Thursday, February 12, 2015

‘आप’सात बदललेल्या भूमिका



शिवसेनेचे पक्षप्रमुख वा अन्य कोणी दिल्लीच्या विजयावर केलेल्या टोमणेबाजीपेक्षा भाजपाच्या तमाम नेत्यांनी कुठे काय चुकले, याचा विचार करणे त्यांच्याच भल्याचे असेल. किंबहूना आठ महिन्यात पक्षात व आपल्या रणनितीमध्ये कुठल्या कुठे आमुलाग्र बदल झाला, त्याचाही उलगडा भाजपावाल्यांना होऊ शकेल. मग दिल्लीच्या मतदाराने काय केले, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. खरे सांगायचे तर चमत्कार त्या मतदारानेही घडवलेला नाही. भाजपानेच स्वत:ला असे बदलले आहे, की यापेक्षा दुसरा निकाल लागूच शकत नव्हता. लोकसभेत दिल्लीच्या फ़क्त सर्वच जागा भाजपाने जिंकलेल्या नव्हत्या. विधानसभेच्या ७० पैकी ६० जागी भाजपाने लोकसभेच्या मतदानात मताधिक्य मिळवले होते. म्हणूनच आज झालेला पराभव भाजपासाठी गंभीर इशारा आहे. किंबहूना या आठ महिन्यात केजरीवाल व आम आदमी पक्षाने भाजपाच्या लोकसभा यशाचा बारकाईने अभ्यास केलेला दिसतो, म्हणूनच त्यांनी विधानसभेत चमत्कार घडवण्यासाठी भाजपाची कार्यपद्धती अनुसरली. त्याच्या उलट मागल्या विधानसभेतल्या यशानंतर केजरीवाल जसे बहकत गेले आणि त्यांनी आपल्याच अपयशाचा पाया घातला होता, त्याचे अनुकरण भाजपा लोकसभा यशांनतर करत गेला. त्याचे प्रतिबिंब यावेळच्या निकालात पडलेले साफ़ दिसते आहे. १६ मे २०१४ रोजी लागलेल्या लोकसभा निकालानंतर भाजपा व आम आदमी पक्षाच्या एकूण वर्तनात व कार्यपद्धतीत पडलेला फ़रक म्हणूनच अभ्यासणे अगत्याचे आहे. तोपर्यंत प्रत्येक विधानसभा लढवायच्या गर्जना करीत देशभर साडेचारशे लोकसभेचे उमेदवार मैदानात आणणार्‍या केजरीवालांनी, अपयशाचा धडा घेऊन फ़क्त दिल्लीची विधानसभा लढवण्याची घोषणा विनाविलंब केली होती. त्यानुसार चार विधानसभा झाल्या त्यापासून त्यांचा पक्ष दूर राहिला होता.

दिल्लीच्या इवल्या नागरी राज्यात यश मिळाल्यावर केजरीवाल यांनी तात्काळ देशव्यापी पक्ष होण्यासाठी झेप घेतली आणि महिन्याभरात एक कोटी सदस्य नोंदण्याचा संकल्प मागल्या जानेवारीत सोडला होता. त्यासाठी इमेल, मिसकॉल वा नुसता फ़ोन करूनही सदस्य नोंदवण्यात आले. हा आकडा कितीही फ़ुगवून सांगता आला असता. त्या सदस्य अभियानाला माध्यमातून प्रचंड प्रसिद्धीही मिळाली. पक्षाला देशभर उमेदवारही मिळाले. पण लोकसभेत सर्वाधिक अनामत रकमा गमावण्याचा विक्रम करून कार्यक्रम आटोपला. यानंतर करोडो पक्ष सदस्य नोंदण्याच्या अभियानाचे नाटक संपले. पण त्याच लोकसभा निवडणूकीत अपुर्व यश मिळवलेल्या भाजपाने, तो केजरीवालांचा सदस्य नोंदणीला नाटकी कार्यक्रम उचलला आणि दहा कोटी सदस्य नोंदवायचा संकल्प सोडला. टोलफ़्री नंबरही जाहिरात करून जगासमोर मांडला. आजवर कदाचित दोनचार कोटी पक्षसदस्य भाजपाने नोंदलेले असतील. पण दिल्लीत जितके सदस्य नोंदले, तितकी तरी मते भाजपा मिळवू शकला आहे काय. याचा शोध घ्यायला हरकत नसावी. असे सदस्य नोंदलेले नसतानाही घरोघर जाणारे क्रियाशील कार्यकर्ते लोकसभेला अखंड राबले आणि भाजपाने पंधरा कोटीपेक्षा अधिक मते मिळवली होती. म्हणजेच सदस्यसंख्या व मतांची संख्या, यात कुठलेही नाते नसते. भाजपाने ते लोकसभेत सिद्ध केले आणि केजरीवालांना त्याच लोकसभा मतदानात त्यातला फ़ोलपणा उमगला होता. त्यांनी तो नाद सोडला आणि भाजपाने तेच फ़सलेले अभियान हाती घेतले. ही पराभवाची बेगमी नव्हती काय? उलट भाजपाने प्रत्येक घरी जाऊन मतदाराशी जवळिक साधली त्याचा लाभ लोकसभेत मिळाला, ते ओळखून आम आदमी पक्षाने मागल्या चारसहा महिन्यात त्याचे अनुकरण केले. निकाल समोर आहेत. भाजपाचे पावतीफ़ाडे सदस्य वाढले आणि केजरीवालांचे मतदार वाढले.

दुसरी बाब जिचा उल्लेख वर आलेलाच आहे, ती आपली शक्ती ओळखून लढण्याची. दिल्लीत सव्वा वर्षापुर्वी अपुर्व यश पहिल्याच दणक्यात संपादन केलेल्या केजरीवाल यांना माध्यमांनी अफ़ाट प्रसिद्धी देऊन घोड्यावर बसवले आणि तेच मोदींचा विजयरथ रोखणार अशी हवा निर्माण केली. त्यात केजरीवाल फ़सत गेले. पण लोकसभेचा दणका बसल्यावर त्यांनी नेमके आत्मपरिक्षण केलेले असावे. देशभर फ़िरून चांगलाच दणका बसला असला, तरी अजिबात दुर्लक्ष करूनही दिल्लीत त्यांच्या उमेदवारांनी चांगली मते मिळवली होती. विधानसभेनंतरच्या सहा महिन्यात त्यांनी उचापती करूनही त्यांचा मतदार वाढला होता. तर पंजाब वगळता अन्यत्र त्यांच्या पक्षाला दणका बसला होता. त्याचा धडा त्यांनी घेतला आणि शत-प्रतिशत होण्याचे खुळ सोडून, आपला दिल्लीतला पायाच भक्कम करण्याचा चंग बांधला. त्यासाठी नंतर पाठोपाठ आलेल्या महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड व काश्मिरच्या विधानसभांकडे पाठ फ़िरवून फ़क्त दिल्लीतच लढायच्या तयारीला ते लागले. त्यामुळे त्यांचे अन्य राज्यातले सहकारी नाराज हाले होते, तरी केजरीवाल यांनी पर्वा केली नाही. भाजपा अन्य राज्यात शत-प्रतिशत होण्याच्या नादात आपले मित्र लाथाडत असताना, केजरीवाल यांनी दिल्लीत अधिकाधिक मतदार जोडण्याचे काम हाती घेतले आणि सहा महिने आधीच घरोघर जाऊन भिडण्याची मोहिम सुरू केली. याच्या उलट भाजपाने सातही खासदार निवडून आले असताना, दिलीकडे पाठ फ़िरवून अन्य राज्यात इतर पक्षातले नेते उमेदवार आणण्यात शक्ती खर्ची घातली. त्यासाठी जुन्या स्वपक्षीय कार्यकर्त्यांना नाराज करायचे काम हाती घेतले. थोडक्यात भाजपाने कार्यकर्त्याकडे पाठ फ़िरवली व नेत्यांची आयात आरंभली, तर केजरीवाल यांनी कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतदार जोडणे, हेच लक्ष्य ठेवून काम आरंभले. कशा भूमिका बदलल्या ना लोकसभेनंतर?

सव्वा वर्षापुर्वी विधानसभेत ‘आप’ला २७ टक्के मते होती, ती लोकसभेच्या पराभवातही ३४ पर्यंत पोहोचली होती. भाजपाला विधानसभेत ३४ टक्के मते होती त्यावरून लोकसभेत ४३ टक्केपर्यंत वाढली होती. २००९ च्या लोकसभेत भाजपाला १८ टक्केच मते मिळाली होती. त्यात अथक प्रचाराचे रान उठवून व कार्यकर्त्याला कामाला जुंपून, मोदींनी मतदानात १३ टक्के वाढ घडवुन आणली. त्यात देशभर साडे चौदा कोटी मतदान वाढले आणि भाजपाला त्यातली साडे नऊ कोटी मते अधिक मिळाली. तिथेच मोदींनी बाजी मारली होती. केजरीवाल यांनी नेमके त्याचे अनुकरण दिल्लीच्या विधानसभा मतदानाच्या वेळी केले. त्यांनी कार्यकर्त्याच्या माध्यमातून दोनतीनदा प्रत्येक घराशी संपर्क साधला आणि मतदानात वाढ करायचा चंग बांधला. त्यातून मतदान वाढले. अधिक पराभूत होणार्‍या कॉग्रेसला जाऊ शकणारी मते ‘आप’ला मिळण्याची सिद्धता केली. याच्या उलट भाजपाने मतदार वा कार्यकर्त्याला अंधारात ठेवून अन्य पक्षाचे नेते व आमदार यांच्याशी ‘संपर्कात’ रहाण्याचा अजब खेळ केला. थोडक्यात आपलीच यशस्वी रणनिती भाजपाने सोडून दिली आणि तिचा केजरीवालांनी उपयोग केला. म्हणून मागल्या विधानसभेइतकीच मते आजही भाजपाकडे आहेत, पण जागा मात्र २८ ने कमी झाल्या. उलट केजरीवाल यांनी पक्ष सोडून जाणार्‍या नेत्यांची पर्वा केली नाही, तर कार्यकर्ते व मतदारांवर भिस्त ठेवली. भाजपाने जिंकू शकणार्‍या उमेदवारांची आयात केली, तर आम आदमी पक्षाने उमेदवार निवडून आणणार्‍या कार्यकर्त्यांवर विसंबून लढाई जिंकली. दोन्ही पक्षांनी लोकसभेनंतर ‘आप’सात भूमिकांची अदलाबदल केल्याचा हा परिणाम साफ़ दिसतो. म्हणूनच लोकसभा निकालानंतर आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्या बदललेल्या आमुलाग्र भूमिकांचा अभ्यास केल्याशिवाय दिल्लीच्या या अपुर्व निकालांचे विश्लेषण होऊ शकत नाही.

1 comment:

  1. आणि सदस्य नोंदणीचे दोनवेळा फसलेले नाटक संघासारख्या मातब्बर मातृसंस्थेनेही राबवले.
    काय फायदा झाला ते गुलदस्त्यात आहे.

    ReplyDelete