जसजशा लोकसभेच्या निवडणूका जवळ येत चालल्या आहेत, तसतशी मोदी विरोधातली अपप्रचाराची मोहिम वेग घेत चालली आहे. एकदा तुम्ही अपप्रचाराचा आधार घेऊन लढायचे ठरवले, मग त्याला कसलाही धरबंद रहात नाही. किंबहूना अशी खोटेपणाची मोहिम आपल्यालाच अपायकारक ठरू शकेल वा अपाय करते आहे, याचेही भान उरत नाही. कारण सतत सत्याचा अपलाप केल्यावर लोक हळुहळू त्यातला खोटेपणा ओळखून तुमच्याकडे पाठ फ़िरवित असतात. उलट खोट्याच्या नादी लागलेलाच आपल्या खोट्यावर अधिकाधिक विसंबून राहू लागतो. त्याचीच त्या खोटेपणाने फ़सगत होऊ शकते. पण त्याला कुठे अशा अपायाची पर्वा असते? आजकाल अनेकांना देशात आणिबाणी असल्याचे साक्षात्कार होऊ लागलेले आहेत आणि त्या भयंकर आणिबाणीची रसभरीत वर्णने जोरात चालू असतात. त्यावरच वाहिन्या चर्चा करतात. कोणी लांबलचक अग्रलेखही लिहीत असतात. यातली गंमत अशी, की त्यांना आणिबाणी म्हणजे काय वा ती जेव्हा देशात लागली होती, तेव्हा नेमके काय घडले होते, त्याचाही पत्ता नसतो. त्यांनी आणिबाणीच्या भाकडकथा ऐकलेल्या असतात आणि मग त्यालाच आपले तिखटमीठ लावून ह्या चर्चा चाललेल्या असतात. म्हणून सामान्य माणसाचा त्यावर विश्वास बसेल, असा या चर्चेकर्यांचा दृढ विश्वास असतो. पण सामान्य माणूस तितका दुधखुळा नसतो की बावळट नसतो. त्याच्याही मनात असल्या खोट्या काल्पनिक आणिबाणीविषयी कुतुहल निर्माण होते. तोही आणिबाणीचा शोध घेऊ लागतो. तिचे दुष्परिणाम शोधू लागतो आणि मग पु. ल. देशपांडे यांच्या एका गाजलेल्या कथेतील दोन लहान भावंडांतील धाकट्याचे शब्द आठवतात. थोरला धाकट्याच्या बालबुद्धीवर विपरीत परिणाम होऊ नयेत, म्हणून रंगवून त्याला काही समजावत असतो आणि धाकटा त्याला निरागसपणे विचारतो, दारू म्हणजे काय रे भाऊ?
ही मजेशीर कथा आजच्या पुरोगामी बुद्धीवादाचा भक्कम पाया झालेली आहे. दारूचे वर्णन थोरला भाऊ अतिशय सोज्वळ शब्दात करीत असतो आणि ते लाल रंगाचे पेय वगैरे असते इत्यादी. अखेरीस तो धाकटा त्याला मख्ख चेहर्याने विचारतो, बाबा कपाटातली बाटली काढून संध्याकाळी ज्याचे घुटके घेतात तीच नारे दारू? मग काय, त्या थोरल्या बुद्धीमान भावाचा चेहरा बघण्यालायक होतो. आपल्याच घरात बाप नित्यनेमाने दारूचे प्राशन करीत असतो आणि शालेय शिक्षणाचा भाग म्हणून थोरला भाऊ धाकट्याल दारूचे दुष्परिणाम समजावत असतो. मग स्थिती कशी हास्यास्पद होते, त्यावर ते कथानक रचलेले आहे. गेल्या एकदिड वर्षात भारतामध्ये अघोषित आणिबाणीच्या रसभरीत कहाण्या सांगितल्या जात आहेत, त्या ऐकल्यावर पुलंच्या त्या कथेतील भावंडे कोणालाही आठवतील. कारण घोषित असो वा अघोषित आणिबाणी म्हणून जो राक्षस असतो, त्याचे चटके लोकांना बसतात, तेव्हा ते कोणी ओरडून सांगावे लागत नसतात. ते चटके बसणारा शांत बसू शकत नाही. १९७० च्या दशकात देशाने त्याचा अनुभव घेतला आहे आणि त्याची किंमत नंतर इंदिराजींना मोजावीही लागलेली आहे. पण सगळा विषय तिथे येऊन संपत नाही. आणिबाणीला लोकांनी एकदिलाने व अपुर्व एकजुटीने झिडकारलेले होते. इंदिराजींसारख्या लोकप्रिय नेत्यालाही तिच्या मतदारसंघात पराभूत करून लोकांनी आणिबाणी संपवलेली होती. पण कथा तिथे संपली नव्हती, की संपतही नाही. त्यानंतर जे काही झाले, त्या अनुभवाने शिकलेल्या सामान्य माणसाने आणिबाणी लादून देशालाच तुरूंग बनवणार्या इंदिराजींना अफ़ाट बहूमत देऊन, अडीच वर्षात पुन्हा सत्तेत आणून बसवले होते. कारण त्या आणिबाणीपेक्षाही भयंकर अशा लोकशाहीचे विकृत रुप इंदिरा विरोधकांनी देशाला सादर केले होते आणि लोकांना त्यापेक्षा आणिबाणी चांगली वाटू लागली होती.
१९७४ सालात देशामध्ये लोकशाहीचा अतिरेक झालेला होता. इंदिराजींपाशी प्रचंड बहूमत लोकसभा व राज्यसभेत होते. पण विरोधी पक्षांनी त्यांना सरकार चालवू द्यायचे नाही, असा चंग बांधला होता. अर्थात इंदिराजी फ़ार समन्वयवादी वगैरे नव्हत्या. त्यांनी आपल्या परीने अनेक राजकीय उचापती केलेल्या होत्या आणि लोकशाहीला शोभू नयेत, असा राज्यघटनेचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम केलेले होते. त्यांना विरोध करायला जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या तपस्वी व्यक्तीला मैदानात उतरावे लागलेले होते. दिल्लीच्या एका प्रचंड जाहिरसभेत जयप्रकाशांनी थेट पोलिस व लष्कराला इंदिरा सरकारचे आदेश झुगारण्याचा सल्ला दिला. त्यालाच अराजक असे ठरवून इंदिराजींनी आणिबाणी घोषित केली होती. त्याला अर्थात एक राजकीय पदर होता. अलाहाबाद हायकोर्टाने इंदिराजींची रायबरेलीतून झालेली लोकसभेवरची निवड रद्दबातल केली होती आणि त्यानंतर हा घटनाक्रम वेगाने दौडू लागला होता. त्याला लोकांचा काहीसा प्रतिसादही मिळू लागला होता. त्यामुळे विचलीत झालेल्या इंदिरा गांधी यांनी आपली सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी देशात आणिबाणी लावलेली होती. त्याच्या विरोधात अवाक्षर बोलणार्याला राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून विरोधी नेत्यांची रवानगी गजाआड केलेली होती. कुठल्याही आरोपपत्र, खटला वा सुनावणीशिवाय हजारो लोकांना तुरूंगात डांबले होते. वर्तमानपत्राची गळचेपी केली होती आणि सरकार वा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एक शब्द लिहीण्याची कोणाची बिशाद नव्हती. तसा नुसता वास आला वा शंका आली, तरी त्या कृतीवर बंदी घालून संबंधिताला तुरूंगात डांबले जात होते. आणिबाणी त्याला म्हणतात. आज जिभा लांब करून बोलणार्यांना त्याचा लवलेशही अनुभवता आलेला नाही. किंवा ठाऊक असूनही ही मंडळी धडधडीत खोटे बोलत असतात. तेव्हासारखी आज परिस्थिती नाही, की सरकारने तशी कुठलीही गळचेपी केलेली नाही.
तो काळ असा होता, की जगात घडणार्या कुठल्याही घटना वा प्रसंगाची खरीखुरी माहिती वर्तमानपत्रे देत नव्हती. टिकेची गोष्ट तर सोडूनच द्या. सहाजिकच गावगप्पा व अफ़वातून लोकांपर्यंत जे काही यायचे, त्यावर लोकांचा अधिक विश्वास बसत होता. आकाशवाणीच्या वा वर्तमानपत्रातल्या बातम्या इतका माहिती मिळण्याचा मार्ग होता आणि तोही इंदिराजींच्या आणिबाणीने बंद करून टाकला होता. सहाजिकच अफ़वांना वजन आलेले होते आणि त्यामुळेच नंतर इंदिराजींचा दारूण पराभव झाला. अन्यथा इतका मोठा पराभव तेव्हाही इंदिराजींच्या वाट्याला आला नसता. मात्र विरोधी पक्ष वा संघटना चळवळी करणार्यांना त्या आणिबाणीचा मोठा फ़टका बसला होता. त्यांचे सगळे उद्योगच बंद होऊन गेले होते. कोणी संप करू शकत नव्हत. सेमिनार मेळावे, सभा निदर्शने अशा सर्व उचापतींना बंदी लागलेली होती. विरोधी पक्षाने काहीही करायला मोकळीक नव्हती. त्याला आणिबाणी म्हणतात. आज तसा कुठे मागमूस दिसतो काय? सत्ताधारी भाजपाच्या विरोधात काही बोलायला लिहायला प्रतिबंध लागू आहे काय? मोदी वा सत्तेतील कुणाच्या विरोधात मतप्रदर्शनाची गळचेपी झालेली आहे काय? निदर्शने मेळावे आंदोलने यांना कोणी रोखले आहे काय? काश्मिर असो वा नक्षली कृत्ये असोत, राजरोस चालू आहेत ना? नेह्मीच्या कायद्यांनी त्यांचा सामना सरकार करते आहे ना? ज्याप्रकारे सरकारी यंत्रणा आज विरोधकांना वागवते आहे, त्यापेक्षा आधीचे युपीए सरकार चांगली कुठली वागणूक तेव्हाच्या विरोधकांना देत होती? मोदींच्या विरोधात जितके बेछूट आरोप राहुल गांधी वा अन्य कोणी करत असतात, त्याचा एक टक्का तरी आणिबाणीच्या काळात कोणी इंदिराजींच्या विरोधात करू धजला होता काय? असेल तर जरूर आजच्या शंकासूरांनी त्याचे दाखले सादर करावेत आणि मोदींच्या नावाने शंख करावा.
अर्थात तसे कोणीही काहीही सांगू शकत नाही की पुरावा देऊ शकत नाही. म्हणून मग आणिबाणी अघोषित असल्याचे तावातावाने सांगितले जात असते. कारण जे काही अघोषित असते, ते अगोचर सुद्धा असते ना? कुणाला भूत दिसत असते आणि नरेंद्र दाभोळकर व त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याला भ्रम म्हणतात, ते सत्य असेल तर आजची अघोषित आणिबाणी, ही आरोपकर्त्यांना झालेली भूतबाधा असू शकते. कारण यात आरोपकर्त्यांमध्ये बहुतांश दाभोळकर भक्तांचा समावेश आहे. कुठल्याही बुवाभगताकडे तशा अगोचर गोष्टींच्या अस्तित्वाचे नित्यनेमाने पुरावे मागणार्यांनी, मग आणिबाणीचा पुरावा द्यायला नको काय? ती अघोषित आहे, म्हणजे काय? तर तिची घोषणा सरकारने केलेली नाही. ठिक आहे, भूतदेखील कुठली घोषणा करून दर्शन देत नाही. पण ज्याला दिसते त्याला ते दिसत असते आणि इतरांना ते दाखवता येत नसते. म्हणून तो भ्रम असेल, तर आजच्या आणीबाणीचे भूतही तसाच प्रकार नाही काय? कारण आणिबाणी घोषित असो वा अघोषित असो, त्याचे दुष्परिणाम समोर असले पाहिजेत. ते परिणाम वा दुष्परिणाम कुठले आहेत? विरोधकांना त्याचा पुरावा दाखला देता आला पाहिजे. आणिबाणीत रेडीओ किंवा अन्य माध्यमात सरकार विरोधी सुर लावता येत नव्हता आणि आजकाल बहुतेक वर्तमानपत्रे बारीकसारीक बाबतीत सरकारची साले सोलत असतात. मग अशा मुक्त स्वातंत्र्याला आणीबाणी म्हणतात काय? एका वर्तमानपत्र वा वाहिनीने तसा कुठला पुरावा द्यावा. रोजच्या रोज अनेक पत्रकार वाहिन्यावर बोलताना वा लेखातून अशा आणिबाणीची ग्वाही देत असतात. पण पुरावा शुन्य आहे. कारण जे सत्य नसते त्याचा पुरावाच नसतो. म्हणून मग नुसते बोलत रहायचे, हळुहळू जे नाही ते भासमान होत जाते. ज्यांना देव किंवा भूत बघायची आस लागलेली असते, त्यांना तसे दिसू लागतेच ना?
कुठल्याही देवळात गेलात तर भक्तीभावाने व श्रद्धेने तिथे दगडाच्या मुर्तीसमोर मस्तक टेकणारे असतातच. तुम्ही नास्तिक असाल, तर तिथे तुम्हाला दगड दिसतो. पण भक्तीभावाने माथा टेकणार्याला तिथे इश्वर भेटत असतो. इथेही गोष्ट वेगळी नाही. आणिबाणीचे निस्सीम भक्त आहेत त्यांना स्वातंत्र्यातही पारतंत्र्य व आणिबाणी दिसू शकते आणि तिचा भ्रामक दुष्परिणामही अनुभवास येत असतो. येण्याला पर्यायही नसतो. कारण भ्रमिष्टावस्थेत मनाला जे बघायचे असते, तेच डोळेही बघू शकत असतात. मग ज्याला लोकशाही व स्वातंत्र्यातही आणिबाणीची हुकूमशाही बघायची असते, त्याला ती तशी दिसणारच. पण तिचा पुरावा तो देऊ शकत नसतो. कारण पुरावा नसतो आणि तशी वस्तुस्थितीही नसते. तो सगळा युक्तीवादातून उभा केलेला आभास असतो. पण असे लोकच कुणा प्रबळ सत्ताधार्याला हुकूमशाहीच्या मार्गाने जायला उद्युक्त करीत असतात. किंबहूना अशा लोकांच्या अराजकी वागण्याला कंटाळलेली जनताही मग कोणा हुकूमशहाने अवतार घेऊन, अशा भंपक लोकशाहीवादी लोकांचा निचरा करावा म्हणून पर्याय शोधू लागत असतात. भारताच्या पश्चीमेस आशिया युरोपच्या खिंडीत तुर्कस्थान नावाचा देश आहे. तिथे अशाच लोकांनी इतका उच्छाद मांडला, की जनतेला सत्तेत असलेल्या आक्रमक नेत्याने या लोकशाही नामक अराजकाचा बंदोबस्त करावा असे वाटू लागले. एर्दोगन नावाच्या त्या सत्ताधीशाने आपल्या देशातील असल्या लोकशाही अतिरेकाच्या विरोधात जनतेचा कौल मागितला आणि मध्यावधी निवडणूका घेतल्या. तिथल्या जनतेने त्याला भरभरून मतदान केले आणि आज तिथे एर्दोगन या लोकशाहीने निवडलेल्या हुकूमशहाला निरंकुश अधिकार मिळालेले आहेत. त्याला संसद वा न्यालायलाहाही जुमानण्याची गरज उरलेली नाही. ही स्थिती तिथे लोकशाहीवाद्यांच्या अतिरेकी वागणूकीतून आलेली आहे.
लोकशाही वा वैचारीक स्वातंत्र्य आणि त्या माध्यमातून सत्ताधारी वर्गाला आव्हान देण्याची मोकळीक, ह्याला लोकशाही म्हणतात ना? ते स्वातंत्र्य उपभोगतानाही सत्ताच तुमचे संरक्षण करीत असते. त्या सत्तेपाशी जी लष्कर पोलिस वा प्रशासन नावाची यंत्रणा असते, तिचे बळच लोकशाहीचे रक्षण करीत असते. तिच्यावर हल्ले चढवून तिचेच खच्चीकरण करण्यासाठी जेव्हा लोकशाहीने दिलेले स्वातंत्र्य वापरले जाते, तेव्हा अराजकाची परिस्थिती निर्माण होत असते. नागरी प्रशासन व सत्ता अखेरीस लष्कर व पोलिसी बंदुकीच्या धाकामुळेच सत्ता मानली जात असते. नाहीतर कोणी भुरटा भामटा मवालीही शस्त्र उगारून कोणाच्याही मुसक्या बांधू शकतो. त्याला कायद्याने रोखण्यासाठी जी सशस्त्र यंत्रणा सत्तेच्या हाती असते, ती म्हणून सामान्य जनतेला आश्वासक वाटत असते. मग ती लोकशाही व्यवस्था असो वा हुकूमशाही असो. आपल्याला सुखरूप सुरक्षित जगता यावे, इतकीच सामान्य लोकांची अपेक्षा असते. शंभर गुंडांच्या हाणामारीत चिरडून जाण्यापेक्षा एका समर्थ गुंडाच्या आश्रयाला लोक जगतात, त्याला सरकार म्हणतात. ते सरकार जितके सभ्य असते, त्याला लोकशाही म्हणतात. सामान्य जनतेला काही अधिकार देऊन तिच्यावर सरकार देखील अन्याय करू शकणार नाही, अशी हमी असते त्याला लोकशाही म्हणतात. ते़च अधिकार वापरून जेव्हा शासकीय अधिकारावर कुरघोडी चालू होते, तेव्हा अराजकाची स्थिती निर्माण होते आणि त्यालाच आणिबाणीची परिस्थिती ठरवण्याची तरतुद कुठल्याही राज्यघटनेत केलेली असते. कदाचित कोणी सत्ताधीश त्याला गैरवापर करतो, कधी तसे होत नाही. पण अघोषित आणिबाणी असा काही प्रकार अस्तित्वात नसतो. तो मुठभर वैचारिक अतिरेक्यांचा भ्रम असतो. सुदैवाने कुठल्याही देशाची जनता पुर्णपणे विचारवंतांची नसते. म्हणून कित्येक शतके, पिढ्यानुपिढ्या देश टिकून राहिले आहेत. तिथल्या शासन व्यवस्था चालल्या आहेत. अर्थात प्रत्येक देशात समाजात अशा बुद्धीमंत भ्रमिष्टांचीही किरकोळ संख्या असतेच. पण सामान्य लोक ठराविक अनुभवानंतर त्यांच्याकडे काणाडोळा करू लागतात. म्हणून मानवसमाज टिकून राहिला आहे. संस्कृती उदयास येतात व अस्तंगतही होत असतात.