आता त्याला वर्ष होईल. लोकसभेच्या निवडणूका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि मुंबईतले शेवटचे मतदान व्हायचे होते. दिड दिवस शिल्लक होता आणि मुंबईतला प्रचार थंडावला होता. तेव्हा एका उमेदवाराने सोशल मीडियातून सर्व वर्तमानपत्रे व वाहिन्यांचे आभार मानले होते. कशासाठी त्याने असे आभार मानावेत? तर प्रसिद्धीच्या रणधुमाळीत त्याच्या पक्षाची वा उमेदवारीची कोणीही साधी दखलही घेतलेली नव्हती. त्या पक्षाचा कोणी उमेदवार मुंबईत उभा असल्याच्या चार ओळीही खरडाव्यात, अशी ‘विवेकबुद्धी’ कुणा पत्रकाराला झाली नाही. सगळी माध्यमे केजरीवाल आणि मोदींच्या भोवती घुमत होती. अर्थात त्यात पुन्हा मोदींच्या भोवती कारण हे मोदींचे मार्केटींग असल्याचा त्याच माध्यमांचा आरोप होता. पण तीच माध्यमे आणि तेच पत्रकार तोडीस तोड अशी प्रसिद्धी केजरीवालना कशासाठी देत होते? त्यामागचे मार्केटींग उलगडत नव्हते. कसे उलगडणार? त्यालाच तर पेडन्युज म्हणतात. आता पेडन्युज हा सर्वतोमुखी झालेला शब्द आहे. सेक्युलर म्हणून मिरवणार्या विचारस्वातंत्र्यांच्या लढवय्यांसाठी मात्र पेडन्युज हीच विवेकाची लढाई असते. म्हणूनच आज ज्यांनी कोणी वैचारिक संघर्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन गोविंद पानसरे यांचा उदो उदो चालविला आहे, त्यापैकी कोणी त्यांच्याच पक्षाच्या मुंबईतील एकमेव उमेदवाराला मागल्या वर्षी चार ओळीची प्रसिद्धीही का दिलेली नव्हती? त्याचे नाव कॉम्रेड प्रकाश रेड्डी. कोण हा प्रकाश रेड्डी? तर कॉ. पानसरे यांचे समकालीन जी. एल. रेड्डी व तारा रेड्डी यांचा पुत्र. आजही आपल्या जन्मदात्यांनी खांद्यावर घेतलेला लाल बावटा निष्ठेने लढवणारा मुंबईतला एक हाडाचा कार्यकर्ता. त्यानेही पानसरे यांच्या पक्षाचा व विचारांचा मुंबईतला शिलेदार म्हणून ती लढत एकाकी दिलेली होती. त्याची दखल किती सेक्युलर पत्रकारांनी घेतली? नसेल तर कशाला घेऊ नये?
प्रकाश तेच विचार मांडत होता आणि त्याच विचारसरणीची लढाई लढत होता, ज्यासाठी पानसरे यांनी आपल्या प्राणांची शर्थ केली. मग जे त्या विचारांचा इतका उदो उदो करतात, त्यांना प्रकाशला प्रसिद्धीचा व मदतीचा हात द्यायची बुद्धी तेव्हा कशाला होऊ नये? तर प्रकाशपाशी न्युजचे बिल पेड करण्याची आर्थिक कुवत नव्हती. आणि पेडन्युज देण्याची कुवत नसेल तर त्याच्या विचारांना कोण सेक्युलर माध्यम धुप घालणार? त्यामुळेच प्रकाश व त्याची उमेदवारी त्या निवडणूकीत साफ़ दुर्लक्षित राहिले. समजा त्याच्या प्रचारासाठी तेव्हा गोविंद पानसरे मुंबईत आले असते, तर यापैकी किती सेक्युलर पत्रकारांनी त्यांच्या त्या वैचारिक लढाईत खांद्याला खांदा लावून सोबत केली असती? आज त्यांचा बळी पडल्यावर रकानेच्या रकाने त्यासाठी खर्ची घालणार्या अशा पत्रकारांनी, प्रकाशच्या प्रचाराला आलेल्या पाबसरे यांच्या विचार मांडणार्या भाषणाच्या चार ओळी तरी प्रसिद्ध केल्या असत्या काय? जे प्रकाशची दखल घ्यायला तयार नव्हते, त्यांनी पानसरेंनी त्याच्यासाठी मांडलेल्या वैचारिक भूमिका वा केलेल्या प्रचाराला तरी कशाला दाद दिली असती? विचारांचे कोणाला काही पडलेले नाही. पण आज त्यापैकी प्रत्येकजण हिरीरीने पानसरे यांच्या बहुमोल वैचारिक योगदानाची किर्तने गातो आहे. त्यातल्या कितीजणांनी पानसरे वाचले वा ऐकले आहेत? ज्या माध्यमे व बाजारू पत्रकारितेची इथे लक्तरे धुतली जात आहेत, तिचेच हे सगळे गुलाम आहेत आणि त्यांना शोषक कसे आपले हुकूमाचे गुलाम करतात, त्याचीही सविस्तर व्याख्या पानसरे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. असे पेडन्युज वा पेडविचारांचे गुलाम हे शोषकांनी शोषितांची दिशाभूल करण्यासाठी कामाला जुंपलेले असतात. तेव्हा आज पानसरेंच्या विवेकी वैचारिक लढाईचा उमाळा आलेले कुठल्या गोत्रातले आहेत, ते लक्षात येऊ शकेल.
अशा सेक्युलर म्हणून मिरवणार्या भामट्यांना कॉ. पानसरे, कॉ. प्रकाश वा त्यांच्या पक्ष विचारसरणीशी कुठलेही कर्तव्य नसते. त्यांनी मांडलेल्या बाजारात ग्राहकोपयोगी वस्तू म्हणून विचार व विवेक हा मोसमी माल असतो. जेव्हा त्याला उठाव असतो, तेव्हा त्याची घाऊक आयात केली जाते आणि शोकेसमध्ये त्यांची आकर्षक मांडणी केली जाते. तो माल खपवण्यासाठी त्यांना विचारवंत पानसरे नको असतात, तर हुतात्मा हवा असतो. म्हणून आजवर याच माध्यमांनी कधी पानसरे वा त्यांच्या विचारांसाठी चार रकाने जागा दिली नाही. पण हुतात्मा म्हणून पानसरे यांचे जोरदार मार्केटींग मात्र चालू आहे. त्यांच्या विचारांच्या लढाईची महत्ता असती, तर त्याच विचारांचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या प्रकाश रेड्डीला चार दिवस साध्या बातमीतून लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे कर्तव्य अशा पत्रकारांनी पार पाडले नसते का? पण बाजारू मालाचा सेल लावणार्यांना वैचारिक गुणवत्तेशी काय घेणेदेणे असणार? तेव्हा केजरीवाल हा बाजारात जोरदार खपणारा ब्रॅन्ड होता आणि तमाम ‘आम्ही सारे पानसरे’ आणि ‘आम्ही सारे दाभोळकर’ केजरीवालच्या भजन किर्तनात मग्न झालेले होते. त्या गदारोळात विचारांसाठी लढणार्या प्रकाश रेड्डींचा आवाज कोणाच्या कानावर जायचा? किंबहूना त्याचाच वैचारिक आवाज दाबून टाकण्यासाठी माध्यमांतील बुद्धीमंतांना, शोषकांनी कामाला जुंपलेले असते ना? आज जे विचारवंत बुद्धीमंत आहेत, त्यांना शोषकांनीच कसे गुलाम वा लाचार केलेले असते, तेच तर पानसरे यांनी सांगितलेले आहे. ‘शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो’ (‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकातून). यावरूल लक्षात येते, की आज पानसरे यांच्याविषयी असे नक्राश्रू ढाळणारे नेमके कोण आहेत?
विक्रेत्याला आणि दुकानदारांना गुणवत्तेशी वा जनहिताशी कर्तव्य नसते. त्यांची नजर खपणार्या मालावर असते. म्हणून आज पानसरेंच्या वैचारिक लढ्याचा उमाळा आलेले तमाम माध्यमकर्मी वा फ़लकबाज यापुर्वी कधी पानसरेंच्या विचारांचे अध्ययन करायला सवड काढू शकले नाहीत. कारण त्यांच्याच भामटेगिरीकडे तर पानसरे सामान्य जनतेचे लक्ष वेधत होते. ज्यांनी शोषितांची व विचारांची लढाई बाजारू करून टाकली, अशाच ढोंगी पाखंडी विचारवंतांकडे पानसरे यांनी कटाक्ष टाकलेला आहे. जो आपल्याकडेच आरोपी म्हणून बोट दाखवतोय, त्याची दखल बदमाश कशाला घेतील? म्हणूनच आजवर पानसरे दुर्लक्षित राहिले आणि त्यांचा बळी पडल्यावर मात्र त्यांच्या हौतात्म्याचा बाजार मांडायला हे शोषकांचे पगारी गुलाम हिरीरीने पुढे आलेले आहेत. अशा बाजारू लोकांना माल खपवण्यासाठी दर्जा नको असतो तर आकर्षक मॉडेल लागते. तसे पानसरे यांचे हौतात्म्य हे मॉडेल आहे. नथूराम हे सुद्धा मॉडेल असते. दातातले-हातावरचे किटाणू ओरडाआरडा करून दाखवले नाहीत, तर लोशन-पेस्टचा माल खपायचा कसा? त्यासाठी आकर्षक मॉडेल आणि आक्रमक जाहिरात लागते. त्यापेक्षा आज पानसरे यांच्या हौतात्म्याचा मांडलेला बाजार किंचितही वेगळा नाही. तो मांडणार्यांना पानसरे ही व्यक्ती, त्याच्यावरचा अमानुष हल्ला वा त्यांचे विचार व संघर्ष यांच्याशी कवडीचे कर्तव्य नाही. त्यांचा मतलब त्या हौतात्म्यातून आपला गल्ला-धंदा साधण्याचा आहे. म्हणूनच प्रकाश रेड्डी त्याच विचारांची लढाई लढताना तिकडे जे ढुंकून बघत नाहीत, तेच आज पानसरेंच्या लढाईचे रणशिंग फ़ुंकत धावताना दिसतील. कारण त्यांच्या राजकीय अजेंड्यातले जे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना झोडण्यासाठी पानसरेंचे हौतात्म्य हे एक हत्यार म्हणून गवसले आहे. पेडन्युजचे गुलाम कधी वैचारिक लढाई लढत नसतात. ते आयत्या बिळावरचे नागोबा असतात.