Monday, April 11, 2016

आत्मघातकी गर्दीचा खेळ



केरळच्या एका मंदिरात नववर्षाच्या स्वागताला घडलेली दुर्घटना डोळे उघडणारी आहे. अर्थात कुठल्याही दुर्घटनेनंतर आपले डोळे उघडण्याची गरज असते. विचारवंतही डोळ्यात अंजन घालणारा अनुभव, असे प्रवचन देतात. पण डोळ्यात अंजन जाऊन त्याचा परिणाम व्हायला हवा असेल, तर डोळे उघडे असायला हवेत. आपल्याकडे कोणी डोळे उघडून बघायलाच तयार नसेल, तर अंजन काय कामाचे? ज्या भीषण घटना घडून गेल्यावरही आपल्याकडे डोळे उघडण्याची कोणाला इच्छा होत नाही, त्या देशात कुठले अंजन आणि कुठला धडा? त्यामुळे केरळच्या ताज्या दुर्घटनेनंतर पुढेही त्याच अनुभवातून जाणे भाग आहे. रविवारी सकाळी लोकांनी आपले टिव्ही संच चालू केल्यापासून त्याच दुर्घटनेचे वार्तांकन चालू होते आणि त्यात त्यामागे कोणकोण दोषी आहेत, त्याचा आढावा घेतला जात होता. जणू कोणाच्या तरी माथी खापर फ़ोडले, म्हणजे विषय निकालात निघणार असावा. पण कोणामध्ये इतकी माणसे हकनाक मारली गेल्याची वेदना जाणवताना दिसत नव्हती. स्थानिक प्रशासन वा मंदिराचे कोणी विश्वस्त त्याला जबाबदार असतील. पण याक्षणी दोषारोप करण्यापेक्षा मदतकार्याला प्राधान्य असायला हवे, इतकेही भान कोणाला नव्हते. ही खरी कायमची दुर्घटना आहे. ज्यांच्याकडे आपण जबाबदार म्हणून बघतो, असा समाजातला उच्चभ्रू घटकच असा बेताल झाला आहे. विविध राजकीय पक्षांना परस्पर विरोधात झुंजवणे याला शहाणपणा म्हणायचे असेल, तर अशा घटनांपासून मुक्ती अशक्य आहे. अशा घटनांचा वापर लोकशिक्षण वा प्रबोधनासाठी करण्याची कोणाला इच्छाही होत नाही. बाकी सगळे जितके जबाबदार आहेत, तितकेच त्यात ज्यांचे बळी गेले वा जखमी झाले, त्यांचाही दोष नाही काय? अपघात मानवनिर्मित आहे आणि आयोजकांइतकेच त्यात बेभान होऊन सहभागी होणारेही दोषी नाहीत काय?

जिथे जिथे गर्दी जमते, तिथे नुसत्या बेशिस्तीने मोठी दुर्घटना घडू शकत असते. म्हणूनच गर्दीच्या जागी जाणार्‍यांनी आपापल्या सुरक्षेचा विचार करणे हे पहिले त्यांचे कर्तव्य नाही काय? गणेशोत्सवाच्या कालखंडात मुंबईत पोलिस लक्षावधी लोकांच्या गर्दीचे आधीपासून नियोजन करीत असतात. त्यासाठी दिड दिवस आधीपासून वाहने कुठून कुठे जाऊ शकतात, त्याचा तपशील जाहिर केला जातो. अधिक शक्यतो वाहने घेऊन बाहेर पडू नका, असे आवाहनही केले जाते. मोठ्या प्रमाणात नागरिकही सहकार्य करतात. अन्यथा इवल्या मुंबईत पन्नास साठ लाख लोकांची झुंबड काही हजार पोलिसांना आवरणे अशक्य आहे. पण परिस्थितीचे भान सामान्य माणूस सुद्धा  राखतो, म्हणून अशा सोहळ्यात फ़ारसे अपघात होऊ शकत नाहीत. आणि झालेच तर हजारो माणसे निव्वळ चेंगराचेंगरीनेच मारली जाऊ शकतात. पण त्या सुरक्षेचे श्रेय जितके पोलिसांचे व प्रशासनाचे आहे; तितकेच सामान्य नागरिकाचे आहे. तसे केरळच्या घटनेविषयी म्हणता येत नाही. कारण अपुरी जागा व कोंदट परिसरात हजारो लोक जमले होते आणि अपरात्री तिथे फ़टाक्यांची आतषबाजी व्हायची होती. घटनास्थळाचे चित्रण बघितले तर नारळाची झाडे चहूकडे आहेत. म्हणजेच उंचावर उडणारी झेपावणारी आतषबाजी चहूकडे ठिणग्या पसरवणारी असणार, हे गृहीत धरावे लागते. त्याच माडांच्या खाली लोकांची गर्दी असणार आणि त्याच्याच आसपास कुठेतरी फ़टाक्यांचे साठे केलेले असणार. थोडक्यात अपघात घडण्याची सर्व सज्जता तिथे होती आणि सुरक्षेची कोणाला पर्वाच नव्हती. कायदा प्रशासनाने कागदी घोडे नाचवून कारवाई उरकली होती. म्हणजे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन, फ़क्त दक्षतेचे पुरावे तितके निर्माण केलेले होते. सहाजिकच व्हायचा तो अपघात घडला आणि त्यात कित्येकांचे बळी गेले. शेकडो जखमी झाले.

कुठलाही उत्सव किंवा सणसमारंभ हा मूळातच आनंद लुटण्यासाठी असतो, याचा विसर पडला, मग यापेक्षा वेगळे काय घडू शकते? सणसमारंभ हे माणसांनी एकत्र येऊन साजरे करायचे असतात. त्यात आनंद वाटणे व जमा होऊन आनंदित होणे, ह्याला महत्व असते. त्यासाठी आवश्यक असलेली नाचगाणी संगीत हा पारंपारिक बाज आहे. पण हल्लीच्या जमान्यात विविध नव्या गोष्टी त्यात सहभागी होत गेल्या आहेत. विजेचा वापर रोषणाईसाठी होतो, तर ध्वनीवर्धकाचाही सर्रास वापर होतो. त्यातच मग फ़टाक्यांची आतषबाजी घुसलेली आहे. यातून आनंदापेक्षा देखाव्याला महत्व आले आहे. कोण किती भव्यदिव्य काही करतो, त्याचे गुणगान माध्यमातून देशभर पोहोचवले जात असते. सहाजिकच लोकांचे व माध्यमांचे लक्ष वेधण्याची मनोवृत्ती वाढलेली आहे. राजकारणापासून कुठल्या मंदिरात प्रवेश मिळवण्याच्या आंदोलनापर्यंत प्रत्येकाला प्रसिद्धीच्या नशेने झिंग चढलेली आहे. त्यातून मग या देखाव्याला प्राधान्य आलेले आहे. कारण प्रसिद्धी अधिक गर्दी खेचून आणते. पण अशा गर्दीचे कोणी नियंत्रण करायचे? त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? ही एक नवी समस्या आहे. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे आहे आणि ते मिळालेले आहे. त्या स्वातंत्र्यातून जे काही प्रश्न निर्माण होतील, त्याची जबाबदारी मात्र कोणाला नको आहे. सहाजिकच त्या कुठल्या मंदिरात नववर्षाचा सोहळा होणार, त्यात सहभागी व्हायला लोकांनी गर्दी करावी म्हणून आयोजकांनी देखावे उभे करायचे. पण गर्दी प्रशासनाने हाताळायची असा एक सार्वत्रिक समज आहे. तेही अयोग्य म्हणता येणार नाही. पण प्रशासन जबाबदार असेल, तर त्याने लागू केलेले नियम वा निर्बंधही स्विकारायला हवेत. तिथे मग स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा गदारोळ सुरू होतो. आम्ही वाटेल तसे स्वातंत्र्य उपभोगू आणि प्रशासनाने आमच्या बेतालपणातून सुरक्षेचा मार्ग काढला पाहिजे, असा हट्ट असतो. तेच दुर्घटनेला आमंत्रण देत असतो.

ज्या पद्धतीचा आगडोंब या घटनेमध्ये उफ़ाळला आहे, त्याचे स्वरूप बघता त्याचीच सज्जता आयोजकांनी केलेली असल्याचे दिसून येते. उडालेल्या फ़टाक्याची कुठली ठिणगी येऊन साठवलेल्या दारूसामानात पडली आणि बघता बघता आगडोंब उसळला. आधी आग लागली आहे की आतषबाजीच चालू आहे, तेही कोणाला कळू शकले नाही. अपरात्रीच्या अंधारात आतषबाजी आणि आगडोंब यातला फ़रक कळणेही अशक्य असते. म्हणूनच आतषबाजी ही अतिशय नियंत्रित स्वरूपात करायचा खेळ आहे. त्याबद्दल असलेले नियम व निर्बंध काटेकोर पाळले गेले पाहिजेत. तसे होणार नसेल, तर सक्तीने त्यावर बंदी आणली गेली पाहिजे. पण मतदानाच्या मोसमात कोणी शासक वा राज्यकर्ते इतके कठोर होऊ शकत नाहीत. मग गर्दी म्हणून गोळा होणार्‍यांना त्याची किंमत आपल्या प्राणाचे मोल देऊन मोजावे लागत असेल, तर लोकांनी शहाणे व्हायला नको काय? आज अशा घटनेचे खापर सरकार वा प्रशासनावर फ़ोडले, मग तिथे प्राणघातक गर्दी करणार्‍यांना आपली चुक कधीच उमगत नाही आणि पुन्हा अशा घटना घडण्याची शक्यता जिवंत रहाते. डोळे दिपवणारे काही बघावे, सादर करावे ही मानवी ओढ समजू शकते. पण असे प्रयोग करणारे त्यासाठी काटेकोर काळजी घेत असतात. कुठेही असे खेळ करण्याइतका तो सोपा मामला नसतो. हे लोकांना शिकवण्याची गरज आहे. लाखोच्या संख्येने लोक जिथे जमा होतील, तिथे नुसती धक्काबुक्की वा चालढकलही शेकडो लोकांना नुसते घुसमटून मारू शकते. इथे तर गर्दीच्या पोटातच शोभेच्या दारूच्या कोठाराचा भडका उडाला. त्याला जितकी आग जबाबदार आहे, तितकीच स्फ़ोटक गर्दीही कारणीभूत आहे. हे लोकांच्या मनात ठसवणे हाच अशा अपघातांना पायबंद घालण्याचा उत्तम मार्ग आहे. पण त्याविषयी कोणी बोलणार नाही. नुसते दोषारोप होतील आणि पुढल्या दुर्घटनेला मोकळीक मिळत राहिल.

No comments:

Post a Comment