आजच्या पोरांना खरे सुद्धा वाटणार नाही. पण आमच्या शाळकरी वयात सिनेमा बघायला मिळत नव्हता. माझीच गोष्ट घ्या. १९६५ सालात शालांत परिक्षा म्हणजे अकरावी मॅट्रीक झालो. तोपर्यंत तीनच सिनेमे बघायला मिळाले होते. त्यातले दोन शाळेत सरकारच्या समाजकल्याण विभागातर्फ़े फ़ुकट दाखवले जाणारे ‘श्यामची आई’ आणि दुसरा ‘अंतरीचा दिवा’. पहिला बालकांवर चांगले संस्कार करणारा म्हणून आणि दुसरा दारूचे कुटुंबावर होणारे दुष्परिणाम दाखवणारा म्हणून. याखेरीज तिसरा सिनेमा आमच्या नशीबी आला तो पौराणिक ‘मायाबाजार’. त्यात सगळेच अदभूत होते, इतकेच आठवते. बाकी सिनेमा म्हणजे पोस्टर्स किंवा प्रचारासाठी केलेल्या व फ़िरणार्या फ़्लोटसारख्या सजवलेल्या गाड्या. तेवढ्यापुरता सिनेमा आमच्या शाळकरी जीवनात होता. त्यापैकी ‘कोहीनूर’ या चित्रपटाची एक जीपगाडी चिंचपोकळी महापालिका शाळेच्या बाहेर (आता व्होल्टासची इमारत आहे त्यासमोर) अनेकदा उभी असायची. त्यात तोफ़ेच्या तोंडाला लटकणारी एक बाहूली होती. ती मधुबाला की मीनाकुमारी असे आमच्यापेक्षा दोनचार वर्षांनी मोठी मुले वाद घालताना ऐकली होती. त्यावरून एकच लक्षात आले, की सिनेमात नट-नट्या असतात, त्यांना आपल्या घरच्यासारखी नावे, आडनावे वगैरे नसतात. पण ज्यांना ती नावे ठाऊक होती, त्यांच्या सामान्य ज्ञानाचे कौतुक वाटायचे. असो
त्या काळातले अजून न सुटलेले एक कोडे आहे. चित्रपटगृहाची तिकीटे आजच्या तुलनेत नगण्यच म्हणायची. कुठे आठ आणे, बारा आणे अशी तिकिटे असायची ती चढत दोन अडीच रुपयांपर्यंत जात. त्यात एक तिकीट ‘वन फ़ाय’ किमतीचे असायचे. म्हणजे एक रुपया पाच आणे. बाकी सगळे दर चार आण्याच्या पटीत असताना एकच वर्ग असा एक रूपया पाच आण्याचा कशाला असेल? त्याचे उत्तर ओळखीचे गावडेमामाही देऊ शकले नाहीत. ते जयहिंद चित्रपटगृहात नोकरी करायचे. शिवाय ‘वन फ़ाय’ हा शब्द कशाला होता? अनेक थिएटरात हे मधल्या दरातले ‘वन फ़ाय’ तिकीट तेव्हा असायचे.
तसाच एक प्रकार १९६०-७० च्या दशकात ‘बाटा’ नावाच्या पादत्राण कंपनीने केला होता. त्या उद्योगातली बाटा ही मोठीच मक्तेदार कंपनी होती. जागोजागी त्यांची स्वत:ची विक्रीकेंद्रे होती. काचेच्या कपाटात म्हणजे शोकेसमध्ये ठेवलेल्या बुट, चपलांवर त्यांची किंमत ठळकपणे लिहीलेली असायची. ‘करोना’ नावाच्या कंपनीचेही तेच होते. पण बाटाचे वैशिष्ट्य असे, की तिच्या सर्वच किंमती नव्याण्णव पैशात असायच्या. कुठलीही चप्पल वा बूट पुर्ण रुपये किंमतीचे नसायचे. दहा रुपये नाही तर ९.९९ म्हणजे नऊ रुपये नव्याण्ण्व पैसे, अशा किंमती असायच्या. पंचवीसाऐवजी चोवीस रुपये नव्याण्णव पैसे असेच असायचे. त्यामुळे कोणी ९९ हा आकडा बोलला तरी त्याची त्याकाळात ‘बाटा प्राईस’ अशी टवाळी व्हायची.
आज इतकी वर्षे झाली आणि त्या गोष्टी मागे पडल्या, काळाच्या पडद्याआड गेल्या. पण ते ‘वन फ़ाय’ आणि ‘नाईन्टी नाईन’चा अर्थ कधी कळला नाही आणि अजून कधीतरी त्यांचा अर्थ लावण्याचा, शोधण्याचा पोरखेळ मनातल्या मनात सुरू होतो.