Saturday, August 27, 2016

लातोंके भूत बातोसे नही मानते

burhan wani के लिए चित्र परिणाम

काश्मिर आज पेटलेला आहे आणि तिथे कठोर कारवाई करण्यापेक्षा सामंजस्याचा मार्ग आवश्यक आहे. असे सांगणारे भरपूर शहाणे आहेत. पण हा भडका कशामुळे उडाला आणि त्यामागची प्रेरणा कुठली आहे? बुर्‍हान वाणी नावाचा एक जिहादी घातपाती चकमकीत मारला गेला. त्याच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावर आले, असेच म्हटले जाते. ते लोक कशामुळे रस्त्यावर आले? त्यांच्या भावना इतक्या तीव्र कोणासाठी झाल्या? बुर्‍हान वाणीसाठीच ना? म्हणजे जे कोणी हजार शेकडो काश्मिरी रस्त्यावर आले, त्यांना लाठ्या झेलून व दगड मारून कुणाचे समर्थन करायचे होते? वाणीचे समर्थन म्हणजे एका जिहादीचे समर्थन होय. पण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. इतका समंजसपणा तशीच परिस्थिती अन्यत्र उदभवली तर दाखवला जाईल काय? म्हणजे उदाहरणार्थ मालेगाव स्फ़ोट खटल्यात आरोपी असलेल्या कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञा यांच्या समर्थनासाठी देशाच्या अन्य भागात लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनीही दंगल माजवली, तर त्यांनाही समजून घेतले पाहिजे, असे म्हणायला यातला कोणी बुद्धीजिवी सेक्युलर नेता पुढाकार घेणार आहे काय? बुर्‍हान वाणी हा अतिरेकी जिहादी होता आणि त्याने हिंसाचार केला याविषयी शंका घ्यायला जागा नाही. पण त्याच्याविषयी आत्मियता असण्यात काही गैर नाही. पण तशीच आत्मियता आपुलकी पुरोहित वा साध्वी विषयी दाखवली मग याच बुद्धीवादी शहाण्यांची प्रतिक्रीया काय असेल? विनाविलंब तुमच्यावर हिंदू दहशतवादी असा आरोप होऊ लागेल. ही तफ़ावत लक्षात घेतली पाहिजे. काश्मिरीयतच्या नावाखाली जिहादी हिंसाचार झाला, तरी तो समर्थनीय असतो. त्यामागे धार्मिक प्रेरणा असली तरी समजून घेतले पाहिजे. पण तसाच पवित्रा कोणा हिंदूकडून घेतला गेला, मग हाच बुद्धीवादी समजूतदारपणा कुठल्या कुठे गायब होऊन जातो.

वादासाठी पुरोहित आणि बुर्‍हान वाणी दोघेही सारखेच गुन्हेगार असल्याचे मान्य करू. अजून तरी पुरोहित विरोधातील कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही. मग वाणी व पुरोहित यांच्यात फ़रक काय उरला? पण जरा कोणी पुरोहित वा साध्वीची न्याय्य बाजू मांडण्याचा पवित्रा घेतला, तरी तमाम सेक्युलर बुद्धीवादी त्याच्यावर तुटून पडताना दिसतील. हा सगळा बुद्धीभेदाचा प्रकार नाही काय? दहशतवाद मालेगाव स्फ़ोटात असतो, तितकाच काश्मिरी हिंसेतही असतो. मग एका हिंसेचे समर्थन करणे व समजून घेण्याचा आग्रह धरणे, म्हणजे प्रत्यक्षात त्याच दहशतवादाचे अनुकरण नाही काय? जितक्या आवेशात मालेगावचा आरोप केला जातो, तितक्याच आवेशात बुर्‍हान वाणीच्या समर्थनाला लोक रस्त्यावर आले, तर त्याचा निषेध व्हायला हवा. त्यातला उन्माद बघायला हवा आणि स्पष्टपणे मांडण्याचे साहस अंगी असायला हवे. पण तितका विवेक आणि तारतम्य आज भारतीय शहाण्यांमध्ये उरलेले नाही. म्हणूनच वाणीच्या समर्थनाला लोक रस्त्यावर आले, तर त्यातला उन्माद बघता आलेला नाही. अशा वागण्यानेच काश्मिरचा पॅलेस्टाईन होऊन गेला आहे. सहा दशके जगातल्या प्रगत देशांनी अब्जावधीचे अनुदान या इवल्या प्रदेशातील जनतेला दिलेले आहे. त्यातून विकास साधून स्वावलंबी होता आले असते. पण आपल्या पायावर उभे राहून पोटाची भूक भागवण्यापेक्षा हिंसा माजवण्यात स्वयंभू होण्याला प्राधान्य देत पॅलेटीनी लोकांनी अनुदानाचेही पैसे चोरटी हत्यारे संपादन करण्यासाठी वापरले. हिंसा माजवली आणि आसपासच्या देशांना लष्कर घालून बंदोबस्त करण्याची वेळ आणली. त्यातून मरणारे व जखमी होणार्‍यांचे प्रदर्शन मांडून अधिक भिक मागणे शक्य होते ना? काश्मिरची अवस्था नेमकी तशीच होत चालली आहे. तिथल्या प्रत्येक विकास कार्याला सुरूंग लावून, लोकांच्या जीवनाचा नरक करण्याला बुद्धीवादी हातभार लावत आलेले आहेत.

आज काश्मिरची छायाचित्रे बघितली, की गाझा किंवा पॅलेस्टाईनचे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे रहातात. इस्त्रायलच्या सैनिकी गाड्य़ांवर दगड वा पेटते बोळे टाकणारे तरूण व मुले गेल्या पाच दशकात जगाने बघितली आहेत. आता तेच आपण काश्मिरमध्ये बघत आहोत. पण त्याच लोकांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले मग त्यांना सहाय्य देण्याची जबाबदारी पुन्हा त्याच सैनिकांवर असते. गतवर्षी तिथे त्सुनामी आली. महापुराने जनजीवन अस्ताव्यस्त होऊन गेले., तेव्हा बुडणार्‍यांना किंवा भुकेल्या नागरिक महिला मुलांना मदत देताना हाच काश्मिरी तरूण किती पुढे आला होता? पोलिस व सैनिकांवर दगड फ़ेकताना उफ़ाळून येणारा पुरूषार्थ व मर्दुमकी त्या नैसर्गिक संकटाच्या पेचप्रसंगात कुठे लुप्त झालेली होती? खरे तर मर्दानगी दाखवण्याची तीच उत्तम संधी असते. काश्मिरला आझादी हवी आहे, तर त्यात आपण आझाद असताना स्वयंभूपणे आपल्या जबाबदार्‍या पार पाडू शकतो, हे दाखवण्याचा तोच उत्तम मार्ग होता. तेव्हा आझादीचे म्होरके आपापल्या सुरक्षित बिळात दडी मारून बसले होते आणि त्यांना तिथूनही अधिक सुरक्षित जागी घेऊन जाण्याची जबाबदारी भारतीय सैनिकांना पार पाडावी लागली होती. भारतीय सेनेला अथवा सरकारला काश्मिरींना चेपून चिरडूनच टाकायचे असते, तर त्यांना महापुर घेऊन आलेल्या त्सुनामीच्या संकटात दुर्लक्षित ठेवूनही असे निर्दालन करता आलेच असते. पण तेव्हा संकटाच्या क्षणी प्रत्येक काश्मिरींपर्यंत मदत घेऊन जाण्यासाठी भारतीय सेनाच पुढे होती. गृहसचिव तिथे मुक्काम ठोकून मदतकार्याचे नियंत्रण करत होते आणि पंतप्रधान मोदी जातिनिशी घटनास्थळी पोहोचले होते. याला गळचेपी म्हणतात काय?

निसर्गाकडूनच काश्मिरींचा काटा काढणे सोपे होते ना? पेलेटगन किंवा अन्य मार्गाने त्यांना भरडून काढण्याची गरजच काय? निसर्ग कोपाच्या प्रसंगी दुर्लक्षित करूनही काश्मिरींना संपवणे भाजपाच्या सरकारला शक्य नव्हते काय? उत्तराखंडात तेव्हाच्या मुख्यमंत्री व भारत सरकारने आपल्या हलगर्जीपणाने हजारोंना मृत्यूमुखी पाठवून दिलेच होते ना? मग त्याचीच पुनरावृत्ती काश्मिरच्या नैसर्गिक संकटात करूनही काश्मिरींना ‘धडा’ शिकवणे अशक्य नव्हते. निदान त्यातल्या आझादीच्या म्होरक्यांना मदतीशिवाय तडफ़डून टाकायला संधी नक्कीच होती. पण भारताच्या विरोधात सतत गरळ ओकणर्‍या अशा सापांनाही भारत सरकारने संरक्षण दिले आणि त्यांना ‘दूध पाजण्याचा’ गुन्हा भारतीय सेनेनेच केलेला होता. आज जे कोणी आझादीचे म्होरके बुर्‍हान वाणीच्या नावाने गळे काढत आहेत, त्यांच्या मदतीला बुर्‍हान आला नव्हता की त्याचे पाकिस्तानातील बोलविते धनी हुर्रीयत नेत्यांना जीवदान द्यायला समोर आलेले नव्हते. तेव्हा कोणा कॉग्रेसवाल्याने वा पुरोगाम्याने मोदी सरकारची पाठ थोपटली होती काय? संवाद नुसत्या शब्दाचा नसतो आणि दु:खावर फ़ुंकर फ़क्त शब्दांनी घातली जात नाही. कृतीतूनही आत्मियता दाखवली जात असते. पण ती आत्मियता कळण्यासाठी मानवी व भावनिक संवेदनशीलतेची गरज असते. बधीर भावना किंवा गेंड्याच्या कातडीचा बेशरमपणा अंगी बाणलेला असला, मग दुध पाजणार्‍यांनाही डंख मारण्याची वृत्ती संधी मिळताच डोके वर काढत असते. म्हणूनच काश्मिरचा प्रश्न संवादाने वा चर्चेने सुटण्याची शक्यताच नाही. लातोंके भूत बातोसे मानते नही, असेच म्हटले जाते. मग ह्या भूतांना बाते करून शांत कसे करणार? कंबरेत लाथा घालूनच त्यांना वळणावर आणणे भाग आहे. तो दिवस तेच जवळ आणत आहेत. म्हणूनच महापुरातील मदत विसरून उलट्या बोंबा चालू आहेत.

1 comment:

  1. लातोंके भूत बातोसे मानते नही,इनको सिर्फ गोलीकी बात समझ आती हैं।

    ReplyDelete