Wednesday, May 30, 2018

दोन माजी अर्थमंत्री

pranab chidambaram के लिए इमेज परिणाम

कसे दिवस आलेत बघा, युपीएचे दोन माजी अर्थमंत्री एकाचवेळी चर्चेत आहेत. एकाला सन्मानाने संघाच्या शिबीरात आमंत्रण मिळाले म्हणून, तर दुसरा आपली अब्रु झाकण्यासाठी कोर्टात अटकपुर्व जामिनासाठी धावला म्हणून! इंदिराजींच्या काळात प्रणबदा अर्थमंत्री होते आणि चिदंबरम सोनियांच्या काळातले अर्थमंत्री! पण दोघात किती तफ़ावत आहे ना? अर्थात सोनियांच्याही काळात प्रणबदा अर्थमंत्री होते. पण चिदंबरम गृहमंत्री असण्याच्या काळापुरते. मग त्यांना राष्ट्रपती पदावर पाठवायचा निर्णय झाला आणि चिदंबरम पुन्हा आपल्या जागी स्थानापन्न झाले. इतक्या दिर्घकाळात प्रणबदांवर कधी कुठले बालंट आले नाही, की त्यांच्या मुलाबाळांनी राजकीय वा सरकारी कामकाजात लुडबुड केल्याचा गवगवा झाला नाही. दुसरे टोक आहे चिदंबरम! यांनी १९९६ सालात कॉग्रेसला लाथ मारून वेगळी तामिल मनिला कॉग्रेस तामिळनाडूत स्थापन केली आणि त्यातून देवेगौडांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केलेले होते. तेव्हापासून त्यांची किर्ती नव्हेतर कार्टी इतकी कुख्यात झाली, की आज बापाला कोर्टात धाव घेऊन अटकपुर्व जामिन मागण्याची नामुष्की आलेली आहे. अर्थात त्यात किती सुरक्षा आहे, ते लौकरच कळेल. कारण कोर्टाने चिदंबरमना निमूट सक्तवसुली संचालनालयात हजर होण्यास फ़र्मावले आहे. तिथे हजेरी लावण्याच्या अटीवर अटकपुर्व जामिन मिळाला आहे. हा माणूस वाहिन्यांवर वा दैनिकातून आजच्या सरकारला अर्थमंत्र्यांना उपदेशाचे डोस पाजत असतो. पण आपल्याच कारकिर्दीत काय दिवे लावले होते, त्याचे खुलासे देण्यासाठी समोर येण्याची हिंमत करत नाही. आताही कोर्टात धाव घेण्याची काही गरज नव्हती. पण चोराच्या मनात चांदणे म्हणतात ना? पोराच्या उपदव्यापांनी आपल्यालाही गजाआड जाऊन पडण्याची किती खात्री असावी पित्याला ना? आधीच अटकपुर्व जामिन घेऊन टाकला.

युपीएच्या काळातील अनेक आर्थिक घोटाळ्यात मनमोहन सिंग वा अन्य मंत्र्यांवर चिखलफ़ेक झाली. पण त्या घोटाळ्याच्या गप्पा चालल्या असताना चिदंबरम यांचे नाव कुठेही आलेले नव्हते. आता त्यांच्या पापाला वाचा फ़ुटलेली असून, त्यात त्यांचे सुपुत्र गाळात अडकले आहेत. पण पित्याच्या अर्थमंत्री असण्याचा लाभ उठवित आपल्या परदेशी खात्याची तुंबडी भरून घेणारा कार्ति चिदंबरम हा छोटा मासा आहे. मोठा मासा गळाला लावण्यासाठी आधी छोटा मासा गळाला लावला जातो, तसा कार्ति हा छोटा मासा आहे. तो कागदोपत्री फ़सला, मग त्याच्या खात्यात जमा झालेलया पैशाचा हिशोब देताना मोठा मासा म्हणून चिदंबरम अडकणार आहेत, विद्यमान अर्थमंत्र्याला शहाणपणा शिकवणार्‍या चिदंबरमना त्याची पुर्ण खात्री आहे. म्हणूनच हे गृहस्थ चौकशीला बोलावूनही हजर होत नाहीत. आपल्याला जिथल्या तिथे अटक होऊ शकते, याची किती खात्री असावी ना? म्हणून त्यांनी अटकपुर्व जामिन घेतला आहे. खरे तर नुसती हजेरी लावूनही विषय संपला असता. पण विषय हजेरी लावून वा खुलासा करून संपणारा नाही, हे चिदंबरम ओळखून आहेत. ते एकच टुमणे लावून बसले आहेत. आपल्याविषयीचे सर्व कागदोपत्री पुरावे सक्तवसुली खात्याकडे उपलब्ध आहेत, मग चौकशीसाठी आपल्याला बोलावतातच कशाला? हाच त्यांच्या सुपुत्राचा बचाव होता. पण तो टिकला नाही. चौकशीला हजेरी लावण्यात टाळाटाळ झाल्यावर कोर्टात त्यानेही धाव घेतली होती. पण अखेरीस त्यालाही गजाआड जावे लागले आणि आता पित्याला पुत्राच्या पावलावर पाऊल टाकून तेच करावे लागले आहे. कारण कॉग्रेसच्या सत्तेवरचा सूर्य कधीच मावळत नाही म्हणून कितीही उचापती कराव्यात, कोणीही आपल्याला पकडणार नाही, असा आत्मविश्वास होता ना? २०१४ सालात मतदाराने त्यालाच दणका दिला आणि आता या लोकांना पळता भूई थोडी झाली आहे.

युपीएने दहा वर्षात घोटाळ्यांचा जो नंगानाच घातला, त्याचे एक एक पदर सध्या उलगडत आहेत आणि त्याची संगतवार मांडणी करणे सोपे काम नाही. चिदंबरमना त्याची खात्री आहे. म्हणूनच त्यांच्यासह अनेकांचा भरवसा आपल्या निष्पाप असण्यापेक्षा पुन्हा सत्तेवर येण्यावर आहे. २००४ सालात जसे वाजपेयी सरकारची सगळीकडून घेराबंदी करून सत्ता मिळवली, तसेच आताही मोदी विरोधात खराखोटा गदारोळ माजवून पुन्हा सत्ता मिळवण्याचे मनसुबे रचले जात आहेत. ते भले पुरोगामीत्वाचे नाटक करून रंगवले जात असतील. पण प्रत्यक्षात आपल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी आता कॉग्रेसला सत्ता हवी आहे. त्यांच्यामागे धावणार्‍या लालूंसारख्यांना देखील आपली पापे झाकण्यासाठीच सत्ता मिळवायची आहे. जेणे करून मोकाट सुटलेल्या मोदी सरकारच्या कारकिर्दीतील विविध तपास यंत्रणांना लगाम लावता येईल. म्हणून मग चार वर्षात काय झाले, असे सवाल विचारून मोदींना सत्ताभ्रष्ट करण्याचे मनसुबे रचले जात आहेत. मोदी सरकारच्या काळात काहीच झाले नसेल, तर मग घोटाळेही झालेले नाहीत आणि तीच त्यांची मोठी जमेची बाजू ठरते. जनतेला मोठे आमिष दाखवून तिलाच लुबाडणार्‍यांपेक्षा जुन्या लुटारूंना अटक करणेही जनतेसाठी अच्छे दिन असतात. हे राहुलभक्तांना व चिदंबरम चहात्यांना कळत नसले तरी मतदाराला कळते. म्हणूनच मोदी पराभूत होण्याची स्वप्ने वर्षभर रंगवायला काहीही हरकत नाही. पण अशा घटनांमधून अनेक गोष्टी समोर येत असतात. चिदंबरम हा बहुधा देशातला पहिला अर्थमंत्री असावा, ज्याला अटकेच्या भयाने कोर्टात धाव घ्यावी लागली वा अटकपुर्व जामिन मिळवावा लागला आहे. खर्‍याची बाजू असती, तर त्यांना इतके भयभीत होण्याची काहीही गरज नव्हती. ज्या राहुलचे नेतृत्व चिदंबरम मानतात, ते फ़क्त पंधरा मिनीटे बोलून मोदींना पळवून लावू शकतात ना?

विविध गुंतवणूकी व त्यातल्या आर्थिक घोटाळ्य़ांना चिदंबरम यांनी वाकडीतिकडी वळणे घेऊन झाकलेले होते. त्याचा तपास कधीही लागला नसता. पण मुलीच्या खुनात आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने आपल्या एका चौकशीत चिदंबरम व त्यांच्या पुत्राचे पितळ उघडे पाडले. आपल्या आर्थिक गैरव्यवहाराला नियमित करून घेण्यासाठी अर्थमंत्री चिदंबरम यांची भेट घेतली व त्यांनीच पुत्र कार्तिच्या कंपनीकडे पाठवले. त्याने सगळ्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्यासाठी काही कोटी रुपयांची लाच मागितली. ती परदेशी खात्यातून वळती केल्यावर पित्याने अर्थमंत्रीपदाचा वापर करून इंद्राणीच्या घोटाळ्याला नियमित केले. त्याविरुद्ध अधिकार्‍यांचे शेरे असतानाही व्यवहाराला नियमित केले. त्यातून विविध कंपन्यांचे शेअर्स कार्तिच्या मित्रांच्या नावे घेण्यात आले आणि ते शेअर्स त्या मित्रांनी नंतर कोवळ्या वयात मृत्यूपत्र करून चिदंबरमच्या नातीला देऊन टाकले. मोठ्या दुर्गम घाटातल्या रस्त्यापेक्षाही चमत्कारीक वेडीवाकडी वळणे आहेत ना? अशा व्यवहारात चिदंबरम नामानिराळे रहायला गेले. पण कार्ट्याने त्यांना पुरते गुरफ़टून टाकलेले आहे आणि आता तपास यंत्रणांचा सापळा आपल्यासाठी पुर्ण सज्ज असल्याची खात्री झाल्यावर, या माजी अर्थमंत्र्याला घाम फ़ुटला आहे. त्याचेही दुर्दैव असे, की त्याने अशा अडचणीच्या वेळी कपील सिब्बल यांना बचावासाठी वकील नेमले आहे. सहाजिकच लौकरच चिदंबरम गजाआड जाण्याची आपण खात्री देऊ शकतो. कारण अशा खटल्यात व प्रकरणात थप्पड खाण्य़ासाठीच सिब्बल ख्यातनाम आहेत. मग ते गांधीवध वा नॅशनल हेराल्ड अशा विषयातली सोनिया राहुलचे प्रकरण का असेना? आपली ही परंपरा सिब्बल मोडण्य़ाची बिलकुल शक्यता नाही. त्यामुळे प्रणबदा नागपूरला भाषण करण्यापुर्वी की त्या़च्याही अगोदर चिदंबरम आत जातात, त्याची प्रतिक्षा करायची. दोघेही माजी अर्थमंत्री आहेत. पण अवस्था किती भिन्न आहे ना?

4 comments:

  1. मान्य आहे की
    सिंह पाळणे थोडे महागात पडत आहे,
    पण ह्याचा अर्थ असा नाही की
    .
    .
    .
    2019 मध्ये आम्ही सिंह विकून गाढव विकत घेऊ 😁🤣😅🤪🤪😜🤪🤪😆🤪🤪

    ReplyDelete
  2. लय रिकामपण दिसते.

    ReplyDelete