Sunday, April 3, 2016

लौकरच कन्हैयाला मॅगसेसे

साधारण १९६०-७० च्या दशकात विविध वर्तमानपत्रात लक्स या साबणाच्या जाहिराती यायच्या. त्यात रेखा किंवा सायराबानु यांची छायाचिते असायची. त्यांच्या तोंडी एक विधान असे, ‘माझ्या सौंदर्याचे रहस्य’! १९९० च्या आसपास या दोन्ही अभिनेत्री रुपेरी पडद्यावरून अस्तंगत झाल्या आणि लक्सच्या जाहिरातीमधून माधुरी दिक्षीत झळकू लागली. आजकाल त्या जाहिरातीत कतरीना कैफ़ नावाची अभिनेत्री दिसते. साबण तोच आहे, त्याचे उत्पादन करणारी कंपनीही तीच आहे. फ़क्त त्याच्यामुळे सौंदर्य मिळणारे चेहरे व महिला प्रत्येक पिढीत बदलत गेलेल्या आहेत. चारपाच वर्षे मागे गेलात, तर सामाजिक वा राजकीय क्षितीजावर असेच काही चेहरे झळकत होते. आज त्यांची झलकही कुठे दिसत नाही. २०११ च्या सुमारास देशात लोकपाल नावाची एक मोठी चळवळ झाली. त्याचा चेहरा म्हणून अण्णा हजारे देशव्यापी व्यक्तीमत्व होऊन गेले होते. देशातल्या कुठल्याही विषयावर तेव्हा कुठल्याही चॅनेलचे पत्रकार कॅमेरा घेऊन अण्णांची प्रतिक्रीया विचारायला धावत असायचे. दिल्लीत कोणीतरी एका शिख माथेफ़िरूने कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांच्या थोबाडीत मारल्याची घटना घडली होती. अशा निरर्थक घटनेविषयी कोणाचीही प्रतिक्रीया घेण्य़ाचे काहीही कारण नव्हते. पण डझनभर कॅमेरे राळेगण सिद्धी गावात पोहोचले आणि त्यावर अण्णांची प्रतिक्रीया विचारण्यात आली. गाफ़ील अण्णांनी उलट प्रश्न विचारला, ‘थप्पड मारा? एकही मारा?’ मग त्यावरून कल्लोळ माजला होता. पण तो अण्णांचा जमाना होता. आजकाल अण्णांच्या कुठल्याही मताची कुठल्याच वाहिनी वा वृत्तपत्राला किंमत वाटेनाशी झाली आहे. आज नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारचा जमाना आहे. २०१३ मध्ये तसा केजरीवालचा जमाना होता. आठनऊ महिन्यांपुर्वी गुजरातच्या हार्दिक पटेलचा जमाना होता.
याला व्यापारी भाषेत मार्केटींग म्हणतात. माल तोच असतो आणि तसाच असतो, तोच तोच माल खपवायला तात्कालीन नवे व लोकप्रिय मॉडेल शोधले जाते. त्याच्या करवी आपल्या मालाची जाहिरात केली जाते. पण एकदा त्या मॉडेलची बाजारातली लोकप्रियता संपली, मग त्याच्याकडे कोणी ढुंकून बघत नाही. पंधरा वर्षापुर्वी पेप्सीच्या जाहिरातीमध्ये विनोद कांबळी वा अझरूद्दीन दिसायचे. आज दिसतात का? तसा आज कन्हैयाचा मोसम आहे. ज्या पद्धतीत त्याचे मार्केटींग चालू आहे, त्यानुसारच प्रतिसाद मिळणार ना? पुण्यात फ़र्ग्युसन कॉलेजमध्ये नेहरू विद्यापीठातील घटनेच्या निमीत्ताने काही घडल्याचे छापून आले आणि तात्काळ त्यात राजकीय नेत्यांनी ढवळाढवळ सुरू केली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड तिकडे धावून गेले. त्याचा कल्लोळ झालेला बघून थोर समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही कन्हैयाला पुण्यात बोलावण्याचे घोषित करून टाकले. त्याला धाकटा भाऊ बनवून टाकले. हैद्राबादला कन्हैया जाऊन आला. रोजच्या रोज कन्हैया आता जगातल्या कुठल्याही घटना गोष्टींवर आपले मतप्रदर्शन करीत असतो. तमाम माध्यमे व वाहिन्या त्याचे ‘बहुमोल’ मत जनतेकडे घेऊन जायला उत्सुक व सज्ज असतात. अगदी बारकाईने बघितले, तर कन्हैया काही नवे बोलत नाही. काही बाबतीत तर मुर्खासारखे बोलतो. पण तरीही थोर विचारवंत किंवा बुद्धीजिवी असल्याप्रमाणे त्याच्या बोलण्याला वागण्याला प्रसिद्धी मिळते आहे. कारण जो माल आजवर अन्य मॉडेलकडून विकला जात होता, तोच माल विकायला कन्हैया तयार आहे. केजरीवाल काय बोलायचे आठवते? मोदी को हराना है! बस्स तीन महिने सलग केजरीवाल जाईल, तिथे कॅमेरे फ़िरत होते. पत्रकार धावत होते. मग गुजरातच्या हार्दिक पटेलचा मोसम आला. नित्यनेमाने हार्दिकचे बारीकसारीक मत आपल्यापर्यंत इमानेइतबारे पोहोचविले जाऊ लागले.
मग अडगळीत पडलेल्या विविध साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांचा जमाना सुरू झाला. एकामागून एक पुरस्कार वापसीच्या बातम्यांची चलती झाली. हळुहळू त्याची मजा संपली आणि ही मॉडेल्सही निकामी ठरली. मग माल विकायचा कसा? माल कुठला? मोदींना शिव्या हा माल आहे. तो विकायला नित्यनेमाने नवनव्या मॉडेल्सची गरज आहे. ती सहज मिळत नसतील, तर शोधावी लागतात. निर्माण करावी लागतात. मग देशद्रोहाचा आरोप झालेल्या व आठवडाभर तुरूंगात गेलेल्या कन्हैयाला हिरो म्हणून पेश केले जाते. त्याला जामिन मिळताच नाट्यमय रितीने पेश केले जाते आणि त्याच्या तोंडून आपला जुनाच माल खपवण्याचा व्यापार पुन्हा तेजीत आणायची धावपळ सुरू होते. कालपरवा नेहरू विद्यापीठात कन्हैयाने नवा सिद्धांत मांडला आहे, दोन वर्षे म्हणजे लोकसभा निकालानंतर अडगळीत जाऊन पडलेला गुजरात दंगलीचा माल कन्हैयाने बाहेर आणला आहे. त्याची आता नव्याने विक्री धडाक्यात सुरू करायची मार्केटींग बहुधा योजलेली असावी. दिल्लीच्या इंदिरा हत्येनंतर उसळलेल्या दंगली आणि गुजरातच्या दंगलीत मोठा फ़रक असल्याचे कन्हैयाने सांगितले आहे. तोच माल खपवण्यात तीस्ता सेटलवाडने कित्येक कोटींचा धंदा केला ना? पण लोकसभा मोदींनी जिंकली आणि गुजरातची दंगल खपवण्याचा बाजारच उठला होता. तीस्ता, केजरीवाल, विविध स्वयंसेवी संस्था किंवा सोनिया-राहुल, लालू यांनी कन्हैयापेक्षा काय वेगळे सांगितलेले आहे? पण कन्हैया त्याच शिळ्या कढीला ऊत आणतो आणि उपासमारीने गांजलेले सेक्युलर पत्रकार भुरके मारत, त्याच कढीवर ताव मारीत आहेत. यातून एक सिग्नल वा संकेत दिला जात असतो. कुमार सप्तर्षी कन्हैयाला पुण्यात आणायच्या गोष्टी त्या सिग्नलनुसार करीत असतात. तो सिग्नल काय आहे? हे मार्केटींग कसे चालते?
कन्हैयाला प्रसिद्धी देत रहायचे आणि त्याला कोणी कुठे देशाच्या कानाकोपर्‍यात बोलावले, त्याच्याही बातम्या झळकवायच्या. त्याचा अर्थ असा, की ज्याला कोणालाही देशव्यापी राष्ट्रीय वाहिन्यांवर प्रसिद्धी हवी असेल, त्याने कन्हैयाला आपल्या व्यासपीठावर आमंत्रित करावे. राष्ट्रीय वाहिन्या कन्हैयाचा कार्यक्रम म्हणून त्याला भरपूर प्रसिद्धी देतील. पर्यायाने सप्तर्षी वा अन्य आयोजकांना कधी नव्हे इतकी देशव्यापी प्रसिद्धी मिळून जाईल. अमुक विकत घेण्यावर तमुक काहीतरी फ़ुकट! कन्हैयाचे असे मार्केटींग सध्या चालू आहे. बदल्यात भाजपा, संघ वा मोदींना कन्हैया शिव्याशाप देईल, त्या ऐकून घ्यायला विविध भागात तुम्ही गर्दी जमवायची आहे. गर्दी नसली तरी बेहत्तर! थेट प्रक्षेपणातून देशात कन्हैयाची हवा असल्याचे चित्र निर्माण करायचे आहे. राहुल गांधींसारखा नेताही त्यासाठी लाचार झाला असेल, तर मार्केटींग किती प्रभावी रितीने चालू आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल. याची पुढली पायरी म्हणजे इतक्या महान कार्यासाठी येत्या वर्षी कन्हैयाला मॅगसेसे पारितोषिक मिळू शकेल. प्रतिक्षा करा. लौकरच तशी घोषणा होईल. मग देशात या कोवळ्या तरूणाने किती मोठी समाजजागृती केली, त्याचे जागतिक गोडवे गायले जातील. मग पुन्हा मॅगसेसे विजेता म्हणून त्याची कुठल्याही फ़डतूस विषयातली मते माध्यमातून मांडण्य़ाचा नवा मोसम उभा केला जाईल. २०१७ किंवा २०१८ मध्ये कन्हैयाकुमार किती लोकांच्या लक्षात असेल? हा मग संशोधनाचा विषय होऊन जाईल. कदाचित कन्हैयालाच आपली डॉक्टरेट मिळवायला नेहरू विद्यापीठात तो उत्तम संशोधनाचा विषय होऊ शकेल. गो. रा. खैरनार कोणाला आठवतात? अण्णा कुठे आहेत? जयप्रकाशांच्या मागे धावलेले सप्तर्षी कन्हैयाला धाकटा भाऊ म्हणू लागले असतील, तर मार्केटींगने लोक चळवळींना किती नामोहरम करून टाकले आहे, त्याचा नुसता अंदाज करावा.

5 comments:

  1. BHAU,, YA MIDIA VAR KHARCH KAHI BANDHAN NAHI KA URALE?

    KI "MAL" VIKATA VIKATA VIKANARE CHA VIKALE GELET?

    ReplyDelete
  2. भाऊ एकदम बरोबर आपण एका मोठय़ा अनेक दशके चाललेल्या देशविरोधी षडयंत्राचा विषय अगदी सोपा (उपहासात्मक ) करुन मांडला आहे. रोमन मेगेसेसे फोड फाऊंडेशन यांचे बिंग आपल्या सारख्यान मुळे बाहेर पडले.आपल्या देशातील विचारवंत, पत्रकार, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी यांनी कधीच ह्यातील परदेशी कावेबाज पणाचा पोलखोल केला नाही
    त्यामुळे मिडिया व पूरोगामी (जे मोठे विचारवंत, संशोधक,साहित्यिक पत्रकार व पुरस्कार विजेते विशेषतः रोमन मेगेसेसे आवाड॔ परदेशी शक्तींना विकलेल्यांची प्रतिमा ऊंचावणया साठी दिले जातात व त्यां नावाखाली देशविघातक फुटीर वादी देशाची प्रगती करणारया मुलभूत प्रकल्प / सुविधा (जसे धरणे विजनिरमिती इ.) रोखण्याची सुपारी घेणारे विशिष्ट पक्षाच्या घराणेशाही ला लोकशाही च्या नावाखाली खपवणरे विचारवंतांची टोळी तयार केली जाते व अशा विचारवंताच्या जोडीने माध्यमातून धुमाकुळ घालायचा व असत्याला/ देशविघातकाला घटनाना बेमालूम पणे सत्य भासवून नागरिकांची दिशाभूल करायची व देशविघातक सत्ता दशकानुदशके चालवायची मोहिम हाती घेतली हे समजायला साठ वर्षे गेली (फक्त काही जणांनाच आजही हे समजले आहे बाकी 90% नागरिकांना काहीच पडलेले नाही जे केवळ लाॅज मध्ये राहील्या सारखे देशात राहतात (किंवा याच वाहिनीच्या एंटरटेनमेट चानल वर सिरियल बघण्यात देशाची सिरीयस परीस्थिती विसरून जातात) कारण एकदा का असे नागरीक जे उठाव करु शकतात ते म्यान झाले ( जे Resident non Indians होउन गेले )की गरीब अशीक्षीत जनतेची सहज दिशाभूल (मिडीया चा आकाश हल्ला व पैसा रुपी पायदळ सेना निवडणूकीचे युध्द सहज जिंकुन देते) करता येते व सत्ता वर्षा नु वर्षे उपभोगता येते.) गेली 60 वष्रे अशा विचित्र अवस्थेत देश सापडला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आता खूपच उशीर झालेला आहे माध्यमांची दहशत एवढी प्रचंड आहे की कोणीही त्यांच्या विरुद्ध बंड करायला उभा रहात नाहि व उभाराहिलाच तर त्याला आयुष्यातुन उठवले जाते. एवढेच कशाला कीतीतरी चांगले नेते ज्यानी आपले आयुष्य समाजकार्या साठी वाहुन घेतले असे अनेक केवळ पत्रकार किंवा मिडिया च्या विरोधात वक्तव्य केले तर त्याला मिडीयाने/ पत्रकारांनी (राजकारण्यानी मिडियाला वापरुन ) पोहचवुन टाकले आहे/बस्तानात बांधुन ठेवले आहे. माध्यमे हे व्हाइट काॅलड॔ दहशतवादीच आहेत की काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. समाज त्यामुळे अनेक नेत्यांना मुकला आहे. केवळ देव सापेक्ष व्यक्तीच किंवा नियती अशा परिस्थितीतून देशाला बाहेर काढू शकते?
    भाऊ आपल्या लेखातून जे काही समाज होते ते आम्ही सध्या what's app च्या माध्यमातुन पसरवण्याचा (जरी साइट वर प्रतीबंध केला आहे)प्रयत्न करत आहोत
    धन्यवाद.
    अमुल शेटे पनवेल

    ReplyDelete
  3. अप्रतिम विश्लेषण भाउ.

    ReplyDelete
  4. samajvadi ani samyavadi ani khup vad aslele cobngressi yanchi vajabakich rajkaran

    ReplyDelete