Sunday, September 29, 2019

सातार्‍यातला पेच-प्रसंग

Image result for pruthviraj chavan pawar

सातार्‍याचे उदयनराजे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपात दाखल झाल्याचे शरद पवारांना जिव्हारी लागले तर नवल नाही. पण त्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रीया तितकीच राजेंच्याही जिव्हारी लागलेली होती. म्हणूनच एका वाहिनीला मुलाखत देताना राजेंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि हुंदका आवरत त्यांनी पवार पोटनिवडणूकीला उभे राहिले, तर आपण लढणार नाही, अशीही घोषणा करून टाकली. त्यांचेही डोळे ओले झाले आले होते आणि कालपरवा अजितदादांनाही पत्रकार परिषदेतच हुंदका आवरला नाही. पंण फ़रक किती असतो? दादांना हुंदका आला, तर ते भावूक झालेले असतात आणि तितके कौतुक कुणाला राजेंच्या हुंदक्याचे वाटले नाही. पण या दोन हुंदक्याच्या निमीत्ताने सुरू झालेले राजकारण तरी किती लोकांच्या लक्षात येऊ शकले आहे? उदयनराजे यांनी भावूक होऊन पवारांना सातार्‍यात जनतेला सामोरे जाऊन आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याचेच आव्हान सहजगत्या देउन टाकले. तात्काळ राष्ट्रवादीच्या उथळ नेत्यांनी ते आव्हान स्विकारण्याचा आग्रह पवारांकडे धरला आणि मग वाहिन्याही त्याला ‘पवारांची खेळी’ म्हणून कोडकौतुक करू लागल्या. पण खुद्द साहेब वाहिन्यांचे संपादक वा स्वपक्षाच्या वाचाळ नेत्यांच्या इतके दुधखुळे नाहीत. म्हणूनच त्यांना सातार्‍याचा सापळा दिसत होता. त्यांनी अलगद त्यातून स्वत:ला बाहेर काढण्याची काळजी घेतली आणि तिथल्या पोटनिवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाणांचे नाव पुढे केले. आता ती एक जागा पदरात पडावी, म्हणून कॉग्रेसचे काही नेते हुरळले आणि त्यांनीही मग पृथ्वीराज बाबांना विधानसभेपेक्षा लोकसभा लढवण्याचा आग्रह सुरू केला. पण बाबांनी नम्रपणे ती ऑफ़र नाकारलेली आहे. मात्र त्यांच्यावरला दबाव कमी झालेला नाही. यातला सापळा किंवा डाव त्यांनाही कळतो. पवार इतक्या सहजासहजी कुणाला काहीही देत नसतात आणि द्यायलाच निघालेले असतील, तर त्यात नक्कीच काहीतरी डाव सामावलेला असणार, हे बाबांनाही कळते. काय असेल हा सातार्‍याचा डाव?

पवारांनी कॉग्रेसला सातारा ही राष्ट्रवादीची हक्काची जागा देऊ केली, तर त्यात काय भानगड असू शकते? कारण ती जागा राष्ट्रवादीने १९९९ पासून सलग जिंकलेली आहे. अर्थात पवारांनी ती जागा कॉग्रेसला देऊ केलेली नाही. तर पृथ्वीराज चव्हाण यांना व्यक्तीगत देऊ केलेली आहे. पवार कधी इतके उदार झाले? सहा महिन्यापुर्वीच शेजारच्या नगर जिल्ह्यात शिर्डीची जागा राष्ट्रवादीने कॉग्रेसला द्यावी आणि बदल्यात नगरची जागा राष्ट्रवादी पक्षाला देण्य़ाची तयारी कॉग्रेसने केलेली होती. पण विख्यांच्या नातवाचे लाड करायला पवारांनी साफ़ नकार दिला होता. इतकेच नाही, तर घरात लाडावून ठेवायला भरपुर मुले नातवंडे असताना, आपण दुसर्‍यांच्या पोरांना कशाला खेळवत बसू? असाही सवाल तेव्हा पवारांनी केला होता. असे व्यक्तीगत हेवेदावे अगत्याने जपणारे पवार, अकारण पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कशाला उदार झाले असतील? आणि तेही शिखर बॅन्केच्या घोटाळ्यात त्यांचेच नाव गोवले गेल्यावर इतके औदार्य? कुठल्याही चिकित्सक पत्रकाराला विचारासाठी प्रवृत्त करणारी अशीच ही भूमिका आहे. कारण ज्याचे खापर आज काका-पुतणे पवार विद्यमान भाजपा सरकारच्या माथी फ़ोडत आहेत, त्याचा मुळ जनक पृथ्वीराज चव्हाणच असावेत याला योगायोग म्हणता येत नाही. कारण तोच तर इतिहास आहे. शिखर बॅन्केचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक बसवण्याची कारवाई मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज यांनीच केलेली होती आणि तिथेच न थांबता त्याच घोटाळ्याची चौकशीचे आदेशही पृथ्वीराज बाबांनी जारी केलेले होते. तेव्हा कुणाचे सरकार होते? अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादीच्या पाठींब्यानेच पृथ्वीराजबाबा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले होते. म्हणून तर इतका मोठा तमाशा रंगला असतानाही पृथ्वीराजांनी पवारांच्या समर्थनार्थ चकार शब्द उच्चारलेला नाही. नेमक्या त्याच कालखंडात होऊ घातलेल्या सातारा पोटनिवडणूकीला काकांनी त्याच बाबांचे उमेदवार म्हणून नाव सुचवले आहे आणि त्यासाठी पक्षाची हक्काची जागासुद्धा सोडण्याचे औदार्य दाखवलेले आहे. पवारांचे हे औदार्यच बाबांना भयभीत करून राहिलेले आहे.

विधानसभेतील कॉग्रेसचे गटनेते वडेट्टीवार यांनीही एका वाहिनीला मुलाखत देताना आपण व कॉग्रेस, पृथ्वीराज बाबांना सातारा पोटनिवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला असल्याने अगत्याने सांगतात. पण मुळातच दिल्लीच्या राजकारणातून आलेल्या पृथ्वीराज बाबांना विधानसभाच का हवी आहे? तर त्याचे रहस्य सातारा नावाच्या सापळ्यात लपलेले आहे. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांचे सातार्‍यात भव्यदिव्य स्वागत करण्यात आलेले होते. त्याला शह देण्यासाठी दोनच दिवसांनी पवार खुद्द सातार्‍याला पोहोचले व त्यांनी मोठी मिरवणूक खुल्या गाडीतून काढून आपले तिथले वर्चस्व कायम असल्याचे चित्र निर्माण केलेले होते. मात्र गुरूवारी इडी प्रकरणी पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला, तेव्हा सातारा पुर्ण शांत होता. बारामती इंदापूर वा अगदी सोलापूरातही बंदचा परिणाम दिसला, तरी सातार्‍याचे सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. पक्षाने केलेले बंदचे आवाहन पु्र्णपणे फ़सलेले होते. त्यामुळे उदयनराजेंचे आव्हान स्विकारून खुद्द पवारांनी सातारा पोटनिवडणूक लढल्यास काय परिणाम असतील, त्याची झलक मिळते. माढा येथून माघार घेताना पवार काय म्हणाले होते? सहा दशकात चौदा निवडणूका लढल्या, पण एकादाही हरलो नाही. तेच साध्य करण्यासाठी उदयनराजेंनी भावनात्मक आव्हान देत पवारांना सापळ्यात ओढण्याचा हुंदका आणला होता काय? अजून आपण तरूण आहोत आणि अनेकांना घरी बसवायचे आहे, असे ठामपणे बोलणारे पवार बारामती सोडून इतरत्र कशाला उभे रहात नाहीत? त्यांनी आपल्या गळ्यातले लोढणे पृथ्वीराज बाबांच्या गळ्यात कशाला अडकवावे? तर जिथून ते हमखास पराभूत होतील, अशीच जागा बाबांना देण्यातला डाव दोघांनाही कळतो. म्हणून बाबांनाही सातारा नकोय. तर पवारांना शिखर बॅन्केच्या घोटाळ्याची चौकशी बरखास्ती करणार्‍यांना धडा द्यायचा आहे. असा एकूणच सातारा पोटनिवडणूक हा मोहात टाकणारा सापळा आहे.

शिखर बॅन्क व त्या संबंधातला इडीने नोंदलेला गुन्हा, यातून पवारांना इतकीच सहानुभूती मिळालेली असेल, तर आपल्या बालेकिल्ल्यातून सातारा लोकसभा लढवण्यासारखा दुसरा लढाऊ पवित्रा असू शकत नाही. पण त्यांना तिथून उभे रहायचे नाही. किंबहूना तिथले माजी खासदार श्रीनिवास पाटिल गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत, त्यांचेही नाव साहेब पुढे करत नाहीत. उदयनराजे भाजपात गेल्यावर काढलेल्या सातारा शोभायात्रेमध्ये श्रीनिवासजी अगत्याने साहेबांच्या बाजूला खुल्या गाडीत स्वार झालेले होते. मग आता पृथीराज बाबांना जागा देण्या़चे औदार्य कशाला? त्याचा असा उलगडा होऊ शकतो. त्यातले औदार्य दिल्लीकरांना वा महाराष्ट्राच्या अन्य भागातल्या कॉग्रेसजनांना समजू शकत नसेल. पण पृथ्वीराज बाबांना ते उमजते. म्हणूनच त्यांना त्या मोहात सापडायचे भय वाटलेले आहे. त्यांनी साफ़ नकार दिला आहे. कारण शिखर बॅन्क घोटाळा प्रकरणाचा सूड म्हणून हे औदार्य साहेब दाखवित आहेत, हे त्यांनाही कळते. म्हणून राहुल गांधींपासून अशोक चव्हाणपर्यंत सर्व कॉग्रेस नेते पवारांच्या समर्थनाला उभे ठाकलेले असताना, पृथ्वीराज चव्हाण यांनी इडी वा शिखर बॅन्क विषयात चकार शब्द उच्चारलेला नाही. खरे तर त्यांच्या इतका दुसरा कोणीही पवारांना क्लीनचीट देऊ शकत नाही. कारण मुख्यमंत्री असताना त्यांनीच हा घोटाळा ठरवला व संचालक मंडळाला बरखास्त करण्यापर्यंत कठोर पावले उचलून चौकशीचेही लचांड लावून दिलेले होते. त्यांनी इतके मोठे पाऊल उचलूनही मोठे किंवा छोटे पवार त्यांना असलेला पाठींबा काढून घेण्याची हिंमत करू शकलेले नव्हते. दहाबारा हजार कोटीच्या ठेवी असलेल्या बॅन्केत २५ हजार कोटींचा घोटाळा कसा होऊ शकतो? हा अंकगणिती सवाल आज अजितदादा पत्रकारांना विचारतात, तोच प्रश्न त्यांनी आपल्याच पाठींब्याने मुख्यमंत्री झालेल्या पृथीराज बाबांना कशाला वि़चारला नव्हता? त्यासाठी उद्विग्न होऊन उपमुख्यमंत्रीपदाचा राजिनामा कशाला दिलेला नव्हता? असे खुप प्रश्न विचारता येऊ शकतात. पण त्यासाठी पत्रकार असावे लागते. हातात कॅमेरा वा माईक असला म्हणून असे प्रश्न सुचत नाहीत.

17 comments:

  1. पराभव दिसत असताना एकमेकांवर कुरघोडी करायची सवय जात नाही.

    ReplyDelete
  2. हल्लीचे बहुतेक पत्रकार बांधिलकी जपणारे आहेत. त्यातही अभ्यासू पत्रकार क्वचितच. परखडपणे प्रश्न विचारणारे पत्रकार दिसतच नाहीत, बहुदा अशांना नारळ दिला जातो. वाहिन्यांवर चाललेल्या एकांगी चर्चा ऐकत तरी का कोण? त्यामुळे हल्ली पक्षाचेही नामवंत प्रवक्ते ही वाहिन्यांवर फारसे येत नाहीत, हे लक्षात आले असेलच

    ReplyDelete
  3. राजे सुध्दा शरद पवार इतेकेच पक्के राजकारणी आहे

    ReplyDelete
  4. भाऊ याच लेखाची वाट पाहत होतो . अप्रतिम दुसरा शब्दच नाही .

    ReplyDelete
  5. हुंदक्यांची इतकी छान उकल फक्त आपणच करु शकता.

    ReplyDelete
  6. खूपच भारी लेख आहे भाऊ...👌👌

    ReplyDelete
  7. भाऊ....झकास...मजा आली....👌👌👌

    ReplyDelete
  8. हा लेख अप्रतिम,
    आज एक news ऐकली की तुर्क भारताच्या बाजूने झालाय पाकची बाजू सोडून
    यामागे मोदींनी भयंकर डाव खेळला अस कानी आहे
    कितपत वास्तव???

    ReplyDelete
  9. भाऊ नेहमीप्रमाणे उत्कृष्ट विवेचन

    ReplyDelete
  10. त्या हुंदक्यांची अन्वयार्थ फक्त आपणांस समजला, आज हे वाचल्यावर लक्षात येतय् कीं "हाताला लकवा मारलाय काय?" च्या मागे इतकं रहस्य होते.

    ReplyDelete
  11. भाऊ, लेख खूप छान आणि साताऱ्यातील सर्व राजकारणाची उकल करणारा आहे.

    ReplyDelete
  12. “एका दगडात दोन पक्षी”
    १)शिखर बॅंक प्रकरण सुरूं केल्याचा राग नाही असे दाखवण्यासाठी साताऱ्यातून उभे रहाण्याचा आग्रह आणी २)सातार्यातून निवडून येणार नाही ही खात्री.

    ReplyDelete
  13. भाऊ पहिला ठाकरे वारस निवडणूक लढवतोय. त्यावर तुमचा उहापोह आवडेल वाचायला.😊

    ReplyDelete
  14. pawar ani party ne rajkarann itke galichcha karun thevle ahe ani ata tyachyach navane gala kadhtat..

    ReplyDelete