Tuesday, October 18, 2016

अंनिसची भगवी पोटदुखी

Image result for fadnavis iftar

शहाण्यांची एकदाच चुक होते नंतर ते कधीही चुक करू शकत नाहीत. आपण शहाणे झालो आणि जगातल्या तमाम अनाकलनीय गोष्टींचे आकलन फ़क्त आपल्यालाच होऊ शकते अशी समजूत करून घेतली, मग माणूस शहाणा होतो. त्यानंतर त्याला चुका करण्याचे स्वातंत्र्य उरत नाही. सहाजिकच चुकाच करत नसल्यामुळे त्याला चुका दुरूस्तही करता येत नाहीत. परिणामी झालेल्या चुकांचे समर्थन व युक्तीवाद करणे त्यांच्या हाती शिल्लक उरते. दुसरी बाजू अशी, की या मूठभर शहाण्यांपलिकडे प्रचंड सामान्य लोकसंख्या असते आणि ही सामान्य माणसे चुका करण्याचा आपला अधिकार जीवापाड जपत असतात. त्यामुळे त्यांना हव्या तितक्या चुका करता येतात आणि चुका मान्य करून दुरूस्त करण्याचीही संधी उपलब्ध होत असते. म्हणूनच त्यांना नव्याने अनेक गोष्टी शिकता येतात. उलट शहाण्यांना नव्याने काहीही शिकता येत नाही. की स्वत:मध्ये सुधारणाही करून घेता येत नाही. एक वेळ अशी येते, की आपण कालबाह्य झाल्याचा साक्षात्कार शहाण्यांना होतो आणि तोपर्यंत आयुष्य संपून गेलेले असते. अशा सामान्य माणसांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एखाद्या इफ़्तार पार्टीला जाऊन मुस्लिम टोपी परिधान केल्याने पुरोगामी झाल्याचा भ्रम होत नाही. किंवा नाणीजच्या नरेंद्र महाराजाच्या पाया तोच मुख्यमंत्री पडला म्हणून तो प्रतिगामी झाल्याचेही भास होत नाहीत. ही व्यवहारी जगण्याची कला असते. पण असे काही समजणे वा समजून घेणे सामान्य बुद्धीचे कार्य असते. ज्यांना बुद्धीचेच अजिर्ण झालेले असते, त्यांना इतक्या सोप्या गोष्टी समजून घेता येत नाहीत. मग त्यांनी उलट्या ओकार्‍या काढणे स्वाभाविक असते. देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर अलिकडे झालेली टिका म्हणूनच काय लायकीची आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. त्यावर झालेले युक्तीवादही किती फ़सवे व निरर्थक आहेत, ते लक्षात येऊ शकते.

नरेंद्र महाराज म्हणजे पुर्वाश्रमीचे नरेंद्र सुर्वे. पुर्वी सरकारी सेवेत असताना त्यांच्यावर काही आरोप होते. त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली आणि पुढे अध्यात्माचा त्यांनी कसा बाजार मांडला, त्याच्याही कहाण्या दोनतीन दिवसात खुप समोर आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊ नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागणी केली होती. ती धुडकावून देवेंद्र तिथे पोहोचले. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन वा पुरोगामी मठाचे अनेक मठाधीश प्रक्षुब्ध झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना शाप द्यावेत यात काही नवल नाही. पण त्यांच्या शापामुळे किंवा वरदानाने कोणी निवडून येत नाही की मुख्यमंत्री होत नाही. म्हणूनच त्यांच्या आग्रहाला धुडकावणे योग्यच होते. कारण मुख्यमंत्री हा राजकारणी आहे आणि ज्यांची मते कधीच त्याला मिळणार नाहीत, त्यांच्या आग्रहाखातर त्याने आपल्याला मिळणार्‍या मताना लाथ मारण्याची अजिबात गरज नाही. हा जो धार्मिक सोवळेपणा अंधश्रद्धा निर्मूलनवाले पाळतात, तो पुरोगामी असल्यानेच त्याला एक धार्मिक कट्टरपणा येत चालला आहे. हेच मुख्यमंत्री इफ़्तार पार्टीमध्ये चक्क मुस्लिम धर्माची टोपी चढवून सहभागी होतात, तेव्हा अंनिसच्या धर्ममार्तंडांना बोचत नाही. टोचत नाही. म्हणजेच त्यांना इस्लाम धर्म असल्याचे ज्ञात नसावे. ते ज्ञात करून घेण्याचीही त्यांना गरज वाटत नसावी. तसे असते तर त्यांनी इफ़्तार पार्टीला गेलेल्या मुख्यमंत्र्यांवर तेव्हाही टिकेची झोड उठवली असती. पण तसे घडताना आपण कधी बघितले आहे काय? पुरोगामी महाराष्ट्रातला मुख्यमंत्र्याने टोप्या घालून रोझा धरल्याशिवाय इफ़्तार पार्टीचे नाटक करण्याविषयी तक्रार नसेल, तर नाणीजला जाण्यात कसली अडचण आहे? त्यामागे नरेंद्र महाराजापेक्षाही त्याच्या हिंदू धर्माशी संबंधित असण्य़ाची अडचण आहे. ख्रिश्चन वा मुस्लिम धर्माशी लांगुलचालन केल्यास कुठली अडचण नसते ना? काय समस्या आहे?

नरेंद्र सुर्वे नावाची व्यक्ती पुर्वी कधी भ्रष्टाचारात वा घोटाळ्यात असल्याची तक्रार असेल, तर छगन भुजबळांचे काय? त्यांना तुरूंगात भेटायला जाणार्‍या विविध पक्षीय नेते वा मंत्र्यांना यापैकी कोणी असा सवाल केला आहे काय? नरेद्र सुर्वेचे प्रकरण आता कालबाह्य झालेले आहे. भुजबळांचे प्रकरण ताजे आहे. त्यांना तुरूंगात असताना अनेकजण जाउन भेटत आहेत. तेव्हा पुरोगामी महाराष्ट्र दारू पिवून झोपलेला असतो काय? गुन्हेगारीचे आरोप असलेल्या तीस्ता सेटलवाड यांना सन्मानीत करणार्‍यांना कधी आपल्या सहयोगाची लाज वाटली आहे काय? दुसर्‍यांना पावित्र्य शिकवताना आपण निदान सोवळे असावे, याचे तरी भान असायला नको काय? रझा अकादमीने मुंबईत धिंगाणा घातला आणि त्यानंतरही त्यांच्या इफ़्तार पार्ट्यांना हजेरी लावणार्‍यांना अंनिसने कधी आक्षेप घेतला होता काय? जेव्हा कोणी भगव्या कपड्यातला बुवा असतो, तेव्हाच यांची झोप मोडते. अन्यथा त्यांना जगात सर्व काही आलबेल असल्याची नशा झोपवत असते. अनेक मंत्री मुख्यमंत्री पार रोमपर्यम्त सरकारी खर्चाने जाऊन मदर तेरेसा चमत्कारी संत असल्याच्या सोहळ्यात सहभागी होतात. तेव्हा अंनिसवाले कुठल्या अंमली पदार्थाच्या नशेत चूर असतात? त्यांनी त्यासाठी ममता बानर्जी वा केजरीवाल यांना आक्षेप घेतले आहेत काय? सगळा निव्वळ निलाजरेपणा होत चालला आहे. ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली, त्यात देहदान वा अवयवदान असेही काही झाले. तसे अंनिसवाल्यांनी किती कार्यक्रम केले आहेत? कोणी बुवा महाराज लोकांकडून पैसे गोळा करतो म्हणे. मग अंनिसवाले काय नोटा छापतात काय? त्यांच्याकडे पैसे कुठून येतात? जरा त्याचाही हिशोब दिला जावा. सवाल नरेंद्र महाराज किंवा अन्य कुणी बुवा लोकांची किती फ़सवणूक करतो याचा नसून, आपण किती धुतल्या तांदळाचे आहोत, तेही सिद्ध करण्याचा असतो.

खरेतर हीच पोटदुखी असते. आपण इतके हुशार आणि बुद्धीमान असूनही लोकांकडून असे सहज पैसे उकळू शकत नाही, याची पोटदुखी यामागची खरी प्रेरणा आहे. या लोकांनी इतकी वर्षे चळवळी केल्या आणि सत्प्रवृत्त लोकांकडून कित्येक लाखाच्या देणग्या उकळल्या, त्याचे फ़लित काय आहे? विविध चळवळींच्या नावाने जमा केलेल्या पैशाचे हिशोब कधी दिले गेले आहेत काय? तीस्ता सेटलवाड किंवा इंदिरा जयसिंग त्याच गोतावळ्यातल्या आहेत. त्यांनी विविध मार्गाने पिडीतांच्या नावाने जमवलेले कोट्यवधी रुपये आपल्या व्यक्तीगत चैनीसाठी उडवल्याचे फ़ौजदारी गुन्हे उघड झालेले आहेत. ही काय कमी बुवाबाजी आहे? गुजरात दंगलीचे कारण दाखवून जगभर वाडगा घेऊन फ़िरलेल्या तीस्ताने लाखो रुपये उकळले आणि त्यातून चैन केल्याचे निष्पन्न झाले आहे. सामान्य लोकांची चांगुलपणावरची श्रद्धाच त्या देणग्यांमागची प्रेरणा नव्हती काय? म्हणजेच न्याय नावाची अंधश्रद्धा फ़ैलावून तीस्ता धंदा चालवित राहिली आणि त्याविषयी अंनिस अवाक्षर बोलणार नाही. हा दुटप्पीपणा नसून ती पोटदुखी आहे. अंनिस हीच एक अंधश्रद्धा झाली असून, विज्ञानवाद विवेकवाद नावाची बुवाबाजी त्यातून फ़ोफ़ावली आहे. दोन्ही बाजू सारख्याच बुवाबाजी करणार्‍या आहेत. पण जेव्हा सत्ताधारी वा पैसेवाले दुसर्‍या बाजूला झुकताना दिसतात, तेव्हा अंनिसवाल्यांना पोटदुखी सतावू लागते. ख्रिश्चन वा मुस्लिम देणगीदार मिळत असल्याने त्यांना भगव्या रंगाचे वा हिंदू बुवामहाराजांचे वावडे आहे. अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र कुठल्या धर्माचार्याकडे धर्ममार्तंडाकडे गेल्याबद्दल आक्षेप नाही. त्यातल्या अंधश्रद्धा वा अन्य कुठल्या बिगर विज्ञानवादाची या लोकांना कर्तव्य नाही. यांच्या दुकानातले गिर्‍हाईक दुसर्‍या दुकानात गेल्याची चिंता भेडसावते. असे हे शहाणे आहेत. सुदैवाने भारतातील बहुसंख्य जनता अजून व्यवहारी म्हणून अडाणी आहे.

10 comments:

  1. भाऊ,आजपर्यंत किती अंधश्रद्धा निर्मूलन झाले किती थडग्यातील देव भूत् खोटी ठरली कुर्बानी च काय??? हे नालायक लोक आहेत आजपर्यंत इतर धर्माचे लोक बाटवले म्हणून हिंदूनी कधिही संतपद किंवा शंकराचार्य बनवलेले नाही

    ReplyDelete
  2. लोकसत्ताने ' असंताचे संत ' या अग्रलेखातुन या तथाकथित संताला चागलेच धुतले हो

    ReplyDelete
  3. लोकसत्ताने ' असंताचे संत ' या अग्रलेखातुन या तथाकथित संताला चागलेच धुतले होते पण हे संत ख्रिश्चन आसल्यामुळे लेखक दबावाला बळी पडले त्यांनी आपले विचार स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य गुंडाळून लेख मागे घेतला . शेवटी सगळे psuedo intellectual मिळणाऱ्या फंड पुढे लाचार असतात .

    ReplyDelete
  4. सुर्वे होते काय ? का कोण जाणे मी त्यांचे आडनाव जाधव समजत होतो.
    ह्या अंनिसवाल्यांनी संस्थेचे नाव बदलून हिंनिस करायला पाहिजे - हिंदुश्रद्धा निर्मूलन समिति

    ReplyDelete
  5. इतरांची ती धार्मिक भावना, हिंंदुची ती अंधश्रध्दा

    ReplyDelete
  6. Have they ever spoken about uniform civil code, minority appeasement is understandable from political parties, but such so called liberals should be neutral.

    ReplyDelete
  7. अत्यंत सडेतोड

    ReplyDelete
  8. मी नरेंद्र महाराजांचे नाव राणे समजत होतो😁😁

    ReplyDelete