Wednesday, December 19, 2012

उपाय आणि उपचारातला फ़रक


   नुकत्याच बांगला देश युद्धाच्या संदर्भातील आठवणींना उजाळा देणारा एक लेख वाचनात आला. त्यात पाकिस्तानी सैनिकांनी बांगला देशात त्यावेळी अत्याचार केले; त्यात काही लाख महिलांवर बलात्कार केल्याचा उल्लेख आहे. त्यांचा हेतू आणि दिल्लीतल्या या श्वापदांचा हेतू वेगळा असतो काय? तुम्ही तुमच्या महिलांना संरक्षण द्यायला नामर्द आहात; असे सत्ताधारी व राज्यकर्त्या प्रशासनाला त्यातून प्रत्येक बलात्कारी सांगत असतो. तो संदेश सरकारपर्यंत पोहोचला असे मला तरी, मंगळवारच्या चर्चेतून दिसले नाही. कारण एकूणच चर्चा व वक्तव्ये औपचारिक होती. आणखी एक गुन्हा झालेला आहे, आणखी एक बलात्कार घडला आहे, असेच चर्चा व वादविवादाचे स्वरूप होते. म्हणूनच मूळ बलात्कारी घटनेपेक्षा ती औपचारिकता अधिक भयकारी वाटते. त्या चर्चा वादविवादाचा सूर रोजची एक घटना किंवा बातमी असाच होता. त्यामध्ये कुठे त्या मुलीची वा अन्य बलात्कार पिडीत महिलेची व्याकुळता दिसली नाही. अशा गुन्ह्यातून उपजणारी वेदना व यातनांचा लवलेश त्या चर्चेत नव्हता किंवा बातम्यांमध्ये नव्हता. बलात्कार म्हणजे नेमके काय, त्याचे अज्ञानच त्याला कारणीभूत आहे असे वाटते. लैंगिक शोषण वा गैरफ़ायदा घेणे, असे बलात्काराचे स्वरूप नाही. तर त्या मुली-महिलेची इच्छा व इज्जत क्रुरपणे पायदळी तुडवणे असते. आणि म्हणूनच ती घटना एक नको असलेली यातनामय आठवण होऊन तिच्या मनाला चिकटून बसत असते. कितीही झटकली वा पुसली; म्हणून जिच्यापासून मुक्त होता येत नाही, अशी ती उद्विग्नता असते. कोणा न्यायाधीशाने एका प्रकारणात त्याचे नेमक्या शब्दात वर्णन केल्याचे स्मरते. शरीरावर बलात्कार एकदाच होतो. पण त्याचा तपास खटले व उल्लेख जितक्या वेळा होतो, तितक्या प्रसंगी त्या बलात्कारितेला त्याच असह्य यातनांतून जावे लागत असते. या गुन्ह्याची इतकी भयंकर व्याप्ती त्यावरच्या चर्चा, बातम्यातून कोणी लक्षात तरी घेतो का? नसेल तर अशा चर्चा हव्या कशाला व त्यातून साधले काय जाणार? घराबाहेर पडणार्‍या महिलेच्या मनातल्या भितीची सुतराम कल्पना चर्चेत दिसली का?

   इतक्या वेगाने असे गुन्हे होत आहेत आणि वाढतच आहेत, तर त्यावरचे उपाय का बदलले जात नाहीत? ज्या कायद्याने वा शिक्षेने धाक निर्माण होतो, त्याच मार्गाने अशा घटनांना पायबंद घालता येईल. पण दुर्दैव असे आहे, की नेहमी त्याच त्याच चर्चा चालतात, पण उपाय बदलण्याचा विचारही होत नाही. कालबाह्य झालेले कायदे आणि त्यांचाही अंमल नसणे; हे अशा सामाजिक दुखण्याचे खरे कारण आहे. आता इतका गदारोळ झाल्यावर त्यातल्या आरोपींची झपाट्याने धरपकड झालेली आहे. तेवढेच नाही तर विनाविलंब त्यांना पकडल्याबद्दल गृहखात्याने स्वत:ची पाठही थोपटून घेतली आहे. मग थोरामोठ्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण प्रतिक्रिया देताना फ़ाशीच्या शिक्षेपासून कठोर शिक्षेच्या मागण्याही केलेल्या आहेत. पण असे प्रकार होऊच नयेत; यासाठी कोणाला उपाय सुचवावा असे वाटत नाही, याला पराभूत मनोवृत्ती म्हणतात. कठोर शिक्षा व तातडीने धरपकड केल्याचे जर समाधान असेल, तर त्यातून गुन्ह्याला एकप्रकारे मान्यता दिली जात असते, त्याचे काय? आम्ही शिक्षा देऊ, तुम्ही गुन्हा करा, गुन्हा होईपर्यंत शांत बसू; असाच सिग्नल त्या गुन्हेगारांना दिला जात नाही काय? गुन्हा रोखण्यासाठी कायदा व कायद्याचे राज्य असते, ह्याचे आपल्याला विस्मरण झाले आहे काय? आरोपीला कुठलीही शिक्षा देऊन झालेले गुन्ह्यामुळे नुकसान भरून येत नाही. म्हणूनच शिक्षा व खटले हे उपचार असतात, उपाय नसतात. उपाय म्हणजे आजारमुक्त गुन्हेगारीमुक्त निरोगी जीवन होय. म्हणूनच गुन्हेगारीमुक्त समाज निर्मितीच्या दिशेने कायद्याने वाटचाल करायला हवी. तेवढा कायद्याचा धाक असायला हवा. तशी कोणाची इच्छा दिसत नाही की प्रयत्नही दिसत नाही. मग मंगळवारी झाला तो नुसता तमाशाच नाही काय?

मित्रांनो शिक्षा कधीच महत्वाची नसते. त्यापेक्षा भयंकर असते ती शिक्षेची भिती. मी शाळेत असताना बहुतेक मास्तरांकडून बेदम मार खाल्लेला आहे. शेवटी तेच मारून दमले, पण मला कोणी धाक घालू शकला नव्हता. आणि त्यापैकी अनेकांनी तसे प्रामाणिकपणे बोलूनही दाखवले. एकच शिक्षक असे होते, की त्यांनी कधी अंगाला हात लावला नाही, की दमसुद्धा दिला नाही. मी त्यांना भयंकर घाबरत असे. आज इतक्या वर्षांनी विचार केल्यावर लक्षात येते, की कधीच शिक्षा न देणार्‍या त्या शिक्षकाने संयम संपून दिलीच शिक्षा; तर ती किती भयंकर असेल यालाच मी घाबरत असावा. शिक्षेचे स्वरूप वा माहिती असण्यापेक्षा तिच्याविषयीची अनाकलनिय अनिश्चितता अधिक भयभीत करणारी व म्हणून परिणामकारक असू शकते, असे माझे मत आहे. मग तो अपराधी माझ्यासारखा व्रात्य खोडकर विद्यार्थी असो, की नामचिन गुन्हेगार असो.
facebook

No comments:

Post a Comment