाय कोणता? उपाय एकूण मानव जमात आपोआप शोधून काढत असते. जोवर एकूण समाजाची सोशिकता टिकून असते, तोवर अशा झुंडींची मस्ती चालते. पण त्या सोशिकतेचा कडेलोट होतो तेव्हा संयम सोडून अवघा समाजच त्या झुंडींपेक्षा अधिक हिंसक होऊन त्या झुंडींचे निर्दालन करायला अधिक पाशवी रूप धारण करतो. तेव्हाच त्या झुंडींचे निवारण होत असते. या झुंडी समाज जीवनाला तापदायक असल्या तरी वारंवार अवतार घेतच असतात आणि समाजजीवन विस्कटून टाकत असतात. आपल्या पाशवी वृत्तीने त्या झुंडी सामान्य शांततामय जीवन जगायला धडपडणार्या मोठ्या लोकसंख्येला शेवटी पाशवी पातळीवर आणुनच स्वत:चे निर्दालन करून घेतात. आजवरचा मानवी इतिहास त्याचाच साक्षिदार आहे.
No comments:
Post a Comment