Tuesday, June 20, 2017

मानवमुक्तीचा जंगली मार्ग

terror killings के लिए चित्र परिणाम

पुर्वीच्या काळात घरोघरी टिव्ही नव्हते आणि असले तरी इतक्या वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे लोकांपर्यंत माहितीचा ओघ कमी यायचा. आता शेकड्यांनी वाहिन्या लोकांना उपलब्ध झाल्या आहेत. त्यात ठराविक विषयाला वाहिलेल्या वाहिन्याही आहेत. नॅशनल जिओग्राफ़िक वा अनिमल प्लॅनेट अशा वाहिन्यांची लोकप्रियता थोडी नाही. त्यात अनेक गोष्टी समजावून सांगितल्या जात असतात. या वाहिन्यांवर पशू व निसर्गाची सुंदर माहिती सादर केलेली असते. त्यात जंगलातल्या पशूंची संस्कृती सातत्याने बघायला मिळत असते. कुठल्याही जंगलात वाघ-सिंह वा चित्ते अशी श्वापदे भुक भागवण्य़ासाठी इतरांची शिकार करत असतात. असे दबा धरून बसलेले श्वापद आढळले वा त्याच्या नुसता सुगावा लागला, तरी झेब्रे, हरणे वा अन्य चरणारे प्राणी जीव मूठीत धरून पळ काढत असतात. कारण त्या श्वापदाने हल्ला चढवला, तर आयुष्य़ संपुष्टात येणार असते. आपल्यावरचा हल्ला न्याय्य आहे किंवा नाही, याची दाद कुठेही मागण्याची सोय त्या प्राण्यांना उपलब्ध नसते. म्हणून बिचारे जीव वाचवायला पळत असतात. हा शिकारीचा प्रकार भयंकर क्रुर वा हिंसक वाटणारा असला, तरी त्यात एक शिस्त असते. अनेकदा असे दिसते, की सिंह चित्ते शांतपणे आपल्या जागी लोळत असतात आणि जवळपास चरणार्‍या अन्य पशूंना उगाच त्रास देत नाहीत. भुक लागलेली नसेल तर कोणाची शिकार वगैरे करीत नाहीत. किंबहूना या श्वापदांच्या वागण्यावरूनही अन्य चरावू प्राण्यांना जीवाला धोका आहे किंवा नाही याचा अंदाज येत असतो. अशा श्वापदांच्या सहवासातही हे दुर्बळ जीव छान चरत असतात. भुकेपुरती शिकार वा रक्तपात हा अशा श्वापदांचा कायदा असतो. उगाच ते कोणाचा जीव घेत नाहीत. त्यांच्यापेक्षा माणूस सुसंस्कृत असतो काय? तो अकारण रक्तपात करतो ना? मग कोणाला सुसंस्कृत मानायचे, असा प्रश्न पडतो.

जंगलच्या राज्यात कुठलाही लिखीत कायदा नसतो किंवा कोणाला कसली सवलत नसते. भुक लागली मग श्वापदाने शिकार करायची आणि त्याच्या तावडीत सापडेल त्या प्राण्याने कर्तव्यबुद्धीने बळी जायचे, इतकाही ढिलेपणा नसतो. शक्य होईल तितकी आपल्या मागे लागलेल्या श्वापदाला हुलकावणी देण्याचा अधिकार त्या प्राण्याला असतो. त्यात गफ़लत झाली, तरच त्याला जीवाला मुकावे लागत असते. मानवी जगात अशी कुठली सभ्यता आहे काय? अकारण कोणाचाही जीव घेणे, ही मानवाची प्रवृत्ती श्वापदांपेक्षाही भयंकर नाही काय? अशा मानवी जगात कधी श्वापदे किंवा जंगलातील प्राणी आलेच आणि त्यांनी इथले कायदेकानु समजून घेतले, तर ती माणसे नाहीत यांचा त्यांना अभिमानच वाटेल. कारण माणूस त्यांच्यापेक्षाही हिडीस आणि पाखंडी आहे. जंगलात बळी तो कान पिळी हाच कायदा असतो. पण मानवाच्या जगात मात्र ज्याच्यापाशी बळ आहे, तोच शिकारही होऊ शकतो. कायदा त्याला बळीचा बकरा बनवू शकतो. तसे नसते तर सशस्त्र असलेले भारतीय सैनिक वा कुठल्या जिहादग्रस्त देशातले सैनिक हकनाक कशाला मारले गेले असते? जगात मागल्या काही दशकात सैनिक हे दहशतवादी घातपात्यांनी नेमबाजीचा सराव करण्यासाठी मरत असतात. दिसता़च वा नुसता संशय आला, तरी कुणालाही ठार मारण्याचे कौशल्य ज्याने आत्मसात केलेले असते, त्याला आजचे जग सैनिक म्हणून ओळखते. पण त्या सैनिकाच्या पायात कायद्याची अशी बेडी घातलेली आहे, की त्याला स्वत:चा बचाव करण्याची मोकळीक ठेवलेली नाही. म्हणजे सिंह चित्त्याच्या तावडीतून निसटण्याची वा प्रसंगी त्याच्यावर उलटा हल्ला करण्याची जी मुभा जंगलात कुठल्याही प्राण्याला असते, ती आधुनिक कायदेशीर सेनेला राहिलेली नाही. त्यामुळे आता अवघे जग हे दहशतवाद नावाच्या श्वापदाचे मोकाट रान होऊन बसले आहे.

हातात बंदुक व बॉम्ब असला, तरी त्याचा स्वसंरक्षणार्थ वापर करण्याची मुभा सैनिकाला नसेल, तर त्याला नुसतेच मरावे लागणार ना? काश्मिरात वा अन्यत्र कुठे अफ़गाण आदि प्रदेशात दहशतवाद मानल्या जाणार्‍या हिंसेचे बळी सामान्य लोक होतच असतात. पण अलिकडे त्यात सैनिकांचाही भरणा झालेला आहे. या सैनिकांनी देशाचे वा समाजाचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा आहे. पण ते कसे करायचे? त्यांनी मरणाला सामोरे जावे हीच अपेक्षा असेल, तर ते कोणाची सुरक्षा करू शकतील? काश्मिरच्या भूप्रदेशात भारताने म्हणजे तीन लाखाहून अधिक सेना तैनात केलेली आहे. ते खरे असेल तर त्या संख्येपुढे पाचसात हजार जिहादी नगण्य असतात. त्यांना मिळतील तिथून शोधून काढून, दिसतील तिथे ठार मारण्याला सेनेला काही दिवसही लागणार नाहीत. पण मागल्या दोन दशकातही ते साध्य झालेले नसेल, तर काही गडबड आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते सैनिक नालायक असायला हवेत, किंवा आळशी असायला हवेत. पण त्यापैकी कशाचाही पुरावा नाही. समस्या अशी आहे, की त्यांनी कोणावरही हल्ला करण्यापुर्वी समोरची संशयास्पद व्यक्ती घातपाती असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. ही खात्री कशी करून घ्यायची? कारण असे घातपाती आपले ओळखपत्र सैनिकांना दाखवून मगच घातपात करीत नाहीत. ते सामान्य नागरिकासारखे दिसणारे असतात आणि अकस्मात हल्लाही करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी खातरजमा होईपर्यंत सैनिकाचा बळी गेलेला असतो. परिणामी घातपाताला पायबंद घालणारी कुठलीही सेना, आजकाल बळीचा बकरा बनलेली आहे. त्या वाहिन्यांवर जंगल दाखवतात, तिथेही अशीच स्थिती असते. चित्ता मादी कुणा दुबळ्या हरणावर पंजा मारून जायबंदी करते आणि मग आपल्या पिलांना शिकारीचा खेळ शिकवू लागते, तो खेळ त्या हरणाच्या जीवाशी चाललेला असतो. त्यापेक्षा आपल्या सैनिकांची स्थिती भिन्न राहिली आहे काय?

कालपरवा काश्मिरात सहा पोलिसांचा बळी घातपात्यांनी घेतला. काहीही समजण्यापुर्वी ते मृत्यूमुखी पडलेले होते. त्यांच्या अंत्ययात्रेलाही कोणी राजकारणी नेता फ़िरकला नाही. मग ह्या पोलिसांनी कुणाच्या संरक्षणासाठी आपले प्राण वेचले? कशासाठी आपले जीव दिले? त्याचे उत्तर कोणी देऊ शकेल काय? त्यांचा जीव घातपातातून ज्यांनी घेतला, त्यांच्याशी या सैनिक वा पोलिसांचे कोणते वैर होते काय? नसेल तर त्यांनी कोणासाठी व कशासाठी मरायचे असते? दरमहा पगार मिळतो म्हणून आपला नंबर लागेल, तेव्हा मरायला सज्ज असण्याला पोलिस वा सैनिक म्हणतात काय? समोरच्या आव्हानाला सामोरे जाऊन आपल्याला त्याने मारण्यापुर्वी त्याचाच बळी घेणार्‍याला सुरक्षा दल म्हणत नाहीत का? येणार्‍या मृत्यूला निमूट कवटाळण्याला कोणी सैनिक म्हणत नाहीत. पण आजकालच्या राजकारणाने व कायद्यातील त्रुटींनी त्यालाच वस्तुस्थिती बनवून टाकले आहे. जंगलालाही लाजवणार्‍या या नव्या माणूसकीने जंगलचा कायदा अधिक सुरक्षित बनवला आहे. मानवी जगातला कायदा आता सैनिक वा पोलिसांसाठीही सुरक्षित राहिला नसेल, तर तुमचे आमचे संरक्षण कोण करणार? हाती हत्यार असून कोणी सुरक्षित होत नाही. ते हत्यार प्रसंगी आपल्याच संरक्षणाला वापरण्याचीही मुभा नसलेल्या फ़ौजा काय कामाच्या? त्यामुळे मानवी जगात सिंह आणि श्वापदांचीच शिकार होऊ लागलेली आहे. ती बघितली तर श्वापदांना नव्हेतर सामान्य जंगली पशूंनाही मानवी संस्कृतीची भिती वाटल्याशिवाय रहाणार नाही. किंबहूना अशा संस्कृतीला कंटाळून व घाबरून लोक आपणच आपल्या सुरक्षेला सिद्ध होऊ लागले आहेत. त्यातून जगातल्या कुठल्याही देशात अराजक सोकावत चालले आहे. कारण मानवी बुद्धीला पाशवी विकृतीने पछाडलेले आहे. त्यातून मुक्ती मिळण्याचा एकच मार्ग आहे, तो माणसांना जंगली कायद्यापर्यंत घेऊन जाणार आहे.

No comments:

Post a Comment