Tuesday, June 13, 2017

परतफ़ेडीचे दिवस

prannoy roy indrani के लिए चित्र परिणाम

दीड वर्षापासून मोदी सरकारच्या विरोधात अनेक आरोप झाले आणि त्यापैकी एक होता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा! तसा कुठलाही पुरावा समोर आणल्याशिवाय अनेक नामवंत आपापले पुरस्कार परत देण्याच्या मोहिमेत उतरले होते. त्यासाठी देण्यात आलेली कारणे अतिशय फ़ुसकी होती. खरे तर तो बार अकारण अवेळी उडवण्यात आला होता. सहाजिकच तो वाया गेला आणि आता तसे काही करून मोदींना कोंडीत पकडता आले असते, तर हातात तितके स्फ़ोटक करायला काही हत्यारच राहिलेले नाही. या आठवड्यात एनडीटीव्ही या माध्यम कंपनीवर सीबीआयच्या धाडी पडल्या आणि आता वापरण्यासारखे पुरस्कार वापसीचे हत्यार बोथट होऊन गेले आहे. अशा कुठल्याही कारवाईसाठी आरोपीकडे उत्तर नसले, मग सोपा खुलासा असतो की शासन व्यवस्था सूडबुद्धीने वागत आहे. त्यात तथ्य नसते असे अजिबात नाही. पण हुशार शासनकर्ता घाईगर्दीने अशी कृती करीत नाही. यापुर्वी अनेक शासनकर्त्यांनी सूडबुद्धीने शासकीय यंत्रणेचा राजकीय बदला घ्यायला वापर केलेला आहे. पण मोदी सरकारने तसा आरोप होऊ शकेल, हे गृहीत धरून अतिशय सावध खेळी केलेल्या आहेत. सत्ता हातात आल्यावर मोदी सूडबुद्धीने एकेकाला धडा शिकवतील, ही अपेक्षा अनेकांनी केलेली होती. तेही स्वाभाविक होते. कारण गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांना विरोधी पक्षातील अनेकांनी व त्यांच्या माध्यमातील बगलबच्च्यांनी अक्षरश: छळलेले होते. माध्यमात बदनामीच्या मोहिमा राबवल्या जात होत्या आणि राजकीय विरोधक सत्तेचा गैरवापर करून मोदींना कैचीत पकडण्याची प्रत्येक संधी शोधत होते. मग मोदींच्या हाती सत्तासुत्रे आल्यावर त्यांच्याकडून तीच अपेक्षा असेल, तर चुकीचे नव्हते. पण मोदींनी तितकी घाई केली नाही, की आपल्या विरोधकांप्रमाणे चुकाही केलेल्या नाहीत. हा खरा धुर्तपणा म्हणता येईल.

२०१४ सालात लोकसभा बहूमताने मोदींनी जिंकली, तेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि विरोधक अगदीच नामोहरम होऊन गेलेले होते. घाबरलेले सुद्धा होते. कारण प्रत्येकाला आता मोदी सुडबुद्धीने वागणार याची खात्री होती. पण मोदींनी तसे काही केले नाही. याचे पहिले कारण त्यात सूडबुद्धीचे प्रतिबिंब पडले असते आणि कुठल्याही तयारीशिवाय प्रतिहल्ला केल्यास तो बारगळलाही असता. तीच चुक विरोधकांनी व कॉग्रेसने आपल्या हाती सत्ता असताना केली होती, ती घाईगर्दीची होती. हाती कुठलाही सज्जड पुरावा व माहिती नसताना नुसत्या अफ़वा किंवा संशयाच्या आधारे मोदी विरोधातल्या मोहिमा राबवल्या गेल्या होत्या. त्यांनी धुरळा खुप उडाला तरी तो टिकला नाही. धुरळा खाली बसल्यावर मोदी निर्दोष ठरत गेले आणि त्यातूनच त्यांची प्रतिमा उजळत गेली. म्हणजेच मोदींना सतावण्यासाठी केलेल्या कारवाया मोदींच्या पथ्यावर पडत गेल्या. ही घाई वा चुक मोदींनी अजिबात केलेली नाही. त्यांनी सूडाचेच राजकारण आता आरंभलेले आहे. पण त्यासाठी तब्बल तीन वर्षे जाऊ दिली आहेत आणि त्या कालखंडामध्ये आपल्या प्रत्येक बारीकसारीक विरोधकाला गुंतवणार्‍या भानगडी व त्यांचे तपशील शोधून काढलेले आहेत. त्यांचे असे जाळे विणले आहे, की त्यातून हे विरोधक जितके निसटायला धडपडतील, तितके त्यात फ़सत जातील. एनडीटीव्ही ही वाहिनी वा तिचे संचालन करणारी कंपनी त्यापैकीच एक आहे. मागल्या काही महिन्यात एकामागून एक राजकीय विरोधकांवर मोदी सरकारच्या अर्थखात्याने डोळे वटारलेले आहेत. त्यात आता एका आघाडीच्या माध्यम कंपनीची भर पडलेली आहे. ही कंपनी कुणाची व तिचे धागेदोरे कुठवर जाऊन पोहोचले आहेत, ते म्हणूनच तपासून बघणे योग्य ठरेल. किंबहूना एकूण देशव्यापी कारस्थानाचा पसारा किती आसू शकतो, त्याचाही अंदाज येऊ शकेल.

१९९८ सालात अकस्मात सोनिया गांधींनी आपली राजकीय अलिप्तता सोडून राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम कॉग्रेससाठी प्रचारसभा घेण्याचा सपाटा लावला. त्या दरम्यान भारतात उपग्रह वाहिन्यांचे युग सुरू झालेले होते. स्टार नेटवर्क नावाची परदेशी कंपनी अनेक वाहिन्या चालवित होती. सोनियांनी राजकारणात उडी घेतली आणि अकस्मात स्टार नेटवर्कने भारतात वृत्तवाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापाशी कुठलीही सज्जता नव्हती. दुरदर्शनवर देशातील पहिला वार्तांकनाचा कार्यक्रम सादर करणार्‍या एनडीटीव्ही कंपनीला स्टारने वाहिनीचे काम सोपवले. ती कंपनी प्रणय रॉय याची. १९८४ सालात राजीव गांधी यांना चारशे जागा लोकसभेत मिळतील असे भाकित करून प्रसिद्धीत आलेला हा माणूस; मग निवडणूक निकालाच्या विश्लेषणाचे कार्यक्रम थेट प्रक्षेपणातून दुरदर्शनवर करू लागला. थोडक्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा त्याला भारतातील आद्यपुरूष म्हणता येईल. त्याच्याच कंपनीकडे स्टारन्युज वाहिनीचे काम आले आणि नंतर अनेक वाहिन्यांचे पेव फ़ुटण्यापर्यंत याच वाहिनी व कंपनीचे त्या माध्यमावर वर्चस्व राहिले. निदान गुजरात दंगल होईपर्यंत याच वाहिनीचे वर्चस्व होते आणि सहाजिकच मोदींची प्रतिमा मलीन करण्यातही सिंहाचा वाटा त्याच कंपनी व पत्रकारांचा राहिला. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, पंकज पचौरी असे थेट कॉग्रेसच्या गोटात उठबस असलेले पत्रकार त्यातले मुरब्बी! पुढे स्टारन्युजचे कंत्राट संपले आणि प्रणय रॉयने आपल्याच हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्या सुरू केल्या. इतकी मोठी झेप अल्पावधीत मारण्यासाठी त्याला पैसे व गुंतवणूक सहजासहजी मिळालेली असू शकत नाही. त्यात अनेक गफ़लती असणार. तेच धागेदोरे कोणी कधी समोर आणले नाहीत आणि आता येत जाणार आहेत. ही गुंतवणूक, त्यातला पैसा आणि कंपनीतल्या पत्रकारांचे मोदीविरोधाचे नाते समजून घेतले पाहिजे.

प्रणय रॉय व त्याच्या कंपनीचे अल्पावधीतील यश समजून घेताना त्याची सुरूवात स्टार नेटवर्कमध्ये झाली, हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा स्टारचा मुख्याधिकारी पीटर मुखर्जी होता. जो आज शीना बोरा हत्याकांडातला आरोपी म्हणून गजाआड खितपत पडलेला आहे. पीटर आणि त्याची रंगिली पत्नी इंद्राणी मुखर्जी त्या काळात करोडो रुपयांच्या उलाढाली किती सहजगत्या करीत होती, त्याची लक्तरे आतापर्यंत समोर आलेली आहे. असा पैसा व माध्यमांची शक्ती या बळावर खुनावरही पडदा पाडता येतो, हा प्रयोग त्या दोघांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. खेरीज अर्थमंत्र्याला त्याच़्या मुलामार्फ़त वापरून कोट्यवधी रुपयांची परकीय गुंतवणूक बेकायदा भारतात आणण्याचे धाडसही मुखर्जी युगुलाने केलेले आहे. अशा गुरूच्या तालमीत प्रणय रॉय तयार झाला आणि अल्पावधीत त्यानेही आपली कंपनी मोठी केली. आपले स्वतंत्र नेटवर्क उभे केले असेल, तर सर्वकाही सुटसुटीत असण्याची शक्यता कमीच आहे. बातम्या कोणाच्या बाजूने व कोणाच्या विरोधात रंगवण्याच्या बदल्यात कोणकोणते लाभ उकळले गेले असतील, त्याचा आपण निव्वळ अंदाज बांधू शकतो. दूध पिताना मांजराने डोळे मिटलेले असले म्हणून जग आंधळे नसते. तसेच गफ़लत केली जाते तेव्हा सगळेच पुरावे नष्ट होऊ शकत नसतात. त्याचे धागेदोरे कुठेतरी शिल्लक उरतात. अशा कित्येकांच्या धाग्यादोर्‍यांचा माग काढण्यात मोदींना थोडा कालावधी लागलेला आहे. पण ज्या धाग्यांचा गळफ़ास होऊ शकतो, ते हाती लागल्यावर त्यांनी एकेकाच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. त्याविषयी अवाक्षरही बोलायचे नाही आणि प्रशासकीय यंत्रणेला आपल्या कामाला जुंपायचे, ही मोदीनिती आहे. तीन वर्षात मोदी सरकारने नेमके काय केले? अच्छेदिन येण्य़ासाठी काय केले, त्याचे उत्तर आता विरोधकांना मिळू लागलेले आहे. त्यांच्यासाठी आजवरच्या अच्छेदिनांची परतफ़ेड करण्याचे दिवस सध्या आलेले आहेत.

3 comments:

  1. बॅंकेच्या फ्राॅडचा व अभिव्यक्ती स्वात्त्रयाचा काय संबंध? पन तो लावला जातोय प्रणांय दिल्लीतल्या चार टाळक्याना घेनुन बाकी चॅनेलना गोदी चॅनल म्हतेय पन जेव्हा UPA शासन होते त्याने पन तेच केले होते.किंबहुना सरकार चे लालुनचागन ची सुरुवात त्यानेच केली होती आता फक्त बाजु पलटली आहे बाकी काही नाही.तसेच त्याने संधी दिलेले बरखा,राजदिप्,करनथापर,निधि हे सर्व वशिलेबाज आहेत.क्रिकेटपटू,पत्रकार,नेहरु घराने,सरकारी नोकर यांची मुले असने हिच त्यांची पात्रता आहे.त्यांच्याकडुन लाळघोटेपनाच होउ शकत होता तो त्यानी केला.

    ReplyDelete
  2. खासच!थंडा बदला!!😁😁

    ReplyDelete