Friday, April 1, 2016

सास कभी किसीकी बहू नही थी

१९७७ साली लोकसभेत कॉग्रेसचा दारूण पराभव झाला आणि जनता पक्षाला थेट बहूमत मिळाले होते. त्यात इंदिराजी व संजय गांधीही थेट निवडणूकीत पराभूत झाले होते. त्यानंतर मोरारजी देसाई सरकारने इंदिराजींच्या मागे अनेक चौकशी आयोगांचा ससेमिरा लावलेला होता. त्यात इंदिराजी खरेच निराश होऊन गेल्या होत्या. त्यांना चौकशीत तसेच गुंतवून बेजार करण्याचा डाव मोरारजी खेळत होते. पण प्रत्यक्ष इंदिराजींना अटक करण्याची कठोर कारवाई त्यांनी टाळली होती. त्यांचे सहकारी आणि गृहमंत्री चौधरी चरणसिंग मात्र कठोर कारवाईसाठी उतावळे झाले होते. पण पंतप्रधान मोरारजींनी त्याला नकार दिला होता. निवडणूकीतला पराभव हीच इंदिराजींना मिळालेली उत्तम शिक्षा असून, अटकेचे पाऊल घातक ठरेल असा त्यांचा सल्ला होता. कारण त्यातून इंदिराजींना सहानुभूती मिळण्याची शक्यता होती आणि तेच खरे होते. पण उतावळ्या चरणसिंग यांनी अर्धवट माहितीच्या आधारे इंदिराजींना अटक करण्यासाठी एक खटला तयार केला आणि खरेच एक दिवस पोलिसांचा फ़ौजफ़ाटा इंदिराजींच्या निवासस्थानी पाठवला. त्याचा पुरेपुर लाभ उठवित इंदिराजींनी असा काही तमाशा उभा केला, की अटकेपेक्षा राजकारण अधिक झाले आणि नामोहरम झालेल्या इंदिराजी त्यातून फ़िनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभ्या राहिल्या. आपल्या अटकेला नाट्यमय रुप देऊन इंदिराजींनी राजकीय नाट्य उभे केलेच. पण खटल्यातील आरोपात दम नसल्याने त्यांना एकही दिवस कस्टडीत ठेवणे सरकारला शक्य झाले नाही. सहाजिकच जनता पक्षाच्या लोकप्रियतेला तिथे पहि्ला दणका बसला आणि इंदिराजींना सहानुभूती गोळा करण्याची अपुर्व संधी प्राप्त झाली. काही महिन्यापुर्वी सोनिया राहुलच्या विरोधात खाजगी खटल्याचे समन्स निघाले, तेव्हा सोनियांनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याची आठवण करून दिली होती. त्यात किती तथ्य होते?
डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी कोर्टाने गांधी कुटुंबाला समन्स जारी केले. ती अटक नव्हती की वारंट नव्हते. तिथे हजर होऊन सुनावणीला गैरहजर रहाण्याची सवलत त्यांना मिळवता आली असती. पण सोनियांनी इंदिराजींचा वारसा चालवण्याचा अनाठायी अट्टाहास केला. जणू मोदी सरकारच आपल्याला त्रास देत असल्याचा कांगावा करीत, त्यांनी ‘आपण इंदिराजींची सून आहोत’ असे विधान तेव्हा केलेले होते. त्याचा अर्थ त्यांना १९७८ सालातल्या इंदिरा अटकेचे नाट्य सांगायचे होते. पण दोन्ही परिस्थिती व प्रकरणात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. तेव्हा इंदिराजींना अटक झाली ती सरकारी कारवाई होती. इथे खाजगी खटला असून अटकेचा विषयही नव्हता. पण जो संदर्भ सोनियांनी दिला, त्याचा लाभ उठवायची त्यांची इच्छा लपून राहिली नाही. मात्र इंदिराजी असल्या खेळी किती जपून व धुर्तपणे खेळत, त्याची जाण सोनियांना नाही, की त्यांच्या सल्लागारांना नाही. म्हणूनच त्यांना वारंवार तोडाघशी पडण्याची नामूष्की येत असते. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अकारण हायकोर्टात समन्सच्या विरोधात अपील करण्यात आले आणि तिथे ‘गुन्हेगारी हेतू’ असा ताशेरा मारला गेल्यावर निमूटपणे सोनिया राहुलना खालच्या कोर्टात हजेरी लावणे भाग पडले. त्याचा कुठलाही राजकीय लाभ त्यांना मिळू शकला नाही. वास्तविक त्या अनुभवानंतर तरी आपल्या सल्लागारांचा नाद सोनियांनी सोडायला हवा होता. तसे झाले असते, तर अरूणाचल व उत्तराखंडात कॉग्रेसला तोंडघशी पडायची वेळ आली नसती. जे नाटक कालपरवा उत्तराखंडाच्या विधानसभेत झाले, तेच काही महिन्यांपुर्वी अरूणाचल विधानसभेच्या बाबतीतही घडले होते. अनुभवातून इंदिराजी शिकत होत्या आणि सोनिया प्रत्येक अनुभवानंतर त्या चुका तशाच करत असतात. उत्तराखंड त्याचा उत्तम नमूना आहे.
कॉग्रेसश्रेष्ठी ही संकल्पना इंदिराजींच्या काळात रुढ झाली. पण राज्यपातळीवर सत्तेत वा पक्ष संघटनेत बेबनाव निर्माण झाला, तर विनाविलंब इंदिराजी आपल्या कुणा विश्वासू सहकार्‍यामार्फ़त त्यात हस्तक्षेप करीत. त्याची घोंगडी भिजत ठेवली जात नसायची. श्रेष्ठी म्हणून इंदिराजी अखंड पक्ष व त्याच्या राजकारणाला वेळ देत असत. म्हणूनच कोणीही कार्यकर्ता त्यांच्याविषयी नाराज नसायचा. राहुल वा सोनिया तशाच निष्ठा इतरांकडून अपेक्षित वा गृहीत धरतात. पण जेव्हा कार्यकर्त्याची तक्रार ऐकून घेतली जावी अशी अपेक्षा असते, तेव्हा त्यांना वेळही दिला जात नाही. गेल्या वर्षी माजी मंत्री जयंती नटराजन यांनी दिड वर्ष आपल्याला राहुल गांधींनी भेटायला वेळ दिला नाही, अशी तक्रार करून पक्षाला रामराम ठोकला होता. काहीशी तशीच तक्रार लालूंचे मेहूणे साधू यादव यांनी तीन वर्षापुर्वी राहुलबाबत केली होती. आज सत्ता गमावल्यानंतरही राहुलना आपल्याच निष्ठावान कार्यकर्त्यांना भेटायला सवड मिळत नाही आणि कन्हैया ते वेमुलांना न्याय देण्याच्या गमजा मात्र तेच राहुल गांधी करीत असतात. उत्तराखंडाच्या नाराज आमदारांनी नेमकी तीच तक्रार केली आहे. किती दिवस पाठपुरावा करूनही राहुल भेटले नाहीत, म्हणून आपल्याला बंडाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला, अशी त्यांची तक्रार आहे. आपल्याच पक्षाच्या सरकारमध्ये असलेल्या समस्या सोडवायला ज्यांना वेळ नाही, ते पक्षश्रेष्ठी असल्यावर यापेक्षा वेगळे काय होऊ शकते? इंदिराजींच्या पुत्राशी विवाह केल्याने कोणीही त्यांची सुन होऊ शकते. पण त्यांचा वारसा सांगायचा आणि पक्षात श्रेष्ठी व्हायचे असेल, तर राहुल वा सोनियांना इंदिराजींइतके जागरूकपणे सहकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणे अवश्यक आहे. सत्ता गमावल्यावरही त्यांना आपली मग्रुरी वा अहंमन्यता त्यागता येत नसेल, तर नुसत्या नात्याने वारसा सांगण्याचे तरी कारण काय?
लोकसभेतील बहूमत गमावल्यानंतर आणि पक्षातल्या ब्रह्मानंद रेड्डी व यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांनी साथ सोडली असताना, पक्ष फ़ोडूनही इंदिरा गांधी यांनी दिड वर्षात दोन नव्या राज्यात सत्ता संपादन केली होती. कर्नाटक व आंध्रप्रदेशात वेगळी चुल मांडलेल्या इंदिरा कॉग्रेसला इंदिराजींनी सत्तेवर आणून बसवले होते. सोनियांनी लोकसभा गमावल्यानंतर वीस महिन्यात कोणती कमाई केली, की सासूच्या वारश्याच्या गमजा कराव्यात? सासू हाताशी काहीही नसताना फ़ुटलेल्या पक्षाला दोन नव्या मोठ्या राज्यात सत्ता मिळवून देते. उलट सून सोनिया गांधी लोकसभा गमावल्यानंतर दोन छोट्या राज्यात पक्षाकडे असलेली सत्ता गमावण्याचा चमत्कारीक पराक्रम करून दाखवतात. ‘आपण इंदिराजींची सून आहोत’ अशी दर्पोक्ती सोनियांनी केल्यानंतर अवघ्या चार महिन्यात अरूणाचल व उत्तराखंडातली सत्ता पक्षाने गमावली आहे. ती गमावण्यात विरोधकांचे कुठलेही सामर्थ्य नाही. पक्षातला बेबनाव थोपवण्यात सोनिया वा राहुल तोकडे पडल्याने ही नामुष्की ओढवली आहे. कुठल्या स्थितीत काय डाव खेळावा आणि केव्हा पडते घेऊन माघारीतही कसे यशस्वी राजकारण खेळावे, याचे दाखले इंदिराजींच्या वारशात सामावलेले असतात. तिथे अहंकाराला स्थान नव्हते. म्हणून यशवंतरावांच्या गोटातल्या वसंतदादांना मुख्यमंत्री व्हायला बिनशर्त पाठींबा देऊन इंदिराजींनी चव्हाणांना त्यांच्याच राज्यात शह दिला होता. सोनियांना यापैकी काय साधले आहे, त्याची तरी जंत्री त्यांच्याच चमच्यांनी द्यावी. आपण इंदिराजींची सुन आहोत आणि म्हणून कोणाला घाबरत नाही, असली मुक्तफ़ळे उधळून कोणी इंदिराजींचा वारस होऊ शकत नाही. तितकी चतुराई, लवचिकता, निर्धार आणि योग्य संधीचे सोने करण्याची किमया अंगात असवी लागते. जिचा लवलेश सोनिया राहुलमध्ये आढळत नाही. पण ज्याच्या खाणाखुणा नरेंद्र मोदींमध्ये आढळतात. मग ते कुणाला आवडो किंवा नावडो!
नॅशनल हेराल्ड प्रकरणानंतर सोनिया म्हणाल्या, आपण ‘इंदिराजींची सुन आहोत, कोणाला घाबरत नाही’. थोडक्यात त्यांना सांगायचे होते, ‘सास भी कभी बहू थी’. पण ती वस्तुस्थिती नाही. इंदिराजी कधीच बहु नव्हत्या. कधी त्यांनी गृहिणी म्हणूनही संसार केला नाही. कोवळ्या वयापासून घरातल्या स्वातंत्र्य चळवळ किंवा राजकारणाच्या बाळकडूचे घोट घेत इंदिराजी वाढल्या, जगल्या. त्यात मध्यंतरी त्यांचा विवाह झाला आणि दोन मुलेही झाली. पण चुलमुल संभाळणारी आई वा बहू होणे त्यांच्या नशिबी कधीच आले नाही. पतिशी फ़ार जमले नाही, तेव्हा इंदिराजी पित्याकडे माहेरी आल्या. तेव्हा डोक्यावर आईची छायाही नव्हती. पदरी दोन मुलगे असताना त्यांना संभाळत इंदिराजींनी पंतप्रधान पित्याच्या घराचा डोलाराही संभाळला होता. थोडक्यात सासूची सून किंवा माहेरवाशिण असे इंदिराजींच्या नशिबी काहीही आले नाही. त्यांना आयुष्याचा प्रत्येक धडा स्वत:च्या अनुभवातून शिकावा लागला. राजकारणात नेहरूकन्या म्हणून संधी मिळाली, तरी आपल्याच पायावर आणि कर्तृत्वावर उभे रहावे लागले. त्याचा पित्याच्या पुण्याईशीही संबंध नव्हता. म्हणूनच इंदिराजींशी सोनिया स्वत:ची तुलना करू बघतात, हे एकूणच हास्यास्पद आहे. कारण सोनिया भले इंदिराजींची बहू असतील. पण त्यांची सास कधीही कोणाची बहू नव्हती. इंदिराजींना पित्यामुळे संधी मिळाली तरी त्या स्वयंभू होत्या. म्हणूनच राजकारणात कधीही त्यांना आपल्या पुर्वजांच्या पुण्याईचे भांडवल करावे लागले नाही. आजच्या जमान्यात तसे नरेंद्र मोदींबद्दल म्हणता येईल. अगदी अमेठीच्या अंगणात तुलसी म्हणून उभ्या राहिलेल्या स्मृती इराणीविषयी म्हणता येईल. पण बारीकसारीक प्रसंग ओढवला, मग आपण इंदिराजींची बहू असल्याचे हवाले देणार्‍या सोनियांपाशी इंदिराजींचे स्वयंभू कर्तृत्व नाही, तर नुसत्या दर्पोक्तीने काय साध्य होणार आहे?

2 comments: