Thursday, June 28, 2018

भावनाविकारांचा जीवघेणा खेळ

mahad poison tragedy के लिए इमेज परिणाम

मुंबई नजिकच्या महड या परिसरात एका कुटुंबाने नव्या घराच्या वास्तुशांतीसाठी जो समारंभ योजलेला होता, त्यात ८०-९० लोकांना विषबाधा झाली आणि त्यातले पाचजण मृत्यूमुखी पडले. अशा घटना अनेकदा घडत असतात आणि त्यात कुठेतरी खाद्यपदार्थामध्ये चुकीचे काही पडल्याने वा निष्काळजीपणाने पदार्थ बनवला गेल्याने विषबाधा होत असते. कुठल्या मंदिराच्या प्रसादात किंवा सार्वजनिक समारंभातही अशा घटना घडलेल्या आहेत. पण इथे रायगड जिल्ह्यातील ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे. कारण घरच्या सुनेनेच अशा रितीने आपल्या आमंत्रित आप्तस्वकीयांना यमाकडे धाडण्यासाठी हा विषप्रयोग केला आहे. तो अपघात नव्हता, तसेच ते योजनाबद्ध कारस्थानही नव्हते. तर योगायोगाने राग व्यक्त करण्याची संधी चालून आली आणि या सुनेने इतका मोठा घातपात करून टाकला. आनंदासाठी जमलेल्या गोतावळ्याला मरणाच्या दारी पाठवूनच तिला शांती मिळाली. कारण तपास सुरू झाल्यावर गुन्हेगार सापडायला फ़ार अवधी लागला नाही आणि जेव्हा तो पकडला गेला, तेव्हाही त्याने फ़ारसे आढेवेढे न घेता, गुन्ह्याची कबुली देऊन टाकली. आपल्या या अमानुष कृत्याची कबुली देताना त्या सुनेने दिलेले कारण थक्क करून सोडणारे आहे. तिचा रंग सावळा व घरकामात ती काहीशी अपुरी पडत असल्याने कुटुंबातच होणारी अवहेलना असह्य झाली, म्हणून तिने असे अमानुष पाऊल उचलले होते. सासुरवास हा शब्द आपल्याकडे बोलीभाषेतच प्रचलीत आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण अनुभवत असतो. पण त्याची अशी परिणती कधी आपल्याला अपेक्षित नसते. जेव्हा ती असे रौद्ररूप धारण करून आपल्या भेटीला येते, तेव्हा मनाचा थरकाप उडून जातो. कारण असल्या घटना कथा कादंबर्‍या वा चित्रपट मालिकांच्या पलिकडे फ़क्त बातमीत असतात. आपल्या आयुष्यात नसतात अशा समजावर आपण जगत असतो.

ज्या प्रकारचा सासुरवास ह्या महिलेच्या वाट्याला आलेला होता, तो आपल्यासाठी नवा नाही. आपल्याच आसपास, परिसरात अशा गोष्टी आपण नित्यनेमाने घडताना बघत असतो आणि मनातल्या मनात हळहळ व्यक्त करून विसरून जात असतो. घरोघर चालणार्‍या सासबहूच्या मालिका बघून आपले मनोरंजन होत असते. त्यामुळे अशा गोष्टी बघून दुर्लक्षित कराव्यात, ही सवय आता आपल्या अंगवळणी पडलेली आहे. अगदी ज्या घरातल्या सुनेने हे कृत्य केलेले आहे, तिच्याही घरात या मालिका बघितल्या जात असणार, याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. पण अशा मालिका, बातम्या वा कथानके सामान्य माणसाच्या मनावर कोणते परिणाम घडवतात, त्याचा कधीही विचार होत नाही. कलास्वातंत्र्य अविष्कार स्वातंत्र्य असल्या शब्दांनी त्या वास्तवाची मुस्कटदाबी होत असते. ठराविक गोष्टी कितीही वास्तव असल्या, तरी बालकांना वा संस्कारक्षम मुलांना दाखवू नयेत, दिसू नयेत याची काळजी घेतली जाण्याला आजकाल मुर्खपणा समजले जाते. वरकरणी त्यातला धोका लक्षात येत नाही. पण म्हणून धोका संपत नाही. कुठल्या गावात पोर्नोग्राफ़ी बघून एका शाळकरी मुलाने आपल्याच बहिणीवर बलात्कार केला वा पिताच कन्येचे लैंगिक शोषण करतो, ह्या बातम्या खर्‍या असल्या तरी त्या कोणापर्यंत पोहोचाव्या, याचे तारतम्य राखायला नको काय? त्यातली विकृती वा अमानुषता ज्याला समजू शकत नाही, त्याच्यासाठी अशा बातम्या कथानके चालना असू शकतात. त्याचा तात्काळ परिणाम दिसणार नाही. पण सतत अशा बातम्या वा कथानके बघून माणसाचे संवेदनाशील मन बधीर होत जाते. त्या कृत्याचा संताप, प्रक्षोभ होण्याची धार संपून जात असते. त्यातून मग आपल्याच परिसरात वा घरात त्या घटनांचा उदभव शक्य होत असतो. या महिलेला असल्या कृत्यासाठी कोणी कल्पना दिलेली असेल?

अनेक कथानके व मालिकांमधून ह्या घटना दाखवल्या जात असतात. त्यात अन्य वेळी शांत सुस्वभावी असलेली व्यक्ती क्षणार्धात भावनांच्या आहारी जाऊन बेताल कृत्य करून बसते. ते बघून बघून आपल्यालाही तसल्या कल्पनांचे आकर्षण वाटू लागते. प्रामुख्याने अशा कृती सहजगत्या होऊन जातात. त्याक्षणी परिणामांची कोणाला पर्वा असते? आपल्या समोर जी परिस्थिती व प्रसंग आहे, त्यावर कुठलाही उपाय सुचत नसेल, तेव्हा माणसाचे हळवे मन या सोप्या पण घातक उपायांकडे आपोआप ओढले जात असते. याही महिलेने काय वेगळे केलेले आहे? वास्तुशांतीचा समारंभ होता आणि तिला हिणवणारे वा चिडवणारे एकाच भांड्यात बनलेले पदार्थ विश्वासाने मिटक्या मारत खाणार होते. त्यातल्या प्रत्येकाविषयी तिच्या मनात तीव्र राग दाटलेला होता. पण त्या प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर देणे वा त्यांच्याशी दोन हात करणे तिला शक्य नव्हते. पण धडा तर सर्वांना शिकवायचा होता. त्यासाठीची इच्छा तिच्या मनात कित्येक दिवसांपासून उसळ्या मारत राहिलेली असणार. पण त्यासाठी सुयोग्य संधी तिला मिळत नव्हती. म्हणजेच तिच्या मनातले श्वापद दबा धरून बसलेले होते. शिकारी श्वापद नेहमी दबा धरून बसते आणि सावज टप्प्यात येईपर्यंत कुणाला त्याचा सुगावा लागू देत नाही. जेव्हा तशी संधी मिळते तेव्हा अशी झडप घालते, की त्यातून शिकार सुटूच शकत नाही. इथे मुद्दा असा आहे, की त्या महिलेच्या मनात हे श्वापद निर्माण कोणी केले? घरातली सुन म्हणजे ती आपले सगेसोयरे सोडून तुमच्या घरात आलेली असते आणि तुम्ही सगळे एका बाजूला तर ती दुसर्‍या बाजूला अनोळखी विश्वात एकाकी असते. तिला आपल्यात मिसळून घेण्याची जबाबदारी तुमची असते आणि ती दिर्घकाळ अंग चोरून तुमच्यातली एक होण्याची धडपड करीत असते. हा अंगचोरलेपणा वा परकेपणा हेच सुक्ष्म श्वापद वा जनावर असते.

सासुसुनेच्या ज्या अतिरंजित गोष्टी सांगितल्या वा दाखवल्या जातात, त्याचा सासूवर परिणाम होतो, तसाच सुनेच्याही मनावर होत असतो. घरातल्या इतरांवरही त्याचा काही परिणाम होत असतो. मुळातल्या आपल्या भावना विसरून अशा कथा बातम्यांचा प्रभाव मनावर जितका होत जाईल, तितकी मग त्याच जीवनातल्या गुंतागुंतीची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न परस्पर सुरू होतो. ज्याच्या मनात हा खेळ चालू असतो, त्यालाही त्याच्याच मनाचा थांग लागलेला नसतो. कारण हे मनोविकारांचे श्वापद मनात आत कुठेतरी खोल दबा धरून बसलेले असते आणि योग्य संधीची प्रतिक्षा करीत असते. म्हणूनच अशा घटना घडल्यावर संबंधिताला पकडून शिक्षा देण्यापुरता त्यातला उपाय मर्यादित नसतो. कारण त्याला शिक्षा दिल्याने अशा घटना व्हायच्या थांबत नाहीत, किंवा त्यात बळी पडलेल्यांना पुर्ववत जीवंतही करता येत नाही. जे नुकसान झाले त्याची कुठलीही भरपाई नसते. म्ह्णूनच असे गुन्हे वा घटना मुळातच घडू नयेत, यासाठी प्रयत्नशील रहाण्याला प्राधान्य असायला हवे. त्यातला पहिला टप्पा म्हणजे माणसाने कुणाही दुसर्‍याला अपमानित करणे वा त्याच्या भावनांची अवहेलना करून मानसिक इजा करणे टाळले पाहिजे. या सुनेमध्ये अनेक दोष असतील वा त्रुटीही असतील. पण त्यासाठी सतत तिला हिणवणे वा डिवचणे अनावश्यक नव्हते काय? तिच्यातल्या त्रुटी वा दुर्गुणांसाठी परिवारातील इतक्या लोकांना विषबाधा होणे वा पाचजणांनी जीवाला मुकणे, ही किंमत परवडणारी आहे काय? तिलाही यातून काही मिळालेले नाही आणि डिवचणार्‍यांना मोजावी लागलेली किंमत अफ़ाट आहे. मग उपाय तशी परिस्थिती यायचे टाळणे इतकाच असू शकतो. आपण कमीअधिक गुणांची वा त्रुटींनी भरलेली सगळी माणसे एकाच मुशीतली आहोत आणि या जगात प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा जन्मदत्त अधिकार आहे, हे लक्षात घेतले तरी खुप काही शक्य आहे.

एकमेकांचा सन्मानही बाजूला ठेवा. एकमेकांशी असे वागावे की कुणाला दुखावलेले श्वापद होण्याची वेळ आणू नये. दिसायला प्रत्येक प्राणी दुबळा वा अशक्त असेलही. पण म्हणून प्रत्येक प्रसंगी तो दुबळा असतो असे अजिबात नाही. ठराविक प्रसंगी तुम्ही संकटात असाल तेव्हा तो दुबळाही तुमच्यापेक्षा सबळ असतो. काही क्षण गाफ़िल राहिलात, तर शिकारीही शिकार होऊ शकतो. हा सभ्य समाजाचा नियम कायदा नसला तरी सजीवसृष्टीच्या नियम आहे. म्हणूनच सबळ असो किंवा दुर्बळ असो, प्रत्येकात श्वापद असते आणि रागलोभातून त्याचे जनावर जागे होत असते. ज्यांच्या घरी ती सुन आपले उर्वरीत आयुष्य जगायला आलेली होती, त्यांनाच इहलोकातून परलोकी धाडण्याची तिची मुळातली मानसिकता असू शकत नाही ना? पण तुम्ही तिला आपल्यात सामावून घेणार नसाल, तर आधीचे घर कुटुंब संपलेले असते आणि तुमच्यात नवे जग शोधणारीचे तेच जग तुम्ही नरक करून टाकत असता. मग तिचे नवे जग उध्वस्त झालेले असते. ते आधी कल्पनेत उध्वस्त होते व नंतर तिला ते वास्तवात उध्वस्त झालेले बघायची अतीव इच्छा अशा प्रसंगांना आमंत्रण देत असते. आजच्या जगात जगताना आपण इतक्या व्यवधान व तणावांनी व्यापलेले असतो, की भावनांच्या व रागलोभांच्या कडेलोटावर प्रत्येकजण उभा असतो. किंचीतसा धक्काही कड्यावरून कोसळण्यासाठी पुरेसा असतो. इतरवेळी तो धक्का धोक्याचा नसला तरी कडेलोटावर भयंकर असतो. सेल्फ़ी घेताना मरणार्‍यांना इवली झुळूक वा घसरलेला पाय पुरेसा असतो, तशीच ही मनोवस्था असते. आता त्या सुनेला अटक झाली आणि तिने गुन्हा कबुल केल्याने भविष्यातले असे प्रसंग वा मृत्यू निकालात निघालेले नाहीत. म्हणूनच तिला शिक्षा होण्यापेक्षाही आज घराघरात असले प्रक्षोभाचे प्रसंग येत असतील, तर त्यापासून आपल्या कुटुंबाला मुक्त करणे, ही सर्वाधिक आवश्यक सामाजिक बाब आहे.

7 comments:

  1. हे सगळे विचार करायला लावणारे आहे. मुळात जी सासू हे सगळे करते ती सुद्धा दुसर्‍या घरातून आलेली अस्ते. स्त्री चि दुखणी स्त्री जाणू शकत नाही हेच दुर्दैव आहे.

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    आज कुटुंब ही सर्वात दुर्लक्षित वस्तू आहे. खरंतर आपल्याला या जगाची ओळख कुटुंबातनंच होत असते. आपली पहिली सांघिक अनुभूती कुटुंबाचीच असते. दिसणारी पहिली माणसं कुटुंबाचीच असतात. पुढं मोठं झाल्यावर आपल्याला येणारे अनुभव आपण कुटुंबाच्या साच्यात बसवून बघायला शिकतो. आज हे कुटुंब्च्म प्रातिनिधिक चित्रं माध्यमांतून विशेषत: दूरचित्रवाणीतून पोखरलं जातंय. जितकं विकृत कुटुंब दाखवलं जाईल तितकं ते पुरोगामी ठरतंय. अशा बिघडलेल्या ( = defunct ) कुटुंबातनं जनावरं उत्पन्न होतात. दिसायला देह माणसाचा पण वृत्तीनं पशू निपजतो.

    कौटुंबिक मूल्यांना कसर लावणारे कार्यक्रम बंद केले पाहिजेत. कुणाचंतरी कसलंतरी अभिव्यक्तीस्वातंत्र्य जाउद्या खड्ड्यात.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. सत्य बातमी कमी आणि बाकीचे उपदेश आणि भारुड जास्त ����

    ReplyDelete
  4. मांडलेले विचार खरोखर चिंतनीय.

    ReplyDelete
  5. फार सुंदर विश्लेषण

    ReplyDelete