Saturday, February 21, 2015

आम आदमी पार्टी की तिसरी शक्ती?

आम आदमी पक्षाच्या सव्वा वर्षापुर्वीच्या यशाने अनेकजण भारावले होते आणि तेव्हाच त्यांनी केजरीवाल मोदींचा विजयरथ रोखण्याची भाकिते केलेली होती. ती तेव्हा कशी फ़सली, हे आपण मागल्या मे महिन्यातच बघितले. ती फ़सणारच होती. कारण दिल्लीतल्या तेव्हाच्या निकालांचे योग्य विश्लेषण झाले नव्हते आणि आज देखील दिल्लीतील त्या पक्षाच्या अपुर्व यशाने भारावलेल्यांना वास्तवाचे भान राहिलेले नाही. मात्र खुद्द केजरीवाल व त्यांचे राजकीय मार्गदर्शक योगेंद्र यादव, यांनी आपल्या भावी वाटचालीचा नेमका आराखडा तयार केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे २०१३ च्या अखेरीस केजरीवाल यांनी दिल्लीतही भाजपाला पराभूत केले नव्हते. तर कॉग्रेस पक्षाला दणका दिलेला होता. पण तो धक्का देताना त्यांनी तिसरी शक्ती वा आघाडी मानले जाणार्‍या पक्षांची दिल्लीतली जागा व्यापलेली होती. त्यात प्रामुख्याने त्यांनी तिथे तिसरी शक्ती म्हणून उदयास आलेल्या मायवतींच्या बहुजन समाज पक्षाची मते पुर्णत: खाल्लेली होती. तोपर्यंत मायावतींनी दोन आमदार व दहापंधरा टक्के मते तिथे मिळवलेली होती. पण केजरीवाल जिंकत असताना मायवतींच्या पक्षाचा दिल्लीत साफ़ अस्त होऊन गेला. यावेळी त्यांना एक टक्काही मते तिथे मिळवता आलेली नाहीत. पण वैफ़ल्यग्रस्त मरगळल्या कॉग्रेसची मते ओढून केजरीवाल इतकी मोठी मजल मारू शकले. अर्थात त्यासाठी त्यांना डाव्यांपासून नितीशपर्यंत अन्य प्रादेशिक पक्षांनी पाठींबा दिलेला होता. त्यामागे अर्थातच भविष्यकाळात आपापल्या राज्यात भाजपा विरोधात ‘आप’चा पाठींबा मिळवण्याची अपेक्षा अशा पक्ष व नेत्यांना असली तर नवल नाही. पण योगेंद्र यादव यांनी कुठल्याही पक्षाशी युती आघाडी नाही, तर आपला मतांचा हिस्सा निर्माण करणे, हेच पक्षाचे उद्दीष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच अस्तंगत होणारी कॉग्रेस व विस्कळीत बेशिस्त सेक्युलर पक्षांचा मतदार हे त्यांचे लक्ष्य असणार आहे.



लालूंपासून मुलायम, मायावती, मुलायम, नितीश वा डावे इत्यादी सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षांचे विविध राज्यात वा तिथल्या नागरी भागात काही किरकोळ समर्थक असतात. पण पक्ष म्हणून त्यांचे कुठलेही संघटन तिथे नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुर्वाश्रमीचे समाजवादी, जनता दलीय विस्कळीत गट अनेक तालुक्यात शहरात विखुरलेले आहेत. त्यांना कोणी नेताच नसल्याने अनाथ असल्याप्रमाणे ते भरकटलेले आहेत. अण्णा आंदोलन व पुढे आम आदमी पक्षाच्या रुपाने त्यांच्या नव्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत लढलेले व उत्साहाने बोलणारे चेहरे तपासले, तर त्यात जुन्या समाजवादी वारश्यातील लोकांचा भरणा दिसेल. आताही भाजपाच्या पराभवाचे चित्र बघायला आसूसलेल्या अनेक सेक्युलर संघटना, गट यांना केजरीवालच्या यशापेक्षा भाजपाचे नाक कापले गेल्याने आनंदाला उधाण आलेले आपण बघू शकतो. असे जे आपल्या नेतृत्व व संघटनात्मक अपयशाने पिचलेले आहेत, त्यांना एकत्र येण्याची संधी देण्यातून भविष्यातला आम आदमी पक्ष उभारला जाऊ शकतो. योगेंद्र यादव यांनी म्हणूनच कुणाशीही युती आघाडी नाही, असा इशारा दिलेला आहे. त्याचा अर्थ असा, की या पक्षाला व त्यांच्या नेत्यांना विस्कळीत अशा तिसर्‍या पर्यायाला पक्ष म्हणून संघटित करायचे आहे. ते शक्य झाले, तर कॉग्रेसच्या बर्‍याच निराश हताश कार्यकर्त्यांनाही आम आदमी हा पर्याय म्हणून स्विकारणे शक्य होईल. हा मोठा मतदार व कार्यकर्त्यांचा गट आहे. तो एकत्रित झाला तरी दहाबारा टक्के मतांचा गठ्ठा होऊ शकतो. असा गठ्ठा उभा राहू शकला, तर सेक्युलर पर्याय म्हणून मुस्लिम व ख्रिश्चन मतांचा आणखी तितकाच गट त्याच्याकडे भाजपाला पर्याय म्हणून येऊ शकतो. अशारितीने देशव्यापी सेक्युलर पर्याय उभा राहिला, तर तो व्यवहारत: भाजपाला राष्ट्रव्यापी पर्याय होत कॉग्रेसची जागा व्यापू शकतो.

आतापर्यंत डावी वा तिसरी आघाडी म्हणून जे गट व मतदार एकत्र आणण्याचे प्रयास झाले, ते नेत्यांना एकत्र आणायचे प्रयत्न होते. म्हणूनच ते नेत्यांच्या अहंकाराच्या खडकावर येऊन फ़ुटत राहिले. मुलायम, मायावती, जयललिता, ममता, करूणानिधी, लालू, नितीश, पासवान, देवेगौडा इत्यादी नेत्यांनी, आपल्या पाठीराख्यांना भाजपा व कॉग्रेसच्या विरोधात उभे रहाण्याचे गाजर जरूर दाखवले. पण प्रसंगोपात त्यांनी आपापले अहंकार व स्वार्थासाठी पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास केलेला आहे. कारण स्वार्थ असेल, त्यानुसार आघाड्या केल्या, मोडल्या वा बदलल्या आहेत. असा मतदार वा पाठीराखा कुठल्यातरी राष्ट्रीय पक्ष व नेत्याच्या पर्यायाचे स्वप्न दिर्घकाळ बघत राहिलेला आहे. म्हणूनच त्याने जनता दल वा जनता पार्टी अशा प्रयोगांना भरभरून प्रतिसाद दिलेला होता. मात्र नेत्यांमुळे ते पर्याय फ़ुसके ठरले. त्या चुका होऊ नयेत अशी आखणी योगेंद्र यादव यांनी आपल्या प्रयोगामध्ये केलेली दिसते. म्हणूनच ते कुणाशीही युती आघाडी करायचे साफ़ नाकारत आहेत. पण आवाहन मात्र त्याच अन्य पक्षांच्या तिसर्‍या शक्तीचे करीत आहेत. मागल्या वेळी कॉग्रेसचा पाठींबा घेतला, तरी सत्ता टिकवण्यासाठी खुर्चीला चिकटून बसत नाही आणि कॉग्रेसला शरणही जात नाही, असे त्यांनी कृतीतून दाखवले आहे. थोडक्यात सत्तेची वेळ आली, मग अलिप्तता आपण सोडत नाही, याची ती ग्वाही आहे. जे आजवरच्या सेक्युलर पक्षांना व नेत्यांना सिद्ध करता आलेले नव्हते. ही आपली ओळख केजरीवाल व योगेंद्र यादव यांनी अतिशय काळजीपुर्वक निर्माण केलेली आहे. म्हणूनच ते भाजपासाठी आव्हान नसून, आधी तिसरी शक्ती म्हणून वावरणार्‍या प्रादेशिक व सेक्युलर पक्षांसाठीचे आव्हान आहे. त्यानंतर ते कॉग्रेससाठीचे आव्हान आहे. मात्र त्याचा धोका आज जितका दाखवला जातो आहे, तितका भाजपासाठी राष्ट्रीय पातळीवरचे ते आव्हान नाही.

दिल्लीप्रमाणेच काही राज्यात आपला मतदार पाया उभारण्यासाठी आम आदमी पक्ष दिल्लीत बसपाचा पाया बळकावला, तसाच छोट्या सेक्युलर पक्षांचा पाया गिळंकृत करणार आहे. दिल्लीचे निकाल पहाता आगामी काळात निवडणूका व्हायच्या उत्तरप्रदेश व बिहारमध्ये या पक्षाचा धोका लालू, नितीश, मायावती व मुलायम यांना अधिक आहे. ज्या समस्यांना त्यांनी दिल्लीत हात घातला आणि लोकांना भुरळ घातली; त्याच समस्यांवर या दोन्ही उत्तर भारतीय राज्यात मतदाराला भुलवणे सोपे आहे. मात्र लगेच त्याला दिल्लीसारखे मोठे यश अन्य राज्यात मिळण्याची सुतराम शक्यता नाही. पण तितकी केजरीवाल यांची महत्वाकांक्षाच नाही. या राज्यात भाजपाच्या मतांमध्ये हिस्सा मिळवणे त्याला शक्य नाही. पण अन्य प्रादेशिक पक्षांनी त्यालाच दिल्लीत पाठींबा दिला व त्याच्या यशाचे कौतुक केल्याने, त्यांच्याच मतदाराला केजरीवालची भुरळ पडली तर नवल नाही. त्यांचा मतदार काही प्रमाणात या नव्या पक्षाकडे वळणारच. त्यातून या प्रादेशिक नेत्यांना भाजपासमोर पराभूत व्हायला, हा पक्ष हातभार लावील. त्याचा आज भाजपाला लाभही होईल. पण पुढल्या काळात पराभवाने खचलेल्या त्या प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नव्या पक्षाच्या आश्रयाला जातील. तीच आगामी निवडणूकीत या पक्षाची रणनिती असेल. समविचारी पक्षांना खच्ची करून त्यांची जागा व्यापणे आणि त्याचा लाभ मिळालेल्या भाजपाने सताधारी म्हणून पुढल्या काळात केलेल्या चुकांचा राजकीय लाभ पाच वर्षानंतर उठवणे; असे डावपेच योगेंद्र यादव यांनी आखलेले असावेत. अर्थात त्यांनी त्यात लपवाछपवी केलेली नाही. अनेकदा त्यांनी आपली ही निती बोलून दाखवली आहे. प्रथम पराभूत व्हायचे, मग पराभूत करायचे आणि नंतर विजय मिळवायचा, हे आपले राजकारण असेल, हे त्यांनी पुर्वीच सांगून ठेवलेले आहे. म्हणूनच एकत्र येऊन फ़ुटत राहिलेल्या तिसर्‍या शक्तीला एका झेंड्याखाली एक पक्ष म्हणून संघटित करायची रणनिती व्यवहारात तिसर्‍या आघाडीची पोपटपंची करणार्‍या सेक्युलर पक्षांसाठीच आव्हान असेल ना?

No comments:

Post a Comment