Tuesday, April 23, 2013

भाकडकथा

एक भाकडकथा

खुप लहानपणी आजीने सांगितलेली एक भाकडकथा आठवते. एकदा म्हणे ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नेहमीच्या कामाचा कंटाळा आला. झक मारले ते जग आणि विश्व, त्याचे व्हायचे ते होईल, असे म्हणून ते तिघेही जबाबदार्‍या सोडुन निघून गेले. पण आता काम नाही तर काय करायचे तेच त्यांच्या लक्षात येईना. ( तेव्हा फ़ेसबुक ट्विटर असते तर कदाचीत त्यांच्यावर अशी पाळी आली नसती). वैतागलेल्या अवस्थेत ते भटकत भरकटत एका माळावर पोहोचले. तिथे एक थेरडी टोपलीत अंडी घेऊन बसली होती. त्या उजाड, निर्जन माळावर ही म्हातारी काय करते; याचे त्या तिघांना कुतूहल वाटले. आसपास शुकशुकाट होता. चालून थकल्याने विश्रांतीसाठी बसली असेल, असे त्यांना वाटले. पण बराच वेळ ती म्हातारी जागच्या जागी. शेवटी या तिघांना रहावले नाही. त्यांनी जाऊन म्हातारीकडे चौकशी केली. बाजार नाही, वर्दळ नाही, घेणारा देणारा नाही, मग इथे बसून ती काय करते त्याची विचारणा केली. तेव्हा त्या म्हातारीने शांतपणे उत्तर दिले, ही अंडी घेऊन मी विकायला बसलेली नाही. वेळप्रसंगाची प्रतिक्षा करते आहे. विश्वाची रचना झाली तेव्हापासून बसलेली आहे इथे. कसल्या वेळप्रसंगाची प्रतिक्षा होती त्या म्हातारीला? जेव्हा विश्वाचा पसारा चालवणारे ब्रह्मा, विष्णू व महेश काम करीनासे होतात, तेव्हा टोपलीतले एक अंडे फ़ोडायचे, की त्यातून दुसरे ब्रह्मा, विष्णू, महेश बाहेर पडतात आणि कामाला लागतात. मग पुन्हा त्यांना कंटाळा येईपर्यंत पुढले अंडे फ़ोडायची प्रतिक्षा करावी लागते. पण ते उत्तर ऐकायला हे पठ्ठे तिघे कुठे थांबले होते. उलट पावली पळत येऊन कामाला लागले होते. मी बावळटासारखा आजीला प्रश्न केला, त्या म्हातारीचे नाव काय होते? तर आजी म्हणाली आदिमाया. आता वाटते आज आजी असती तर आणखी एक प्रश्न तिला विचारला असता. त्या म्हातारीच्या टोपलीत रेनेसॉ, क्रांती, परिवर्तन, रिवॉल्युशन अशा गोष्टी बाहेर पडणारी अंडी असतात का?

============================


कुमार केतकर उजळमाथ्याने फ़िरतात त्याचे काय?

देशमुख साहेब, आपण लिहिता, ‘एक हल्ला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या घरावरही झाला होता. मात्र या पैकी एकाही आरोपीला प्रचलित कायद्यानुसार शिक्षा झालेली नाही. पत्रकारांवर हल्ले करणारे उजळमाथ्याने फिरताना दिसतात.’ खरे आहे. पण केतकर तरी काय मोठे सभ्य लागून गेलेत? पंधरा वर्षापुर्वी रमेश किणी प्रकरणात त्यांनीही राज ठाकरे यांच्या विरोधात जी अफ़वांची राळ उडवली होती. ते काय निखळ सत्य होते आणि समाजहिताची केलेली लढाई होती? ती सुद्धा सुपारीबाजी नव्हती का? पत्रकारितेचा बुरखा पांघरून एका मान्यवर व्यक्तीच्या चरित्र्याचे हनन म्हणजे हत्येचाच तो प्रयत्न होता ना? त्यातून राजविरोधात अक्षरही खरे ठरले नाही. पण एकदा तरी झाल्या अपराधाबद्दल चार शब्दांची माफ़ी मागण्य़ाची सभ्यता केतकर अथवा कुण्या पत्रकाराने दाखवली आहे काय? त्यातले तमाम बदमाश पत्रकार सुपारीबाज पत्रकार आजही उजळमाथ्याने समाजात वावरत आहेत ना? मग राज ठाकरे यांच्यासारख्या पत्रकारी हल्ल्यातल्या अनंत बळींना कोणते संरक्षण आहे? की आपण पत्रकार झालो म्हणजे कोणालाही आयुष्यातून उठवण्याचा परवाना मिळत असतो?

देशमुखजी, आपल्या युक्तीवादाला दुसरी बाजू सुद्धा आहे. ज्या पत्रकारांचा सामान्य लोकांना त्रास होतो, त्यांच्यासाठी अशा खास कायद्यात तरतूद आहे असावी. कारण समाजात प्रत्येकजण नविन जिंदालसारखा पैसेवाला नाही, की पत्रकारांवर खटले भरून वेळ व पैसा वाया घालवू शकतो. उदाहरणार्थ धडधडीत अफ़वा व कंड्या पिकवून सामान्य नागरिकांच्या जीवनात व्यत्यय आणणार्‍या पत्रकारांचे व माध्यमांचे काय करायचे? कारण आपल्यासारखे पत्रकारांची वकीली करणारे; कधी बदमाश पत्रकारांचा साधा निषेधही करायलापुढे येत नाहीत. तेव्हा मात्र सार्वत्रिक मौनव्रताचा अवलंब होतो. बहुतांश हल्ल्यांना अशा अफ़वा कारणीभूत होतात हे नाकारता येत नाही. म्हणूनच जेवढे हल्ल्यापासून पत्रकारांना संरक्षण आवश्यक आहे; तेवढेच पत्रकारांच्या ‘हल्ल्या’पासून अन्य नागरिकांनाही संरक्षण आवश्यक आहे. आपण म्हणता त्या कायद्यात त्याची सोय आहे काय? जिंदाल-झी प्रकरणात वाहिन्यांच्या संघटनेने निदान सुधीर चौधरी या संपादकाला संघटनेतून बडतर्फ़ केले. आनंद अडसूळ अफ़वा प्रकरणात इथल्या पत्रकार संघटनांनी महाराष्ट्र टाईम्स विरुद्ध अशी कुठली कारवाई केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. अशी दुतर्फ़ा तरतूद असलेला कायदा मागत असाल, तर त्याचे सर्वच समाजाकडून स्वागत होईल.
===========================
डॉबरमना सज्जना श्वान पंथेची जावे

श्वान हे अत्यंत इमानदार जनावर असते असे अवघ्या जगात मानले जाते. पण त्याचे इमान हे त्याला पाळणार्‍याशी असते. मग तो पाळणारा गुन्हेगार आहे किंवा चारित्र्यसंपन्न माणुस आहे, याच्याशी श्वानाच्या इमानाला कर्तव्य नसते. अलिकडे ही इमान दारी बांधण्या्ची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात मानवी जमातीनेही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या पैसेवाल्यांना चार पायांचे श्वान म्हणजे कुत्रे पाळण्य़ाचा किंवा त्यातले जातिवंत कुत्रे पाळण्याच साफ़ कंटाळा आलेला आहे, त्यांनी असे मानवी श्वानपंथीय पाळण्याचा श्रीमंती छंद जोपासलेला दिसतो. त्यातले काही श्वान मग भुंकण्यात वाकबगार म्हणून ख्यातकिर्त झालेले आहेत तर काहींनी सामुहिक भुंकण्याचे नवनवे विक्रम करुन दाखवले आहेत. मग अशा श्वानांच्या मालकांनी त्यांच्यासाठी खास थेट प्रक्षेपणाच्या सुविधाच उभ्या करून दिल्या आहेत. उपग्रहवाहिन्या म्हणून त्या ओळखल्या जातात. अशा वाहिन्यांमध्ये कायबीइन लोकमत आघाडीवर असेल तर नवल नाही. कारण ज्यांचा जन्मच लायका कुत्रीने अवकाशात झेप घेण्याच्या युगात झाला, त्यांच्याकडून तशीच अपेक्षा करायला हवी ना?

जेव्हा उपग्रहाचा जमाना सुरू झाला नव्हता आणि नुसतेच अग्नीबाण सोडून प्रक्षेपणाची क्षमता वाढवली जात होती, तेव्हा अवकाशात ज्या पहिल्या सजीव प्राण्याला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला, त्याचे श्रेय लायका नावाच्या कुत्रीला होते. सोवियत युनियनच्या अवकाशयानातून सर्वप्रथम तिनेच अवकाशात झेप घेतली. बहुधा त्याच वर्षी निखिल वागळेचा जन्म झालेला असावा. त्यामुळे उपग्रहाच्या वाहिनीवरून भुंकण्याचे नवनवे विक्रम तो नेहमी प्रस्थापित करत असतो. सोमवारी ३ सप्टेंबर रोजी त्याने मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांच्यावर सलग पाच मिनिटे भुंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. अर्थात जो खरे बोलतो त्याला भुंकण्याची गरज नसते. आणि दरेकर खरेच बोलत असल्याने त्यांना आवाज चढवावा लागला नाही. पण समोर येण्यार्‍या सत्याला भेदरल्यामुळे निखिलला भुंकण्याखेरीज गत्यंतर नव्हते. म्हणूनच की काय हा डॉबरमन श्वान पंथेची गेला.

केरळ व अन्य राज्यात स्थलांतरीत कामगार म्हणजे अन्य राज्यातून येणार्‍या कामगार श्रमिकांची रितसर नोंद केली जाते. पोलिसांकडे तशी नोंद व्हावी लागते, असा मुद्दा आमदार दरेकर मांडत होते. तर निखिलने थेट त्यांच्यावर डॉबरमन या जातिवंत कुत्र्यालाही मागे टाकील, एवढ्या भसाड्या आवाजात भूंकायला आरंभ केला. जेणे करून प्रेक्षकांना दरेकर सांगत असलेले सत्य ऐकता येऊ नये. उलट दरेकर खोटे बोलत असल्याचे निखिल भुंकून भुंकून सांगत होता. आणि ज्याअर्थी निखिल खोटे म्हणतो त्याअर्थी दरेकर खरे सांगत असणार याची मला खात्री पटली होती. म्हणूनच मी मंगळवारी इन्टरनेटवर शोध घेऊन सत्यशोधनाचा प्रयास केला. आणि दरेकरच खरे असल्याचा पुरावाच मला मिळाला. मला आश्चर्य वाटले ते कॉग्रेस आमदार व प्रवक्ते भाई जगताप यांचे. कारण मी त्यांना बुद्धीमान व विवेकी अभ्यासू नेता म्हणून ओळखतो. त्यांनीही निखिलच्या धडधडीत खोटेपणाला दुजोरा देण्याचा प्रमाद केला, त्यात माझी मोठी निराशा झाली. कारण जगताप स्वत: कामगार नेता आहेत आणि त्यांनी निखिलच्या नादी लागून आपले अज्ञान असे जगासमोर आणायला नको होते. कारण केरळा्त अशी स्थलांतरीत परप्रांतिय कामगारांची नोंद होते, ही नुसती बातमीच नाही तर त्यावर तिथल्या विधानसभेत चर्चाही झालेली आहे. इथे त्या बा्तमीचा इंतरनेट दुवा मी देत आहे तो निखिल बघेल असे मला वाटत नाही. कारण तो अज्ञानातच आनंदी आहे व राहो. पण जगताप यांनी जरूर बघावा.

प्रेस ट्रस्टने ११ जुलै २०१२ रोजी दिलेल्या बातमीत केरळमध्ये सरकारच्या हुकूमान्वये पोलिसांनी ६३,२०० परप्रांतिय स्थलांतरीत कामगाराची नोंद केल्याची माहिती गृहमंत्री तिरुवंकूर राधाकॄष्णन यांनी विधानसभेत दिल्याची ही बातमी आहे. तिथे केरळात मनसेचे राज्य नाही, तर भाई जगताप यांच्याच कॉग्रेस पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अघाडीचे सरकार आहे. तेव्हा निखिलच्या भुंकण्याला दाद देऊन जगताप यांनी आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये एवढीच अपेक्षा. मुद्दा इतकाच, की दरेकर देत असलेली माहिती शंभरटक्के खरी होती. मग निखिल त्यांच्यावरच खोटेपणाचा आरोप करून भूंकत का होता? कारण सोपे होते. त्याच दिवशी त्याच्या मालक दर्डा फ़ॅमिलीच्या कंपनीवर सीबीआयच्या धाडी पडल्या होत्या ना? ते जे कोणी सीबीआयवाले तिथे आले वा धाडी घालत होते, त्यांच्यावर भूंकायची हिंमत नसली मग या डॉबरमनाने दुसरे काय करावे? निदान मालकाची अब्रू जाते आहे त्यावरचे लोकांचे लक्ष उडवण्याचे इमान तरी दाखवायला नको काय? त्यासाठी मग दरेकरना ‘दर्डा’वत शिकारीचा आव आणणे त्याला भाग होते. कारण बाकी सगळ्या चॅनेलवर दर्डा कंपनीचे धिंडवडे निघत असताना त्याची लपवाछपवी करायची, तर अन्य कुणाच्या अंगावर भुंकायला नको का? राज ठाकरे कोण लागून गेलेत; असे म्हणतानाचा निखिलचा आवेश असा होता, की सीबीआयवाले कोण लागून गेलेत. असेच त्याला भुंकताना म्हणायचे असावे. पण तिकडे तोंड वळवले तर कायबीईन लोकमतच्या शेअर्सचीही तपासणी व्हायची भिती असेल ना? त्यापेक्षा दरेकरवर भुंकण्यात डॉबरमना सज्जनाने आपली ताकद व बुद्धी खर्ची घातली. तिथे आपली खोटेपणाची भूक भागवून घेतली

आवडले तर लाइक बरोबर शेअर सुद्धा करा

http://www.ndtv.com/article/south/kerala-police-to-identify-lakhs-of-unregistered-migrant-labourers-208005



http://www.dailypioneer.com/state-editions/kochi/90613-kerala-mulls-law-for-migrant-workers-registration.html


http://www.mid-day.com/news/2012/sep/030912-mumbai-Raj-Kerala-govt-registers-migrants-so-why-cant-we.htm


http://www.ndtv.com/article/south/over-60-000-migrant-workers-register-with-kerala-police-242172


http://bhautorsekar.blogspot.in/2012/02/blog-post_27.html
 — with Vinay Mali and 3 others.

No comments:

Post a Comment