Sunday, August 7, 2016

कोण सभ्य? कोण असभ्य?



केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय संयमाने महाड घटनेबद्दल दिलेली प्रतिक्रीया स्पृहणिय आहे. आजकाल कुठल्याही सत्ताधारी वा राजकीय नेत्याकडून इतक्या समजूतदार प्रतिक्रीयेची अपेक्षा करता येत नाही. कुठलाही गुन्हा वा दुर्घटना घडली, मग त्याचे खापर दुसर्‍या कुणाच्या तरी डोक्यावर फ़ोडायला सर्वजण उत्सुक असतात. मात्र त्याविषयी दुरगामी विचार करून उपाय शोधण्याचा विचारही कुणाच्या मनाला शिवत नाही. खापर फ़ोडले, की विषय निकालात निघाला असेच मानले जाते. त्यापासून माध्यमेही अपवाद राहिलेली नाहीत. महाडचा तो जिर्ण पुल ब्रिटिशकालीन होता आणि वापरासाठी कमकुवत झाला होता. म्हणजेच तिथे अपघाताची शक्यता होती. इतके समजल्यावर माध्यमांनी देशाच्या कानाकोप‍र्‍या कुठे कुठे ब्रिटीश राजवटीत पुल बांधले गेले आणि अजून वापरात आहेत; त्याचा शोध सुरू केला. या आठवडाभरात इतके असे पुल व त्यांची जिर्णावस्था दाखवली गेली, की साध्या जुन्या पादचारी पुलावरून चालण्याचेही सामान्य नागरिकला भय वाटावे. ही बेजबाबदारवृत्ती घातक असते. असे शेकड्यांनी मृत्यूचे सापळे आपल्या देशात पसरलेले आहेत. विकेंद्रित अधिकार आणि सत्तेची साठमारी, यामुळे तिकडे दुर्लक्ष होत असून त्याचे खापर कुणाच्या तरी डोक्यावर फ़ोडण्याची स्पर्धा जोरात चालू असते. पण त्यात हकनाक बळी पडणार्‍यांविषयी कुणाला कुठली सहानुभूती उरलेली नाही. उलट त्यातून नवे वाद उकरून काढण्याचे नाटक सुरू होते. कुणा मंत्र्याने पत्रकाराला दुरूत्तर दिले, म्हटल्यावर त्याचेही भांडवल झाले. त्यानंतर त्या मंत्री वा राजकीय नेत्याला कोंडीत पकडण्यासाठी झुंबड उडाली. पण तितक्याच हिरीरीने जबाबदारी पत्करणार्‍या गडकरींची पाठ थोपटायला पत्रकार पुढे येणार नसतील, तर त्यांच्याही वर्तनाविषयी शंकाच घेणे भाग आहे.

कुठल्याही निराधार वा अर्धवट माहितीच्या आधारे मंत्र्याला वा अधिकारी नेत्याला प्रश्न विचारायचे आणि त्याने रागावून प्रत्युत्तर दिले मग कांगावा करायचा, हा पत्रकारी बाणा होऊ लागला आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी संबंधित पत्रकाराला दुरूत्तरे दिली हे उघड आहे. पण त्यापुर्वी तोच पत्रकार ज्या पद्धतीचे बेछूट सवाल मंत्र्याला करत होता, ते वर्तन सभ्यतापुर्ण होते काय? सर्व मृतांचे पिडीतांचे नातेवाईक संतापले आहेत, कुठलीही व्यवस्था तुम्ही ठेवली नाही, असे बेधडक आरोप करत असताना प्रत्यक्षात त्या नातलगांची कहाणी बातमीत कुठेही नव्हती. इतकी मोठी दुर्घटना घडली असताना, बुडालेल्या व्यक्तींचा शोध महत्वाचा असतो आणि सर्व शक्ती त्यासाठी लावायला हवी. की तिथे येणार्‍यांची बददास्त ठेवण्याला प्राधान्य असू शकते काय? अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मंत्र्याने वेळ दिला पाहिजे आणि आपल्या जबाबदार्‍या पार पाडण्याकडे दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा आहे काय? वाजपेयी सरकारच्या काळात एका विमानाचे अपहरण झाल्याची बातमी आली, हवाई वाहतुक खात्याचे मंत्री शहानवाझ हुसेन विमानतळावर निघाले असताना बरखा दत्त हिने मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. शेवटी मंत्र्याला हे सांगावे लागले, की तुमच्या प्रश्नांना उत्तरे देत बसलो तर विमानतळावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती हाताळायला सवड उरणार नाही. काय केले ते करण्यापुर्वी सांगणार कसे? तेव्हा कृपया प्रश्न आवरा आणि मला जरा मोकळीक द्या. अशा आगावूपणाला पत्रकारीता म्हणायचे असेल, तर त्यांच्याशी उर्मट व्यवहार करण्याला पर्याय उरत नाही. समोरून सभ्य उत्तराची अपेक्षा असेल, तर अलिकडूनही सभ्यपणाचाच अनुभव आला पाहिजे. संकटकाळात व्यग्र माणसाला विचलीत करणारे प्रश्न विचारण्याला सभ्यपणा म्हणत नाहीत, की पत्रकारिता म्हणता येत नाही.

कुणा मृत्ताच्या नातलगाला ‘कसे वाटते’ हा प्रश्न मृतदेहही हाती आलेला नसताना विचारण्याला काय म्हणायचे? त्यावर उर्मट उत्तर आले, तर समोरचा बेजबाबदार नाही तर विचलीत करणारा कारणीभूत असतो. ज्यांना अशा घटनेत प्रसंगावधान राखता येत नाही, ते पत्रकार तरी कसे होऊ शकतात? कारण जगातल्या कुठल्याही घटनाक्रमात प्रसंगावधान राखले जात नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी बातमीदारी वा पत्रकारिता जन्माला आलेली आहे. पण त्याचेच भान सुटलेल्या लोकांचा हल्ली त्या पेशात भरणा झालेला आहे. सहाजिकच पत्रकार आणि सार्वजनिक जीवनात वावरणार्‍यांचे सातत्याने खटके उडू लागले आहेत. मग अशावेळी जितकी झोड मंत्र्यावर उठवली जाते, तितकीच बेजबाबदार पत्रकारावर सुद्धा उठली पाहिजे. त्यात भेदभाव होत असेल, तर पत्रकारितेची विश्वासार्हता संपून जाते. संकटकाळ वा आपत्तीनिवारण चालू असते, अशा जागी जगाला घटनेचा तपशील मिळण्यापेक्षा धोक्यात असलेल्या व्यक्ती वा पिडीताला मदत मिळण्याला प्राधान्य असते. म्हणूनच संबंधितांपासून दूर राहून वार्तांकन करण्याचे भान आधी पत्रकारांना येण्याची गरज आहे. इथे प्रकाश मेहता हा भले पालकमंत्री असेल, पण तो नेता आहे. प्रशासकीय अधिकारी नाही. म्हणूनच त्याला प्रसंगाची माहिती व निवारण कार्याची जाण असू शकत नाही. सहाजिकच त्यासंबंधीचे प्रश्न त्याला विचारायला जाणेच मुर्खपणाचे आहे. कारण पत्रकार परिषद चालू नसून एका भीषण अपघातातून लोकांना सोडवण्याचे काम तिथे चालू होते. तिथे कॅमेरा घेऊन घुसणे व कामात व्यत्यय आणणे गैरलागू होते. त्यातून वाद उकरण्याचा प्रयास निंदनीय होता. त्याचीच निंदा झाली असेल, तर आपल्या वाह्यात पोराचे काम उपटण्याची गरज आहे. पत्रकारीतेतील ढुढ्ढाचार्यांना त्याचे भान राहिलेले नाही. म्हणूनच दिवसेदिवस पत्रकारांवरचे हल्ले वाढत आहेत.

दुसरीकडे नितीन गडकरी यांनी आधीच्या सरकारला गुन्हेगार ठरवण्यापेक्षा आपल्या सरकारची जबाबदारी उचलतात, त्यांचे स्वागत करायला कोणी पत्रकार पुढे आलेला नाही. बेछूट आरोप करण्याची अक्कल असते, त्यापैकी कुणाला अशा जबाबदार दुर्मिळ नेत्याच्या शब्दांचे स्वागत करण्याची बुद्धी नसेल, तर त्यांची गुणवत्ता लक्षात येऊ शकते. पुर्वीच्या सरकारने काम संथगतीने केले व त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रेंगाळले, असे स्पष्ट सांगतानाच गडकरी यांनी दोन वर्षे सत्तेत असलेल्या आपल्या पक्षाची वा सरकारची जबाबदारी झटकलेली नाही. असे जबाबदारीचे वक्तव्य अलिकडल्या काळात किती ऐकायला मिळते? नसेल तर एक मंत्री का होईना, सभ्यपणे प्रामाणिकपणे चुक मान्य करीत असेल, तर तीच बातमी होते. अजब असेल तीच बातमी असते ना? मग प्रकाश मेहतावरून गदारोळ करणार्‍यापैकी कोणालाही गडकरींची पाठ थोपटण्याचे भान कशाला राहिले नाही? कारण इतरांच्या जबाबदार्‍या व कर्तव्याचे ढोल वाजवणार्‍या पत्रकारितेलाही आज आपल्या कर्तव्याचे भान अजिबात उरलेले नाही. त्यातून मग गंभीर प्रसंगाचाही पोरखेळ होऊन जातो. बातमी नको पण कॅमेरे आवरा म्हणायची वेळ येत चालली आहे. कारण सामान्य माणसाला दिलासा व धीर देण्यापेक्षा भयभीत करून सोडणे किंवा थक्क व्हायला कारणीभूत होण्याला पत्रकारिता मानले जाऊ लागले आहे. त्यासाठी मग गदारोळ माजवणे अपरिहार्य होत चालले आहे. नवनव्या योजना काढून फ़ुकट घरपोच वर्तमानपत्रे पोहोचण्यावर पैसा खर्चावा लागतो आहे. भामटेगिरी वाढत चालली आहे. त्यात मग प्रामाणिकपणे पत्रकारिता करणारेही भरडले जात आहेत. प्रकाश मेहतांचे बोलणे वागणे असभ्य असेल, तर अशा स्वरूपाची पत्रकारिता कुठल्या सभ्यतेचा आदर्श आहे, त्याचाही खुलासा एकदा करून टाका. म्हणजे पत्रकारितेचे समाजातील स्थान पक्के होऊन जाऊ शकेल.

3 comments:

  1. भाऊ हे सगळे पेपरवाले व tv channel वाले Isi agent असावेत असे वाटते भितीदायक वातावरण निर्माण करून पैसा लाटणारे लोक आहेत हे यामुळे खरे पत्रकार मातीत चाललेत यामुळे लोक social media कडे वळत आहेत लोकांचा विश्वास राहीलानाही "खरे पत्रकार Meseum मध्ये"

    ReplyDelete
  2. भाऊ एकदम बरोबर. पत्रकारिता हि बाजारबसवी व सुपारीबाझ झाली आहे हे पुर्वी आपण अनेक लेखातुन सांगितले आहे.
    परंतु या सेवाभावी व्यवसायात राजकारण्यां प्रमाणे निरुद्योगी व ब्लॅक मेलिंग करुन केवळ पैसे कमवण्याचा खालच्या पातळीवर व वरिल पातळीवर % मध्ये सरकारात असलेल्या कडुन पैसे कमवण्याचा धंदा झाला आहे.
    बरं आजकाल सर्वच बाबतीत पुरोगामी असे सर्वसकट म्हणणे चुकीचे आहे हा युक्तिवाद नेहमीच करतात हे जनतेला कन्फ्युजन करण्यासाठी व अशा चुकीचे करणार्‍यांना प्रोटेक्शन देण्यासाठी होतो. व यातुन जनतेने दुर्लक्ष करावे असा संदेश दिला जातो. म्हणजे जे चुकीचे करतात त्यांना कोणीही दटावत नाही.
    मिडिया विकला गेला की नुसता देशच विकला जात नाही तर नागरिकांची विचार प्रतीकार व अधिकार शक्तीच संपवली जाते. म्हणजे देशाच्या लुटारूंना काम सोपे होते. व विदेशी शक्तींना युद्ध न करता व राज्य चालवण्याची जबाबदारी न घेता सहज देशाची सत्ता व लुट करता येते. आपल्याच देशात धन्यासाठी बैल राबल्या प्रमाणे नागरिक राबतात व देशातील काही लोकांना व विदेशींना लुट करता येते.
    यासाठी मिडिया व्ययसातील परकीय गुंतवणूक व मालकी त्वरित बंद केली पाहिजे. व कडक कायदे फाष्ट न्यायालयात दोषींवर कारवाई केली पाहिजे. परंतु मांजराच्या गळयात घंटा कोण बांधणार? की ते मरायची वाट बघणार? परंतु मांजरी च्या पिल्लावळी प्रमाणे हि पिल्लावळ वाढणार आहे.

    यासाठी डोळस पणे च्यानल वरिल चर्चा ऐकणे आवश्यक आहे. (अखलख दादरी, दलित व आता गोरक्षा चर्त्या ऐका मग एकाच पक्षाला वारिस पठाण अजय अलोक इतर अनेकांना घेऊन कसे टारगेट केले जाते व आशा गोष्टींचा आजेडा यांना कोण देतो व का देतो याचा पोलखोल होणे आवश्यक आहे ) त्यामुळे गेली कित्येक वर्षे निखिल वागळे व आर्णब गोस्वामी यांनी चर्चां मध्ये ठराविक नेत्यावर व ठरावीक सरंजामी पक्ष व त्याच्या मित्र राजकीय पक्षांना सोडून ठराविक पक्षाच्या प्रवक्ता ला नेत्यावर पाशवी अत्याचार केले व करत आहेत. हे त्या चानलच्या प्रेक्षकावर अगतिक पणे पहाणे भाग आहे. यातील एकाला नियतीने जागा दाखवली आहे. व अशा टारगेट केलेल्या नेत्याला देशाच्या जनतेने सर्वोच्च स्थानी विराजमान केले आहे.
    अमुल

    ReplyDelete
    Replies
    1. Media वर communist हुकुमशाही प्रमाणे बंधने असावीत हिंसक देशविरोधी बातमि दाखवली तर कडक शिक्षा किंवा बंदी हवी.

      Delete