Tuesday, February 14, 2017

चिन्नम्माने काय गमावले?

sasikala cartoon के लिए चित्र परिणाम

तामिळनाडूत सत्ताधारी असलेल्या अण्णाद्रमुक पक्षात जयललिता यांची एकछत्री हुकूमत होती. पण जेव्हा अशी व्यक्तीपुजा वा व्यक्तीमहात्म्य हाताबाहेर जाते, तेव्हा त्याच व्यक्तीच्या भक्त पाठीराख्यांच्या अपरोक्ष अनेक गोष्टी घडत असतात. त्या पाठीराख्यांना त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्या दैवतानेच केली असे भासवले जात असते. पण प्रत्यक्षात लोकांना जे भासवले वा सांगितले जात असते, ते त्या लोकप्रिय व्यक्तीलाही ठाऊक नसते. त्याच्या नावावर बाहेर काहीही खपवले जात असते. जयललितांच्या बाबतीत नेमके असेच घडत गेलेले होते. तामिळनाडूच्या लोकप्रिय नेत्या व मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या एकाकी जीवनात शिरलेल्या शशिकला नटराजन नावाच्या या महिलेने, अम्माला इतके बंदिस्त करून टाकले होते, की जगात काय घडते आहे, तेही त्यांना कळू शकत नव्हते. अम्माच्या खाण्यापिण्यापासून निर्णयावर शशिकलाची छाप पडलेली होती. पण त्याविषयी कोणी अम्माकडे तक्रारही करू शकत नव्हता. कारण अम्मापर्यंत पोहोचणेही शशिकलाच्याच माध्यमातून शक्य होते. बाहेरचे जग आणि अम्मा यांच्यात शशिकला एक भिंत बनून उभ्या राहिल्या होत्या. म्हणूनच जयललितांच्या आत्पस्वकीय वा मित्रपरिचितांनाही अम्मापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. सहाजिकच अखेरच्या काळात शशिकला म्हणतील वा बोलतील सांगतील, तोच अम्माचा शब्द होऊन गेला होता. परिणामी अकस्मात अम्मा आजारी पडल्यावर त्यांचा आजार म्हणजे काय; तेही जगाला कळू शकले नाही, की कोणाला त्याची उत्तरे मिळू शकली नाहीत. खुद्द पन्नीरसेल्व्हम मुख्यमंत्री होते, पण त्यांनाही अम्माची आजारपणात भेट मिळू शाक्ली नाही. इतके चिन्नम्माने अम्माचे आयुष्य व्यापून टाकलेले होते. तिथपर्यंत चालून गेले. लोकांनीही फ़ारसे मनावर घेतले नाही. पण जेव्हा ही शशिकला स्वत:च अम्मा व्हायला निघाली, तिथून सर्व काही बिघडू लागले.

अम्माच्या निधनानंतर त्यांच्या वतीने बोलणे संपले आणि आपणच अम्मा असल्याच्या सर्वाधिकाराने शशिकला निर्णय घेऊ लागल्या. लोकांनी, भक्त पाठीराख्यांनी आपल्यातच अम्मा बघावी; असा अट्टाहास त्यांनी सुरू केला आणि गडबड झाली. कारण अम्माच्या कृपेमुळे लोकांनी वा भक्तांनी शशिकलांची अरेरावी सहन केली होती. पण आता अम्मा नाहीत म्हटल्यावर त्या देवपणाचा आव आणून भागणार नव्हते. पण तितकी बुद्धी शाबुत नसली, मग चुका होऊ लागतात. शशिकलांनी जयललिता व्हायचा हव्यास केला, तेव्हा सत्तेच्या भोवतीचे लोक त्यांना भुलले. ज्यांचे आपापले स्वार्थ गुंतलेले होते, त्यांना शशिकलासमोर नतमस्तक होण्याखेरीज पर्याय नव्हता. पण निव्वळ निरागस भावनेने ज्यांनी जया अम्मावर प्रेम केले व कोणतीच अपेक्षा केलेली नव्हती; त्यांच्यासाठी अम्मा व चिन्नम्मा यात जमिन अस्मानाचा फ़रक होता. अम्मा हयात असतानाही त्यापैकी बहुतेकांना शशिकलांची अरेरावी मान्य नव्हती, की ढवळाढव्ळ आवडत नव्हती. केवळ अम्माच्या प्रेमापोटी लोकांनी शशिकलांना सहन केलेले होते. अम्माचे निधन झाल्यावर त्यांना आपल्या निष्ठा वा प्रेम समाधीजवळ व्यक्त करण्याचा पर्याय उपलब्ध झाला. यासाठी शशिकलाचे दर्शन घ्यायला जाण्याची गरज उरली नाही. हा फ़रक चिन्नम्माने ओळखला असता, तर सर्व सत्तापदे आपल्या हाती केंद्रीत करण्याचा उतावळेपणा तिच्याकडून झाला नसता. असलेली स्थिती व पक्ष सुरळीत चालवला असता, तरी रिमोट कंट्रोलने तामिळनाडूचे राज्य आणखी चार वर्षे चिन्नम्मा आरामात चालवू शकल्या असत्या. पण त्यांना तेवढाही संयम दाखवता आला नाही. अम्माच्या अनुपस्थितीत आपणच अम्मा झाल्याच्या भ्रमाने या महिलेला इतके भारावून टाकले होते, की तिने जयललिताची नक्कल सुरू केली आणि आपल्या हातानेच कपाळमोक्ष घडवून आणला आहे.

समजा शशिकला यांनी पक्षाचे सरचिटणिसपद मिळण्यावर समाधान मानले असते आणि पन्नीरसेल्व्हम यांनाच मुख्यमंत्री राहू दिले असते. तर आजही मुख्यमंत्र्यावर त्यांचीच हुकूमत राहिली असती. त्यांच्याच इशार्‍यावर सेल्व्हम यांनी आपल्या पदाचा राजिनामा राज्यपालांना सादर केला होता. म्हणजेच अम्माच्या अनुपस्थितीतही हा नेता चिन्नम्माच्या आज्ञेत असल्याचा दाखला मिळालेला आहे. तितके झाल्यावर चिन्नम्माने पुन्हा पन्नीरसेल्व्हम यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवले असते, तर रिमोटनेही त्याच सत्ता राबवू शकत होत्या. पक्षात दुफ़ळी माजली नसती, की गटबाजीने डोके वर काढले नसते. अगदी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरुद्ध केल्यामुळे चिन्नम्मा तुरूंगात गेल्या असत्या, तरी सेल्व्हम त्यांच्याच आदेशानुसार कारभार करत राहिले असते. दोनदा अम्मानेही त्याच माणसाला सत्तेत बसवले आणि त्याने इमानदारीने अम्माचे आदेश पाळलेले होते. तसेच चालू राहिले असते. पण जो आत्मविश्वास अम्मापाशी होता, तितका चिन्नम्मापाशी नाही. म्हणूनच तिने मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्याचा हव्यास केला. त्यासाठी घाई सुद्धा केली. समजा निकाल लागण्यापर्यंत कळ काढली असती, तर आज पुन्हा तुरूंगात चिन्नम्मा जाताना बघून सगळेच्या सगळे अम्मा पाठीराखे अश्रू ढाळतानाच दिसले असते. कारण चिन्नम्मा सर्वच पक्षाची नेता राहिली असती आणि मुख्यमंत्रीही तिच्यासाठी रडताना जगाने बघितला असता. पण तसे झालेले नाही. मागल्या खेपेस अम्मा तुरूंगात गेल्या आणि सेल्व्हम यांचा शपथविधी झाला. तेव्हा सगळेच मंत्री शपथ घेतानाही रडताना दिसले होते. आज त्यापैकी अनेकजण चिन्नम्माला शिक्षा झाल्यावर आनंदोत्सव साजरे करताना दिसत आहेत. त्यांच्यावर ही पाळी खुद्द चिन्नम्मानेच आणलेली नाही काय? जर सत्तेचा हव्यास धरून पक्षात दुफ़ळी माजवली नसती, तर ही वेळ कशाला आली असती?

चिन्नम्मा तुरूंगात भले गेली असती. पण तिच्याविषयी ज्यांच्या मनात असुया वा राग होता, त्यांना व्यक्त करण्याची संधी नक्कीच मिळाली नसती, अम्माभक्त अण्णाद्रमुक कार्यकर्ता शशिकला यांच्या अटकेचे वा शिक्षेचे दु:ख साजरे करताना दिसला असता. राजकारणात आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य वापर केला नाही, तर आत्मघात ओढवून आणला जात असतो. अम्माची गोष्ट वेगळी होती. विपरीत परिस्थितीला सामोरे जाण्याची व परिणामांना तोंड देण्याची हिंमत जयललिता या महिलेत होती. तिच्यासारखी हात जोडण्याची नक्कल करून शशिकला निरागस जनतेची दिशाभूल करू शकणार नाहीत. आपल्या पाताळयंत्री वागण्याने जयललिता यांच्यावर कब्जा मिळवणे सोपे असले, तरी त्या अम्माच्या भक्तांवर हुकूमत प्रस्थापित करणे सोपे नसते. त्या पाठीराख्यांना चुचकारून आपल्या पाठीशी आणण्याच्या कलेला राजकारण म्ह्णतात. हुकूमत आपुलकीतून निर्माण होत असते. शशिकलांना त्याचे भान राहिले नाही. बहुसंख्य आमदार मुठीत ठेवून घटनात्मक नाट्य रंगवता येत असले, तरी लोकभावना जिंकता येत नाही. लोकांचा पाठींबा मिळत नाही. आणि जेव्हा लोकभावना विरोधात जाते, तेव्हा लोकमतावर निवडून येणारे आमदार वा खासदारही पळ काढतात. तेच आता तामिळनाडूत होऊ घातले आहे. चिन्नम्मा तुरूंगात जाऊन पडल्यावर त्यांनी कोंडून ठेवलेले आमदार एक गट म्हणूनही टिकणार नाहीत. जिथे सत्ता व संधी असेल, तिथे सर्व आमदार धावत सुटतील. फ़ाटाफ़ुट झाली नसती आणि सेल्व्हम यांना बंडाची संधी मिळालीच नसती, तर चिन्नम्माचे नेतृत्व व हुकूमत अबाधित राहिली असती. कारण चिन्नम्माला टक्कर देणारा दुसरा नेता त्या पक्षात कोणीच नव्हता. शशिकला यांनी आपल्या उतावळेपणातून सेल्व्हम यांना बंड करायला भाग पाडून अम्माच्या पाठीराख्यांना दुसरा खंबीर नेता मिळवून दिला आहे.

No comments:

Post a Comment