Saturday, June 16, 2018

जातीअंत झाला जातीवंत

संबंधित इमेज

या वर्षाच्या आरंभी पुण्यात एल्गार परिषद म्हणून जो चिथावणीखोर तमाशा साजरा करण्यात आला, त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी बंदचे आवाहन केलेले होते. नंतर जी जाळपोळ झाली, तेव्हाही त्यांनी आपलीच पाठ थोपटून घेत संभाजी भिडे व एकबोटे अशा हिंदूत्ववादी नेत्यांना अटक करण्याचा आग्रह धरला होता. त्यातून त्यांनी जो संदेश दिला वा सिग्नल तळागाळापर्यंत पोहोचवला, त्याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत. अशा घटना वा त्याचे दृष्य़ परिणाम विचारवंत किंवा शहाण्यांसाठी भले वैचारिक असतील. पण सामान्य समाजाच्या आयुष्यात असे परिणाम भीषण असतात. त्यातून जो जातीय विद्वेष पसरवला जात असतो, त्याचे परिणाम चर्चा रंगवणार्‍यांना भोगावे लागत नसतात. तर समाजाच्या विविध थरात मिळून मिसळून जगणार्‍या विविध जातीजमातीच्या सामान्य लोकांना भोगावे लागत असतात. त्या समाजात जी सौहार्दता नांदत असते, तिला असल्या आक्रस्ताळी भाषणांनी व वक्तव्यांनी चुड लावली जात असते. त्याच्या झळा सुरक्षित जागी वास्तव्य केलेल्या प्रकाश आंबेडकर वा अन्य विचारवंतांपर्यंत येत नाही. ती झळ गाववस्त्या पाड्यांवर गल्लीबोळात येत असते. कारण मुठभरांसाठी ती वैचारीक चळवळ असते. पण समाजात मिसळून गेलेल्यांसाठी ती दुहीची विसंवादाची सुरूवात असते. तिचे पर्यवसान मग लहानसहान भांडणांनी उग्र स्वरूप धारण करण्यात होते. कारण अशा वैचारीक मेळावे परिषदातून जे विष उगाळले जात असते, ते जखमांवरची खपली काढणारे असते. त्यातून मग विविध समाजघटक एकमेकांकडे संशयाने बघू लागतात आणि त्यांना मनातले विष ओकण्याचे निमीत्त व संधी हवी असते. ती मिळते तेव्हा मुंबईसारख्या शहरात जाळपोळ होते आणि खेड्यापाड्यात जळगावसारख्या घटना घडतात. त्याची जबाबदारी सरकार नव्हेतर एल्गार परिषदेवर येत असते. कारण भडक शब्दांनी त्यांनीच सामाजिक सौहार्दाला चूड लावलेली असते.

जळगावची घटना घडल्यानंतर तात्काळ तिचा गाजावाजा सुरू झाला. या सगळ्या गोष्टीचा रोख हिंदू समाजातील उच्चभ्रू व ब्राह्मण समाजाकडे असतो. पण आजच्या जमान्यात हिंदू समाजाचे नेतृत्व किंवा अगदी धार्मिक नेतॄत्वही ब्राह्मणांकडे राहिलेले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात इतर अनेक लहानसहान जातीजमाती नेतृत्व करायला पुढे आलेल्या असून, ओबीसी मानल्या गेलेल्या जातीचा पंतप्रधान आज देशाचा सत्ताधीश आहे. दलित मानल्या जाणार्‍या समाजाचा नेता राष्ट्रपती म्हणून बसला आहे. अशावेळी कालबाह्य झालेला मनुस्मृती वा धार्मिक विषयांचे हवाले देऊन हिंदूत्वावर हल्ले चढवले जातात, तेव्हा दुखावला जाणारा वर्गही कल्पनेतला ब्राह्मण नसून, तो इतर जातीजमातीचा हिंदू आहे. मध्यम जाती व वंचित जातीही अनेक गटातटात विभागल्या गेलेल्या आहेत. सहाजिकच जेव्हा तीव्रतेने हिंदूत्वावर हल्ले होतात, त्याचे उत्तर द्यायलाही तशाच जाती पुढे येतात. जळगाव हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. मातंग या दलित जातीच्या मुलांना विहीरीत उतरल्याने मारहाण झाली व गावातून त्यांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्यातील आरोपींचे नाव जोशी असल्याने तात्काळ पुरोगामी माध्यमांणी त्याचा गहजब केला. पण लौकरच यातल्या आरोपीचे नाव जोशी असले तरी ते भटक्या विमुक्त समाजाचे असल्याचे निष्पन्न झाले. थोडक्यात आधुनिक पुरोगामीत्वानुसार जे कोणी दलित पिडित वा वंचित म्हणून नोंदले जातात, त्यापैकीच दोन वर्गातील हा संघर्ष वा घटनाक्रम होता. मुद्दा जातीय नसून सबळ व दुर्बळातला असतो. अन्याय अत्याचार जातीनिहाय होत नसतो, तर दुर्बळ अन्यायाचा नेहमीच बळी असतो. त्याला जात चिकटवणे हे विषय सोपा करायला उपयुक्त असले तरी दिशाभूल होण्याला चालना देणारे असते. एकूणच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची दिशा त्यात भरकटून जाते.

मायावती वा प्रकाश आंबेडकर अशा लोकांनी मनुवाद नावाचे थोतांड उभे करून ही दिशाभूल केलेली आहे. आज समाजाच्या किती लोकसंख्येत कोण मनुस्मृतीचे अनुकरण करून जगत असतो? नसेल तर त्याचा नुसता गाजावाजा करून काय निष्पन्न होऊ शकते? एक गोष्ट नक्की आहे, बळी असल्याचे कारण सहानुभूती मिळवण्यास उपयोगी असते. मात्र अशा नाटकाने सुखवस्तु दलित कांगावा करतात आणि खरे वंचित त्याचे बळी होत असतात. इथे आपल्या सुखवस्तु वातावरणात सुरक्षित बसलेल्या प्रकाश वा अन्य दलित पुढार्‍यांना त्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत. राजकीय दबावामुळे त्यांना कायद्याचे संरक्षण अहोरात्र मिळत असते. पण जळगावच्या त्या खेड्यासारख्या लाखो वस्त्या गावे अशी आहेत, तिथल्या दलित वंचितांना स्थानिक शिरजोरांच्या मेहरबानीवर दिवस कंठावे लागत असतात. त्याला त्यांची जात किंवा मस्तवालांची जात कारण नसते, तर त्यांचे आर्थिक राजकीय दुबळेपण कारणीभूत असते. त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारा जात हे निमीत्त बघत असतो, पण वास्तवात ते दुबळेपणाचे बळी असतात. आपल्या राजकीय सबळतेचा वापर करून प्रकाश आंबेडकर कालपरवा एका वाहिनीवरच्या संपादकाला धमकी देतात आणि खेड्यापाड्यात जो तसाच बलदंड बाहूबली असतो, तो अशा धमक्या प्रत्यक्षात राबवित असतो. आंबेडकर काय म्हणाले होते? आजचे सरकार जाऊन आमचे सरकार आले, मग तुम्हाला बघून घेऊ. मग जळगावात त्या भटक्या विमुक्त जातीच्या जोशी मंडळींनी काय वेगळे केले? त्यांच्या हाती बळ आहे, म्हणून त्यांनी असला प्रकार केला. उद्या त्याच दलितांच्या हाती सत्तासुत्रे आली, तर त्यांनी त्याचा बदला घ्यावा, यालाच प्रकाश आंबेडकर सामाजिक न्याय समजत असावेत. एल्गार परिषदेची तीच अपेक्षा होती. अन्यथा कुठलेही निमीत्त घेऊन जातीअंताच्या नावाखाली असा ‘जातीवंत’ आगलावेपणा कोणी कशाला केला असता?

चार दशकापुर्वी समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा नावाची चळवळ चालवली होती. त्याचे गुणगान साधना नावाच्या साप्ताहिकातून आणि इतर पुरोगामी माध्यमातून खुप झाले. खरेच अशी चार दशकाची परिवर्तनाची चळवळ यशस्वी झालेली होती, तर जळगावात असली हिडीस घटना घडण्याचे कोणतेही कारण नव्हते. पण ती घडली, कारण ‘एक गाव एक पाणवठा’ हे पुरोगामी पत्रकार माध्यमांनी व नेत्यांनी चालविलेले मार्केटींग होते. प्रत्यक्षात महाराष्ट्रात लोकांच्याच मिळण्या मिसळण्यातून जितके सामाजिक अभिसरण होऊ शकते ते होत राहिलेले आहे. बाकी सामाजिक चळवळी व फ़ुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे मेळावे परिषदा हा निव्वळ देखावा होता. त्याचा पसारा प्रसिद्धी माध्यमात होता आणि जमिनीवर त्याचा मागमूस नव्हता. तो सामान्य लोकांमध्ये पोहोचणे दुरची गोष्ट झाली. ज्यांनी या चळवळीची धुरा खांद्या्वर घेतलेली होती, त्यांच्या व्यक्तीगत जीवनात वा कुटुंबातही कुठली सामाजिक समारसता कधी येऊ शकली नाही. त्यापेक्षा अशा लोकांनीच अधिकाधिक जातीय जाणिवा किंवा अस्मिता जोपासण्याचे काम केले. त्या अस्मिता टोकदार होण्यातून अशा घटनांना शाश्वती मिळालेली आहे. उच्चवर्णिय आणि पिछडे दलित सोडून द्या. त्यांच्यातील दुरावा कमी हॊऊ शकला नाहीच. पण वंचित दलित अशा लहान दुर्बळ जातीजमातीमध्येही एकजीवता येऊ शकली नाही. त्यांच्या जाणीवा अधिक जातीय व तीव्र होत गेल्या आणि त्यांच्यातच एकमेकांना हीन लेखण्याची स्पर्धा सुरू झाली. परिवर्तनाच्या चळवळ्यांनी अधिकाधिक समाजाला भूतकाळ व इतिहासात नेवून टाकलेले आहे. भुजबळ वा प्रकाश आंबेडकर त्याचे प्रतिक झाले आहेत. अशा मतलबी सुधारकांपेक्षाही आपल्याच गतीने मोठ्या संख्येने समाजातील नवी पिढी सुशिक्षित होऊन जातीच्या जंजाळातून बाहेर पडते आहे. देशाचा पंतप्रधान त्याचे उत्तम उदाहरण आहे.

9 comments:

  1. झणझणीत अंजन घालणारा लेख.
    मनापासून धन्यवाद भाऊ��

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम विवेचन,खरे तर प्रकाश आंबेडकर,मायावती, व इतरही दलीत नेते हे सदैव स्वतः चे दुकान चालावे म्हणून अशी फूट पाडतात व मूर्ख लोक त्यामागे हिंसाचार करतात.

    ReplyDelete
  3. Elgar Parishad was organised by two retired jugdes. Why no 'Patrakar' is taking their interview ?

    ReplyDelete
  4. जातीअंतचा लढा म्हणजे ब्राह्मण जातीच्याअंताचा ख्रिशन फ़ंडेड लढा , सेंट फ्रान्सिस झेवियर गोव्यात आला तेव्हापासून चालू आहे .
    अगदी श्रीलंकेतही डच लोकांनी तमिळ हिंदूच बाटवले ,सिम्हलीं बौद्ध नाही .
    आता हा लढा टाटा इन्स्टिट्यूट चालवते .

    ReplyDelete
  5. Atishay katu satya je media kadhi asha vishayavar bolat nahi .

    ReplyDelete
  6. मला वाटते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. ललित मुलांवर अन्याय वगैरे थापा आहेत. जिथे विहीरीचे पाणी प्यायला वापरतात तिथे विहीरीत पोहू दिले जात नाही. माझ्याकडे बापू म्हणून एक राहता गडी शेतात ९ वर्षे कामाला होता. गुराखी मुले माळी व मराठा असायची. तोही त्यांना हाकलून द्यायचा. अगदी माझ्या भाचीला ही पोहू देत नसे. This is routine practice in the rural Maharashtra. Problem lies with ABP Maaza & Pappu.

    ReplyDelete
  7. इजतेम्याचा फटका न बसलेले लोकच जातीअंताच्या लढ्याचे ढोल बडवतात !
    बाकीचे पटापट घरे बदलून हिंदुबहुल वस्ती जवळ करतात

    ReplyDelete
  8. आंबेडकरांना महाराज म्हटले तर विद्यापिठाच्या कुलसचिवाचे तत्काळ निलंबन होणे हे जातीअंताच्या पुरोगामी लढ्याचे दणदणीत यश म्हणावे लागेल भाऊ

    ReplyDelete