Friday, September 14, 2012

पुरोगामी पतिव्रतांच्या उरावर सेक्युलर ‘बाजार’बसवी

   गुरूवारी डिझेलची दरवाढ केल्यावर काहूर माजणार याची कॉग्रेसला पुर्ण कल्पना होतीच. मात्र ते काहूर माजल्यावर एक दोन रुपयाची कपात करून दरवाढ पचवली जाईल, असे बहुतेक वाहिन्यांवरील मुर्खांनी सांगितले होते. कारण पुस्तकापलिकडचे जग बघायची सवय नसलेल्यांम अशा पढतमुर्खांना जगात खरोखरच काय घडते याच्याशी कर्तव्य नसते. अगदी अपेक्षेप्रमाणे विरोधकांनीच नव्हेतर कॉग्रेसच्या मित्र पक्षांनीही डिझेल दरवाढीला कडाडून विरोधाचे नाटकही छान रंगवले. पण आपला पुरोगामी देश शेवटी पतीपरमेश्वर मानणार्‍या मनोवृत्तीचाच आहे ना? तिथे पुरोगामीत्वही त्याच पातिव्रत्याच्या सोवळ्यात अडकलेले असते. मग बाहेरख्याली नवरा जसा रुसलेल्या पतिव्रता पत्नीला दाद देत नाही, तशीच आजच्या सेक्युलर कॉग्रेसची अवस्था आहे. त्यामुळेच जोवर मित्र व सहकारी पक्ष कपाळावर सेक्युलर सौभाग्यलेणे मिरवण्या्चे पातिव्रत्य जपणार आहेत; तोवर सेक्युलर व्याभिचारी नवर्‍याने लग्न मोडायची भिती कशाला बाळगायची? दोन दिवस शिव्या घालणारी पतिव्रता शेवटी वटसावित्रीचा दिवस उजाडला, मग पुन्हा हातात तबक घेऊन वडाची पूजा बांधतेच ना? आणि सातजन्मी हाच सेक्युलर नवरा हवा म्हणून उपास करतेच ना? मग कॉग्रेसने घाबरायचे कशाला? असा नवरा नुसता त्या सतीसावित्रीचा अपेक्षाभंगच करत नाही तर तिच्या उरावर बसून भावना पायदळी तुडवणारा चंगीभंगीपणा उजळमाथ्याने करतच असतो. अशा मुर्ख पतिव्रतेवरच्या अन्याय किंवा फ़सवणूकीने हळहळतात, तेही बेअक्कल असतात. तशीच आजच्या कॉग्रेस व सेक्युलर लाचारांची अवस्था आहे. म्हणुन तर इकडे हे सेक्युलर लाचार डिझेल दरवाढीवर रुसून बसले असताना; तिकडे कॉग्रेसने दरवाढ कमी करण्यापेक्षा उलट अनेक व्यापार उद्योगात ५१ टक्क्याहून अधिक परदेशी गुंतवणुकीची वारांगना या सेक्युलर पतीव्रतांच्या उरावर आणून बसवली. कारण हे लाचार सेक्युलर पक्ष तोंडाने खुप कॉग्रेसला शिव्या घालतील; पण गळ्यातले सेक्युलर मंगळसुत्र काढून घेण्याची वेळ आली किंवा पुरोगामीत्वाचे कुंकू पुसायची वेळ आली, मग निमुटपणे त्यागी पतिव्रतेसारखे कॉग्रेसच्या समर्थनाला उभे रहातील याची कॉग्रेसला खात्री आहे. म्हणूनच डिझेल दरवाढीची नाराजी कमी करण्याऐवजी मनमोहन सरकारने परदेशी गुंतवणूकीची बाजारबसवी या सेक्युलर पतिव्रतांच्या उरावर आणून बसवण्यापर्यंत मजल मारली आहे.

   गुरूवारी डिझेल दरवाढ केल्यावर शुक्रवारी आपल्या जनानखान्यातील या सेक्युलर पाळीवांमध्ये कुरबुरी होणार याची कॉग्रेसला खात्री होतीच. पण नाराजी दुर करण्याऐवजी कॉग्रेसने त्यांना आणखी दुखावण्याचे कारण काय असेल? त्याचे उत्तर वाहिन्यांवरील दिवट्य़ांना सापडत नव्हते. कारण त्यांची बुद्धीच खुंटली आहे. सेक्युलर मित्रांना दुखावून कॉग्रेस पक्ष आपल्याच सरकारला धोका का न्रिर्माण करते आहे? त्याचे उत्तर कुठल्याही शहाण्याकडे नव्हते. ते उत्तर असे आहे की कॉग्रेसला हे सरकार चालवायचे नाही, तर शक्य झाल्यास येत्या डिसेंबरपुर्वी निवडणुका घ्यायच्या आहेत. पण सत्ता अर्धवट सोडली व लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूका घेतल्या, असे पाप आपल्या डोक्यावर नको आहे. ते सरकार पाडायला विरोधी भाजपा सोबत जनानखान्यातले सेक्युलर पक्षच गेले आणि म्हणुन सरकार पडले व मध्यावधी निवडणूका आल्या, असे कॉग्रेसला दाखवायचे आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणूका येत्या डिसेंबरमध्ये होत आहेत. त्यात मोदी जिंकणार याची कॉग्रेसला खात्री आहेच. पण तिथे यश मिळवल्यावर मोदी दिल्लीच्या मोहिमेवर निघणार आणि त्यांना अवघे सहा महिने मिळाले तरी ते देश ढवळून काढतील, याची भिती कॉग्रेसला सतावते आहे. म्हणूनच मोदींना गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये अड्कवून लोकसभा निवडणूका उरकायची रणनिती कॉग्रेसने आखलेली आहे. मात्र तसे थेट करण्यासाठी लोकसभा बरखास्त केली, तर कॉग्रेस मोदींना घाबरलेली दिसेल. तसे व्हायला नको म्हणुन सरकार पाडायचे पाप आपल्या जनानखान्यातील सेक्युलर पतीव्रतांना करायला भाग पाडायचा डाव कॉग्रेसने योजला आहे. त्यासाठीच हमखास विरोध होईल अशी मि्त्र पक्षांची कळ कॉग्रेसने काढली आहे.

   आता मुद्दा असा आहे, की मित्र सेक्युलर पक्षांना मान्य नसेल तर त्यांनी सरकार भाजपाच्या मदतीने पाडावे. नाहीतर आहे ते निमुटपणे सहन करावे. म्हणजे दोन्ही बाजूंनी कॉग्रेसच जिंकते ना? आजचे सरकार चालवणे म्हणजे कसरतच आहे. त्यात अशा मित्रांच्या इशार्‍यावर नाचण्यापेक्षा आपले निर्णय ठामपणे घेऊन मित्रांनाच अडचणीत आणायचे डाव कॉग्रेस खेळते आहे. सेक्युलर मित्र गप्प बसले तर भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे ते भागिदार ठरतात, अधिक महागाई दरवाढीचेही खापर सरकार समर्थक म्हणून त्यांच्याही डोक्यावर फ़ुटते. आणि विरोधात जाऊन सरकार पाडले तर त्यांच्या सेक्युलर पातिव्रत्यावर कलंक लावता येतो. म्हणजे दोन्हीकडून व्याभिचारी नवरा कॉग्रेस सुटतो आणि फ़सते ती सेक्युलर पतिव्रता. कॉग्रेसला येत्या डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूका हव्या आहेत आणि त्यामागे नरेंद्र मोदींचे भय कारणीभूत आहे. त्यातूनच हा आक्रमक पवित्रा कॉग्रेसने घेतला आहे. त्यात मोदींचे कॉग्रेसला वाटणारे भय हा मुद्दा ज्या सेक्युलर मुर्ख विश्लेषकांच्या हिशोबातच नाही, त्यांना कॉग्रेसचा हा आक्रमक पवित्रा कशामुळे आला त्याचा थांगपत्ता लागू शकणार नाही. मग ज्याचे उत्तर सापडत नाही व तर्कानेही शोधता येत नाही, त्याला हे शहाणे अनाकलनिय ठरवतात. मुद्दा सोपा व सरळ आहे. येत्या डिसेंबरमध्ये गुजरात मोदी पुन्हा जिंकणार आहेतच. पण तो विजय त्यांना २०१४ सालच्या लोकसभेतील अर्धे यश मिळवून देईल. आणि पुढले दहा बारा महिने मिळाल्यास मोदी संपुर्ण देशच पादाक्रांत करतील, या भयातून कॉग्रेसने हा जुगार खेळलेला आहे. सर्वकाही परत मिळवण्याच्या आमिषाने युधिष्ठीराने जशी द्रौपदी पणाला लावली होती; तशीच आज कॉग्रेसने आपली लुळीपांगळी सत्ता पणाला लावली आहे.

3 comments:

  1. एकदम १००% कटू सत्य !! भानगड महागाई,एफ.डी.आय. ग्यास,पेट्रोलियम ची सुरु आहे आणि मुलायम धर्मनिरपेक्षतेची बांग देतो आहे हे न समजण्या इतकी जनता अजूनही तितकी मूर्ख आहे असा ह्यांचा जो गैरसमज आहे तो खरच विलक्षण आहे. ह्या सगळ्यांना एकदा भुई सपाट कर एवढीच आता श्री गणेशाला विनंती आहे. सहनशक्ती चा अंत झाला आहे. भाऊ असेच झोडत राहा ह्या वारांगनांना ...सडेतोडपणा बद्दल तुमचे आभार.....!

    ReplyDelete
  2. भाऊ ग्रेट भविष्यात के होईल याच मस्त विश्लेषण केले आहे

    ReplyDelete