Monday, October 15, 2018

वाचाल तर ‘वाचाल’

reader के लिए इमेज परिणाम

जगात मानवी वाटचालीचा विचार केला, तर प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचे मूल्यमापन करताना विविध ऐतिहासिक प्रसंगांचे स्मरण करून दिले जाते. त्यात औद्योगिक क्रांती असेल वा विविध वैज्ञानिक शोधांचा समावेश असतो, तसाच वैचारिक उत्थानाचेही दाखले दिले जातात. पण मानवी विकासामध्ये किंवा प्रगतीमध्ये सर्वात मोठे योगदान कोणाचे असेल, तर ते छपाई तंत्रज्ञानाचे आहे. जोवर कागद आणि छपाईचा शोध लागला नव्हता, तेव्हापर्यंतचे जग आणि त्यानंतरचे जग यात जमिन अस्मानाचा फ़रक दिसून येईल. त्या एका शोधाने मानवी जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणलेले आहे. कारण छापलेली अक्षरे, शब्द वा वाक्यांसह पुस्तके ग्रंथ सामान्य लोकांना उपलब्ध होत गेले. त्यातून आधी वाचनाला चालना मिळाली व आपोआप लिखणाला प्रेरणा मिळत गेली. मुठभर लोक साक्षर होते, ती मक्तेदारी छपाईने संपुष्टात आणली. पण तिची खरी प्रेरणा वाचक हीच होती. ज्या वेगाने हे तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध झाली, तितक्याच नव्हेतर त्याहून अधिक वेगाने वाचक वाढत विस्तारत गेला. म्हणून छपाईचे नवनवे प्रयोग होऊ शकले आणि छपाईच्या माध्यमातून अक्षरे-शब्द ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचत गेले. त्याने जी अक्षरक्रांती घडवून आणली, त्यामुळे बाकीच्या सर्व क्रांत्यांना व बदलांचा पाया घातला गेला. वाचनाची ती महत्ता आहे. पण मानवी प्रगतीच्या इतिहासात त्याचा उल्लेखही सहसा कुठे केला जात नाही, की या महान मूलभूत क्रांती्कारक शोधाला त्याचे योग्य श्रेय दिले जात नाही. सामान्य माणसाने त्यातून कालौघात नव्या युगाला चालना देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचीही जाणिव जागतिक इतिहासात राखली गेलेली दिसत नाही. कागद छपाईसह ग्रंथ लेखक, प्रकाशक आणि त्याचा विस्तार करण्यासाठी निघालेली वाचनालयांची चळवळ, खरेखुरे क्रांतीचे दूत होते व आहेत. निदान आजच्या दिवशी त्यांचे योग्य स्मरण व्हावे.

वाचन म्हणजे नेमके काय असते? कुठलेही पुस्तक तुम्ही घेऊन वाचता, म्हणजे काय असते? कुठल्याही भाषेतली अक्षरे, त्यांच्या संयोगाने झालेले शब्द, विविध संदर्भाने त्यांचे बदलणारे अर्थ आणि त्यांच्यातून तयार झालेली रचना. यातून कोणीही आपल्या मनातले विचार, कल्पना, भूमिका वा घटनाक्रमांच्या नोंदी करून ठेवत असतो. तो आपला समकालीन नसतो वा कित्येक पिढ्या आधीचा दुरचा असू शकतो. कालखंडामुळे वा अंतरामुळे आपली त्याची कधीही भेटही शक्य नसते. पण असा माणूस त्या पुस्तकातून, छापलेल्या कागदातून आपल्याला भेटू शकत असतो. त्याचे विचार वा त्याचे मन, हे त्याचे छापील अस्तित्व असते आणि आपली त्याच्याशी भेट होऊन जाते. तसे बघितले तर शब्द वा छापलेली अक्षरे निर्जीव असतात. पण वाचक मिळण्यापर्यंत ते सुप्तावस्थेतले बीजच असते. पोषक योग्य परिस्थिती निर्माण झाली तर सुप्तावस्थेतले बीज अंकुर फ़ुटून नव्याने सर्जन करते, तसेच हे छापलेले पुस्तक वा लिखाण असते. त्याला सुप्तावस्थेतून बाहेर काढणारा कोणी घटक हवा असतो आणि वाचकच तो घटक असतो. तो वाचायला येतो, पुढाकार घेतो म्हणून त्या सुप्तावस्थेत पडलेल्या शब्द विचारांमध्ये नवी संजिवनी संचारत असते. ग्रंथालय अशा शेकडो हजारो बीजांचे गोदाम असते. कधी एका भाषेतली पुस्तके दुसर्‍या भाषेतही रुपांतरीत केली जातात. त्यातून पृथ्वीच्या एका टोकाला असलेले विचारांचे कथेचे जीवनशैलीचे बीज दुसर्‍या टोकाला, दुसर्‍या गोलार्धात येऊन पोहोचते. शक्य झाल्यास त्यातून एक नवे सर्जन होत असते. मुळच्या बीजापेक्षाही वेगळे व अधिक दर्जेदार सर्जनही होऊन जाऊ शकते. पोर्तुगालचा आंबा आपले मुळचे रुप स्वाद बदलून कोकणाल्या जांभ्या दगडाच्या भूमीत अधिक स्वादिष्ट चविष्ट होताना हापूस होऊन गेला, तशीच क्षमता प्रत्येक पुस्तकाच्या सुप्तावस्थेतील अक्षरे व शब्दांमध्ये सामावलेली असते ना?

फ़्रेंच राज्यक्रांती होऊन आता शतकांचा कालावधी उलटून गेला आहे. पण त्यातल्या घटना, व्होल्टेअरचे वक्तव्य किंवा पुढल्या वैचारिक उलथापालथी लिहील्या व छापल्या गेल्या. विविध कालखंडातील लोकांपर्यंत जगभर पसरत गेल्या, म्हणून आज जग कुठल्या कुठे बदलून गेले आहे ना? चारशे वर्षापुर्वीच्या अशा घटनांनी अजूनही नव्या युगतील अनेक मागे पडलेल्या समाजांना स्फ़ुर्ती मिळू शकते. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या काळात किंवा तुकोबांनी त्यांच्या कालखंडात समाजातील ज्या विकृती होत्या, त्या धुवून काढण्यासाठी केलेले प्रयास, आज छापलेल्या स्थितीत उपलब्ध आहेत. म्हणून समाजाला सुसंस्कृत ठेवायला मदत होत असते. माणुस अखेरीस पशूच असतो. पण त्यातल्या पाशवी वृत्तीला लगाम लावण्याची किमया अशा शब्दांनी करून ठेवलेली आहे. त्या किमयागार शब्दांना एका पिढीनंतर दुसर्‍या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम ग्रंथांनी केलेले आहे. ते ग्रंथ नुसते छापून पडून राहिले असते, तर कोणी त्याच्या पुढल्या आवृत्ती काढल्या नसत्या, की वाचल्याही नसत्या. म्हणजे त्या थोर महापुरूषांनी जे काही मानव संस्कृतीसाठी योगदान करून ठेवलेले आहे, ते पुढल्या कित्येक पिढ्यांपर्यंत पोहोचते करण्याच्या दिंडीमध्ये सामान्य वाचक होऊन आपण सहभागी होतो. हे दुर्लक्षणीय योगदान नाही. चारपाचशे वर्षपुर्वीच्या आद्य वैज्ञानिकांनी आपले अनुभव, प्रयोग ग्रथीत करून ठेवले आणि पुढल्या पिढीतल्या चिकित्सक वाचकांनी अभ्यासले वाचले. म्हणून नवनवे संशोधन होत गेले, आधीच्या लिखाणाच्या वाचनातून पुढल्या पिढीतल्या संशोधनाचा पाया घातला गेला. वाचनाची हीच महत्ता आहे. ती असलेल्या स्थितीशील जीवनाला प्रवाहित करायला चालना देत असते. प्रेरणा देत असते. प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘वाचाल तर वाचाल’. त्याचा अर्थ किती आशयघन आहे, त्याची जाणिव इतक्या विवेचनातून येऊ शकेल.

मानव संस्कृतीच्या या वाटचालीत ग्रंथालये व वाचनालयांचे योगदानही महत्वाचे ठरलेले आहे. त्यांनी वर्तमानपत्र वा पुस्तक खरेदी शक्य नसलेल्यांना वाचनासाठी सामुदायिक सुविधा उभारून चालना दिलेली आहे. म्हणूनच ही ग्रंथालये वा वाचनालये अशा वाचनसंस्कृतीचे खरे प्रेरणास्रोत आहेत. जगातल्या खर्‍याखुर्‍या संपत्तीचे साठे अशा वाचनालयात ग्रंथालयात साठवून ठेवलेले आहेत. संसार आणि जगण्याच्या विवंचनेत फ़सलेल्या माणसाला, या विचारधनाकडे आणायचे काम ह्या संस्था करतात म्हणून वाचन संस्कृती टिकून राहिली आहे. ग्रंथालयाच्याही पलिकडे जाऊन आता लोक पुस्तक खरेदीत पुढे येऊ लागले आहेत. सुखवस्तू लोकांच्या घरातच्या एका भिंतीवर पुस्तकांचा कप्पा, कपाट दिसते, त्यामागची प्रेरणा वाचनालयातूनच आलेली असते. मुठभर का होईना पुस्तके घरात असावी, असे वाटणारी प्रवृत्ती वाढते आहे. नुसत्या अक्षरांनी, शब्दांनी व पुस्तकांनी जग किती आरपार बदलून टाकलेले आहे. धर्मकर्म यापुरते असलेले लिखीत शब्द आता हजारो विभिन्न विषयांसाठी वापरले जात असतात. नवनवे शब्द योजले जातात. जन्माला घातले जातात. कालपरत्वे त्याचे अर्थही बदलून घेतले जातात. हे सर्व वाचन संस्कृतीमुळे शक्य झालेले आहे ना? कार्ल मार्क्सचा ‘दास कॅपीटल’ हा जाडजुड ग्रंथ असो किंवा फ़ेसबुक नावाच्या सोशल मीडियाची ओळख झालेले एफ़ हे इंग्रजी मुळाक्षर असो, त्यांच्यात जग बदलण्याची किमया वाचणार्‍यांनी घडवून आणलेली आहे. वाचनाच्या प्रेरणेने घडवून आणलेली आहे. आता तर तंत्रज्ञान मेंदू व मनातले विचार वाचण्यापर्यंत झेप घ्यायला बघते आहे. कधीकाळी लिहीण्यापुरती अक्षरे शब्द मर्यादित राहिले असते आणि वाचले जाण्यापासून वंचित राहिले असते, तर आपण इथपर्यंत मजल मारू शकलो असतो का? कोणीतरी अक्षरे तयार केली आणि दुसर्‍याने कोणी तरी शब्दांचे पंख माणसाला दिले, तिथून भरारी घेतलेला माणूस वाचनातून किती उंच अवकाशात झेपावला ना? मग जन्मत:च सूर्यावर झेपावलेल्या पवनपुत्र हनुमानाची गोष्ट आठवते. वाचनप्रेरणेची गोष्ट तसूभर वेगळी नाही.

4 comments:

  1. भाउ तुमचा पण एक एक शब्द वाचनीय असतो.

    ReplyDelete
  2. मंदार करमरकरOctober 15, 2018 at 5:22 PM

    खूप दिवसांनी आवडीच्या विषयावर वाचायला मिळाले

    ReplyDelete
  3. "माणुस अखेरीस पशूच असतो. पण त्यातल्या पाशवी वृत्तीला लगाम लावण्याची किमया अशा शब्दांनी करून ठेवलेली आहे." फारच छान.👌

    ReplyDelete
  4. असच राजकारणा व्यतिरिक्त इतर विषयांवर प्रकाश टाकावा.

    ReplyDelete