Tuesday, February 24, 2015

विचारांसाठी माणसांना कोण ठार मारतो?


 (इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी)

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर पुन्हा एकदा बिनबुडाच्या आरोपांचा कांगावा सुरू झाला आणि विनाविलंब डझनावारी ‘आम्ही सारे’ म्हणत भोंदू लोक रस्त्यावर आले. अर्थात त्यात आता नवे काही राहिलेले नाही. ताबडतोब खुन्यांना हल्लेखोरांना अटक करायच्या मागण्याही आता नेहमीच्याच झाल्या आहेत. त्यात जणू खुन होताना बघितले आहे, असा आवेश असतो. पण नुसते आरोप करायचे आणि धुरळा उडवायचा. मग ज्याची हत्या झाली त्याच्याविषयीची सहानुभूती जागवून आपल्या राजकीय पोळ्या त्यावर भाजून घेण्याचा उद्योग आता नित्याचा झालेला आहे. त्यात बळी पडलेल्याविषयी किंचितही आत्मियता नसते. त्यापेक्षा अशा दुर्घटनेची इव्हेन्ट करण्या्ची जणू स्पर्धाच चालू होते. पानसरे यांच्या हत्येनंतर त्याला उधाण आले तर नवल नव्हते. कारण ती नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडानंतरची पुनरावृती होती. खरेच अशा हत्या व हल्ले राजकीय असतात आणि त्यामागे नेमके काही हेतू असतात, याबद्दल शंका नाही. पण कुठल्याही गुन्हा व खुनामागे काहीतरी हेतू असतो. कोणाचा तरी लाभ अशा हत्याकांडामागे असतो. असा कुठला हेतू असु शकतो, त्याचे विवेचन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळातील नेते एम एम मणी यांनी केलेले आहे. त्यावरून तीनच वर्षापुर्वी काहुर माजलेले होते. अर्थात केरळ इथून खुप लांब असल्याने इथले विवेकवादी तेव्हा ढाराढूर झोपा काढत होते. त्यांनी त्याबद्दल चकार शब्द उच्चारला नाही. त्यांचा विवेक झोपेतून जागा होण्यासाठी दाभोळकरांना आपल्या प्राणाची किंमत मोजावी लागली. तरीही अजून यापैकी कोणी मणी नामक मार्क्सवादी नेत्याने केलेले मार्गदर्शन अभ्यासायला तयार दिसत नाही. राजकीय हत्या करण्याचे धोरण व कारस्थान डाव्यांनी कसे पुर्वापार चालविले आहे, त्याचा तपशीलच मणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितला होता.

२००८ सालात केरळमध्ये मार्क्सवादी पक्ष सोडून गेलेल्या आणि वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन करणार्‍या टी. पी. चंद्रशेखरन या आपल्याच जुन्या सहकार्‍याची डाव्या नेत्यांनी कशी वैचारिक लढाई केली? त्यांनी त्याला ठार मारून संपवले. त्याचे प्रकरण २०१२ मध्ये खुप गाजत होते. डाव्या किंवा पुरोगाम्यांची वैचारिक लढाई कशी असते? त्यांचे काही विचार आहेत आणि तत्वज्ञान आहे. तेच अंतिम असून त्याला मान्यता देण्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नसते. ते अमान्य करणे किंवा त्याच्या विरोधात लढायला उभे रहाणे, म्हणजे प्राणांची बाजी लावणे होय. चंद्रशेखर हत्याकांडाचे प्रकरण गाजत असताना इद्दूकी जिल्ह्याचे मार्क्सवादी चिटणिस मणी यांनी आपल्या पक्षाने चंद्रशेखर यांची हत्या केलेली नाही, असा निर्वाळा भाषणातून दिला होता. पण तेवढ्यावर न थांबता, तसे असते तर आपला पक्ष खुनाची जबबादारी घ्यायला कचरला नसता अशीही ग्वाही देऊन टाकली. त्याला दुजोरा देण्यासाठी मणी यांनी त्यापुर्वी पक्षाने तीन हत्या कशा पद्धतशीरपणे घडवून आणल्या, त्याचाही तपशील याच भाषणातून दिला. पुरोगाम्यांच्या दुर्दैवाने कोणीतरी त्याचे चित्रण करून ठेवले आणि त्याचा बभ्रा झाला. सहाजिकच तिथल्या विधानसभा व राजकारणात डावे कुठल्या ‘माळेचे’ मणी आहेत त्यावर चर्चा झाली. आपल्या राजकारणात आडव्या येणार्‍यांना आपण कसे खड्यासारखे बाजूला करतो, याची कबुलीच मणी यांनी दिलेली होती. मुद्दा इतकाच, की लेनीन स्टालीन वा चे गव्हेरा यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नक्षलवाद्यांच्या जंगलातही शिरायचे कारण नाही. लोकशाहीत विचार जोपासण्यासाठी विचार कसे जीवानिशी मारावेत, याचे मार्गदर्शन मार्क्सवादी नेत्याने केलेले आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या विवेकवादी परिवर्तनाच्या चळवळीने कुठली अफ़ुची गोळी घेऊन गाढ झोपणे पसंत केले होते?

आज उपोषणे करणारे वा फ़लक मिरवणारे तेव्हा विवेकशून्य होऊन बिळात दडी मारून बसले होते काय? जगातली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतातली महाराष्ट्रातली कम्युनिस्ट चळवळ वेगळी नाही. सर्वांच्याच विचार धोरणात प्रसंगी हिंसा करण्याचा सारखाच अंतर्भाव आहे. त्यातले काही पानसरे यांच्यासारखे निव्वळ वैचारिक वाद प्रतिवादात रमणारे असतात, तर काही थेट कृती करणारे हिंसकही असतात. म्हणून प्रत्येक कम्युनिस्ट वा पुरोगामी हिंसक हल्लेखोर होत नाही. पण हिंदूत्ववाद्यांना जर सरसकट नियम लावला जाणार असेल, तर कम्युनिस्टांनाही सरसकट तोच नियम लावावा लागेल ना? दोनचार हिंदूत्ववादी हिंसक कृती करतात, म्हणून त्यांची संपुर्ण संघटनाच खुनी ठरवायची असेल, तर दोनचार खुनी कम्युनिस्टांसाठी संपुर्ण चळवळच हल्लेखोर म्हणावी लागेल ना? कारण कुठल्याही विचारांचा अतिरेक व्हायला लागला, मग त्यातून हिंसेचा उदभव होत असतो. आपला तो विचार आणि तोच बाकीच्यांनी निमूट मान्य केला पाहिजे, असा अट्टाहास असहिष्णूतेला जन्माला घालत असतो. त्याची सुरूवात भिन्न विचारांना वा वेगळ्या मतांवर झुंडीने हल्ला करण्यातून होत असते. दाभोळकर-पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर एका संघटना विचारांच्या लोकांवर ज्याप्रकारे आरोप सुरू झाले, तेच मुळात असहिष्णू वृत्तीचे द्योतक आहेत व होते. ते आपल्या विचारांचे नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते हल्लेखोर आहेत असा एकसुरी प्रचार त्यांच्या विरोधातील हिंसेला प्रेरणा देणारा असतो. कारण अशी एकसुरी प्रतिक्रियाच कळपाची वा झुंडीची मानसिकता जोपासत असते. आपले नाहीत वा समविचारी नाहीत, म्हणूनच ते शत्रू आणि आपले शत्रू म्हणूनच त्यांच्यापासून जगाला धोका असल्याचा मानसिक प्रवास आपोआप होत जातो. केरळचे डावे मार्क्सवादी नेते मणी त्यातूनच मग हिंसेचे समर्थन करतात व कृतीही करतात.

सवाल इतकाच आहे, की तसेच असेल तर विवेकाचे व वैचारीक संघर्षाचे नाटक कशाला? प्रतिकार वा प्रतिहल्ल्याची शक्ती नसल्याने मग वैचारिक मुखवटा चढवला जातो. पुढे शक्ती जमा झाली, तर तितकाच हिंसक प्रतिकार करायची इच्छा त्यातून लपत नाही. ‘हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है’ अशा घोषणा विवेकाचे प्रतिक आहेत काय? कातील जिंदा है म्हणून शरम वाटत असेल, तर शरम संपवायचा कुठला मार्ग असतो? तो मार्ग चोखाळण्याची इच्छा त्यातून व्यक्त होत नाही काय? अशा घोषणा कायदा व शिक्षा देण्याचा अधिकार हाती घेण्याची अतीव इच्छा व्यक्त करत नाहीत काय? त्यालाही हरकत नाही. पण मग उगाच संयमाचे वा विवेकाचे नाटक कशाला? कालपरवापर्यंत बंगालमध्ये डाव्यांची सत्ता कशाच्या बळावर होती? आज तीच झुंडशाही ममताच्या गोटात गेल्यावर डाव्यांना विवेक आठवू लागला आहे. पण आता त्यांची सद्दी संपली असून ममताची झुंडशाही मोकाट आहे. तिच्याशी भाजपा झुंज देतो आहे. उद्या तीच झुंडशाही भाजपाच्याही गोटात दाखल होईल आणि मग ममताला विवेकाचे महत्व आठवेल आणि विचारांची लढाई विचारांनी करण्याचे शहाणपण सुचेल. विवेक वगैरे गोष्टी सोयीच्या असतात. जेव्हा आपल्या मनगटात हल्ला करायची शक्ती नसते, तेव्हा विवेकाच्या गप्पा करायच्या आणि रक्त सांडण्याची कुवत आली, मग दुसर्‍यांची मुस्कटदाबी करायची हा सर्वच राजकीय चळवळी व संघटनांचा खाक्या राहिला आहे. तेव्हा कोणीही उगाच वैचारिक संघर्षाच्या गमजा करण्याचे कारण नाही. दाभोळकर पानसरे अशा लोकांच्या संगतीत असले, तरी व्यक्ती म्हणून विवेकी होते. त्यांचा हकनाक बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. त्याचे भांडवल व इव्हेन्ट करून कोणी किती राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या, हा निव्वळ बेशरमपणा होत चालला आहे. तो कुठेतरी थांबवला पाहिजे.

3 comments:

  1. भाऊ,या मार्क्सवादी लोकानी गेल्या कित्येक वर्षात २५० च्यावर संघ आणि संघ परिवारातील व्यक्तिंच्या हत्या केल्या आहोत, आणि त्यातिल कित्येक तर कम्युनिस्ट विचारधारेला कंटाळुन संघात आलेले होते

    ReplyDelete
  2. खरं म्हणजे गोविंद पानसरे जानवेबाज मनुवादी बामणांचे छुपे समर्थक होते हे त्यांच्याच पुस्तकात दिसून येते. उदा शिवाजी महाराज गोब्राम्हण प्रतिपालक होते, त्यांची मुंज झाली होती म्हणजे ते ब्राम्हण होते, त्यांना ब्राम्हणांचा कळवळा होता, त्यांचा घरवापसीला व गोहत्या बंदीला सुध्दा पाठिंबा होता असे सर्व पुरावे शिवाजी कोण होता या पुस्तकात पानसरेंनी दिलेले आहेत. अर्थात हे सत्य उशिराने कळल्याने चिडलेल्या मूर्ख बीग्रेडींनी त्यांचा खून करून त्यांना ढगात पाठवले हीच शक्यता जास्त आहे....
    - बोला शेपुट मैय्या की जय !

    ReplyDelete
  3. तर्कशुद्ध विचार आचरणात न आणता नुसता बोभाटा करणार्या तुचियांना भक्कम टॊला!

    ReplyDelete