Tuesday, June 13, 2017

कॉग्रेसी पुरोगामी वर्णव्यवस्था

अवघ्या दोन आठवड्यापुर्वीचीच तर गोष्ट आहे. तेव्हा केंद्र सरकारने दुभत्या पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी खरेदीविक्री संबंधी एक आदेश जारी केला होता. त्यालाच गोमांस भक्षणावर बंदी ठरवून देशभर गदारोळ माजवण्यात आला. मग काय भाजपा सरकारला कोंडीत पकडण्यासाठी टपलेल्या पक्षांना मोकाट रान मिळाले होते आणि एकाहून एक भडक प्रतिक्रीया उमटलेल्या होत्या. त्यातून इशारा घेऊन केरळच्या काही युवक कॉग्रेस कायकर्त्यांनी विनाविलंब गोमांस मेजवानीचे आयोजन केले. त्याला भरपूर प्रसिद्धी मिळावी म्हणून भर चौकात एक वासराची हत्या करून तिथेच त्याचे मांस शिजवण्याचा जाहिर कार्यक्रम आयोजित केला. त्यातून इतकी मोठी संतप्त प्रतिक्रीया देशभर उमटली, की पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल माध्यमाचा वापर करीत, आपल्याच त्या युवक कार्यकर्त्यांचा निषेध केला होता. त्यांची पक्षातून तात्काळ हाकालपट्टी केली होती. राहुलच्या या तत्परतेमुळे पक्षाची प्रतिमा किती उंचावली, त्याचा हिशोब अजून मिळायचा आहे. पण त्या युवकांनी असे कशाला केले असावे, त्याचाही शोध घेण्याची कॉग्रेस पक्षाला गरज वाटली नव्हती. राहुलनाही त्याची आवश्यकता वाटली नाही. पक्षाच्या भूमिकेशी अमान्य असलेली कृती करण्याला इतकी कठोर व तात्काळ शिक्षा असेल, तर तसे अनेक गुन्हे आजवर घडलेले आहेत आणि घडतच आहेत. त्यांच्याविषयी राहुल गांधी इतके निष्क्रीय कशाला रहात असतात? जी शिक्षा केरळच्या त्या युवक कार्यकर्त्यांना फ़र्मावण्यात आली, तशीच शिक्षा मग दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांच्या कुपुत्रालाही तात्काळ मिळायला नको काय? त्याचाही गुन्हा तितकाच भयंकर व पक्षाच्या प्रतिमेला काळिमा फ़ासणारा आहे. मग केरळचे युवक कर्यकर्ते आणि संदीप दिक्षीत यांच्यात कुठला मूलभूत फ़रक आहे, की त्यांना मिळणारी वागणूक भिन्न असावी?

संदीप दिक्षीत हे कॉग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांना पक्षात इतके मोठे पद मिळण्यासाठी त्यांच्यापाशी अशी कुठली गुणवत्ता आहे? त्यांनी पक्षासाठी असे कोणते मोठे कार्य बजावलेले आहे? त्याचा भिंग घेऊन शोध घेतला, तरी हाती काही लागणार नाही. फ़क्त जन्मघर सोडले तर अन्य कुठलीही खास गुणवत्ता त्यांच्यापाशी नाही. इंदिराजी व पंडित नेहरू यांचे निकटवर्तिय आजोबा आणि मुख्यमंत्री आई; ही संदीप दिक्षीत यांची एकमेव गुणवत्ता त्यांना कॉग्रेससाठी मोठा नेता बनवत असते. तर त्यांना सुखव्स्तु कुटुंबातील असल्याने चुरचुरीत फ़ाडफ़ाड इंग्रजी बोलता येते, ही त्यांची व्यक्तीगत गुणवत्ता आहे. इतके सोडल्यास पक्षासाठी त्यांचे योगदान शून्य आहे. पण कॉग्रेसमध्ये तितकीच प्रमुख पात्रता आवश्यक असते. तुमचे जन्मदाते वा कुटुंब कुठली तरी सत्ता वा पद भोगलेले असायला हवेत. मग विनाविलंब कॉग्रेस पक्षात तुम्हाला महत्वाचे स्थान प्राप्त होत असते. त्याच कारणास्तव २००९ सालात संदीप दिक्षीत दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी मिळवू शकले आणि आज कुठले सत्तापद नसताना प्रवक्ते म्हणूनही त्यांचीच वर्णी लागली आहे. अशा नव्या पिढीतील अनेक कॉग्रेस नेत्यांची लांबलचक यादीच देता येईल. त्याची सुरूवातच राहुल गांधींपासून होते. मग जसजसे कनिष्ठ स्तरावर उतरत जाल, तसे ग्रामीण भागापर्यंत कॉग्रेस ठराविक घरांपर्यंत वारशाची मालमत्ता म्हणावी, असा पक्ष होऊन गेला आहे. त्यामुळेच कुणा महत्वाकांक्षी वा कर्तबगार तरूणाला तिथे वाव राहिलेला नाही, की स्थान उरलेले नाही. वारशात सातबारामध्ये नाव लागावे, तसे कॉग्रेस पक्षाचे होऊन गेले आहे. पण अशा वारसांनी निदान असलेला पक्ष वा त्याची प्रतिष्ठा जपावी, इतकीही अपेक्षा अधिक आहे काय? कारण असे मालमत्तेवर बसलेले भुजंग वा वारस, आपल्या नाकर्त्या वागण्याने पक्षाची उरलीसुरली पतही संपवण्याचे काम करीत असतात.

मागल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसने सत्ता गमावली व इतिहासात कधी नव्हे इतका मोठा दारूण पराभव पत्करला आहे. अनेक होतकरू वा क्रियाशील कार्यकर्ते व नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तरी राहुलना त्याची पर्वा नाही. त्यांच्या लेखी आपल्या वडीलार्जित पक्षाचे भलेबुरे वारसांकडूनच होईल. म्हणून तर पक्षाच्या कुणा जुन्या वारसाने कितीही बुडवेगिरी केली, म्हणून त्याला हात लावला जात नाही. पण पक्षात उमेदवारी करू बघणार्‍या कुणाची इवली चुक झाली, तरी त्याला विनाविलंब हाकलून लावले जाते. किंवा शिक्षा फ़र्मावली जाते. केरळात वासरू कापणारे कार्यकर्ते तरूण उतावळे व मुर्खच असतील. पण त्यांचा गुन्हा तपासलाही गेलेला नव्हता. तडकाफ़डकी त्यांना निलंबित करण्यात आलेले होते. पण संदीप दिक्षीत यांच्या गुन्हाचा देशव्यापी गवगवा झाला व पक्षाच्या अन्य प्रवक्त्यांनी त्याची जबाबदारी नाकारली आहे. पण म्हणून संदीपला पक्षाने हात लावलेला नाही. कसा लावणार? संदीपच्या तीन पिढ्या पक्षात आहेत आणि त्यांनी मोठी सत्तापदे उपभोगलेली आहेत. पक्ष संघटना उभारण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी गुरसारखे राबायचे असते आणि वारसांनी सत्तापदे उपभोगायची असतात. ह्यालाच तर वर्णव्यवस्था म्हणतात ना? ती कायम असते. पुर्वी ती जन्माधिष्ठीत होती आता ती पक्षाधिष्ठीत झालेली आहे. विचाराधिष्ठीतही होते आहे. त्यामुळेच संदीप दिक्षीतना शंभर गुन्हे माफ़ असतात. पण सामान्य कार्यकर्त्याला किरकोळ चुकही क्षम्य नसते. कारण कॉग्रेसी पुरोगामी वर्णव्यवस्थेमध्ये प्रत्येक पिढीतून एका वर्णाची बढत मिळत असते. संदीप दिक्षीतच्या तीन पिढ्या कॉग्रेसी वर्णव्यवस्थेमध्ये प्रस्थापित झालेल्या आहेत. त्याला कोण शिक्षा देऊ शकतो? त्याने पक्ष बुडवावा किंवा मातीमोल करावा. राहुल गांधींनी नाही का, सर्जिकल स्ट्राईकला ‘खुन की दलाली’ संबोधून कॉग्रेसला गोत्यात घातलेले होते?

अशा पक्षीय पुरोगामी वर्णव्यवस्थेमध्ये कुठले शब्द वा कृती हा गुन्हा नसतो. तर ती कृती कोणी केली वा तसा शब्द कोणी उच्चारला, यानुसार गुन्हा ठरवला जात असतो. त्यात संदीप दिक्षीत वा मणिशंकर अय्यर अशा उच्चवर्णियाने शिव्याशाप दिले तरी त्याला शिव्यांना ओव्या मानाव्यात, अशी कॉग्रेसच्या नियमावलीत मांडणी केलेली आहे. तसे नसते तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काढलेल्या अध्यादेशाला ‘नॉनसेन्स’ अशा शेलक्या भाषेत नाकारणार्‍या राहुल गांधींना खुद्द मनमोहन सिंग यांनी कशाला डोक्यावर घेतले असते? मनमोहनजी कोणी फ़डतूस व्यक्ती नाहीत. ते उच्चविद्याविभूषित आहेत आणि अमेरिकेत जागतिक नेत्यांच्या गोतवळ्यात ते वावरत असताना, मायदेशातून त्यांचा ‘नॉनसेन्स’ असा गौरव राहुलनी केलेला होता ना? कोणी त्याबद्दल नाराजी तरी व्यक्त केली काय? लालकृष्ण अडवाणी यांनी वेळोवेळी मनमोहन यांचा दुबळा पंतप्रधान असा उल्लेख केल्यावर प्रत्येक कॉग्रेसवाला चवताळून उठत होता. पण राहुलनी त्याच पंतप्रधानाला ‘नॉनसेन्स’ संबोधल्यावर कोणी तक्रार केलेली नव्हती. कारण राहुलनी ‘नॉनसेन्स’ ठरवणेही गौरवास्पद असते आणि तुम्हीआम्ही तेच मनमोहन यांच्यविषयी बोललो असतो, तर त्यांचा घोर अपमान झाला असता. असा पुरोगामी कॉग्रेसी वर्णव्यवस्थेचा मामला असतो. याचे भान केरळच्या त्या युवक कॉग्रेस कार्यकर्त्यांना राहिले नाही आणि त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. संदीप दिक्षीतला त्याची फ़िकीर नाही. त्याच्या पाठीशी पुर्वजांची पुण्याई आहे. तशी ती नरेंद्र मोदींच्या मागे नाही किंवा भारतीय सेनादलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याही पाठीशी नाही. मोदी, रावत यांच्यासह आपण सगळे कनिष्ठ तळागाळाच्या वर्णातले असतो ना? मग आपण बोललो तरी गुन्हा असतो. आपण नुसते बोललो तरी पुरोगामी उच्चवर्णियांची गळचेपी होते आणि असंहिष्णूता सुरू होत असते.

No comments:

Post a Comment