Wednesday, May 10, 2017

तामिळी रहस्यकथा

shashikala के लिए चित्र परिणाम

तामिळनाडूत जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच नेतृत्वाखालच्या अण्णाद्रमुक पक्षाची काय दुर्दशा चालली आहे, ते आपण बघत आहोत. कुठल्याही पक्षाला वा संघटनेला खंबीर नेतृत्वाची गरज असते. पण नेतृत्व इतके एकखांबी असू नये, की त्याच्या मागे संघटनेत टोकाची बेदिली माजावी. जयललिता किंवा ममता बानर्जी यांच्यासारख्या नेत्यांमुळे एक पक्ष उभा रहातो आणि त्याला लोकांचा पाठींबाही मिळत असतो. पण त्यामुळे त्याला संघटना म्हणता येत नाही. संघटना ही सामुहिक नेतृत्वावर उभी रहात असते. त्यापेक्षा एकाच नेत्याच्या लोकप्रियतेवर आधारीत जमलेल्या गर्दीला संघटना असे नाव दिले, म्हणून ती खरेच संघटना होत नाही. कारण त्या लोकप्रिय नेत्याच्या अनुपस्थितीत काय करावे, त्याचा निर्णय अशा संघटनेतला गोतावळा करू शकत नसतो. त्यांच्यात स्वार्थ व मतभेदांची रणधुमाळी सुरू होते आणि बघता बघता पक्ष वा संघटनेचा विध्वंस होऊन जातो. अण्णाद्रमुक त्याच अवस्थेत सध्या सापडली आहे. या पक्षाची स्थापना एमजीआर या लोकप्रिय अभिनेत्याने केलेली होती. त्याच्या निधनानंतरही असेच रणकंदन माजलेले होते. पण पक्षाचा वारसा आपल्या खांद्यावर पेलू शकणारे दुसरे व्यक्तीमत्व, म्हणून जयललिता पुढे आल्या होत्या. त्यांच्या मागे तशी जबाबदारी पेलू शकणारा कोणीही नेता पक्षात नसल्याने अराजक माजले आहे. दंगलीचा फ़ायदा घेऊन जशी लूटमार चालते, तसे बहुतेक नेते आपापले मतलब साधून घेण्याच्या उद्योगात गर्क आहेत. कारण त्यापैकी कोणीही खरा नेता नसून, आपापल्या परीने सत्तालंपट लोक तिथे एकत्र आलेले आहे. त्यापैकी शशिकला तुरूंगात जाऊन पडल्या आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या पलानीस्वामी यांना पक्षासह सरकारवर मांड ठोकून काम करता आलेले नाही. पण या दरम्यान ज्या इतर घटना घडत आहेत, त्या कुठल्याही चित्रपट कथानकाला शोभणार्‍या आहेत.

जयललिता यांच्याशी जवळीक करून त्यांच्या घरात घुसलेल्या शशिकला यांनी अम्माच्या निधनानंतर त्यांचा नुसता राजकीय वारसा बळकावलेला नाही. त्यांची मालमत्ताही बळकावण्याचे संपुर्ण कारस्थान आधीपासून शिजवलेले असावे. म्हणूनच अखेरच्या कालखंडात आजारी असलेल्या अम्माला कुणाही जवळच्या नातेवाईकालाही भेटू देण्यात आले नाही. आता तर त्यांच्या ज्या अन्य मालमत्ता आहेत, तिथेही मुडदे पाडले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. जयललितांच्या अनेक मालमत्ता आहेत. करोडो रुपयांची सपत्ती त्यांच्या खाती जमा होती. त्यापैकी एका मोठ्या फ़ार्महाऊसच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला करून अज्ञातांनी ठार मारल्याची बातमी होती. मग त्याच खुनाचा आरोप असलेला संशयीतही कुठे मोटार अपघातात मारला गेल्याची बातमी आली. दुसर्‍या एका मालमत्तेच्या रक्षकावरही असाच प्रा्णघातक हल्ला झालेला असून अजून तो मरण पावलेला नाही. हे सर्व घडत असताना खुद्द शशिकला तुरूंगात आहेत आणि त्यांनी नेमलेला राजकीय वारसही निवडणूक आयोगाला लाच देताना पकडला गेल्याचे प्रकरण रंगलेले आहे. एका दलालामार्फ़त पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळावे म्हणून दिनाकरन या शशिकलाच्या भाच्याने आयोगाच्या कुणा वरीष्ठ अधिकार्‍यालाच कोट्यवधी रुपयांची लाच देऊ केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्याच्याही आधी अम्माच्या रिक्त जागी होणार्‍या पोटनिवडणुकीत हाच दिनाकरन पक्षाचा उमेदवार झाला होता. त्याने मतदाराला विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे व वस्तुंचे वाटप केल्याचा गवगवा झाला. सहाजिकच तिथले मतदान आयोगाला अनिश्चीत काळासाठी रद्द करावे लागले आहे. ह्या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. याचा परस्पर संबंध जोडतानाही अनेक अभ्यासक पत्रकारांची तारांबळ उडाली आहे. अतिशय गुंतागुंतीची रहस्यकथा म्हणावी, असा हा घटनाक्रम आहे.

शशिकला यांना एकेदिवशी अकस्मात अम्माने आपल्या घरातून हाकलून लावलेले होते. त्यांची पक्षातूनही हाकालपट्टी केलेली होती. नंतर आपल्या कुटुंबाशी सर्व संबंध तोडूनच पुन्हा शशिकला अम्माच्या निवासस्थानी दाखल झाल्या. पुढल्या काळात कुठल्याही नातलगाशी संबंध ठेवणार नसल्याचे लिहून दिल्यावरच अम्माने शशिकला यांना पुन्हा जवळ घेतले होते. पण अम्मा आजारी झाल्या व बेशुद्धावस्थेत गेल्यापासून पुन्हा शशिकला यांच्या कुटुंबियांची वर्दळ अम्माच्या निवासस्थानी सुरू झाली. अम्माच्या आजारपणात, इस्पितळातही याच कुटुंबाच्या हाती सर्व सुत्रे होती. या कुटुंबाला मन्नारगुडी माफ़िया अशा नावाने ओळखले जाते. माफ़िया हे विशेषण कुठेही लावण्याची आपल्याकडे फ़ॅशन आहे. म्हणूनच कोणी शशिकला यांच्या कुटुंबाची पुर्वी गंभीर दखल घेतली नव्हती. पण जयललिता यांच्या निधनानंतर ज्या घाईगर्दीने व निर्दयपणे सत्तेसह मालमता बळकावण्याचा खेळ झाला, त्यातून ह्या माफ़िया शब्दाचा खरा अर्थ उलगडू लागला आहे. आमदारांना कोंडून ठेवणे वा पक्षाच्या पदाधिकारी वर्गाकडून जबरदस्तीने संमतीपत्रे गोळा करणे; अशा अनेक गोष्टी समोर आलेल्या होत्याच. पण आता मुडदेही पाडले जाऊ लागले आहेत. अम्माच्या मालमत्तेचे रक्षक वा जुने ड्रायव्हर यांच्याही हत्या कशासाठी होत आहेत? कष्ट उपसणार्‍यांच्या पोटभरू नोकरांच्या जीवावर कोण उठला आहे? त्याचेही कारण समजले पाहिजे. असे राखणदार वा ड्रायव्हर सतत मोठ्या लोकांच्या सहवासात व नजिक असतात. त्यांना त्या बड्या लोकांच्या गोपनीय गोष्टी ठाऊक असतात. अनेक रहस्ये पोटात घेऊन असे कष्टकरी जगत असतात. निष्ठावान नोकर म्हणून त्यांची त्या़च कारणास्तव ओळख दिली जात असते. अम्मा व शशिकला यांच्यातल्या संबंध वा नात्याविषयी त्यांनाच खुप काही ठाऊक असल्यामुळे त्यांचे जगणे कोणाला घातक वाटू लागले आहे काय?

मालमत्तेचा रखवालदार वा जुना ड्रायव्हर ह्यांना मारून कोणाला कुठली इस्टेट मिळणार आहे? त्याचे उत्तर नकारार्थी आहे. पण त्यांच्याकडे असलेली माहिती वा त्यांचीच साक्ष, अन्य को्णा मालमत्ता बळकावण्याच्या मार्गातली अडचण असू शकते ना? तेच अशा हल्ले व हत्याकांडाचे कारण असावे. चित्रपटात वा रहस्यमय कथेमध्ये असेच किरकोळ नोकर मारले जात असलेले आपण बघतो. पण वास्तवात अशा हत्या होत असल्याचे आपल्याला बघायला मिळत नसते. या प्रकरणात संशयास्पद रितीने अम्माच्या अनेक जुन्या निष्ठावान कर्मचारी व नोकरांची हत्या तामिळनाडूत माफ़ियाराज असल्याची साक्ष देते आहे. मन्नारगुडी माफ़िया अशी शशिकलाच्या कुटुंबाची ओळख कशाला करून दिली जाते, त्याचा हा सज्जड पुरावाच मानावा लागेल. कारण खुद्द शशिकला व त्यांनी नेमलेला वारस दिनाकरन देशातील निवडणुक आयोगाला लाच देण्यापर्यंत मजल मारतो. पैसा व सत्तेच्या बळावर आपण कोणाचीही मुस्कटदाबी करू शकतो, अशी मस्ती माफ़िया टोळ्यांमध्येच असू शकते. त्याचीच प्रचिती सध्या तामिळनाडूच्या राजकारणात व सार्वजनिक जीवनात येत आहे. पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या दाऊद इब्राहीमची कसली दहशत, त्याच्या भारतातील टोळीवाल्या साथीदारांना असते, त्याचा हा नमूना आहे. प्रत्येकाला जीवाची भिती आहे आणि आज सोबत असलेला सहकारी कधी बॉसच्या इशार्‍यावर आपला मुडदा पाडणार, अशी ती भिती असते. ती दहशत निर्माण करण्यासाठी आधीपासून अशा घटनाही घडवलेल्या असतात. शशिकला वा त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी आपला असा धाक निर्माण करण्यासाठी काय काय गुन्हे केलेले असतील, त्याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे. पण त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे अशा माफ़िया टोळीने एका लोकप्रिय पक्षावर आणि राज्य सरकारवर आपले प्रभूत्व सिद्ध केलेले आहे. तामिळनाडू त्यातून कसा सुटणार हे इतिहासच सांगेल.

No comments:

Post a Comment