Friday, September 16, 2016

पक्षश्रेष्ठी नावाची भुताटकी

high command cartoon के लिए चित्र परिणाम

लागोपाठच्या पराभवानंतरही कॉग्रेस काही धडा शिकायला तयार दिसत नाही. अन्यथा त्यांनी उत्तरप्रदेशात पुन्हा राहुल गांधी यांच्याच यात्रांचा कार्यक्रम योजला नसता. मागल्या लोकसभा मतदानात देशभर सपाटून मार खाल्ल्यानंतर पक्षाने नव्याने फ़ेरविचार करण्याची गरज होती. अशा लढतीमध्ये जिंकणार्‍या पक्षाने आपल्याला यश कशामुळे मिळाले, त्याचा विचार करणे आवश्यक असते. त्याहून अधिक पराभूत पक्षाने आपल्या चुका शोधायच्या असतात. कारण त्यांना नव्याने आपले बस्तान बसवणे भाग असते. सहाजिकच आताच्या अपयशाला जी कारणे आहेत, त्याचा पुन्हा अवलंब होऊ नये, ही पहिली गरज असते. पण कॉग्रेसला त्याची गरजच वाटलेली नाही. याचे एकमेव कारण पक्षश्रेष्ठी नावाची भंपक भुताटकी होय. इंदिरा गांधींनी आपल्या कारकिर्दीत कॉग्रेसच्या प्रस्थापित प्रादेशिक नेतृत्वाचा खात्मा करून टाकला होता. त्यांना आव्हान देऊ शकेल असा नेता दिल्लीतून पुढे येणे शक्य नव्हते. पण प्रादेशिक प्रभावाने डोईजड होऊ शकेल, अशा नेत्याची इंदिराजींना भिती होती. म्हणून आधी त्यांनी प्रादेशिक प्रभाव असलेले दिल्लीतील नेते खच्ची केले आणि पाठोपाठ प्रादेशिक पदांवर असलेल्या नेत्यांना खच्ची करण्याचे काम हाती घेतले. त्यातून पक्षश्रेष्ठी किंवा हायकमांड नावाची संकल्पना आकारास आली. प्रत्यक्षात इंदिराजींच्याच अपेक्षेला माना डोलावणारी टोळी, म्हणजे पक्षश्रेष्ठी होते. अशा टोळीला आपल्या प्रांतात किंमत असता कामा नये आणि त्याने सत्तेसाठी पुर्णपणे इंदिराजींवर विसंबून असायला हवे, ही त्याची व्याख्या होती. त्यांनी प्रादेशिक पक्ष संघटनेत इंदिराजींचे निरोप पोहोचवून तसे निर्णय स्थानिक नेत्यांना सहमतीने घ्यायला भाग पाडायचे, असे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. अशा घोळक्याला पक्षश्रेष्ठी म्हटले जाऊ लागले. पण इंदिराजींचा करिष्मा होता तोपर्यंतच अशा श्रेष्ठींना किंमत होती. बाकी त्यांची किंमत शून्य होती.

इंदिरा हत्येमु्ळे व्याकुळ झालेल्या देशाने राजीव गांधींना प्रचंड मते दिली आणि मग राजीवच श्रेष्ठी बनून गेले. त्यांची एक नवी टोळी तयार झाली. पण दरम्यानच्या काळात प्रांत, प्रदेश वा स्थानिक पातळीवर उपजत पुढे येणारे पक्षातील नेतृत्व आणि त्यांच्याकडून बांधली जाणारी पक्षसंघटना, ही कल्पनाच इतिहासजमा होऊन गेली. पक्षाचे प्रादेशिक नेते वा प्रदेशाध्यक्षही दिल्लीतून नेमले जाऊ लागले. त्यांना स्थानिक जनतेची सोडा, कार्यकर्त्यांचीही मान्यता मिळण्याची गरज राहिली नाही. मुंबईचे अध्यक्ष म्हणून संजय निरूपम यांची सध्या नियुक्ती झाली आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? गुजरातचे प्रदेशाध्यक्ष शंकरसिंग वाघेला तिथे भाजपाचा पाया घातल्याने प्रकाशात आलेले नेते आहेत. उत्तरप्रदेश या सर्वात मोठ्या राज्याचा नेता म्हणून सध्या राज बब्बर या अभिनेत्याकडे जबबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचे त्या राज्यातील जनतेमध्ये स्थान कोणते? समाजवादी पक्षात मतभेद झाल्याने कॉग्रेसमध्ये आलेला हा माणूस! अशारितीने कॉग्रेसची संघटना मागल्या चार दशकात क्रमाक्रमाने मोडण्यात आली. तिथे स्वतंत्रपणे विचार करू शकणारा किंवा पक्षाची उभारणी करू शकणारा नेता, पुढे येऊच दिला जात नाही. आंध्रप्रदेशात नव्याने कॉग्रेस उभी करणारा राजशेखर रेड्डी हा शेवटचा नेता. पण त्याचा वारसा पुत्राने घेण्याचा अट्टाहास केल्यावर सोनियांनी त्याच्यासह त्या राज्यातली कॉग्रेस नेस्तनाबुत केली. पण जगमोहन रेड्डी या तरूण नेत्याला आपल्या पायावर उभे राहू दिले नाही. इंदिराजींचा करिष्मा सोनियांपाशी नाही. पण पक्षातला तितका अधिकार मात्र त्यांच्याकडे आलेला आहे. कारण एकूणच कॉग्रेसमध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याला प्रतिबंध आहे. किंवा कॉग्रेसजन स्वतंत्रपणे विचार करायचेच विसरून गेले आहेत. थोडक्यात पक्षश्रेष्ठी ही आजच्या कॉग्रेसची खरी समस्या आहे.

२०१३ सालात चार राज्यामध्ये कॉग्रेस पुरती नेस्तनाबुत झाली. खुद्द दिल्लीत तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या शीला दिक्षीत पराभूत झाल्या. नवख्या आम आदमी पक्षालाही मोठे यश मिळाले. अन्य तीन राज्यात भाजपाने कॉग्रेसला धुळ चारली. त्यावेळी पक्षाचे उमेदवार निवडण्यापासून प्रचारापर्यंत सर्व जबाबदार्‍या राहुल गांधींनी उचलल्या होत्या. त्यांना पक्षाला न्याय देता आला नाही. किंबहूना त्यांच्याच पोरकटपणाने पक्षाला भूईसपाट व्हायची पाळी आलेली होती. पण निकालानंतर पत्रकारांशी बोलताना त्याची किंचितही वेदना राहुलच्या चेहर्‍यावर नव्हती. यातून आपला पक्ष धडा शिकणार असल्याची ग्वाही त्यांनीच पत्रकारांना दिली होती. कोणता धडा राहुल वा कॉग्रेस शिकली, त्याचे उत्तर पुढल्या सहा महिन्यातच मिळाले. लोकसभेचे मतदान सहा महिन्यात झाले आणि त्यात उरलीसुरली कॉग्रेस धुळीला मिळाली. हा शतायुषी पक्ष एका पोरकट छचोर तरूणाच्या हाती सापडला आणि किंमती खेळण्याची मोडतोड खट्याळ मुलाने करावी, तशी राहुलनी कॉग्रेस उध्वस्त करून टाकलेली आहे. मात्र त्यालाच कॉग्रेसची फ़ेररचना किंवा नव्याने उभारणी ठरवणार्‍यांची आज कॉग्रेस पक्षात चलती आहे. ज्यांना लोकसभेत थेट निवडून येणे शक्य नाही, किंवा लोकांमध्ये जाऊन पक्षाची लोकप्रियता निर्माण करत येत नाही, अशांच्या हाती आज एकूण कॉग्रेस संघटनेची सुत्रे गेलेली आहेत. कारण श्रेष्ठींकडून त्यांच्याच नेमणूका होत असतात आणि त्यांनाच अधिकार दिले जात असतात. इंदिराजी आपल्या व्यक्तीमत्व आणि करिष्म्यावर पक्षाला विजय मिळवून देऊ शकत होत्या. म्हणून अन्य नेत्यांना त्यांच्यापुढे शरणागत व्हावे लागत होते. पण ती शरणागतीची सवय इतकी अंगवळणी पडली आहे, की करिष्मा नसलेल्या कुणालाही पक्षाध्यक्षपदी बसवले, मग त्यालाही कॉग्रेसजन शरण जात असतात. मग तो सीताराम केसरी असो किंवा राहुल गांधी असो.

आज त्याच चक्रव्युहात कॉग्रेस फ़सलेली आहे. म्हणूनच उत्तरप्रदेशात पक्षाचे बस्तान बसवण्याची कल्पना योग्य असली, तरी कोण ती कल्पना कोन यशस्वीपणे राबवू शकतो, याचा वेगळा विचारही पक्षाला करावासा वाटलेला नाही. कारण कॉग्रेसमध्ये सोनिया विचार करू शकतात. इतर कोणी विचारच करायचा नसतो. मग पक्षाचा विचार वा निर्णय म्हणजे सोनियांना जे काही त्यावेळी वाटेल, तेच असते. त्यांना पुत्रप्रेमाने पछाडलेले असेल, तर त्यांनी राहुलच्याच हाती निर्णय व अधिकार सोपवल्यास नवल नाही. मग त्याला आव्हान कोणी द्यायचे? तसे आव्हान देणार्‍याला कॉग्रेसमध्ये स्थान नाही. ममता बानर्जी यांनी बाजूला होऊन बंगालमध्ये मृतप्राय झालेली कॉग्रेसच प्रादेशिक पक्ष म्हणून पुनरूज्जीवित केली ना? अठरा वर्षापुर्वी त्याही कॉग्रेसमध्येच होत्या. त्यांना जे शक्य झाले ते अन्य प्रादेशिक कॉग्रेस नेत्यांना अशक्य आहे, असा दावा कोण करू शकतो? पण ममतामध्ये सीताराम केसरी व सोनियांना झुगारण्याची हिंमत होती. आज देशव्यापी वा अन्य प्रांतातील कॉग्रेस पुनरुज्जीवित करायची असेल, तर अशी हिंमत असलेल्या कॉग्रेसच्या नेत्यांना धाडस करावे लागेल. त्यासाठी पोकळ वासा असलेली श्रेष्ठी ही संकल्पना झुगारून द्यावी लागेल. नुसते कार्यकर्तेच नाही तर बंगालप्रमाणे मतदारही अशा नेत्यांना साथ देऊ शकेल. पण सवाल नुसत्या धाडसाचा नाही, तर पक्षश्रेष्ठी नावाच्या भुताटकीतून मुक्त होण्याचा आहे. अन्यथा उतरप्रदेश वा तामिळनाडू सारख्या राज्यातून कॉग्रेस जशी नामशेष झाली, तशी अन्य राज्यात दिसेनाशी व्हायला फ़ार वर्षे लागणार नाहीत. उत्तरप्रदेशात सध्या जो तमाशा चालू आहे, तो राहुल गांधींचा जिर्णोद्धार करण्याची मोहिम आहे. ती कितपत यशस्वी होईल ते काळच ठरविल. पण उत्तरप्रदेशात कॉग्रेसला भवितव्य नसल्याची ग्वाही आजपासून देता येईल.

रोजनिशी   दै. जनशक्ति

2 comments:

  1. कन्हैय्याकुमार अफजलगुरुचा तर वेमुला मेमनचा शहादत दिन साजरा करीत होता , अशा लोकांना पाठिंबा देण्यासाठी या शतायुषि पक्षाचा नेता गेला होता .bjp ला विरोध करण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात . कन्हैयाने दिलेल्या घोषणा
    आतापर्यत कानात घुमत आहेत . या देशाची जनता राहुलला या गुन्ह्याबद्दल कधीही माफ करणार नाही .

    ReplyDelete