Thursday, February 2, 2017

तोंडघशी पाडणारी तोंडपाटिलकी


Image result for BMC transparency DNA
नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर येण्यापुर्वी आजचे किती भाजपा नेते मोदींच्या नावाचा जप करीत होते? २०१२-१३ या कालखंडातही विविध राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर भाजपाच्या प्रवक्त्यांना त्यासाठी प्रश्न विचारले जात होते. कारण मतचाचण्यामध्ये मोदींची राष्ट्रव्यापी लोकप्रियता साफ़ दिसू लागली होती. पण पक्षाची भूमिका साफ़ नसल्याने कोणी भाजपावाला मोदींच्या कौतुकाचे चार शब्द बोलायला धजावत नव्हता. कारण तोपर्यंत लालकृष्ण अडवाणी त्यांचे पक्षावर प्रभूत्व होते आणि त्यांना मोदींशी स्पर्धा नको होती. म्हणून तर नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मोदींना राष्ट्रीय कार्यकारिणीतून खड्यासारखे बाजूला केले होते. तेव्हा भाजपाचे प्रवक्तेही मोदी पंतप्रधान होऊ शकतील, असे छातीठोकपणे सांगायची हिंमत करत नव्हते. मोदींच्या पंतप्रधानकीच्या उमेदवारीचा विषय आला, मग हेच लोक पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल; असे सांगून विषय टाळत होते. पण त्यातला प्रत्येकजण आज आवेशात आपणच नरेंद्र मोदींना पांतप्रधानपदी बसवले असल्याच्या थाटात बोलत असतो. किंबहुना मोदींमुळे कुठल्याही खेड्यातली ग्रामपंचायतही भाजपा कसा जिंकू शकतो, त्याचे विश्लेषण भाजपाचे वाचाळवीर करीत असतात. त्यापैकी कोणाच्याही योगदानाने मोदी इथपर्यंत पोहोचलेले नाहीत. पण मोदींनी स्वकर्तृत्वाने जे काही साध्य केले आहे, त्या भांडवलावर आजच्या भाजपावाल्यांना आपापले राजकीय स्वार्थ पदरात पाडून घेण्याची घाई झालेली आहे. त्यामुळे एकाहून एक वाचाळवीर सतत तोंडपाटिलकी करत असतात. त्यात मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा अग्रक्रम लागतो. किंबहूना वाचाळता करून आपल्यासह पक्षाला तोंडघशी पाडण्याची शर्यत कोणी योजली, तर त्यात शेलार अजिंक्यपद पटकावू शकतील अशीच स्थिती आहे. अलिकडेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना यशस्वीपणे तोंडघशी पाडून दाखवले आहे.

युती करणार नसल्याचा निर्णय प्रजासत्ताकदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केला होता. आपण स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते. मग दोन दिवसांनी तिथेच भाजपाचाही मेळावा झाला आणि तिथे शेलारांनी नेहमीप्रमाणेच विचारवंताचा आव आणून केलेल्या भाषणात, आधुनिक महाभारताची कथा सांगितली होती. त्यात आपल्याकडे पांडवांचे मुखवटे घेताना, त्यांनी शिवसेनेला कौरव ठरवण्यापर्यंत मजल मारली. मात्र त्यांचे ते महाभारत तासभरही टिकले नाही. काही मिनीटातच भाषणाला उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी शिवसेना कौरव नसल्याचा निर्वाळा भाजपाच्याच व्यासपीठावरून देऊन टाकला. सरकारात शिवसेना आहे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसत असल्याने, त्यांना कौरव म्हणता येणार नाही असे फ़डणवीस उत्तरले. म्हणजेच जिथल्या तिथे शेलारांची तोंडपाटिकली खुद्द त्यांच्याच व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनीच निकालात काढून टाकली. शेलारांच्या पांडीत्याची यापेक्षा अधिक शोभा काय व्हायला हवी? पण ते व्यासपीठ शेलारांचे व त्यांनीच योजलेल्या निवडणूक प्रचाराचे असल्याने, मुख्यमंत्र्यांनाही स्वपक्षाचे वाभाडे काढणे अशक्य होते. तिथे आपल्या कुणा नेत्याने आरंभलेला पोरकटपणा सावरून घेण्याखेरीज फ़डणवीस यांनाही गत्यंतर नव्हते. म्हणूनच शिवसेनेला दुखावणार्‍या शब्दात बोलण्यापेक्षा, त्यांनी शब्दांची कसरत करून पारदर्शकता असा शब्द वापराला होता. मुंबईतून शिवसेनेचा कारभार संपवायचा, कारण सेनेमुळे पालिकेत पारदर्शक कारभार होत नाही. भाजपाला तिथे पारदर्शकता आणायची आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनाच करावा लागला. खरे तर त्यांनाच युती हवी होती आणि शेलार-सोमय्या यांच्यासारख्या वाचाळांना युती मोडायची होती. त्यासाठी देवेंद्रना पुढे करण्यात आले होते. म्हणून त्यांनी पारदर्शकतेचा शब्द वापरला. पण त्यांच्याच दिल्लीतील चाणक्यांनी तो अधिकृतपणे खोडून काढला.

थोडक्यात गोरेगावच्या पक्ष व्यासपीठावर शेलारांचे दावे फ़डणवीसांनी खोडून काढले आणि दिल्लीच्या राष्ट्रीय मंचावर मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेचा दावा अर्थंमंत्री जेटलींनी खोडून काढला. देशाचा अर्थसंकल्प मांडण्याच्या आदल्या दिवशी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जो आर्थिक आढावा सादर केला, त्यात देशभरच्या विविध महापालिकांच्या कारभाराचाही आढावा आलेला आहे. त्यात सर्वात पारदर्शक व कर्तव्यतत्पर म्हणून पहिल्या क्रमांकावर मुंबई महापालिका असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. म्हणजे ज्या भाजपाचे मुंबई अध्यक्ष शेलार व खासदार किरीट सोमय्या मागल्या दोनतीन वर्षापासून मुंबई पालिकेचा कारभार पारदर्शक नसल्याचे भलेथोरले दावे करीत होते; त्यांना त्यांच्याच भारतीय नेत्याने सणसणित चपराक हाणलेली आहे. नुसते पारदर्शकतेचे प्रमाणपत्र शिवसेनेच्या मुंबई पालिकेतील कारभाराला दिलेले नाही, तर संपुर्ण देशात पहिला क्रमांकही दिलेला आहे. त्यामुळे अवघ्या एका आठवड्यात खुद्द मुख्यमंत्र्यांनाच तोंडघशी पडायची पाळी आली. तीही त्यांच्याच मुंबई पक्षाध्यक्षाने आणली. इतक्या टोकाला जाऊन टीका केली नसती आणि असे सोज्वळ शब्द वापरून हल्ले केले नसते; तर शिवसेनेच्या हाती प्रचाराचे कोलित दिले गेले नसते. शेलारच नव्हेतर मुख्यमंत्र्यांचेच शब्द अर्थमंत्री जेटली खोटे असल्याची साक्ष देतात. आता त्याचा भरमसाट प्रचार शिवसेना करू शकते. ती संधी सेनेला शेलार-सोमय्यांनी बहाल केलेली आहे. ज्यांना आपल्या बळावर कधी पक्षाची संघटना बांधून राज्यात वा मुंबईत पक्ष उभारता आला नाही, पण पक्षाच्या लोकप्रियतेचे राजकीय लाभ मिळाले; अशा या दिवाळखोर नेत्यामुळे भाजपाला तोंडघशी पडण्यापलिकडे काय मिळू शकले आहे? कारण आता शिवसेना नुसते जेटलींनी दिलेले प्रमाणपत्रच वापरू शकणार नाही, तर भाजपाच्या पालिका कारभाराची जेटलींनी केलेली तुलनाही मुंबईकरांना सांगू शकणार आहे.

मुंबईत पालिकेचा कारभार देशातला सर्वात उत्तम व पारदर्शक असल्याचे जेटलींचा अहवाल म्हणतोच. पण जिथे भाजपाची सत्ता आहे, त्या महापालिकांचा कारभार कितीसा पारदर्शक आहे, त्याचीही गणती त्याच अहवालात आलेली आहे. म्हणजेच भाजपाला मुंबईत बहूमत मिळाले, तर किती भयंकर स्थिती होऊ शकते, त्याचाही मालमसाला जेटलींच्याच अहवालाने पुरवलेला आहे. दिल्ली, सुरत, अहमदाबाद, जयपूर, डेहराडुन, चंडीगड अशा महापालिका दिर्घकाळ भाजपाच्या हाती आहेत. तिथल्या कारभारावर जेटलींचा अहवाल काय म्हणतो? ज्या महापालिकांच्या कारभाराचा अभ्यास करून हा अहवाल तयार झाला, त्यात चंडीगड शेवटच्या स्थानावर असून त्याला अवघे दोन गुण देण्यात आले आहेत. दिल्लीच्या तिन्ही पालिका भाजपाकडे आहेत आणि त्यांना अवघे चार गुण मिळालेले आहेत. म्हणजेच मुंबईतील शिवसेनेच्या तुलनेत भाजपा कुठल्याही पालिकेत उत्तम कामगिरी करू शकलेला नाही. पारदर्शकता, जबाबदारी व सहभाग अशा तीन निकषावर मुंबई अव्वल असल्याचा निर्वाळा जेटलींच्या अहवालाने दिलेला आहे. गेल्या काही महिन्यात दिल्लीत सर्वत्र महापालिकांनी गचाळ कारभार केल्याने जागोजागी कचर्‍याचे ढिग व उकिरडे उभे राहिल्याच्या बातम्या अवघ्या देशाने बघितल्या आहेत. मग मुंबईत भाजपा पारदर्शक कारभार म्हणजे कचर्‍याचे ढिग व उकिरडे माजवू बघते काय; असे विचारले जाऊ शकते आणि शिवसेना ते विचारणारच. किंबहूना दिल्लीतील भाजपाचा कारभार म्हणून बातम्यांचे प्रक्षेपित झालेले चित्रण सेनेने प्रचारात सरसकट वापरले; तर शेलारांसह मुख्यमंत्रीही तोंडघशी पडणार आहेत. एकूणच अशी नेतामंडळी असली मग पक्षाच्या मोदींसारख्या दिग्गज नेत्यालाही जमिनदोस्त करण्यासाठी कॉग्रेस वा पुरोगामी पक्षांना काही विशेष करण्याची गरज उरणार नाही. कॉग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्या मोदींना, अशा नेत्यांपासून भाजपा मुक्त करायला कधी सवड मिळणार आहे?

No comments:

Post a Comment