Thursday, February 9, 2017

नाटक जुने, प्रयोग नवा

janaki ramachandran के लिए चित्र परिणाम

तामिळनाडुत सध्या राजकारण असे रंगले आहे, की त्यात लोकशाहीच्या नवनव्या व्याख्या ऐकायला मिळत आहेत. मागल्या विधानसभा निवडणूकीत अण्णाद्रमुक या पक्षाने स्पष्ट बहूमत मिळवले होते आणि म्हणूनच त्याचाच मुख्यमंत्री त्या राज्यात सत्तेवर आरुढ होणार; याविषयी कोणाचे दुमत नाही. पण पक्षात जी सत्तास्पर्धा सध्या रंगलेली आहे, त्यामुळे हे वादळ उठले आहे. एका विशिष्ठ विचाराने पक्ष वा संघटना निर्माण होतात व चालतात. पण द्रमुक वा अण्णाद्रमुक पक्ष आता त्या स्थितीत राहिलेले नाहीत. मुळचा द्रमुक हा पक्ष करूणानिधी यांच्या कुटुंबाची मालमत्ता होऊन गेला आहे. तशीच वाटचाल होताना दिसल्याने त्यापासून बाजूला झालेल्या एम जी रामचंद्रन यांनी तीन दशकापुर्वी अण्णा द्रमुक हा वेगळा पक्ष काढला होता. अर्थात त्यामागे मुळच्या द्रविड चळवळीचीच प्रेरणा होती, यात शंका नाही. पण अण्णादुराई यांनी जसा विचाराधिष्ठीत पक्ष उभा केला होता, तसा कुठलाही विचार या पक्षापाशी नव्हता. एमजीआर हे लोकप्रिय अभिनेता होते आणि त्यांच्या तुलनेत करुणानिधी तोकडे पडले, म्हणून वेगळ्या पक्षाने बाजी मारली होती. पण पक्षात उघड फ़ुट पडलेली नव्हती. एमजीआर यांनी पक्षाला रामराम ठोकून वेगळी चुल मांडली. म्हणजे काय केले? तर त्यांनी वेगळा पक्ष काढल्याची घोषणा केली आणि रातोरात नव्या पक्षाच्या खेड्यापाड्यापर्यंत शाखा उभ्या राहिल्या. त्या मुळातच उभ्या होत्या. पण त्यांचे नाव अण्णा द्रमुक असे नव्हते, तर त्या शाखा एमजीआर यांच्या चहात्यांची मंडळे म्हणून ओळखल्या जात होत्या. पक्षाची घोषणा होताच त्याच शाखांचे रातोरात अण्णाद्रमुक पक्षाच्या शाखा म्हणून रुपांतर करण्यात आले. त्यात पक्षाचे कोणीही दिग्गज नेते वा पदाधिकारी सहभागी झालेले नव्हते. पण त्यांची गरजही नव्हती. राज्यव्यापी पक्ष रातोरात उभा राहिला होता. त्याचा खरा सुत्रधार वीरप्पन नावाचा नेता होता.

दिर्घकाळ एमजीआर यांचा सहकारी असलेला आर एम वीरप्पन, हा त्यांचा व्यावसायिक सहकारी होता. चित्रपटाचा धंदा व अभिनेता एमजीआर यांच्या उलाढालीवर वीरप्पन याचेच नियंत्रण होते. थोडक्यात आज शशिकला यांचा जसा अम्माच्या जगण्यावर प्रभाव होता; तशीच वीरप्पन याची रामचंद्रन यांच्या आयुष्यावर पकड होती. त्यामुळेच त्या अभिनेत्याच्या चहाते मंडळाच्या संघटनेची सुत्रेही वीरप्पन यांच्याकडेच होती. त्यांनीच रातोरात त्या मंडळांचे पक्षाच्या शाखांमध्ये रुपांतर केलेले होते. मग आपोआप पुढल्या काळात अण्णाद्रमुक पक्षावरही वीरप्पन याचेच नियंत्रण राहिले तर नवल नव्हते. पण पुढे निवडणूकात सत्ता जिंकून रामचंद्रन मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आपला राजकीय वारस म्हणून जयललितांना पक्षात आणले. त्यामुळे वीरप्पन यांना एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला होता. जयललिता यांना पक्षात महत्वाचे पद होते. पण बाकी संघटनेत त्यांना कुठलीही घुसखोरी वीरप्पन यांनी करू दिली नाही. म्हणूनच पुढे एमजीआर आजारी पडले, तेव्हा जयललितांना त्यांच्या जवळपास फ़िरकू दिले गेले नाही. अंत्ययात्रेतही त्यांना धक्के मारून पिटाळून लावण्यात आले. तिथेच हे भांडण थांबले नाही, वीरप्पन यांनी कारस्थान करून सर्व आमदार जयललितांच्या विरोधात उभे केले आणि विधवा जानकीअम्मा यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. आज जसे राजकारण शशिकला खेळत आहेत, तेच तेव्हा वीरप्पन करीत होते. कारण त्यांच्या हाती पक्षाची व एमजीआर यांच्या कुटुंबाची सर्व सुत्रे केंद्रित झालेली होती. जयललितांनी त्याच्या विरोधात बंड पुकारले. पण त्यांना साथ देण्याचे धाडस पक्षाच्या कुणा आमदार खासदाराला शक्य झाले नाही. एकदोन नगण्य आमदार वा मंत्री त्यांच्यासोबत गेले. पण खरी कसोटी लागली, ती निवडणुकांमध्ये व जनतेमध्ये जायची वेळ आल्यावर. कारण तिथे वीरप्पन व जानकीअम्माची डाळ शिजली नाही.

वीरप्पन यांच्या हाती पक्षाची सर्व सत्ता केंद्रीत झाली होती आणि त्यांनी जानकीअम्मांना मुख्यमंत्रीपदी बसवून, जयललितांना बेवारस सोडून दिलेले होते. पण जयललिता यांना आपला राजकीय वारस म्हणून एमजीआर यांनीच लोकांसमोर आणलेले होते. म्हणूनच जयललिता लोकांमध्ये फ़िरू व बोलू लागल्या; तेव्हा त्यांना अफ़ाट प्रतिसाद मिळू लागला. ती क्षमता वीरप्पन वा जानकीअम्मा यांच्यापाशी नव्हती. त्यामुळेच हळुहळू पक्षाचे स्थानिक वा दुय्यम नेतेही पांगू लागले. जयललितांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद बघून लहानसहान नेत्यांचा ओढा त्यांच्या बाजूला झुकू लागला. तसेतसे अन्य नेतेही वीरप्पन यांना सोडून जयललिताच्या गोटात जमा होऊ लागले. आज नेमकी तशीच स्थिती तामिळनाडूत दिसते आहे. त्याच अण्णाद्रमुकमध्ये दोन गट पडले आहेत. एकाचे नेतृत्व शशिकला करीत आहेत आणि त्यांच्याकडून जुन्या वीरप्पनचा वारसा चालविला जात आहे. तर दुसर्‍या गटाचे नेतृत्व पन्नीरसेल्व्हम करीत आहेत आणि ते जयललिताचा झुंजार वारसा चालवित आहेत. जयललितांना पक्ष आयता मिळाला नाही, तर लोकप्रियता व लोकभावना जिंकून त्यांनी पक्षावर प्रभूत्व मिळवले होते. आज शशिकला यांनी बहुसंख्य आमदार आपल्या बाजूने उभे करून दाखवले आहेत आणि तेव्हाही वीरप्पन यांनी तसेच बहुतांश आमदार खासदार जानकीअम्माच्या पाठीशी उभे करून पहिली बाजी मारलेली होती. पण लौकरच निवडणूकीला सामोरे जाण्याची वेळ आली आणि लोकांना भिडण्याची वेळ आली. तिथे शशिकलांची कसोटी लागणार आहे. कारण जयललितांचे बोलणे व वागणे जसे थेट जनतेच्या मनाला जाऊन भिडणारे होते, तसे काहीही शशिकला करून दाखवू शकलेल्या नाहीत. उलट अम्माच्या समाधीवर जाऊन ध्यानधारणा करत त्यांच्याच प्रेरणेने आपण जनतेला सत्यकथन करत असल्याचा पन्नीरसेल्व्हम यांचा अविर्भाव परिणामकारक ठरतो आहे.

शशिकला यांना अम्माने कधीही आपली वारस म्हणून लोकांसमोर पेश केलेले नाही. पण पन्नीरसेल्व्हम यांना अम्माने दोनदा आपला वारस म्हणून अधिकृतपणे सादर केलेले होते. दोनदा मुख्यमंत्री असताना अम्मांना तुरूंगात जावे लागले, तेव्हा त्यांनी सत्तासुत्रे पन्नीरसेल्व्हम यांच्याकडे सोपवली आणि त्यांनीही पादुका सिहासनावर ठेवून कारभार करून दाखवला होता. ज्याक्षणी अम्माची सुटका झाली, तेव्हा विनाविलंब सत्तापदाचा राजिनामा देऊन जागा मोकळी केलेली होती. अम्माने त्यांच्यावर कधी अविश्वास दाखवलेला नाही, तर निष्ठावान म्हणून प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी त्यालाच आपला वारसा दिलेला होता. उलट शशिकला यांना त्यांच्या कुटुंबासकट अम्माने घरातून हाकलून लावलेले जनतेने बघितलेले आहे. म्हणूनच जो कोणी अम्मावर जीवापाड प्रेम वा भक्ती करतो, त्याच्यासाठी पन्नीरसेल्व्हम हाच अम्माचा खरा वारस असू शकतो. किंबहूना त्याच भावनेला हात घालून पन्नीरसेल्व्हम यांनी भावी राजकारणाचा भक्कम पाया घालण्याची खेळी केलेली आहे. आज आपल्या पाठीशी बहुसंख्य आमदार नेते नसतील. पण अम्माचा भक्तगण पाठीशी आणला, तर नेते व आमदारही झक्कत त्या बाजूला येतात, हे सत्य हा मितभाषी नेता नेमके ओळखून आहे. म्हणूनच त्यांनी आमदार वा खासदार नेत्यांपेक्षाही, सामान्य जनतेला आवाहन करून अम्माचा वारसा पुढे नेण्याची भूमिका घेतलेली आहे. अम्माचा वारसा दरबारी राजकारणातून सत्ता बळकावण्याचा नसून, सामान्य जनतेच्या भावनांना हात घालून तिच्या आशीर्वादानेच सत्ता मिळवण्याचा आहे. त्या अम्माभक्तांची झुंबड मुख्यमंत्री निवासात झाली आणि आमदार शशिकलाच्या गोटात जमा झाले. ही जशीच्या तशी इतिहासाची पुनरावृत्तीच नाही काय? हा नेता जयललितांच्या तीन दशके जुन्याच नाट्याचा नवा प्रयोग तसाच्या तसा सादर करतो आहे.

2 comments:

  1. छान भाऊ मस्तच

    ReplyDelete
  2. विश्लेषण नेहमी प्रमाणे उत्तमच

    ReplyDelete