Saturday, October 22, 2016

राजकारणातल्या रामलिला

karuna stalin के लिए चित्र परिणाम

रामलिला हा उत्तर भारतात नवरात्रीत चालणारा नाट्यप्रयोग आहे. त्यातून अनेक नव्या कलावंतांना प्रोत्साहन मिळत असते आणि लोकांचेही मनोरंजन होत असते. म्हणूनच डाव्यांपासून उजव्यांपर्यंत सगळेच राजकारणी रामलिलांचे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात. भाजपाने पंचवीस वर्षापुर्वी अयोध्येतल्या रामजन्म भूमीचा वाद राजकारणात आणल्याने त्यांच्यावर जातियवादाचा किंवा धर्मांधतेचा आरोप झाला. पण विविध राजकारण्यांच्या घरात वा पक्षात रंगलेल्या रामलिलेचा उहापोह कधी होत नाही. सद्या उत्तरप्रदेशच्या राजकीय घराण्यात म्हणजे समाजवादी पक्ष व मुलायम यादव यांच्या कुटुंबात अशीच एक रामलिला रंगलेली आहे. उघड कोणी त्याविषयी फ़ारसे बोलत नाही. पक्षातील गट किंवा पिताविरुद्ध पुत्र, अशा कथा सांगितल्या जात आहेत. पण वास्तवात यादव कुटुंबात ही रामलिलाच रंगलेली आहे. मुलायम यांनी साडेचार वर्षापुर्वी पक्षाला बहूमत मिळाल्यावर देशातील त्या सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या लाडक्या सुपुत्राचा राज्याभिषेक केला होता. पण मुलायम हे समाजवादी पुरोगामी अधिक यादव असल्याने त्यांच्यातला दशरथ कोणी बघायला राजी नव्हते. म्हणूनच आजची रामलिला बघणेही अशक्य झाले आहे. मुलायम यांच्या दोन पत्नी आणि त्यांची अनेक मुले आहेत. त्यापैकी अखिलेश पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तर दुसर्‍या पत्नीच्या मुलाला सिंहासनापासून वंचित रहावे लागले आहे. सहाजिकच घरातल्या कैकयीला हे मान्य होणे कसे शक्य होते? तिथून आजच्या समस्येचा आरंभ झाला. अखिलेशला पित्याने भावी राजा म्हणून घोषित केल्याने अनेकजण चवताळले आणि त्यांनी कैकयीला हाताशी धरून जे राजकारण खेळले. त्याचे फ़लित आज जगासमोर आलेले आहे. त्यात मुलायमचे बंधू व मित्र सवंगडीही आहेत. मात्र संघर्ष पितापुत्रांमध्ये रंगला आहे.

आधीपासून सहकार्य केलेले असूनही संधी आली, तेव्हा मुलायमनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नाही, म्हणून शिवपाल यादव नावाचा भाऊ चिडला तर नवल नव्हते. पण थोरल्या भावाला आव्हान देण्याची कुवत शिवपालमध्ये नव्हती. म्हणूनच काहीकाळ मान खाली घालून पुतण्याच्या हाताखाली त्यांनी काम केले. दरम्यान त्यांनी व्युहरचना सुरू केली होती. त्यानुसार अमरसिंग या कुरापतखोर माणसाला पुन्हा पक्षात व मुलायमच्या नजिक आणण्याची कामगिरी शिवपालनी कुशलतेने पार पाडली. त्यानंतर क्रमाक्रमाने अखिलेश विरोधातली जमवाजमव सुरू झाली. पण मुलायमना आव्हान देण्याची कुवत त्यांच्यापाशी नव्हती. तिथे कैकयीचे पात्र पटकथेत आणले गेले. आपल्या पुत्राला सिंहासनापासून वंचित ठेवल्याने नाराज असलेल्या कैकयीला समाजवादी दशरथ मुलायमच्या अंगावर सोडले गेले आणि त्याचवेळी शिवपाल व अमरसिंग आपापल्या भूमिका पार पाडत होते. त्यातूनच आता पितापुत्र आमनेसामने येऊन उभे ठाकले आहेत. एका बाजूला पुतण्या व चुलता; तर दुसर्‍या बाजूला पिता व चुलता असे गट पडले आहेत. त्यात कैकयीने मुलायमना भरीस पाडल्याने अखिलेश एकाकी पडला आहे. पण तो रामायणातला पित्याचा आज्ञाधारक राम नसून यादवपुत्र आहे. म्हणूनच पित्याने दिलेल्या शब्दासाठी सिंहासन सोडण्याचा विषय येत नाही. त्याने महाभारत रंगवण्याचा पवित्रा घेतला आहे. राजकीय मुळपुरूषाच्या घर कुटुंबातील नातलगांच्या भाऊबंदकीने साम्राज्ये उध्वस्त झाली. तोच इतिहास भारताच्या आधुनिक लोकशाहीतही तसाच चालू आहे. त्यात यादवघरचे रामायण हा एक नवा अध्याय असला, तरी पहिलीच कथा नाही. अनेक भारतीय राजघराण्यात त्याचे अनेक अध्याय घडून गेलेले आहेत. अगदी नेहरू घराणेही त्यातून सुटलेले नाही. राम उत्तरेतला असला तरी दक्षिणेतही रामलिला घडल्या व घडत आहेत.

तिथे उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या वारसांची जुंपलेली असतानाच दक्षिणेच्या तामिळनाडूत एका राजघराण्याचा वारस घोषित झाला आहे. पन्नास वर्षे द्रमुक पक्षाचे अखंड नेतृत्व करणारे वयोवृद्ध एम करूणानिधी यांनी अलिकडेच एका मासिकाला मुलाखत देताना स्टालिन हा आपला राजकीय वारस असल्याचे जाहिर करून टाकलेले आहे. पाच वर्षापुर्वी करुणानिधी तामिळनाडुचे मुख्यमंत्री होते आणि आपल्या लाडक्या पुत्राला उपमुख्यमंत्री करण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्यावर तिथेही धुमश्चक्री उडालेली होती. करुणानिधी यांच्या तीन बायका आहेत. त्यांच्यापासून झालेल्या मुलांचा मोठा गोतावळा आहे. त्यापैकी प्रत्येकाला आपल्या पित्याचा राजकीय वारस होण्यासाठी महत्वाकांक्षा असली तर नवल नाही. पण करूणानिधी यांनी तेव्हा सोयीपुरती विभागणी करून दिली. अळागिरी नावाच्या एका पुत्राला दिल्लीच्या युपीए सरकारमध्ये मंत्री केले आणि दुसर्‍या स्टालीनला उपमुख्यमंत्री केले. नातू केंद्रात मंत्री होताच. पण या नातवाने चालवलेल्या टिव्ही वाहिनीने एक मतचाचणी घेऊन स्टालीनच पित्याचा योग्य वारस असल्याच निष्कर्ष काढल्यावर हाणामारीचा प्रसंग आला होता. वाहिनीचे कार्यालय जाळण्यापासुन अनेक प्रकार झाले होते. अखेरीस अळागिरी पक्षासह घरातून बाहेर पडला आणि स्टालीनचा मार्ग मोकळा झाला. पाच वर्षापुर्वी द्रमुकचा म्हणजे पित्याचा पराभव विधानसभेत व्हावा आणि सत्ता जावी, यासाठी अळागिरी याने खुप कष्ट उपसले. म्हणजेच राजकीय वारसा हक्क प्रस्थापित करण्यात द्रमुकने मते व सत्ता गमावली. त्या घरातल्या कौशल्या कोण व कैकयी कोण, त्याबद्दल बाहेर फ़ारशी वाच्यता झालेली नाही. तरी वास्तवात करुणानिधींच्या घरातली व पर्यायाने कौटुंबिक झालेल्या द्रमुकतील ती रामलिलाच होती. मात्र द्रविडीयन असल्याने त्या पक्षाला रावणाचे खुप कौतुक आहे.

असाच काहीसा प्रकार दहा वर्षापुर्वी कर्नाटकातही रंगला होता. त्यात मात्र कैकयीचे पात्र नव्हते. तेव्हा कॉग्रेसने सत्ता गमावली आणि कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाहीतर देवेगौडा यांच्या पक्षाचा पाठींबा घेऊन कॉग्रेसने सत्ता राखली होती. पण मग एकेदिवशी देवेगौडा यांच्या पुत्राला सत्तेचा लोभ जडला. त्याने पित्याला वार्‍यावर सोडून भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री व्हायचा घाट घातला. तेव्हा देवेगौडा कमालीचे ‘विचलीत’ झाले होते. कारण भाजपाला देशाच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी १९९६ सालात देशभरच्या पुरोगामी पक्षांनी देवेगौडांनाच पंतप्रधान बनवले होते आणि आता त्यांचाच सुपुत्र कुमारस्वामी मुख्यमंत्री व्हायला भाजपाचा पाठींबा घेत होता. तर देवेगौडांचे सर्व आमदार त्यांना सोडून पुत्राच्या गोटात दाखल झाले होते. मग दिड वर्ष पुत्राला मुख्यमंत्रीपदी बसलेला बघून देवेगौडांच्या डोळ्याचे पारणे फ़िटले. नंतर भाजपाला दिड वर्षाची मुदत देण्याची वेळ आली, तर पिता अडवाणींचा उंबरठा झिजवत होता. पण ते साधले नाही व येदीयुरप्पा यांना मुख्यमंत्री पदासाठी देवेगौडांना पाठींबा द्यावा लागला. तेव्हा पुन्हा त्यांच्यातले पुरोगामीत्व उफ़ाळून बाहेर आले आणि विधानसभा बरखास्तीची पाळी आली होती. पण ते सरकार पाडण्याला देवेगौडांच्या दोन सुनांमधील भांडण कारणीभूत झाल्याचे म्हटले जाते. कुमारस्वामींनी सत्ता भोगली, पण दुसर्‍या भावाला चवही चाखता आली नाही. म्हणून दोन जावांमध्ये भांडण जुंपले आणि त्याचे पर्यवसान त्या पक्षाची वाताहत होण्यात झाले. काहीचा असाच प्रकार मनेका गांधी व सोनिया गांधींमध्ये १९८० च्या सुमारास संजय गांधीचा वारसा मागण्यातून उदभवला होता. मनेका घर सोडून बाहेर पडल्या आणि इंदिराजींचा वारसा राजीव मार्गे सोनियांकडे आला. एकूण काय, एकविसाव्या शतकातही लोकशाहीत भारताच्या अनेक राजघराण्यात रामलिला रंगलेल्या आहेत.

1 comment:

  1. भाऊ,हे सगळेच अडकित्त्यांचे चाहते आहेत यांना प्रभु श्री राम यांच्या नावाची अॅलर्जी आहे यांची तुलना अशी नको यांची तुलना शहाजहॅा अौरंगजेब अशी हवी

    ReplyDelete