Tuesday, May 9, 2017

चळवळीच्या विश्वासार्हतेची हत्या



आम आदमी पक्षात आज जे रणकंदन माजले आहे, त्यापेक्षा उर्वरित राजकीय पक्षात काही वेगळे होत नसते. नेत्यांचे अहंकार एकमेकांशी टक्कर घेऊ लागले, मग असेच होत असते. त्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणून जनता पक्ष व नंतरच्या काळातील जनता दलाकडेही बघता येईल. १९७४ च्या भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनातून जनता पक्षाची निर्मिती झालेली होती. पण पुढे त्याच्या हाती सत्ता आली आणि एकापेक्षा एक असे नेते एकमेकांशी भांडू लागले, अर्थातच त्यांनीही आजच्या आम आदमी पक्षाच्या तरूण नेत्यांप्रमाणेच आपापल्या अहंकाराला तत्वांचा व विचारांचा उदात्त मुखवटा चढवलेला होता. प्रत्यक्षात तीही नेत्यांच्या अहंकाराचीच लढाई होती. पण अशा भ्रष्टाचार विरोधी लढाईत उतरलेली तेव्हाची जॊ तरूण पिढी होती, तिच्या आकांक्षा मातीमोल होऊन गेल्या. त्या आंदोलनाचे कारण एकहाती सत्ता असलेल्या कॉग्रेस पक्षात माजलेली बेबंदशाही असेच होते. १९७१ सालात तात्कालीन कॉग्रेसमधील बड्या धेंडांना बाजूला सारून इंदिराजींनी कॉग्रेसचे शुद्धीकरण केले होते. त्यामुळे डबघाईला आलेली कॉग्रेस सावरली. पण त्यात इंदिराजी इतक्या मोठ्या होऊन गेल्या, की पक्ष त्यांच्यासमोर खुजा भासू लागला. पक्ष संघटनेला किंमतही राहिली नाही. इंदिराजींचे छायाचित्र व नाव वापरून कुठलीही निवडणूक जिंकता येते; असा आभास इतका प्रभावी होत गेला, की इंदिराजींच्या नावावर कोणीही काहीही कुठेही मनमानी करू लागला. त्यातून विविध राज्यात व पक्षातही बेबंदशाही निर्माण झाली. पण कुठेही त्याविषयी बोलले तरी इंदिराजींच्या विरुद्ध, असा त्याला रंग चढवून विरोधाला दडपले जाऊ लागले. सहाजिकच सामान्य जनताही अस्वस्थ होत गेली. पण तिचे नेतृत्व करायला कुठलाही विरोधी राजकीय नेता प्रभावी राहिलेला नव्हता. त्यातून लोकभावना विरोधकांकडे वळली आणि त्याचाच जनता पक्ष झाला होता.

एक मोठा फ़रक असा होता, की लोकपाल आंदोलन राजकारणाबाहेरच्या लोकांचे होते आणि १९७४ सालचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन राजकीय पक्षांच्या संघटनांचे होते. सहाजिकच त्यात सहभागी झालेल्या नेत्यांनी व पक्षांनी एकत्र येऊन एक नवा पक्ष स्थापन केला होता. पण त्यात जुन्याच राजकीय पक्षाचे व विभिन्न विचारांचे नेते सहभागी झाले होते. त्यांची आधीपासून नेता अशी ओळख होती. म्हणूनच त्यांच्यात लौकरच बेबनाव सुरू झाला तर समजण्यासारखे आहे. आम आदमी पक्षाची कहाणी संपुर्ण वेगळी आहे. आम आदमी पक्ष नव्या कोर्‍या नेतृत्वाने निर्माण केला होता. १९७४ सालात राजकीय पक्षांनी खुप गदारोळ केला होता. पण त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणूनच त्याचा राजकारणावर प्रभाव पडलेला नव्हता. मग गुजरातमध्ये नवनिर्माण नावाचे विद्यार्थ्यांचे एक आंदोलन पेटले आणि ते राज्यव्यापी होत गेले. कारण तेव्हा तिथे इंदिरा कॉग्रेसचे चिमण पटेल नावाचे मुख्यमंत्री खुप अरेरावी करीत होते आणि कुणालाही दाद देत नव्हते. त्यांनी विद्यार्थ्यांना झोडपून काढण्यासाठी शासकीय यंत्रणा वापरली. त्यामुळे वातावरण इतके नासत गेले, की राज्यभर विद्यार्थी युवक रस्त्यावर उतरले आणि मुळच्या विद्यार्थी मागण्या बाजूला पडून ‘चिमणभाई हटाव’ हीच मागणी होऊन गेली. त्यापुढे इंदिराजींनाही शरण जावे लागले आणि त्यातूनच जयप्रकाशांनी प्रेरणा घेऊन आपल्या आंदोलनात तरूण व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. आज आपण ज्यांना ज्येष्ठ नेते म्हणून अनेक पक्षात बघत असतो, ती तेव्हाची तरूण पिढी होती. रामविलास पासवान, नितीशकुमार, लालूप्रसाद वा नरेंद्र मोदी असे अनेकजण त्यातूनच उदयास आले. त्यातले अनेकजण त्यापुर्वी राजकीय पक्षात कार्यकर्ते वा नेते म्हणूनही ओळखले जात नव्हते. अशी जी सुशिक्षित वा नवोदित पिढी आंदोलनात आली. तिने पुढली तीन दशके देशाला विविध पातळीवर नेतृत्व पुरवले आहे.

काहीजण त्या आंदोलनात नव्हते किंवा विरोधातही होते. अशा लोकांनी पुढल्या काळात कॉग्रेसलाही नेतृत्व दिलेले आहे. गुलाम नबी आझाद वा शरद पवार त्याच पिढीचे होत. अशी एक नवी पिढी राजकारणात आणिबाणीच्या आगेमागे दाखल झाली. तेव्हा त्यांनी आंदोलनाची पताका आपल्या खांद्यावर घेतलेली असली, तरी त्यापैकी कोणी नेता झाला नव्हता. तर आधीच्याच ज्येष्ठ नेत्यांचे अनुयायी म्हणून ह्या नव्या पोरांनी राजकारणाचे धडे गिरवले होते. अगदी नेत्यांच्या बेबंदशाहीतही या तरूणांचे गट विभागले गेले होते आणि त्यांनीही हिरीरीने एकमेकांच्या विरोधात आरोळ्या ठोकल्या होत्या. पण त्यांचे नवखेपण त्यात सोलवटून निघाले आणि अनुभवाने राजकारणाचे अनेक पदर त्यांना शिकून घेता आले. त्यातून त्यांची जडणघडण झाली. उदाहरणार्थ पासवान हा तेव्हा सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून आलेला लोक्सभा सदस्य होता. सर्वात तरूणही होता. तर नितीशकुमार तेव्हा नवखा आमदार म्हणून विजयी झाले होते. पुढल्या खाचखळग्यांनी त्यांना घडवले. आंदोलनात उतरले आणि दुसर्‍या दिवशी, दोन महिन्यात मुख्यमंत्री वा मंत्री झाले, असा उतावळेपणा त्यात नव्हता. महाराष्ट्रातही कुमार सप्तर्षी वा प्रमोद महाजन ही तेव्हाची कार्यकर्ता मंडळी होती. अशांनी नंतरच्या तीन दशकात देशाला व राज्याला अनेक पक्षातून नेतृत्व दिले. पण त्यापुर्वी त्यांची जडणघडण आंदोलनाप्रमाणेच पक्षीय उलढालीतून झालेली होती. ज्येष्ठांचे ऐकून वा त्याला विरोध करतही त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले होते. त्यासाठी हाती असलेली वा आलेली सत्ताही सोडण्याचे साहसही त्यांनी दखवले होते. राजकीय वनवासात जाऊन पडण्याचा धोकाही पत्करला होता. म्हणूनच त्यांना क्रमाक्रमाने नेतृत्वाची शिडी चढता आली. १९७७ चे आमदार नितीश १९९८ सालात प्रथमच केंद्रात मंत्री झाले आणि केजरीवाल राजकारणात आल्या आल्या दहाबारा महिन्यात थेट मुख्यमंत्रीच होऊन गेले.

हा मोठा फ़रक होता. दोन्ही आंदोलनात एक मोठे साम्य असे, की त्यांना जनमानसाचा मोठा पाठींबा विनासायास मिळाला होता. ती त्यापैकी एकाही आंदोलनातीन नेते वा पक्षाची लोकप्रियता नव्हती. त्यापेक्षाही सत्तेतल्या कोणाच्या तरी मस्तवालपणावर उमटलेली तीव्र प्रतिक्रीया होती. त्याचा लाभ तेव्हा जनता पक्षाला देशभर मिळाला. तर लोकपाल आंदोलनाची व्याप्ती दिल्लीपुरती असल्याने केजरीवाल फ़क्त दिल्लीत चमक दाखवू शकले. पण त्यांची राजकीय महत्वाकांक्षा लौकरच स्पष्ट झाली. हाती आलेली सत्ता व संधी प्रयोगादाखल वापरून देशात एक आदर्श व्यवस्था उभारण्याची ती अपुर्व संधी होती. पण त्या किरकोळ शहरी यशाने नाममात्र मुख्यमंत्री झालेल्या केजरीवालना एकदम देशाची सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पडू लागली. हा दोन आंदोलनातला जमिनअस्मानाचा फ़रक होता. १९७४ च्या आंदोलनात उतरलेले तरूण यातना वा तुरूंगवास सहन करूनही सत्तालोलूप नव्हते. उलट लोकपाल आंदोलनाचे म्होरके तरूण चळवळीचा आडोसा घेऊन आपल्या राजकीय महत्वाकांक्षा जोपासत होते. मात्र त्यांच्या तोडी त्यागाची जपमाळ अखंड चाललेली होती. सहाजिकच पदोपदी त्यांनी मतलब साधण्यापलिकडे काहीच केले नाही. तशी गोष्ट लोकपाल आंदोलनात सहभागी झालेल्या अन्य उत्स्फ़ुर्त नव्या तरूणाची नव्हती. तो तरूण व्यवस्था बदलण्यासाठी उत्सुक होता. त्याला केजरीवाल टोळी प्रामाणिक असल्याचे वाटलेले होते. पण जसजसे दिवस गेले तसतसा तरूणांचा व नंतर जनतेचा भ्रमनिरास होत गेला. कारण आम आदमी पक्षापाशी राजकीय पोक्तपणा अजिबात नव्हता आणि त्यागाचे तर नुसते नाटक होते. त्यामुळेच जनता पक्ष वा जयप्रकाशांचे आंदोलन जसे दिर्घकालीन नवे नेतृत्व निर्माण करू शकले, तसे काहीही लोकपाल आंदोलनातून साध्य होऊ शकले नाही. किंबहूना लोकपाल आंदोलन ही सामान्य जनतेची निव्वळ दिशाभूल ठरली.

आज आम आदमी पक्ष फ़ुटतोय म्हणून चर्चा आहे. त्यातले नेते एकमेकांना समजावण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या हाती असलेली दिल्ली ह्या नगरराज्याची सत्ता कोसळण्याचे अजिबात कारण नाही. महापालिका मतदानात पराभव झालेला असला, तरी विधानसभेत त्या पक्षापाशी निर्विवाद बहूमत आहे. पण आधीच्या दोन वर्षात सरकार व चार वर्षात पक्ष ज्याप्रकारे केजरीवाल यांनी चालवला, त्यातून त्यांच्याविषयी आता त्यांच्याच निकटवर्तियांना शंका येऊ लागल्या आहेत. लोकसभेतील दारूण पराभवानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष व शक्ती दिल्लीत केंद्रीत केली. लोकांच्या हातापाया पडून दुसरी संधी मिळवली. पण काही महिन्यातच आपल्याच ज्येष्ठ सहकारी प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांना, पक्षातून खड्यासारखे बाजूला केले. पक्ष व त्याचे सरकार ही केजरीवाल व त्यांच्याभोवतीची चांडाळचौकडी, यांची मक्तेदारी होऊन बसली. पक्षाचे कुठलेही निर्णय श्रेष्ठी म्हणून या चौकडीने घ्यायचे आणि मग बाकीच्या समित्या वा कार्यकारी समितीने त्यावर निमूट शिक्कामोर्तब करायचे, असा कॉग्रेसी पायंडा आम आदमी पक्षातही पडून गेला. निवडणुका जिंकल्या तेव्हा मजा होती. कोण या चौकडीच्या अधिकाराला आव्हान देऊ शकत नव्हते. म्हणूनच यादव वा भूषण यांचा विनासायास बळी घेतला गेला. आता तशी स्थिती राहिलेली नाही. लागोपाठच्या पराभवामुळे केजरीवालचा चेहरा व शब्द याच्यावर निवडणूका जिंकता येत नसल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळेच आजवरच्या अरेरावीला आव्हान मिळू लागले आहे. याचे कारण आम आदमी पक्ष हा कधीच आंदोलनातून जन्मलेला क्रांतीकारी लोकांचा पक्ष नव्हता. त्यात सर्वच सत्तापिपासू लोक एकवटले होते. म्हणूनच त्यात सत्ता गमावणार्‍या नेत्याविषयी निष्ठा दाखवली जाण्याचा विषयच नव्हता. जो जनता पक्षाच्या पडझडीनंतरही दिसला होता. वाजपेयी असोत की चरणसिंग राजनारायण असोत, त्यांच्या सहकार्‍यांनी नेत्याला कायम साथ दिलेली होती.

जनता पक्षातही नेत्यांच्या अहंकाराची लढाई जुंपलेली होती. पण त्यांच्या सहकार्‍यांनी अनुयायांनी सत्तेसाठी नेत्याला आव्हान दिले नाही. त्याच्या निवडणुका जिंकून देण्याच्या क्षमतेवर नेतृत्व मानलेले नव्हते. ते अनुयायी व जनता पक्षीय तात्कालीन नेते, हे आपापल्या भूमिका व विचारांसाठी सत्तेची पर्वा करणारे नव्हते. उलट आजचा आम आदमी पक्ष आहे. ज्या अण्णा हजारे यांच्या चेहर्‍याला समोर ठेवून लोकपाल आंदोलन झाले, त्यांनाच बाजूला टाकून या लोकांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. नंतर अण्णांना नाकारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अण्णांनी वेळोवेळी यांच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या, त्याचीही दखल घेण्याचे सौजन्य यापैकी एकानेही दाखवले नाही. ज्या तत्वांचा वा साधनशुचितेचा कायम गदारोळ केला, तिलाच तिलांजली देण्यात या लोकांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. पण तेही दुय्यम आहे, कारण एक पक्ष जिंकण्याचा वा पराभूत होण्याचा हा विषयच नाही. आजही त्यांच्यात बेबनाव झाला असताना, ‘आंदोलनचे निकली हुई पार्टी’ असे हे लोक बोलत असतात. त्या आंदोलनाचे सार साधेपणात व शुचितेमध्ये सामावलेले होते. त्या प्रत्येक गोष्टीला या आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी काळीमा फ़ासलेली आहे. पण त्यालाही महत्व नाही. महत्वाची गोष्ट लोकपाल आंदोलनाने जागवलेली नवी तरूण पिढी पुन्हा राजकारण व सार्वजनिक जीवनापासून दुरावलेली आहे. तिची जागा संधीसाधी व बदमाश लोकांनी बळकावली आहे. आज केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षात अन्य कुठल्याही पक्षापेक्षा अधिक लबाड, बदमाश व संधीसाधू लोकांचा भरणा झालेला आहे. त्यातून लोकलज्जा असलेले व सचोटीला साथ देणारे लोक केव्हाच अस्तंगत होऊन गेले आहेत. जनहिताचा अजेंडा केव्हाच नामशेष होऊन गेला आहे. सत्ता व त्यासाठी निवडणूका जिंकणे, इतकेच आता या आम आदमी पक्ष नावाच्या टोळीचे उद्दीष्ट बनून गेलेले आहे.

केजरीवाल, शिसोदिया, कुमार विश्वास वा आणखी कोणी आशुतोष व संजयसिंग असोत. त्यांनी सत्ता उपभोगावी. जनतेच्या पैशावर मौजमजा करावी. त्याच्याविषयी कुठलीही तक्रार नाही. बाकीचे पक्षही कमीअधिक प्रमाणात तेच करत आलेले आहेत आणि तशा लोकांना अन्य पक्षांनी सोबतही घेतलेले आहे. पण आम आदमी पक्षाची गोष्ट तशी नाही, असा दावा स्थापनेच्या वेळी केला गेला होता आणि आजही केला जात असतो. पण त्याचा मागमूसही त्यांच्या वागण्याबोलण्यातून अनुभवास येत नाही. सत्तापिपासूंची झुंड, यापेक्षा दुसरे काहीही त्यांच्या वागण्यातून आढळून येत नाही. १९७७ च्या अपुर्व यशानंतर तीन वर्षात जनता पक्ष संपला, म्हणून त्यातले तरूण नेते कार्यकर्ते विचलीत झाले नव्हते. त्यांनी निवडणूका लबाडी करून इंदिराजींनी जिंकल्याचा आरोप केला नव्हता. पण नवख्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांना एकदोन पराभव पचवताना नाकी दम आलेला आहे. आपल्या कर्माने व पापामुळे लोक आपल्यापासून दुरावले किंवा रागावले, हे सत्यही डोळसपणे बघण्याची कुवत आता त्यांच्यात राहिलेली नाही. हे त्यांचे खरे चरित्र आहे. लोकपाल आंदोलन हा त्यांनी उभा केलेला देखावा होता आणि त्याच्या आडून त्यांना राजकारणात आपला पाया घालून घ्यायचा होता. कुठलेही समाज परिवर्तन वा नव्या पिढीचे नवे नेतृत्त्व उभारण्याची आकांक्षा त्यांच्यात नव्हती. म्हणूनच त्यांनी आपल्या कृत्यातून नव्या पिढीचा मुखभंग केला आहे. नवे नेतृत्व जन्माला येऊन बाळसे धरण्यापुर्वीच त्याची भृणहत्या केलेली आहे. पुढल्या दोन दशकात भारतीय समाजाचे विविध स्तरावर नेतॄत्व करू शकेल, अशा होतकरू तरूणांच्या मनातून राजकारणाचे बीज उखडून टाकले आहे. या लोकांनी आपल्या सत्तालंपटतेसाठी लोकपाल आंदोलनाच्या आत्म्याचा व आशयाचा चक्क मुडदा पाडला आहे. किंबहूना भ्रष्टाचार वा गैरकारभार याच्या विरोधात चालत आलेल्या चळवळींनाच संशयित बनवून टाकले आहे. त्यांनी चळवळ नावाच्या एका उदात्त कल्पनेचीच हत्या करून टाकली आहे. त्यांची विश्वासार्हता संपवून टाकली आहे.

No comments:

Post a Comment