Monday, May 20, 2013

साबरमती ते बारामती; व्हाया हरिश्चंद्र तारामती


आदरणिय श्री. अरूण टिकेकर
संपादक दै. ‘लोकसत्ता’ यांस,

   आपल्या दैनिकाच्या १ मे आणि १५ मे १९९४च्या अंकात रविवारी ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झालेले माधव गडकरी व शरद पवार नामे दोघांचे प्रदीर्घ लेख वाचण्यात आले. आजच्या प्रतिष्ठीतांमध्ये बोकाळलेल्या बुद्धीभ्रष्टतेला पुरेसे अनावृत्त करण्यास हे दोन्ही लेख कारणीभूत ठरावेत, ही अपेक्षा आहे. आपलीही तशीच अपेक्षा असावी. परंतू या दोन्ही लेखामध्ये कुठेतरी कारण नसताना माझ्यासारख्या सामान्य माणसाची उगाच फ़रफ़ट करण्यात आलेली आहे. त्या दोघांनी लेख लिहिताना माझा उल्लेख केल्याने हा खुलासा करणे आवश्यक वाटते. म्हणून हा पत्रप्रपंच.

   ‘साबरमती ते बारामती’ या आपल्या प्रदीर्घ लेखामध्ये माधव गडकरी यांनी माझा उल्लेख करून माझ्या तोंडी भलतेच विधान घुसडले आहे. ‘मुर्खांच्या हाती पैसा आणि बुद्धीशून्यांच्या हाती सत्ता यामुळे साबरमती ते बारामती देशाचे वाटोळे झालेय’, हेच ते विधान. वास्तविक मी म्हणजे पुण्याचा रिक्षावाला असे विधान करण्याइतका बुद्धीभ्रष्ट नाही. कारण मुर्ख व बुद्धीभ्रष्ट वेगळे नव्हे हे गडकरींना कळत नसेल. पण मला कळते. म्हणूनच मी असे विधान कशाला करीन? असे अक्कलशून्य विधान करायला आम्ही पुण्याचे रिक्षावाले शिक्षण महर्षी पतंगरावांच्या विनाअनुदान विद्यापिठात देणग्या देऊन शिकलो नाही. खेड्यात जिथे अनुदानाअभावी अर्धपोटी शिक्षक कसेबसे पोरांना शिकातात, तिथे शिकून आम्ही पोटापाण्याच्या मागे लागलो. मग आम्हाला अशी साबरमती ते बारामती वगैरे अनुप्रासाची विधाने सुचणार तरी कशी? पण त्यानंतर शरद पवारांचा लेख वाचला. तेव्हा जुळणार्‍या शब्दरचनेला अनुप्रास म्हणतात, याचे ज्ञान झाले. आणि अनुप्रास करायचा तर काय केले असते, म्हणून शब्दाशी खेळ करत गेलो, तेव्हा पुढील विधान सुचले ते असे- 

   ‘मुर्खांच्या हाती वृत्तपत्रे आणि लफ़ंग्यांच्या हाती सत्तासुत्रे आली; मग हरिश्चंद्र तारामतीचे शरश्चंद्र बारामती होतात आणि त्यांच्या पोटी रोहिदासाऐवजी मोहीदासाची हावरी संतती पैदा होते. मग सगळा देश विकून खाल्ला तरी त्या हावरट पोराची भूक संपत नाही’. 

   आता हे वाचून पवारांना पुन्हा अनुप्रास दिसेल आणि नको त्या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटेल. प्रामाणिक मतभेद व्यक्त करावेसे वाटतील. त्यात त्यांचा बहुमोल वेळ उगाच खर्ची पडू नये, म्हणून या पत्रास प्रसिद्धी देऊ नये आणि दिलीच तर त्या अंकाची प्रत पवारांच्या हाती लागू नये याची काळजी घ्यावी.

   संपादक महोदय, ‘मुर्खांच्या हाती वृत्तपत्रे’ म्हटल्यावर आपल्यालाही माझा राग येणे स्वाभाविक आहे. पण शहाण्यांच्या हाती वृत्तपत्रे असती, तर लफ़ंग्यांच्या हाती सत्तासुत्रे गेली असती काय? आपण ज्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये श्रीयुत गडकरी यांचा ‘साबरमती ते बारामती’ असा मुख्यमंत्री पवारांच्या लुच्चेगिरी विषयक लेख छापला, त्याच ‘लोकरंग’मध्ये डिसेंबर (१९९३) महिन्यात पवारांचे गोडवे व गुणवत्ता गाणारा दिनेश देसाई यांचा लेख छापला होता. त्या लेखाप्रमाणे जर पवार पंतप्रधान होण्याइतके महान असते, तर आज अवघ्या चार पाच महिन्यात ते लुच्चेलफ़ंगे बनले काय, असा प्रश्न पडतो. असे दोन परस्परविरोधी लेख चारपाच महिन्याच्या अंतराने छापताना, आपले वृत्तपत्र एका टोकाहून दुसर्‍या टोकाला भरकटत जाते, एवढेही ‘तारतम्य’ ठेवले जात नाही ना? पवारांनीही आपल्या लेखात ‘तारतम्याच्या अभावाची’ आठवण करून दिली आहे. मग सांगा टिकेकरजी वृत्तपत्रे शहाण्यांच्या हाती आहेत की मुर्खांच्या हाती गेली आहेत?

   आज तुम्ही मुख्यमंत्र्याने पैसा खाल्ला, माया जमवली, भ्रष्टाचार केला, असे छापल्यावर तोच मुख्यमंत्री खुलासेवार लेख पाठवतो आणि तुमच्या ‘तारतम्याचा’ प्रश्न विचारून तुमच्या अब्रुला थेट हात घालतो, ती बेअब्रू तुम्ही छापता. हा शहाणपणाचा दाखला आहे का? आमचा बाप नेहमी आचार्य अत्रे नामक कुणा संपादकाची आठवण मोठ्या अभिमानाने सांगायचा. या अत्रे साहेबाचा ‘मराठा’ म्हणून एक पेपर होता. सगळ्या मंत्र्यासंत्र्यांना ‘मराठा’ नागडा करायचा. अत्र्यांच्या लेखणीने कोणाचे धोतर पाहिले नाही, की कोणाची लंगोटी पाहिली नाही. ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ अशा ब्रिदवाक्याने पत्रकारिता केली. त्या अत्र्यांना सगळे मंत्री वचकून असायचे. भानगड छापतो म्हणायची खोटी, भल्याभल्यांची पॅन्ट पिवळी व्हायची. एका मुख्यमंत्र्याने तर म्हणे, ‘मराठा’त आपली मोठी भानगड छापून येणार म्हणून आत्महत्याच केली होती.

   नाहीतर आजचे तुम्ही संपादक लोक. मुर्ख आणि बुद्धीशून्य यातला फ़रक तुम्हाला कळत नाही. तुम्हाला शहाणे कोणी म्हणावे? पूर्वीचे संपादक शहाणे होते म्हणून वृत्तपत्रांचा दरारा असे. सत्ताधार्‍यांना जपून कारभार करावा लागे. कारण पत्रकार हा समाजाचा पहारेकरी असतो. तो जेवढा शहाणा असतो, तेवढा चोर भित्रा असतो. पण पहारेकरीच मुर्ख बनला, मग चोर शिरजोर व्हायचाच. जेव्हा बुद्धीवादी वर्ग स्वार्थावर डोळा ठेवून बुद्धी गहाण टाकू लागतो, तेव्हा देश गहाण पडायला वेळ लागत नाही. ज्या काळात इंदिराजींच्या लांड्यालबाड्या झाकायला इथला बुद्धीवादी वर्ग झटू लागला, तिथूनच देशाची अब्रू विकायला सुरूवात झालेली होती. गडकरी जे ४७० हजार कोटी रुपयांचे कर्ज सांगतात, ते कालपरवा घेतलेले नाही. पंचवीस वर्षातल्या उधार उसनवारीचा हिशोब आहे. त्याच इंदिराजींच्या कर्तृत्वाचे गोडवे गडकरी आधी गात होते. पवारांनी गायले व निळूभाऊ खाडीलकरही गातच होते. त्याच कर्तृत्वाची किंमत आपण कर्जाचे व्याज म्हणून आपण भरत आहोत.

   बांगला देश मुक्त करून दाखवला त्याचीही किंमत याच कर्जात येते. एशियाड स्पर्धा भरवल्या, रंगीत टिव्ही आणला, बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण झाले, बर्‍याच गोष्टी आहेत. सगळा प्रकार ॠण काढून सण साजरा करण्याच्याच होत्या. पण तेव्हा ज्यांनी कान पकडायचे तेच ढोल पिटत होते. आणि आता मोठे कर्जाचे आकडे दाखवून छात्या बडवित आहेत. तेव्हा त्यांनी खोट्या कर्तृत्वाचे ढोल पिटले नसते, तर आज मुर्खांच्या हाती पैसा आला असता का? हाती पैसा येणे म्हणजे विकास अशी फ़सवी व्याख्या कोणी तयार केली? भीक मागणे व भीक मिळवणे म्हणजे कमाई आणि ती भीक पदरात पडली म्हणजे विकास; अशी व्याख्या कोणी तयार केली? गडकरी आपल्या लेखात म्हणतात- 

   ‘उत्तम अर्थमंत्री हवा होता, तोही मिळाला. श्री. मनमोहन सिंग यांनी भारताला जगाच्या बाजारातील गेलेली पत पुन्हा मिळवून दिली हेही खरे आहे. परदेशी कर्जावरचे व्याज वेळेपुर्वीच दिले असे सांगितले गेले.’

   याला पत म्हणतात? घेतलेले कर्ज फ़ेडलेले नाही. व्याज भरताना तारांबळ. ती तारांबळ थांबली म्हणजे बाजारात पत आली? टिकेकर साहेब, आम्ही सुद्धा पठाण सावकाराकडून कर्ज घेतो. पण आम्हाला त्याची बाहेर वाच्यता करायचीही लाज वाटते. वेळीच व्याज दिले नाही तर सावकार दारात येतो. तेव्हा आत्महत्या करावी इतकी शरम वाटते. एकदाचे सर्व कर्ज फ़ेडतो, तेव्हाच कुठे आम्ही उजळमाथ्याने फ़िरू शकतो. त्याला आम्ही रिक्षावाले, मोलमजूरी करणारे पत म्हणतो. तेव्हा तुमच्या आणि आमच्य साबरमतीमध्येही तेवढाच फ़रक आहे. तुम्हाला कर्जावरचे व्याज वेळच्यावेळी दिले हेच कर्तृत्व आणि पत वाटते. आम्ही कर्जमुक्त होण्याला पत समजतो. तुमची साबरमती गांधीजींच्या आश्रमात किंवा त्यांच्या चष्म्यात अडकलेली आहे. तुमचे गांधीजी पुतळ्यात कुंठीत झालेले आहेत. आश्रमाला भेट दिली किवा पुतळ्याला हार घातला, की तुमचा गांधीजींशी संबंध संपतो. आमची साबरमती, आमचा गांधीजी हा विचार आहे, प्रामाणिक आचार आहे. आपण आपल्या जागी चांगले व खरे वागलो; हेच आमचे गांधीदर्शन असते. त्यात चोरीचपाटी केली मग साबरमतीची बारामती होते. शरद पवार आपल्या लेखामध्ये म्हणतात- 

   ‘साबरमती व बारामती हे सार्वजनिक जीवनातील प्रवृत्तीची दोन परस्परविरोधी टोके आहेत, असे चित्र उभे केले आहे. ते निखालस अन्याय्य आहे. गांधीजी हे शतकातून एकदाच जन्माला येणारे महामानव होते. त्यांचे निकटचे सहकारी असणार्‍या पंडित नेहरू, सरदार पटेल आदी थोर राजकीय नेत्यांनाही त्यांच्या मार्गाने जाणे जमले नाही. माझ्यासारख्या आजच्या बदलत्या परिस्थितीत काम करणार्‍या स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीच्या प्रतिनिधीला ते जमणे जवळजवळ अशक्यप्रायच आहे.’

   यालाच आम्ही सामान्य माणसे दांभिकपणा म्हणतो. ढोंग म्हणतो. गांधींच्या मार्गाने जाण्यात पवारांना कुठली अडचण आहे? गांधींचा मार्ग सोपा सरळ आहे. स्वावलंबन आणि सचोटी या दोन समांतर रेषांमध्ये जेवढे अंतर आहे, तेवढ्या रुंदीमधून वाटचाल करायची. यालाच गांधीमार्ग म्हणतात ना? त्यात लांडीलबाडी, थापेबाजी यांना स्थान नाही. तसेच कर्ज मागत झोळी घेऊन फ़िरण्याची मोकळीक नाही. यात कठीण ते काय? पवारांना त्यात अशक्यप्राय वाटावे, असे आहेच काय? गांधीजींचा मार्ग म्हणजे पंचा नेसून जगणे, बकरीचे दूध पिणे, टकळी घेऊन सूत कातणे, चरखा चालवणे, पदयात्रा करणे, असा नाही. कुणी पवारांना पंचा नेसायला सांगत नाही की दांडीयात्रा करायला सांगितलेले नाही. पण गांधींसारखे खरे व सत्य बोलायला काय अडचण आहे? गांधींप्रमाणे सचोटीने जगण्यात अशक्यप्राय कोणती बाब आहे? पवार गांधीजींना महामानव बनवून आपण फ़क्त लांड्यालबाड्या करू व असत्यच बोलू; असे बजावत अहेत. त्याला हिंमत म्हणतात.

   तुम्हीच सांगा टिकेकर साहेब, आजवर कुणा माणसाची एवढी हिंमत झाली आहे काय? आपण फ़क्त खोटेच बोलू व वागू, याची जाहिर ग्वाही देण्याची हिंमत दुसरा कोणी करू शकला आहे काय? एवढ्यापायीच पवारांची बारामती म्हणजे खोटेपणा, दगाफ़टका यांची धोकेबाज गुहा अशी कुख्यात झाली आहे. आणि पवार ती बदनामी पुसायच्या नादात लेख लिहिताना सुद्धा, पुन्हा बारामतीला बदनामच करून गेलेत ना? थोडक्यात आपण धुर्त बनेल आहोत आणि सत्ता मिळवण्या टिकवण्यासाठी लफ़ंगेच रहायला हवे, प्रामाणिक होता येणार नाही; असे पवार सांगतात. तेव्हा सत्ता लफ़ंग्यांच्या हाती आहे, याची पवारच साक्ष देतात ना? गडकरी आपल्या लेखामधून स्वत:चा मुर्खपणा सिद्ध करतातच. शिवाय वृत्तपत्रीय खोटेपणाचे दाखले देतात, तेव्हा वृत्तपत्रे मुर्खांच्या हाती गेल्याचे सिद्ध होते आणि मग अशा लफ़ंगेगिरीलाच सच्चाई ठरवणेही सोपे होऊन जाते ना? पवारांनी आपल्या लेखात सर्वच आरोपांना ‘लोकापवाद’ ठरवून आपण सत्याचे पुतळे आहोत, असा आव उगाच आणला का? पण त्या लोकापवादात अनील शर्मा प्रकरणी पवारांनी मूग गिळले ते कशाला?

   असो. तर माझ्या विधानातील मुर्खांच्या हाती वृत्तपत्रे आणि लफ़ंग्यांच्या हाती सत्तासुत्रे गेली, याचा अर्थ एवढ्याने स्पष्ट व्हावा. आता वळू या हरिश्चंद्र तारामती या गोष्टीकडे. राजा हरिश्चंद्र म्हणे सत्यवचनी होता. स्वप्नात राज्याचे दान दिल्याचे वचन त्याने जागेपणी पुर्ण केल्याची कहाणी खुप प्रसिद्ध आहे. कुणा साधूला स्वप्नात दिलेला शब्द पाळण्यासाठी हरिश्चंद्राने स्वत:चा लिलाव  करून राज्यावर पाणी सोडले, हलाखीचे जीवन पत्करले, अशी ती पुराणकथा आहे म्हणे. तुलनाच करून बघा. आजच्या बारामतीचा राजा शरश्चंद्र जागेपणी दिलेला शब्द स्वप्नात तरी पाळतो का? मुख्यमंत्री होताना गॅंगवॉरचा बंदोबस्त करतो असे पवार म्हणाले होते. कोणता बंदोबस्त केला? उलट आता गुन्हेगारी आणि गॅंगवॉर अस्तित्वातच नाही, असा विश्वामित्री पवित्राच शरश्चंद्र बारामती घेत नाहीत काय? ‘लोकसत्ता’च्या लोकरंग पुरवणीत ‘लोकापवादाला खतपाणी कशाला’ अशा शिर्षकाच्या लेखात ते काय लिहितात?

   ‘गेल्या शनिवारी खटाव मिलचे प्रमुख सुनित खटाव यांची भर दुपारी रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती अजून शहरात वावरत आहेत व आता कामगार चळवळीत त्या प्रवेश करू पहात आहेत, हे प्रकर्षाने दिसून येते.’

   इथे अजूनही या शब्दाचे प्रयोजन काय? पवारांनी मुख्यमंत्री झाल्यापासून असा कोणता बंदोबस्त केला होता, की मुंबईत गुन्हेगारी प्रकर्षाने दिसेनाशी झाली होती? तान्या कोळीचा खुन झालाच. अश्विन नाईकवर हल्ला झालाच. खंडण्या उकळण्याचे उद्योग नियमित चालू असल्याचे पोलिसच सांगतात. त्यासाठी अनेकांना टाडा लावतात. हे पोलिस पवारांच्याच हाती असलेल्या गृहखात्याचे बंदे सेवक आहेत ना? मग पोलिसांना दिसणारा दहशतवाद, गुन्हेगारी, गुंडगिरी पवारांना प्रकर्षाने दिसत नव्हती ती कशाला?

   हा हरिश्चंद्र आणि शरश्चंद्र यांच्यातला फ़रक आहे टिकेकर साहेब. ‘तारतम्य’ लिहिताना असे फ़रक लक्षात घेत चला जरा. मग पवारांच्या लेखातील असे ‘अजूनही’ रहाणारे शब्द प्रकर्षाने संपादकीय कैचीत सापडतील. ‘लोकसत्ता’च्या संपादकाला थेट ‘तारतम्य’ शिकवायचा आगावूपणा पवार आपल्या लेखात करतात, तेव्हा स्वत: किती तारतम्य राखत असतात? ‘अजूनही गुन्हेगारी दिसते’ म्हणतात हा धादांत खोटारडेपणा झाला. कारण त्यांचेच निकटवर्तिय व कालपर्यंतचे गृहराज्यमंत्री अरूण मेहता यांनीच राष्ट्रीय मिल मजदूर संघ प्रकरणी चाललेल्या गुंडगिरीसाठी गळा काढला होता. पवारांना होणारी गुन्हेगारी दिसत नसेल, तर निदान मेहतांचा आक्रोश तरी ऐकू यायला हवा ना? पण नाही ऐकू आला. त्यालाच शरश्चंद्र बारामती म्हणतात. सरळ कानावर हात ठेवून मोकळे होणे. आपण त्या गावचेच नाही, असे भासवून काढता पाय घेणे, म्हणजेच शरश्चंद्र बारामती.

   त्या पुराणकथेतील हरिश्चंद्र तारामतीला एक पुत्र होता. आपल्या पित्याचे राज्य गेल्यावर आलेल्या हलाखीच्या जीवनात तोही अर्धपोटी जगू लागला. त्याने शब्द पाळणार्‍या बापाला नालायक ठरवले नाही. एके दिवशी खायला अर्धीच भाकर राहिली; म्हणून मायबापांनी उपाशी राहुन आपला पुत्र रोहिदासाला ती अर्धी भाकर वाढली. तेव्हा तो पोर सुद्धा भूक मारून उपाशी झोपला. त्याची बोधप्रद कथा आचार्य धर्माधिकारी यांनी लिहून ठेवली आहे. आईबापांच्या भुकेतही सुख शोधणारा पुत्र हरिश्चंद्र तारामतीच्या पोटी जन्मला होता. शरश्चंद्र बारामतीला अशी संतती लाभली का? लाभेल का? काका आमदार, पुतण्या खासदार, पुतण्या आमदार तर काका खासदार; असाच खेळ चालला आहे ना? कुठे संपणार आहे त्यांची सत्तेची भूक? सत्तेत काय कमी झाले त्यांना? शरदरावांना काय कमी पडले, की अजितदादांची कुठली उपासमार झाली? तरीही भुक संपली आहे का? यालाच मोहीदास म्हणतात. मोह न संपणारा तो मोहीदास. ज्याची भूक सगळे जग गिळून झाले, तरी संपत नाही. पवारांची सगळी पिलावळ अशीच हावरी झालीय. मग कुणाचे नाव कलमाडी असेल, कुणाला पद्मसिंह म्हणत असतील. पण उपज तीच मोहीदासाची. विधीनिषेधशून्य हावरटाची.

   मात्र तरीही दोष त्यांचा नाही टिकेकर साहेब, आरोपी ते नाहीतच. त्यांना मोकाट होऊ देणारे खरे गुन्हेगार आहेत. ज्यांनी त्यांना वेळच्यावेळी रोखायचे होते, तेच त्यांच्याशी चांगले सोयरसंबंध जुळवत बसले, मग चोरांनी शिरजोर व्हायचे नाही तर काय? आज गडकरींना साबरमती व बारामतीमधला फ़रक दिसू लागला, कारण त्यांचे पवारांशी संबंध चांगले नाहीत. म्हणजे संबंध कसे आहेत वा असतात; त्यावर गडकरी वा इतरांची लेखणी निर्भीड होत असते. अलिकडे ‘नवाकाळ’चे निळूभाऊ खाडीलकर यांच्या निर्भिडतेचा घोडा खुप उधळला आहे. गडकरी तरी चौफ़ेर लिहायचे. निळूभाऊ चक्क चौखुर उधळलेत. पवारांच्या गृहमंत्र्यावरच ‘गॅंगवॉरची पाळेमुळे’ असल्याचा बिनपुराव्याचा आरोप निळूभाऊ करणार. मात्र खैरनारांनी पवारांवर आरोप केला, तर तेच निळूभाऊ त्यांच्याकडे पवारांच्या विरोधातले पुरावे मागणार. त्यांना फ़ैलावर घेणार. पवारांची बदनामी म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राची बेइज्जत, म्हणून ‘नवाकाळ’ गळा काढणार. कशाला कुठले तारतम्य शिल्लक राहिले आहे? अशा़च प्रकारच्या प्रतिष्ठीतांची संख्या समाजात वाढते आहे. पण एकूण समाजाची प्रतिष्ठा मात्र दिवसेदिवस खालावत चालली आहे. कदाचित जागतिक बॅन्क आणि नाणेनिधीकडून उद्या अब्रू देखील कर्जावू आणावी लागेल, इतकी प्रतिष्ठा संपत आलेली आहे. पवार आणि गडकरी अब्रू व प्रतिष्ठेऐवजी विश्वासार्हता असा बनावट शब्द वापरतात इतकेच. आमच्या साध्या शब्दात कुणालाच लाज उरलेली नाही.

   माफ़ करा टिकेकर साहेब, आजच्या या प्रतिष्ठीतांकडे पाहिले, बुद्धीमत्तेच्या कसरतीकडे पाहिले, मग आम्ही सामान्य पोटार्थी व अडाणी राहिलो; याचीच धन्यता वाटते. शिकून विद्वान झालो असतो, तर न जाणो आम्हीही रिक्षा चालवण्याऐवजी असेच बेशरम शाब्दिक कसरती, चलाख्या आणि लबाड्या करून स्वत:च्या पापाला पुण्यकर्म ठरवित गेलो असतो. दुसर्‍यांच्या पापाला पुण्यकर्माचे लेबल लावायचे महापाप करीत राहिलो असतो. मुर्खांच्या हाती पैसा आणि अक्कलशून्यांच्या हाती सत्ता गेल्याने काही बिघडत नाही. पण जेव्हा त्या निर्बुद्धांना बुद्धीमान व चतूर ठरवणारे निर्माण होतात. तेव्हाचा वाटोळे होत असते. बुद्धीमान असतात तेच भाट, चमचे व लाळघोटे झाले मग मात्र विनाशाला पर्याय उरत नाही.

   मुर्खाच्या हाती पैसा आला तर तो उधळून टाकतो. बुद्धीशून्याचा हाती सत्ता आली तर तो ती सत्ता गमावतो. पण  शहाणपणा-मुर्खपणा, सत्य-असत्य, चांगले-वाईट, पाप-पुण्य यात फ़रक करण्याचा जो निकष असतो, त्यात दोष वा खोट असणे; ही विनाशाची हमी असते. कारण हा निकष खोट्याला खर्‍याचे प्रमाणपत्र देण्याचा धोका असतो. निकष हा मानवी श्रद्धा, समजुती, निष्ठा यांचा प्रमुख आधार असतो. तोच निकष खोटा बनला; मग समाजाचा मूलाधारच डळमळू लागतो. संपुर्ण समाज व राष्ट्रच दोलायमान होऊन जाते. साबरमती ते बारामती नव्हेतर काश्मिर ते कन्याकुमारी. असेतू हिमाचल राष्ट्रच कोसळू लागते. आपण तेच घडताना पहात आहोत. पवारांना ‘अजुनही’ तेवढेच ‘प्रकर्षाने’ दिसत नाही. गडकरींच्या दृष्टीक्षेपात येत नाही. तुमच्या ‘तारतम्यात’ बसत नाही. निळूभाऊंची अवस्था इतकी तरल आहे, की वितभर उंचीवरून त्यांचा रथ धावतोय. आधार सुटल्याचे भानही एवढ्यात त्यांना येणार नाही. आम्ही सामान्य मातीची बनलेली माणसे. साध्या भूकंपाने आमची घरे ढासळतात. तेव्हा समाज, देश, राष्ट्र डळमळू लागले हे आम्हालाच आधी कळणार ना? तुम्हा बड्यांना ते इतक्या लौकर कसे कळेल?

   तुम्ही विचारात गढलेली माणसं. विचारांनी प्रवृत्त होणारी, विचारांनी अनावृत्त होणारी, विचारातून निवृत्त होणारी, म्हणूनच अविचारालाही प्रवृत्त होणारी. आम्ही विचारच करत नाही; तर अविचाराला तरी सवड कुठली मिळायची? पोटात एक बावीस फ़ूट लांबीचं आतडं असतं. तेवढा बावीस फ़ुटाचा पल्ला गाठून रोजच भूक भागवण्यातच आमचं आयुष्य संपून जातं. तुमच्यासारखे अतीदूर पल्ल्याचे विचारही आमच्या डोक्यात येऊ शकत नाहीत. ते आम्हाला परवडणार नाहीत. कारण पोटाची भूक हे आमचं सत्य आहे. इतर सत्यशोधन आमच्या आवाक्यातल्या गोष्ट नाही. त्यामुळे आम्ही समोर दिसणार्‍या गोष्टीवर विश्वास ठेवतो. पवार साहेब आमच्या त्या विश्वासालाच लोकापवाद म्हणतात.

   मग तुम्हीच सांगा टिकेकर साहेब, पवारांवर मतदानातून सामान्य जनतेने व्यक्त केलेला विश्वासही लोकापवाद नाही काय? त्या मतदाराने तरी कुठे पवारांचा प्रत्येक शब्द खराखोटा तपासून पाहिला होता? आज पवारांच्या पाठीशी विधानसभेत बहूमत आहे, म्हणजेच जनतेचा त्यांना पाठींबा आहे, हा सुद्धा एकप्रकारे लोकापवादच नाही काय? मतदानाला चार वर्षे उलटून गेली. पवारांनी कधी व कितीदा तो जनतेचा विश्वास खरा की खोटा, ते तपासून पाहिले आहे? कितीसे सत्यशोधन केले आहे? टिकेकर साहेब तुम्ही तरी किती सत्यशोधन केलेत? पवारांचा लेख छापण्यापुर्वी त्यात सत्य किती नि तथ्य किती याचा शोध घेतला का? पवारांनी लिहिला नि तुम्ही छापलात. पवारांच्याच भाषेत सांगायचे, तर गडकरींचा लेख छापून तुम्ही ‘लोकापवादाला खतपाणी’ घातलेत. तसेच पवारांनी लिहिलेल्या लेखाला प्रसिद्धी देऊन पुन्हा दुसर्‍या लोकापवादालाच खतपाणी घातलेत ना?

   कोण कोणाला जेवू घालतो, कोणाच्या दारी पंगती उठतात, कोण बोकड कापून खाऊ घालतो, त्याची उठाठेव गडकरींनी केली आहे. अशी तक्रार करताना पवार म्हणतात, कोणी कोणाला कोठे भोजन दिले, ही बाब गौण मानावी. म्हणजे खाण्याचा बोभाटा नको. खर्‍याखुर्‍या खाण्याची चर्चा नको. नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात अधिक बोला(ई)चे मटन हवे आहे. लोकांनी त्यावरच आपली भूक भागवावी अशी अपेक्षा दिसते. मुळात हा सगळा उद्योग हवाच कशाला होता? गडकरींनी असला लेख लिहिण्यापेक्षा शरद पवारांशी चांगले नसलेले संबंध, चांगले बनवण्याचा प्रयास केला असता; तर ही बोलाची पंगत वाढलीच गेली नसती. आणि आमच्यासारख्या सामान्य रिक्षावाल्याला बोलाचे उपाशी ढेकर देण्याची वेळही आली नसती. कदाचित लेख छापून आल्यावर त्यांचे बिघडलेले संबंध सुधारतील व पंगती रंगतदार होतीलही. मग आम्ही कोरडे ढेकर द्यायचे आणि तुम्ही रहाणार कोरडे पाषाण.

   शेवटी एकच विनंती टिकेकर साहेब, तुम्ही वा गडकरी त्या पवारांचे गोडवे गा किंवा पोटभर निंदानालस्ती करा. आम्हा पुण्याच्या वा इतरत्रच्या रिक्षावाल्यांना त्यात अकारण ओढू नका. आमच्या तोंडी भलतीसलती विधान घुसडू नका, कोणी घुसडली तर निदान छापू नका. खुप खुप उपकार होतील गरीबांवर तुमचे.

आपला नम्र

पुण्याचा रिक्षावाला

(पूर्वपर्सिद्धी जुन १९९४)