Wednesday, May 24, 2017

‘शरीफ़" केजरीवाल



६ मे २०१७ रोजी आम आदमी पक्षाचे माजीमंत्री कपील मिश्रा याने खुलेआम रस्त्यावर येऊन आपल्याच मुख्यमंत्र्याला भ्रष्टाचारी ठरवण्याची मोहिम हाती घेतली. अर्थात असे झाल्यावर कुठल्याही राजकीय पक्षाची पहिली प्रतिक्रीया असते, तशीच ‘आप’ची प्रक्रीया आलेली होती. मंत्रीपद काढून घेतल्याने कपील मिश्रा नाराज झाले असून बेताल आरोप करीत असल्याचा हा खुलासा होता. पण वास्तविकत: तो सापळा होता. मग रविवारी कपीलने पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांनी सत्ता हाती घेतल्यापासून किती व कोणते भ्रष्टाचार व लूट केली, त्याची यादीच सोपवण्याचा सपाटा लावला. त्यातला अत्यंत महत्वाचा आरोप होता साडूच्या कंपनीला सरकारी काम देऊन बिनाकामाचे १० कोटी रुपये लुटण्याचा! अर्थात हा गंभीर आरोप होता आणि त्याचे उत्तर देण्याची हिंमत केजरीवालना झाली नाही. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना पुढे करून थातूरमातूर उत्तरे दिली. पण कुठेही आरोपातील तथ्यांचा साफ़ इन्कार करणे त्यांना शक्य झाले नाही. ७ मे २०१७ पासून २१ मे पर्यंत तब्बल चौदा दिवस, किंवा दोन आठवडे केजरीवाल बिळात लपून बसले होते. पोलिस वा अन्य कुठल्या यंत्रणेकडून काही कारवाई होत नाही बघितल्यावर त्यांना थोडा धीर आला. त्यांनी रविवारी एका जाहिर समारंभात आपल्यावरच्या आरोपाचा प्रथमच साफ़ इन्कार केला. पण आरोप खोटे असल्याचे सांगण्यापेक्षा अधिक कुठलाही तपशील त्यांना देता आला नाही. कारण आरोप खरे असल्याची केजरीवालनाही खात्री होती. किंबहूना त्यांच्या पत्नीलाही आरोपातले तथ्य ठाऊक होते. पण आपल्यासाठी सापळा लावला असल्याची माहिती असल्याने केजरीवाल अंग चोरून बसले होते. मात्र रविवारी त्यांचा धीर सुटला आणि ते फ़सले. रविवारी त्यांनी जाहिरपणे या विषयात वक्तव्य केले आणि सोमवारी कपील मिश्राच्या आरोपानुसार धाडी पडल्या, त्यात केजरीवाल फ़सले.

आरोपांचे जाळे ही अशी गोष्ट असते, की त्यात खरेखोटे बेमालून मिसळलेले असते. त्यात खोट्याचा विरोध करायला म्हणून तुम्ही बिळातून बाहेर आलात, मग तुमच्या समोर खरे आणले जात असते. कपील मिश्राने बेताल आरोप करताना सिद्ध होणार्‍या आरोपाचे पुरावे थेट सरकारी यंत्रणांच्या हाती सोपवले होते. पण त्याच्यावर कुठली कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. जणू ही कारवाई करण्यासाठी केजरीवाल बिळातून बाहेर येण्याची प्रतिक्षा तपास यंत्रणा करीत होत्या. रविवारी केजरीवालनी आरोपांचा इन्कार केला आणि सोमवारच्या धाडीने कपील मिश्राला सत्यवादी ठरवून टाकले. कारण सोमवारी केजरीवालांचे साडू बन्सल यांच्या घरी व कार्यालयांवर धाडी घालण्यात आल्या. बन्सल यांच्या कंपनीला कामे देऊन त्याची रक्कम केजरीवाल यांच्या सरकारने चुकती केली होती. पण प्रत्यक्षात ती कामेच झालेली नाहीत. बन्सल हे केजरीवालांचे साडू म्हणजे त्यांच्या पत्नीच्या भगिनीचे पती आहेत. सहाजिकच यात केजरीवाल पत्नीचाही सहभाग येतो. ही बाब लक्षात घेतली तर आयुष्यात प्रथमच केजरीवाल यांची पत्नी या राजकारणात कशामुळे ओढली गेली, त्याचाही खुलासा होतो. त्यांच्याच बहिणीच्या पतीला वा त्याच्या कंपनीला कपील मिश्राने हत्यार बनवले आहे आणि म्हणूनच या केजरीपत्नीने कपीलवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. यात विश्वासघात कुठे आला? विश्वासघात त्याच्याकडून होतो, ज्याने आपल्या विश्वासाला तडा दिलेला असतो. केजरीवाल पत्नीपतीने कपीलवर कसला विश्वास ठेवला होता? त्यांनी केलेल्या गफ़लती, लूटमार वा भ्रष्टाचाराविषयी कपील कुठे काही बोलणार नाही, असा विश्वास ठेवला आणि त्याने दगा दिलेला आहे काय? काहीही लपवण्यासारखे नसेल तर कपीलने विश्वासघात करण्याचा प्रश्नच कुठे येतो? परंतु केजरीपत्नीने विश्वासघाताचा आरोप करून कपील सत्य बोलत असल्याचीच ग्वाही दिली होती ना?

कपीलने केजरीवाल कुटुंबातील कुठल्या खाजगी वा व्यक्तीगत गोष्टींना वाचा फ़ोडलेली नाही. त्याने दिल्लीकर नागरिकांच्या हिताशी संबंधित व्यवहाराचा बोलबाला केला आहे. त्यात कौटुंबिक विश्वासघाताचा प्रश्नच कुठे येतो? पण केजरीपत्नी त्यालाच विश्वासघात म्हणते, तेव्हा भ्रष्टाचार कौटुंबिक संपत्ती संपादन करण्याचा असल्याचीच ग्वाही दिली जात असते. पण तरीही तपासयंत्रणांनी संयम राखला होता. कपीलची तक्रार एसीबीने व सीबीआयने नोंदवून घेलली. पण पुढली कुठलीही हालचाल झालेली नव्हती. जणू केजरीवाल आरोपाविषयी काहीतरी बोलण्याच्या प्रतिक्षेत या यंत्रणा बसलेल्या होत्या. किंबहूना केजरीवालनी साफ़ इन्कार करावा, म्हणजे त्यांना पुराव्यानिशी खोटे पाडण्याची चांगली संधी येईल, अशा अपेक्षेत यंत्रणा सज्ज असाव्यात. नसेल तर केजरीवाल बिळातून बाहेर आल्यवर काही तासात अशा धाडी पडण्याचे काहीही कारण दिसत नाही. रविवारी एका समारंभात केजरीवालनी इन्कार केला आणि सोमवारी बन्सल यांच्या घरी व कचेरीत धाडी पडल्या. तिथून केजरीसाडूच्या पापाचे मोठे पुरावे हाती घेण्याची कारवाई उरकण्यात आली. अर्थात असे पुरावे त्या धाडी घालून जमवण्याची काहीही गरज नाही. कारण कागदपत्रे सरकार दफ़्तरीही उपलब्ध आहेत आणि केंद्रीय बांधकाम विभागाला सोबत घेऊन यंत्रणेने ते पुरावे आधीच गोळा केलेले आहेत. पण धाडींमुळे गाजावाजा अधिक होतो आणि केजरीवाल अधिकच गाळात जायला हातभार लागतो. कपीलची तुलना आम्ही यापुर्वीच अमेरिकन गुन्हेगारी इतिहासातील एक ऐतिहासिक माफ़ीचा साक्षीदार एब रिलेस याच्याशी केली होती. आता त्याचीच साक्ष जाहिरपणे मिळते आहे. कारण एकामागून एक आरोप करणारा कपील मिश्रा, केजरीवाल यांच्या पाच वर्षाच्या नाटकातला अखेरचा अध्याय होऊ घातला आहे. आधी आरोप, मग इन्कार आणि शेवटी पुराव्यासह कारवाई; असे त्या नाट्याचे स्वरूप असणार आहे.

मुळातच केजरीवालच्या साडूची कंपनी दिल्ली सरकारच्या का्ळ्या यादीतील होती. तरीही तिच्यावर कुठले काम सोपवणे हाच भ्रष्टाचार होता. मग तेही काम केले नाही आणि त्यासाठी किंमतही सरकारी तिजोरीतून मोजली गेली असेल; तर त्याचे भक्कम पुरावे सरकारी दफ़्तर व बॅन्कांमध्ये उपलब्ध असतात. सहाजिकच त्यात तपासाची फ़ारशी गुंतागुंत नसते. केजरीवालाना सत्येंद्र जैन याने दोन कोटी रुपये रोख लाच दिली, हा आरोप टिकणारा नव्हता. पण त्याच संदर्भात कपील मिश्राने केजरीवालच्या साडूला दहा कोटी रुपये बांधकाम खात्यातून खोट्या कामाचे देण्यात आल्याचा दिलेला संदर्भ, निकाल लावणारा होता. त्यात खरा सापळा लावलेला होता. थोडी अक्कल असती, तरी केजरीवालनी कपील मिश्राला समजूत घालून आपल्या गोटात परत आणले असते. त्याची समजूत काढली असती. त्यामुळे हे पुरावे नष्ट करता आले नसते. पण त्याचा असा बोभाटा झाला नसता, की तपास यंत्रणांच्या हाती असे कोलित मिळाले नसते. अर्थात तिथेही सुत्रे राजकारणीच हलवित असतात. दिड वर्षापुर्वी सीबीआयने दिल्ली सरकारच्या मंत्रालयात धाड घालून मुख्यसचिव राजेंद्रकुमार यांची झडती घेतली होती आणि त्यात अनेक गोपनीय पत्रेही पळवली गेली, असा आरोप केजरीवालनी केला होता. तेव्हा आपल्या सचिवावर धाड पडल्याने केजरीवाल इतके कशाला घुसमटले होते, त्याचा अर्थ आता लागू शकेल. किंबहूना त्यातूनच केजरीवाल सरकारच्या अनेक भानगडी व भ्रष्टाचाराची प्रकरणे सीबीआयच्या हाती लागली. पण कपील मिश्राला बंडखोर म्हणून उभा केल्यावर त्याचा बोभाटा करण्यात आलेला नाही, याची कोणी हमी देऊ शकतो काय? केजरीवाल यांचे पक्षातील सहकारी कपीलच्या आरोपांचे खंडन करीत नाहीत, तर तो भाजपाची भाषा बोलतो असे का म्हणतात, त्याचे उत्तर दीड वर्षापुर्वीच्या सीबीआय धाडीत लपलेले आहे. म्हणून तर हा सगळा सापळा वाटतो. ज्यात केजरीवाल अलगद येऊन अडकले आहेत.

1 comment:

  1. जबरदस्त, केजरीवाल च्या पत्नीने केलेल्या विश्वासघाताचे स्पष्टीकरण सोडले तर पूर्ण लेख पटला. एकाधा माणूस जर आपल्या नवर्यावर एवढे आरोप करतो तो तिला विश्वासघाती वाटला असावा. पण खरी मजा ती नाहीए, खरी मजा तर ही आहे की तिने त्यासाठी twitter चा वापर केला. या आधी तिला कधी ट्विटर वरती active पाहिले होते काय? मला पूर्ण खात्री आहे की केजरीवाल च त्याच्या बाइकोचे twitter खाते वापरून tweet करत होता. त्याच्या सारखा भूरटा माणूस ते करुही शकतो

    ReplyDelete